एक आगळी-वेगळी पैज


पैज ह्या प्रकारापासून मी जरा चार हात दूरच राहतो. कारण त्यात हरलो तर फार मोठे काही तरी गमवावे लागते आणि जिंकावे म्हणाले तर ते म्हणावे तितके सोपे नसते. पण शेवटी मानव प्राणी हा चुका करतच राहतो नाही का?

अशीच एक घटना, कॉलेजच्या दिवसांतील. नेहमीप्रमाणे आम्ही सगळे टवाळकीगीरी करत कॅन्टिन मध्ये बसलो होतो. रोज पैसे फार खर्च होतात म्हणून कॅन्टिन मध्ये जायचे नाही असे ठरवायचो.. आणि दररोज पावलं तिकडेच वळायची. सहज मनात विचार आला.. आठवडाभर रोज कॅन्टिनमध्ये येऊन खायचे आणि पैसे दुसऱ्या कुणी तरी भरायचे असे घडले तर किती बरे होईल नाही?.

मी माझा विचार तसा लगेच बोलूनही दाखवला.

आमच्या गप्पा चालूच होत्या तेवढ्यात कॅन्टिन मध्ये दोन छोटी मुलं पैसे मागायला आली. त्यांनी हनुमानाचा वेष घातला होता. तोंडाला हनुमानाचा मुखवटा, गळ्यात माळा, कमरेला एक फडक बांधलेले, खांद्यावर एक गदा, आणि मागे शेपटी. असली सॉलिड ध्यान दिसत होती ती.

ग्रुपमधल्याच एकाला युक्ती सुचली, मला म्हणाला.. “चल.. तुझे आठवड्याचे बिल मी भरतो..पण एक पैज लावायची.. ती जिंकलास तरच..”. मी लगेच तयार झालो..

मग तो म्हणाला.. हे दोन हनुमान आहेत ना त्यांना तुझ्या गाडीवर बसवायचे आणि डेक्क्नन पर्यंत फिरून यायचे. बरं नुसते जायचे नाही..जाताना स्वतःशीच काहीतरी मोठ्यांदा बडबडायचे. कुणी काही बोलले तरी त्यांच्याशी काही बोलायचे नाही. तू बरोबर वागतो आहेस की नाही हे पाहायला आम्ही मागून आमच्या गाड्यांवरून येणार.. बोल आहे कबूल?.

माझे कॉलेज.. सिंबायोसिस.. सेनापती बापट रोडवर होते.. तेथून डेक्कन तसे फार लांब नाही. पण तरीही…!! शिवाय वाटेत दोन कॉलेज लागतात..B.M.C.C आणि मराठवाडा.. चांगले public असते.. जवळच F.C. रोड आहे..काय करावे.. पण पैसे वाचण्याचा मोह ही होताच की.. शेवटी मी तयार झालो..

पैज लावली तर खरी, पण मनात विचार-चक्र चालू होते. इतक्या वेळ बोलायचे तरी काय?. नुकतेच शिवाजी महाराजांवरील पुस्तक वाचनात आले होते, त्यातील पावनखिंडीचा भाग कालपरवाचं वाचला असल्याने जसाच्या तसा लक्षात होता. मग ठरले तर.. तोच इतिहास बडबडायचा. ते दोन वानर पोरही माझ्याबरोबर पार्किंग मध्ये आली. आधी दोघांनाही मागे बसवले.. पण पुढच्याची शेपटी मागच्याच्या तोंडात जात होती.. त्यामुळे तो मागचा वैतागला. शेवटी एकाला मागे बसवले, आणि दुसरा, पुढे पेट्रोलच्या टाकीवर बसला.

काय सुंदर दृश्य होते ते. सगळे जण माझ्याकडे हा काय publicity stunt म्हणून बघत होती. हास्याचा महापूर लोटला. तशातच माझी गाडी मी पार्किंग मधून बाहेर काढली…मी माझी बडबड लगेच मोठ्यांदा चालू केली.

“….. आणि महाराजांची पालखी पन्हाळ्यावरून बाहेर पडली. अंधारामुळे दिसत काहीच नव्हते. पाऊस व सोसाट्याचे वादळ चालूच होते. विजेच्या प्रकाशात शत्रूने पाहिले (मनातल्या मनात म्हणाले, H.O.D. ने पाहिले तर) तर या भितीने जीव खालीवर होत होता. महाराज श्रींचे स्मरण करीत होते जगदंब-जगदंब!..सबंध डोंगरावरून पाणी खळाळत होते. रातकिड्यांनी कर्कश सूर धरला होता. सारे वातावरण भयानक होते…”

( वातावरण खरंच भयानक होते ते.. पुढे वानर, मागे वानर अशी ती आमची फेरी सेनापती बापट रोड पासूनच कुतूहलाचा आणि हास्याचा विषय ठरली होती.

रस्त्यावरून पायी जाणाऱ्या एका छोट्या मुलीने तीच्या आईला आमच्या कडे बोट दाखवून म्हणाली..”ममा ममा ते बघ मंकी गाडीवरून चाललेत” मागोमाग माझी दोस्त मंडळी येतच होती.

रंगोली हॉटेलपाशी नेमका सिग्नल लागला. आता आली का पंचाईत. कारण गाडी थांबवून बोलणे म्हणजे फारच झाले. आजूबाजूला लोक उभी असणार.. पण काय करणार.. पैज लावली होती.. माझे शिवचरित्र चालूच होते)

….बाजीप्रभूंनी आणि मावळ्यांनी वेढ्यांत पाऊल टाकले. पावसाचे आडवेतिडवे फटकारे बसत होते. महाराजांची पालखी गुपचूप पण झपझप पुढे सरकत होती.

थोड्याच वेळात वेढ्याची हद्द संपली. महाराज सिद्दी जौहरच्या मगरमिठींतुन सहीसलामत निसटले होते.

(शेजारचा एक माणूस बऱ्याच वेळ आमच्याकडे बघत होता, शेवटी त्याने विचारले..)
कुठल्या कॉलेजचा Traditional Day?
(मला इतरांशी बोलण्याची परवानगी नव्हती. मी त्याच्याकडे नजर टाकली आणि म्हणालो..)

“तुम फौरन शिवाजी का पीछा करो! मरे हाथोंसे एक बेनजीर नगीना निकल गया! हमारी ऑंखों में धूल झोंककर शिवाजी भाग गया! जाओ!

(तो माणूस चक्रावून गेला. म्हणाला.. काय आज सकाळी सकाळीच का?)

मी: बाजीप्रभू महाराजांना म्हणाले ” महाराज, तुम्ही जाणें! या खिंडीमेध्ये निम्मे मावळे घेऊन मी थांबतो. गडावर जातांच तोफांचे आवाज करणे! तोंपावतो गनिमाची फौज येऊं देत नाही! आमची चिंताच करूं नका”
बाजींनी महाराजांना अखेरचा मुजरा केला. हर हर महादेव!

त्याच वेळेस सिग्नल सुटला.. बरोबरच्या वानर सेनेनेही खांद्यावरील गदा उंचावून “हर हर महादेव” चा जल्लोष केला.

शत्रूची पहिली भयंकर लाट खिंडीवर थडकली. (माझ्या आजूबाजूनेही गर्दीची प्रचंड लाट वाहत होती. सगळ्यांच्या नजरापासून तोंड लपवत मी गाडी हाकत होतो) बाजीची (आणि माझीही) वानरसेना खवळली होती. खडाजंगी युद्ध सुरू झाले. बाजीची फौज सिद्दी मसूदच्या फौजेला जणू आव्हानच देत होती या या लेकांनो! आमचा राजा हवाय नाही का तुम्हांला? या इकडे!

थोड्याच वेळात डेक्कन आले.. चला..एक तर टप्पा पार झाला.. आता परत वळायचे आणि कॉलेज गाठले की झाली पैज पूर्ण. पण बहुदा जगदंबेला.. आपले.. ईश्वराला हे मान्य नसावे. डेक्कन च्या बस स्टॉप वर अजून एक-दोन हनुमानाच्या वेषातील ती भिकारी पोर उभी होती. कोणता तरी एक नेता त्यांना खाण्याचे काहीतरी वाटत होता. त्यातील एकाची नजर गाडीवर बसलेल्या त्या दोघांकडे गेली.. आणि त्याने आवाज टाकला..

“ए sss शंत्या, बबन्या.. अरं हे बघ इकडे काय मिळतेय”

त्यांना बघताच या पोरांनी मला गाडी थांबवायला सांगितली आणि ट्णा..ट्ण उड्या मारत ही पोर तिकडे निघून गेली. मी बऱ्याच वेळ वाट पाहिली..पण गर्दीत ती पोर कुठे पसार झाली काही कळलेच नाही.

“….गडावर तोफा कडाडल्या, आणि एकडे बाजीचा देह खिंडीत कोसळला.. गजापूरची खिंड पावन झाली ! पावनखिंड !”

माझ्या दोस्त लोकांनी माझ्या performance ची कदर करून आठवड्याचे नाही.. निदान ३ दिवसांचे कॅन्टिन बिल भरले. अशी ही आगळी-वेगळी.. आणि खूप मजा केलेली पैज मी कधीच विसरू शकणार नाही.

Advertisements

11 thoughts on “एक आगळी-वेगळी पैज”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s