Monthly Archives: April 2009

५००० बी.सी.


नाही नाही, मी बी.सी. म्हणजे ‘बिफ़ोर ख्रिस्ट’ बद्दल बोलत नसुन माझ्या ‘ब्लॉग काउंट’ बद्दल बोलतोय. माझा मराठी ब्लॉगींग चा हा पहीलाच प्रयत्न. ब्लॉग सुरु करुन जेमतेम १ महीना ९ दिवस होत आहेत आणि ब्लॉग काऊंट चक्क ५००० च्या वर पोहोचला आहे. खुप मजा वाटली आणि आनंद ही झाला.

त्याचबरोबर हा एका छोटासा ‘माईलस्टोन’ गाठताना अनेक गोष्टींचे आभार मानावेसे वाटतात:

  • महेंद्रजी, अभिजीत, समवेद, वाय.डी, श्रध्दा, किर्ती, नितीन, अजीत, शेखर, श्वेता, सहजच, मृदुला, भानसा या आणि अजुनही अनेक लोकांनी वेळोवेळी प्रतिक्रिया देउन माझा लेखनाचा उत्साह द्विगुणीत केला त्याबद्दल त्यांचे आभार.
  • मराठीब्लॉग्स.नेट ज्यांनी माझा ब्लॉग त्यांच्या श्रुंखलेत समाविष्ट करुन अनेक वाचकांपर्यंत पोहोचवला.
  • माझे आई-बाबा ज्यांनी मला मराठी माध्यमात घालुन मला मराठी भाषेचे शिक्षण दिले.
  • माझे शाळा शिक्षक (रत्नागिरी आणि पुणे दोन्ही ठिकाणातील) ज्यांनी वेळोवेळी मला व्याकरण सुधारावे म्हणुन अनेक उपाय केले. त्यांची आठवण रहावी म्हणुन माझ्या व्याकरणाच्या चुका अजुनही चालुच ठेवल्या आहेत.
  • पत्नी आणि छळवादी कार्ट ज्यांनी मला लिखाणासाठी (वेळोवेळी नापसंती दाखवुन का होईना) वेळ दिला
  • मराठी लिखाणासाठी वापरत असलेली ‘बराहा’ संगणक प्रणाली आणि ती बनवण्यासाठी जिवाचा आटा-पिटा केलेले संगणक अभीयंते. त्यांच्या परीश्रमाने आज मी मराठीत लिहु शकतोय.
  • संगणक, तो बनवण्यात गुंतलेले असंख्य अभियंते
  • माझा मेंदु (छोटा आणि मोठा)

लिस्ट खुप मोठी आहे, पण १०००० झाले की बाकीचे 🙂 सध्या पुरते या सर्वांचे अतीशय आभार. असाच लोभ कायम रहावा

तदेव लग्नं..


कुठलेही धार्मिक कार्यक्रम मला लांबुनच बरे वाटतात, पण माझ्या लग्नात मात्र मला सहभागी व्हावे लागणारच होते. त्यामुळे जशी जशी तारीख जवळ येत होती, तशी तशी माझी चिंता वाढतच होती. ते गळ्यात हार-तुरे घालायचे, तो साधु काय बोलतो ते ऐकायचे, मधेच तो काहीतरी म्हणायला सांगतो तसे म्हणायचे, बहुतेक वेळेला सुरुवात “मम” पासुनच असते, समोर आगीचा डोंब उसळलेला असतो, त्यात अजुन सारखे तुप घालायचे, त्यात अंगात भरजरी कपडे सांभाळायचे. मग लग्नानंतर भेटायला येणाऱ्यांबरोबर उगाचच खोटे खोटे हसायचे, मला हे सगळे जिवावर येते. मी सगळ्यांच्या हाता-पाया पडलो की नोंदणी पध्दतीने विवाह करू, पण माझे कोणी ऐकेल तर. अगदीच माझ्यावर उपकार म्हणुन आदल्या दिवशीचे श्रीमान पुजन का काय असते ते रद्द केले. सगळ्यांचे उत्तर एकच.. हौस-मौज असते, करुन घ्यायची.. हो..मान्य आहे, पण कुणाची, माझी का तुमची?. सगळ्यांच्या उत्साहाला नुसते उधाण आले होते. मला तसाही खरेदी मधे उत्साह नव्हता, त्यामुळे बाकीच्या लोकांनी त्यांची खरेदी करुन घेतली, पण शेवटी कुणीच उरले नाही तेंव्हा मला जबरदस्तीने खरेदीसाठी घेउन गेले. मग असंख्य प्रश्न, काय घ्यायचे, कोट घ्यायचा की जोधपुरी, की शेरवानी. खरे सांगतो, मला त्यातला फरकच कळत नाही. शेवटी त्यातल्या त्यात बरे दिसणारे घेउन बाहेर पडलो.

लग्नाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी, होणाऱ्या बायकोचा फोनः इकडुन गाडी निघालीये तुम्हाला घ्यायला. तयार आहेस ना? [उगाचच युध्दाला वगैरे तयार असल्यासारखे वाटले]. काय कपडे घातले आहेस? काळ्या रंगाचे नको घालुस. [घ्या. झाले का.. मी तर काळ्या रंगाचाच शेरवानी का चुडीदार का काय ते घातले होते] मी आपले बर म्हणुन फोन ठेवुन दिला. तेव्हड्यात गाडी आलीच. मग आम्ही सगळे बाराती निघालो. कार्यालयापाशी दारातच आडवले.. जकात भरायला नाही हो.. ओवाळायला.. [बुट का मोजुडे काढा, पाय धुवा, परत घाला.. वैताग क्र.१] जिजु-जिजु म्हणुन सारखे फोन करणारी आणी चॅट वर भेटणारी माझी साली, जुईली हसत मुखाने स्वागताला हजर होती. मग जोरदार स्वागत समारंभ झाला.. हसण्याची मुक्त हस्ते उधळण झाली आणी आमच्या स्वारीने रणांगणात- आपले.. कार्यालयात प्रवेश केला. बरीच ओळखीची-अनोळखीची लोक जमली होती. ज्यांनी मला आधी पाहिले नव्हते किंवा मी ज्यांना आधी पाहिले नव्हते असे आम्ही एकमेकांकडे बघत होतो. थोड्याच वेळात आमच्या सौ. अवतरल्या. गडद निळ्यारंगाची एकदम रापचीक साडी घातली होती. चेहरा चमकी लागल्यासारखा चमकत होता. हाताची मेहंदी मस्तच रंगली होती. आता बोलायचे असते की नाही कुणास ठाउक.. म्हणुन मी आपली एक चोरटी स्माइल देउन मोर्चा दुसरीकडे वळवला. तोपर्यंत सामानाच्या बॅगा खोलीत गेल्या होत्या. थोड्याच वेळात जेवणासाठी बोलावणे आले. श्रीमान पुजन नसले तरी, भोजन होते. आमच्या सौ. लांब कुठेतरी त्यांच्या नातेवाईकांबरोबर बसल्या होत्या. लांबुनच त्यांनी छान दिसतोय असा हात हलवला, मग मी पण तसेच केले. मग तिने मला एक डोळा मारला.. आणी मी चक्क लाजलो. एवढ्यात वाढपी आले. शिरा-पुरीचे जेवण होते. जेवण झाल्यावर सगळी लोक पांगली. मी पण मित्रांबरोबर गप्पा मारत बसलो. थोड्यावेळाने मग मी झोपायला गेलो. पण हाय रे दैवा खाली अंताक्षरीचा खेळ सुरू झाला होता. झोपायचा प्रयत्न वायाच गेला. मग कंटाळुन मीपण खाली आलो. लगेच सगळ्यांनी मला पकडले आणी गाणी म्हणायला बसवले. पण सासरच्या अनेक लोकांसमोर गाणे कसे म्हणायचे या विचारांनी मी संकोचलो होतो त्यामुळे काहीतरी कारण काढुन मी बाहेर पडलो. आमच्या सौ. पण थोड्यावेळाने बाहेर आल्या. रात्रीचे १२ वगैरे वाजुन गेले होते. बाहेरच्या मंडपात अतिशय शांतता होती. आम्ही तिकडेच खुर्चा टाकुन गप्पा मारत बसलो. खुप छान क्षण होता तो. दोन वर्षाच्या मैत्रीनंतर उद्या [खरंतर आता आजच] आम्ही लग्नाच्या गोड बंधनात बांधले जाणार होतो. मग काय थोड्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, कॉलेजचे ते दिवस, एकमेकांशी झालेली ओळख, त्याचे प्रेमात झालेले रुपांतर, नंतरचे ते चोरुन चोरुन भेटणे, भेटकार्ड आणी प्रेमपत्रांची देवाणघेवाण सर्व काही. एव्हाना आतली गाणी वगैरे संपली होती आणी सकाळी लवकर उठायचे म्हणुन सगळे झोपायला गेले होते. अधुन-मधुन कोणीतरी बाहेर यायच, पण आम्हाला बघुन परत निघुन जायचे. आज झोपच येत नव्हती. सकाळ पर्यंत असेच गप्पा मारत बसावेसे वाटत होते, तेवढ्यात कोणत्यातरी आजीबाईंची हाक कानावर पडली..”झोपा आता, सकाळी लवकर उठायचे आहे, नंतर आयुष्य आहे गप्पा मारायला.” मग शेवटी, मावळत्या सुर्याचा नाही पण चंद्राच्या साक्षीने एकमेकांचा निरोप घेउन झोपायला गेलो.

सकाळी जाग आली ती लोकांच्या चाललेल्या गडबडीने, बादल्यांचे आवाज, चहाच्या कपांचे आवाज, बारक्या मुलांची बोंबाबोंब. परत एकदा मला जाणीव झाली की माझ्या लग्नाचा माझ्यापेक्षा इतरांनाच जास्ती उत्साह आहे. नोंदणी पध्दत किती सुटसुटीत असते, कोर्टात जायचे, दोन सह्या करायच्या, हार घालायचे आणी पेढे खायचे झाले. पण कुणाला पटेल तर ना. मी आपल्याच विचारात मग्न होतो तोच लोकांची झुंड आत आली मला उचलले आणी आंघोळीला नेहुन बसवले. कसले कसले तेल, उटणी, रंगीत साबण आणी बरेच काही होते. मग मला बराच धुतला आरती का ओवाळणी वगैरे झाली. मला आता खुप झोप आली होती पण नाही, गुरुजी यायची वेळ झाली म्हणे त्यामुळे आवरावे लागले. मग आवरले एकदाचे आणी खाली आलो. खाली खिचडीचा मस्त वास सुटला होता, तेवढ्यात कुणीतरी माझ्या समोर “डिश” आणुन ठेवली. नवरा मुलाचा मान म्हणतात तो हाच असावा असे म्हणुन मी आडवा हात मारला. त्यावर एक कप कॉफी ढकलली तेंव्हा कुठे जरा बरे वाटले.

मग मला सौं ची आठवण झाली. मनात म्हणले दिसत नाहीये कुठे, काल रात्री उशीरा झोपली अजुन उठली नाही कि काय? माझी शंका मी माझ्या सालींपाशी बोलुन दाखवली तेंव्हा कळले की ती सकाळी लवकरच उठलीये, ब्युटी-पार्लर वाली आलीये, मेक-अप चालु आहे. तेव्हढ्यात ती आलीच बाहेर. काय चिकणी दिसत होती हिरव्या साडी मध्ये. पण लगेच माझ्या इकडे आलीच नाही. तिच्या नातेवाइकांचे कौतुक चालु होते ना. “काय सुंदर दिसतीय ना पल्लु”,”किती गोड दिसतीय, द्रुष्ट काढा बाई तिची”, “साडी चा रंग किती उठुन दिसतोय”, “मेक-अप किती छान केलाय” असे आणी बरेच काही. मेक-अप चांगला केला होता खुप वेगळीच दिसत होती, पण पावडर जऱा जास्तीच लावली होती वाटते त्यामुळे “खारा-दाणा” दिसत होती. असो. मग आमचे एकत्र आणी वेग-वेगळे फोटो काढले गेले. मग माझ्या सासर च्या लोकांनी खिचडी आमच्या समोर आणुन ठेवली. मी म्हणले “मी खाल्ली.!!” ..”आधीच??” [म्हणजे असे पण असते का मी तिच्या आधी काही खायचे नाही??!!”]

थोड्याच वेळात गुरुजी आले. त्यांना गुरुजी का म्हणतात तेच कळत नाही, मी आपला त्यांना साधुच म्हणतो. तर ते आले. इकडे तिकडे कटाक्ष टाकला आणी मग स्थानापन्न झाले. मग थोड्यावेळाने त्यांनी गर्जना केली. मुलाला बोलवा, मुलीला बोलवा. आता तिकडे एवढ्या छान अक्षरात फुलांमधे माझे आणी पल्लवी चे नाव लिहिले होते. मग नावाने हाक मारावी ना.. मुलगा, मुलगी काय..तर आम्ही तिकडे गेलो. लगेच कॅमेरे वगैरे सरसावले. मग कसल्या कसल्या पुजा सुरू झाल्या. वातावरण खुप प्रसन्न होते पण बहुतेक त्या साधुला ते बघवले नसावे, त्याने समोरच्या भांड्यात आग पेटवलीच आणी मला म्हणाला “माझे मंत्र पठण होइ पर्यंत यात पळी भर तेल टाकत रहा.. ॐ श्री गणपतेय नमः, ॐ श्री सिध्दविनायेन नमः, तुमची कुलदेवता कोण. [मला कुठे माहीत] मी आई कडे कटाक्ष टाकला. “अंबाबाई..” पुढे.. असेच काही तरी चालु होते. मी आगीत तेल ओतत होतो.. थोड्याच वेळात सगळा धुराडा झाला. आमच्या सौ तो धुर नसुन धुके आहे अशा आनंदात आमच्या हाताला हात लावुन बसल्या होत्या. समोर बघ्यांची गर्दी वाढत होती. मी उगाचच खुष असल्याचे भासवत होतो. मधुन मधुन “मम” चालुच होते. त्यातच आता सारखे उठुन “मोठ्यांना नमस्कार करा” चा प्रकार वाढला होता. हळुहळु मला पण हा सगळा प्रकार आवडायला लागला होता फक्त त्या धुराचे काहीतरी करायला हवे होते. तासभर हा प्रकार झाल्यावर साधु थांबला. मग आम्ही उभे राहीलो. माझ्या हातात लाह्यांचा एक ढिग दिला आणी तो तिच्या हातावरुन आगीत टाकायला सांगीतले. मला एव्हाना परत भुक लागायला लागली होती. त्या आगीत भाजल्या जाणाऱ्या लाह्या बघुन मला “पॉपकॉर्न” ची आठवण होत होती.

हे झाल्यावर एक तांदुळाने भरलेले ताट समोर आले. मी म्हणे ह्यावर नाव लिहायचे बायकोचे, किंवा जर बदलणार असेल तर. मी तिला आधी घाबरवुन ठेवले होते कि मी ‘सगुणा’ किंवा असलेच काही तरी अतरंगी नाव ठेवणार म्हणुन त्यामुळे ती लक्ष ठेवुन होती. मग मंगळसुत्र आले. ह्या क्षणाची मात्र मी आतुरतेने वाट बघत होतो. मी अक्षरशः त्यावर झडप घातली आणी “गुरुजींची” आज्ञा होताच ते सौंच्या गळ्यात घालुन टाकले. खुप छान दिसत होते ते तिला. त्यानंतर मग सात फेरे झाले.. हा प्रकार पण मला खुप आवडला. मजा आली. आता जरा त्या साधुने विश्रांती घ्यायेचे ठरवले असावे. त्याने आम्हाला कपडे बदलुन यायला सांगीतले. मग मी पटकन कपडे बदलुन आलो. परत ते पाय धुवा वगैरे.. यावेळेला मी वैतागलो होतो. म्हणले बुटावरच ओता काय ओतायचे ते. आता खुपच गर्दी झाली होती.. बहुतेक मुहुर्त आला होता. मग आंतरपाट वगैरे धरला. आणी थोड्याच वेळात “तदेव लग्नं..” सुरु झाले. मनामध्ये खुप साऱ्या भावना दाटुन आल्या होत्या. विचारांची गर्दी झाली होती. आज मी ब्रम्हचर्य सोडुन, गृहस्थ होणार होतो. मधुनच आंतरपाटाच्या वरुन मी पलीकडे आमच्या सौ रडत आहेत का ते बघत होतो.. पण नाही.. मस्त हसत होती.. छान..मला आपली उगाचच चिंता वाटत होती. एवढ्यात आंतरपाट बाजुला झाला आणी आम्ही एकमेकांच्या गळ्यात हार घातले. नंतर काय झाले आठवत नाही. एक वेगळ्याच धुंदीत होतो. खुप सारी लोक शुभेच्छा देउन गेली.

तर असा हा लग्न सोहळा “अगं अगं म्हशी” म्हणत शेवटी मात्र एन्जॉय केला.

पाहता त्या बाला कलीजा खल्लास झाला


अमेरीकेबद्दल खुप काही लिहीले गेले आहे, आणि लिहीले जात आहे. माझ्या अमेरीकेतील एका महीन्याच्या वास्तव्यात माझ्या स्मरणात राहीलेल्या दोन बालांविषयी थोडेसे. त्यांना पाहुन एकच ओळ मनात येते “पाहता त्या बाला कलीजा खल्लास झाला..”

सोबत त्यांचे फोटो सुध्दा जोडत आहे.

१. स्थळ: रेडवुड सिटी, कॅलेफॉर्निया
पहाता ती बाला

एका संकेत स्थळावरुन मला माहीती मिळाली की रेडवुड सिटी नामक शहरात रोज गुरुवारी संध्याकाळी मोफत डान्स परफॉर्मंन्स असतात. ही जागा मी रहात असलेल्या ठिकाणापासुन चालत जाउ शकतो इतक्या अंतरावर होती. मग मी हा ‘शो’ बघायचाच असं ठरवलं. गुरुवारी संध्याकाळी कार्यालयातुन लवकर निघालो. कॅबने हॉटेलवर पोहोचलो, फ्रेश झालो, कॅमेरा घेतला आणि भरभर चालत ठिकाणाकडे निघालो. पोहोचेतोवर ७ वाजले होते. कार्यक्रम नुकताच सुरु होतं होता. पहीला डान्स सो-सो होता. त्यातील बालीका उपस्थीत प्रेक्षकांना आपल्या नाचात सहभागी करुन घेत होत्या, त्यांना स्टेप्स चे धडे देत होत्या. मी मोक्याची जागा पकडुन स्थानापन्न झालो.

पुढचा परफॉर्मन्स ‘हुला’ वर्गातला होता. मस्त थिरकणारे हवाई संगीत आणि नृत्यकांचे पोषाख, सगळेच काही झक्कास. माझे लक्ष वेधुन घेतले ते ह्या नर्तीकेने. माझे म्हणण्यापेक्षा बहुतांश प्रेक्षकांचे असेच मी म्हणेन. खुपच उत्तम नाच करत होती ती. शी वॉज एच. ओ. ट., शी वॉज एस. ई. एक्स. वाय. आणि फुल्ल ऑफ ऍटीट्युड. picture-050 मी तर अगदी तिच्या समोरच होतो. कित्तीतरी फोटो काढले मी तीचे. ‘शी वॉज जस्ट ऑस्सम’. तिला माहीती होते की मी फक्त तीचेच फोटो काढतोय. नृत्य संपल्यावर जाताना तिने मागे वळुन मला दिलेली स्माईल… बस्स.. कलीजा खल्लास करुन गेली.

भारतात परत आल्यावर तिचे इतके सारे फोटो होते, त्यामुळे सगळ्यांपासुन किंबहुना बायकोपासुन लपवण्यासाठी एका वेगळ्या फोल्डर मध्ये कॉपी करुन ठेवले होते. पण हाय रे दुद्रैवा, ‘पिकासा’ नामक गुगलची एक प्रणाली संगणकावर टाकलेली आहे. ही प्रणाली संगणकावर साठवलेले सगळे फोटो तुम्हाला दाखवते. एकदा बायकोने ते ‘पिकासा’ चालु केले आणि माझा हा ‘खजीना’ उघड झाला. त्यानंतर जी टोचुन टोचुनची बोलणी ऐकुन घ्यावी लागली ना की काही विचारायची सोय नाही. लगेच तिच्या समोर सगळे फोटो ‘डिलीट’ करुन टाकले. (बरं झाले अमेरीकेत असताना सगळे आधीच ऑनलाईन-अपलोड करुन ठेवले होते ते 🙂 )

२. स्थळ: पॅलो अल्टो, कॅलेफॉर्निया

white_limo

भारतात परतण्याच्या एक दिवस आधी माझी आणि हिची भेट झाली, अगदी अनपेक्षीतपणे. रिलीज झाले, म्हणुन क्लायंटने खुश होऊन एक पार्टी ठेवली होती. मस्त खाना और पिना. हॉटेल मध्ये पोहोचलो आणि दरवाज्यावरील बोर्ड वाचुन आनंद द्विगुणीत झाला. काही तासांतच ‘नॉटी गर्ल्स कॉन्टेस्ट’ होणार होती. चेहऱ्यावर दाखवत नसलो तरी मनोमन मी खुश होतो. पण ऐन वेळेस काही तासांनी ती पुढे ढकलण्यात आली. आमचे खाणे-पिणे संपले आणि दुसरीकडे कुठेतरी जायचे आहे असे मला सांगण्यात आले. मी फारच नाराज झालो होतो. शेवटी उठलो आणि बाहेर आलो तर काय, आमच्यासाठी ही मोठ्ठी शुभ्र रंगाची स्ट्रेच-लिमो आम्हाला घेउन जायला उभी. मी २-२ दा विचारले आपण यातुन जाणार आहोत. निराश झालेले मन टणाटण उड्या मारायला लागले. यावेळेला मात्र मी माझा आनंद लपवु शकलो नाही. गाडीचे पुढुन, मागुन कडेने, आतुन फोटो काढुन घेतले.

fort-lauderdale-limo

आत मध्ये शिरलो आणि डोळ्यावर विश्वास बसेना. प्रत्येकी एक या प्रमाणे १२ शॅम्पेन च्या बाटल्या आमच्या वाट बघत ठेवलेल्या होत्या. तेथील मऊ-मऊ सिट वर स्थानापन्न झालो. गाडी सुरु झाली आहे हे मला खुप उशीरानेच कळाले. हातापाशीच एक हाय-फाय म्युझीक सिस्टीम होती. एका कलीगने त्याचा आयपॉड त्या सिस्टीमला जोडला आणि लगेच अती-उच्च आवाजातील धडधडणारे संगीत सुरु झाले. त्याचबरोबर छताला असणारी लेजर सिस्टिमहि सुरु झाली आणि गाडीचे अंतरंग असंख्य लखलखणाऱ्या प्रकाशांनी उजळुन निघाले.

कडेलाच कसलेसे एक बटन होते, ते दाबले आणि ड्रायव्हरच्या मागच्या बाजुला वरुन हळुच सरकत एक एल.सी.डी. अवतरला. कडेच्या रॅकमध्ये कित्तीतरी नवनविन सिनेमांच्या डी.व्ही.डी ठेवलेल्या होत्या. एक छॊटासा फिज कोल्ड ड्रिंक्स आणि बिअरच्या बाटल्यांनी खचाखच भरला होता. फ्रिजच्याच दुसऱ्या कप्प्यात अमेरीकेतील प्रसिध्द चॉकलेटस खच्चुन भरली होती.

गाडीच्या काचा किंवा ड्रायवरशी बोलायचे असल्यास मध्ये असलेली काच खाली वर करायला एक छोटासा रिमोट कंट्रोल. सुखाचा श्रीमंतीचा तो अनुभव माझा पहीलाच होता, आणि परत असा अनुभव कधी मिळेल हे माहीत नसल्याने प्रत्येक क्षण मी अगदी मनापासुन उपभोगत होतो. मन नुसते मंत्रमुग्ध झाले होते त्या २-३ तासाच्या प्रवासामध्ये,.. आणि कलीजा.. फुल्ल खल्लास..!!

“जय हो” इंग्लीश मध्ये


पायांचा ठेका धरायला लावणारे, अंगात झिंग आणणारे आणि भारताला ऑस्कर मिळवुन देणारे ‘ए. आर. रेहमान’ चे “जय हो” गाणे आता इंग्लिश मध्ये चित्रीत करण्यात आले आहे.

“Pussycat Dolls” या बॅडच्या “Nicole Scherzinger” ने हे गाणे म्हणलेय. आपण नेहमी इंग्लीश गाण्यांच्या धुन चोरुन, इंस्पायर्ड होऊन आपल्या चित्रपटात वापरत, ऐकत आलोय. आपले गाण्यावरुन इंस्पायर्ड होऊन इंग्लीश बॅडने बनवलेले गाणे माझ्या दृष्टीने तरी पहीलेच. मस्त बनवलेय. सात-समुद्रापलीकडच्या रेल्वे स्टेशन वर बनवलेले गाणे जरुर ऐका/पहा आणि म्हणा.. ‘जय हो!!’


[The Pussycat Dolls – Jai Ho (You Are My Destiny)]

हनिमुनचा भयावह शेवट


हनीमुनची ती रोमांचक दिवसांची सुट्टी संपवुन आम्ही पुण्याला परतत होतो. बैगलोर-पुणे नागरकॉइल एक्सप्रेस ने परतीचा प्रवास होता. गाडी वेळेत संध्याकाळी ८ वाजता प्लॅटफॉर्मला लागली. बोगी नंबर वगैरे शोधुन सामान सावरत आत मध्ये शिरलो.

आत मध्ये शिरत असतानाच बायको मला म्हणाली, “ए ती मुलगी बघ ना कशी बघती आहे तुझ्याकडे!” मी लगेच शोधाशोध केली. आमच्या कंपार्टमेंट पासुन काही सिट दुरुन एक २५वीशीतली मुलगी टक लावुन बघत होती. बायको पुढे म्हणाली.. “अशी काय बघती आहे ती? तु काही आणि एवढा स्मार्ट, हॅडसम वगैरे नाही आहेस बरं का!!”

आमची ए/सी केबीन पुर्ण रिकामी होती. कुणाचेच रिझर्वेशन नव्हते. त्यामुळे पुण्यापर्यंत या पुर्ण केबीनमध्ये आम्ही दोघचं या विचाराने खुश झालो. सामान अस्ताव्यस्त फेकुन मस्त ताणुन दिली. थोडा आराम झाल्यावर मी कानात हेडफोन घुसडुन बायकोच्या मांडीवर पहुडलो तर बायको कुठलेतरी पुस्तक वाचत बसली. थोड्यावेळाने सहजच डोळे उघडले तर ती मगाचची मुलगी उघड्या दारातुन हळुच आत मध्ये वाकुन बघत होती. तिला बघुन जाम घाबरलो आणि ताडकन उठुन बसलो. मला उठलेला बघुन ती तेथुन निघुन गेली. नंतर माझे लक्षच लागत नव्हते. सारखे दाराकडे लक्ष जात होते. शेवटी न रहावुन हळुच उठलो, दार किलकिले करुन बाहेर बघीतले. ती मुलगी तिच्या जागेवरुन मागे वळुन बघत होती. पटकन आत घुसलो आणि दार लावुन घेतले. कडी लावीन म्हणलं तर हाय रे दैवा. भारतीय रेल ची दाराची कडी तुटलेली. मग दार तसेच ओढुन घेतले.

काही वेळाने दारावर ‘टक-टक’ झाली. आम्हाला वाटलं टी.सी आहे म्हणुन दार उघडले. तर परत तीच मुलगी दारात उभी. २-४ क्षण शांतते गेले. ती सारखी माझ्याकडे आणि बायकोकडे आळीपाळीने बघत होती. शेवटी तिने बायकोला “आत येउ का?” विचारले. आता नाही कसं म्हणायचे म्हणुन तिला आत बोलावले. ती समोरच्या बाकावर बसली आणि आम्ही दुसऱ्या बाजुला. परत २-४ क्षण शांततेत. तीची ती भयानक नजर दोघांवर खिळुन होती.

शेवटी तीच बोलली जराश्या चिडक्या आवाजात.. ‘मगाशी तुम्ही दोघं काय करत होतात?’
आम्ही: ‘मगाशी? कधी? काही नाही.. का?’
थोडा वेळ खाउन ती बोलली, “मी बघीतलं ना मगाशी, हा तुझ्या मांडीवर झोपला होता!”
आम्ही: “??? !!!”
शांतता…..
आम्ही: “मग?”
ती: “मग म्हणजे? असं चालतं का?”
आम्ही: “अगं आम्ही नवरा बायको आहोत. नुकतेच लग्न झालेय.”
ती: “कशावरुन? कशावरुन तुम्ही खोटं नाही सांगत?”
आम्ही: “?????!!!!! मग एकदम मला सुचले मी माझ्या आणि बायकोच्या हातातली अंगठी तीला दाखवली.. हे बघ..”
आपल्या चेहऱ्यावर अस्ताव्यस्त ओघळणाऱ्या केसांना मागे सारत ती जरा रिलॅक्स झाली. “मग ठिक आहे” चेहऱ्यावर हास्य आणत ती म्हणाली. मग एकदमच हात पुढे करुन म्हणाली..”मी शोनाली.. तुम्ही??”
मी हात पुढे केला.. तशी तिच्या चेहऱ्यावरचे हास्य परत गेले.. “तु नको शेक-हॅड्स करुस.. तुझं लग्न झालयं.. तु करं गं असं म्हणुन तीने बायकोला शेक-हॅड केले”

पुढचे काही क्षण परत शांततेत. ती सरळ टक लावुन आमच्याकडे आळीपाळीने बघत होती. पापण्यांची हालचाल सुध्दा अगदी कमीच. आम्ही मात्र विचारात गर्क. “कोण आहे ही? थोडी वेडी वगैरे आहे का?” तेवढ्यात कंपार्टमेंटचे दार उघडुन एक बाई आत आली. शोनालीला बघुन तिच्या चेहऱ्यावरचा ताण निवळला. “अगं तु एकडे काय करत आहेस चल तिकडे!” असं म्हणुन तिने तिला जवळ जवळ ओढलेच. जाताना, “स्वॉरी हा..तुम्हाला उगाचच त्रास” म्हणुन गेली सुध्दा.

ती गेल्यावर आम्हाला जरा मोकळ मोकळ वाटलं. पण आमचा हा आनंद फार काळ टिकला नाही. काही वेळातच ‘ती’ परत आलीच. आल्यावर ते डोळे तसेच रोखुन धरलेले.. भयानक. केस मोकळे होते. चेहऱ्यावर संशयाचे भाव. येउन परत समोर बसली आणि बायकोला म्हणाली, “हा तुला फसवतोय!’

आम्ही: “???!!!!!??”
ती: “बघ, लक्ष ठेव, मगाशी सारखा माझ्याकडेच बघत होता. तुला फसवणार तो!!”
माझ्या मनामध्ये एवढ्या शिव्या येत होत्या ना!! म्हणंलं सरळ हिला धरुन बाहेर काढावं. तेवढ्यात बायकोने विषय बदलला. मग तीच म्हणाली, “तुम्हाला नटं कोण आवडतो. मला तर बाबा शाहरुख खान आवडतो..” आणि परत गंभीर होत..”आणि तुम्हाला कोण आवडतो? शाहरुखच ना?” (आमची काय हिम्मत नाही म्हणायची.)

मग तिने बायकोला विचारले “तु काय करतेस गं?”. बायको म्हणाली..’मी जॅपनीज ट्रांसलेशन करते. इंग्लीश टु जपानी” तशी एकदम उड्या मारत नाचायलाच लागली.. आणि टाळ्यावाजवत गाणं म्हणायला लागली..”मेरा जुता है जपानी..”

तीचा तो आवतार बघुन बायको जाम घाबरली होती.. आणि मी पण. आम्हाला शांत बघुन मध्येच थांबुन म्हणाली..”तुम्ही शांत का? म्हणा ना गाण माझ्याबरोबर..” आणि परत तिचा तो भयावह नाच चालु.

शेवटी मी तीथुन बायकोला घेउन बाहेर पडलो आणि तडक तिच्या आईकडे गेलो. आई डुलक्यांमध्ये मग्न होती. तिला जागे केले आणी झालेला प्रकार सांगीतला. ती परत आमच्या कंपार्टमेंटमध्ये आली आणि तिला घेउन गेली. नंतर आम्हाला परत ‘स्वॉरी’ म्हणाली. ती म्हणे थोडी मानसीक पेशंट आहे, तीला ट्रीटमेंट साठी मुंबईला घेउन चालले होते. म्हणलं, “ते सगळ ठिक आहे हो पण तिला थोडं सांभाळा ना.. सारखं इकडेच येती आहे ती..”

नंतरचे तास आम्ही कसे काढले कुणास ठाउक. शोनाली नंतर कंपार्टमेंट मध्ये आली नाही. पण ती होती. बाहेर दारापाशी होती. उघड्या फटीतुन आत पहायचा प्रयत्न करत. जाणवत होतं ते आम्हाला. आम्ही शेवटी एकदम वरच्या बर्थ चा आसरा घेतला आणि लाईट मालवुन झोपुन गेलो. पहाटे कधी तरी जागं आली. कॉफीसाठी बाहेर पडलो तेंव्हा ‘फुल्ल खुन्नसने’ ती आमच्याकडे बघत होती. पुणे स्टेशन आल्यावर मागे पुढे नं बघता सरळ बाहेर पळत सुटलो, रिक्षा पकडली आणि तडक घर.

विथ ड्यु रिस्पेक्ट टु हर मॉम, आणि तिच्या आजारपणाची मला खिल्ली ही उडवायची नाही. पण आमच्यावर ओढवलेले ते भयानक तास वर्णन करण्यासाठीच हा लेख. ते पापण्या क्वचीत हलणारे डोळे, ते मोकळे केस, तो ‘मेरा जुता है जपानी’ वरचा टाळ्या वाजवतचा नाच. कध्धीच विसरु नाही शकत..!!

पोराला कुत्र्यासारखा धुतला


काल अचानक पणे मतदानानिमीत्त आजच्यादिवशी आम्हाला सुट्टी जाहीर केली. अर्थात त्यासाठी पुढच्या शनिवारी कामाला यावे लागणार आहे. पण आज तर सुट्टी मिळाली. भल्या सकाळी ८ वाजताच मतदान करुन आलो. बायकोने आल्या आल्या ‘आज मुलाला आंघोळ घाल ना!’ म्हणुन तगादा लावला. पोरंगं ही मग बाबांबरोबरच आंघोळ करायची म्हणुन बोंबलत बसलं मग काय करता शेवटी गेलो दोघं जण आंघोळीला.

पहिले २-४ तांबे झाल्यावर साबण लावायची वेळ आली. आता सहसा त्याला आंघोळ त्याची आई किंवा आज्जीच घालते त्यामुळे त्याचा साबण कुठला मला कसं माहित. समोर एक गुलाबी रंगाचा साबण होता. पोराचा आवडता रंग गुलाबीच म्हणलं हाच असणार म्हणुन घेतला तोच. पोराने ही साबणं बघीतल्या बघीतल्या.. “आsss!! पिंक साबणं. कित्ती छान आहे” म्हणुन आपला आनंद व्यक्त केला.

तरी एकदा विचारावं म्हणुन विचारले, “काय रे हाच ना तुझा साबंण?” ३ वर्षाचे पोरगं ते त्याला काय..”होss हाच्च माझा साबणं” म्हणुन मोकळा. “रंग कित्ती छान आहे”, ‘कित्ती छान वास आहे” वगैरे विषेशणं चालुच होती. साबणावर भु-भु चे चित्र होते. ते लगेच मी त्याला दाखवले, “हे बघ.. डॉगी पण आहे साबणावर!!!” पोरगा खुssssश्श” अश्यारीतीने आनंदाने आंघोळ पार पाडली. पोराला पाठवलं बाहेर आणि मी माझी आंघोळ चालु केली.

बाहेरुन पोराचा आईशी चाललेला संवाद ऐकु येत होता.
“आई.. आज बाबांनी मला नविन नविन साबणाने आंघोळ घातली”..
आई..”होss!!!, कुठला रे?”
“पिंक पिंक होता भु भु चे चित्र असलेला. मला आवडला.. मला बाबा पण आवडले. मला तु नाही आवडत तु नाही मला त्या साबणाने आंघोळ घालत”

त्याचे वाक्य पुर्ण होयच्या आधीच बायकोने बाथरुमचे दार बडवले..”अरे तु कुठल्या साबणाने आंघोळ घातली त्याला??”
मी: “का काय झालं.. त्याच त्याच्या पिंक साबणाने”
एव्हाना मी दार उघडले होते. बायको आत घुसली आणि समोरचा साबण हातात धरुन मला म्हणाली .. “याsss??”
मी ‘हो’ म्हणलं. बायकोने डोक्यालाच हात लावला.. ‘अरे तो आपल्या कुत्र्याचा आंघोळीचा साबण आहे.. माहीत नाही का तुला?? हा बघ हा ओजस चा साबण जॉन्सन ऍन्ड जॉन्सन चा’
मी.. “अरे देव्वा…”

पोराचे नुकतेच आवरले होते, परत त्याचे कपडे काढले आणि आंघोळीला घेतला. दोघांनी चांगला घासुन पुसुन धुतला त्याला. परत बाहेर आल्यावर तेल, क्रिम, पावडर चोपडले. सुट्टीच्या दिवशी नसता उपद्याप झाला.

एक बरं झालं पण.. निदान लगेच तरी त्याच्या आंघोळीचे काम माझ्याकडे येणार नाही.

हसुन हसुन पुरे वाट


माझी हसुन हसुन पुरे वाट करणारा एक किस्सा सांगतो.

थोडे प्रास्तावीक, मी संगणक अभियंता असुन संगणक प्रणालीमधील किडे पकडण्याचे (Software testing, bugs) काम करतो. नॉन आयटी लोकांसाठी सांगायचे म्हणजे एखादे सॉफ्टवेअर बाजारात विकायला जाण्याआधी, आपणच, ग्राहक ते सॉफ्टवेअर कसे कसे वापरेल आणि ते सगळे निट चालते आहे ना हे पहावयाचे. जर एखादी गोष्ट नीट चालत नसेल तर त्याचा ‘बग फाईल’ करायचा. मग दुसऱ्या दिवशी क्लायंट बरोबर तो बग मिटींग मध्ये चघळायचा असे थोडक्यात स्वरुप असते. उदाहरणच द्यायचे झाले तर ‘याहु मेल’ ला ‘साईन-अप’ करुन बघा होते आहे का? झाले तर संगणक-प्रणालीचा तो भाग निट चालतोय. नाही झाले तर ‘बग फाईल’ करा.

तर आता हे युजर तयार करायचे इथपर्यंत ठिक आहे हो. पण दर वेळेस टेस्ट करायचे असेल तर सारखं सारखं काय नावं द्यायची?. एकदा इतकी वाईट परीस्थीती आली की सगळ्या नावाचे युजर झालेले. काही टाकले तरी ‘Already exists’ आणि मला पण काही सुचत नव्हते म्हणुन टाकले आपले ‘First Name = maze (माझ)े Second Name= doke (डोके) Last Name=firalaya (फिरंलया )’
पण नेमका घोळ झाला आणि ‘युजर क्रियेशन फेल’ झाले. मी ही लगेच त्याचा ‘बग’ टाकुन दिला

दुसऱ्या दिवशी सकाळी ‘Bugs Analyzing Meeting’ मध्ये:

क्लायंट: ‘हे अनिकेत (क्लायंट लोक “हाय” नं म्हणता “हे” का म्हणतात हे मला न सुटलेले कोडं आहे). रिगार्डींग युवर यस्टर्डीज बग, आई सी द उजर फेल्ड नेम्ड “मझी डॉईकी फ़िअरालाया”‘
(माझ्या एकदम लक्षात आले की नेमक्या त्या युजर चे नाव मी असले अतरंगी ठेवले होते. त्याचा अर्थ मला माहीतेय पण त्या अंग्रेज क्लायंटला मराठीच कळत नाही तर त्याचा अर्थ काय कळणार?? तो तर आपला उच्चार करत होता. त्याचे ते उच्चार ऐकुन माझ्या आणि माझ्या कलीग च्या चेहऱ्यावर हास्य उमटले.) ‘सो ऍनीकीट (यातही एक मजा आहे, आमचे एक्चुअल संभाषण होयच्या आधी क्लायंट च्या दृष्टीने मी ‘तो’ नसुन ‘ती’ होतो कारण माझ्या नावात २-२ मुलीची नाव होती ‘ऍनी आणि केट’ (अनि+केत). धिस युजर, परत अडखळत त्याने ‘मझी डॉईकी फिअरालाया’ उच्चारले. गंभीर वातावरण असताना येणारे हसु दाबायचा प्रयत्न केला की हास्य जरा जास्तीच उफाळुन येते तसे आमचे झाले. म्हणजे खरंच विचार करा ना.. एखादी व्यक्ती जिच्याबद्दल तुमच्या मनात थोडाफार राग आहे अशी तुम्हाला त्याच्या नकळतच म्हणायला लागली की ‘त्याचे डोक फिरलेय’, तर हासु येईल की नाही?

आमचे ही तसेच झाले. हसण्याचा ज्वर हळु हळु वाढत होता, पण फोनवर आवाज ऐकु जावु नये म्हणुन तोंडावर हात ठेवुन हसु दाबण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात माझ्या कलीगने तिच्या चेहऱयावरचे हास्य पुसुन माझ्याकडे फेकले. (हा खेळ तुम्हाला माहीत आहे की नाही ते मला माहीत नाही. यामध्ये आपल्याला खुप हासु येत असेल तर चेहऱ्यावरुन हात फिरवायचा आणि ते दुसऱ्याकडे फेकायचे म्हणजे आपले हासु कमी होते आणि दुसऱ्याला येते) याचा परीणाम खुपच वाईट झाला आणि मी जोरात ‘फुस्स्स’ करुन हसलो. तिकडे त्याचे “मझी डॉईकी फ़िअरालाया” चालुच होते.

मध्ये त्याने एकदा विचारले ही ..’व्हॉट हॅपन्न्ड, अनीथींग रॉग?’ आम्हाला खरंच सांगतो इतके हसु येत होते ना, कदाचीत ते वाचताना जाणवणार नाही, पण त्याच्या त्या अमेरीकी एस्केंटमधला उच्चार खुपच भयानक होता. कित्ती वेळा तर मी टेबलाखाली जाउन हसुन परत वर येत होतो.

मिटींग संपल्यावर बाहेर आलो तेंव्हा अक्षरशः मी लाल झालो होतो हसुन हसुन.

हॅलो!! एस.एन.डी.टी वुमन्स कॉलेज?


शनिवार, सुट्टीचा दिवस. आमरसाचे जेवण करुन निवांत पहुडलो होतो. डोळ्यात झोप हळु हळु उतरत होती एवढ्यात घरातला फोन खणखणला. सेल्समन/सेल्सवुमन आणि फोन कधी येईल काही सांगता येत नाही. चरफडत उठलो आणी फोन उचलला.

पलीकडुन एका युवतीचा आवाज, “हॅलो, एस.एन.डी.टी. वुमन्स कॉलेज?”.
“सॉरी, रॉग नंबर”, म्हणुन मी फोन धाडकन आपटुन बंद केला.

गादीवर जाउन जरा पडीन म्हणतो, तोच परत तीचाच फोन, “एस.एन.डी.टी?”

“नाही हो.. नंबर नीट तपासा ना!”, मी आवाजातली नाराजी शक्यतो लपवत म्हणालो.
ती, “अहो नंबर हाच दिलाय. मग हा कुणाचा नंबर आहे?”
मी: “ते नाही सांगु शकत पण एस.एन.डी.टी चा नाहीये. आणि आमच्या घरातील कोणीही एस.एन.डी.टी मध्ये प्राध्यापक, कर्मचारी नाहीये”.. धडाम्म, बंद करुन टाकला.

तासाभराने परत दुसऱ्या युवतीचा फोन.. “एस. एन.डी.टी?” परत तेच संभाषण. यावेळेला तिला निट सांगीतले, तुम्ही नंबर बरोबर दाबला आहे, परत लावुन बघु नका. हे एस. एन. डी. टी. वुमन्स कॉलेज नाही.

त्यानंतर दिवसभरात ८-१० फोन आले. झोपेचा पार बट्याबोळ झाला. इतका वैताग आला होता ना!!

रविवार सकाळ. १०.३० वाजले होते, टि.व्ही. वर ‘अलीफ लैला’ नामक कार्यक्रम बघत बसलो होतो. उडता गालीचा, आग ओकणारा राक्षस मस्त रंगात आले होते, एवढ्यात फोन वाजला.

पहील्यांदा…
“एस.एन.डी.टी?”
“रॉग नंबर”.. धडाम्म..

दुसऱ्यांदा..
“एस.एन.डी.टी?”
“रॉग नंबर”.. धडाम्म..

तिसऱ्यांदा..
“एस.एन…?”
“रॉग नंबर”.. धडाम्म..

चौथ्यांदा
“एस.?”
“रॉग नंबर”.. धडाम्म..

पाचव्यांदा..
धडाम्म..

आता माझ्या संभा्षणात अजुन एक वाक्य जोडले गेले होते, ‘तुम्हाला एस. एन. डी.टी. चा नंबर मिळाला तर त्यांना सांगा कुठल्यातरी प्रॉस्पेक्टसवर चुकीचा नंबर टाकलाय.’ जेणेकरुन तो नंबर लवकरच बदलला जाईल आणी मला येणारे हे निरर्थक फोन बंद होतील. पण कसंच काय? काही उपयोग झाला नाही. फोन येतच राहीले.

काही वेळेला माझ्याबद्दल लोकांना सहानभुती वाटावी म्हणुन मला कित्ती त्रास होतोय हेही सांगत होतो. पण काही महाभाग असेही होते..’हा एस.एन.डी.टी चा नंबर नाही तर मग त्यांचा नंबर काय?’ (आता मला काय माहीत).. अहो असे कसे माहीत नाही तुम्हाला, तुम्हाला इतके फोन येतात तर माहीत करुन घ्या ना (अहो..). धडाम्म, माझे म्हणणे ऐकुनच घ्यायचे नव्हते त्यांना.

काही आया आपल्या मुलीच्या कॉलेज ऍडमीशनबद्दल भावुक होत होत्या. “अहो, मी बारामती हुन बोलतेय (कधी कधी नगर, औरंगाबाद, नाशीक ही होतं) प्लिज मला तिथला नंबर सांगा ना. मी परत उद्या फोन करते” आता माझ्याकडेच नाही तर मी तरी कुठुन देणार.

महीनाभर हा प्रकार चालु होता. आता मात्र माझ्या आणि माझ्याही पेक्षा जास्ती आई आणि बायकोच्या.सहनशक्तीचा अंत झाला होता. हातातली कामं सोडुन फोन घ्यायला यावे तर हे ‘एस. एन. डी. टी!!!’

टेलीफोन डिरेक्टरी शोधुन झाली, झालेच तर कॉलेजमध्ये जाउन प्रॉस्पेक्टस बघुन झाले, पण माझा नंबर तिथे कुठेच नव्हता. मग या सगळ्या ‘विद्यार्थीनी’ मला कुठुन फोन करत होत्या. बर एस. एन. डी. टी. ची एक का वेबसाईट आहे?. कित्ती तरी शोधुन झाल्या पण प्रयत्न व्यर्थ. काही दिवस गणपती पाण्यात ठेवला, तळ्यातल्या गणपतीला नवस बोलला. पण काही उपयोग नाही.

पण एके दिवशी मात्र सापडली, एक वेबसाईट सापडली आणि घोळ लक्षात आला. माझा नंबर आणि एस. एन. डी. टी. चा नंबर अगदी एकसारखाच.. शेवटचे दोन अंक सोडले तर. माझ्या नंबरचा शेवट ‘६९’ ने होणारा तर एस.एन.डी.टी. चा शेवट ‘९६’ कोणत्यातरी लायकी नसलेल्या निर्लज्ज संगणक अभीयंत्याने वेबसाईट तयार करताना ‘९६’ ऐवजी ‘६९’ टाकले होते.

एखादा खजीना सापडावा तस्सा मला आनंद झाला. लगेच एस.एन.डी.टी. ला फोन करुन त्यांच्या कानावर ही चुक घातली. परंतु २ आठवडे उलटले तरी फोन चालुच होते. म्हणलं कदाचीत या युवतींनी खुप आधी वेबसाईट वरुन नंबर लिहुन घेतला असेल. होईल बंद हळु हळु. माझे समाजकार्य चालुच होते. आता नंबर माहीत असल्यामुळे त्या युवतींना मी खरा नंबर देत होतो आणि एक कळकळची विनंती पण करत होतो..”ताई, कृपया तिकडे फोन कराल तेंव्हा त्यांना सांगा वेब-साईटवर नंबर चुकीचा आहे.”

तरीही २ आठवडे झाले, फोन चालु. शेवटी परत एस.एन.डी.टी. कार्यालयात फोन केला. खरं तर चुक माझीच होती, लंच टाईम मध्ये फोन करत होतो.. पण काय करणार कामाच्या व्यापात वेळच मिळत नव्हता. ३-४ प्रयत्नांनंतर शेवटी कोणीतरी फोन उचलला.

‘हॅलो..’ (आवाजात पुणेरीपणा आणि खत्रुडपणा पुरेपुर भरला होता.)
मी: ‘हॅलो. एक विनंतीवजा तक्रार करायची होती. तुमच्या एका वेब-साईटवर तुम्ही चुकीचा नंबर टाकला आहे. म्हणजे बघा तुमचा नंबर xxx xxx x९६ आहे तर तुम्ही तो चुकुन xxx xxx x६९ टाकला आहे, जो दुर्दैवाने माझ्या घरचा नंबर आहे. तुमचे सगळे चौकशीचे फोन माझ्या घरी येतात हो. कृपया तो नंबर बदलुन घ्या’

त्याने माझे म्हणणे शांतपणे ऐकुन घेतले आणि ‘बरं’ म्हणुन फोन ठेवुन दिला.

मी खुश.. लगेच घरी फोन करुन आनंदाची बातमी दिली की आत्ता हे फोन बंद होणार. काय घोळ झाला होता आणि मी तो कसा शोधुन काढला ते सांगीतले. बायकोच्या आवाजात ‘नवरा माझा कित्ती हुशार’ चा भाव, तर आईच्या ‘पोरगं माझ गुणाचं’ कसं शोधुन काढल नै त्याने’!!

संध्याकाळी जेवायला गोडाचा शिरा होता.

दुसरा दिवस उजाडला आणि ‘येरे माझ्या मागल्या’ चालुच. एक दिवस झाला, दोन झाले, चांगला आठवडा झाला. शेवटी परत ‘एस.एन.डी.टी.’ च्या कार्यालयात फोन केला. यावेळेला फोन उचलणारा नविन असल्याने आणि मागच्यावेळेला फोन कोणी घेतला होता हे माहीत नसल्याने त्याला परत सगळे सांगावे लागले.

‘अहो पण तो वेब-साईटच्या नंबरचं आम्ही काही करु शकत नाही?’ तो..
मी संगणक क्षेत्रातलाच असल्याने मी ही लगेच ‘अहो पण का? एक साधी HTML तर आहे, तुम्हाला ती फक्त एडीट करुन नंबर बदलायचा आणि HTML परत पब्लीश करायची. आहे काय त्यात?’
‘अहो.. बरोबर आहे, पण ती वेब-साईट मुंबईला आहे!!’
मी आव्वाकच..”अहो वेबसाईट अशी कुठल्या गावाला नसते हो.. ती एका कंम्प्युटर वर असते जी कुठुनही एक्सेस करता येते. तुम्हाला त्या गावाला नाही जावे लागणार. प्लिज तेवढे बदलुन घ्या ना”
तो .” ते आम्हाला नाही कळत काही, एक काम करा तुम्ही मुंबईच्या कार्यालयात फोन करुन तक्रार नोंदवा ते बदल करतील”.. धडाम्म!!

आता मुंबईचा नंबर शोधण आलं. हातातली काम सोडुन २-३ मुंबईचे नंबर लावल्यावर एका ठिकाणी बरोबर नंबर लागला. तेथील मॅडमने फोन घेतला. मी परत माझं सगळ तुण-तुण वाजवल्यावर त्या मॅडमने नंबर लवकरात लवकर बदलुन घेण्याची आश्वासन दिले. तसेच अतीशय सौम्य शब्दात माझी माफी मागीतली. म्हणलं बघा मुंबईची लोक, नाहीतर आपल्या पुण्यात सगळे खत्रुडच भरलेले. आता आपलं काम होणार या विचाराने मी निर्धास्त झालो.

योगायोगाने २-३ दिवस कुणाचा फोन सुध्दा आला नाही. मग काय विचारता एकदम खुश. पण माशी शिंकायला वेळ नाही लागत, तिसऱ्या दिवशी तो नतदृष्ट वाजलाच ‘एस.एन.डी.टी.’ चा जप करत.

आता मात्र माझ्या सहनशक्तीचा अंतच होता. मग फोन करुन शेवटी अरेरावीची भाषाच वापरली. म्हणलं २ दिवसांत नंबर बदला नाहीतर ‘ग्राहकमंचाकडे तक्रार’ नोंदवतो. तसेच त्यांना होणाऱ्या नुकसानीचीही जाणीव करुन दिली. तुमच्या कॉलेज मध्ये ऍडमीशन घेउ इछ्चीणाऱ्या कित्तेक युवतींना योग्य नंबर न मिळाल्याने तुमचा आणि त्यांचा ही तोटा होतो आहे.

नंतरही काही दिवस फोन येत राहीले आणी मग बंद झाले. एक दिवशी सहजच ती वेब-साईट परत पाहीली आणि नंबर बदलेला दिसला आणी खरंच सांगतो, जीव १० फुटांवरुन हेलकावत भांड्यात पडला.

आजही फोन वाजला की छातीत धडकी भरते..”परत एस.एन.डी.टी. तर नाही!!!’

असंभव


प्रास्तविक: दहा जन्मांपुर्वी शुभ्राचे सासरे असलेले या जन्मी आता पाकीस्तानचे संरक्षण मंत्री – कुरेशी म्हणुन आयुष्य जगत आहेत. परंपरेनुसार त्यांना दहा जन्मांपुर्वी शुभ्रेने केलेला छ्ळ आठवतोय आणी शुभ्रा रहात असलेल्या देशाचा नायनाट करयायचा ह्या एकाच उद्देशाने ते झपाटलेले आहेत.

स्थळ: पेशावर मधील निर्जन परीसर. कुरेशी एका खुर्चीत डोळे मिटुन बसलेले आहेत. सर्व सामान्य माणुस त्यांचा डोळा लागला आहे अश्या समजुतीत राहु शकतो, पण सत्य हे आहे की त्यांचा हिंदुस्तानातीलच एका व्यक्तीशी मनाचा संवाद चालला आहे. ति व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसुन दस्तुर-खुद्द सुलेखा आहे.

कुरेशी, “लेखा, हमे खुशी है की आखीर तुमने हमारी बात मानली. सिर्फ शुभ्राही नही बल्की पुरा हिंदुस्तान तुम्हारा दुश्मन है. आज रात हम्हारा एक खास जहाज तुम्हे पाकीस्तान ले जाने के लिए आयेगा, तुम..”

सुलेखा: “जनाब कुरेशी, आप अभी-भी मुझे समज नही पाए. मुझे किसीके सहारे की जरूरत नही. मै मेरी शक्तीयोंका इस्तमाल करके कही भी आ-जा सकती हुं. फिलहाल जो भी करना है मै यही से कर दुंगी, अब इजाजत दिजीये.”
—————————————————————————————————————————————
प्रसंग दुसरा: दिल्ली, पक्ष कार्यालयात हाय कमांड ची मिटींग चालु आहे. अचानक हाय कमांड गप्प होतात. नजर शुन्यात जाते, डोळे गोल-गोल फिरायला लागता. कार्यकर्ते घाबरुन जातात. मॅडम ना फिट आली की काय म्हणुन कोण कांदा लावतेय, कोण चप्पलेचा वास देतेय, कोण तोंडात चमचा ठेवतेय. परंतु प्रसंग वेगळाच आहे. सुलेखाने हाय-कमांडच्या मनाचा ताबा मिळवलाय.
मॅडम मानेला झटके द्यायला लागतात, तोंडाने हुss हुss हॅ हु असा आवाज निघायला लागतो.
सुलेखा हाय-कमांडच्या मनातील सगळ्या गोष्टी काढुन घेते आणि हाय-कमांडच्या मनापासुन disconnect होते.

थोडा वेळ विश्रांती घेउन ती कुरेशींच्या मनाला Connect करायचा प्रयत्न करते, पण त्यांचे मन Engage येते.

“शीss!! काय वैताग आहे, इंटरनेट चे समजु शकते, पण आजकाल मनाला connect करायचे म्हणले तरी वेटींग आहे.”, सुलेखा.

कुरेशींच्या मनाला connect करायचा परत परत प्रयत्न करत रहाते, पण tone engageच येतो.
—————————————————————————————————————————————
प्रसंग तिसरा:
“मिसेस शास्त्री sssssssssss, आठवा सासरी आल्यापासुन तुम्ही स्वयंपाक घरात केलेला एखादा पदार्थ तरी आठवा”, डॉक्टर
शुभ्रा: “ते जाउदेत डॉक्टर, मला कसलेतरी भास होत आहेत, कसली कसली स्वप्न पडतात. त्या स्वप्नांचे अर्थ कळणे महत्वाचे आहे.”
“…मिसेस शास्त्री..”, डॉक्टर
“नाही डॉक्टर, आता नाही सहन होत, सकाळ संध्याकाळ दिवसांमागुन रात्र धावतेय, सुत्रधार या साऱ्याचा नाव तयाचे काय. काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा डॉक्टरssss” शुभ्रा.
“मिसेस शास्त्री, तुमचा नवरा नोकरी धंदे सोडुन दुसऱ्या मुलीच्या मागे फिरतोय, तुमची बिचारी सासु एकटीच स्वयंपाक घरात राब राब राबतीय, नणंद शिक्षण व्यवसाय काही न करता फालतु गुप्तहेरी करतेय. आजो-सासऱयांना श्री-रामाचा जप-करुन करुन मानेचा जर्जर आजार जडलाय आणि तुम्ही तुमची स्वप्नच घेउन बसला आहात?” डॉक्टर
“डॉक्टर, जास्ती प्रश्न विचारु नका, मी एकटीच तुमची पेशंट आहे. उद्या मी डॉक्टर बदलला तर तुम्हाला रस्त्यावर यावे लागेल. चला आपलं सेशन चालु करुया..” शुभ्रा.

दोघेही डोळे मिटुन बसतात.
—————————————————————————————————————————————
खडकी बाजार परीसर, जुना पुणे मुंबई रस्ता. रस्त्याच्या कडेला हेल्मेट, कुंड्या, मुर्ती विकणारे, दुपारची जेवण करुन बसलेले आहेत. इतक्यात एक मुलगी तावा-तावाने तिथे येते.
“हि कुठली मुर्ती दिलीत? त्याने काही होतच नाही.” ती मुलगी, अर्थात प्रिया.
“काही होत नाही म्हणजे? अवं मुर्ती काय बार-बालांसारखा नाच करतात व्हयं मंग?”, विक्रेता
“अहो असं काय करताय? त्या विद्न्यानाच्या पुस्तकात लिहीलेय तसं. एक डोळा फुटलेली, रंग उडलेल्या मुर्ती चालतात म्हणुन. ते काही नाही मला मुर्ती बदलुन द्या”, प्रिया
“काय ताई, अहो चिनी मालाची कधी गॅरंटी असते व्हयं? ह्यो मुर्ती चिनी माल है. एक-बार बेचा तो हो गया, इसमै exchange नही है” विक्रेता.
प्रियाचा जळफळाट होतो. हातातली मुर्ती कोपऱ्यात फेकुन ती निघुन जाते
प्रिया गेल्यानंतर झाडामागुन हळुच सुलेखा बाहेर येते, ती कोपऱ्यात फेकलेली मुर्ती उचलते. मुर्तीच्या पायाखाली एक खटका असतो, तो दाबते, मुर्तीचे डोळे लाल होतात. सुलेखा खुश होते.
—————————————————————————————————————————————
प्रथमेश ची आई गावातुन खरेदी करुन दमुन घरी आली आहे. पदराने कपाळावरचा घाम टिपत टिपत ती खुर्चीत अंग टाकते. दोन मिनीट धापा टाकल्यावर लगेच उठुन प्रथमेश च्या खोलीत जाते. प्रथमेश नेहमीप्रमाणे काहीतरी चित्र काढत बसलाय. त्याची आई कोपऱ्यातील काही कोरी कागद उचलुन त्याच्या समोर ठेवते आणि त्याला खाणा-खुणा करुन सांगते,
“प्रथमेश बेटा, अरे कामाच्या गडबडीत सकाळची सिरीयल बुडलीच बघ. तुला मागच्या जन्मातले आठवते तसे जरा आठवुन बघ बरं मालीकेत काय झालं आणी मला सांग.”

प्रथमेश डोळे मोठे आणी वाकडे तिकडे करतो. नंतर कोऱ्या कागदावर चित्र काढायला लागतो. त्याची आई कौतुकाने ती चित्र बघत असते.. शेवटचा कागद बघता बघता स्वतःशीच पुटपुटते, “कुसुमचे लग्न झाले की नाही ते शेवटी नाहीच दाखवले वाटतं आज..!!”
—————————————————————————————————————————————
डॉ. विराज आणि तनिष्का ची मुलगी पियु १०वी च्या परीक्षेला बसली आहे. तीचा गणीताचा पेपर फारच कठीण आलेला असतो. परीक्षा वर्गात तीला टेंन्शन मुळे काही आठवत नाही. ती नापास होणार या विचाराने रडायला लागते.

तनीष्का, तिची आई, घरातुन पियु च्या मनाचा ताबा घेते आणि सगळा पेपर सोडवुन टाकते. पुढचे सगळे पेपर अश्याच रीतीने सोडवले जातात आणि पियु मेरीट-लिस्ट मध्ये नंबर मिळवुन उत्तीर्ण होते.
—————————————————————————————————————————————
हाय-कमांडच्या मनाचा ताबा घेण्याची घटना भारताने फार गांभीर्याने घेतली आहे असे प्रणब-मुखर्जी आज-तक ला सारखे सारखे ओरडुन सांगत असतात, पोलीसांच्या हाती लागलेल्या काही पुराव्यांमुळे आणि देशभक्तीला जागुन शुभ्रा, डॉक्टर आणि प्रथमेश ने केलेल्या सहकार्यामुळे सुलेखावरचा संशय वाढत जातो. शेवटी सुलेखा देश सोडुन पाकिस्तानचा आश्रय घेण्याचे ठरवते. त्यासाठी ती बॉर्डर वर वसलेल्या कुसवडे गावातुन पाकिस्तान हद्दीत घुसण्याचे ठरवते. दुपारच्या कडक उन्हात जेव्हा सगळा गाव झाडाच्या सावलीत लवंडलेला आहे, तेंव्हा सुलेखा दबकत दबकत चाललेली असते, अचानक कुसवडे गावात मोकळा सुटलेला वळु- डुरक्या तिच्या समोर येतो. ते काळं जनावर पाहुन प्रथम सुलेखा घाबरते पण नंतर ती मनावर ताबा मिळवते. दोघांची नजरा-नजर होते. सुलेखा डोळे गरा-गरा फिरवते, डुरक्याला हे सहन होत नाही. तो चक्कर येउन खाली कोसळतो. दुसऱ्या दिवसांपासुन गावकऱ्यांना डुरक्याच्या वागण्यात झालेला मवाळ पणाचा बदल लगेच दिसुन येतो. डुरक्या कमालीचा शांत होतो.
—————————————————————————————————————————————
“श्री-राम, श्री-राम… हुंssssss.. आहं.. श्रीराम.. हुंsssss”.
आजोबांच्या खोलीतुन येणारे असले विचित्र आवाज ऐकुन विष्णु धावत धावत येतो. बघतो तर काय? खोलीत आरश्यासमोर आजोबा विचीत्र वेषात उभे असतात. छातीवर, हातावर पोटावर काय काय कोरलेले दिसते. लांबुन विष्णु फक्त “पार्वती वहीनी वॉज किल्ड” एवढेच वाचु शकतो. आजोबा विष्णुला बघतात, समोर पडलेला कसलासा गठ्ठा उचलतात आणि रागारागाने येउन विष्णू समोर येउन उभे रहातात. मग हातातल्या गठ्ठ्यातुन एक एक फोटो काढुन बघु लागतात. एक फोटो सापडतो तो बघुन त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. ..”श्रीराम श्रीराम, अरे विष्णु होय.. आज काल वयामानानुसार विसरायला होतो बघ. १५ मिनीटांपेक्षा जास्तीचे आठवतच नाही काही. मग ते त्याच्या जवळ येउन उभे रहातात आणि दोघांचा मिळुन हातातल्या पोलोराईड कॅमेऱ्यातुन फोटो काढतात.
—————————————————————————————————————————————-
शेवटचा प्रसंग:

पाकिस्तानच्या वायव्य प्रांतात जनाब कुरेशी, सुलेखा आणि काही किडुक मिडुक सैनिकी ड्रेस घातलेले लोक बसले आहेत. मध्ये कसलीशी एक फुटकी मुर्ती हार घालुन सजवण्यात आली आहे. भारतात शुभ्रा, आजोबा आणि परिवार बसलेला आहे.

डॉक्टर – “मिसेस शास्त्री, सुरु करा.”
शुभ्रा – “आजोबा, पहीला मंत्र सांगा”.
आजोबा – “ओम, भगं भुगे भग्नि भागो दरि.. ओम फट स्वा:”
पाकिस्तानात कुरेशीच्या कानशीलात एक जोरात फटका बसतो. कुरेशी चवताळतो .. “इस्स थप्पड की गुंज तुम्हे सुनाई देगी..” वगैरे काहीसे बडबडतो. इकडे प्रथमेश हात-पाय झाडतो, डोळे फिरवतो, आजोबांचे ‘श्रीराम’ जोरात चालु असते. आईंना पुजेसाठी प्रसादाचा शिरा करायचा असतो त्यामुळे त्या पुजेला न येता नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरातच असतात. प्रसाद करता करता रात्रीसाठी थोडं पिठ्ल भात पण टाकतात.

मंत्र जोरात चालु असतात. शुभ्रा.. “आजोबा.. पुढचा मंत्र”, तेवढ्यात १५ मिनीटं होतात. आजोबा सगळं विसरतात. त्यांच्या मोबाईल मध्ये “टि..टि.. वाजते.” मग ते सगळे फोटो वगैरे बघायला लागतात. शुभ्रा वैतागते.

तेवढा वेळ सुलेखाला मिळतो, ती शिरजोर होयला लागते. सुलेखा जिंकणार असेच वाटत असताना दार उघडुन एक काळी आकृती आत येते. सुलेखाच्या तोंडुन अस्पष्ट शब्द बाहेर पडतात, “आभिमान??”

अभिमान सुलेखाने फसवल्याने चिडलेला असतो. त्याने अंगाला सगळीकडे बॉंब लावलेले असतात.. “दिल से” चित्रपटात जसा शाहरुख खान मनीषा कोयरालाला जवळ ओढतो तसेच तो सुलेखाला कवेत घेतो आणि बटन दाबतो.. मोठ्ठ स्फोट होतो.. सगळे मरतात. शुभ्राचा विजय होतो.

तेवढ्यात आईंचा आवाज येतो.. “चला गरम गरम पिठ्ल भात खाउन घ्या ssssss!!!’

[समाप्त]

माझा हा लेख काही दिवसांपुर्वी दैनीक सकाळ मध्ये प्रसिध्द झाला होता.

निशब्द


राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप, वैयक्तीक टीका-टीपणी. मी मराठी, तु बिहारी, तु मुस्लिम, तु दलीत असे जातीय टोपणं अश्या वातावरणात हे दृष्य मला खरंच निशब्द करुन गेले.

मैत्री

सहज खिडकीतुन बाहेर बघत बसलो होतो तेंव्हा दोन पोपट आणि एक खारुताई एकाच ताटात आपला खाऊ खात होते. एक पक्षी वर्गातला तर दुसरा प्राणी वर्गातला. रहावलं नाही, पटकन कॅमेरा काढला आणि त्यांची ही मैत्री कॅमेरात टिपुन घेतली.

खरंच माणुस सर्वश्रेष्ट, सर्व शक्तीमान, बुद्धीमान आहे का? आणि असेलच तरीही त्याला प्राण्यांकडुन खुप काही शिकण्यासारखे आहे.