भाग ३ पासुन पुढे…
“क्या बात है, आप भी आ रहे हो हमारे साथ??”, गाडीत डिसुझाला चढताना पाहुन ड्रायव्हरला आश्चर्य वाटले.
“मै भी नही, सिर्फ मै आ रहा हु.. सिक्युरीटी गार्डस नही आयेंगे.. और वैसेभी हम है तो क्या गम है… चल घुमा चाबी..” डिसुझाने हातातली बंदुक ड्रायव्हरपुढे नाचवत म्हणले..
ड्रायव्हरने व्हॅन गेअर मध्ये टाकली आणि ‘ए़क्झीट टु ए़क्स्प्रेस वे’ च्या दिशेने गाडी वळवली. गाडी ए़क्स्प्रेस-वे वर आली तसे डिसुझा रिलॅक्स होऊन बसला. अर्धे काम पारपडले होते. क्षुल्लक घटना वगळता ब्ल्यु-नाईलमध्ये काही अघटीत घडले नव्हते. आता फक्त कॅश मुंबईला पोहोचवायची आणि पुढचा एक आठवडा टाकलेली सुट्टी ऍन्जॉय करायची. ड्रायव्हरने अल्ताफ राजाची कॅसेट टाकली होती.. “तुम तो ठहरे परदेसीssss साथ क्या निभाओ गे…sss” अल्ताफ त्याच्या नेहमीच्या पट्टीत गात होता. डिसुझाची तंद्री भंगली ते कुणाच्या तरी सतत हॉर्न वाजवण्याने.
“कौन है बे.. इसकी माss की.. साले.. जगहं मत दे उसको.. बिलकुल ओव्हरटेक मत करने देना..” डिसुझा संतापुन बोलला.
ड्रायव्हरही महा बिलंदर त्याने मागुन वेगाने येणाऱ्या स्कॉर्पियोचे ओव्हरटेकींगचे सगळे प्रयत्न हाणुन पाडले.
मागे स्कॉर्पियो मध्ये क्रिश आता बैचीन होऊ लागला होता. त्याला शक्य तितक्या लवकर व्हॅनला ओव्हरटेक करुन पुढे निघुन जायचे होते आणि ठरलेल्या ठिकाणी गाडीचा अपघात घडवुन आणायचा होता. पण बरेच प्रयत्न करुनही त्याल यश मिळत नव्हते. घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत होता. ठरलेले ठिकाण जवळ-जवळ येत चालले होते. डॉली मात्र शांत होती. शेवटी क्रिशने एका ठिकाणी अतीशय चपळाईने गाडी पुढे घातली…
“ओ.. तेरी.. निकल गया आगे..” ड्रायव्हर निराश होऊन म्हणाला..
डिसुझाच्या डोळ्यांनी स्कॉर्पियोच्या खिडकीत घाबरुन बसलेली डॉली बरोबर टिपली होती..”ओय.. वो छोड.. वो लौंडीया दखी क्या.. फटाका थी एकदम.. साला.. लेकीन क्या डरी हुई थी..ये पंटर आज मरवाएगा शायद उसको..”
ओव्हरटेकींग होताच क्रिशने गाडिला अजुन वेग दिला. ताशी १४० कि.मी. च्या वेगाने गाडी पळत होती. त्याने आरश्यात बघीतले कॅश व्हॅन आता दिसेनाशी झाली होती. मागे वाहतुकही नव्हती. बस्स अजुन ५ मिनीटं आणि अप-साईड डाऊन.. काही क्षणातच त्याला ते वळण दिसु लागले. त्याने डॉलीकडे बघीतले..डॉलीने त्याच्याकडे..
“क्रिश.. आय ट्रस्ट यु.. तु निट करशील याची मला खात्री आहे आणि आपण यातुन नक्की सुखरुप बाहेर पडु”.. डॉलीने आपला हात क्रिशच्या घामटलेल्या हातावर ठेवला.. दोघांनीही सिट-बेल्ट्स टाईट केले. “डॉली, काही काळासाठी आपण वेगळे होणार आहोत आपण, पण परत आपण लवकरच भेटु.. आणि ते मात्र कायमचेच..होल्ड टाईट”.. क्रिश म्हणाला..
“१०…९…८…७…६…५…४…३…२…१…हीअर वु..गोssss” असे म्हणुन त्याने त्या शार्प वळणावर वेगाने गाडी वळवली आणि नायट्रोजन सिलेंडरचे बटन दाबले. क्षणातच नायट्रोजन वेगाने पिस्टॉन्मध्ये शिरला, समोरील मिटरवर नायट्रोजनचे प्रेशर वाढत गेले आणि तो पिस्टन फोडुन बाहेर पडला. डॉली आणि क्रिशच्या शरीराला एक जोराचा झटका बसला आणि गाडीने जोराने पल्टी घेतली. दोन-तीन पल्ट्या खाउन गाडी रस्त्याच्या मध्ये आडवी पडली. डॉलीला थोडेफार खरचटले होते पण क्रिश.. तो खुप जखमी झाला होता. नायट्रोजन गॅस ए़क्स्प्लोड चे बटन बसवण्यासाठी जे पॅनल त्याने बसवले होते त्याचा पत्रा त्याच्या पोटात घुसला होता. क्रिशच्या चेहऱ्यावरील वेदनेचे भाव बघुन डॉलीच्या लक्षात आले काहीतरी झाले आहे..”यु ओके?” तिने क्रिशला विचारले.. आणि तिचे लक्ष क्रिशच्या पोटाकडे गेले..त्याच्या पोटातुन रक्त वहात होते.. क्रिशने आपली जखम हाताने दाबुन धरली आणि तो म्हणाला.. “मी ठिक आहे.. उतर खाली पटकन, व्हॅन येतच असेल.”
दोघंही धडपडत खाली उतरले. रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला टनेल असल्याने त्याबाजुकडुन कुणाला अपघात झाल्याचे दिसण्याचा प्रश्नच नव्हता. दोघही गाडीपासुन काही फुट पुढे जाउन रस्त्यावर पालथे पडले. सिमेंटचा रस्ता उन्हाने चांगलाच तापला होता. डॉलीच्या नाजुक हातांना, पायाला, मांड्यांना चांगलेच चटके बसत होते पण कश्याचीही पर्वा न करता ती निपचीत पडुन होती. क्रिशची परिस्थीती डॉलीपेक्षा बिकट होती. आधीच पोटाला झालेली जखम वेदना देत होती आणि त्यातच रस्त्याचे चटके जखमेवर बसत होते.
थोड्याच वेळात मागुन कॅश व्हॅन आली. ड्रायव्हरने दुरुनच रस्त्यात आडवी पडलेली स्कॉर्पियो पाहीले. “साबजी सही बोला था आपने..” डोळे मिटुन बसलेल्या डिसुझाला ड्रायव्हर म्हणाला..
“क्यु? क्या हुआ?”, डिसुझा..
“वो देखो ना. आपने बोला था ना.. वो बंदा लौंडीया को मरवायेगा.. देखो तो.. लगताहै लुडक गये.”
डिसुझा सतर्क झाला होता. त्याचे मन अलर्ट झाले होते. तो ड्रायव्हरला म्हणाला.. “गाडी रोकना मत, अगर बाजुसे निकलती है तो निकालके आगे चलो..”
“जी साबजी..” म्हणुन ड्रायव्हरने गाडीचा वेग हळु केला आणि कडेने गाडी न्हेऊ लागला.
डिसुझा चे लक्ष क्रिश आणि डॉलीकडे गेले. दोघेही निपचीत पडले होते. क्रिशच्या पोटातुन रक्ताची एक बारीक धार आली होती. त्याने परत डॉलीकडे बघीतले. त्या अवस्थेतही ती आकर्षक दिसत होती. तिचे गोरे पाय, मांड्यांपर्यंत सरकलेला तिचा फ्रॉक, चेहऱ्यावर एका निरागस मुलीचे भाव.. “ड्रायव्हर.. गाडी रोको.. देखते है जिंदा भी है की सच मै लुडक गये..”
ड्रायव्हरने गाडी थोडी स्कॉर्पियोच्या पुढे न्हेउन उभी केली. डिसुझा खाली उतरला, त्याचे पुर्ण लक्ष डॉलीकडेच होते, तरीही त्याचा एक नकळत खिश्यात गेला. हाताला थंडगार कोल्ट .४४ रिव्हॉल्व्हरचा स्पर्श झाल्यावर तो निश्चींत झाला. त्याने ड्रायव्हरला गाडीतच थांबायला सांगीतले आणि तो खाली उतरुन पुढे जाऊ लागला. सर्वात प्रथम तो क्रिश कडे जाऊ लागला. एक हात त्याचा अजुनही खिश्यावर होता. क्रिशच्या जवळ जावुन त्याने पायाने हलवुन बघीतले. काहीच हालचाल नव्हती. तो मागे वळला आणि डॉलीकडे जाऊ लागला. काही पावलं पुढे गेला आणि त्याच्या पाठीला बंदुकीच्या नळीचा स्पर्श झाला..
“जीव प्रिय असेल तर बंदुक खाली टाक, मी परत सांगणार नाही.” मागुन आवाज आला. पण त्या आवाजात जरब नव्हती. त्याने खाली बघीतले.. समोर वाकुन उभ्या असलेल्या, एका हातात बंदुक तर दुसऱ्या हाताने पोटावर दाब दिलेल्या एका माणसाची सावली दिसत होती. त्याने सावकाश खिश्यातुन बंदुक काढली आणि खाली टाकली. मागच्या माणसाने ती बंदुक उचलली आहे हे त्याला सावलीत दिसले.
“डॉली, उठ.. चल लवकर..” मागुन आवाज आला..
डॉली अजुनही निपचीत पडली होती..
“डॉली.. आर यु ओके?.. उठ लवकर..” परत मागुन तो वेदनेने आणि चिंतेने भरलेला आवाज.
डिसुझाने तिरक्या नजरेने सावलीतल्या माणसाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. साधारण २५-३० वयाचा कृश शरीरयष्टीचा माणुस मागे उभा होता. त्याच्या हातात बंदुक नसती तर डिसुझाने त्याला काही क्षणात लोळवला असता.
“डॉली.. वेक अप..”.. मागच्या माणसाचे लक्ष आता नक्कीच विचलीत झाले होते.. त्याला डिसुझा पेक्षा नक्कीच त्या समोर पडलेल्या मुलीची चिंता होती. एक क्षण, फक्त एक क्षण, आणि काही कळायच्या आत डिसुझा चित्त्याच्या चपळाईने मागे वळला आणि त्याने आपला पोलादी हात त्या माणसाच्या पोटातील जखमेवर मारला. अतिव वेदनेने तो माणुस कळवळला, त्याच्या हातातील बंदुक गळुन पडली. पोटातील जखमेतुन रक्ताची मोठी धार वाहु लागली..
“डॉली..”.. धाड.. दुसरा हात त्या माणसाच्या तोंडावर पडला.
डिसुझाला सावजाला तडपावुन मारण्यात मजा यायची. तो पुढे झाला.. त्या माणसाच्या पोटात मारण्यासाठी त्याने पाय उचलला एवढ्यात “धाड.. धाड” गोळ्यांचे दोन आवाज आले.. त्याने मागे वळुन बघीतले.. मगाचची ती मुलगी उठुन उभी होती, हातामध्ये .३२ ऍटोमॅटीक. डिसुझाने तिच्या हातातल्या बंदुकीच्या दिशेने बघीतले. समोर कॅश व्हॅनचा ड्रायव्हर कोसळला होता. डिसुझाला का वेळ लागला हे बघायला तो गाडीतुन उतरुन मागे येत होता. डॉलीने त्याला त्याची बंदुक काढायलाही वेळ दिला नव्हता. डॉलीने बंदुक डिसुझा कडे वळवली.. “स्टॉप.. ऑर आय विल शुट यु..” थंडपणाने डिसुझाला म्हणाली.
गाडीतुन उतरुन मागे येणाऱ्या ड्रायव्हरला तिने पाहीले होते. त्याच्याकडे असलेल्या बंदुकीची डॉलीला कल्पना होती आणि म्हणुनच ती तो जवळ येईपर्यंत निपचीत पडुन होती.
या मरतुकड्या माणसापेक्षा ही मुलगी जास्त घातक आहे, डिसुझाच्या चाणाक्ष नजरेने हेरले. एकाला आधीच कसलाही विचार न करता मारले आहे, आपल्यावरही गोळी चालवायला ती कमी करणार नाही डिसुझाने विचार केला.
“काय पाहीजे तुम्हाला? कॅश? ती तर तुम्ही न्हेणारच आहात. पण मला मारलेत तर नुकसान तुमचेच आहे. त्या कॅश पेटीचा नंबर मला माहीत आहे. मी ती तुम्हाला उघडुन देऊ शकतो. नाही तर तुम्हाला महीना गेला तरी ती पेटी उघडण्यात यश येणार नाही..” डिसुझा बोलला.
डॉली आणि क्रिशची नजरनजर झाली. दोघांनी ही एकमेकांकडे बघुन मान हालवली. क्रिश अजुनही वेदनेने तळमळत होता. त्याने खाली पडलेली बंदुक उचलली आणि डिसुझाला पुढे चालण्याची खुण केली. डिसुझा गाडिच्या जवळ जाताच त्याने बंदुकीचा दांडा त्याच्या मानेवर मारुन त्याला बेशुध्द केले.
तेवढ्यात बाजुच्या झाडीतुन बंटी बाहेर पडला..
“च्यायला तुझ्या.. कुठे होता तु??” क्रिशने विचारले…”का मुद्दाम लपुन बसला होतास माझी मरायची वाट बघत, म्हणजे तेवढाच एक हिस्सा कमी झाला..”
“अबे..भुतनीके.. सकाळपासुन इथे झाडीत लपुन आहे. दोन मिनीटांसाठी झाडामागे गेलो आणि इथे सगळा झोल झाला.. स्वॉरी यार..” बंटी म्हणाला..
मग त्याने आणि बंटीने डिसुझाला गाडीत ढकलले. बंटी ड्रायव्हरच्या जागी बसला आणि त्याने कॅश व्हॅन चालु केली. इकडे डॉलीने त्या ड्रायव्हरला स्कॉर्पियोच्या मागे ढकलले आणि ती अन-कॉन्शियस असल्याचे भासवत रस्त्यावर बसुन राहीली.
*************************
पंकी ट्रक मध्ये बसुन अस्वस्थपणे कॅश व्हॅनची वाट बघत होता. घड्याळात पुढे पुढे जाणारा काटा त्याची बैचैनी वाढवत होता.
क्रिश मोठ्या मुश्कीलीने टोल नाका पार् होई पर्यंत चेहऱ्यावर उसने आवसान आणुन बसला होता. क्षणाक्षणाला त्याला गाडित बसणे अशक्य होत होते.. जखमेतुन बरेच रक्त वाहील्याने त्याला प्रचंड अशक्तपणा आला होता. पंकीचा ट्रक दिसताच त्याच्या जिवात जिव आला. पंकीने आरश्यातच मागुन येणारी कॅश व्हॅन पाहीली होती, त्याने पटकन ट्रकचे मागचे दार उघडुन ठेवले. बंटीने सरळ गाडी आतमध्ये घातली. दार मागोमाग बंद झाले होते.
पंकी पुढच्या दारातुन आत मध्ये आला. क्रिशला बघताच त्याला शॉक बसला. क्रिश किमान १० वर्षांनी म्हातारा वाटत होता.
“काय झालं??..” त्याने क्रिशच्या जखमेकडे बघत विचारले..आणि त्याचे लक्ष व्हॅन मध्ये बेशुध्द पडलेल्या डिसुझा कडे गेले..”आणि हा कोण? ह्याला कश्याला आणले उचलुन??”
क्रिशने त्याला घडलेले थोडक्यात सांगीतले..”पंकी बोलण्यात वेळ घालवु नकोस, मला औषधाची जरुरत आहे. अतीशय अशक्तपणा आला आहे. तु ट्रक डॉक वर घे. मी सांभाळतो याला.
“क्रिश, तुला आणि बंटीला कॅश ची पेटी ओढुन घेता येईल?” पंकीने विचारले.
क्रिशला अर्थातच हे शक्यच नव्हते. शेवटी धोका पत्करुन पंकीने आणि बंटीनेच ती पेटी ओढुन खाली ट्रक मध्ये घेतली. वाटले होते त्यापेक्षाही जास्ती जड आणि जास्त वेळ घेणारे हे काम ठरले. पंकीची धाकधुक वाढत होती. ट्रक एकाच जागी थांबलेला असल्याने जिपीएस वर टेंपोचे लोकेशन फिक्स दिसणार होते. पण पर्याय नव्हता. पंकीला ट्रक चालवायचा म्हणले असते तर बंटीला एकट्याला ती पेटी ओढणे शक्य नव्हते. एकदा पेटी निघाल्यावर बंटीने लगेचच कॅश व्हॅन बाहेर काढली आणि तो टोलच्या दिशेने निघुन गेला.
पंकीने ट्रक चालु केला. क्रिश तेथेच टेकुन एका ठिकाणी खाली बसला. छोट्याश्या हादऱ्यानेही त्याला मरणप्राय यातना होत होत्या. एका हाताने तो जखमेवर हात ठेवुन होता तर दुसरा हातात बंदुक धरुन ती त्याने डिसुझावर धरली होती.
बंटीने पुढचा टोलनाका पार केला आणि ठरलेल्या ए़क्झीटला लपवुन ठेवलेली बाईक काढुन तो डॉक-कडे आला. पंकीनेही पुढची ए़क्झीट घेउन ट्रक डॉकच्या दिशेने वळवला. अतीशय सावधानतेने तो ट्रक चालवत होता. कुठेही स्पिड-लिमीट क्रॉस केली किंवा लेन कटींग मुळे त्याला पोलीसांची झंजट मागे लावुन घ्यायची नव्हती.
ट्रकमध्ये थोड्या वेळाने डिसुझाला शुध्द आली. प्रथम त्याला कळेना आपण कुठे आहे. त्याची कॅश-व्हॅन गायब होती, तर कॅशची ती मोठ्ठी बोजड पेटी शेजारीच ठेवलेली होती. समोरच क्रिश हातात बंदुक धरुन बसला होता. त्यामुळे डिसुझा जागचा हालला नाही
क्रिशचा चेहरा पांढराफटक पडला होता. अशक्तपणामुळे त्याच्या डोळ्यावर पेंग येत होती. डिसुझा क्रिशच्या बेशुध्द होण्याचीच वाट बघत होता.. अगदी तश्शीच जसे एखादे गिधाड समोर मरायला टेकलेल्या प्राण्याकडे वाट बघत असते.. पेशंटली.. ‘Vulture is really a patient bird’ ….. कुठल्याही क्षणी झडप घालण्याच्या तयारीत.
क्रिशने स्वतःला जागे ठेवण्याचा खुप प्रयत्न केला आणि शेवटी त्याची शुध्द हरपली आणि तो खाली कोसळला. त्याच बरोबर डिसुझाने चपळाईने त्याची बंदुक काढुन घेतली. एक क्षण त्याने क्रिशला गोळी घालण्याचा विचार केला.. “पण नाही.. हा तसाही मरणार आहे.. उगाच गोळीच्या आवाजाने बाहेरची लोकं सावध होतील..” म्हणुन तो विचार त्याने काढुन टाकला.
ट्रक बऱ्याच वेळाने एखाद्या गावात आला होता. बाहेरुन गाड्यांचे, लोकांचे आवाज ऐकु येत होते. थोड्यावेळाने ट्रक कुठेतरी येउन थांबला आणि मग उलट्या दिशेने एखाद्या गॅरेज किंवा मोठ्या शेडमध्ये गेला. बाहेरुन येणारा प्रकाश कमी झाला यावरुन डिसुझाने हा अंदाज बांधला. डिसुझा आता सावध झाला होता. त्याने क्रिशचे खिसे तपासले आणि एका खिश्यातुन सायलेंन्सरची नळी बाहेर काढली आणि हातातल्या रिव्हॉल्व्हर वर चढवली.
थोड्यावेळाने मागचे दार उघडले गेले. डिसुझा अंधारात लपुन बसला होता. दारात बंटी होता. त्याने बॅटरीचा प्रकाश आत मध्ये टाकला. प्रकाशात त्याला कोपऱ्यात कोसळलेला क्रिश दिसला. बंटी लगेच सावध झाला, त्याने पटकन आपला हात खिश्याकडे न्हेला, परंतु डिसुझा विजेच्या चपळाईने पुढे झाला आणि त्याने हातातल्या बंदुकीने गोळी झाडली ती थेट बंटीच्या डोक्यात घुसली. बंटी खाली कोसळला. डिसुझाच्या गोळीने नेम साधला होता, पण त्याचा हा आनंद त्याला साजरा करायला वेळच मिळाला नाही, कारण बंटीच्या मागेच सावध असलेल्या पंकीच्या गोळीने डिसुझाच्या काळजाचा वेध घेतला होता.
बॉलीवुडचा अभिनेता ‘बोमन इराणी’ सारखा दिसणारा डिसुझा त्या अंधारलेल्या शेडमध्ये कोसळला होता.. कायमचा….
[क्रमशः]
पुढचा भाग>>
Like this:
Like Loading...