पुणे ते कोल्हापुर


आ sss ले पाक, आ ले पा ss क, खारा दाणा, वडा पाsssव..वडा पाव” अशा आवाजांनी स्टेशनचा परिसर नुसता भरून गेला होता. त्यातच निर्देशीका आपल्या शक्य तितक्या कोमल आवाजात “कोल्हापुरला जाणारी गाडी ७२३९ प्लॅटफॉर्म नं. ३ ला लागली आहे” वगैरे घोषणा करत होती. तिची ती अखंड बडबड KBC मधला अमिताभ बच्चनच काय तो ‘समय समाप्ती की घोषणा’ करून बंद करू शकला असता.

कोल्हापूर ला जाणारी गाडी लागलीय म्हणाल्यावर आम्ही आमचे सामान उचलले आणि त्या खटारा लाल रंगाच्या एस.टी मध्ये जाऊन बसलो.

खरं तरं अमितचे कोल्हापुरला जाण्याचे अचानकच निघाले, कोर्टाचे काही कागद-पत्र त्याच्या आजोळी पाठवायचे होते. त्यामुळे खाजगी गाडीचे आरक्षण मिळाले नाही. मलाही काही काम नव्हते म्हणाला चला जाऊन येऊ त्याच्याबरोबर. तेवढाच बदल म्हणून मी पण निघालो त्याच्याबरोबर.सामान वरती टाकून, एस.टीच्या त्या खडबडीत, स्पंज निघालेल्या हिरव्या बाकड्यावर बुड टेकवून बसलो.

आजूबाजूला नजर टाकली, सगळी लोक अगदी टिपीकल गाववाले वाटत होते. कोण तंबाखू चोळतेय, कोण बिडी फुंकतेय, कोण कुंकवा-एवढा टिळा लावलेली बाई बरोबरच्या बाईबरोबर वसा-वसा भांडतीय, एखादा म्हातारा आपल्या छातीच्या फासळ्या कराकर खाजवत खोकतोय. ६-७ तासांचा तो प्रवास या असल्या गाडीतून त्रासदायक होणार हे तर
नक्कीच होते, शिवाय वेळ तरी कसा घालवायचा?? मग पुढच्या बाकड्याच्या मागे लिहिलेली प्रेमी युगुलांची नाव, कुणाची शेरो-शायरी, कुणाची चित्रकला पाहतं बसलो.

इतक्यात कुणाचा तरी हसण्या-खिदळण्याचा आवाज आला म्हणून दाराकडे नजर टाकली तर एक सुंदर बालीका आपल्या मैत्रिणींचा निरोप घेत गाडीत चढत होती.

“आयला, आखीर भगवानने मेरी सुनली.!”, मी स्वतःशीच पुटपुटलो.
“तेरी नही, अपनी सुनली”, अमित म्हणाला आणी आम्ही हसायला लागलो.

चला प्रवास अगदीच काही कंटाळवाणा होणार नव्हता तर.

“बा sss य पियु, पोहोचलीस की फोन कर” वगैरे म्हणून तिच्या मैत्रिणी निघून गेल्या.

“पियु, छान नाव आहे हो.!! पण हे खरंच नाव असेल कारे? का प्रिया, पायल किंवा अजून काही नाव असेल??” अमित.

आता हे मला कसे माहीत असणार, पण त्याच्या बडबडीकडे दुर्लक्ष करून मी ति पियु कुठे बसतेय ते बघत होतो. तिची नजर आसन क्रमांक शोध घेत भिरभिरत होती.

चला पहिली रो तर नाही.. दुसऱ्या रांगेत नाही, तिसऱ्या, चौथ्या.. आणि.. मिळाला बहुतेक पाचवी रांग हुर्रे.. आमच्या पुढेच की.

‘देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाड के’, अमित मनातल्या मनात, पण तिला ऐकू जाईल अश्या आवाजात गुणगुणत होता. तिने एकवार आमच्याकडे नजर टाकली आणि महाराणी आसनस्थ झाल्या.

अमितने त्याचा आय-पॉड काढून माझ्याकडे दिला, म्हणाला, “गाणी ऐकत बस, म्हणजे तुला बोअर नाही होणार”,थोडक्यात तो मला या पियु प्रकारात जास्त लक्ष देऊ नकोस असेच सुचवत होता. “राहील!! आम्हाला काय?.. आम्ही आपली गाणी ऐकतो, असे बोलून कानाला तो आय-पॉड लावला”.

थोड्याच वेळात कंडक्टरने डबल मारली, आणि एस.टी. सुरू झाली. समोरच्या खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याबरोबरच येणारा तिने लावलेल्या परफ्यूमच सुगंध, मन धुंद करत होता. तिचे लांबसडक केस आणि ओढणी वाऱ्यामुळे सारखी माझ्यापर्यंत येत होती. आमच्या अमित-शेठ ला हे बघवले नसावे, त्याने त्याची जागा माझ्याबरोबर बदलून घेतली. आता
तो त्याच्या लेखी असलेल्या ह्या स्वर्ग-सुखाचा आनंद घेत होता. मी मग गाणी ऐकण्यात मग्न. मध्येच त्याच्या हालवण्याने जाग आली. तेंव्हा तो माझ्या कानात कुजबुजला,
“अंट्या अरे ती पण कोल्हापुरलाच उतरणार आहे?”
“कशावरून”, मी
“अरे आत्ता तिने तिकीट काढले ना, मी ऐकत होतो.”, अमित.

मी परत गाणी ऐकण्यात मग्न. मध्ये कुठेतरी गाडी थांबली तेंव्हा आम्ही खाली उतरलो. कंटाळा आल्यामुळे मी आपले आळोखे-पिळोखे देत होतो. आमचे अमित शेठ भलतेच खूश दिसत होते. त्याला अपेक्षा होती, मी काहीतरी विचारेन, पण शेवटी न राहवूनच तो म्हणाला,
“अड्या कसली लाइन देतीय राव. मगाशी कितीतरी वेळा माझ्याकडे बघत होती.”
“मग बोल की तिच्याशी, तुमच्या कोल्हापुराचीच असेल कदाचित”, मी.

पण त्याचे माझ्या बोलण्याकडे लक्ष नव्हते, त्याची नजर पियुचा उपहार-गृहापासून बस मध्ये चढे पर्यंत पाठलाग करत होती. अर्थात अमित म्हणत होता त्यात तथ्य होतेच. कारण बसमध्ये चढताना तिने एकदा वळून त्याच्याकडे बघितलेले मला जाणवले. एवढंच कशाला, गाडीत चढतानाही ति त्याच्याकडे बघत होती. “च्यायला, अमट्या एकदम फास्ट निघाला राव!!” मी मनातल्या मनात म्हणलं.

अमितशेठ आता चांगलेच रंगात आले होते. उगाचच मला त्याच्या कॉलेजमधले किस्से, त्याने केलेले पराक्रम, त्याचे मित्र आणि जास्ती करून मैत्रिणी यांच्याबद्दलच तो पियु ला ऐकू जाईल अशा आवाजात मला ऐकवत होता. अख्या प्रवासामध्ये त्याने मला भंडावुन सोडले होते. एक-दोनदा पियु पण वरच्या सामानातून काही तरी काढण्यासाठी उभी राहिली तेंव्हा तिने एक कटाक्ष अमितकडे टाकला होताच.

कोल्हापूर येईपर्यंत हे असेच चालू होते. नुसते नजरेचे बाण उडत होते. मला राहवून राहवून रामानंद सागरच्या रामायणाची आठवण येत होती. .. “आला आला… तिकडून आगीचा बाण आला… इकडून लगेच पाण्याचा बाण आला.. मग हे बाण बऱ्याच वेळ आकाशात उडत राहिले मग.. कधीतरी त्यांची टक्कर झाली.. आणि दोन्ही बाण अदृश्य., की लगेच
ढणाण.. टडाड.. असले काहीतरी वाद्य. आपला बाण अदृश्य झाला म्हणून लगेच तो वीर-पुत्र डोळे मोठ्ठे करून दचकणार”… अरे अरे.. काय विचार चाल्ले होते माझे, कंटाळा आला होता बहुतेक.

शेवटी एकदाचे कोल्हापूर आलेच. पियु पाठोपाठ आम्ही पण उतरलो खाली.
“रिक्ष !!”, मी आवाज दिला..
“अरे.. रिक्शा कशाला?” अमितने माझे वाक्य मध्ये तोडले, “जवळच तर आहे घर, चल चालतच जाऊ”.
नंतर लक्षात आले, पियु पण चालत त्याच रस्त्याने चालली होती, ज्या रस्त्याने आम्ही चाललो होतो.

शेवटी, कोणतरी तिची मैत्रीण तिला भेटली आणि ती तिथेच तिच्याबरोबर गप्पा मारत थांबली त्यामुळे आम्हाला पुढे जाणे भाग पडले. मग मात्र भूक लागल्याची जाणीव झाली आणि आम्ही झपाझप पावलं टाकत घरी पोहोचलो.

दारातच त्याच्या आजी, काकूने स्वागत केले. प्रवास कसा झाला वगैरे झाल्यावर, काकू अमितला म्हणाल्या,
” काय रे तुझा मोबाईल, काल आम्ही किती प्रयत्न केला लागतच नव्हता. अरे तुला शिल्पा आठवतेय का?, तुझ्या आत्ते आजीची नात? नाही का तुम्ही लहानपणी खेळायचात!!, तुला नाही आठवायची आता, अरे ति पण पुण्यालाच असते, ती पण येणार होती कोल्हापुरला. म्हणाला तुम्हाला आणि तिला कंपनी तरी मिळाली असती. पण ऐन वेळेला तिचा कार्यक्रम बहुतेक पुढे ढकलला गेला”

तेवढ्यात दारातून आवाज आला..” आजी… मी आले.. सरप्राइज..!!”
आमच्या नजरा दरवाज्याकडे वळल्या..आणि तिथेच थिजल्या.
आजी आणि काकू.. आनंदाने ओरडल्या.. “अगं पियु तू?? काय गं लबाडे, काल म्हणालीस आज नाही येणार म्हणून!!”

मग काकू अमितला म्हणाल्या, “अरे ओळखलंस का हिला.. अरे ही शिल्पा.. अरे पियु रे तिचे लहानपणाचे नाव.. तुझी लांबची बहीणच म्हण ना!!”

अमित आवाका!!
मी डोक्यालाच हात मारला.. बहीण.. ब..ही..ण… बिच्चारा अमित..!!

पियु उर्फ शिल्पा म्हणाली,.. अगं आजी, मला वाटलंच हा अमित असणार, काल काकू म्हणाली होती ना की हा पण येतोय. पण म्हणलं. तो कसला एस.टी ने येतोय.. आणि ना ओळख ना पाळख.. असं कसं. एकदम विचारणार तूच अमित का?? म्हणून नाही बोलले.!! काय रे अम्या ओळखलंस का?”

च्यायला.. म्हणजे.. म्हणून ही सारखी अमितकडे बघत होती व्हय!!!…

अमित अजूनही धक्का बसल्यासारखा स्तब्ध बसला होता!..

15 thoughts on “पुणे ते कोल्हापुर”

  1. तरुणांची एक कॉमन शोकांतिका! मस्त लिखाण!! आवडले! बाकी ‘पुणे-कोल्हापूर’ हा प्रवास आता जरा सहनीय झालाय.. आणि असले अनुभव असतील तर तो जरा जास्तच चांगला वाटतो!

  2. अनिकेत राव, मानल् तुम्हाला…. प्रवासातील अमित चे भावविश्व अगदि अचुक टिपले आहे..
    आणि पियु / शिल्पा बद्दल कळल्यावर चेहरा जो बघन्यासारखा झाला असेल. ते मी बघु शकलो…
    कोल्हापूर प्रवासात मजा आली. 🙂 🙂

    1. धन्यवाद राहुल.. तो प्रसंग अजुनही माझ्या मनात जश्याच्या तस्सा आहे 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s