Monthly Archives: March 2009

स्त्री, अशी तु!!


आज पर्यंत स्त्री ची अनेकविध रुप आपल्या समोर आली आहेत. कधी सत्य कथांमधुन तर कधी टि.व्ही वर दाखवलेल्या बटबटीत व्यक्तीरेखांमधुन. पण स्त्री नक्की कशी आहे? अश्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या स्त्री आणि पुरूषांमधले फरक स्पष्ट करते.

स्त्री-बिज आणि पुरूष बिज यांच्या मिलनातुन ‘एम्ब्रियो’ जन्माला येतो. पहिले आठ आठवडे स्त्री आणि पुरुष ‘एम्ब्रियो’ जवळजवळ एकसारखेच असतात. दोन्हीमध्ये अधोरेखीत करणारा एकच फरक असतो आणि तो म्हणजे ‘क्रोमोसोम्स’ चा. डी.न.ए हा क्रोमोसोम्स भोवती घट्ट गुंडाळलेला असतो. स्त्री बिजामध्ये दोन ‘X’ क्रोमोसोम्स असतात तर पुरुष बिजांडामध्ये एक ‘X’ आणि एक ‘Y’. पहिले काही आठवडे क्रोमोसोम्स चे हेच समीकरण पुरुष किंवा स्त्री लिंग यातील फरक स्पष्ट करत असतो.

अर्थात जेंव्हा स्त्री किंवा पुरूष जन्माला येते तेंव्हा इतर बरेच घटक असतात जे दोन्हींमधील फरक स्पष्ट करतात. सर्वसाधारणपणे स्त्री ही पुरुषापेक्षा उंची आणि सर्वांगाने बारीक असते, पण स्त्रीमध्ये चरबीचे प्रमाण पुरुषापेक्षा जास्ती असते (एकुण शरीराच्या मानाने) स्त्रीला नविन मानव जन्माला घालण्यासाठी असणारे अवयव आणि नंतर बाळाचे सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक असणारे इतर घटक उपलब्ध असतात. स्त्रीयांचा रक्तदाब हा पुरुषांपेक्षा थोडा कमी, तर ह्रुदयाचा प्रति-मिनीट धडकण्याचा वेग जास्त असतो. मेंदुकडे होणारा रक्तप्रवाह हा सुध्दा स्त्रियांमध्ये जास्ती असतो आणि त्यामुळेच मेंदुंच्या पेशींची होणारी झीज ही पुरुषांच्या तुलनेने कमी असते.

स्त्रिया या पुरुषांपेक्षा जास्त भावनाशील असतात का? स्त्रीया पुरुषांपेक्षा जास्ती रडतात का?
साधारणपणे स्त्रिया या पुरुषांपेक्षा जास्ती रडतात असे आढळुन आले आहे. परंतु लहान मुले किंवा मुली यांच्यामधे फारसा फरक दिसत नाही. २००५ चे न्युयॉर्क आर्टीकल च्या निरीक्षणानुसार वयाच्या १८ व्या वर्षी स्त्रिया पुरूषांपेक्षा चार पट अधीक रडतात. कदाचीत याचे एक कारण असे असु शकते की प्रोलॅक्टीन (प्रोटीन हॉर्मोन) चे प्रमाण हे स्त्रि/पुरूष किती प्रमाणात रडतो हे ठरवत असतो.

प्रोलॅक्टीन हा घटक रक्तात आणि अश्रुंमध्ये सापडतो, आणि त्याचे प्रमाण हे पुरुषांपेक्षा स्त्रीयांमध्ये अधीक सापडते. स्त्रियांच्या डोळ्यात असणारी अश्रुंसाठिची खोबण ही सुध्दा पुरुषांपेक्षा थोडी वेगळ्या आकाराची असते. अजुन एक कारण असेही असु शकते की, काही समाजामध्ये पुरुषांचे रडणे हे कमी पणाचे/ बायकीपणाचे लक्षण समजले जाते, आणि स्त्रीयांना मात्र मोकळेपणाने रडण्याचे स्वातंत्र्य असते.

स्त्रियांची ताणतणाव आणि चिंता पेलण्याची शक्ती
स्त्रिया सामाजीक आणि कौटुंबीक घटकांबाबतीत पुरुषांपेक्षा जास्ती चिंतातुर असतात. असे असले तरी तो ताण सहनकरण्याची शक्ती ही पुरुषांपेक्षा स्त्रीयांमध्ये अधीक प्रमाणात आढळते. मेंदुमध्ये असणारा ‘amygdala’ हा घटक भीती किंवा ऍन्क्झायटी चे प्रमाण ठरवण्यास कारणीभुत असतो. पुरुषांमध्ये ‘amygdala’ भिती, चिंता, तणाव या जाणीवांची माहीती आणि इतर संदेश वहन हे त्या घटकांबरोबर केले जाते जे दृष्य गोष्टींची माहीती संकलीत करतात आणि त्यावर जी प्रतीक्रिया घ्यायची त्याची माहीती अवयवांना देतात. पण स्त्रियांच्या बाबतीत अश्या गोष्टींची देवाण-घेवाण ही मेंदुमध्ये ‘हार्मोन्स’ निर्माण करणाऱ्या घटकांबरोबर केली जाते. यामुळेच की काय चिंता, ताणतणाव याचे पडदास स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्या शरीरयष्टीवर दिसुन येतात. उदाहरणार्थ डोळ्याखालील काळी वर्तुळ, चेहऱ्यावरील सुरकुत्या वगैरे. तस पाहीले तर, ताणतणाव निर्माण करणारे किंवा ते झेलणारे ‘हार्मोन्स’ची निर्मीती ही स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्ती होते. त्यामुळे एखादा तणाव/चिंतेचा प्रसंग घडुन गेल्यानंतर ही हार्मोन्स ची निर्मीती बंद व्हायला स्त्रियांना जास्ती वेळ लागतो. कदाचीत यामुळेच त्या घटनेचा मनामध्ये विचार स्त्रियांच्या अधिक प्रमाणात आणि अधीक काळापर्यंत चालु असतो.

[सोर्स – howstuffworks.com]

मेडीटेशन.. नक्को रे बाबा


उन्हाळा असह्य होत चालला आहे. रोज ७ कि.मी सायकलने ऑफिसला यायचे आता खरंच जिवावर यायला लागले आहे. थंडीत मज्जा आली पण आता नको वाटतेय. ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत घामाच्या धारा लागलेल्या असतात. कधी एकदा आत जाउन ए/सी चा थंड वारा अंगावर घेतो असे झालेले असते.

तर परवा दारावरचा बघणारा माणुस (वॉचमन) म्हणाला साहेब आल्या आल्या असे ए/सी मध्ये बसु नका, जरा वेळ बाहेरची हवा खा, शरीराचे तापमान ‘सेट’ होऊ द्या वगैरे वगैरे!! नाहीच, तर निदान लगेच कामाला नं लागता थोडा योगा किंवा मेडीटेशन तरी करा.

शेवटी म्हणलं चला बघुया तरी ‘मेडीटेशन’ काय प्रकार आहे ते. सकाळी विशेष काम पण नव्हते मग महाजालावर धुंडाळुन ‘मेडीटेशन’ संबंधीत काही संगीत फाईल्स (mp3) उतरवुन घेतल्या. ईयरफोन लावले आणी ए/सी चे गार वारे अंगावर घेत ऐकत बसलो.

पहिल्यांदा पक्षांचा किलबीलाट वगैरे झाला, मग संथ आवाजातील बासरी, सितार वगैरे वाजली. नंतर संथ धबदबा किंवा नदीचा आवाज. जोडीला कोमल आवाजात एका युवतीने सुचना द्यायला सुरुवात केली.

डोळे बंद करा, दिर्घ श्वास घ्या, सोडाss.. घ्या.. घ्या.. घ्या…. घ्या.. (डोळ्यासमोर पोट फुगवलेल्या बेडकीचे चित्र आले होते…). सोडा… (हुश्शsssss). असे २-३ दा झाले.
मग म्हणे दोन डोळयांच्या बरोब्बर मध्ये एक बिंदु दिसतोय का.. (दिसला.. चॉकलेटी रंगाचा..) त्यावर लक्ष केंद्रित करा. निट लक्ष द्या.. तो बिंदु तिव्र होत जाईल. (नाही झालं). शांत व्हा.. (झालो..) खांदे सैल सोडा. पाण्यावर तरंगण्याचा भास निर्माण करा. पाण्याचा प्रवाह जिकेडे घेउन जाईल तिकडे वहावत जा.. (पुढे धबधबा नाहीये ना नक्की??)

पहिल्यांदा मजा वाटली आणि पण नंतर हळु हळु त्यात गुंगत गेलो, परिस्थितीचे भान राहीले नाही, मग एकदम ऑफीसमध्ये आहे याची जाणिव झाली आणि ते संगीत बंद करुन टाकले. पण काय सांगु मन फारच शांत झालेय हो..! काही करावेसेच वाटत नाहीये, प्रचंड झोप आली आहे आणि थोड्याच वेळात क्लायंट बरोबर ‘कॉल’ आहे. कसं होणार हो माझं??

कॉफी पिउन यावे म्हणुन उठीन म्हणतोय पण कसले काय.. मन अजुनही पाण्याच्या त्या प्रवाहात वाहतच चाललेय.. कुठुन दुर्बुद्धी झाली आणि सकाळी सकाळी असले प्रकार केले.

मेडीटेशन.. नक्को रे बाबा, निदान कामावर असताना तरी नक्कोच..!!!

बार्बी डॉल


आम्हाला मुलगी व्हावी असं फार वाटत होतं, पण मुलगा झाला. त्यानंतर मात्र त्याचे आणि माझे मस्त मेतकुट जमलं. पण २-३ दिवसांपुर्वी परत एकदा वाटले मुलगी पाहीजे होती राव. मग मी माझ्या मुलाच्या मागेच लागलो, चल तुला बाहुली घेउन देतो. गाड्या, बंदुकांमध्ये रमणाऱ्या त्याला बाहुलीचे ते काय आकर्षण तो काही ऐकायला तयार नाही, मी मात्र त्याला बार्बी डॉल घेउन द्यायच्या इराद्यानेच पेटलो होतो. बायको पण चकीत, “अरे मुलं कधी बाहुली खेळतात का?” पण नाही.

नेमकं दुर्दैव आड आलं आणि बायकोला दुरचित्रवाणी चाळताना ‘ती’ बातमी दिसली “कॅटरीना कॅफ बार्बी डॉलच्या वेशात रॅम्प वर” झालं, तिने जे उशीने आणि शब्दाने मला बडवलेय म्हणुन सांगु, “अरे.. ३ वर्ष मुलाचा बाप ना तु, हिच शिकवण देणार का तु मुलाला??’ वगैरे वगैरे.

पण काही असो, ‘कॅट’ काय दिसत होती राव बार्बी-डॉल च्या पेहरावात!! काही दिवसांपुर्वीच तिची ती ‘आमसुत्र’ ची जाहीरात बघुन घायाळ झालो होतो, जेव्हा ती तो आंबा आपल्या कोमल हातांनी असा आवळतेना!!.. अंगावरुन मोरपीस फिरल्यागत होतं बघ्घा अगदी. आत्ता जर मी शाळेत असतो आणी ‘मी आंबा झालो तर?’ असा काही विषय ‘कल्पनाविस्तार’ म्हणुन आला असता ना तर सांगतो पैकीच्या पैकी मार्क मिळवले असते. ‘मी सलमान खान झालो तर?’, ‘मी अक्षय कुमार असतो तर?’, ‘मी ब्रिटनचा राजकुमार असतो तर?’, ‘मी विजय मल्या असतो तर?’ असे अनेक निबंध माझ्याकडे तयार आहेतच 🙂

काही लोकं, मला वाटतं, उगीचच ‘कॅटरीना’ आणि ‘ऍश’ ची तुलना करतात. माझ्या मते ऍश ला उगीचच लोकांनी डोक्यावर चढवलयं ती कुठं आणि आपली ‘कॅट’ कुठं.

गिधाडांची जातच चिवट


एखादी गोष्ट तुम्हाला अगदी ‘डेस्परेटली’ पाहीजे असते. तुम्ही सगळीकडे शोधता आणि मिळतच नाही. तुम्ही निराश झालेले असता, काही दिवसांनी त्या गोष्टीचा विसरही पडलेला असतो, आणि एक दिवस ती गोष्ट सहजच, अगदी सहजच काहीतरी शोधाशोध करताना सापडली तर काय होईल? अत्यानंद नाही का?

अगदी तसेच माझे आज झाले. तसा मी दर्दी वाचक वगैरे नाही. मी फार कमी पुस्तक वाचतो, इंग्रजी तर त्याहुनही कमी. पण ‘जेम्स हॅडली चेस’ आणि ‘सिडने शेल्डन’ यांच्या पुस्तकांचा मी नित्सीम चहाता आहे. सापडले की मी अक्षरशः तुटुन पडतो. ‘सिडने शेल्डन’ ची पुस्तक मोठ्ठी असल्याने एका बैठकीत होत नाहीत पण ‘जेम्स हॅडली चेस’ मात्र मी घेतले की संपल्यावरच उठतो. दोघेही ‘क्रिमीनल’ गोष्टी लिहीण्यात अगदी पटाईत. ‘जेम्स हॅडली चेस’ म्हणजे तोच ज्याच्या कथानकातील काही गोष्टी ‘जॉनी गद्दार’ या चित्रपटात घेतल्या आहेत, रेल्वेमध्ये ज्याचे पुस्तक वाचतानाही चित्रपटातील नायकाला दाखवले आहे.

तर सांगण्याचा मुद्दा हा की, आज महाजालावर मी उगाचच इकडुन तिकडे काहीतरी शोधाशोध करत होतो आणि एका ठिकाणी मला ‘जेम्स हॅडली चेस’ ची ‘ई-बुक्स’ मिळाली. इतका आनंद झालाय म्हणुन सांगु. मी अक्षरशः संगणक-स्क्रिनला पापेच द्यायला लागलो.

तर सगळ्यात पहिल्यांदा ‘Vulture is a patient bird’ (गिधाडांची जातच चिवट) नावाचे पुस्तक हाती घेतले आहे. धर्मेंद्रचा ‘शालीमार’ हा चित्रपट याच पुस्तकावर बेतलेला आहे. आता उपकार केल्यासारखे पटापट जेवणार आणि मस्त कथानकात आकंठ बुडुन जाणार.

ज्यांना ‘जेम्स हॅडली चेस’ ची पुस्तकं आवडतात / उत्सुकता आहे त्यांच्यासाठी पुस्तकाच्या डाउनलोडची लिंक सोबत देत आहे.

गिधाडांची जातच चिवट

दुपारी साडेअकरापर्यंत गुढी उभारण्यास मुहूर्त


गुढी उभारु भाग्याची

गुढी उभारु भाग्याची


“साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या शुक्रवार(ता. 27)च्या गुढीपाडव्यासाठी शुक्रवारी सकाळी साडेसहा ते दुपारी साडेअकरापर्यंत उत्तम मुहूर्त आहे. गुढीची उभारणी शास्त्रशुद्ध पद्धतीने करावी,” असे येथील दिगंबरशास्त्री जोशी यांनी “सकाळ’शी बोलताना सांगितले.
श्री. जोशी पुढे म्हणाले, “”गुढी शक्‍यतो घराच्या दारातच उभारावी. गुढी उभारण्याची जागा शक्‍य असल्यास सारवून घ्यावी किंवा स्वच्छ धुऊन घ्यावी. लाकडी काठी पाण्याने पुसून घ्यावी. त्या काठीला अत्तर लावावे. हळदी-कुंकवाचे पट्टे काठीवर ओढावेत. नवीन साडी किंवा महावस्त्र काठीच्या एका टोकाला दोरीने बांधावे. त्यावर तांब्या ठेवावा. तांब्याचा तांब्या गुढीसाठी चांगला असतो. पण तो नसेल तर स्टीलचा गडवा लावला तरी हरकत नाही. त्याला कडुलिंबाची पाने, साखरेच्या गाठी व फुलांचा हार घालावा. नवीन वस्त्रे परिधान करून विघ्नहर्त्या गणरायाचे व कुलदैवताचे स्मरण करून काठीची पूजा करावी. गुढीला कडुनिंबाच्या पानांचा नैवेद्य दाखवावा.”
यंदाचे नूतन संवत्सर “विरोधी’ नावाचे असल्याचेही जोशी यांनी सांगितले.

[सौजन्य: ई-सकाळ]

लग्नाचा परवाना


“License to Wed”, अर्थात ‘लग्नासाठीचा परवाना’ असा एक हॉलीवुडचा सिनेमा बघण्यात आला. नेहमीप्रमाणेच कथानकातील नावीन्य हा एकमेव फॅक्टर ‘हॉलीवुड’ पटांना यशस्वी बनवतो. ही कथा आहे एका जोडप्याची. त्या शहरात लग्न करण्यासाठी तुम्ही काही परीक्षा उत्तीर्ण होणे महत्वाचे असते. त्या गावातील ‘फादर’ या परीक्षा घेत असतो. या एक एक परीक्षा खऱ्या अर्थाने त्या जोडप्याची परीक्षा पहाणाऱ्या असतात, आणि त्या पुऱ्या करताना होणारी त्यांची त्रेधा-तिरीपीट पहाताना आपली मात्र हसुन हसुन मुरकुंडी वळते.

अशीच एक परीक्षा, त्या जोडप्याला सांभाळायला म्हणुन तो फादर दोन ‘रोबोट बाळ’ देतो. हे जोडपे त्या बाळांना आणि त्यांच्याच ओळखीच्या दोन मुलांना घेउन मॉल मध्ये खरेदी करायला जातात. फादर आणि त्यांचा हस्तक हातात ‘बेबिज’ चा रिमोट कंट्रोल घेउन मॉल मध्ये त्यांना छळायला हजरच असतात. पुढे काय होते हे सांगुन मी तुमचा रसभंग करणार नाही. खुप हसायची तयारी असेल तर हा विडिओ जरुर बघा.

अधुरी प्रेम कहाणी


पावसाळी दिवसातील ती दुपार होती, साधारण २-३ वाजले असतील पण सूर्याचा कुठेच ठाव-ठिकाणा नव्हता.  आकाश काळ्या ढगांनी भरले होते, पावसाची बारीक-बारीक रिपरिप चालूच होती., सगळी धरती हिरवी-गार झाली होती, नारळाची झाडे मुक्त होऊन वाहणाऱ्या वाऱ्या बरोबर डोलत होती. घरात बसूनही कंटाळाच आला होता, मग कपडे चढवले, पायात चप्पल अडकवली आणि सरळ बाहेर पडलो.  रत्नागिरीत तशी मनोरंजनाची ठिकाणे फार नाहीत. मग जायला कुठली वाट नसली की मी सरळ समुद्र किनाऱ्याची वाट धरतो.  समुद्राची रूप पण किती वेगवेगळी असतात, सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशात अवखळ भासणारा हाच समुद्र, दुपारी मात्र अंतःकरणात फार मोठे गुपित साठवून वागणाऱ्या गंभीर माणसासारखा भासतो. ओहोटीला, रुसून बसलेल्या मुलासारखा आपल्यापासून दूर जाऊन बसतो, तर भरतीला शत्रू सैन्यावर धावून जाणाऱ्या, विजयश्रीसाठी आसुसलेल्या सैन्यासारखा.

पावसात भिजत, समुद्राच्या हळुवार लाटा पायावर घेत किनाऱ्यावरून फिरण्यात जे सुख आहे ते काय वर्णावे. पण आज मला कशातच आनंद वाटत नव्हता. त्या विशाल समुद्रासमोर माझे एकटेपण मला जास्तच बोचत होते.  ज्या हातात कुणाचा हात नाही, त्या हाताचा उपयोग तरी काय? आपली कुणीतरी असावी, जवळची. मनातले सगळे विचार तिच्यासमोर मोकळे करून टाकावेत, आपण बोलत राहावे आणि तिने ऐकत राहावे, आणि तिने बोलत राहावे आणि आपण ऐकत राहावे. तिच्या डोळ्यात बघत..सारी दुनिया विसरून जावे असे आणि बरेचसे विचार मनात गर्दी करून होते.  माझी तंद्री भग्न पावली ति कोणाच्या तरी आवाजानेच. कोणीतरी मला हाक मारत होते. मागे वळून पाहिले तर नेहा पळत येताना दिसली.

नेहा, माझ्या वर्गातली एक गोड चेहऱ्याची, गोड आवाजाची, मुलगी. .कोणालाही आवडावी अशीच. माझी आणि तिची फारशी ओळख नव्हती. काही दिवसांपूर्वीच तिचे वर्गातीलच विनीत या मुलाशी जमले.  खरं तर या बातमीने सगळ्यांनाच तसा धक्का बसला. विनीत दिसायला नीट-निटका, श्रीमंतीचा वारसा लाभल्याने नवीन नवीन गाड्या, सिनेमे, पार्ट्या यामध्येच रमणारा, त्याचे मित्रही थोडेसे गुन्हेगारी प्रवृत्तीचे. कॉलेजमध्ये अधून-मधून घडणाऱ्या हाणामारीच्या प्रकरणात आघाडीची भूमिका बजावणारे. माझी आणि विनीतची तशी सुरुवातीला चांगली ओळख होती, पण नंतर नंतर मीच त्याच्यापासून जरा दूर झालो. नेहा अजूनही पळत येत होती. वाऱ्याने तिचे लांबसडक केस पार विस्कटून टाकले होते. कपाळावर टिकली, एका हातात नाजुकसे ब्रेसलेट आणि दुसऱ्यात दररोज वेगवेगळ्या असणाऱ्या बांगड्या, आणि पांढरा शुभ्र पंजाबी. समुद्राच्या त्या पार्श्वभूमीवर मला ती एखाद्या जलपरीसारखी भासत होती. पावसाचे थेंब तिच्या चेहऱ्यावरून ओघळत होते.

“ओळखलंस मला?”, नेहा
“व्वा, तुम्हाला कोण नाही ओळखत, खरंतरं माझे नाव तुम्हाला माहीत आहे हे ऐकूनच आश्चर्य वाटले”, मी
“ए s s s तुम्ही वगैरे काय?”, नेहा
“मग काय, मोठी लोकं तुम्ही”, मी स्तुतिसुमन उधळायची काय थांबत नव्हतो. खरं तर ती माझ्याशी बोलतीय यावरच माझा विश्वास बसत नव्हता.
“पुरे पुरे.. तूच ठीक आहे.. बरं, तू एकडे कसा?” नेहा
“आलो असाच फिरत फिरत, मला समुद्राच्या किनाऱ्यावर फिरायला खूप आवडते.” मी
“हो sss  मला पण.. मी तुझ्याबरोबर इथे जरा वेळ फिरले तर चालेल ना?”, नेहा

त्यानंतर जवळ-जवळ एक तास भर आम्ही मस्त मनसोक्त गप्पा मारल्या. अगदी खूप वर्षापासून ओळख असल्यासारखी.

दुसऱ्या दिवशी कॉलेजला जरा खुशीतच गेलो. नेहाशी गप्पा मारून मित्रांवर इंप्रेशन मारता येईल हाच विचार मनात होता. पण आज नेहा वर्गात आलीच नाही, त्यामुळे सगळे तास खूप कंटाळवाणे गेले. बाहेर पडलो. कॅटीनबाहेर नेहाची गाडी दिसली, म्हणून आत डोकावून पाहिले. नेहा-विनीत आणि त्याचा ग्रुप बसला होता. विनीत तिला जोर-जोरात काहीतरी ओरडत होता. शेवटी वैतागून ती बाहेर पडली. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. नक्कीच काहीतरी भांडण झाली होती. मी बाहेरच उभा होतो. तिने एकदा माझ्याकडे बघितले आणि गाडी चालू करून निघून गेली.

मी पण माझी गाडी काढली आणि घरी न जाता, गाडी समुद्राकडे वळवली.  माझा अंदाज खरा ठरला. दूरवर नेहा गुडघ्यात डोकं खुपसून रडताना दिसली.  मला बघताच तिने डोळे पुसले, आणि दुसरीकडे कुठेतरी बघत बसली. बराच वेळ शांततेत गेला, मग तिच म्हणाली, “विनीत खरंच खूप चांगला आहे रे. त्याचे माझ्यावर खूप प्रेम आहे. पण तो माझ्या बाबतीत खूप पझेसीव्ह आहे. मी दुसऱ्या कुणाशी बोललेले त्याला आवडत नाही.. काल आपण इकडे गप्पा मारल्या ते त्याला कुणीतरी सांगितले, ते त्याला आवडले नाही. प्लीज तू त्याला समजावून सांग ना की आपल्यात तसे काही नाहीये.”

एवढे बोलून ति निघून गेली. दुसऱ्या दिवशी मी विनीत आणि नेहाला एकत्रच भेटलो. त्याला खात्री पटवून दिली की तो समजतोय तसे काही नाहीये. त्यालाही ते पटले. मग भरपूर गप्पा मारून, ती दोघ निघून गेली.

त्यानंतर त्या दोघांमधील भांडण वाढतच गेली. कारण एकच, त्याचा पझेसिव्हनेस, कधी तिने केस मोकळे सोडले म्हणून, कधी लिपस्टिक लावले, कधी शॉर्ट स्कर्ट घातला, तरी कधी अजून काही. रोजची भांडण, रोजची रडारड. कधी ती मला भेटून त्याला समजवायला सांगायची, तर कधी तो मला भेटून तिला त्याच्यासाठी मनवायला सांगायचा. एव्हाना मी या वकिलीमध्ये चांगलाच पारंगत झालो होतो.  नेहा मला म्हणाली सुद्धा, तू वकील का नाही होत, चांगले बोलता येते तुला.

कित्येक दिवस गेले, भांडण मात्र या ना त्या कारणाने चालूच होती. विनीतचा माझ्यावर थोडाफार विश्वास होता, त्यामुळे तो त्याच्या मित्र-मंडळींसोबत कुठे चालला असेल तर मला नेहा बरोबर थांबायला सांगायचा. मग तो परत येईपर्यंत मी तिच्याबरोबर गप्पा मारत बसायचो. तिचे सरदारजीचे विनोद, कधीतरी एखादी कविता, तिचे गाणे गुणगुणणे, तिच्या मैत्रिणींचे प्रॉब्लेम्स, गॉसिप्स सगळे काही मनापासून ऐकायचो.  पहिल्या-पहिल्यांदा विनीतच्या परतण्याची वाट पाहणारी नेहा, नंतर नंतर मात्र त्याच्यापासून दूर जाऊ लागली, त्याला या ना त्या कारणाने टाळू लागली. त्या दोघांमधली दरी वाढतच गेली, आणि आमच्यातले अंतर कमी कमी होत गेले.

एके दिवशी तर कमालच झाली, गावात देवीची जत्रा होती, विनीत तिला त्याच्याबरोबर यायला सांगत होता, पण बरं नाही म्हणून टाळले. इकडे, मी आणि माझे काही मित्र-मैत्रिणी जत्रेला जाणार होतो, तेंव्हा नेहाने चक्क माझ्याबरोबर यायला संमती दाखवली. हे म्हणजे माझ्यासाठी खूपच होते. मी चक्क तिला माझ्या गाडीवर बसवून जत्रेला गेलो. तिकडे आम्ही खूप मजा केली.  जत्रेत रंगांची, गुलालाची खूप उधळण झाली. मग आम्ही सगळे अंगाला, कपड्यांना लागलेला रंग धुण्यासाठी समुद्रावर गेलो. तिकडे मस्त पाण्यात खेळलो, मातीत किल्ले केले, खूप धमाल केली. माझ्यासाठी तो दिवस स्वप्नवतच होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी सहजच तिला फोन केला, बोलताना सहजच विचारले, “कालचा रंग गेला का?”.
तर म्हणाली, “तो रंग केंव्हाच गेला, पण तुझा रंग उतरतच नाहीये.
मी म्हणले, “म्हणजे काय?”
तर पटकन सारवासारव करून म्हणाली, “अरे म्हणजे तो कुठलातरी रंग तू लावलास ना, तो जातच नाहीये.”

त्यानंतर असे बऱ्याचदा होत गेले, ती मला काही सुचवायला तर बघत नव्हती?, असे तर नव्हते की ती आता माझ्यावर प्रेम करू लागली होती? नुसत्या विचारानेच माझ्या अंगावर गोड शहारे उमटले. तिच्या मैत्रिणींचा पण माझ्याशी बोलण्याचा सुर बदलला होता. नेहा कुठे दिसली नाही, की त्या मलाच येऊन विचारायच्या, आणि मग उगाचच हसत निघून जायच्या. विनीत पण मला जाता येता टॉन्ट मारायचा, “गद्दार, बेवफा, दोस्त दोस्त ना रहा” वगैरे म्हणायचा.

दिवसांवर दिवस जात होते. माझी आता खात्रीच झाली होती की नेहाच्या मनात विनीत नसून मीच आहे.

पण एक दिवस माशी शिंकली, जे होऊ नये ते घडले. नेहा आणि विनीतला मी नारळाच्या बागेत हातात हात घेऊन गप्पा मारत बसलेले बघितले. माझ्या मनात रचलेले मनोरे, क्षणात कोसळून गेले. पुढे-पुढे तर काही झालेच नव्हते असे संबंध विनीत नेहा चे जमले. एकत्र फिरणे, सिनेमा वगैरे. आमच्या कॉलेजचे लव्ह-बर्डस…

आज बऱ्या दिवसांनी, पावसाचे परत भरून आले होते. आज परत मी एकटाच होतो. चालता-चालता सहज मागे वळून पाहिले, सगळा समुद्र-किनारा रिकामाच होता. कुणीतरी मागून पळत येऊन मला हाक मारेल ही अपेक्षा व्यर्थ होती. ओल्या मातीमध्ये पावलांच्या खुणा उमटत होत्या, आणि येणारी समुद्राची प्रत्येक लाट, आळीपाळीने एक एक खुणा मिटवत होत्या, जणु काही तो समुद्रच मला मागच्या खुणा विसरून जायला सांगत होता.

दूरवर MTDC मध्ये कुठल्याश्या रिमिक्स गाण्यावर तरूण-तरूणी नाचत होते, त्यातील काही ओळी कानावर पडल्या:

” जिंदगी मे कोई कभी आए ना रब्बा..
आए तो कोई फीर जाए ना रब्बा ssss
देने हो अगर मुझे बाद मै आसू..
पहेले कोई हसाए  ना रब्बा  s s s..  पहेले कोई हसाए  ना  रब्बा  “

क्लायंट भगवान होता है


पुण्याचा अपवाद सोडला तर बहुतेक सर्वत्र ‘ग्राहक’ हाच देव मानला जाउ लागला आहे. प्रत्येक गोष्ट मग ती दुकानातील सजावट असो की विक्रीसाठी असणारे मदतगार असोत, प्रत्येक जण ‘क्लायंट-ओरीएंटेड’ झाला आहे. परंतु तरीही ‘आमचा हा असा माल आहे, पाहीजे तर घ्या नाहीतर तुम्हाला दुसरे पर्याय उपलब्ध आहेतच!!’ असा थोडाफार सुर पहावयास मिळतो.

संगणक कंपन्या मात्र याला मोठ्ठा अपवाद आहेत, विशेषः ‘सर्व्हिस बेसड़’  कंपन्या. ‘क्लायंट’ हाच भगवान आहे. तो ‘उठ’ म्हणाला की उठायचे आणि ‘बस’ म्हणाला की बसायचे हेच ब्रिदवाक्या घेउन सगळेजण ‘धक्याला’ लागलेले असतात. बिच्चारा कर्मचारी वर्ग एकीकडुन ‘क्लायंट’ आणि दुसरीकडुन ‘बॉस’ असा दुहेरी मार खात असतो.

आजचेच उदाहरण घ्यायचे झाले तर माझी कलीग ‘अपर्णा’ जी माझ्यापेक्षाही खुssप जास्ती कामसु, आणि सिन्सियर आहे. पण ग्रह फिरले की काय होते याचा प्रत्यय तिने आज घेतला. तिच्या कामाची नेहमीच ‘तोंडी’ तारीफ करणाऱ्या क्लायंटने आज मात्र क्षुल्लक चुकांसाठी आपला निषेध आमच्या ‘बॉस’ कडे ‘लेखी’ नोंदवला. 

हे पाहुन मला खरंच प्रश्न पडला, चुकांना तुम्ही जसे ‘हायलाईट’ करता तसेच चांगल्या कामांना सुध्दा करा ना. ‘मोटीवेट’ केलेत तर तुमचे काम चांगलेच होणार आहे.  डोक्यावर बसुन काम करुन घेण्यापेक्षा, कृष्णासारखे रथाचे सारथ्य करुन काम करवुन घेणे जास्त योग्य नाही का?

आमच्या कंपनीमध्ये तरी खुप चांगली परीस्थीती आहे. मित्रांकडुन जेंव्हा त्यांच्यावर बेतलेले प्रसंग ऐकतो तेंव्हा खुssप रागही येतो आणि त्यांची किवही येते. ‘क्लायंट’ म्हणेल ती पुर्व दिशा म्हणुन कामाला जुंपलेल्या त्या बिचाऱ्यांची तोंड दाबुन बुक्यांचा मार सहन करणे हीच आयुष्याची रोजनिषी झालेली आहे.

शाळा


मुलांच्या शाळा हा पुर्वीसारखा जिव्हाळ्याचा विषय न रहाता आजकाल तो चिंतेचा, संतापाचा, आर्थीक विवंचनेचा आणि एकुणच क्लेषदायक असा प्रकार झालेला आहे.

  • काही दिवसांपुर्वीच पेपरमध्ये वाचनात आले की पुण्यातील एका नावाजलेल्या मुलींच्या शाळेने शाळेची फी भरली नाही म्हणुन मुलींना शाळेत डांबुन ठेवले. शाळेचे, शिक्षणाचे व्यवसायीकरण झालेले आहे. सर्व-प्रथम दोष मी त्या पालकांना देईन. आर्थीक परिस्थीती बेताची असताना, एवढी फी देण्याची ऐपत नसताना आपल्या पाल्याला एवढी ओढाताण करुन अश्या शाळेत घालावेच कशाला? बाकीच्या शाळांमधुन शिकलेले मुलं काय पुढे मोठ्ठी होतं नाहीत? प्रगती करत नाहीत? मग हा हव्यास हवाच कशाला. एखाद्या शाळेची हजार फी म्हणुन ती वाईट आणी एखादी शाळा लाखो रुपये घेते म्हणुन ती उत्तम??? कुठल्याही शाळेत गेलात तरी पृथ्वी ही अंडाक्रृती आहे आणि २+२=४ हेच शिकवणार ना???
  • शिक्षकाने लहान-सहान मुलींचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
  • शिक्षकाने किंवा शिक्षीकेने मुलाला/मुलीला इतके मारले की तो/ती बेशुध्द पडला.
  • नेलपेंट/मेहंदी लावले म्हणुन शिक्षा
  • भरमसाठ फि आणि डोनेशन्स. माझ्या मुलाची मिनी-केजी ची फी सध्या १९ हजार फक्त आहे.   माझे संगणक पोस्ट ग्रॅड्युएशन ची प्रथम वर्षाची फी या पेक्षा कमी होती.  आम्हाला डोनेशन्स काही भरावे लागले नाही हे ऐकल्यावर तर मित्रमंडळींनी चक्क पार्टीची मागणी केली.
  • मुलाच्या ऍडमिशनच्या वेळेस शाळेत गेलो तेंव्हा एखाद्या कंपनीच्या मुलाखतीला गेल्यासारखेच वाटत होते. तुम्हीच सांगा ज्या शाळांमध्ये पालकांनाच कंफर्टेबल वाटत नसेल, तिथे पाल्य काय आनंदाने रहाणार आणि शिकणार?
  • छोट्या छोट्या गोष्टींचा मोठ्ठा इश्यु करायची सवयच आहे शाळांमध्ये. माझ्या ओळखीमधील एका कुटुंबातील मुलगा शाळेत अतीशय शांत, एकलकोंडा रहाणारा होता. मात्र घरी बाहेर चांगला खेळतो, सगळ्यांमध्ये चांगला मिसळतो. शाळेमध्ये मुख्याध्यापकिने त्याच्या पालकांना बोलावुन तुमचा मुलगा मती-मंद आहे. त्याची शारीरीक तपासणी करुन घ्या, तसेच आमच्या कन्स्लटंटला भेटा असे सांगुन कहरच केला.  त्यांच्या पालकांवर काय प्रसंग ओढवला असेल याची कल्पनाच केलेली बरी.
  • आमची शैक्षणीक शाळा कशी पारदर्शक आहे यासाठी वेळोवेळी पालक सभा आयोजायच्या. प्रत्येक गोष्टींमध्ये पालकांचा सहभाग करुन त्यांची फरफेट करायची. आजच्या मंदीच्या काळात जो-तो आपल्या नोकऱ्या सांभाळुन आहे. एक दिवस अर्धा दिवस सुट्टी मागायची म्हणजे काय करावे लागते याची जाणिव तो पालकच जाणे.

एबॅकसचा क्लास, पोहोण्याचा क्लास, स्केटींग, कराटे, ग्राऊंड, वाद्यवृंद अश्या एक ना अनेक गोष्टींमध्ये ही निरागस मुलं त्यांचे स्वातंत्र हरवत चालली आहेत.

सगळ्याच शाळा अश्या आहेत असे मला नाही म्हणायचे, पण जेंव्हा इतरांशी बोलतो, किंवा आपण स्वतः अनुभवतो त्यातुन सगळीकडे हाच सुर पहावयास मिळतो.

लिप्स्टीक लावलेल्या, चेहरा मेक-अप ने चोपडलेल्या आणी चेहऱ्यावर खोटे हासु घेउन वावरणाऱ्या त्या कचकड्याच्या बाहुल्यांमध्ये मुलांना आपुलकी, शिक्षकाबद्दलचे प्रेम कसे वाटणार?  पुर्वीची ती शाळा, ते धोतर घातलेले, अंगात काळा कोट, डोक्यावर काळी टोपी, कपाळाला गंध लावलेले ते मास्तर काळाच्या पडद्याआड कुठे लुप्त झाले कुणास ठाउक??

रामसे बंधु आणि भयपट


बघा ना कस्स्म असतं. आठवडाभर ८ वाजले तरी डोळे उघडत नाहीत आणि मगं सुरू होते धावपळ कामावर वेळेत पोहोचण्याची. आज शनिवार सुट्टीचा दिवस म्हणलं मस्त झोपु उशीरापर्यंत तर कसलं काय, ७ लाच डोळे उघडले आणि परत झोपायचा कित्तीतरी प्रयत्न केला तरी झोप येइना. मग शेवटी उठलो आणि टि.व्ही. लावला. बघतो तर काय न्युझीलंडचे ७ गडी बाद झाले होते. म्हणजे पहीली टेस्ट मॅच आपल्या खिशातच होती. मग बसलो बघत. शेवटच्या गड्यांनी फारच झुंजवले पण होता आउट होत नव्हते. म्हणुन शेवटी चॅनल बदलला. होते ते चांगल्यासाठीच म्हणतात ना, तस्सेच झाले, दुसरीकडे ‘पुरानी हवेली’ नावाचा भयपट(?) लागला होता. मग तोच बघत बसलो.

खरं तर त्यात भय वाटण्यासारखं काहीच नव्हतं. उलट, तो चित्रपट बघून हसायलाच येत होतं. एकूणच रामसे बंधूचे सगळेच चित्रपट एक सारखे असतात.  साधारणपणे पुढील गोष्टी एखाद्या भयपटात आढळल्यास डोळे झाकून तो रामसे बंधूंचा चित्रपट आहे हे ओळखावे.

१.  बहुतेक करून, या सिनेमाचा हिरो, हा हेमंत बिरजे (टारझन फेम) हाच असतो. तो सिनेमात कधीच कुठेच हसत नाही.
२.  चित्रपटात नेहमी कुत्री “भू…sss ऊ sss ऊ..sss” करून रडत असतात.. मात्र सिनेमात कुत्रं कधीच दिसत नाही.  अधून मधून एक हिरव्या डोळ्याची काळी मांजर मात्र दिसते.
३. चित्रपटात नेहमी एक ‘हार्ट शेप’, बाथ टब असतोच
४. भुताची एंट्री ही नेहमीच सस्पेन्स असते. म्हणजे, पहिल्यांदा जेंव्हा भूत येते तेंव्हा ते आपल्याला कधीच दिसत नाही.. नुसता कॅमेरा पुढे-पुढे जात असतो.
५. त्या नंतर दिसणारे भूत हे बहुदा अस्वलासारखे असते
६. एखाद्याला मारायला येणारे भूत हे अतिशय संथ पणे हळू-हळू चालत येत असते. मात्र भुतापासून “आ sss.. ऊ sss  बचाओ”.. असे करत पळणारी नटी.. संपूर्ण वाड्याला फेऱ्या मारून येते आणि ते भूत तिथेच उभे असते, म्हणजे तिच्या समोर असते.. मग ति नटी एवढी बोंबलत फिरून परत तिथेच येते.. का ते भूत मधूनच एक्टिव्ह होते कुणास ठाऊक.
७. झि हॉरर शो ज्यांनी पाहिलाय त्यातील संगीत या चित्रपटात नेहमी येते.
८. स्त्री भूतांचे डोळे हिरवे/पांढरे/घाबरवणारे असले तरी ती बहुधा यश चोप्रा पटातल्या नायिकेसारखे किंवा रिन/सर्फ/ससा/एरिअल च्या जाहीरातीतल्यासारखे पांढरेशुभ्र पारदर्शक आणि एस.इ.एक्स.वाय. दिसणारी असतात.
९. कथानकात ओढूनताणून किरीस्ताव पात्रे/खून करणारी पात्रे दाखवलेली असतात, कारण भूताने कब्रस्तानातून/गाडलेल्या जागेतून उठणे हा कथानकाचा प्राणवायू असतो. (हिंदू दहन केलेले भूत परत आलेले दाखवल्यास तितकेसे ‘ग्लॅमर’ येत नसावे.)
१०. कथानकात एक मांत्रिक अत्यावश्यक असतो आणि शेवटी तो भूताचा नायनाट करुन स्वतःही मरतो.
११. कथानकात बर्याचदा एक मोठा सहलीला निघालेला घोळका गाडी बंद पडल्याने त्या झपाटलेल्या बंगल्यात गेलेला दाखवलेला असतो.
१२. भूताने घाबरलेल्या नायिकेला शांत करण्याच्या निमीत्ताने काही गरम प्रसंग रंगवलेले असतात.
१३. भूत नायिकेला घाबरवायला येणार असेल तर शक्यतो अपॉइंटमेंट घेऊन ती रात्री आंघोळीचे कपडे घालून (म्हणजे काढून) जात असतान किंवा टबमधे डुंबत असतानाच येते.
१४. भूताला मेल्यावर कुठेही उडत जायचे लायसेन्स असले तरी ते ईमानदारीत तरण्याबांड नायकाला(म्हणजे हेमंत बिर्जे किंवा विजय अरोराला) रात्री पांढर्या कपड्यात उभे राहून लिफ्ट मागते व त्याला कब्रस्तानापर्यंत वाट वाकडी करायला लावते. 
१५. रात्रीच्यावेळी जंगलातला धूर. ( प्रत्येक चित्रपटात, जंगल आणि अगदी झाडेही तिच असतात.)
१६. हवेली मधला म्हातारा, क्वचितच बोलणारा, लालटेन घेऊन फिरणारा नोकर.
१७. हिरोचा एखादा विनोदी (?) मित्र आणि त्याची गावातली प्रेयसी.
१८. अस्वलासारख्या भूताला घाबरविण्यासाठी, क्रॉस किंवा ॐ असतोच. आणि ते दाखविले की भूत सैरभैर होतं !
१९.  प्रत्येक भुताला स्वतःची अशी एक “हिस्ट्री” असते.
२०. भुताच्या तोंडून येणारा हुम्म्म्म हुम्म्म्म्म SSSSS असा आवाज, आणि दोनही हात मिठी मारायला उत्सुक असल्यासारखे असतात ! बाकी रामसेची भूतं हळूहळू का चालतात हा प्रश्न मला फार आधी पासून पडला आहे !

असे अनेक मुद्दे मांडता येतील.. तुम्हाला माहीत आहेत अजून काही?