एनीथींग फॉर बायको


लग्नानंतर अनेक लोकांनी मला विचारले, ‘तु ममा’ज बॉय?’ का ‘वाईफ्स मॅन’. मी आपला प्रसंगाअनुरुप उत्तर देतो. पण खरं तर मी स्वतःचाच.. स्वार्थी, मतलबी. पण बऱ्याच वेळेला घडते असे की नको असतानाही मी बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी केवळ बायको म्हणतेय म्हणुन करतो, जस्ट बीकॉज.. माझा मुड असतो ‘एनीथींग फॉर बायको’ अश्याच एका मुडमध्ये असताना घडलेला एक मजेशीर किस्सा.

तसं मला न आवडणारी गोष्ट म्हणजे कार्यांना उपस्थीती लावणे. लग्न, बारसे, वाढदिवस असले कार्यक्रम अगदी विट आणतात. नक्को वाटतं जायला. मला खरंतर सोशलाईज व्हायलाच आवडत नाही. मला आपले हे इंटरनेटचे व्हर्चुअल वर्ल्डच आपले वाटते. असो. माझी बायको ही जॅपनीज ट्रान्सलेटर आहे. म्हणजे जॅपनीज मध्ये असणारी पुस्तक, माहीती पत्रक, ग्रंथ (!), सिनेमांसाठीचे सबटायटल्स, टेक्नीकल डॉक्युमेंटस वगैरे गोष्टी जॅपनीज भाषेतुन इंग्रजी भाषेत रुपांतर करणे. तर एकदा जपानच्या विद्यार्थी, कलाकार लोकांचा एक गट पुण्यात येउन थडकला होता. मग काय विचारता सगळ्यांच्या गाठी-भेटि झाल्या, एकत्र जेवण खाण झालं. संस्कृतीची देवाण-घेवाण झाली. मग त्या जपानी गटाने पुण्यातील ‘बालगंधर्व रंगमंदीरात’ एक नाटक सादर करण्याचा चंग बांधला. आता ते नाटक बघायला मी यावे असा बायकोचा हट्ट होता. खरं तर ते नाटकं पुर्णपणे ‘जपानी’ भाषेतुन होते आणि ते जपानी शिकणाऱ्यांसाठी किंवा त्यामध्ये काम करणाऱ्यांसाठीच होते. पण बायकोपुढे कोण ऐकणार. तिने माझ्यासाठी पण पास मिळवला होता. शेवटी करणार काय? मी झालो तयार! म्हणलं चल नेहमी काहीतरी कारणे सांगुन नाही म्हणत असतो.. येतो आज. शेवटी नाटकानंतर अल्पोपहारची पण सोय होती ना 🙂

ठरलेल्या वेळी आम्ही तेथे पोहोचलो. सगळीकडे खुप सारे जपानी सांडले होते. बुटके, बसके, मिचमीच्या डोळ्यांचे, चेहऱ्यावर नेहमी हास्य बाळगणारे, सदानकदा कमरेत वाकुन नमस्कार करणारे. मग मी आत मध्ये जाउन आसनस्थ झालो. नाटक सुरु व्हायला वेळ होता म्हणुन म्हणलं ‘चला काहीतरी खायला घेउन यावे!’ म्हणुन बाहेर पडलो.

बिल-बनवता बनवता शेजारी उभ्या असलेल्या एक जपानी मुलाकडे लक्ष गेले. बायकोकडुन शिकल्यामुळे थोडेफार मोडके तोडके जपानी शब्द येतात मला. म्हणलं चला जरा हाय हॅलो करावं. म्हणुन फेकला शब्द ‘कोनीचीवा’

तो पंटर ढम्म, मागे पण बघीतले नाही. मी परत घसा साफ करुन ‘कोनीचीवा’ म्हणजे ‘हॅलो’ चा पुर्नऊच्चार केला. त्याने मागे वळुन बघीतले. त्याच्या चेहऱ्यावर मोठ्ठे प्रश्न चिन्ह होते. शेवटी त्याने तुटक्या फुटक्या इंग्रजीमध्ये त्याला मी काय म्हणतो ते कळत नसल्याचे सांगीतले. मला कळेना हा असं का करतोय, एवढे साधे कळत नाही. मग ट्युब पेटली आणि त्याला फाड्फाड इंग्रजी मध्ये विचारले तेंव्हा कळाले की तो ‘जपानी’ नसुन ‘कोरीयन’ होता आणि कुठलातरी भरतनाट्यमचा शो बघायला आला होता. च्यायला, ही सगळी लोक एकसारखीच दिसतात, कसं कळणार??? चांगलाच तोंडघशी पडलो होतो. खाद्यपदार्थ घेउन आत घुसलो खरा, पण नेमके नाटक सुरु झाले होते आणि सगळीकडे अंधार होता. पास असल्याने खुर्ची क्रमांक वगैरे काहीच नव्हता. झालं का आता..माझी आणि बायकोची चुकामुक झाली होती. आता काय करावं?? शेवटी विचार केला आत्ता बसुन घ्यावे आणि मध्यंतरात तीला शोधावं म्हणुन मग जागा मिळेल तिथे बसलो.

नाटकाचा विषय गंभीर आहे का विनोदी आहे मला माहित नव्हते त्यामुळे गप-गुमान बसुन होतो. नाटक सुरु होते. कोण काय बोलत आहे, काय चालले आहे काही कळण्याचा मार्गच नव्हता. नुसते सगळे ‘कडाकुडू’ तेवढ्यात सगळीकडे हास्याचा खळखळाट झाला.. काहीतरी विनोद झाला होता बहुतेक.. मग मी पण जोरजोरात हसुन घेतले. असे २-३ दा झाले. शेजारचीला माझ्या लेट हसण्याचे आश्चर्य वाटत होते. असो.. काय करणार. सगळीकडेच माझी लेट रिएक्शन होती. सगळे हसले की मी हसायचो, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या की मी टाळ्या वाजवायचो असा प्रकार चालला होता. नशीब बलवत्त्तर म्हणुन नाटक छोटे होते. थोड्याच वेळात पडदा पडला आणि मंचावर अध्यक्ष, पाहुणे स्वयंसेवक भाषणे द्यायला जमले. हे कमी की काय पण थोड्याच वेळात कसले तरी फॉर्म वाटप चालु झाले. तो फिडबॅक फॉर्म होता बहुतेक. त्यात आपला कॉन्टॆक्ट डिटेल्स वगैरे भरायचे होते आणि नाटकाबद्दल काय वाटले याची माहीती द्यायची होती. भरली असती हो माहीती, पण सगळा फॉर्मच जपानी भाषेतुन! कुठे काय भरणार? टेलीफोन नंबरचा सेक्शन तेवढा कळाला मला.

आजुबाजुचे सगळे लगेच भराभरा फॉर्म भरत होते आणि मी ढिम्म. मग शेवटी म्हणलं काहीतरी भरायला हवे ना. शेजारी बघीतले तर ते जपानी भाषेतुन फॉर्म लिहीत होते. मग काहीच पर्यात नाही म्हणुन मी कोराच ठेवला फॉर्म. थोड्यावेळाने फॉर्म्स गोळा करणे सुरु झाले, माझा कोरा फॉर्म बघुन त्या स्वयंसेविकेने चेहरा दुखाने वाकडा केला. त्या जपानीला वाटले बहुतेक की मला नाटक आवडले नाही. तिने ४-५ गोष्टी विचारल्या पण मला काहिच कळाले नाही काय विचारतीय ती बया ते. मी आपले हसुन मान डोलावली. तेवढ्यात भाषण संपले आणि मी सटकलो.

अल्पोपहार हा प्रकार पण माझी परीक्षाच पहाणारा ठरला. खाण्यासाठी नुडल्स सारखं दिसणारा काहीतरी प्रकार होता. ते ठिक आहे हो.. पण खाण्यासाठी चॉप्स-स्टिक होत्या, त्याने कुठे जमतेय खायला. खमंग वास येत असुनही ते नीट खाता येत नव्हते. इतके हाल झाले म्हणुन सांगु.

म्हणलं निदान बायकोकडुन सहानभुती तरी मिळेल म्हणुन झालेले प्रकार सांगीतले, तर बसली की फिदि-फिदी हसत. काय म्हणावं याला!!

तेव्हापासुन आता ‘एनीथींग फॉर बायको’ ला एक ‘*’ स्टार जोडला आहे.. कसला?… अहो.. “Conditions apply” चा 😉

7 thoughts on “एनीथींग फॉर बायको

  1. masta lihilay post, khoop maja ali vachun 🙂
    “पण खरं तर मी स्वतःचाच.. स्वार्थी, मतलबी. ” he statement awadla, ekdam mature statement ahe.

  2. hahaha एनीथींग फॉर बायको’ ला एक ‘*’ स्टार जोडला आहे.. >> he tyaana mahit aahe na? 😉

    • नाही रे बाबा, असंच आपलं ‘मनातच’ ठेवायच, म्हणुनच तर ब्लॉग चे नाव ‘मनातले’ ना!!!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s