Monthly Archives: September 2009

आजा गुन्हा कर ले (भाग-३)


भाग २ पासुन पुढे..

“दिन्या अरे हे काय चालवले आहेस तु?” बेडवर निपचीत पडलेल्या त्या वेट्रेसच्या प्रेताकडे बोट दाखवत मी विचारलं.. “म्हणजे आता इथुनही कल्टी मारावी लागणार तर..छ्छा!!”

“काला है तो काला होगा
मौत का ही मसाला होगाss
चुना कथ्थार जिंदगी तो
सुपारी जैसा छला होगा

बाप ने जना नही तो
पापीयोंने पाला होगा
भला बुरा, बुरा भला है
खोटे पर सब खरा भला है..”

दिन्या आपल्याच तंद्रीत मद-मस्त होता. शेवटी मीच त्या तरुणीचे प्रेत ओढत-ओढत बाथरुम मध्ये आणुन टाकले. एकुणच सगळ्या प्रकारांनी थकवा आला होता म्हणुन बेड वर स्वतःला झोकुन दिले, काही क्षणातच झोपेच्या आधीन होऊन गेलो.

डोळे उघडले तेंव्हा उन्ह खुप खाली उतरली होती. दिन्या खोलीत नव्हता, कुठेतरी बाहेर गेला होता. ‘आज रात्रीच इथुन निघायचे’, मी मनोमन ठरवुन टाकले. दिन्या आला तर बेस्टच नाहीतर एकटे..

तोंड धुवायला बाथरुम मध्ये गेलो.. ‘ते’ प्रेत अजुनही आहे त्याच स्थितीत पडुन होते. मला फार काळ बघवले नाही. पटकन फ्रेश होऊन बाहेर आलो. कपाटातुन बऱ्यापैकी दिसणारे कपडे काढले. आरश्यात स्वतःला एकदा न्हाहाळले आणि रुम लॉक करुन बाहेर पडलो.

हॉटेलच्या बेसमेंट मध्ये असलेला कॅसीनो पर्यटकांच्या गर्दीने तुडूंब भरला होता. दिन्याचा कुठेच ठावठिकाणा दिसत नव्हता.

“ऍन्टीक्वीटी.. ऑन द रॉक्स..” तेथील बारटेंडरला ऑर्डर देऊन तेथीलच एका खुर्चीवर स्थानापन्न झालो. दोन जळजळीत घोट घश्याला घासत पोटात गेले आणि जरा बरं वाटलं. डोकं एकदम हलके झाले. उरलेला घोटही एकादमात संपवला आणि अजुन एक ऑर्डर दिली. इतक्यात खिश्यात पैसे आहेत की नाही याची जाणीव झाली. खिश्यातुन पाकीट काढुन बघतच होतो इतक्यात.. “हाय हॅंडसम, कॅन आय बाय यु वन लार्ज व्हिस्की?” मागुन एक आवाज आला.

माझ्या मागेच एक २७-२८शीतील तरूणी माझ्याकडे अर्थपुर्ण कटाक्ष टाकत उभी होती. कुरळे केस, कॉफी कलरचे डोळे, लार्ज ओपन नेक टी-शर्ट आणि लो-वेस्ट जीन्स घातलेली एक तरूणी मला व्हिस्की ऑफर करत होती.

“वेल शुअर.. व्हाय नॉट!!.. मी पैसे रुममध्येच विसरुन आलो..”

शेजारचीच खुर्ची ओढुन ती तरूणी मला घसटुन बसली.

“दिन्या नसल्याचा फायदा.. तो असला की सगळ्या तरूणी त्याच्याभोवतीच घोटाळत असतात. मी सुध्दा इतका काही वाईट नाही.. जस्ट दॅट दिन्याचा इन्फ्ल्युएंन्स जास्त असतो..” स्वतःशीच विचार करत होतो

व्हिस्कीचे घोट एकावर एक पोटात जात होते. त्या तरूणीची घसट जास्तच वाढली होती. हळु हळु व्हिस्कीपेक्षा अधीक मादक आणि अधीक ज्वलंत मला ती तरूणी भासु लागली. डोळे जड होऊ लागले तसे मी पेग घेणे थांबवले.

“मग.. पैसे घ्यायला मी तुमच्याबरोबर रुम मध्ये येऊ..”.. माझ्या गालाला हलकाच स्पर्श करत ती तरूणी म्हणाली..

कदाचीत माझ्या चेहऱ्यावर एक हास्य उमटले होते. समोर एखादा आरसा असता तर कदाचीत मी दिन्यासारखाच दिसलो असतो.. भेसुर, हिंस्त्र.

त्या तरूणीला घेउन मी रुमवर आलो. रुममध्ये अंधार होता. म्हणजे दिन्या अजुनही परत आला नव्हता. रुममधला दिवा लावला.. “बरं झालं ते प्रेत मगाश्शीच बाथरुममध्ये न्हेऊन टाकले ते…” मनामध्ये एक विचार येऊन गेला.

खोलीचे दार लावुन टाकले आणि त्या तरूणीला जवळ ओढले. तिचे गरम श्वास माझ्या मानेवर, कानावर जळजळीत आग ओतत होते. तिच्या छातीची धडधड एखाद्या पटरीवरुन धावणाऱ्या आगगाडिच्या आवाजाइतकी स्पष्टपणे मला ऐकु येत होती. मोठ्या मुश्कीलीने तिला माझ्या बाहुपाशातुन बाजुला केले आणि नकळत कपाटाकडे गेलो. माझे हात नकळतपणे काहीतरी शोधत होते..काय???.. कदाचीत दिन्याचा लाडका ७” सुरा.

“इथेच तर ठेवला होता!! कुठे गेला..”

इतक्यात पाठीला काहीतरी थंडगार वस्तुचा स्पर्श झाला.

“हॅन्ड्स-अप मिस्टर, यु आर अंडर अरेस्ट..” मागुन तिचा आवाज आला..
“कोण?? कोण आहेस तु??”
“सि.आय.डी. इन्स्पेक्टर निशा मेहता.. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय..”

मी सावकाश मागे वळलो. खोलीमध्ये अजुन दोन बंदुकधारी माझ्यावर नेम धरुन उभे होते.
********************************************

“इन्स्पेक्टर साहेब माझ्यावर विश्वास ठेवा.. अहो यातील कुठलाही खुन मी केलेला नाही”
“अच्छा, मग तुमच्या रुममध्ये सापडलेले ते तरूणीचे प्रेत?..”
“ते.. ते.. दिन्याने मारले तिला..”
“दिन्या? कोण दिन्या? आहे कुठे तो?”
“मला..मला माहीत नाही कुठे आहे तो.. दुपारपासुन नाहीसा आहे तो..हायवे वरील खुन सुध्दा त्यानेच केले आहेत..”
“याला काही पुरावा?..”
“पुरावा?.. होता.. पुरावा होता.. संजु.. तो सुध्दा माझ्याबरोबर होता..”
“संजु? मग आता कुठे आहे तो??”
“त्याला… त्याला सुध्दा मारला दिन्यानेच.. त्या मॉटेलच्या मागे..”
“मग आम्हाला त्याची बॉडी सापडायला हवी होती! नाही का?? आम्हाला खोलीमध्ये सुध्दा फक्त एकाच माणसाचे ठसे सापडले.. आणि काही तासांतच ते ठसे तुमचे आहेत हे स्पष्ट होईल..”
“आहे.. अजुन एक पुरावा आहे.. पेट्रोल पंपावरचा तो पोरगा.. ज्याचे पैसे न देता दिन्याने गाडी बाहेर काढली होती. तो सांगु शकेल की माझ्याबरोबर ३ लोकं होती.”
“झालं.. ते सुध्दा झालं.. त्या पोऱ्यानेच आम्हाला सांगीतले की त्या गाडीत फक्त एकच माणुस होता.. मग??”
“एकच माणुस..?? कसं शक्य आहे ते.. एकवेळ संजु त्याला दिसला नाही म्हणुन दोन माणसं म्हणला असता तरी ठिक आहे.. पण एकच माणुस म्हणतो म्हणजे… इन्स्पेक्टर साहेब.. ही दिन्याचीच काहीतरी चाल आहे.. तो मला या प्रक्ररणांमध्ये अडकवुन स्वतःला सोडवु पहातोय.”
“हे बघा.. त्या हॉटेलच्या सि.सि.टी.व्ही. क्लिप्स मध्ये सुध्दा आम्हाला फक्त एकच माणुस रुम मधुन आतबाहेर करताना दिसला होता आणि तो म्हणजे फक्त तुम्ही..

ही काय गडबड आहे मला काहीच कळत नव्हते.. दिन्या असा अचानक कस्सा नाहीसा झाला होता. हे सगळे खुनाचे पुरावे माझ्या विरोधात कसे होते..?? प्रश्न.. फक्त प्रश्न..

“बर मिस्टर.. तुम्ही मला दिन्याचे आणि संजुचे वर्णन सांगु शकाल काय? आपण गोवा पोलीसांच्या मदतीने त्या दोघांचा काही माग लागतो का ते बघु..”
“हो.. हो.. सांगतो ना.. संजु.. ५.८”, गोरा रंग, मजबुत बांधा वय साधारण २८-३० च्या आसपास, चेहऱ्यावर नेहमी घाबरलेले भाव..”
“आणी दिन्या??”
“दिन्या.. ५.८”, गोरा रंग, मजबुत बांधा वय साधारण २८-३० च्या आसपास, चेहऱ्यावर नेहमी बेफीकीरीचे भाव..”

इस्न्पेक्टरच्या चेहऱ्यावर एक हास्य पसरले.. त्याने माझी कॉलर धरुन ओढत न्हेले आणि एका आरश्यासमोर उभे केले..

“बघा मिस्टर.. काय दिसते समोर??”
मी समोर बघीतले.. “हा काय चमत्कार मला आरश्यात मी न दिसता चक्क संजु दिसत होता.. भयानाक घाबरलेला संजु!!”
इन्स्पेक्टरने माझ्या कानशीलात एक जोरदार भडकावली.. “साल्या.. तुला तर फाशीला लटकवणार मी..”

प्रहार एवढा जोरदार होता की माझी माने मागे फेकली गेली.. जेंव्हा मान सरळ करुन समोर आरश्यात पाहीले तेंव्हा संजुची जागा आता दिन्याने घेतली होती.. आरश्यात आता मला दिन्या दिसत होता…

हा काय प्रकार आहे मला काहीच कळत नव्हते. इन्स्पेक्टरने पोटात एक जोरदार लाथ घातली आणि मला लॉक-अप मध्ये कोंबले.

माझे डोके भुणभुणायला लागले होते. हा सगळा प्रकार माझ्या समजण्यापलीकडचा होता. समोरच टेबलावर तो हरामी इन्स्पेक्टर, सि.आय.डी. निशा आणि पांढरा कोट घातलेला, डॉक्टरसारखा दिसणारा एक इसम दिसत होता. मी त्यांचे बोलणे ऐकु लागलो.

तो हरामी इस्न्पेक्टर हसत म्हणत होता.. “विश्वास बसत नाही अश्या गोष्टींवर. इन्स्पेक्टर निशाला इंटरनेटवर माहीती कळाली आणि म्हणुन आम्ही तुम्हाला संपर्क केला. डॉक्टर हा काय प्रकार आहे?”

“एम.पि.डी.. अर्थात मल्टीपल पर्सनालीटी सिंन्ड्रोम असे ह्या मानसिक विकाराचे नाव आहे. ह्यामध्ये एकच मनुष्य दोन किंवा अधीक व्यक्तींचे आयुष्य जगत असतो आणि मुख्य म्हणजे तो त्या व्यक्तींमध्ये इतका गुंफला जातो की त्याला सत्यातच आपल्या भोवती त्या व्यक्ती आहेत असे वाटु लागते. मग ती व्यक्ती समवयीन असु शकते, एखादा लहान पोरगा किंवा इव्हन भिन्न लिंगी व्यक्ती सुध्दा.. ह्याच्या बाबतीत सुध्दा तस्सेच झाले. त्याच्या लेखी संजु आणि दिन्या ही भिन्न व्यक्तीमत्वाची लोक त्याच्या अवतीभोवती सत्यात होती. पण प्रत्यक्षात मात्र ह्या सर्व घटनांमध्ये एकच व्यक्ती होती. एखाद्या भितीदायक घटनेत त्याचा संजु व्हायचा तर त्याचे गुन्हेगार मन जागृत झाल्यावर दिन्या.”

“ऐकावे ते नवलच..तिन तिन माणसांच व्यक्तीमत्व एकच माणुस जगतो…कमाल.. अर्थात न्यायालयात हे सिध्द व्हायला वेळ लागेल पण अशक्य नाही. केवळ पेट्रोलपंपावरील ती क्षुल्लक घटनेचा मागोवा घेताना हे सत्य पुढे येत राहीले. त्या पोऱ्याने सांगीतलेले वर्णन.. एकच माणुस इकडे तिकडे बघत कधी दिन्या तर कधी संजुशी काही तरी बोलत होता आणि आजुबाजुला मात्र कोणीच नव्हते. त्याचवेळेस ड्राईव्ह-इन मधील घटनेची माहीती पोलीसांना मिळाली, क्लिप्स चा पुरावा मिळाला. नजदीक ठिकाण गोवा म्हणल्यावर तो गुन्हेगार तिथेच मिळणार असल्याची शक्यता पोलीसांनी उचलुन धरली आणि.. पुढे काय घडले हे वेगळे सांगायला नकोच..”

त्यांचे बोलणे खुंटले ते गाण्याच्या आवाजाने. सगळे जण आश्चर्याने माझ्याकडे बघत होते तर मी आश्चर्याने माझ्याच सेल मध्ये शेजारी अचानकपणे आलेल्या दिन्याकडे..

दिन्या गाणं गुणगुणत होता..

“वोह जो कही नही है
उसपे भी तो यकीन नही है
रहता है जो फलक फलक पै
उसका घर भी जमीन नही है
अकल का खयाल अगर वो
शकल से भी हसिंन नही है
पहले हर जगह पै था वोह..
सुना है अब वोह कहीं नही है..

.. आजा गुफा ओं मै आss.. आजा गुनाह कर ले, आजा गुनाहsss करले…!!”

मायग्रेन


दसऱ्यामुळे जोडुन आलेली सुट्टी उपभोगणे नशीबात नव्हते बहुदा. शनिवार, सुट्टीचा पहिला दिवस, सकाळी उठलो तिव्र डोके दुःखी घेउन. ही डोके दुःखी नेहमीसारखी नव्हती. एक तर डोक्याचा एकच भाग दुखत होता. आणि ते पण म्हणजे दोक्याला काही जोरदार लागलं असेल तर कसं दुखतं ना… तस्सच, कपाळाचा भाग तर अत्तीच दुखत होता. शेवटी पेन किलर घेतली आणि दुपारनंतर उतार पडला.

रविवार आणि सोमवारची सकाळ सुध्दा तस्सेच.. दुपारपर्यंत प्रचंड डोके-दुखी आणि दुपारपर्यंत उतार. शेवटी आज अशक्यच झाले म्हणुन डॉक कडे धाव घेतली.

डॉक्टरही नेहमी उशीराच येणारी गोष्ट आहे. एक एक क्षण तासासारखा काढला. सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे ‘ब्रेन ट्युमर’ वगैरे तर नसावा ना झालेला असलेही विचार डोक्यात तरळुन गेले. नेहमीची डोकेदुखी ही खचीतच नव्हती त्यामुळे डोक्यात नानाविवीध शंकांनी थैमान घातले होते.

डॉक आला.. त्याने पाहीले आणि.. डॉक्टरने पहीलाच बॉम्ब टाकला, ‘मायग्रेनची लक्षणं’ दिसत आहेत. मी डोक्यालाच हात लावला.. “अरे देवा..” लगेच दोन दिवसांचे डोस दिले आहेत त्यावरुन कळेल काय खरं आणि काय खोटं.

घरच्यांनी याचे खापर लग्गेच त्या बिच्चाऱ्या संगणकावर फोडले. ‘त्यामुळेच तुझे डोके दुखते सारखे’ हे दिवसभरात १०-१० वेळा ऐकवुन झाले.

घरी आल्या आल्या कार्यालयात मेल्स पाठवतो च्या नावाखाली संगणकावर बसलो आणि मायग्रेन बद्दल महाजालावर जरा शोधाशोध केली आणि अजुनच घाम फुटला.

बिच्चारा.. डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा आजारी पडला 🙂

दसऱ्याच्या शुभेच्छा


सर्व मराठी ब्लॉगर्सना दसऱ्याच्या शुभेच्छा.
सर्व ‘बांधवांसाठी’ एक दसऱ्याची खास चित्र-भेट. हे चित्र बघीतल्यावर तुम्ही नक्कीच म्हणाल नाही का.. ‘रावण असणं नेहमीच वाईट असते असं काही नाही.!!!’ 🙂

Being Rawan

Being Rawan

आजा गुन्हा कर ले (भाग-२)


भाग १ पासुन पुढे..

“दिन्या अरे हे काय केलेस तु?”.. समोरचे ते भयानक दृश्य बघुन माझे डोळे अजुनही विस्फारलेले होते, तर संजुची नेहमीप्रमाणे दातखीळी बसली होती.

“जास्ती बोलु नका, चला आवरा पटापट, आपल्याला निघायला हवे..” दिन्या त्याचे सामान पटापट बॅगेत भरत म्हणाला.

आम्ही एकवार सगळी रुम परत एकदा तपासली. कुठे कुणाचे काही राहीले तर नाहीना याची खातरजमा केली. दिन्याने हळुच दार उघडले आणि तो व्हरांड्यात आला. व्हरांड्यात पिवळट्ट प्रकाशात एक मंद दिवा लागलेला होता. अर्थात तो दिवा असुनही नसल्यासारखाच होता. त्याचे असुन नसणे आमच्या पथ्यावरच पडणार होते. आम्ही हळुच दिन्याच्या मागोमाग बाहेर पडलो. रात्रीची वेळ होती. कड्यावर वसलेल्या त्या मॉटेलचे पत्रे मागुन दरी-डोंगरातुन येणाऱ्या वाऱ्याने थाड्थाड उडत होते.

“मी पोलीसांना फोन करतो..” संजु पहील्यांदाच काहीतरी बोलला..
“ए फट्टु.. डोके बिके फिरेल का तुझे.. चल.. बस गाडीत..” दिन्या दरडावुन बोलला.
“नाही, मी नाही येणार तुझ्याबरोबर. तु खुनी आहेस..तुझ्याबरोबर पकडले गेलो तर नाहक पोलीस आम्हाला सुध्दा आत टाकतील.. त्यापेक्षा आत्ताच पोलीसांना फोन करुन मी खरं खरं सांगुन टाकतो..” संजु म्हणाला.
“बरं संजु. जशी तुझी इच्छा.. तो बघ त्या मॉटेलच्या मागे एक पिसीओ आहे, जा फोन करुन ये..” दिन्या म्हणाला..

संजु झपझप चालत मॉटेलच्या मागे फोनबुथ शोधायला निघुन गेला. तो दिसेनासा होताच दिन्यासुध्दा त्याच्या मागोमाग धावला. जाताना दिन्याच्या चेहऱ्यावर ते भयानक हास्य मी पाहीले होते.

थोड्यावेळाने दिन्या परत आला.

“चल..” माझ्याकडे न बघताच दिन्या गाडीत बसला..
“संजु?”, उत्तर माहीती असुनही मी एक निरर्थक प्रश्न विचारला..
“तो आपल्या बरोबर नाही येणार.. त्याला मी दुसऱ्या गाडित बसवुन दिले आहे..” असं म्हणुन दिन्याने गाडी चालु केली.

काही क्षणातच आम्ही NH4 वर गोव्याच्या दिशेने सुसाट निघालो होतो.

“संजु आक्स्ड फॉर इट..” मी स्वतःशीच विचार करत होतो.. “कश्याला उगाच दिन्याच्या विरोधात जायचे? मुर्ख कुठला! झाली दिन्याच्या हातुन एक चुक.. काय त्यात एवढे? एक फडतुस व्होअरला तर टपकवले ना! एक दुःस्वप्न म्हणुन विसरुन जायचे..!”

“काय रे, कसला विचार करतो आहेस?” दिन्याच्या आवाजाने मी भानावर आलो.. दिन्याच्या चेहऱ्यावरचे टेंन्शन कुठल्या कुठे निघुन गेले होते.. तो नहमीप्रमाणे मस्त मुड मध्ये होता.. जसे काही, काही घडलेच नाही

“काही नाही रे.. मला आपलं असं वाट्त होते.. तो पिचपिच्या डोळ्याच्या म्हाताऱ्याने तुझं वर्णन पोलीसांना दिले तर? त्याच्याशिवाय आपल्याला कोणीच पाहीले नाहीये.. तो एक पुरावा राहीला बघ..”..

दिन्याने खाड्कन हॅन्ड्ब्रेक ओढुन गाडी ड्रिफ्ट केली..”यु आर राईट.. उगाच कश्याला पुरावे सोडा.. चल जाऊ परत..”, दिन्याने गाडी परत माघारी वळवली.

एक क्षण मी उगाचच दिन्याला सांगीतले असं वाटु लागलं.. तो बिच्चारा म्हातारा.. त्याचे काय होणार हे सांगायची आवश्यकताच नव्हती. जसं जसं मॉटेल जवळ यायला लागले तसं तसे माझे छातीचे ठोके वाढु लागले. लांबुनचे काळ्या-आकाश्याच्या पार्श्वभुमीवर ‘ड्राईव्ह-इन मॉटेलचे’ दिवे दिसु लागले. दिन्याने सावकाश गाडी कडेला उभी केली. मला गाडीत बसायला सांगुन दिन्या एकटाच आतमध्ये गेला. मला फार काळ वाट बघायला लागली नाही. आपले ‘काम’ उरकुन दिन्या काही वेळातच बाहेर आला. त्याने गाडी परत चालु केली आणि आम्ही गोव्याच्या दिशेने प्रयाण केले.

*********************************

“वॉस्को..वॉस्को..वॉस्को..वॉस्को..”
“पणजीम..पणजीम..पणजीम..पणजीम..पणजीम..”

बसचालक, खाजगी वाहतुकदार, टॅक्सीवाल्याच्या आवाजाने गोव्याचा स्टेशनपरीसर गजबजला होता. काळरात्र ओसरली होती आणि सुर्याची सोनेरी किरणे गोव्याच्या निळ्याश्यार समुद्राला चमकवुन टाकत होती. कालच्या रात्रीचे आमचे ते विद्रुप मुखवटे अंधारात विरुन गेले होते आणि आम्ही गोव्यात आलेल्या असंख्य पर्यटकांपैकीच एक होऊन गेलो होतो.

दिन्याने यावेळेस एक बऱ्यापैकी हॉटेलपाशी गाडी थांबवली..
“दिन्या.. अरे लय महाग वाटतेय हॉटेल.. परवडायचे नाय..” दिन्याला म्हणालो..
दिन्या परत एकदा तस्साच भयानक हसला आणि त्याने जाकीटाच्या खिश्यातुन पैश्याची पुडकी काढुन माझ्यासमोर फेकली..
“दिन्या.. इतके पैसे?? कुठुन आणले..” मी चाचरतच विचारले..
“काल त्या म्हाताऱ्याला टपकवला ना.. त्याच्या खोलीत कॅश-पेटीची किल्ली होती.. म्हणलं इझी-कॅश… कश्याला सोडा..उचलली..” दिन्या बेफीकीरीने म्हणाला.. “शिवाय ते बघ वर काय लिहीले आहे..” दिन्याने कॅसिनोच्या ग्लो-साईनकडे बोट दाखवले..

दिन्या खऱंच स्मार्ट आहे हं.. कसं काय सुचतं त्याला हे सगळं.. म्हणुनच तो भयानक असुनही माझं आणि त्याचं जमतं.

आमची रुम मस्त होती.. शिवाय ए/सी. कॉम्लेमेंट्री म्हणुन वाईनची बॉटल सुध्दा होती. तिथल्याच एका खुर्चीत मी स्वतःला लोटुन दिले.. दिन्याने तोपर्यंत टि.व्हि. लावला. अनपेक्षितपणे “ड्राईव्ह-इन” ची बातमी न्युज चॅनल्स वर दाखवली जात होती. इतक्या लवकर ही गोष्ट मिडीया पर्यंत पोहोचेल असं वाटलं नव्हतं

ब्लर व्हिजन करुन न्युज वर त्या नग्नावस्थेतील पोरीचे आणि रुममध्ये मान मोडुन पडलेल्ल्या म्हाताऱ्या मॅनेजरच प्रेत दाखवत होते.

“कुठल्यातरी एखाद्या विकृत, मनोरुग्ण माणसाचे हे काम आहे..” पोलीस न्युज-रिपोर्टरला माहीती देत होते.. “आम्हाला खोलीत आणि मॅनेजरच्या डेस्क पाशी एका माणसाचे ठसे सापडले आहेत. इतकेच नव्हे तर ह्या मॉटेलचे मॅनेजर मोठ्ठे आंबट-शौकीन होते. आपली इच्छा भागवण्यासाठी त्यांनी मॉटलमध्ये कित्तेक ठिकाणी बेमालुमपणे क्लोज-सर्कीट कॅमेरे बसवले होते. मॉटेलवर एका-रात्रीपुरत्या येणाऱ्या जोडप्यांची लाईव्ह क्लिपींग्ज ते मोठ्ठ्या चवीने बघत असतं. अर्थात त्यामुळे आम्हाला क्ल्यु मात्र मिळाला आहे. ह्या रुम मध्ये येणाऱ्या त्या खुन्याचे क्लिप्स आम्हाला मिळाले आहेत. साधारणपणे २५-२७ वयोवर्षाच्या, ५ft.9″ च्या एका गोऱ्या तरुणाचा आम्हाला शोध आहे. ”

“एकाच माणसाचे??” मला आश्रर्य वाटले.. “पण आम्ही तर तिघं होतो.. निदान खोलीत तरी आम्हा तिघांचे ठसे सापडायला हवे होते. म्हाताऱ्याला आम्ही दिन्याच्या मागे लपलो असल्याने दिसलो नसु पण कॅमेरात पण कुणीच कसे दिसले नाही.. आश्चर्य आहे. तस्सेच संजुच्या प्रेताचं काय? ते कसं कुणाला सापडले नाही? त्याबद्दल कोणीच कसं काही बोलत नाही.. दिन्याने काय केलं असेल नक्की त्याचं?”

“खुन्याबद्दल काही सुगावे आम्हाला हाती लागले आहेत.. पण त्याबद्दल अधीक आत्ताच सांगणं योग्य ठरणार नाही..” पोलीस बोलत होता..

“अबे छोड बे.. साला.. नाही सुगावा मिळाला म्हणुन मिडीया फाडुन खाईल या मामुला म्हणुन तो आपलं फेकतोय..आपल्यासारखे दिसणारे हजार सापडतील ह्या करोडो लोकांमध्ये आपल्याला ते शोधु पण शकणार नाय..” दिन्याने नेहमीचे बेफीकीरीचे विधान केले आणि त्याने चॅनेल बदलला.

काही वेळातच दारावर ‘टकटक’ झाली. दिन्या चित्याच्या चपळाईने उठला. तो दारापाशी गेला आणि त्याने ‘कि-होल’ मधुन बाहेर कोण आहे ते पाहीले. तो मागे वळला तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच भयानक हास्य होते. हळु आवाजात त्याने मला बाथरुमकडे जायला खुण केली.

बाहेरुन..”रुम सर्व्हिस..” एक मधाळ आवाज ऐकु आला.

मी धावत दारापाशी गेलो आणि की-होल मधुन डोकावुन बाहेर पाहीले.

गडद निळ्या रंगाचा बॉडी-फिट मीडी घातलेली, एका फिक्क्ट हिरव्या रंगाच्या रिबिनेचा आपल्या पाठीपर्यंत घनदाट मोकळे सोडलेल्या केसांचा पोनी बांधलेली एक तरुणी उभी होती.

दिन्याच्या मनामध्ये काय चालले आहे हे जाणवुन माझ्या अंगावर काटा आला.

“नको दिन्या.. आत्ता नको.. इथे भर वस्तीमध्ये..कालची घटना ताजी असतानाच अजुन एक..प्लिज नको..” मी काकुळतीला येऊन म्हणालो..

“रुम सर्व्हिस…” बाहेरुन परत तोच आवाज ऐकु आला..

“च्यायला.. ही पोरगी जात का नाहीये.. मरायचे आहे का हीला..” मी मनोमन विचार केला.
दिन्याने डोळे मोठ्ठे केले आणि मला बाथरुममध्ये जायची खुण केली.

केवळ नाईलाजास्तव, जड पावलांनी मी बाथरुममध्ये गेलो आणि दार आतमधुन लावुन घेतले.

बाहेरचे दार दिन्याने उघडले होते..

[क्रमशः]

भाग क्रमांक ३ पुढे वाचा..

आजा गुन्हा कर ले (भाग-१)


“दिन्या हळु चालव रे गाडी, काय घाई आहे एवढी?”, शेवटी मी न रहावुन दिन्याला म्हणालोच. भारी डँबीस आहे दिन्या, एक नंबरचं अवलादी कार्ट. कधी, कुठे तो कसा वागेल ते फक्त दिन्याच सांगु शकतो. मला तर कधी कधी जाम भिती वाटते त्याची. त्या उलट तो गाडीत मागे बसलेला संजु. महा-भित्रट, आम्ही तर त्याला फट्टुच म्हणतो. प्रत्येक गोष्टीची त्याला भितीच असते. मी मात्र अगदी बॅलन्स्ड आहे. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करुन निर्णय घेणारा. आम्ही तिघंही अगदी वेगळा विचार करणारे तरीही एकमेकांचे घट्ट मित्र.

लागुन आलेल्या सुट्टीचे निमीत्त साधुन आम्ही गोव्याला निघालो होतो माझ्या गाडीतुन. पण दिन्या इतकी भयानक गाडी चालवत होता ना!! “आजा गुन्हा कर ले..” दिन्याचं फार आवडतं गाणं. आमच्या सारखे मित्र भेटले म्हणुन बरं, नाही तर दिन्या नक्कीच एक अट्टल गुन्हेगार झाला असता.

दिन्याने झप्पदिशी वळवुन गाडी पेट्रोल पंपावर घेतली.

“टाकी फुल्ल करो..” दिन्याने ऑर्डर दिली. बाकी काही म्हणा, दिन्या स्मार्ट आहे एकदम, स्टाईल मध्ये असतो अगदी. गॉगल, केसांना जेल, महागडी पर्रफ्युम्स. टाकी भरत आली तसे दिन्याने एकदा माझ्याकडे पाहीले. त्याच्या चेहऱ्यावर ते विकृत हास्य होते. मला फार भिती वाटते त्याच्या त्या स्माईलची. असा काही तो हसत असला म्हणजे त्याच्या मनामध्ये काहीतरी काळं-बेरं चालु आहे हे समजावे. टाकी फुल्ल झाली तश्शी त्या पोऱ्याने पंप काढला, झाकण लावले आणि पंप तो जागेवर लावायला वळला. बस्स.. तोच क्षण, दिन्याने गाडीची किल्ली फिरवुन गाडी चालु केली आणि काही क्षणातच आम्ही परत हाय-वे वर होतो..

“दिन्या अरे पेट्रोलचे पैसे.. दिलेच नाहीस तु..” मी म्हणालो..
“अबे छोड बे.. काय त्यात एवढे.. काय करणार आहेत ते? गाडीचा नंबर सुध्दा दिसला नसेल त्या शेंबड्या पोराला.. वाचले ना पैसे आपले.. रात्री मोठ्ठा खंबा मागवु ..” दिन्याने परत गाडीला वेग दिला.

संजु बिच्चारा मागे घाबरुन बसला होता. मला ना, कधी कधी त्याची फार किव येते. माणसाने इतके पण भित्र असु नये.

बऱ्याच वेळ गाडी चालवुन दिन्या आता कंटाळला होता. सुर्य मावळतीला झुकला तशी दिन्याची नजर रहाण्यासाठी ठिकाण शोधु लागली. हाय-वे वरच एक बऱ्यापैकी कळकट, मंद दिवे लागलेले ‘मॉटेल’ बघुन दिन्याने गाडी कडेला घेतली.

“तुम्ही दोघं, माझ्या मागुन या..” असं म्हणुन दिन्या आतमध्ये घुसला.

आतमध्ये एका मोडक्या टेबलावर पेन्सीलीच थोटुक घेउन एक म्हातारं काहीतरी खुरडत बसलं होतं.

“१ रुम प्लिज..” दिन्या त्याच्या खर्जातल्या आवाजात म्हणाला..
त्या म्हाताऱ्याने कष्टाने वर बघीतले.
“किती जणांसाठी?” म्हाताऱ्याचा अशक्त आवाज कसा बसा आमच्या कानांपर्यंत पोहोचला.
“एक..” दिन्या म्हणाला आणि त्याने आमच्याकडे बघुन डोळे मिचकावले.
“७०० रु..” म्हाताऱ्याने काही नं बोलता रुमची किल्ली दिन्याच्या हातात दिली.

“काय हे दिन्या.. त्या म्हाताऱ्याला सुध्दा बनवलेस..? त्याला कळले तर आपण एक नाही तिघं आहोत.. थोडे दिले असतेस जास्ती पैसे तर??” मी म्हणालो.
“छोड बे..त्या म्हाताऱ्याला कुठलं दिसतंय, आणि सकाळी सुर्य उगवायच्या आधीच आपण कल्टी मारु ना..” दिन्या म्हणाला.

म्हाताऱ्याला आम्ही दिसणार नाही याची काळजी घेत मी आणि संजु दिन्याच्या मागोमाग रुममध्ये घुसलो.

फ्रेश झाल्यावर दिन्या म्हणाला इथेच थांबा मी आलोच दोन मिनीटांत.

बाहेरुन गाडीचा आवाज आला. “आता दिन्या कुठे गेला इतक्या रात्रीचा?”, त्याचं ना खरंच काहीच कळत नाही.

मी आणि संजु टी.व्हि. लावुन बघत बसलो.

साधारणं तासाभराने गाडीचा आवाज आला.. ‘दिन्या आला वाटतं परतं!!’ मी स्वतःशीच पुटपुटलो.

थाडकन खोलीचं दार लाथेने उघडत दिन्या आत आला. हातामध्ये मोठ्ठी दारुची बॉटलं.. ज्याला दिन्या खंबा म्हणतो ती अर्धी संपलेल्या अवस्थेत होती. दिन्या लटपटत आत आला आणि त्याच्या मागोमाग एक तोडके कपडे घातलेली एक टंच पोरंगी पण आत आली. दिन्यासारखीच ती पण हेलपांडत होती.

दिन्याने दार लावुन घेतले आणि त्या पोरीला जवळ ओढुन तिचे एक दीर्घ चुंबन घेतले.

“शी..काय हे.. आमच्या समोर??”
म्हणजे ती पोरगी तशी अंगापिंडाने भरलेली होती.. पण म्हणुन कुणाबरोबरही. दिन्याने आमचा टि.व्ही बंद केला, दिवे मालवले आणि डोळ्यानेच आम्हाला तिकडे कोपऱ्यात झोपायची खुण केली.

चंद्राच्या अर्धवट प्रकाशात आणि आवाजांवरुन दिन्याने आणि त्या मुलीने एकमेकांची वस्त्र काढली आहेत याचा आम्हाला अंदाज आला होता. दिन्याने तिला बेड मध्ये ओढले.

मी आणि संजु डोळे आणी कान बंद करुन कोपऱ्यात झोपुन गेलो.

रात्री कोणीतरी मला गदागदा हलवत होते… “अबे.. उठ ना.. लोचा झालाय.. चल आपल्याला सटकायला पाहीजे इथुन..उठा साल्यांनो..”

मोठ्या कष्टाने मी डोळे उघडुन बघीतले.. समोर दिन्या उभा होता.. पहिल्यांदा त्याच्या चेहऱ्यावर मी भितीची एक छटा पाहीली.

“काय झालं..? इतक्या रात्री कुठे जायचे? आणि ती पोरगी कुठे आहे?”.. मी प्रश्नावर प्रश्न विचारत होतो. एव्हाना संजु पण उठुन बसला होता.

दिन्याने तोंडावर बोटं ठेवुन गप्प रहायची खुण केली. हळुच त्याने खोलीतला बारीक दिवा लावला आणि आम्हाला त्या बेडकडे पहायची खुण केली.

आम्ही आमच्या नजरा बेडकडे वळवल्या.

समोरच्या त्या बेडवर नग्नावस्थेत ती मुलगी पडली होती आणि तिच्या छातीमध्ये दिन्याचा तो लाडका ७” चाकु खुपसलेल्या अवस्थेत होता…

[क्रमशः]

पुढचा भाग>>

झुकी झुकी नजर


सकाळी कार्यालयात येत असताना गाडीत कुठल्याश्या रेडीओ चॅनलवर ‘झुकी झुकी सी नजर’ गाणे लागले आणि क्षणात मन भुतकाळात गेले.

जे मला कमी ओळखतात त्यांच्या दृष्टीने मी तसा ‘लाजाळु’ आहे. पण खरं सांगायचं तर मी ‘लाजाळु’ कमी आणि ‘खालं मुंडी पाताळं धुंडी’ अधीक आहे. म्हणजे कसं असतं ना, आपले डोळे फार बोलके असतात, मनातले विचार पटकन उघड करतात, त्यामुळे मी ना, अश्यावेळी खाली बघुनच बोलतो.

तर, खुप मागे एकदा आम्हा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप वर्षासहलीनिमीत्त गाड्यांवरुन भटकायला बाहेर पडला होता. ग्रुप मध्ये ‘प्रिती’ नावाची एक गोड मुलगी होती.. कुणालाही आवडेल अश्शीच.. अगदी ‘गर्ल नेक्स्ट डोअर’, आणि दुर्दैव म्हणजे माझ्याच मित्राची गर्ल-फ्रेंड होती. त्यामुळे ‘भाभी मां..’ नाही का. ती दिसायला जितकी गोड होती, तितकाच तिचा आवाज. गाणी गुणगुणत असली म्हणजे ऐकतच रहावं.

वाटेत एका ठिकाणी आम्ही सर्व जण थांबलो होतो. सगळे जण तिला ‘प्रिती गाणं म्हण ना एखादं’ म्हणत होते आणि ती म्हणाली.. ‘ओके.. पण हे गाणं.. अनिकेत साठी..’
पावसाळ्याचे दिवस होते.. हवेत गारठा होता आणि तिच्या त्या वाक्याने.. एखादं अतीथंडगार मोराचे पिसं अंगावरून फिरल्यासारखे झाले बघा.

त्यावेळेस तिने..’झुकी झुकी सी नजर..’ हे गाणं म्हणलं होतं. त्याला ८ एक वर्ष झाली. पण ते गाणे.. ते क्षणं.. तो थंडगार अनुभव आज परत एकदा ताजा झाला.

गर्ल-फ्रेंड आपली असतीच हो. पण दुसऱ्याच्या गर्ल-फ्रेंड ने तुमच्यासाठी म्हणलेले गाणं म्हणजे.. अहम्म..अहम्म् .. खासंच.. नाही का?

व्हेईकल फ्रि डे


गोष्ट अगदी काल-परवाचीच. संध्याकाळची ७.३० ची वेळ. स्वाईन-फ्ल्यु ने बाजार-पेठा ओस पडल्याच्या घटना इतिहास जमा झाल्या. रस्ते रहदारीने तुडुंब भरुन वाहात होते. नळस्टॉप चौकामध्ये गाडीमध्ये बसुन होतो. सिग्नलवर सिग्नल लागत होते परंतु पुढे जायला रस्ताच मिळत नव्हता. असंख्य बेशिस्त वाहन चालक सिग्नल मोडुन, रहदारीचे नियम मोडुन वाट्टेल तसे घुसायचा प्रयत्न करत होते इतक्यात जोरात सायरनचा आवाज येउ लागला. मागे वळुन बघीतले काही अंतरावर एक रुग्णवाहीका आपला निळा दिवा, सायरन लावुन पुढे जायच्या प्रयत्नात होती परंतु वाहतुक इतकी जाम झाली होती की पुढील वाहनांना रस्ता द्यायची इच्छा असुनही शक्य होत नव्हते. सिग्नल यंत्रणा / वाहतुक पोलीस यंत्रणा सगळे काही हतबल होते. सायरनचा तो आवाज ह्रुदयाचे ठोके वाढवत होता. रुग्णवाहीकेतील तो रुग्ण यातनांनी तळपळत असेल, त्याच्या बरोबरचे नातेवाईकांना एक-एक क्षण तासाएवढा वाटत असेल. त्यांना वेळेवर उपचाराची आवश्यकता होती. परंतु सर्व काही गोठुन गेले होते. शेवटी बऱ्याच वेळानंतर त्या रुग्णवाहीकेला अथक प्रयत्नांनंतर जागा मिळाली.

पुण्यामध्ये काही दिवसांपुर्वीच संपलेल्या गणेशोत्स्वात एका अश्याच रुग्णाला आपला जिव गमवावा लागला. विसर्जन मिरवणुकीमुळे रुग्णवाहीका रुग्णापर्यंत पोहोचुच शकली नाही आणि त्या रुग्णाने आपल्या नातेवाईकांसमोर प्राण सोडला.

माझा भारत महान, माझा भारत प्रगतीशील, विकसनशील असे आपण नेहमी म्हणतो, ऐकतो पण अश्या अनेक गोष्टी आहेत ज्यांच्यामधे सुधार येणे आवश्यक आहे. परदेशांचे अनेक गोष्टींत आपण अनुकरण करतो. मग या गोष्टींत का नाही? संकटकाळी काय करावयाचे याचे मार्गदर्शन आपल्याला मिळते का? परदेशांत रुग्णवाहीका, आगीचे बंब यांना कधीही कुठेही पोहोचण्यासाठी अडथळा आल्याचे ऐकीवात नाही. एखाद्या दुर्गम ठिकाणिसुध्दा हेलिकॉप्टर सारख्या साधनांनी पोहोचता येते. अर्थात मुद्दा तो नाही. मुद्दा हा आहे की आपली वाहतुक व्यवस्था पुर्णपणे कोलमडली आहे. अफाट वाढलेल्या वाहनांना पुरतील इतके मोठ्ठे रस्तेच नाहीत. फेरीवाले, दुकानवाले यांना भरपुर जागा आहेत, पण चालण्यासाठी पुरेसे पदपथ नाहीत, वाहने लावण्यासाठी पुरेश्या सुविधा नाहीत.

हे सर्व मांडण्याचा मुद्दा म्हणजे आज २२ सप्टेंबर,’व्हेईकल फ्रि डे’. ह्या दिवशी शक्य असल्यास खाजगी वाहनं न वापरता सायकल किंवा पर्यायी वाहन जसे बस, रिक्षा यांचा वापर करावा जेणेकरुन वाहतुकीवरील आणी पर्यायाने प्रदुषणावरील ताण कमी होईल. परंतु असा काही ‘डे’ आहे याची कित्ती लोकांना कल्पना होती. ‘व्हॅलेंटान्स डे’, ‘फ्रेंडशीप डे’ असे अनेक ‘डे’ ची पुर्वतयारी आपण कित्तेक आठवडे आधीपासुन चालु करतो. मग ह्या ‘डे’ ची का नाही? फक्त एका दिवसासाठी ‘चालत जाणे’, ‘सायकल वापरणे’ किंवा ‘पर्यायी वाहतुकीचा वापर करणे’ एवढे अवघड आहे का?

सरकारने आपलाच पैसा खर्च करुन बांधलेले पदपथ, सायकल मार्ग विक्रेत्यांचे, गर्दीतुन पुढे घुसण्यासाठी दुचाकी वाहनचालकांचे आश्रयस्थान बनले आहे. “We loose what we don’t use” ह्या उक्तीप्रमाणे कदाचीत ह्याचा उपयोगच होत नसेल तर कश्याला बांधायचे म्हणुन सरकारने सोडुन दिले तर? त्यापेक्षा आपण जेंव्हा जेंव्हा चालत जातो तेंव्हा सक्तीने पदपथाचाच वापर करुयात. शक्य असेल तेंव्हा, जवळच जायचे असेल तेंव्हा सायकलला आपला जवळचा मित्र बनवुयात. जिथे सायकल-मार्ग उपलब्ध आहेत तिथे कटाक्षाने सायकल-मार्गाचाच वापर करु यात जेणेकरुन दुचाकीचालकांना तो आपलाच रस्ता वाटणार नाही. अगदी छोटीश्शी गोष्ट, पण त्याने अनेक गोष्टीसाध्य होतील यात काडी मात्र शंका नाही.

कोळ्याचं जाळं


मला ना, कोळ्याचं आणि त्याने विणलेल्या जाळ्याचं नेहमीच कौतुक आणि आश्चर्य वाटत आलं आहे. म्हणजे बघा नं, इतकं सुंदर असतं ते जाळं, दिसताना इतकं नाजुक दिसतं पण तरीही तितकेच मजबुत. एकदा का एखादं भक्ष्य त्यात अडकलं की मग सुटनं मुश्कील. पण असं असुनही तो कोळी मात्र त्यात कध्धीच अडकत नाही. विणत असतानाही आणि विणुन झाल्यावरही.

आपल्या माणसांच मात्र अगद्दी उलटं असतं. जन्मल्यापासुनच माणुस एक-एक नाती जोडत असतो. जन्मल्याक्षणापासुनच तो कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ/बहीण, कुणाचा नातु तर कुणाचा कोण असतो. ह्या नात्यांच्या बंधनामध्ये तो इतका अडकुन जातो की कित्ती वेळा इच्छा असुनही तो नंतर त्यातुन बाहेर पडु शकत नाही. हिच नाती कधी त्याच्या प्रगतीच्या आड तर कधी जिवनाच्या आड येतात. या नात्यांमध्ये तो एतका गुरफटलेला असतो की जिवनाचे त्रिकालाबाधीत सत्य ‘मृत्यु’ ह्याची ही तो नको तितकी भिती बाळगतो, त्यापासुन दुर पळायला बघतो. या नात्यांपायीच कित्तेक दुखांचा धनी होतो. ही नातीही कोळ्याच्या जाळ्याइतकी मजबुत नसतात. ताणली तर लगेच तुटतात.. पण जेंव्हा एखादे नाते तुटते तेंव्हा असंख्य वेदनांचे व्रण आणि घाव ते माणसाच्या मनावर उमटवते.

खरंच कोळ्यासारखे रहाता आले तर? आपल्याच जाळ्यात आपण न अडकता?.. अलिप्तपणे जिवन जगता आले तर?

आनंदी आनंद गडे


आनंदी आनंद गडे
निवडणुक वारे चोहीकडे
वरती खालती इच्छुक फिरे
श्रेष्ठीकडुनही संकेत मिळे ॥१॥

कार्यकर्ते फिरती चोहीकडे
मतांची ती भिक मागण्या पडे
चौकाचौकात पोस्टर चढे
पैश्याची ही खिरापत वाढे ॥२॥

महागाईलाही जोर चढे
स्वाईन फ्ल्युही मदतीला पुढे
उत्साह वाढे चोहीकडे
कित्ती पक्ष हे म्हणु गडे ॥३॥

पण एकच चिंता वाटते गडे
स्वपक्ष ही पाय ओढण्या पुढे
विनंती एकच ही प्रभुकडे
लॉटरी लागो मला गडे ॥४॥

– सुधाकर समुद्र

चिनी ‘कम’ला


आता चिनीही भारताच्या सीमेमध्ये ‘कम’ला. आत्तापर्यंत पाकिस्तानकडुन घुसखोरी चालु होती ते कमी की काय म्हणुन चिनचे सैन्यसुध्दा घुसखोरी करु लागले आहेत. काही दिवसांपुर्वीच चिनचे हेलीकॉप्टर्सने हवाई हद्दीचा भंग करुन ‘लेह-लडाख’ प्रांतात अन्नाची पाकीटं टाकली. हे कमी म्हणुन की काय, नुकतेच भारताच्या सिमेमध्ये घुसुन लेह-लडाख प्रांतातील काही दगड त्यांनी लाल रंगांनी रंगवुन टाकल्याचेही समोर आले आहे.

आधी ‘हिंदी चिनी भाय-भाय’, मग ‘चायनीज फुड’ चे वाढत असलेले भारतातील प्रस्थ, त्यानंतर चिनी खेळण्यांचा बाजारात वाढलेला सुळसुळाट आणी आता हा प्रकार.

अर्थात यात आपले राजकारणी काय करणार? ते बिच्चारे निवडणुक तोंडावर आल्याने कामात मग्न, कुणाशी गटबंधन करायचे आणि कुणाशी युती तोडायची ह्याच्या गहन विचारात मग्न, ते तरी कुठे कुठे लक्ष घालणार? ‘नुसताच रंग दिला आहे ना? ठिक आहे ना मगं? अजुन द्या म्हणाव रंग, आमच्या परराष्ट्र मंत्रालयाची इमारत तशीही बेरंग झाली आहे, पावसाळ्यानंतर रंग द्यायला काढायची होती.. त्यालाच देऊन टाका ना रंग.. म्हणजे त्याचे पैसे लाटायला आम्ही मोकळे..’

अर्थात विदेश-मंत्रालयाने ह्या घटनेला गंभीरतेने घेतले आहे आणि चिन सरकारकडे याचा जाहीर तिव्र निषेध नोंदवला आहे हे सांगणे नं लागे..