…तुमच्या घरात खुन झालाय


शुक्रवारचा दिवस माझ्यासाठी अतीशय नाट्यमय ठरला.

सध्या माझे रो-हाउस विकुन एखादे मोठ्ठे घर घेण्याच्या विचारात आहे. हेच रो-हाउस मी गेले काही दिवस जवळच्याच कंपनीत काम करणाऱ्या मुलांना भाड्याने रहायला दिले होते. काही महीन्यांपुर्वीच ते रिकामे करुन घेतले. त्यानंतर थोडी डाकडुजी करुन ते लोकांना दाखवायला सुरुवात केली होती.

शुक्रवारी एका गृहस्थाचा मला फोन आला, ‘काय लोकांची फसवणुक करत आहात, घर विकताना पुर्ण माहीती का नाही सांगत?’

मला काहीच कळेना, माझ्या माहीतीतले सगळे डिटेल्स मी देत होतो, मग अशी कुठली गोष्ट आहे जी मी सांगीतली नाही आणि त्यामुळे लोकांची फसवणुक होते आहे.

मग तो गृहस्थ म्हणाला, ‘अहो सरळ सांगा ना तुमच्या घरात एका मुलीचा खुन झाला होता म्हणुन ते घर तुम्ही लगबगीने विकायला काढले आहे, नाहीतर एवढ्या चांगल्या ठिकाणचे चांगले घर कशाला कोण विकेल?’

माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ‘खुन झाला होता? माझ्या घरात? अहो काहीतरी काय बोलताय! कुणाचा खुन? कधी झाला?’

तो म्हणाला, ‘मी फोनवर बोलु शकत नाही, तुम्ही मला सोमवारी समक्ष भेटा मग आपण बोलु.’ असे म्हणुन त्याने फोन ठेवुन दिला.

मी ही कार्यालयात असल्याने मला जास्ती बोलता आले नाही. पण त्यानंतर माझे कामावरचे लक्षच उडाले. सारखे डोक्यात तेच विचार. घर रिकामे केल्यानंतरचा घराचा प्रत्येक कोपरान कोपरा आठवुन बघत होतो, कुठे काही संशयास्पद होते का? कुठे काही रक्ताचे डाग किंवा तत्सम आढळले होते का? वॉचमनचे वागणे, शेजाऱ्यापाजाऱ्यांशी बोलताना काही खटकले होते का? काहीच सुचत नव्हते. हे सगळे खरं असेल तर पोलीस केस झाली होती का? का पोलीस अजुन तपास करत असतील? कधीना कधी ते माझ्यापर्पंत पोहोचतीलच मग? कोर्टाच्या वाऱ्या सुरु. वर्षोंवर्ष. डोकं विचार करुन करुन बधीर झाले होते. शेवटी शक्य तितक्या लवकर काम संपवले आणि घरी पळालो. घरी पोहोचल्या-पोहोचल्या परत त्याला फोन केला.

मी: ‘जरा सविस्तर बोलु यात का? तुम्ही जे खुन वगैरे सकाळी म्हणालात त्याबद्दल बोलायचे आहे. मला सांगा हे कधीच्या घटनेबद्दल तुम्ही बोलत आहात? म्हणजे ती जागा रिकामी झाली असताना झाला होता? का बांधकाम चालु असताना? का पझेशन आमच्याकडे असताना? एक महीना आधी एक वर्ष आधी कधीबद्दल बोलता आहात?’

तो: ‘अहो आपण क्षमक्ष भेटुयात ना? मी आत्ता गाडीवर आहे, आणि तुम्ही हो की नाही ते सांगा ना, खुन झाला होता की नव्हता?’

मी: ‘माझ्या माहीती मध्ये तरी नाही, मी तुमच्याकडुनच ऐकतो आहे. तुम्ही जरा प्लिज गाडी कडेला घ्या आणि मला डिटेल्स सांगा, मी पोलीस कंप्लेंट करायला चाललो आहे. तुम्हाला खात्री आहे का? घर क्रमांक 1234 मध्येच खुन झाला आहे?’

तो: ‘हे बघा साहेब मी त्या भागामध्ये गेली ४० वर्ष रहातो आहे. त्या भागाची मला चांगली माहीती आहे. कोण कुठे रहाते, कोण काय करते, कुठे काय घडते मला सगळे माहीती असते’ (आता मात्र मी जाम घाबरलो होतो. हे जे घडत आहे ते खरंच आहे का स्वप्न आहे अस्सेच मला वाटत होते) तुम्ही भेटा मला, ज्यांनी कुणी मला हे सांगीतले आहे त्याला मी समोर आणतो आणि आपण सोक्षमोक्ष लावुन टाकु. त्याची माहीती चुकीची असेल तुमच्या समोर त्याचे थोबाड फोडतो. ……..भोपाळचा मुलगा होता, त्याने प्रेमप्रकरणातुन एका मुलीचा खुन केला होता..’

मी: ‘एक मिनीट..’ त्याचे वाक्य अर्धवट तोडत मी म्हणालो, माझी ट्युब आता पेटत चालली होती ..’आता लक्षात आलं काय झाले ते. तुम्हाला मिळालेली माहीती अर्धी बरोबर आहे. सांगतो काय घोळ झाला ते. माझ्या घराला लागुनच एक संगणक कंपनी आहे STPI अर्थात आणि तिथुन पुढेच अजुन एक कंपनी आहे ज्याचे नाव पण STPI. अर्थात त्यांचे लॉग-फॉर्म वेगळेवेगळे आहेत. पण तुमच्या दृष्टीने ति एकच कंपनी. खुन झाला ती मुलगी आणि तो मुलगा STP मध्ये कामाला होते, पण दुसऱ्या, माझ्या इथल्या नाहीत. ते रहात होते ते घर कंपनीलाच लागुन होते. त्यामुळे तुमचा गैरसमज झाला. तुम्हाला हवे असेल तर मी आत्ता या क्षणाला तुमच्याबरोबर पोलीस चौकीत येतो, आपण त्या घराचा पत्ता काढु आणि त्यावरुन तुम्हाला कळेल की माझ्या घराचा पत्ता आणि तो वेगवेगळा आहे. तसेच मला आता तुम्हाला भेटण्यात ही स्वारस्य नाहिये कारण मला १००१ टक्के खात्री आहे की तुम्ही ज्याबद्दल बोलत आहेत ते वेगळे ठिकाण आहे, एकच कंपनी नेम आणि एकच एरीया असल्याने तुमचा गोंधळ झाला’

असो, त्याचा माझ्याबोलण्यावर विश्वास बसला आणि तो विषय तिथेच संपला. पण तो दिवस, बापरे, डोक्याचा खरंच विचार करुन करुन भुगा झाला होता. ज्या मुलांना भाड्याने घर दिले होते, त्यांच्या प्रत्येकाचा विचार करत होतो मी. अर्थात ते सगळे विश्वासाचे होते आणि माझ्या पत्नी त्याच कार्यालयात काही दिवस कामाला होती.

पण म्हणतात ना, संशयाचा भुंगा मनात शिरला की काही खरं नसते. मन चिंती ते वैरी ना चिंती हेच खरे नाही का???

पुतळ्याचे वस्त्रहरण


‘शहाण्याने कोर्टाची पायरी चढु नये’ असे म्हणतात तसेच ‘शहाण्याने बायकोबरोबर तिच्या शॉपींगसाठीही जाऊ नये’ असे म्हणायला खरंतर काही हरकत नसावी. नुकताच घडलेला एक ऑकवर्ड किस्सा सांगतोय. अर्थात हा लेख लिहीताना आचरटपणा, आंबट-शौकीनपणाचा भाव नसुन केवळ एक अनुभव नमुद करणे हाच आहे. कुणाला यात काही गैर वाटत असल्यास मी ‘तहे दिल से’ क्षमा मागतो.

तर, एकदा बायकोच्या शॉपींगसाठी तिच्याबरोबर मी आणि आमचं व्रात्य कार्ट बाहेर पडलो. दुकानामागुन दुकान पालथी घातली, पण एकाठीकाणी पसंद पडेल तर नवलं!!. देवळात माणुस काय करतो? आत जातो, घंटा वाजवतो, नमस्कार करतो आणि बाहेर पडतो. अगद्दी तस्संच. दुकानात जायचे, बाहेर लावलेल्या कपड्यांना हात लावुन बघायचा, जो पर्यंत आतला दुकानदार बाहेर ‘काय हवंय?’ विचारायला येतोय, तोपर्यंत मोर्चा नेक्स्ट दुकान. पुण्यातले दुकानदार तर मेले लवकर बाहेरही येत नाहीत.

तर असं मजल दर मजल करत शेवटी एका दुकानाचे भाग्य उजळले आणि आम्ही आत गेलो. कपड्याच्या राशीवर राशी निघाल्या पण पसंद काही पडेना. शेवटी बाहेर पडणार तेवढ्यात बाहेरच्या एका पुतळ्यावर घातलेला एक टॉप भावला. दुकानाच्या स्टॉक मध्ये तस्साच, त्याच रंगाचा दुसरा नसल्याने, त्या सेल्स-गर्ल ने तो पुतळा आत आणला, त्याचा टॉप काढला आणि बायको तो टॉप घेउन ट्रायल-रुम मध्ये गेली.

बाहेर राहीलो मी, माझं पोरगं आणि ती सेल्स गर्ल. थोड्यावेळाने पोरगं हसायला लागलं. म्हणलं ‘काय झाले रे?’, तर म्हणे, ‘बाबा, ते बघ नंगु!!’ मी मागे बघीतलं तर तिथे टॉपलेस पुतळा. म्हणजे इतक्यावेळ तो समोरच होता, पण मी काही एवढे लक्ष दिले नव्हते. आता तो म्हणाल्यावर माझी आणि त्या सेल्सगर्ल ची नजर एकदम त्या पुतळ्यावर पडली. तिने माझ्याकडे आणि मी तिच्याकडे बघीतले. फार ऑकवर्ड क्षण होता तो. मला हसु आवरले नाही म्हणुन मी दुसरीकडे बघीतले. तेवढ्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला म्हणुन मी मागे बघीतले, तर त्या सेल्स-गर्ल ने एक फडके त्या पुतळ्यावर फेकण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला होता. यावेळेला मात्र मी हसु आवरु शकलो नाही. शेवटी मी मुलाला घेउन बाहेर पडलो.

मग परत काही माझा आत जाण्याचा धिर झाला नाही, बाहेरुनच बायकोकडे पैसे दिले आणि तिथुन सटकलो. पुतळ्याच्या विटंबना झाल्याच्या अनेक बातम्या वाचतो, पुतळ्याचे वस्त्रहरण झाल्याची ही बातमी पहीलीच असेल नाही?

सिंदबाद आणि जास्मीन


लहानपणातल्या फॅन्टसीज, अजुन काय!!

‘सिंदबाद’, माझा ‘ऑल टाईम फेव्हरेट’ हिरो. त्याच्या आयुष्याने, त्याच्या सात सफरींनी मनाला भुरळ घातली होती. काय सही लाईफ होते त्याचे!! फुल्ल टु.. कट-लुज. समुद्रामध्ये सफरी करायच्या, येणाऱ्या संकटांशी बेधडक भिडायचे आणि संकट परतवुन लावायची. जिवाभावाचे दोस्त लोक बरोबर घेउन सगळा प्रदेश पिंजुन काढायचा, नविन नविन ठिकाणं बघायची. वाटायचे, असे लाईफ नशीबी यावे.. कमी जगायला मिळाले तरी चालेल, पण जेवढे काही जगु.. ‘जियेंगे शानसे’

जास्मीन, काय लिहावं हिच्याबद्दल!! वाटायचे, कित्ती लक्की आहे तो अल्लाउद्दीन ज्याला जास्मीन मिळाली. पायापर्यंत घोळणारे काळे भोर केस, ‘डस्की कॉम्प्लेक्शन’, स्लिम बॉडी, आणि राजाची एकलौती लेक. कान्ट आस्क मोर दॅन दॅट. 🙂

‘जास्मीन’ ची निर्मीती, ‘मार्क हेन्न‘ नामक एका कार्टुन-कर्त्याने केली. मार्के एका ‘थिम पार्क’ वर काम करत होता तेंव्हा एका तरूण, लांबसडक केस असणाऱ्या पाहुणीने त्याचे लक्ष वेधुन घेतले. तीच पाहुणी, युवती, जास्मीन च्या निर्मीतीची प्रेरणा ठरली!.

सुलतानची मुलगी असणारी प्रिंन्सेस जास्मीन जेंव्हा अवतरली तेंव्हा तिचे वय होते १६ पुर्ण व्हायला फक्त काही दिवस बाकी. ‘About to touch sweet sixteen‘ कार्टुनच्या दुनीयेमध्ये ती एकटीच अशी प्रिंन्सेस आहे जीचे लग्न ‘प्रिंन्स’ शी नाही झाले.

अर्ध आयुष्य आज पर्यंत जगुन झाले, पण हे दोन कॅरेक्टर्स डोक्यातुन काही केल्या जात नाहीत.

दादा, काय चुकलं माझं?


मॅगी ला घरी आणलं तेंव्हा ती फक्त ७ महीन्यांची होती. गुबगुबीत अंग, अंगभर पांढरेशुभ्र केस, काळेभोर डोळे, छोटेसे काळे नाक, झुपकेदार शेपुटे, छोटेसे पाय आणि छानसी गुलाबी जीभ. पहाताच कुणालाही उचलुन घ्यावेसे वाटेल अशी मॅगी, पॉमेरीअन कुत्र्याच पिल्लु देशपांडे कुटुंबीयांनी घरी आणले होते.

६ महीने पुलाखाली रहाणाऱ्या ‘कुत्तेवाल्याकडे’ हाल-अपेष्टा, खाण्याची आबाळ सहन केल्यानंतर मॅगीचे नशीब आज उघडले होते. मऊ थंडगार गाडीमधल्या सिटवर बसुन, खिडकीतुन नाक बाहेर काढुन फेरफटका मारल्यावर मॅगी एका अलीशान बंगल्यात आली होती. आल्या आल्या तिला एका छानश्या भांड्यात दुध-पोळी, पाणी मिळाले होते. मॅगी खुप खुश होती. देशपांडे काकांनी मॅगीची सर्व कुटुंबाशी ओळख करुन दिली. हा तुझा दादा, ज्याच्या हट्टाला जागुन तुला घरी आणले, आणि ही तुझी आई, काही लागलं तर त्यांना सांगायचे. मॅगी खुश झाली आणि दादाच्या अंगाला अंग घासत त्याच्यापुढे उताणी पडली. दादानेही मग तिला अंजारले-गोंजारले, डोक्यावर थापटले. मॅगीला खुप छान वाटले. दादाने मग त्याच्या खेळण्यातला चेंडु काढला आणि तो आणि मॅगी पार दमेपर्यंत बंगल्याच्या बागेत मनसोक्त खेळले.

संध्याकाळी घरी परतल्यावर दादाने मॅगीला बाथरुम मध्ये घासुन पुसुन आंघोळ घातली. तिच्यासाठी स्पेशल साबण काय!, शॅम्पु काय!, वेगळा टॉवेल काय!, मॅगीला स्वर्ग ही ठेंगणा वाटु लागला होता. रात्री गुबगुबीत पांघरूणात शिरुन मॅगी झोपुन गेली.

हळ् हळु मॅगी देशपांडे कुटुंबाचाच एक भाग बनुन गेली. तिला बरोबर घेतल्याशिवाय ते बाहेर गावी जात नसत. ऑफीसमधुन, शाळा-कॉलेजमधुन घरी परतल्यावर मॅगीला गोंजारल्याशिवाय तिच्याशी गप्पा मारल्याशिवाय कुणाला चैन पडत नसे. दिवसामागुन दिवस गेले, वर्ष गेली. मॅगीला रस्त्यावरची कुत्री बघुन, स्वतःच्या सुखाचा हेवा वाटे आणि मग ती लाडात येउन बरोबरच्याचे पाय चाटे, अंग घासे.

मॅगी मोठी झाली होती, तिला दिवस राहीले होते आणि एके दिवशी तिने ४ गुबगुबीत पिल्लांना जन्म दिला. मोठी लोभस होती ती पिल्ल. मॅगीला कोण आनंद झाला होता. तेवढ्यात कॉलेजची क्रिकेटची मॅच संपवुन तिचा दादा चिखलाने माखलेल्या स्थितीत घरी परतला. त्याला बघताच मॅगीला आनंद झाला, तिने कसलाही विचार न करता आपल्या पिल्लांना त्याच्याकडे पाठवले.

तिन-चार दिवसांनी त्यांच्याकडे कोणीतरी पाहुणे-मंडळी आली. मोठ्या कौतुकाने ते मॅगीच्या पिल्लांकडे बघत होते. मॅगीला वाटले कोणीतरी नातेवाईक लोक आले आहेत. मग दादाने आणि काकांनी एक एक करत चारही पिल्ल त्या लोकांकडे दिली. नविन लोकं बघुन पिल्ल ‘कुई कुई’ करु लागली तशी मॅगी त्यांना म्हणाली, ‘घाबरु नका बाळांनो, माझा सगळ्यांवर पुर्ण विश्वास आहे, त्यांच्यामुळे आपले कुणाचेही वाईट होणार नाही, तुम्ही निर्धास्त रहा. पिल्लांना घेउन ते लोक निघुन गेले. मॅगी निर्धास्त होती. तिला दादावर पुर्ण विश्वास होता. आपल्याला जसा तो गाडीतुन चक्कर मारायचा तश्शीच चक्कर मारायला त्याने आपल्या पिल्लांना पाठवले असणार या विचाराने ती मनोमन सुखावली होती. बराच्च वेळ झाला पण पिल्ल आली नाहीत म्हणुन ती कासावीस होऊ लागली, पण तरीही तिचे मन तिला समजावत होते, अगं येतील पिल्ल कुठे जाणार आहेत. तुझा दादा त्यांना काही होऊ देणार नाही.

पण शेवटी तिची पिल्ल परत आलीच नाहीत. कशी येणार, तिच्या निर्दयी दादाने आणि काकांनी मिळुन तीची पिल्ल परस्पर विकुन टाकली होती. मॅगि खुप विव्हळली, पिल्लांच्या आठवणीने वेडीपिशी झाली, पण तिचं म्हणण कुणाला कळणार?

काही वर्ष गेली. मॅगी आता थकत चालली होती. पुर्वीचा उत्साह तिच्यात राहीला नव्हता. वाढत्या वयाने तिच्या एक प्रकारचा भित्रेपणा आला होता. एक दिवस त्यांच्या घरी एक अनोळखी ताई आली. तिला बघुन मॅगी जोरजोरात भुंकायला लागली. दादाने तिला समजावुन बघीतले, पण मॅगी भुंकतच राहीली. तिच्या भुंकण्याने ती ताई चांगलीच घाबरली होती. शेवटी दादाने खाडकन जोरात फटका मॅगीला मारला. इतक्या वर्षात दादाने पहिल्यांदाच तिच्यावर हात उगारला होता.

‘मॅगी.. कळत नाही तुला गप्प म्हणलेले, चल आत मध्ये हो .. मुर्ख कुठली’ तो जोरात मॅगी वर खेकसला.

मॅगीला स्वतःचीच लाज वाटली. ‘माझीच चुक होती, मी उगाचच ओरडत बसले, दादाचं ऐकुन गप्प बसायला हवे होते. या म्हातारपणामुळे कशाचेही भानच रहात नाही’. मॅगी मान खाली घालुन आत जावुन बसली. बाहेरुन हसण्याचे आवाज येत होते. दादा आणि ती ताई खुप गप्पा मारत होते. दादा खुप खुश होता, त्यामुळे मग आपले दुखः विसरुन मॅगी पण खुश झाली.

काही दिवसांनी ती ताई कायमची त्यांच्या घरी रहायला आली. दादाचे आणि तिचे लग्न झाले होते. गोरीपान, फुलासारख्या त्या ताईला बघुन मॅगी लाडात आली आणि तिने ताईचे पाय चाटायला सुरुवात केली. त्याबरोबर ती ताई ‘ईsss’ करुन खुर्चीवर उभी राहीली आणि जोरात ओरडली ‘इन्फेक्शन होईल ना’ मॅगीला अर्थात ते काही कळले नाही. पण तिचा हिरमोड झाला आणि ती आत निघुन गेली. त्यानंतर एक गोष्ट मात्र तिच्या लक्षात आली, त्या ताईला मॅगी फार आवडत नव्हती. दोन हात ठेवुनच ताई फिरायची. दादाही मॅगीपासुन थोडा दुर गेला होता. ताईच्या सहवासात त्याला मॅगीचा पुर्ण विसर पडला होता. मॅगी मात्र त्याला कध्धीच विसरली नव्हती. लांबुनच ती दादाकडे डोळे भरुन पहायची आणि आपल्या लहानपणीच्या आठवणींमध्ये रमुन जायची.

काही दिवसांनी त्या ताईने पण एका बाळाला जन्म दिला. नविन बाळ घरी आले तेंव्हा मॅगीला कोण आनंद झाला. ते बाळ पण मॅगीकडे बघुन खुश झाले होते. मॅगीला त्या बाळाचा वास खुप आवडला म्हणुन ती बाळाच्या दिशेने सरकु लागली, तशी ताई आणि दादा दोघंही जोरात तिच्यावर ओरडले. दादाने तिला उचलुन दुसऱ्या खोलीत न्हेउन ठेवले आणि दार लावुन टाकले. मॅगीला काय झाले तेच कळेना. जेंव्हा दादा चिखलात माखुन आला होता तेंव्हा कसलाही विचार नं करता मी माझ्या पिल्लांना त्याच्याकडे जाउ दिले होते, मग आता हा भेदभाव का?

बाळ काही महीन्यांनी रांगु लागले, दिसेल त्या वस्तु तोंडात घालु लागले. त्यावरुन ताई आणि दादाचे काहीतरी भांडण होत होते. ताई सारखी मॅगीकडे बोट दाखवुन ‘इन्फेश्कन’ बद्दल काहीतरी बोलत असे. मॅगीला तो प्रकार काय आहे हे अजुनही कळाले नव्हते. मी तर आता कुणाच्या जवळही जात नाही, कुणावर ओरडतही नाही, मग माझ्याबद्दल हे लोकं काय बोलतात?

शेवटी जे व्हायचे तेच झाले, बाळ आजारी पडले, खुप आजारी पडले. ताई-दादाची खुप धावपळ झाली. दादाच्या नजरते मॅगीबद्दल असलेले उरले-सुरले थोडेसे प्रेम निघुन गेले होते, त्याची जागा आता तिरस्काराने घेतली होती. मॅगी बिच्चारी कोपऱ्यात अंग चोरुन बसायची, जेणे करुन आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये!

एके दिवशी, दादा घरी आला, त्याने मॅगीला जवळ बोलावले, तिला पुर्वीसारखेच गोंजारले, तिला दुध-पोळी खाउ घातली. मॅगी खुप खुश झाली. मग दादाने तिच्या गळ्यातला पट्टाही काढुन टाकला. मॅगीला खरं तरं तो पट्टा अज्जिबात आवडला नव्हता, पण दादाने घातला म्हणुन तीने तो इतके वर्ष सांभाळला होता. तो काढल्यावर तर तिच्या आनंदाला पारावारच राहीला नाही. ती खुश होती, पण दादा मात्र उदास दिसत होता, कसल्यातरी दडपणाखाली असल्यासारखा.

मॅगीचे खाउन झाल्यावर त्याने तिला उचलुन घेतले आणि गाडित ठेवले, तिच्याबाजुच्या खिडकीची काचही खाली करुन दिली. कित्तेक दिवासांनी गाडीतुन फिरायला जायला मिळणार म्हणुन मॅगी खुश झाली. दादा गाडी पळवत होता.. दुर खुप दुर गाडी चालली होती. गाव मागे पडले होते. खिडकीतुन येणारा बेभान वारा मॅगीला सुखावत होता. खुपच दुर आल्यावर दादाने गाडी एका मैदानापाशी गाडी थांबवली. मग त्याने मॅगीला खाली उतरवले. एका झाडापाशी खुपसारे पोळीचे तुकडे आणि पाण्याचे भांडे ठेवले. मग त्याने बॉल काढला आणि मॅगीला म्हणाला, ‘चल मॅगे बॉल खेळु!’

मग त्याने तो बॉल उंच फेकला. मॅगी आनंदात होती. ती पळत पळत बॉलच्या मागे गेली आणि तोंडात बॉल पकडुन परत दादाकडे आली. दादाने परत बॉल लांब फेकला.

मॅगी मनात म्हणाली, ‘नको ना दादा बॉल लांब फेकुस, पळवत नाही रे मला आत्ता, वय झालं बघ’, पण तरीही दादाला वाईट नको वाटायला म्हणुन तितक्याच जोशात ती पळत जाउन बॉल घेउन आली.

दादाने यावेळेस बॉल खुपच लांब फेकला. मॅगी, बॉलच्या मागे मागे बऱयाच वेळे पळत गेली. तिने बॉल पकडला आणि माघारी वळाली. बघते तर काय, दादा गाडीत बसुन निघाला होता. मॅगीला वाटले हा पण काहीतरी खेळच आहे म्हणुन ति परत बॉल घेउन गाडीच्या मागे पळत सुटली. दादाने गाडीचा वेग वाढवला. मॅगिला धाप लागली होती. तिने बॉल टाकुन दिला आणि ‘दादा थांब, दादा थांब करत ओरडत गाडीच्या मागे पळत सुटली’. पण तिचा दादा थांबलाच नाही. धुरळा उडवत त्याची गाडी दुरवर निघुन गेली.

डोळे भरुन मॅगी त्या धुरळ्याकडे बघत बसली. “काय झालं? काय केले मी की मला ही शिक्षा दिली? खरंच दादा मी काही नाही केले, माझा त्रास होत असेल तर तसे सांग समजावुन मी बंगल्याच्या मागे झोपुन राहीन, तुला, तुझ्या बाळाला, ताईला कुणालाही माझा त्रास होणार नाही, पण अशी शिक्षा नको देउस रे, असा मला एकटीला टाकुन नको ना सोडुन जाउस.. खरं सांग दादा, काय चुकलं माझं?”

वाहत्या रहदारीच्या रस्त्यावर मॅगीचा पळण्याअचा वेग कमी कमी होत गेला आणि शेवटी अशक्य झाले म्हणुन ती एका जागी थांबली. पळल्यामुळे खुपच दम लागला होता, तोंड सताड उघडुन जिभ बाहेर काढुनही श्वास पुरत नव्हता. दादाची गाडी दिसेनाशी झाली होती. समोरुन एक अवजड वाहन वेगाने मॅगीच्या दिशेने येत होते. पण मॅगीला बाजुला व्हायला त्राणच नव्हते, शारीरीक आणी मानसीकही. मॅगीने घट्ट डोळे मिटुन घेतले, लहानपणापासुन दादाबरोबर घालवलेले क्षण मनात एकामागोमाग एक पलटत गेले. मॅगी त्या अतीव सुखात आकंठ बुडुन गेली, इतकी की अवजड वाहन अंगावरुन गेल्यावरही तिला कसल्याच वेदना जाणवल्या नाहीत.

लव्ह गेम (भाग २ शेवटचा)


रोहनचा मुड आज खुपच खराब होता. क्लायंटने ऐन वेळेस बरेचसे बदल सांगीतले होते त्यामुळे तो खुपच अपसेट झाला होता. दुपारच्या नेहमीच्या रिव्हु मिटींगला सुध्दा तो आपले यायचे म्हणुन आला होता. खरं तर चर्चा करण्यासारखे काही नव्हते, पण आपली फॉर्मालिटी म्हणुन ती एक मिटींग होती. तो आत आला तेंव्हा सगळेजण आधीच येउन बसले होते. त्याची नजर रितु वर खिळली. लेमन कलरचा टॉप आणि क्रिम कलरची ३/४थ मध्ये खुप गोड दिसत होती ती. रोहनने दोन सेकंद तिच्याकडे पाहीले आणि तो जागेवर जाउन बसला.

मिटींगमध्ये विशेष असे काही नव्हते. लोक ये जा करत होती, लोकांचे सेल फोन वाजत होते काहीजण लॅपटॉप वर काम करण्याच्या नावाखाली चॅटींग करण्यात मग्न होते. रोहन जाम वैतागला होता. रितु आणि इशाचे काहितरी गॉसिपिंग चालु होते. त्यांची खुस-पुस त्याला बऱ्याच वेळापासुन इरीटेट करत होती. शेवटी न रहावुन तो उठला आणि रितुला उद्देशुन जोरात ओरडला,
‘Shut Up!! Don’t you understand a serious meeting is going on here. If you do not understand the work culture and seriousness of a work, then please quit and go back to your college’

अचानक झालेल्या या प्रकारामुळे सगळे एकदम शांत झाले. रितुसाठी रोहनचे हे रुप नवीनच होते, अनपेक्षीत होते. सगळ्यांसमोर बोलणी बसलेले तिला सहन झाले नाही, आणि ती स्वतःचा चेहरा खाली घालुन, स्वॉरी म्हणुन बाहेर निघुन गेली. बाहेर जाताना पाण्याने भरलेले तिचे डोळे कुणाच्या नजरेतुन सुटले नाहीत. रितु बाहेर पडताच शर्मिलाच्या लॅपटॉपवर इशा चा मेसेज झळकला, “बिच!!.. लुक हाउ शी ऍक्टेड, जस्ट ट्रायींग इमोशनल सो दॅट रोहन विल फेल फॉर हर, आय थिंक शी गॉट व्हॉट शी आस्क्ड फॉर” दोघींची नजरानजर झाली आणि त्यांनी एक चोरटी स्माईल एकमेकींना दिली.

थोड्यावेळाने रोहनचा बॉस त्याला म्हणाला, “रोहन तु उगाच तिला ओरडलास. शी इज जस्ट अ फ्रेशर, जस्ट कॉलेज पास्ड आऊट. तिला वेळ लागेल सिरीयसनेस यायला. आणि तसेही इथे कोण सिरीयसली मिटींगला आले आहे तु सांग. तु तुझे फ्रस्ट्रेशन उगाचच तिच्यावर काढलेस!!”

रोहनलाही त्याची चुक लक्षात आली, पण आता वेळ निघुन गेली होती. तो बाहेर आला तेंव्हा रितु घरी निघुन गेली होती.

दुसऱ्या दिवशी रितु ऑफिसला आली तेंव्हा तिच्या डेस्क वर एक ‘सुर्यफुल’ ठेवलेले होते आणि संगणकाच्या मॉनीटरला स्टिकी नोट्स वर लिहीले होते ‘स्वॉरी, प्लिज किप गोईंग विथ युअर चार्मींग सनी स्माईल फॉर दिस सनफ्लॉवर – रोहन’

‘स्ट्युपीड’, रितु स्वतःशीच म्हणाली, ‘काय तर म्हणे सुर्यफुल, चांगले कुठले फुल मिळाले नाही का द्यायला?’

लंच नंतर रोहनने ‘नॉलेज शेअरींग’ चे सेशन त्याच्या टिमसाठी ठेवले होते. ब्ल्यु शर्ट, फिक्कट हिरव्या रंगाच्या पॅन्ट मध्ये रोहन नेहमीसारखाच हॅंडसम दिसत होता. सेशन सुरु झाले, पण रोहनचे लक्ष प्रेझेंटेशन पेक्षा रितुवरच जास्त होते. आपला प्रत्येक मुद्दा संपल्यावर ‘आर यु क्लिअर विथ धिस मिस. रितु?’ आपल्या भुवया थोड्याश्या उंचाउन, चेहऱ्यावर आपले नेहमीचे चार्मींग स्माईल आणुन रोहन रितुला विचारत होता. तर रितु मात्र ‘येस, मि. रोहन’ या एकाच प्रकाऱचे उत्तर देउन संभाषण तोडुन टाकत होती.

टि-ब्रेक मध्ये इशाने रितुला विचारले ‘व्हाय आर यु ऍक्टींग लाईक धिस? लकी यु! तुला तो स्वॉरी म्हणाला ना? सो प्रॉब्लेम काय आहे?’
रितु: ‘स्वॉरी म्हणाला म्हणुन काय झाले? सगळ्यांसमोर कसा बोलला काल मला तो?’
इशा: ‘कमॉन रितु, ग्रो अप. तो बॉस आहे तुझा. त्याने काय आता सगळ्यांसमोर उभे रहावुन कमरेत वाकुन तुझी माफी मागायला पाहीजे का?’
रितु: ‘व्हाय नॉट? आवडेल मला’
तिने असे म्हणायला आणि रोहनने तिथुन पुढे जायला एकच वेळ आली.

रितुने पार्कींग मधुन गाडी काढली आणि तिथुन लगेच बाहेर पडली. तिला कधी एकदा लांब जाते आणि मनात साठलेला आनंद व्यक्त करते असे झाले होते. त्याला कारणही तस्सेच होते. दुसरे सेशन संपता संपता, रोहन त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव घेउन उभा राहीला होता आणि रितुशी नजर मिळवुन त्याने तिची सर्वांसमक्ष माफी मागीतली होती.
सगळ्यात शेवटी, “आय होप यु फर्घिव्ह्ड मी मिस. रितु!!” म्हणाला होता आणि रितुने “येस मि. रोहन!” म्हणुन मान डोलावली होती.

पुढील कित्तेक दिवस ‘हाय मिस रितु’ आणि ‘हॅल्लो मिस्टर रोहन’ अस्सेच चालले होते. प्रत्येक वेळी रितु खाली वाकुन तिचे हास्य ओठात दाबुन धरायची, तर रोहनची डिंपल स्माईल अजुनच खुलायची. दोघांमध्ये शाब्दिक संभाषण कमी होते, परंतु चेहऱाने आणी डोळ्यांनी दोघांमध्ये कित्तेक वाक्य संभाषण होत असे.

‘डु यु थिकं देअर इज समथीं बिटवीन देम?’ ऑफीसमधील प्रत्येकजण दुसऱ्याला विचारत होता. एवढेच काय, एकदा तर लिफ्ट मध्ये दोघे ही जण एकमेकांशी न बोलता, न बघताही हसत आहेत म्हणल्यावर लिफ्टमनही चक्रावला होता. त्यांच्यात वाढत असलेली मैत्री इशाला फारच खटकायची रोहनशी वाढत असलेली रितुची जवळीक तिला नको-नकोसे करुन सोडायची.

आणि शेवटी तो दिवस उजाडला, रितुला ६ महीने पुर्ण झाले होते आणी तिचा कंपनीमधला शेवटचा दिवस होता. तिला फेअरवेल द्यायला सगळेजण कॉमन हॉलमध्ये जमले होते. रितु जाणार या विचारानेच इशा मनोमन खुश होती, तर रोहनचा चेहरा पडलेला होता.

रितीरीवाजाप्रमाने ‘एक्झीट स्पिच’ द्यायला रितु उभी राहीली. तिने सर्व प्रथम कंपनीच्या अधीकाऱ्यांचे धन्यवाद मानले. इथे मिळालेला हा अनुभव तिला भविष्यकाळात खुप उपयोगी पडेल याचा आवर्जुन उल्लेख केला. ज्यांच्या ज्यांच्या बरोबर तिने काम केले आहे त्या प्रत्येकाचा तिने उल्लेख करुन तिने त्यांचेही आभार मानले. मग तिने तिची नजर रोहनकडे वळवली. रोहन अजुनही मान खाली घालुन बसला होता.

‘मिस्टर रोहन,” रितु पुढे बोलु लागली, “आय एम स्पेशली थॅकफुल टु धिस मॅन. रोहनने खुप मदत केली मला. त्याच्याकडुन शिकायला मिळालेली प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे. रोहन, तु या ६ महीन्यात जी साथ मला दिलीस, तीच साथ पुढे आयुष्यभरासाठी देशील? आय लव्ह यु रोहन!!”

पहिल्यांदा आपण जे ऐकतोय ते खरे का खोटे हे कुणालाच कळत नव्हते. कुणाला हे अपेक्षीतच नव्हते. सगळे क्षणभरासाठी अवाक झाले होते, त्यांच्या नजरा रोहनकडे खिळल्या. रोहन उठुन उभा राहीला आणि आपल्या डिंपल स्माईल सहीत म्हणाला, ‘येस मिस्स रितु, आय विल..!! आय लव्ह यु टु!!’

कंपनीचा कॉमन हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने भरुन गेला.

संध्याकाळची ७ची वेळ, सी.सी.डी (कॅफे कॉफी डे) मध्ये रोहन आणि रितु बसुन गप्पा मारत होते.

रितु: “ए कसला भाव खातोस रे तु? आणि कसली उगाचच शायनींग मारत असतोस ऑफीसमध्ये, नौटंकी आहेस एक नंबरचा तु’
रोहन: “आणि तु काय कमी आहेस का नौटंकी? नुसतं एवढस्स बोललो तुला तर काय लगेच डोळ्यात पाणी वगैरे”
रितु: “असु दे.. पण ते जाउदे.. बघ मी जिंकले की नाही बेट??”

त्यांचे बोलणे ऐकुन शेजारचे २-४ कपल्स कसली बेट जाणुन घेण्यासाठी उत्सुक झाले होते. मग रितुच त्यांना म्हणाली..
“हा रोहन, आम्ही एकमेकांना गेली ३ वर्ष ओळखतो आणि एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालो आहोत. मागच्या व्हॅलेंटाईन्स डे ला, इथेच मी रोहनला म्हणाले होते की हिम्मत असेल तर सगळ्यांसमोर मला ‘आय लव्ह यु’ म्हण.. आणी हा चक्क नाही म्हणाला. मला म्हणे काही काय? असं सोप्प असते का अनोळखी लोकांसमोर ‘आय लव्ह यु’ वगैरे म्हणणं? मग मीच बेट लावली की माझ्यात आहे हिम्मत आणी मी म्हणुन दाखवीन.” योगायोगाने मला कॉलेज साठी ६ महीने लाईव्ह एक्सपीरियंस हवा होता म्हणुन मी याच्या कंपनी मध्ये अप्लाय केले आणि मला तिथे प्रोजेक्ट एक्स्पिरीयंस साठि संधी मिळाली.. पुढे काय झाले हे तर ऐकलेच तुम्ही!!!”

रोहन: “बर बरं असु देत हा. तु ग्रेट आहेस बास्स? ए पण काही म्हण हं असं एकमेकांना अनोळखी होऊन जगण्यात पण एक मज्जा आहे नाही” असं म्हणुन त्याने रितुला टाळी दिली आणि दोघ हास्य विनोदात मग्न झाले.

सि.सि.डी. मध्ये मागे रेडीओवर गाणे लागले होते.. “चलो एक बार फिरसे, अजनबी बन जाये हम दोनो…!!!’

[समाप्त]

लव्ह गेम (भाग १)


ए बंड्या !! अरे झोपला का? चल सिग्नल सुटला. निमीष च्या आवाजाने रोहन भानावर आला. त्याने स्कॉर्पियो गेअर मध्ये टाकली आणि गर्दीतुन वाट काढत पुढे निघाला. त्याचे लक्ष मात्र स्कॉर्पियोच्या आरश्यातच होते. पुढचा सिग्नल लागला आणी रोहन परत आरश्यात पहाण्यात दंग झाला. यावेळेसही निमीष ला रोहनला सिग्नल सुटल्याची जाणीव करुन द्यावी लागली. त्यामुळे पुढच्या सिग्नलला निमीष सावध होता. सिग्नल सुटायच्या आधीच त्याने रोहनकडे बघीतले.

रोहन स्वःताशीच हसत स्कॉर्पियोच्या आरश्यातुन मागे बघत होता.
“अरे काय झालेय तुला? लक्षं कुठेय तुझं ?” निमीषने काहीश्या वैतागलेल्या सुरात रोहन जिकडे बघत होता तिकडे मागे वळुन बघत रोहनला विचारले.

“काही नाही रे!”- रोहन
“काही नाही? मग तु वळुन वळुन मागे काय बघत आहेस?”- निमीष
निंमीषची उत्सुकता जागृत झाली आणी त्याने गाडीच्या आरश्यातुन मागे बघीतले.

मागे पिंक रंगाच्या स्कुटी वर एक मुलगी आपल्याच नादात तिच्या गाडीच्या आरश्यात बघुन एका हाताने डोळ्यातील कॉन्टाक्ट लेन्स निट करत, तर दुसऱ्या हाताने चेहऱ्यावर येणारी केसांची बट सावरत होती.

“Man, She is damn cute !!”, निमीष स्वतःशीच पुटपुटला.
“I know”, रोहन.
“काय साहेब, तुम्ही कधी पासुन असल्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घ्यायला लागलात?”, रोहनच्या पाठीवर थाप मारत निमीष म्हणाला.
“प्लिज हा. इंटरेस्ट वगैरे काही नाही, एक सिग्नलवरचा विरंगुळा, एवढचं!” – रोहन

तेवढ्यात सिग्नल सुटला. रोहनने आपल्या घड्याळावर नजर टाकली आणि आपल्या स्कॉर्पियोला वेग दिला.

“सकाळी सकाळी इंटरव्हु म्हणजे खरंच वैताग आहे हं!. आणी तो पण फ्रेशर्स चा?, कॉलेज प्रोजेक्ट साठी???” – रोहन

“हो ना. सकाळ म्हणजे मस्त कॉफी पित, मेल्स, ऑर्कुट बघण्याची वेळ. आपले एच.आर पण ना!! समोरचा म्हणाला ९ वाजता येतो इंटरव्हुला की लगेच हो म्हणणार. अरे आपल्या कंपनीचे पण काही स्टेटस आहे की नाही? हे कॉलेज स्टुडंस, साला आपल्याच डोक्याला त्रास होणार आहे.” निमीष ने ही आपला त्रागा व्यक्त केला.

रोहनने गाडी कंपनीच्या “रिझर्व्हड पार्कींग” मध्ये पार्क केली. निमीषने तोपर्यंत लिफ्ट चे बटन दाबले होतेच. लिफ्ट येताच दोघेही जण आत घुसले आणी कंपनीत आले.

“We are 15 mins late! एच.आर. कडुन खा आता शिव्या” असा विचार करतच दोघेही कॉन्फरंन्स रुम मध्ये आले. बघतात तर आत मध्ये कोणीच नाही.

“घ्या!! एवढी धावपळ करुन या.. आणी इथे कॅन्डीडेटच हजर नाही..”- निमीष परत चालु झाला. दोघेही परत बाहेर आले, तेवढ्यात ऑफीसच्या दारातुन त्यांना सिग्नलवर दिसलेली ‘ती’ आत येताना दिसली.

हिरव्या रंगाचा पुल-ओव्हर, काळी ३/४थ जीन्स, गुलाबी रंगाचा हेअर बॅन्ड, हातात घट्ट धरलेली फाईल, डोळ्यांत गोंधळलेले भाव.!!

“काय अवतार आहे! असे कोणी इंटरव्ह्युला येते का?”- रोहन, “हे असले कपडे कोणी दुसऱ्याने घातले असते तर भयानकच दिसले असते. But just because she is wearing it, she is… she is looking….”
“Awesome!!” निमीषने रोहनचे अर्धवट वाक्य पुर्ण केले.

रितुने आत आल्यावर समोर उभ्या असलेल्या आणी ‘फॉर्मल्स’ मधल्या त्या दोघांकडे पाहीले. ‘आधीच एक तर उशीर झालेला त्यात आपले कपडे इथे जरा मिस-मॅचच दिसत आहेत’ असा एक विचार तिच्या मनात येउन गेला. तरी घरुन निघताना तिची आई तिला म्हणालीच होती, “काय रितु तुझे कपडे हे, अगं इंटरव्ह्युला चालली आहेस ना?”

तेव्हा तिनेच आईला सांगीतले होते, “काय गं मम्मा, मी काय गव्हर्नमेंट सर्ह्विससाठी चालले आहे का? I am going in Advertising Agency. I am a “Mass Communication” student, आणि तिथले सगळेही अश्याच वातावरणातुन आलेले असणार. These clothes will perfectly go with the environment. Don’t worry”

रोहनने तोपर्यंत इंटरव्ह्यु कॅन्डीडेट्स ची लिस्ट काढली आणि पहीले नाव वाचले, “रितु प्रधान”. स्वतःचे कपडे ठिक-ठाक केले, केसांमधुन एक हात फिरवला आणि रिसेप्शन मध्ये गेला.

चेहऱ्यावर नेहमीचेच ‘चार्मींग स्माईल’ आणुन त्याने शक्य तितक्या कमी आवाजात विचारले, “रितु प्रधान?, प्लिज कम धिस वे!” रोहनला आपल्या चार्मींग स्माईलवर फार विश्वास होता. त्याला माहीत होते की या स्माईल मुळे तो अधीकच स्मार्ट आणि आकर्षक दिसतो. परंतु रितु वर त्याचा काहीच प्रभाव पडला नाही हे पाहुन त्याचा फारच जळफळाट झाला.

पुढचा जवळ-जवळ एक तास इंटरव्हु संपवुन जेंव्हा दोघे बाहेर आले तेंव्हा दोघांच्या चेहर्यावर समाधान होते. ‘She is good, what say?’ निमीषने रोहनला विचारले. रोहननेही त्याला संमती दाखवली. आठवड्याभरातच रितुने ऑफीस जॉईन केले.

पुढचा एक महीना रितु साठी खुपच धावपळीचा होता. कॉलेजमध्ये शिकवलेले ज्ञान किती तोकडे आणि व्यवहारासठी बिनकामाचे आहे याची जाणीव झाली. प्रोजेक्ट शिकुन घेणे, ऑफिसमधील चालीरीती, सहकारी त्यांचे विचीत्र स्वभाव यांच्याशी जुळवुन घेणे चालुच होते. पण या सगळ्यांत तिला रोहनची खुप मदत होत होती. त्याच्या वागण्यात कुठेही ‘टीम-लिडर’ चा तोरा नव्हता. ‘कदाचीत म्हणुनच तो सगळ्यांचा आवडता आहे’, रितु स्वतःच्याच विचारात मग्न होती. तेवढ्यात संगणकाच्या स्क्रिनवर तिच्या कलीगचा इशाचा मेसेज चमकला
‘.. कॉफी?’
‘येस.. शुअर’
‘चल देन’

कॉफी पिता पिता रितुने सहजच विषय काढला, ‘रोहन किती वर्ष आहे गं इकडे?’
‘ऐss स्टे इन द क्यु.. ओके?’, इशा
‘क्यु?? व्हॉट क्यु?’ न कळल्याने रितुने विचारले.
‘हे बघ, तुलाही जरी रोहन आवडत असेल ना तरीही त्याला पटवण्याचा प्रयत्न करु नकोस हा.. इथे ऑलरेडी क्यु आहे :-)’ इशा
‘ओह.. नाही गं. तसं काही नाही, मी आपलं अस्संच विचारलं’ रितु

संध्याकाळी घरी आल्यावर रितु आरश्यामध्ये स्वतःचे प्रतीबिंब न्हाहाळत् विचार करत होती. “रोहन काही ‘हंक’ वगैरे नाही, पण क्युट आहे, जस्ट लाईक बॉय नेक्स्ट डोअर!!. छान आहे तो. तो बरोबर असला की कित्ती कंफर्टेबल वाटतं, तो हसला की आपण नकळत हसतो, एखाद्या वेळेस तो दिसला नाही की आपली कावरी-बावरी नजर त्याला शोधत रहाते.. तो दिसे पर्यंत. त्याचे प्रेझेंटेशन स्किल्स अफाट आहेत, क्लायंटशी कित्ती मस्त बोलतो तो.. असं वाटतं ऐकतच रहावे. आणि त्याची स्माईल.. डिंपल स्माईल.. अगदी क्रेझी करुन टाकते. पण इशा म्हणते तसं.. असेल खरं असेल, तो कुणालाही आवडावा अस्साच आहे. पण तो कुणाला भाव देत नाही हे ही खरंच आहे. मी आवडत असेन त्याला? काय विचार करत असेल तो माझ्याबद्दल? मी पण काही वाईट नाही. कॉलेजमध्ये कित्ती मुलं होती माझ्या मागे!!. मी पटवलं तर नक्की पटेल रोहन मला.. मी पटवेनच त्याला..” रितुला स्वतःचेच हसु आले..

आपण ठरवतो एक, आणि होते दुसरेच. नियतीच्या मनात रितुबद्दल काही वेगळेच होते.. वाचत रहा ‘लव्ह गेम’ च्या दुसऱ्या भागात

[क्रमशः]
पुढचा भाग>>

कराओके


कराओके, फार सुंदर प्रकार आहे हा. तुम्हाला गाणी म्हणण्याची आवड असेल तर कराओके ‘बेस्ट’ आणि ‘मस्ट’. तसं सगळ्यांना माहीत असेलच पण तरीही थोडक्यात सांगायचे झाले तर कराओके म्हणजे शब्द नसलेले गाणे अर्थात फक्त ‘इंन्स्ट्रुमेंटल’ संगीत वाजते आणि समोर गाण्याचे बोल येत असतात. जसजसे गाणे पुढे सरकते तसतसे त्या गाण्याचे शब्द रंगीत होत जातात किंवा एखादा ठिपका त्या शब्दांच्या वरुन सरकु लागतो. त्या ठिपक्याबरोबर तुम्हाला संगीताचा मेळ घालुन गाणं म्हणायचे.

महाजालावर एक कराओके साईट आहे, गीतनेट इथे प्रचंड खजीना आहे बऱ्याचश्या जुन्या आणि नविन गाण्यांचा. घरी ब्रॉडबॅड असेल तर अगदी सहज वापरता येईल ही साईट. मस्तच आहे. कालचा दिवस सौ. बरोबर इथे गाणी म्हणण्यातच गेला. खुप्प मज्जा आली. ‘मांग के साथे तुम्हारा’ किंवा ‘मेहंदी लगाके रखना’ गाण्यांना खुप मज्जा आली. या साईटचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे तुमचे रेकॉर्डींग या साईट वर अपलोड करुन तुमच्या मित्रांबरोबर ते शेअरही करु शकता (अर्थात मी ते करणार नाही :-)).

करा गुणगुणणे चालु मग या साईटवर आणि तुमचा अनुभव आणि शक्य झाले तर गुणगुणणारी गाणी जरुर शेअर करा.