फोटो: ‘अजंठा केव्हज’


अजंठा केव्हज चे काही निवडक फोटो इथे जोडत आहे. प्रत्येक लेणींबद्दलची अधीक माहीती, त्यांचा इतिहास इथे वाचता येईल.

पुण्यातील ‘सायकल ट्रॅक्स’


काही दिवसांपुर्वीच पुण्यातील रस्त्यावर एका १५ वर्षीय सायकल स्वाराला बसने ठोकरल्याने गंभीर अपघात झाला आणि पुण्यात ‘बनवलेल्या’ सायकल ट्रॅक्स चा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अपघातग्रस्त भागाचा अधीक तपास केल्यावर असे लक्षात आले की त्या मुलाने सायकल चालवताना जर सायकल ट्रॅक्सचा वापर केला असता, तर कदाचीत हा अपघात टळु शकला असता.

काही दिवसांपुर्वी माहीतीच्या आधीकाराखाली मागवलेल्या माहीतीत असा उल्लेख आला होता की डेक्कन ते कोथरूडपर्यंत (साधारण पणे ६ कि.मी.) सायकल ट्रॅक बनवलेला आहे. वाचताच मला धक्काच बसला? माझा नेहमीचा रस्ता आणि मलाच माहीत नाही. म्हणुन मग आवर्जुन शोधाशोध केली तेंव्हा रस्त्याच्या कडेला काही तुरळक पाट्या दिसल्या ज्या त्या रस्त्याला ‘सायकल ट्रॅक्स’ असे संबोधीत होत्या.

ह्या ट्रॅक्स वर काही ठिकाणी वेडी वाकडी वाढलेली मोठ्ठाली झाडं आहेत. म्हणजे काही ठिकाणी तर अक्षरशः एखाद्याला सायकलवरुन खाली उतरुन वाकुन पुढे जावे लागेल. अनेक सायकल ट्रॅक्स वर भाजीवाले, फेरीवाले, दुकानाचे बोर्ड्स, पंचरच्या दुकानाचे टायर्स सर्रास पडलेले दिसतात. अनेक ठिकाणी लोकं गप्पा मारत मध्येच उभे असतात. शेवटी एका ठिकाणी मी मुद्दामहुन सायकलची घंटा वाजवुन निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या पदरी थट्टाच पडली 😦

ज्या रस्त्यावर अपघात झाला तो कर्वे रस्ता ‘जवाहरला नेहरु नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन’ योजनेखाली येतो ज्या योगे अश्या रस्त्यांवर ‘सायकल ट्रॅक्स’ असणे आवश्यक आहे. परदेशवारी करुन आल्यावर तिथल्या योजना इथे राबवायच्या म्हणुन अनेक ठिकाणी पुण्यात सायकल ट्रॅक्स बनवले गेले आहेत. काही खरोखरच उत्कृष्ठ आहेतही, पण केवळ हातावर मोजण्यासारखेच. बाकीच्या ठिकाणी अर्धवट बांधकाम झालेले, उखडलेले, वाट्टेल तसे बांधलेले ट्रॅक्सच जास्त आहेत.

जोपर्यंत हे ट्रॅक्स वापरण्यायोग्य होत नाहीत, त्यावरील अतिक्रमणं दुर होतं नाहीत तो पर्यंत त्याचा वापर होणे कठीण. सायकल चालकांवरही त्यानंतर रस्ता वापरल्यास कारवाई होणे गरजेचे आहे. नुसतेच सायकल वापरा, पर्यावरण वाचवा, प्रदुषण टाळा, वाहतुकीवरील बोज खाजगी वाहनं कमी वापरुन कमी करा म्हणुन होणार नाही तर त्यासाठी योग्य पर्यायी मार्गाची पुर्तता होणे हे सुध्दा तितकेच गरजेचे आहे.

दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी


“एsss चला उठा लवकर, ५.३० वाजुन गेले..”
“काय कटकट आहे! सुट्टीच्या दिवशी सुध्दा झोपुन देत नाहीत”
“उठा आणि आंघोळी उरकुन घ्या.. आज नरकचतुर्दशी आहे, सुर्य उगवायच्या आत आंघोळ नाही केली तर नरकात जाल..”

ही नरकाची भिती फार असते बाबा नरकचतुर्दशीला..

दिवाळीची पहाट, कोणी तरी अतीउत्साही आधीच आंघोळ उरकुन खाली “मीच पहिला” दाखवण्यासाठी दणादण ऍटंबॉंब फोडत असतो. आजची थंडी नेहमीपेक्षा जास्तच असते. तेल लावण्यासाठी कपडे उतरवायला सुध्दा नक्को वाटते अगदी.

कढत पाणी आज जास्तच कढत भासत असते.. आंघोळीचा पहिला तांब्या अंगाअंगावर रोमांच उठवुन जातो. बादलीत टाकलेले अत्तराचे थेंब, उटण्याचा सुवास, मोती साबणाचा सुगंध मन सुवासीत करत असते.

मध्येच कुडकुडत औक्षण उरकते, एखादी फुलबाजी उडवली जाते.. पण लक्ष लागलेले असते पुढचा गरम पाण्याचा तांब्या घेण्याकडे. सोपस्कार पार पडले की ‘आवरा औघोळी..’ ऐकु येईपर्यंत मस्त गरम पाण्याची आंघोळ चालु रहाते.

दिवाळीसाठी आणलेले कपडे तसेच बॉक्स मध्ये कपाटात पडुन असतात. त्याची लेबल्स, टाचण्या, शर्टला लावलेली कॉलर काढण्यापासुनची कार्य पार पडल्यावर तो अंगात चढवला जातो. आवरुन होत नाही तो पर्यंत फटफटायला लागलेले असते. लग्गेच फटाक्यांची पिशवी, उदबत्ती घेउन घोळक्यात ‘हॅप्पी दिवाली’ पासुन ते ‘पहील फटाका कुणाचा’ चर्चा सुरु होतात.

तेवढ्यात कोणीतरी ओरडते..’ए सुतळी लावलाय..’ हात आपसुकच कानावर जातात. धाड आवाज होऊन बॉम्ब फुटुन जातो.

कुणाचा सुतळी, कुणाचा चौकोनी, कुणाची लक्ष्मी तर कुणाचा बुलेट बॉंम्ब धडाका चालुच असतो. रस्ता कचऱ्याने भरुन वहात असतो. हात फटाक्याच्या दारुने माखलेले असतात..

मग पोटातली भुक जागी होते, एक एक करत सगळे पांगतात घरातला फराळ उरकायला. पोटभर चकल्या, करंज्या, लाडु, चिवडा आणि इतर पदार्थ दामटल्यावर आरश्यात एक नजर टाकुन परत घोळका जमु लागतो, कोपऱ्यावरील गणपतीच्या देवळातल्या ‘देवी’ दर्शनासाठी..

हम्म.. दिवाळी आली तर, प्रकाशाचे, आनंदाचे, मांगल्याचे, चैतन्याचे प्रतिक घेउन.

ही दिपावली तुम्हा सर्वांना आनंदाची, सुखाची, भरभराटीची जावो ही शुभेच्छा

माश्यांचे हळदी-कुंकु आणि पक्षांना खाऊ


दिवाळीच्या शाळांना सुट्या लागुन काही दिवस सुध्दा नाही झाले की पोरांचे घरात उद्योग सुरु झाले. गेल्या दोन दिवसांतील दोन उद्योग ऐका –

 • घरात असणाऱ्या फिश-टॅक मधील माश्यांचे परवा जोरदार हळदी कुंकु झाले. त्याचे झाले असे की मंडई मधुन हळदी-कुंकु च्या पुड्या आणल्या होत्या. आवरु नंतर म्हणुन तश्याच कडेला ठेवल्या होत्या. दुपारी बराच वेळ झाला तरी पोराचा काही आवाज नाही, आश्चर्य वाटले म्हणलं एवढी शांतता आहे, बघावं काय चालु आहे म्हणुन मागच्या खोलीत गेलो तर सगळे हळदी-कुंकु फिश-टॅक मध्ये ओतले होते आणि हातातल्या काठीने ते पाणी पोरगा ढवळत होता. सगळे पाणी रंगीत झाले होते. मासे हळदी-कुंकुवाने माखले होते.

  नशीब एखादा गचकला नाही, हो ना.. एवढे महागाचे ते शार्कस बिच्चारे वाचले, त्यांचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती.

 • पुन्हा एकदा अशीच दुपारची भयाण शांतता. पोरगा बऱ्याच वेळ शांत आहे म्हणल्यावर काहीतरी उद्योग सुरु आहेत हे समजुन जावे. लगेच खोलीत धाव घेतली आणि जे पाहीले ते डोक्यावर हात मारण्यासारखेच होते.

  खिडकीत तुर-डाळ धुवुन वाळत टाकली होती. आमच्या समोरच्या झाडावर भरपुर पोपट असतात. अगदी एका वेळेस कमीत-कमी १५-२० तरी नक्कीच असतात. आमचे दिव्य रत्न त्या पक्षांना मुठ-मुठ भरुन डाळ खायला म्हणुन फेकत होते. साधारण एक किलो डाळ खिडकीतुन खाली फेकण्यात आली होती.

  थांबवले तर परत आम्हालाच चिडुन म्हणतोय, ‘अरे त्या पक्षांना खाऊ देत होतो ना.. ते बिच्चारे काय खाणार मग??’

 • फक्त दोन दिवसांच्या सुट्टी मध्येच असले उद्योग, पुर्ण दिवाळीची सुट्टी संपेपर्यंत असे काय काय उद्योग होणार आहेत हे त्या परमेश्वरालाच ठाऊक..

  ॥ ओम नमः शिवायः ॥

ओजसचे फोटो


दुपारचा फावला वेळ असला की पोराचे फोटो काढायचा चान्स मी सोडत नाही आणि जेंव्हा पोरगा स्वतःहुनच म्हणतो, “बाबा फोटो काढा नं..” मग तर काय, विचारायलाच नको. स्वारी मुड मध्ये असली की मस्त पोज देते नाही तर इतर वेळेस फार भाव खातो.

असेच आज काढलेले फोटोंपैकी काही निवडक इथे जोडत आहे..

मेहंदीच्या पानावर (भाग-३)


भाग २ पासुन पुढे

१५ फेब्रुवारी

रात्रभर अखंड वाहीलेल्या आश्रुंनी भिजलेली उशी सकाळी गार पडली होती. सकाळी अंथरूणातुन उठायचाच कंटाळा आला होता.. उशी उराशी कवटाळुन खुप वेळ लोळत पडले. पण शेवटी मी थांबल्याने क्षण थोडे नं थांबणार होते? पटापट आवरुन खाली आले. पार्कींग मध्ये उभ्या असलेल्या MH-01 नंबराच्या आलीशान गाडीने माझे लक्ष वेधुन घेतले. महाराष्ट्राची गाडी? इकडे?? उत्सुकतेने रजिस्टर चाळला आणि आश्चर्याचा धक्काच जणु बसायचा बाकी होता. ‘राज’ च्या नावावर दोन रुम्स बुक्ड पाहुन मी थक्कच झाले. शेरसिंगला विचारले तसे त्याने बाहेर गार्डनमध्ये बसलेल्या एका इसमाकडे बोट दाखवले. मी थोडी धावतचं.. थोडी भरभर चालत बाहेर पोहोचले आणि राजला तिथे बघुन अक्षरशः थिजुन गेले.

आयुष्य काय खेळ खेळत होते माझ्याबरोबर? ज्याला विसरण्यासाठी मी इतक्या दुर निघुन आले तोच पुन्हा माझ्या आयुष्यात डोकावला होता. याला काय म्हणायचे? निव्वळ योगायोग?, एक आयुष्याने केलेली एक क्रुर थट्टा? की आयुष्यात येणाऱ्या एका सुखद सुखाची चाहुल?

काहीही असो, मला त्याच्या समोर जाणं भाग होतं आणि मी गेले. मला पाहुन तो चकीतच झाला. मस्त हसला मला बघीतल्यावर. कालच रात्री आला. तो आणि ‘निधी मेहता’ दोघं निघाले होते काश्मीरला, पण तिकडे काहीतरी भानगड झाली म्हणुन दिल्लीपासुनच रस्ता बदलला आणि इकडे आले. असो.. मनातल्या मनात एका विचाराने मी खुप खुश होते.. ‘राज’ ने दोन रुम्स घेतल्या होत्या.. वेगवेगळ्या त्याच्यासाठी आणि निधीसाठी.

का कुणास ठाऊक, पण त्याने माझी आणि निधीची ओळख करुन दिली नाही. निधी दिसायला तशी छानच आहे.. हो माझ्यापेक्षाही छान, राजला शोभुन दिसते.. पण स्वभावाने मात्र आज्जीब्बात आवडत नाही मला ती..

राजशी बोलावेसे खुप वाटत होते, पण काय आणि कसं बोलणार? कोणं म्हणुन बोलणार?

संध्याकाळी दिसले होते दोघं..बाहेर जाताना.. निधीचे अगदी राजचा हात हातात धरुन, खांद्यावर डोके ठेवुन चालणं..लाडे-लाडे बोलणं फारचं वाटलं मला… वाटलं जाऊन सांगावं तिला.. ‘ए बये..जरा लांबुन, नवरा नाही झाला तुझा तो अजुन’. पण..

रात्री परतायला पण खुप उशीर झाला असावा त्यांना. मी खुप वेळ वाट बघत थांबले होते. पार्किंग मध्ये कुठल्याही गाडीचा आवाज आला तरी धावत जाऊन खिडकीतुन खाली बघत होते.. उगाचच.. खुर्चीत बसल्या बसल्याच कधीतरी डोळा लागला रात्री

 

१६ फेब्रुवारी
मनं आनंदी असलं की सारंच कसं छान वाटतं नाही? पांघरूणावर उतरलेली सोनेरी किरणं, निळं आकाश, लाल-पिवळ्या फुलांवर चमकणारे दवबिंदुंचे थेंब. सकाळ एकदम प्रसन्न होती. आज खुप दिवसांनी स्वतःला निट आवरावेसे वाटत होते.. आज खुप दिवसांनी स्वतःलाच आरश्यात परत परत पहायची इच्छा होत होती. कित्ती दिवस झाले होते, मी स्वतःला निट्सं आरश्यात पाहीलचं नव्हतं. एकदा विचार आला मनात विचारावं आरश्याला, ‘आरश्या आरश्या सांग, सर्वात सुंदर कोणं?’ पण मग उगाचच वाटलं.. आरसा ‘निधी मेहता’ म्हणाला तर!!!

टुरिस्ट सिझन जवळ येत चालला आहे आणि बाजारात सहजच एक फेरफटका मारला तर त्याची जागोजागी प्रचीती येऊ लागते.

मनं नको असतानाही राजचाच विचार करत असते. कामात असुनही त्याची चाहुल लागते का हे पहाण्यासाठी मनाचा एक कोपरा सतत मग्न असतो हे आता माझ्या लक्षात येऊ लागले आहे.

 

१७ फेब्रुवारी
आजची सकाळ माझ्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली. सकाळी राज ऑफीस मध्ये आला होता. म्हणाला, एक रुम ‘चेक-आऊट’ करायची आहे. म्हणलं का? तर डोळे मिचकावत म्हणाला..’निधी माझ्या रुम मध्ये शिफ्ट करत आहे’. इतके डोक सटकलं होतं ना, ती असती समोर तर कदाचीत काहीतरी नक्कीच बोलुन गेले असते, पण मग तोच म्हणाला, निधीचे २-३ गाणी रेकॉर्डींगच्या डेट्स प्रि-पोन झाल्या आहेत, तिला जावं लागते आहे. मी मात्र आहे अजुन ७-८ दिवस इथेच. इतका आनंद झाला होता ना. वाटलं उठावं आणि त्याला कडकडुन मिठी मारावी. पण तो इतक्या जवळ असुनही खुप दुर होता.

आय ट्राईड माय बेस्ट टु स्टे ए़क्स्प्रेशनलेस, पण मला माहीत आहे, माझ्या चेहऱयाने मला नक्कीच धोका दिला असणार.

गोपाळकाकांनी आज गार्डन मध्ये छान दिव्यांच्या माळा लावल्या आणि मध्ये एक छोटासा खड्डा खणुन काही लाकडं रचुन ठेवली, संध्याकाळच्या गुलाबी थंडीत शेकोटी पेटवण्यासाठी. त्याचा वापर मीच लग्गेच सुरु केला. संध्याकाळी त्या गरम-उबदार शेकोटीने बोचरी थंडी कमी केली होती. मी शेजारीच खुर्ची टाकुन बसले होते आणि अनपेक्षीतपणे राज माझ्याइथेच येउन बसला.

‘हाय..’
‘हॅल्लो..’
….
‘अचानक इकडे कशी? रेकॉर्डींग सोडुन दिलेस की काय?’
‘बस्स.. अस्सच.. काही तरी बदल’
‘हो.. पण कुणालाही नं सांगता अचानक निघुन आलीस..’
‘:-)’
‘निधी पोहोचली?’
‘हो.. मगाश्शीच फोन येऊन गेला..’
……………..
‘बदललीस तु खुप..’
‘मी?’ (ह्याला काय माहीत मी आधी कशी होते?)
‘टेंन्शन घेतेस का कश्याचे खुप?’
‘नाही रे.. काही काय?.. आय एम कुssssल, पण तुला का असं वाटलं मी बदलले..’
‘सहजच.. वजन कमी केलेस की काय?’
‘झालं.. थोडा फरक पडतोच ना..हवेचा..’
‘हम्म.. पण आता अजुन नको कमी होऊ देउस,, आहे ते छान आहे..’
‘:-)’ (मला ना.. खरं तर काय बोलायचं तेच सुचत नव्हते. मुर्खासारखे उगाच हातातल्या पुस्तकात डोकं खुपसत होते.. पण त्याने खुप बोलावं आणि आपण ऐकत रहावं अस्सं वाटत होतं)
‘केस पण काही तरी बदललेस तु!..’
‘हो.. थोडे स्ट्रेट केलेत..’ (त्याचे निरीक्षण ऐकुन मन खुप सुखावत होतं.)
……………………………………..
‘बिझी?’ (बहुतेक माझ्या पुस्तक वाचण्याला कंटाळुन म्हणाला)
‘नाही.. मी आपलं अस्संच..’ मी ओशाळुनच म्हणाले..
‘ग्रेट.. चल मला सिमला दाखव. इतके महीने इथे राहीलीस.. चल उठ..’ मला हाताला धरुन उठवत तो म्हणाला..तो स्पर्श.. एक क्षणाचा..अंगावर हजारो रोमांच उमटवुन गेला. त्याच्या त्या मजबुत हातांच्या पकडीत मी एखाद्या बाहुलीसारखी उचलले गेले.
‘थोडं थांब.. मी चेंज तरी करुन येते..’
‘छे.. चेंज कसलं करतीस.. तु इतकी क्युट असताना, कुठलाही वेगळा ड्रेस काय कामाचा..’

खुप मस्त संध्याकाळ गेली ती.. मी जाणीवपुर्वक त्याला गर्दीची ठिकाणं टाळुन लांब पॉईंट्स वर न्हेलं. नुकत्याच मावळलेल्या सुर्याच्या लाल छटा आकाशात सर्वत्र विखुरल्या होत्या. कदाचीत राजच्या सहवासाने माझ्याही चेहऱ्यावर अश्शीच लाली उमटली असेल.. मी शक्य तेवढी राजशी नजरा-नजर टाळली.

 

१८ फेब्रुवारी
रिसॉर्ट मध्ये आज सकाळी पुणे-मुंबईच्या १०-१२ जणांचा एक ग्रुप दाखलं झाला आज रात्रं थांबुन ते सर्व उद्या बाईक्स वरुन लेह-लडाखला जाणार आहेत. ‘वॉव, कित्ती मज्जा असेल नाही?’ मी असा विचार करतच होते आणि तेवढ्यात राजने येऊन सहजच विचारले, “इथले तसेही पाहुन झाले आहे माझे.. या ग्रुप बरोबर लेह-लडाखला जायला खुप मज्जा येईल.. जायचं? येणार माझ्याबरोबर?”

आयुष्य किती घड्याळ्याच्या दोलकाप्रमाणे हिंदकाळत असते नाही? निराशेच्या गर्तेत कोसळलेले माझे आयुष्य गेल्या काही दिवसात अचानक-पणे उत्तुंग आकाशात भरारी मारतं आहेत.

लिहीता लिहिताच पॅकींग चालु आहे, एका लाईफ़-टाईम सहलीसाठी, एका लाईफ-टाईम सहवासासाठी..

रामदेव बाबा की जयगेले दोन आठवडे चालु असलेला मायग्रेन नामक डोके दुखीचा त्रास वाढतच चालला होता आणि सहन करणे अशक्य झाले होते. नेहमीच्या डॉक्टरकडे ३-४ खेपा झाल्या. दर वेळेला वेगळ्या गोळ्या, पण एक कणही फरक पडत नव्हता. कार्यालयात सुट्यांवर सुट्या पडत होत्या. शेवटी दुसरा उपाय करुन पहावा म्हणुन घराशेजारीच असलेले श्री. रामदेव बाबा यांचे आयुर्वेदीक “पतंजली चिकित्सालया”त जाऊन पहावे असा विचार मनामध्ये आला. बऱ्याच लोकांकडुन चांगले रिझल्ट्स ऐकुन होतो शेवटी जाऊन आलोच.

अपेक्षा आजाबात केली नव्हती, पण दुसऱ्या दिवसापासुनच खुsssप फरक पडला. डोकेदुखी अगदी थांबली नसली तरी जाणवण्याइतपत कमी झाली.

दुसऱ्या दिवशी नेहमीच्या अमेरीका गावातल्या क्लायंटच्या ‘कॉल’ मध्ये क्लायंटला माझ्या आवाजातला फरक लग्गेच जाणवला. बऱ्याच दिवसांनंतर बरा वाटत होतो. म्हणुन मग त्याने आस्थेने चौकशी केली. काय उपचार केले, कसा काय फरक पडला एकदम. म्हणुन मग मी त्याला माहीती सांगीतली. इथे एक ‘रामदेव बाबा’ म्हणुन आहेत, त्यांचे ‘आयुर्वेदिक क्लिनिक्स’ आहेत, त्यांच्या जडी-बुटीने फरक पडला. खुप प्रसिध्द आहेत ते. त्यांचे योग-शिबीर फार प्रसिध्द आहेत, लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित रहातात वगैरे.

इतर नॉन-भारतीयांप्रमाणे त्याचीही योग, आयुर्वेद वगैरे शब्द ऐकल्यावर चिकित्सा जागृत झाली म्हणुन त्याने इंटरनेट्वर सर्च मारला आणि रामदेव-बाबा बघुन तो जरा दचकलाच. त्याच्या लेखी एखादा सुटा-बुटातला डॉक्टर असावा बहुदा.

त्याने लगेच आय.एम वर मला रामदेव-बाबांच्या फोटोची लिंक पाठवली आणि विचारतो कसा..

“इज धिस जेंटलमेन चेक्ड यु? इज ही अ डॉक्टर?”

मग त्याला समजावले, अरे बाबा क्लिनिक्स त्याचे आहेत, पण तो नाही येत इकडे तपासायला. तो औषध बनवतो आणि योग-विद्येचे ज्ञान देतो. रामदेव-बाबांचे यु-ट्युब वरील व्हिडीओ बघुन तो खुपच प्रभावीत झाला होता आणि मी त्याची (अत्यंत कडवट, अत्यंत घाणेरड्या चवीची) अत्यंत गुणकारी ठरलेली औषधं घेऊन.

त्यामुळे आजच्या तारखेला मी जरूर म्हणु इच्छीतो ‘रामदेव बाबा कीssss जय!!!’