वडाच्या झाडाचे आत्मवृत्त


सुप्रभात मुलांनो, मी वडाचे झाड बोलतोय. आज तुम्हाला मी माझ्याबद्दलची काही माहीती सांगणार आहे. मुलांनो मला पुर्वापासुन ‘वटवृक्ष’ किंवा ‘वडाचे झाड’ या नावाने संबोधले जाते. तुम्हाला माहीत असेलच मी भारतीय संस्कृतिचा एक भाग आहे. वटपोर्णीमेला तुमची आई/आज्जी तुमच्या आजोबांच्या, बाबांच्या निरोगी, दीर्घ आयुष्यासाठी फेऱ्या मारताना तुम्ही पाहीलेच असेल. माझ्या अंगाच्या चारही बाजुने, खोडातुन फुटलेल्या मुळ्या, ज्याला तुम्ही पारंब्या म्हणता, त्या जमीनीच्या आत पर्यंत पोहोचलेल्या असतात. माझे आयुष्य खुप दीर्घ आहे, अगदी तुमच्या आजोबांच्या जन्मापुर्वीही आमचा जन्म झालेला आहे. त्यामुळे तुमच्या वेळेपर्यंत आमची प्रचंड वाढ झालेली तुम्हाला दिसत आहे. आम्हाला “अक्षय वृक्ष’ असेही म्हणतात, कारण आमचा क्षय म्हणजे अंत होत नाही. याला ज्या पारंब्या फुटतात, त्या पारंब्या जमिनीत शिरकाव करून मुख्य झाडाला आधार देत आपला विस्तार करतात.

मुलांनो तुम्हाला माहीती आहे, आम्हाला वर्षभर फळे येत असतात, अनेक दुर्मिळ पक्षी ती फळे खाण्यासाठी येतात. महाराष्ट्राचे मानचिन्ह असणारा “हरियल’ हा पक्षी मेजवानीसाठी अतिशय दुरून या झाडाकडे आकर्षित होतो. माकडे, खारी, वटवाघळे, धनेश, पोपट, बुलबुल इत्यादी पक्षी वडफळांवर ताव मारण्यासाठी कितीतरी खेटा या झाडावर मारतात. निसर्गाच्या अन्नसाखळीमध्ये उंदीर हे घुबडांचे अन्न आहे. या घुबडांना वटवृक्षाच्या ढोल्या निवारा पुरवतात. आमची मुळे पाण्याच्या शोधात आडवी वाढून खूप लांबपर्यंत जातात. जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर थांबविण्यासाठी या आमचा उपयोग होतो. आम्ही ५०० गॅलन वाफ बाहेर टाकत असतो त्यामुळे उन्हाळ्यातही आमच्याखाली जास्त गारवा असतो.

कित्तेक पिढ्या आमच्या अंगाखांद्यावर कधी वटपोर्णिमा, तर कधी सुरपारंब्या, कधी क्षणीक विसावा तर कधी गावच्या पंचायतीच्या निमीत्ताने बागडुन गेलेल्या आहेत. खुप आनंद वाटतो तुमचा सगळा परिवार वाढताना बघुन.

पण आता, खरं सांगु तर मी खुप दुःखी आहे. तुमच्या राज्यामध्ये रस्त्यांचे जे जाळे आहे ते विकासात्मक कामासाठी रुंद करणे अपरिहार्य आहे आणि ही कामे करताना आमचे असंख्य भाऊ-बंध तोडले गेले आहेत, तोडले जात आहेत. शहरी भागात वटपूजनासाठी झाडाजवळ जाण्याऐवजी आजच्या कार्यमग्न महिला बाजारातून एखादी वडाची फांदी विकत घेतात आणि त्याची पूजा करून दुसऱ्या दिवशी ती फांदी फेकून देतात, ही तर या झाडाची विटंबना आहे, पूजा नव्हे ! यामुळे असंख्य चांगल्या वडाच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी झालेली आपल्याला दिसते, यामुळे या अक्षय वृक्षाला आपण ग्रहण लावत आहोत.

आधीच संख्येने कमी असलेले वटवृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्ग जे आपल्याला भरभरून देतो, त्याची परतफेड आपल्याला करायला नको का?

तुमचे दिवाणखाने सजवण्यासाठी लोकप्रिय ठरलेला “बोन्साय” चा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. विशाल, अजस्त्र अशी बिरुद मिरवलेला वड आज एका छोट्याश्या टेबलावर तुमच्या दिवाणखान्याची शोभा बनु पहात आहे, हे रुचते का तुम्हाला?

मुलांनो, हे कुठेतरी थांबवायला हवे. वडाची वृक्ष तोड थांबायला हवी. मग करणार ना तुम्ही मला मदत, आज तुमच्या पिढीने पुढाकार घेतला तरच.. तरच तुमच्या मुलाबाळांना हे वटवृक्ष पहायला मिळतील.

एवढे बोलुन तो महाकाय वड शांत झाला.

11 thoughts on “वडाच्या झाडाचे आत्मवृत्त

  1. Sayrabano Patil

    it’s nice and a notice for us that we have to save trees so please guys don’t cut trees.
    If u like my thought then please like my message

    Reply

Leave a reply to Sayrabano Patil Cancel reply