रॉबरी- [भाग ५]


भाग ४ पासुन पुढे..

गुंजाळ, ब्ल्यु-नाईल क्लबचा मालक, एके काळचा कु-प्रसिध्द गुंड आणि सध्याचा एक बिझिनेसमॅन. अर्थात इतरांसाठी त्याचे काळे धंदे बंद झाले असले तरी आजही समाजाच्या दृष्टीआड त्याचे उद्योग चालुच होते. त्याच्याच क्लबची कॅश पळवली गेल्याने तो कमालीचा अस्वस्थ झाला होता.

“सर.. थॉमस आला आहे..”, सेक्रेटरीने इंटरकॉमवर गुंजाळला निरोप दिला.. पुढच्या मिनीटाला गुंजाळच्या केबीनमध्ये थॉमस उभा होता. थॉमस गुंजाळच्या भरवश्याच्या अनेक माणसांपैकीच एक होता.

“थॉमस, फक्त ३ आठवडे, मला त्याच्या आत माझी पुर्ण कॅश मला परत हवी आहे. आणि ज्या लोकांनी ही हिम्मत केली आहे, त्यांचे काय करायचे हे तु उत्तमपणे जाणतोसच..”.. गुंजाळ गंभीर स्वरात म्हणाला.

गुंजाळच्या डोळ्यावर नेहमी एक काळा गॉगल चढवलेला असे, परंतु तरीही त्याची भेदक नजर आपल्यावर रोखलेली आहे हे थॉमस जाणुन होता. आपल्या बॉसशी गद्दारी करणाऱयाची, त्याच्या धंद्यात आड येणाऱ्याचि काय गत होते हे तो चांगले जाणुन होता.

“एस बॉस.. तुम्ही डोंट वरी, मी फाईंड करीनच..” थॉमस म्हणाला..
“मला अपयश, हार मान्य नाही थॉमस, तु जाणतोस.. काम पुर्ण झाले नाही तर मी कुणाचीही गय करत नाही.. तुला वेगळे सांगायची गरज नाही..जाऊ शकतोस तु..” गुंजाळ

पुढच्या दहा मिनीटांत थॉमसने त्याच्या माणसांना कामाला लावले होते. त्याचा प्रत्येक माणुस तपास करायला काना-कोपऱ्यात पसरला होता.

************************************

बंटीच्या जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला होता. असं काही होईल याचा कुणीच विचार केला नव्हता. बंटीच्या अचानक नाहीश्या होण्याने तिघांसमोर मोठ्ठा प्रश्न उभा ठाकला होता. बंटी तेथील कामाचा सुपरव्हायझरच होता. तेथील कामगारांना काय सांगायचे? समोरच्या पोलीस चौकीतील पोलीसांचे काय? रोज या ना त्या कारणाने भेटणारा बंटी अचानक दिसेनासा झाल्यावर कुणीतरी काहीतरी विचारणारच ना. शेवटी ‘पगारवाढ’ नाकारल्याने बंटी नोकरी सोडुन गेला असे सांगायचे ठरले.

क्रिशची तब्येत खालावतच होती. कामात तर त्याचा काहीच उपयोग होतं नव्हता. एका कोपऱ्यात तो पडुन राही. डॉलीचे तेथे येणे योग्य नव्हते. अश्या मजुरीच्या ठिकाणी तिच्यासारख्या एका मुलीचे काय काम? एक दिवस फक्त डॉली त्याला भेटुन गेली.
क्रिशने पाहीलेली, त्याला भावलेली ही डॉली नक्कीच नव्हती. तिच्या डोळ्यात त्याला दिसणारी स्वतःबद्दलची जवळीक निघुन गेली होती, राहीली होती फक्त औपचारीकता आणि कोरडेपणा.

पंकी, क्रिश आणि रफिक समोर मोठ्ठ प्रश्न होता डिसुझा आणि बंटीच्या बॉडीचे काय करायचे? रॉबरीची बातमी काहीतासातच सर्वत्र थडकली होती. अपेक्षेप्रमाणेच पोलीसांनी नाकाबंदी केली होती. गावात येणाऱ्या आणि गावाबाहेर जाणाऱ्या प्रत्येक वहानांची कसुन तपासणी होतं होती. एक-दोन दिवस पंकीने वाट पाहीली परंतु नाकाबंदी उठण्याची शक्यता कमीच होती. बॉडी सडण्याचा, दुर्गंधी सुटण्याचा धोका होता. त्याच्या आतच काही-तरी पावलं उचलणं आवश्यक होते पण काय???

पंकीच्या डोक्यात एक कल्पना आली, पण त्यासाठी त्याला डॉलीची मदत आवश्यक होती. अर्थात डॉलीने प्रथम त्याला नकार दिला..

“हे बघ पंकी, मला दिलेले काम मी पुर्ण केलेले आहे. प्रत्येक वेळी धोक्याची काम माझ्याच वाट्याला का येतात? तु रफिकची मदत का नाही घेत? तसेही त्याच्या वाट्याला ह्या शेड मध्ये लपुन बसुन रहाण्याखेरीज काहीच काम नाही..” डॉली..

“डॉली.. सद्यपरीस्थीतीमध्ये आपल्याला लगेच हालचाल करणे महत्वाचे आहे. थोडीशी चुक आणि आपण सगळे पकडले जाऊ.. प्लिज हेल्प कर..” पंकी..

डॉलीकडे दुसरा पर्याय नव्हता.
******************************

रविवारची दुपार, नाकाबंदी असल्याने वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. नाक्यावरुन वाहनं मुंग्यांच्या गतीने पुढे सरकत होती. नाक्यापासुन काही वाहनं पुढे एक काळ्या रंगाची मर्सिडीज उभी होती. पुढचे वाहनं पुढे गेले तरी ती मर्सिडीज जागची हालली नाही म्हणल्यावर मागच्या वाहनांनी हॉर्न वाजवुन गोंधळ सुरु केला.

ड्युटीवरील पोलीसाचे लक्ष तिकडे गेले. तो तावातावाने त्या मर्सिडिजपाशी गेला. ड्रायव्हिंग व्हिलपाशी एक २५तील तरूणी स्टेअरींगला डोके टेकवुन बसली होती..

“ओss मॅडम झोप लागली काय? चला की पुडं..” हवालदार ओरडुन म्हणाला

ती तरूणी एकदम खडबडुन जागी झाली..”माफ करा हं साहेब.. थोडा शुगरचा त्रास आहे, चक्कर आल्यासारखे झाले..”

“.. घ्या कडेला घ्या जरा गाडी बाकीच्यांना जाऊ देत पुढे..”.. हवालदार..
तो पर्यंत बाकीचे एक-दोन पोलिसही तिथे आले होते.. “काय झालं रं..”
गाडी कडेला लावुन बाहेर येणाऱ्या त्या तरूणीला बघुन सर्व पोलीस घायाळ झाले होते. स्ट्रॉबेरी रंगाचा तिचा फिटींगचा ड्रेस तिचे सौदर्य अधीकच खुलवत होता..

त्या तरूणीने पर्स मधुन एक-दोन गोळ्या काढुन घेतल्या, पाणि पिले आणि ती पोलीसांपाशी आली.. “माफ करा हं.. माझ्यामुळे उगाचच खोळंबा झाला तुमचा..” मग तिने पर्स मधुन काही कागदपत्रे काढुन पोलीसांसमोर धरली.. “मी डॉली.. डॉली कुमार..” इथुनच पुढे एकाठिकाणी माझ्या कंपनीचे एक वर्कशॉप आहे तेथे चालले होते. ही माझी कागद पत्रं. माझं फक्त १० मिनीटांचेच काम आहे आणि परत जाणार आहे. पण झालं काय, सकाळपासुन काही खाल्लं नव्हता ना.. त्यामुळे थोडि चक्कर आल्यासारखं झालं. आता बघा नं नेमका माझा ड्रायव्हर आज सुट्टीवर होता आणि माझं इथे येउन जाणं महत्वाचं होतं म्हणुन स्वतःच गाडी घेउन आले आणि हा घोळ झाला..”

“काही हरकत नाही मॅडम.. आम्ही फक्त दोनच मिनीटं घेतो तुमची.. ए.. तुक्या जा जरा एकदा गाडी चेक करुन घे आणि मॅडमना जाउ दे कडेने..” ऑफीसरने हवालदाराला हुकुम सोडला.

आपल्या सर्वांगावरुन फिरणाऱ्या ऑफिसरच्या नजरेची डॉलिला पुर्ण जाणिव होती.. पण शेवटी हीच ती गोष्ट होती ज्यामुळे डॉली आज इतक्या संपत्तीची धनी होती. हवालदार गाडि चेक करुन आला आणि त्यांनी डॉलीला जाउ दिले.. शहरात आल्यावर डॉलि वेगाने त्या शेड कडे आली. बोलायला आणि इतर कश्यालाही फार वेळ नव्हता. गाडी शेडच्या मागच्या बाजुला लावल्यावर पंकी आणि रफिकने पटापट डिसुझा आणि बंटीच्या बॉडीज गाडिच्या डीक्कीत भरल्या. डॉलिच्या आवाजाने क्रिश उठुन बसला होता, पण काही वेळातच गाडीच्या जाण्याचा आवाज आला आणि त्याच्या पदरी निराशाच पडली.

साधारण अर्ध्या तासाच्या अंतराने डॉलिची गाडी परत चेकनाक्यावर आली. डॉलीला प्रचंड भिती वाटत होती.. जरका परत गाडीचे चेकींग झाले तर सगळा खेळ खल्लास. नाका जवळ येताच तिने स्वतःवर नियंत्रण मिळवले. नाक्यापाशी ती स्वतःहुन खाली उतरली.

” चला ऑफीसर..झालं माझं काम.. मगाशी तुम्ही होतात म्हणुन.. या उन्हामध्ये दिवसभर उभं राहुन काम करणं सोप्प काम नाही. मला खरंच कौतुक वाटतं तुमचं. तुमच्या सारख्या लोकांमुळे आज आम्ही समाजात निर्भयपणे वावरु शकतोय नाही का..??” डॉलिच्या चेहऱ्यावर तेच नेहमीचे फ्रेंडली हास्य होते..

“धन्यवाद मॅडम.. अहो आमच्या कामाची कदर आहे कुणाला इथं सालं आपलं २४ तास ड्युटी घरदार नाही, सणवार नाही.. बरं तुम्ही जा आता. आणि सावकाश जा.. पुढं एक चांगले रिसॉर्ट आहे तेथे जेवण चांगलं मिळतं बघा.. खाऊन घ्या तिथे. चला.. जाउद्या”.. ऑफीसर..

“अहो पण गाडिचे चेकिंग..” डॉलि चेहऱ्यावर उसने हास्य आणुन म्हणाली..
“का लाजवताय मॅडम.. अहो चोर कधी तुमच्या सारख्या सुंदर स्त्रिच्या वेश्यात मर्सिडीजमधुन फिरतात का? अहो उद्या लोकांनी म्हणायला नको पोलिस चोर सोडुन संन्याश्याला फाशी देतात म्हणुन..जा तुम्ही..” ऑफिसर..

डॉलिचा जिव भांड्यत पडला.. तिने अधीक न बोलता गाडि बाहेर काढली.. गावाबाहेर गेल्यावर पंकी आणि बंटीने रात्रिच्या वेळी गाडीतिल प्रेतांची विल्हेवाट लावुन टाकली होती.

***********

पहीले काही दिवस, १-२ आठवडे आज पेटी उघडेल, उद्या उघडेल या आशेवर क्रिश तग धरुन होता. परंतु ते पोलाद वाटते त्यापेक्षाही फारच कठीण निघाले. डॉली परत क्रिशला भेटायला कध्धीच आली नाही.. तिने फोनही त्याला कध्धीच केला नाही. क्रिशने सर्व आश्या सोडुन दिल्या होत्या आणि एक दिवस झोपेतच त्याने जीवही सोडुन दिला.

डॉली, बेंजोच्या संपर्कात होती. रॉबरीबद्दल मिळणारी बारीक-सारीक माहीती, तपासातली प्रगती ती पंकी आणि रफिकला कळवत होती. आत्तापर्यंत रॉबरी कशी झाली असावी याबद्दलची प्राथमीक माहीती तपासात पुढे आली होती. एक खोटा अपघात घडवुन कॅश-व्हॅन अडवली. ती घेउन पुढच्या टोल नंतर ती एका ट्रकमधुन कुठेतरी न्हेण्यात आली आणि नंतर परत खाली उतरवुन अमुक-अमुक ठिकाणी सोडुन देण्यात आली. मोठ्ठ्या ट्रकचा उल्लेख होताच पंकीने शेडवर येणारे मोठठे ट्रक बंद केले होते त्याऐवजी टेंपोंमधुनच अधुन-मधुन माल येत होता.. जात राहीला..

शेवटी तिन आठवडे प्रयत्न केल्यानंतर त्यांना ती पेटी फोडण्यात यश येऊ लागले आणि एक-एक करत त्याचे थर महीनाभराच्या अंतरात गळुन पडले. शेवटचे झाकण उघडायच्या वेळी पंकी, रफिक आणि डॉली पेटी भोवती उभे होते. झाकण उघडले आणि तिघांचे डोळे समोर खचाखच भरलेली कॅश बघुन सताड उघडेच पडले. शिवाय त्या पेटी मध्ये काही मौल्यवान दागीनेसुध्दा होते. बहुदा जुगारात हारलेले तरीही जिंकण्याची आश्या असलेल्या लोकांनी आपल्याजवळील दागीने गहाण टाकले होते. इतक्या दिवसांनंतर प्रथमच तिघांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. रफिक तर वेडाच झाला होता. दागीने, कॅश तो वेड्यासारखी हातात धरुन बघत होता, त्याचे चुंबन घेत होता. स्वतःच्याच अंगावर उधळत होता आणि अचानक तो स्तब्ध झाला.. हातातले दागीने गळुन पडले. त्याचा तोल जाऊ लागला तसा त्याने भिंतीचा आधार घेतला. रफिकला काय होते आहे हे कुणालाच कळेना. त्याच्या तोंडातुन फेस आला आणि तो खाली कोसळला…

************************

गुंजाळच्या टेबलावरचा फोन खणखणला.. “बॉस, थॉमस..पत्ता लागलाय.. पाच लोकं आहेत. त्यातील दोघं आधीच टपकले आहेत आणि एक आज टपकला.. कॅश पेटी उघडण्यात आली आहे…” आणि मग त्याने आत्तापर्यंत झालेला तपास आणि बाकीची माहीती गुंजाळला सांगीतली..

गुंजाळच्या चेहऱ्यावर एक विषारी हास्य उमटले.. “..शाब्बास थॉमस.. तु अजुन काही ऍक्शन घेउ नकोस.. पण जवळुन लक्ष ठेव आणि प्रत्येक बारीकसारीक डिटेल्स मला पाहीजेत.. मरण्यापुर्वी त्यांना कळले पाहिजे की हाता-तोंडाशी आलेला घास पळवणं म्हणजे काय आणि गुंजाळच्या पैश्याशी खेळले की काय होते..”

रॉबरीच्या कॅश भोवती म्रुत्यु घोटाळत होता. गद्दार कोण होते.. पंकी की डॉली? कॅश घेउन पळुन जाण्यात कोण यशस्वी होणार? गुंजाळचा डाव काय आहे? रफिकचा मृत्यु नक्की कश्यामुळे झाला??

सर्व काही पुढच्या- शेवटच्या भागात.. वाचत रहा.. रॉबरी..

[क्रमशः]

पुढचा भाग>>

6 thoughts on “रॉबरी- [भाग ५]

 1. रहस्य चांगलं पकडून ठेवलं आहेस. तू ये ब्लॉगरवर आणि छानसं नाव दे तुझ्या ब्लॉगला. तुला आगामी लेखनासाठी शुभेच्छा!

  1. अनिकेत

   धन्यवाद अदिती. नविन ब्लॉगवरही आपला लोभ असाच कायम रहावा 🙂

 2. vijay

  सही रे मित्रा… मस्तच जमली आहे.
  बोलेतो रापचिक !!!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s