‘शादी’ के लिये साला कुछ भी करेगा [भाग-१]


“आई, केतन दादा आला गं!”, शरू ओरडत आत पळाली. थोड्याच वेळात दारात सगळा गोतावळा जमा झाला. सगळ्यांनाच केतनला भेटायची उत्सुकता होती. जवळ-जवळ ८ वर्षांनंतर केतन भारतात येत होता..

“अगं बाई.. आले वाटंतं अमेरीकाकर”, आत्याबाई गुडघे सांभाळत बाहेर येत म्हणाल्या.

केतन ला दारातच आई म्हणाली..”काय रे.. कित्ती वाळला आहेस? खातं नव्हतास का अमेरीकेत?”

“काय गं आई? वाळला काय? आणी वेब-कॅमवर काय वेगळा दिसायचो का?” आई-बाबांच्या पाया पडत केतन म्हणाला.

“बसं रे बाबा.. दमला असशीला ना प्रवास करुन?” आत्या म्हणाल्या..

“नाही गं आत्या..दमायला काय होतंय? दोन-चार तासाचा तर प्रवास.. अगं मी बॅंगलोर वरुन आलो आहे आत्ता!! अमेरीकेवरुन कालच आलो होतो मी बॅगलोरला. आज तिथल्या आमच्या शाखेत एक KT सेशन होते.. मी येतंच होतो इकडे तर माझ्याच गळ्यात टाकलं ते कामं. दुपारी ते संपल्यावर एक डुलकी काढुन इकडे आलो..” केतन

“बरं बाबा.. राहीलं.. आता आला आहेस ना चार-दोन आठवड्यांसाठी? का जायचे आहे लगेच?” आत्या म्हणाल्या..

“नाही.. आहे आता.. पुढच्या आठवड्यात सुशांत दादाचे लग्न उरकले, धावपळ संपली की मग १-२ आठवडे मस्त आराम करणार, आईच्या हातचा स्वयंपाक हादणार आहे..” केतन खुर्चीवर आरामात बसत म्हणाला..

एवढ्यात जिन्यावरुन केतनचे भाउ-बंधु धावत-पळत केतनला भेटायला आले. सगळ्यांनी केतनभोवती कोंडाळा केलं. केतने पहिल्यांदा सुशांतला मिठी मारुन अभिनंदन केले.

‘काय? झाली का तय्यारी लग्नाची..?? आणि मनाची?’ केतनने पाठीवर थाप मारत सुशांतला विचारले.

‘म्हणजे आता झालीच म्हणायची..वेळच नाही मिळाला ना तयारीला. लग्न ठरवतोय म्हणतोय आणि तोच आम्हालाही अमेरीकन गोऱ्याचे आग्रहाचे आमंत्रण आले आहे एक वर्षासाठी त्यामुळे मग गडबडीतच लग्न ठरवावे लागले..’ सुशांत

‘हम्म.. यार फोटो दाखवं ना वहिनीचा’, डोळे मिचकावत केतन म्हणाला..
‘अरे फोटो काय, तिचीच ओळख करुन देतो ना.. इथेच आहे बघ ती..’ असे म्हणुन सुशांतने हाक मारली..’अनु.. एss अनु.. खाली ये जरा’
‘अनु??’ केतनने विचारले..
‘अरे म्हणजे.. अनुराधा रे.. तिच आहे जिचे पत्रिकेवर नाव होते.. घाबरु नको.. बदलली नाहीये..” ” ..ए. अनु खाली ये ना..” सुशांत..”बरं..!! आमचं झालं !! .. तुमचं काय? कधी करताय लग्न??? मिळाली का नाही तुमच्या मनासारखी ब्लॉंड तुम्हाला?”
‘ब्लॉंड??…म्हणजे काय रे दादा?’ दुसऱ्याने लगेच नाक मध्ये खुपसले..

‘अरे म्हणजे सोनेरी केसांची, गोरी-गोरी पान परीच हवी आहे केतन दादाला.. साहेबांना भारतीय नारी नको आहे ना बायको म्हणुन..!! त्यांना अमेरीकन ब्लॉंड्शीच लग्न करायचे आहे.. काय करणार?? इतकी चांगली स्थळ सांगुन आली होती.. पण साहेब बधतील तर काय?’ सुशांतने खुलासा केला..

‘काय रे..? झालं का तुमचं टोमणे मारणं सुरु.. कश्याला माझ्या लग्नाचा विषय काढताय? माझं ठरलं की मी सांगीनच ना तुम्हाला. आणि ते ब्लॉंड, अमेरीकन वगैरे जाऊ देत, विसरुन जा ते सगळं’.. केतन वैतागुन म्हणाला.

“का रे बाबा? प्रेम-भंग वगैरे केला का कुठल्या अमेरीकन मुलीने तुझा? का कुठली भारतीय आवडली?’, भुवया उडवत आणि कोपरखळ्या मारत सुशांत म्हणाला..

“.. म्हणजे.. अगदीच तसे काही नाही.. पण एक भारतीय आवडली खरी…” केतन इकडे-तिकडे बघत हळु आवाजात म्हणाला..

“काय बोलतोयेस काय? अरे कधी? केंव्हा? कुठे? आणि हे तु आत्ता सांगतो आहेस..?? अरे ऐका ऐका..ss’ सुशांत सगळ्यांना बोलवायला लागला..
“अरे गप्प ना..अजुन कश्यात काही नाही.. कश्याला गाव-जेवण घालतो आहेस? मला तिचं नाव आणि ती आपल्याच गावची- मुंबईची आहे.. एवढेच माहीती आहे..”, केतन म्हणाला..
“..म्हणजे..?? अरे निट सांग ना..” सुशांत खुर्चीवर बसत म्हणाला

“सांगतो..पण कुठे बोलु नका. अरे कालच माझी ओळख झाली तिच्याशी.. झालं काय, माझी प्लाईट सॅन-फ्रॅन्सिस्को ते शांघाय .. आणि तिथुन दुसरी कनेक्टींग फ्लाईट होती बॅंगलोर पर्यंत. शांघायवरुन दुसरी फ्लाईट पकडायला चार तास वेळ होता. मी तेथीलच एका कॅफे मध्ये बसलो होतो. इतका दळींद्री कारभार सगळा.. तिथल्या लोकांना इंग्लिशचा गंधच नाही रे.. मला काहीतरी ऑर्डर करायचे होते.. आणि तेथील लोकांना कळेचना मी काय म्हणतोय, जाम कंटाळलो आणि वैतागलो होतो तेवढ्यात तिची आणि माझी भेट झाली. तिने मस्त चायनीज भाषेतुन ऑर्डर दिली की! मी थक्कच झालो. मग काय, वेळ भरपुर होता आणि तिची आणि माझी फ्लाईट एकच होती बसलो गप्पा मारत.. आणि खरंच रे खुप आवडली मला. कित्ती छान होती ती..गप्पा मारताना नुकतीच ओळख झाली आहे असं वाटलंच नाही..विमानातही रिकामी जागा बघुन आम्ही एकत्रच बसलो होतो. वाटलं काय मुर्खासारखं मी अमेरीका-अमेरीका करत होतो..प्रवासाचा थकवा असा जाणवलाच नाही. वाटत होतं बॅंगलोर कधी येऊच नये. बॅंगलोरला उतरलो आणि नशिबाने पुन्हा एकदा साथ दिली.. तिची पुढची मुंबईची कनेक्टींग फ्लाईट २ तास लेट.. मग मी पण मित्राची वाट बघतोय कारण सांगुन तिथेच थांबलो तिच्याशी गप्पा मारत… शेवटी अगदीच नाईलाज झाल्यावर निघालो.. पण येताना तिचा नंबर घेतला आहे बरं का!. आजच संध्याकाळी तिला फोन करतो..” केतन बोलत होता..आठवणींमध्ये रममाण होऊन

“अरे व्वा.. छानच.. तु लढ बिंधास्त.. मी तर म्हणतो संध्याकाळची कश्याला वाट बघतोस.. आत्ताच लाव फोन..आण इकडे नंबर.. काय नाव म्हणालास…?”, सुशांतने मोबाईल पुढे केला..

“काय रे सुशांत कश्याला मगाच-पासुन हाका मारतो आहेस..?” वरुन जिन्यावरुन येताना कुणाचा तरी आवाज आला.. सुशांत आणि केतनने मागे वळुन बघीतले. केतनची नजर जागच्या जागी खिळली..त्याच्या समोर त्याला भेटलेली ‘तिच’ मुलगी उभी होती. केतनला काय बोलावे, काय करावे काहीच सुचेना.. तिच्या डोळ्यात पण एक ओळखल्याची खुण चमकुन गेली.. केतन काही बोलणार एवढ्यात सुशांत म्हणाला..

ये अनु.. अगं तुझी ओळखं करुन द्यायची होती.. हा माझा चुलत भाऊ.. केतन.. अमेरीकेला असतो.. आत्ताच आला तिकडुन..आणि केतन, ही अनु..अनुराधा.. माझी होणारी बायको.. तुझी वहिनी..

केतनची स्तब्ध नजर अनुने नुकत्याच हाताला लावलेल्या ओल्या मेहंदीवर खिळली होती.. शुन्यात नजर असल्यासारखी…………………

[क्रमशः]

पुढचा भाग>>

Advertisements

8 thoughts on “‘शादी’ के लिये साला कुछ भी करेगा [भाग-१]

 1. योगायोग का काय माहीत नाही पण रविवारीच HBO वर Maid of Honour पाहिला आणि आजची तुझी कथा वाचून चाटच पडलो. काय हे तुझे अष्टपैलुत्व. अगदी त्या हॉलिवूडपटाच्या तोंडात मारेल अशी कथा लिहायला घेतली आहेस मित्रा….. आता पहिल्या भागाच्या शेवटी असली ’कहानीमे twist’ टाकून जीवाला घोर कश्याला लावलास रे पण? पटकन येवू दे पुढचा भाग आता….
  BTW, केतनची अवस्था मात्र ’सहनही होत नाही आणी सांगताही येत नाही’ अशी झाली असेल ना? :P:P

 2. तू सहज कॅरक्टर मध्ये घुसतोस आणि कागदा वर उतरवतोस रे मित्रा. १ मिं मध्ये तू केतन, सुशांत आणि अनु ही तिनही कॅरक्टरस् डोळ्यासमोर उभी केलीस.

  अनुला समोर बघून ‘केतन के तन-से एक बिजली सी दौड़ गयी होगी’ … 😀

  1. धन्यवाद मित्रा.. हो खरं आहे.. ‘जोरं का झटका धिरे से लगे’ असंच काही तरी 🙂

 3. हे काय “पाठलाग” ची स्टोरी मधेच सोडून ही नवीन स्टोरी ???????
  काही कळल नाही अनिकेतजी,
  पण ही स्टोरी ही मस्त झाली आहे.
  “पाठलाग” काय झाल ते सांगाल का Please.
  मी आतुरतेने वाट पाहतेय तुमच्या Reply ची

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s