ह्रुदयी वसंत फुलताना (भाग १)


तसे अफेअर्स २-३ झाली होती, पण प्रेम ज्याला म्हणतात ते कधी झालेच नाही. मी माझी जीवन-साथी शोधत राहीलो, पण मनामध्ये जी कल्पना होती तशी प्रत्यक्षात कधी भेटलीच नव्हती. अशातच मी ‘सिंबायोसिस’ ला संगणक डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. हे कॉलेज अगदी जसे ऐकुन होतो तसेच होते. नेहमीच्या कॉलेज लाईफ पेक्षा थोडे हटके!. इथली तरुणाई थोडी वेगळीच भासते. सुंदर कपडे आणी काहीश्या वेगळ्याच फॅशन मधील क्राउड, इमारती, वर्ग, कॅन्टीन सर्व काही वेगवेगळा रंगामध्ये न्हाउन निघालेले. इथे टु-व्हीलर आणी वडापाव खाणाऱ्यांपेक्षा, फोर-व्हीलर आणी बर्गर खाणारे जास्ती. थोडक्यात सांगायचे तर “यहा जिंदगी, एक अलग जिंदगी है.”

तर अशा वातावरणात माझी कॉलेजची सेकंड इनिंग सुरु झाली. माझ्या वर्गात आपले वाटणारे थोडेच होते आणी आपल्या वाटणाऱ्या तर फारच कमी. त्यामुळे मग पुर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रीत केले. मधे-आधे एक एक मित्रांना गर्ल-फ्रेंड मिळत गेल्या. मी मात्र एकटा जिव, सदाशिव. डिप्लोमा चांगल्या मार्कांनी पास झालो, कॉलेज मधे तर पहिला आलोच, पण पुणे युनीर्व्हसीटीत पण पाचवा नंबर लागला. त्यामुळे PG ला लगेच प्रवेश मिळाला. बाकीच्या मित्रांचे पण प्रेमभंग झाले होते त्याचा परीणाम त्यांच्या रीझल्टस झाला. मग PG मधे जाणारे २-३ जणच होते. आता परत नवीन ग्रुप, नवीन मित्र-मैत्रीणी सगळे काही नवीन.

यशाची चटक लागलेला मी, यावर्षी पण यश मिळवायचे या उद्देशाने झपाटलेला होतो. कॅन्टीन,
पार्कींग, कट्टे यापेक्षा मी लायब्ररी, लॅब इकडेच जाऊ लागलो. कधी लेक्चर बुडवणे नाही, वेळेवर
सबमिशंन्स वगैरे चालु होते आणी थोड्याच दिवसात हुशार विद्यार्थी [सरांच्या भाषेत] आणी पुस्तकी किडा [इतरांच्या भाषेत] बनुन गेलो.

आणी मग वेळ आली ऍन्युअल फेस्टीवल ची. जोरदार तयारी सुरु झाली. लेक्चर्स तसेही होत नव्हते मग मी पण अभ्यास थोडा बाजुला ठेवुन या आनंद-जत्रेत सहभागी व्हायचे ठरवले, पण ऑर्गनाझर म्हणुन.

मग काय फुल्ल धमाल.. रोज प्लॅनिंग, मिटींग्स, डेकोरेशन्स, हे आण, ते आण. बऱ्याच नवीन लोकांशी ओळखी झाल्या. ‘पर वो नही मिली जिसका इंतजार था’. रोज सकाळी मी आणी १-२ मित्र टेबल टाकुन बसायचो. गेम्स मधे भाग घेणाऱ्यांची नोंदणी करायला.

आणी…..एक दिवस ती आली, अगदी अनपेक्षीतपणे. डार्क निळ्या रंगाचा पंजाबी, केसांचा पोनी
बांधलेला, खांद्याला एक पर्स, हातात कुठलेसे संगणकाचे चे पुस्तक, चेहऱ्यावर केसांची एक बट.. टिकली… नाही??.. नाही!! नसु देत.. भिरभिरती नजर आणी डोळ्यांमधे कमालीची उत्सुकता.

छातीमध्ये कळ येणे काय असते, ते त्यादिवशी अनुभवले. ती आली आणी आमच्या टेबलपाशी येउन उभी राहीली. तिच्याबरोबर तीची मैत्रीण होती, आणी काय आर्श्चय मी तीला ओळखत होतो. मी माझा मोर्चा पहिल्यांदा तिकडेच वळवला. इव्हेंटची माहिती सांगितली,मग
इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्या.. पण आमच्या बाईसाहेब काही बोलायचे नाव घेइनात. मग मीच तिला विचारले..एकदम फाड-फाड कोकाटे इंग्लीश मधे “You are also interested in some kind of game to participate?”, तर सरळ नाही म्हणाली. झाले पुढे काय बोलणार. हो म्हणली असती तर नाव तरी कळले असते. तेवढ्यात माझे लक्ष तिच्या हाताकडे गेले. तिने बोटामधे “K” लेटर ची अंगठी घातली होती.. लगेच मनात विचार सुरु झाले.. अं..केतकी… कविता.. किरण.. नको.. कोमल.. काहीचच कळत नव्हते.

मग परत मी- “तुझे नाव केतकी आहे का.?”
ती- “नाही” ..
[मीः मनातच मग..बोल कि काय ते..] मग.. कविता..
ती- “नाही”..
[ च्यायला ] बरं पण तुझे नाव “K” पासुन सुरु होते.. राइट??
ती- “नाही”..

[अरेच्या- मग हिला कोणी बॉयफ्रेंड वगैरे आहे काय “K”पासुन नाव असलेला.. ] पण ही काही पत्ता लागु देईना. वाक्य तोडुनच टाकायचे म्हणल्यावर काय करणार..!! मग मात्र मला राहावले नाही..

शेवटी विचारलेच काय नाव तुझे??.

तीः “..

[क्रमशः]
Next >>

बालपणीचाच काळ का सुखाचा?


आपण मोठे झाल्यावर, नोकरी-धंद्याला लागल्यानंतर जवळ-जवळ सगळेच जण असे म्हणत असतात “बालपणीचा काळ सुखाचा” आणि त्याला कारणही तसेच असते. लहानपणी कशाची चिंता नसते, महिन्याचे बजेट आखायचे नसते, कामावर वरिष्ठांची बोलणी खायची नसतात, कसलीच बंधन नसतात.

पण सहजच विचार करताना मला काही गोष्टीची जाणीव झाली, अशा कितीतरी गोष्टी असतात ज्या आपण लहानपणी करू शकलेलो नसतो, मग अशा गोष्टी, अशा इच्छा आपण मोठे झाल्यावर का नाही पूर्णं करून घेत.

अशाच गोष्टीची एक यादी:

१. खिशात जास्ती पैसे नाहीत म्हणून, शाळेच्या मधल्या सुट्टीत पाहिजे तेवढी चन्यामन्या बोरं घेऊ शकत नव्हतो.
पण आज तर घेऊ शकतो ना? मग समोर चन्यामन्या बोरं विकणारा विक्रेता सहज आपल्या नजरे आड कसा होतो? का मी कामधंद्यात एवढे बुडलोय की मला ह्या सगळ्या गोष्टीचा विसरच पडलाय?

२. बर्फाचा गोळा, त्यावर विविध रंग,सरबत टाकून उन्हाळ्यात विकत मिळणारा. त्या गोळ्यासमोर सगळे तुच्छ होते. तिच गोष्ट ५० पैशाला विकत मिळणारी, दुधात बुडवलेली कुल्फीची. आज मात्र आपण ह्या गोळेवाल्याला, कुल्फीवाल्याला नजरेआड करून स्वच्छतेच्या नावाखाली हॉटेल मध्येच आईस-क्रीम खाणे पसंत करतो.

३. परीक्षेच्या काळातही, खोकला होईल म्हणून, घरातून विरोध असताना कैरीच्या झाडावर चढून, धरपडुन कैऱ्या काढून तिखट मीठ लावून खायचो. आज मात्र कैरी बहुतेक वेळेस लोणच्यातून, किंवा पन्ह्यातूनच भेटीस येते.

कदाचित ह्यातले आपण काही केलेही असते.. पण मग घरातील वडिलधारी माणसे.. बस्स झाले आता.. तू काही लहान राहिला नाहीस. मोठा झाला आहेस वगैरे म्हणून आपल्याला थांबवतात. पुढे पुढे आपणही मग काही करण्यापूर्वी दहा दा विचार करतो.. कारण आता मी मोठा झालो आहे.

हे थोडे चुकीचे नाही का? कदाचित आपण येण्याऱ्या पिढीला प्रत्येक गोष्टीत त्यांच्या मोठेपणाची जाणीवच करून नाही दिली तर त्यांच्यातील ती निरागसता, तो बालपणा आयुष्यभर साथ देईल आणि या आणि अशा अनेक गोष्टी ज्या बालपणात केल्या त्याच त्यांना त्यांच्या मोठेपणी आणि आपल्याला आता ही करता येतीलच की.. मग फक्त बालपणाचाच काळ सुखाचा नाही होणार.. नाही का?

तुम्हाला आठवत आहेत का अजून अशाच काही गोष्टी?

घननीळा बरसला


DSC00435

पुण्यामध्ये आज अचानक संध्याकाळी आकाश भरुन आले आणि थोड्याच वेळात धो-धो पावसाचे आगमन झाले. आम्ही कार्यालयातील खिडक्या उघडुन बाहेरुन येणारा तो गार वारा आणि पाण्याचे तुषार अंगावर झेलले. कृत्रीम ए/सी पेक्षा हा गारवा कित्तेक पटीने सुखद होता. थोड्याच वेळात आकाश निळ्या रंगाने भरुन गेले आणि तो निळा निसर्ग कॅमेरामध्ये टिपण्याचा मोह मला आवरला नाही. श्रावण नसला तरीही ‘श्रावणात घननीळा बरसला’ ह्या गीताची आठवण झालीच.

पहिल्या पावसाच्या सर्वांना शुभेच्छा.


श्रावणात घननीळा बरसला रिमझिम रेशीम धारा
उलगडला झाडातून अवचित हिरवा मोरपिसारा

जागुनी ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी
तिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी
माझ्याही ओठावर आले नाव तुझेच उदारा
श्रावणात घननीळा बरसला …

रंगाच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी
निळ्या रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी
गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा
श्रावणात घननीळा बरसला …

पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले
माझ्या भाळावर थेंबाचे फूलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा
श्रावणात घननीळा बरसला …

पानोपानी शुभशकुनांच्या कोमल ओल्या रेषा
अशा प्रीतीचा नाद अनाहत शब्दावाचून भाषा
अंतर्यामी सूर गवसला नाही आज किनारा
श्रावणात घननीळा बरसला …

बनवा फेक मॅगझीन कव्हर्स


महाजालावर MagMyPic.com नावाची एक वेबसाईट आहे ज्याच्या मदतीने तुम्ही पण फेक मॅगझीन कव्हर्स बनवु शकता. मी बनवलेले काही मॅगझीन कव्हर्स खाली जोडत आहे. कव्हर वर हवा असलेला एक फोटो या साईटवर जाउन अपलोड करायचा, तुम्हाला हवे असलेले डिझाईन वर जाउन क्लिक करायचे आणि पिक्चर सेव्ह करायचे, बस्स झाले तुमचे स्वतःचे मॅगझीन कव्हर तयार.

साधारण पणे ३० विवीध प्रकारचे कव्हर्स उपलब्ध आहेत. चला तर मग, बनवा स्वतःचे फेक मॅगझीन कव्हर आणि हो, तुमच्या कव्हर ची लिंक मला पाठवायला विसरु नका. I would love to see the photos in action!!

2c0ac28a544b3305a63d4d3b1e48a_3201

e5893aad3c164656f148f0c21c03b_2101

615bcd13fa2c6617f21665b8bc973_2501

माझ्यात लपलेला चित्रकार (हसणार नसाल तरच बघा)


पोरं कधी कधी इतकी छळतात ना!! काल आमचं पोरगं मागेच लागलं बाबा चित्र काढुन दाखवा, बाबा चित्र काढुन द्या. सगळ्याप्रकारे सांगुन बघीतले, पण ऐकेल तर शप्पथ. काय करता मग? शेवटी माझ्यात लपलेला चित्रकार जागा झाला आणि दिलं चित्र काढुन त्याला.

ठिक आहे, ठिक आहे माहीती आहे.. मी एवढा काही खास चित्रकार नाहीये… प्रयत्न तर केला ना?? बरं.. मी चित्रकारच नाहीये.. बास?.. जास्ती हसु नका फिदीफिदी, सांगतो यातील कोण, कोण आहे ते! पहिले अस्वल :-), दुसरे हरीण 🙂 आणी तिसरा वाघ 🙂

पोराने ते चित्र वाकडं तोंड करुन बघीतलं. मी सांगीतलेले स्पष्टीकरण त्याला फारसं काही पटलं नाही. शेवटी, “जाउ देत, तुम्ही चुकीचीच चित्र काढता!!” म्हणुन कागद तिथेच टाकुन निघुन गेला.

झिपऱ्या कुत्र्याला सोडा गं बाई


भोंडल्यामध्ये म्हणले जाणारे हे गाणे कित्ती छान वाटते ऐकायला, पण प्रत्येक झिपरं कुत्र गोंडस असतेच असे नाही ना, अश्या कुत्र्याला सोडलं तर काय होईल?

कंपनीच्या आवारात एक काळं झिपरं कुत्र गेली कित्तेक वर्ष मी पहातोय. इतकं आळशी कुत्र मी आयुष्यात कधी पाहीले नाही. सदांकदा ते झोपलेलेच असते. शेजारुन जोरात गाडी गेली किंवा कोणी ओरडा-आरडा करत पळत गेले तरी ते डोळे उघडुन बघतही नाही. पण शुक्रवारचा दिवस त्याच्या ह्या व्यक्तीमत्वाला छेद देणारा ठरला.

ह्याच काळ्या झिपऱ्या कुत्र्याने आमच्या कार्यालयामधील एकाचा चावा घेतला. इतकेच नाही तर काही लोकं घरी जात असताना त्यांच्या अंगावर, गाडीच्या मागे धावुन गेला असं ऐकण्यात आले. मग दिवसभर अफवांना पिकच आले होते. कोणी म्हणलं ‘त्याने चावलेला एक माणुस मेला’, तर कोणी सांगीतले ‘एकाच्या पायाचा लचकाच निघाला’. ज्याला ते कुत्र चावलं होतं त्याच्यावर उपदेशांचा भडीमार चालला होता. ‘त्या कुत्र्यावर लक्ष ठेव’, ‘ते मेलं तर तुझ काही खरं नाही रे बाबा’ एकुण सुर ऐकुन प्रोजेक्ट मॅनेजरने लगेच त्याचे एक KT अर्थात नॉलेज ट्रान्स्फर चे एक सेशन ठेवले. हो.. उद्या उगाच काही झाले तर दुसरा रिसोर्स तयार हवा.

कार्यालयामध्ये दिवसभर भीतीचे वातावरण होते. लोकं खाली जायला का-कु करत होते. एक-दोन लोक गेली होती खाली. लिफ्ट चे दार उघडल्यावर त्यांना ते काळं कुत्र समोरच बसलेलं दिसलं लगोलग त्यांनी लगेच दार लावुन घेतलं आणि परत वर आले.

कंपनीमध्ये त्यादिवशी मॅक्सीमम मॅन हॉवर्स चे काम झाले, कारण घरी कोणी लवकर जातच नव्हते बऱ्याच वेळ सगळे कार्यालयात होते. ज्यांना अगदीच गरज होती ते दोघ-तिघं चा घोळका करुन बाहेर पडत होते. जे सुटले त्यांचे लगेच फोन येउन गेले, तर ज्यांना परत यावे लागले त्यांनी ते कुत्र कसं अजुन पिसाळलेले दिसते आहे याचे वर्णन करुन सगळ्यांना घाबरवुन सोडले होते.

या कुत्र्यापासुन वाचण्यासाठी काय करता येइल याबद्दल ऍनालिस्ट लोकांनी ‘गुगल’ वर धाव घेतली परंतु योग्य मार्ग सापडला नाही. शेवटी बालपणीचीच एक युक्ती वापरायची ठरवले. लहानपणी लपाछपी खेळताना ‘धप्पा’ देताना एकदम १०-१५ जणांचा गुच्छ गेला की ज्याच्यावर राज्य त्याला काहीच करता येत नाही आणि मग ‘धप्पा’ देता येतो त्याप्रमाणे मग आम्ही सगळे जण एकत्र जमलो. कंपनीच्या वॉचमनला पुढे केले (कारण त्याच्याकडे काठी होती ना!!) आणी सगळे एकदम ‘होssss होssss’ असा ओरडा आरडा करत जिन्यामधुन लिफ्टमधुन ओरडत खाली गेलो. एवढ्या सगळ्या लोकांचा ओरडणारा ‘कळप’ पाहुन ते कुत्र बावचळले आणि शेपुट घालुन पळुन गेले. मग आम्ही पण पटापट गाड्या काढल्या आणि घरचा रस्ता धरला.

पण मला माहीती आहे, ते कुत्र गेले नाही, इथेच कुठेतरी आहे. लपुन बसले आहे, बदल्याची वाट बघत. आज परत कुणाचा तरी बळी जाणार.. ‘बली मांगती काली मॉ.. शक्ती दे काली मॉ’

सो.. झिपऱ्या कुत्र्याला सोडा.. पण निट विचार करुन !!!

अजुबा“मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है,
वही होता है जो मंजूर-ए खुदा होता है”

१९९१ साली प्रर्दशीत झालेला, अमिताभ बच्चन, डिंपल कपाडीया, ऋषी कपुर, सोनम आणि अमरीश पुरी यांच्या प्रमुख भुमीका असलेला सिनेमा मला तेंव्हाही आवडला होता आणि अजुनही आवडतो. काल ‘यु-ट्युब’ वर उगाचच काहीतरी शोधाशोध करताना हा सिनेमा सापडला आणि लगेच संगणकावर उतरवुन घेतला. माझी शनीवारची संध्याकाळ सत्कारणी लागल्यासारखे वाटले 🙂

बहारीस्तानमध्ये राज्य करणाऱ्या सुलतानच्या घरी एक मुलगा जन्माला येतो. पण त्याच वेळेस त्याचा वझीर बंड करतो आणि त्यांच्या जिवावर उठतो. सुलतान त्याच्या पत्नी आणि मुलाला घेउन बोटीतुन पळुन जायचा असफल प्रयत्न करतो. वझीर त्यांची बोट बुडवुन टाकतो. नशीबाने तिघेही जण वाचतात पण सगळे एकमेकांपासुन दुरावतात. सुलतान त्याची ‘याददाश’ घालवुन बसतो आणि एका निर्जन स्थळी वैद्य म्हणुन जीवन जगत असतो. त्याची पत्नी अंधळी होते आणि भिकारी म्हणुन जीवन जगत असते तर त्याच्या पुत्राला एक लोहार आपल्या घरी वाढवतो तोच- अली अर्थात अमीताभ बच्चन. ‘अली’ गरीबांचा तारणहार होतो. चेहऱ्यावर मुखवटा लावुन वझीराने केलेले जुर्म तो उलटवुन लावत असतो.. हाच मुखवटा लावलेला माणुस- अजुबा.

हाच अजुबा पुढे वजीराचा नायनाट करतो त्याला त्याचे आई-बाबा परत मिळतात आणि जनता सुखी होते. परंतु हे सगळे घडताना अनेक फॅन्टसी घटना आहेत. अलीची मानलेली आई अर्थात समुद्रातील डॉल्फीन, राक्षस, उडते गालीचे, जादुची माळ, जादुची तलवार, अंगावर शिंपडल्यावर क्षणार्धात अंगठ्याएवढे करणारे जादुचे पाणी सगळेच काही अद्बभुत.

तुम अगर मेरे बिवी के भाई ना होते तो एक मामुली सिपाही होते‘ हा अमरीश पुरीचा दिलीप ताहीलला वारंवार लगावलेला टोला मस्तच.

अलीफ- लैलाचे चाहते असाल आणि हा सिनेमा बघीतला नसेल तर नक्की बघा. लहान मुलांबरोबर (काही प्रसंग सोडले तर) नक्कीच बघणीय. मला असले सिनेमे जाम आवडतात. पुढचा ‘लिस्ट’ मधला बघायचाच आहे असा सिनेमा म्हणजे ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ 🙂

बोंबला, माझे जीमेल ‘हॅक’ले


दिवस १: जीमेलला लॉगीन करायचा परत परत प्रयत्न करतोय, सारखे आपले ‘Invalid Login’. पहिल्यांदा वाटले घाई-घाईत चुकीचा पासवर्ड टाकला, दुसऱ्यांदा प्रयत्न केला तरी तेच. काय झाले काय? लॉगीन का होत नाहीये. बर जीमेल चा प्रॉब्लेम म्हणावा तर ते ही नाही, कारण बाकीच्यांचे होतेय लॉगीन, माझेही दुसऱ्या अकाउंटला होतेय लॉगीन. काय कटकट आहे. आता ऑर्कुट पण त्यामुळे वापरता येइना. जाउ देत, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल.

दिवस २: प्रॉब्लेम कंटीन्युज. मी पासवर्ड विसरणं शक्यच नाही. रोज लॉगीन करतो त्याच पासवर्ड ने. काहीतरी गंडलेय.

दिवस ३: सहनशक्तीचा अंत. आता मात्र फार झाले. ‘Forgot Password’ वापरुन पासवर्ड बदलुन टाकावा. अरे पण हे काय.. ‘Forgot Password’ ची मेल पण येत नाहीये. मग शेवटी गुगलींग केल्यावर असा संशय यायला लागला की माझे अकाऊंट ‘हॅक’ झाले आहे. त्वरीत गुगलला मेल केला आणि पासवर्ड रिसेट करण्याची विनंती केली.

दिवस ४: गुगलकडुन अधीक माहीतीची खातरजमा करण्यासाठी मेल आली. लगेचच सर्व माहीती भरुन दिली. संध्याकाळपर्यंत गुगलकडुन परत पासवर्ड रिसेट केल्याची मेल आली.

लगेच नविन पासवर्ड ने लॉगीन केले आणि इनबॉक्स पाहुन धक्काच बसला. इनबॉक्स मध्ये बऱ्याचश्या मेल या ‘उर्दु’ / ‘अरेबीक’ किंवा तत्सम भाषेतील मेल्स ने भरला होता. काय आहे, कसल्या मेल्स आहेत काहीच कळत नव्हते. मग शेवटी एका मेल्स मधील टेक्ट कॉपी करुन घेतले आणि ते गुगलच्या ट्रांन्स्लेशन च्या विभागात जाउन अरेबीक ते इंग्लीश ट्रांन्सलेशन साठी नोंदवले. गुगलकडुन लगेच त्याचे इंग्रजीमध्ये रुपांतर करुन आले. मग हा प्रकार ४-५ मेल्स साठी करुन बघीतला. बहुतेक सर्व मेल्स मध्ये ‘जिहाद’, ‘स्वातंत्र्य’, ‘अल्लाह फोरम’ वगैरे संदर्भ होते.

जाम टरकलो होतो. नशीबाने ऑर्कुट प्रोफाईल मध्ये काही प्रकार नव्हता झालेला. त्यानंतर आठवडा झाला तरी अरेबीक मेल्स येतच राहीले. बहुदा हा इमेलचा पत्ता एखाद्या फोरमसाठी रजिस्टर केला गेला होता. शेवटी वैतागुन माझे जिमेल अकाऊंट आणि ऑर्कुट दोन्ही डीलीट करुन टाकले. न जाणो आज हॅक झाले, उद्या परत हॅक झाले आणि त्याचा कुठे काही गैरवापर केला गेला तर नसती आफत.

एनीथींग फॉर बायको


लग्नानंतर अनेक लोकांनी मला विचारले, ‘तु ममा’ज बॉय?’ का ‘वाईफ्स मॅन’. मी आपला प्रसंगाअनुरुप उत्तर देतो. पण खरं तर मी स्वतःचाच.. स्वार्थी, मतलबी. पण बऱ्याच वेळेला घडते असे की नको असतानाही मी बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी केवळ बायको म्हणतेय म्हणुन करतो, जस्ट बीकॉज.. माझा मुड असतो ‘एनीथींग फॉर बायको’ अश्याच एका मुडमध्ये असताना घडलेला एक मजेशीर किस्सा.

तसं मला न आवडणारी गोष्ट म्हणजे कार्यांना उपस्थीती लावणे. लग्न, बारसे, वाढदिवस असले कार्यक्रम अगदी विट आणतात. नक्को वाटतं जायला. मला खरंतर सोशलाईज व्हायलाच आवडत नाही. मला आपले हे इंटरनेटचे व्हर्चुअल वर्ल्डच आपले वाटते. असो. माझी बायको ही जॅपनीज ट्रान्सलेटर आहे. म्हणजे जॅपनीज मध्ये असणारी पुस्तक, माहीती पत्रक, ग्रंथ (!), सिनेमांसाठीचे सबटायटल्स, टेक्नीकल डॉक्युमेंटस वगैरे गोष्टी जॅपनीज भाषेतुन इंग्रजी भाषेत रुपांतर करणे. तर एकदा जपानच्या विद्यार्थी, कलाकार लोकांचा एक गट पुण्यात येउन थडकला होता. मग काय विचारता सगळ्यांच्या गाठी-भेटि झाल्या, एकत्र जेवण खाण झालं. संस्कृतीची देवाण-घेवाण झाली. मग त्या जपानी गटाने पुण्यातील ‘बालगंधर्व रंगमंदीरात’ एक नाटक सादर करण्याचा चंग बांधला. आता ते नाटक बघायला मी यावे असा बायकोचा हट्ट होता. खरं तर ते नाटकं पुर्णपणे ‘जपानी’ भाषेतुन होते आणि ते जपानी शिकणाऱ्यांसाठी किंवा त्यामध्ये काम करणाऱ्यांसाठीच होते. पण बायकोपुढे कोण ऐकणार. तिने माझ्यासाठी पण पास मिळवला होता. शेवटी करणार काय? मी झालो तयार! म्हणलं चल नेहमी काहीतरी कारणे सांगुन नाही म्हणत असतो.. येतो आज. शेवटी नाटकानंतर अल्पोपहारची पण सोय होती ना 🙂

ठरलेल्या वेळी आम्ही तेथे पोहोचलो. सगळीकडे खुप सारे जपानी सांडले होते. बुटके, बसके, मिचमीच्या डोळ्यांचे, चेहऱ्यावर नेहमी हास्य बाळगणारे, सदानकदा कमरेत वाकुन नमस्कार करणारे. मग मी आत मध्ये जाउन आसनस्थ झालो. नाटक सुरु व्हायला वेळ होता म्हणुन म्हणलं ‘चला काहीतरी खायला घेउन यावे!’ म्हणुन बाहेर पडलो.

बिल-बनवता बनवता शेजारी उभ्या असलेल्या एक जपानी मुलाकडे लक्ष गेले. बायकोकडुन शिकल्यामुळे थोडेफार मोडके तोडके जपानी शब्द येतात मला. म्हणलं चला जरा हाय हॅलो करावं. म्हणुन फेकला शब्द ‘कोनीचीवा’

तो पंटर ढम्म, मागे पण बघीतले नाही. मी परत घसा साफ करुन ‘कोनीचीवा’ म्हणजे ‘हॅलो’ चा पुर्नऊच्चार केला. त्याने मागे वळुन बघीतले. त्याच्या चेहऱ्यावर मोठ्ठे प्रश्न चिन्ह होते. शेवटी त्याने तुटक्या फुटक्या इंग्रजीमध्ये त्याला मी काय म्हणतो ते कळत नसल्याचे सांगीतले. मला कळेना हा असं का करतोय, एवढे साधे कळत नाही. मग ट्युब पेटली आणि त्याला फाड्फाड इंग्रजी मध्ये विचारले तेंव्हा कळाले की तो ‘जपानी’ नसुन ‘कोरीयन’ होता आणि कुठलातरी भरतनाट्यमचा शो बघायला आला होता. च्यायला, ही सगळी लोक एकसारखीच दिसतात, कसं कळणार??? चांगलाच तोंडघशी पडलो होतो. खाद्यपदार्थ घेउन आत घुसलो खरा, पण नेमके नाटक सुरु झाले होते आणि सगळीकडे अंधार होता. पास असल्याने खुर्ची क्रमांक वगैरे काहीच नव्हता. झालं का आता..माझी आणि बायकोची चुकामुक झाली होती. आता काय करावं?? शेवटी विचार केला आत्ता बसुन घ्यावे आणि मध्यंतरात तीला शोधावं म्हणुन मग जागा मिळेल तिथे बसलो.

नाटकाचा विषय गंभीर आहे का विनोदी आहे मला माहित नव्हते त्यामुळे गप-गुमान बसुन होतो. नाटक सुरु होते. कोण काय बोलत आहे, काय चालले आहे काही कळण्याचा मार्गच नव्हता. नुसते सगळे ‘कडाकुडू’ तेवढ्यात सगळीकडे हास्याचा खळखळाट झाला.. काहीतरी विनोद झाला होता बहुतेक.. मग मी पण जोरजोरात हसुन घेतले. असे २-३ दा झाले. शेजारचीला माझ्या लेट हसण्याचे आश्चर्य वाटत होते. असो.. काय करणार. सगळीकडेच माझी लेट रिएक्शन होती. सगळे हसले की मी हसायचो, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या की मी टाळ्या वाजवायचो असा प्रकार चालला होता. नशीब बलवत्त्तर म्हणुन नाटक छोटे होते. थोड्याच वेळात पडदा पडला आणि मंचावर अध्यक्ष, पाहुणे स्वयंसेवक भाषणे द्यायला जमले. हे कमी की काय पण थोड्याच वेळात कसले तरी फॉर्म वाटप चालु झाले. तो फिडबॅक फॉर्म होता बहुतेक. त्यात आपला कॉन्टॆक्ट डिटेल्स वगैरे भरायचे होते आणि नाटकाबद्दल काय वाटले याची माहीती द्यायची होती. भरली असती हो माहीती, पण सगळा फॉर्मच जपानी भाषेतुन! कुठे काय भरणार? टेलीफोन नंबरचा सेक्शन तेवढा कळाला मला.

आजुबाजुचे सगळे लगेच भराभरा फॉर्म भरत होते आणि मी ढिम्म. मग शेवटी म्हणलं काहीतरी भरायला हवे ना. शेजारी बघीतले तर ते जपानी भाषेतुन फॉर्म लिहीत होते. मग काहीच पर्यात नाही म्हणुन मी कोराच ठेवला फॉर्म. थोड्यावेळाने फॉर्म्स गोळा करणे सुरु झाले, माझा कोरा फॉर्म बघुन त्या स्वयंसेविकेने चेहरा दुखाने वाकडा केला. त्या जपानीला वाटले बहुतेक की मला नाटक आवडले नाही. तिने ४-५ गोष्टी विचारल्या पण मला काहिच कळाले नाही काय विचारतीय ती बया ते. मी आपले हसुन मान डोलावली. तेवढ्यात भाषण संपले आणि मी सटकलो.

अल्पोपहार हा प्रकार पण माझी परीक्षाच पहाणारा ठरला. खाण्यासाठी नुडल्स सारखं दिसणारा काहीतरी प्रकार होता. ते ठिक आहे हो.. पण खाण्यासाठी चॉप्स-स्टिक होत्या, त्याने कुठे जमतेय खायला. खमंग वास येत असुनही ते नीट खाता येत नव्हते. इतके हाल झाले म्हणुन सांगु.

म्हणलं निदान बायकोकडुन सहानभुती तरी मिळेल म्हणुन झालेले प्रकार सांगीतले, तर बसली की फिदि-फिदी हसत. काय म्हणावं याला!!

तेव्हापासुन आता ‘एनीथींग फॉर बायको’ ला एक ‘*’ स्टार जोडला आहे.. कसला?… अहो.. “Conditions apply” चा 😉

भुतबाधा


.. म्हणजे तशी मला भुतबाधा वगैरे झाली नाहीये, पण सध्या ‘भुत’, ‘लाईफ अफ्टर डेथ’, ‘ब्लॅक मॅजीक’ वगैरे बद्दल वाचण्यात मी जरा बिझी आहे. जे मला चांगले ओळखतात त्यांना तर माहीत असेलच एखादी गोष्ट डोक्यात शिरली की मग ते मला बरेच दिवस पुरते तसेच काहीसे हे. म्हणुनच तर ब्लॉग चे हेडर फोटो पण असला विकृत लावला आहे ना 🙂

तर वाचतोय म्हणजे नक्की काय वाचतोय? सर्वप्रथम ‘गरूडपुराण’. असेलही कदाचीत हे सर्वश्रुत, पण मला याबद्दल आत्ताच माहीती मिळाली आणि वाचायला सुरुवात केली. यामध्ये मुख्यत्वे करुन मृत्युनंतरचे जिवन याबद्दल लिहीले आहे. किती खरं किती खोटं तो परमेश्वरच जाणे पण केवळ उत्सुकता म्हणुन हे नक्कीच वाचनीय आहे.

यामध्ये मानवाच्या मृत्युनंतर जे दिवस पाळतो त्याचे महत्व आणि कारणं सांगीतली आहेत. रीतीरिवाजाप्रमाणे पिढ्यांपिढ्या चालत आलेल्या गोष्टी आपण अंगीकारतो. पण ‘गरुडपुराण’ वाचल्यावर खरंच अगदी डोळे उघडले माझे. प्रत्येक आणि प्रत्येक कार्याला असणारे कारण आणि त्याचे महत्व यात सांगीतले आहे. मृत्युनंतर आयुष्य आहे का? आत्मा काय असतो? मृत्युनंतर त्याचे काय होते? तो स्वर्ग किंवा नरकात कधी आणि कसा पोहोचतो? चित्रगुप्त काय प्रकार आहे? माणुस नरकात जाणार की स्वर्गात हे कसे आणि कोण ठरवतो? पुढचा जन्म कोणत्या योनीत होतो आणि ते कशावरुन ठरते? असे अनेक प्रश्न आणि त्यांची उत्तरं या मध्ये मिळतात. थोडेसे चाळावे म्हणुन महाजालावर बसलो आणि नंतर २-३ तास त्यात पुर्ण गुरफटुन गेलो. अशक्य आहे हा सगळा प्रकार, अंगावर काटा आला माझ्या तर. वेळ असेल आणि उत्सुकता असेल तर जरुर वाचा.

दुसरे, ब्लॅक मॅजीक अर्थात काळी विद्या, प्लॅनचेट, भानामती, हाकामारी हे असलं खरंच काही आहे का? महाजालावर प्रचंड माहीती उपलब्ध आहे. जितके वाचु आणि जे वाचु ते थोडेच आहे. अनेक आश्चर्यकारक, स्तंभीत करणाऱ्या माहीतीचे स्त्रोत उपलब्ध आहेत. काही ठिकाणी तर अक्षरशः त्यासाठीचे मंत्रही दिलेले आहेत.

तेंतेच वाचुन कंटाळला असाल, ज्ञान चाळवणारे, उत्कंठावर्धक काहीतरी वेगळे वाचावेसे वाटत असेल तर केवळ उत्सुकतेपोटी या गोष्टींबद्दल थोडीफार माहीती वाचायला काहीच हरकत नाहीये. मी असं म्हणत नाही की हे सगळे खरं आहे पण सगळ खोट्ट आहे हे सांगायला ही काही पुरावे नाहीत ना!!

आपण म्हणतो परग्रहावर वस्ती नाहीये. सगळे थोतांड आहे. काय तर म्हणे एलीयन्स, यु.एफ़.ओ. मध्ये बसुन आपल्या पृथ्वीवर येतात. पण मी म्हणतो अशक्य तर नाहीये ना? का नाही येउ शकत? येतही असतील आपण नाही का आपली ‘यानं’ दुसऱ्या ग्रहावर पाठवत?

एनीवेज, चुकुन माकुन काही वाचलतं आणि काही इंटरेस्टींग मिळाले तर लिंक जरूर मला पाठवुन द्या. सध्या असल्याच विचीत्र गोष्टींमध्ये बुडालो आहे मी 🙂 आणि हो.. या भुतमय वातावरणात एक भुतकथा लिहायला घेतली आहे, बघु कितपत जमतेय ते.