Monthly Archives: November 2009

लाईफ़ इन आय.टी.


कि-बोर्ड च्या बटनांच्या आवाजाने संपुर्ण आसमंत भरुन गेलेला आहे. वातावरणात एक प्रकारचा तणाव, कायमचाच भरलेला असतो. बाहेरच्या ऍटेंन्डन्स बोर्डला गळ्यातल्या कार्डने नोंद करुन काचेचे दार उघडुन आत आले की हा लगेच तणाव जाणवतो.

भयाणं.. अंगावर दडपण आणणारा..

आपल्या मागे काचेचे दार बंद होते आणि आपला आणि जगाचा जणु भौतीक संपर्कच तुटतो. काळ्या काचेच्या खिडकीतुन बाहेरील वेळ कळणे केवळ अशक्यच असते. बाहेर उन आहे का पाऊस आहे, वादळ आले का जगबुडी झाली, जोपर्यंत ती बातमी इंटरनेट वर येणार नाही तोपर्यंत आतील लोकांनी त्याबद्दल काही कळण्याचा काही मार्गच नसतो.

शनिवार-रविवारची जोडुन आलेली सुट्टी सुध्दा चेहऱ्यावर प्रसन्नता आणु शकत नाही.

इन-बॉक्स मध्ये ऑर्कुट, फेसबुक वर आलेल्या मित्रांच्या नोंदीची मेल्स असतात. पण वाचत बसणे जवळ जवळ अशक्यच होऊन गेलेले असते. कारण साता-समुद्रापार बसलेल्या क्लायंटच्या विकेंड्ची सुरुवात अनेक कामं ऑफ्लोड करुन झालेली असते.

वेलकम टु द वर्ल्ड ऑफ आय.टी.

कामाच्या दडपणाचे भुत क्षणाचाही विलंब न करता मानगुटीवर चढुन बसते.

बोटं कि-बोर्ड वर सराईतपणे फिरु लागतात. प्रोजेक्ट मॅनेजरची लाल-उद्गारवाचक चिन्ह असलेली महत्वाची मेल प्रोजेक्ट ‘येल्लो फ्लॅग’ मधुन ‘रेड फ्लॅग’ मध्ये गेल्याची बातमी देत असते.

भितीची एक लाट अंगावरुन धावत जाते. कुणाला घाम फुटलेला असतो तर कुणी भितीने आधीच गारठलेले असते. थिजलेल्या शरीराव ए/सी चा थंडगार वारा काटे आणत असतो.

‘कॉफी?’ संगणकाच्या पडद्यावर बाजुच्याच क्युब मध्ये बसलेल्या मित्राचा मेसेज फडफडतो. शरीरावर चढत असलेले दडपण दुर करण्यासाठी तुम्ही उठण्याचा विचार करता, पण समोर साठलेला कामाचा ढीग पाहुन,

‘नो यार, बिट बिझी! लॅटर’
‘ऑल राईट, सी या’
तुमची विनोद बुध्दी जागृत होते, तुम्ही तेवढ्यात त्याला म्हणता, ‘cya म्हणु नकोस, त्याचा अर्थ वेगळा होतो, खोटं वाटते तर गुगल वर cya शोध’

तुम्ही मान उंचावुन त्याच्याकडे बघता, त्याच्या चेहऱ्यावरचे बदलेले भाव बघुन तुम्हाला हासु येते.. क्षणीक.. आणि परत कामात मग्न होता.

दरवेळी मदतीला हमखास धावणारे गुगल नेमके आजच बावचळल्यासारखे करत असते. मिळणारे अनेक पर्यायांपैकी एकही तुम्हाला उपयोगी पडत नसतो. तासभर प्रयत्न केल्यावर तुमची चाळवा-चाळव सुरु होते. तुम्ही पुन्हा एकदा मान उंचावुन बघता.

दुसऱ्या क्युबीक मधील एका कन्येशी तुमची नजरानजर होते. ती दोन्ही डोळे मिचकावुन एक हास्य फेकते. तुम्ही हास्य देऊन परत इतरत्र पाहता. मानेवरुन फिरणारे हात, नखांचे कुरतडणे, बोटांची टेबलावर लयबध्द टिक-टिक. प्रत्येकाचंच घोडं कुठेना कुठे अडलेले असते.

संगणकाच्या पटलावर पुन्हा एकदा मेसेज फडफडतो.. ‘कॅन यु कॉल मी नाऊ’ क्लायंट उगवलेला असतो. तुम्ही चरफडता. ‘साले, रात्री झोपत नाहीत का? यांना ना नवरे ना बायका, मोकाट सोडलेल्या वळु सारखे फिरत असतात.’

कॉल सुरु होतो.. तो बोलत असतो, तुम्ही ऐकत असता. कॉल संपतो. तुम्ही चरफडत बाहेर येता. प्रोजेक्ट मध्ये थोडा बदल असतो ज्यामुळे तुम्ही केलेले खुप सारे काम स्क्रॅप झालेले असते. पुन्हा नविन सुरुवात, पुन्हा नविन उमेद.

आठवड्याचे चार दिवस सतत १२-१६ तास काम करुन तुमचा कलीग थकलेला असतो. शुक्रवारी तरी घरी वेळेवर जाऊ या विचारात असतानाच एक ‘एस्कलेशन’ येते. तो जाम वैतागलेला असतो. क्लायंटला कळकळीच्या स्वरात विचारतो, ‘आठवडाभर १६ तास काम केले आहे, एक्सलेशन p2 च आहे, सोमवारी बघीतले तर चालेल का?’

थोड्यावेळाने तुमच्या बॉसला क्लायंटचा फोन येतो, ‘आमचे कॉन्ट्राक्ट तुमच्या कंपनीशी आहे, तुमच्या एखाद्या इंजीनीयरशी नाही. तो १२ तास काम करतो का १६ तास त्याच्याशी आम्हाला काही देणे-घेणे नाही, तुम्ही मागता तेवढे पैसे आम्ही देतो, आम्हाला आमचे काम वेळेवर करुन हवे.’

शुक्रवारची संध्याकाळ सोडाच, आता शनिवार-रविवार सुध्दा त्याचा राहीलेला नसतो.

‘बाबा मला सायकल शिकवा ना..’ पोराची आर्त विनंती या आठवड्यात सुध्दा अर्धवटच रहाणार या विचाराने त्याच्या डोळ्यात पाणी तरळते.

दुपारची जेवणाची वेळ झालेली असते. बायकोने डब्यात प्रेमाने दिलेले अन्न ए/सी मुळे गारठलेले असते. एव्हाना तुमची खाण्यातुन वासना गेलेली असते. डबा परत कसा न्हायचा म्हणुन तुम्ही कसंबसं पोटात ढकलता.

क्षणभर विरंगुळा म्हणुन आलेल्या स्क्रॅप्स, ट्विट्स, मेसेजेसला तुम्ही पटापट उत्तर देऊन टाकता. बॅकेच्या स्टेटमेट्स वर एक नजर जाते. काहीच उरलेले नसते. गलेलठ्ठ दिसणारा पगार इनकम-टॅक्स नामक अक्राळ-विक्राळ भस्मासुराने आधीच गटकलेला असतो. उरलेला पैसा इ.एम.आय ने महीन्याच्या पहिल्या आठवड्यातच उचललेला असतो.

कुणाच्या घरात बारसं, कुणाचे पहिले वाढदिवस, कुणाच्या ऍनीव्हर्सरी, तर कुणाच्या पालकांची साठीचे कार्यक्रम ठरत असतात. तुमच्या दृष्टीने पंचांगाची किंमत शुन्य असते. महत्वाचे असते ते प्रोजेक्ट डेडलाईन्सचे कॅलेंडर.

तुमच्यापैकीच कोणी परदेशात स्थाईक झालेले असता. आपला आनंद, आपले सुख तुम्ही निसर्ग-रम्य स्थळांभोवती, बर्फामध्ये फोटो काढुन, हॅलोविनचे भोपळे हातात घेऊन काढलेले फोटो सोशल-नेटवर्कींग वर शेअर करुन मित्र-मंडळींना जळवु पहाता. तुमच्याकडे बोलण्यासारखे सांगण्यासारखे खुप काही असते. परंतु दिवाळी-दसरा, रक्षाबंधन, श्रावण-सणाला तुमच्याकडचे शब्दच थिजुन जातात. शेअर करण्यासारखे काहीच रहात नाही.

कुठुन आय.टी. मध्ये आलो.. पश्चातापाचा एक विचार पुन्हा एकदा डोक्यात तरळुन जातो. मित्राने एकदा सांगीतलेले असते, ‘अरे तुला माहीत आहे, तो शंकर महादेवन आहे ना, तो संगणक तज्ञ होता आधी!, ओरॅकल मध्ये कामाला होता. पण तो वेळीच बाहेर पडला. आता बघ तो कुठे पोहोचला!.’

तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या आठवतात. ‘लकी गाय’, त्याला शक्य झाले, आपणं कधी बाहेर पडु शकतो या जंजाळातुन?

मौत का कुवा! डोक्यात जुन्या आठवणी जाग्या होतात. तो मोटारसायकल वाला त्या विहीरीत गोल गोल फेऱया मारत असतो. प्रचंड वेगाने, तेच तेच, त्याच त्याच गोष्टी, परंतु प्रचंड एकाग्रता. एक छोटीशी चुक, एक क्षण विश्रांती आणि होत्याचे नव्हते होऊन जाऊ शकते.

थांबला तो संपला….

समोरच्या भितीवर लावलेल्या अनेक देशांमधील वेळ दाखवणाऱ्या घड्याळांचे काटे फिरत असतात.. न थांबता.

कंटाळवाण्या मिटींग्ज्स, ट्रेनींग सेशन्स, निरर्थक बडबड डोक्यावर आदळत असतात. तुमचा मौल्यवान वेळ वाया चाललेला असतो.

तुमच्याच ग्रुप मध्ये एक नविन ‘बकरा’ रुजु झालेला असतो. आज पहिलाच दिवस असतो. घड्याळात ७ वाजलेले बघुन तो आवरा-आवर करुन बाहेर पडत असतो. तेवढ्यात मॅनेजर त्याला गाठतो..

‘जा रहे हो?’
‘हा सर!’
वेळ माहीत असुनही घड्याळात एक कटाक्ष..
‘अच्छा ठिके.. जाओ.. वैसेभी तुम्हारा आज पहेला दिन है.. आदरवाईज, धिस इज जस्ट अ हाल्फ डे, इजंट इट?’

त्याची ती थंडगार स्माईल पुन्हा एकदा सर्वांगावर काटा आणते..

वेलकम टु द वर्ल्ड ऑफ आय.टी….

माझ्या ब्लॉग ला ‘स्टार माझा’ चे प्रथम पारीतोषीक


सकाळी मेल उघडली आणि आश्चर्याचा धक्काच बसला. ‘स्टार माझा’ कडुन एक मेल आली ज्यामध्ये त्यांनी विजेत्यांची नावे घोषीत केली होती. केवळ उत्सुकता म्हणुन उघडली (कारण मला काडीचीही अपेक्षा नव्हती की माझे नावं कुठे असेल म्हणुन) आणि अहो आश्चर्य, प्रथम पारीतोषीक मिळालेले पाहुन हर्षायुच झाला आहे.

अर्थात हे सर्व शक्य झाले ते तुमच्या प्रोत्साहन, प्रतिक्रिया आणि प्रेमामुळेच. तुमचे शतशः धन्यवाद.

सर्व विजेत्यांची नावे इथे प्रसिध्द करत आहे.

प्रथम तिन विजेते –
Aniket Samudra http://manatale.wordpress.com
Neeraja Patwardhan http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
Dipak Shinde http://bhunga.blogspot.com

उल्लेखनीय –
Hariprasad Bhalerao http://www.chhota-don.blogspot.com
Devdatta Ganar http://maajhianudini.blogspot.com/
Medha Sakpal http://www.medhasakpal.wordpress.com
Salil Chaudhary http://www.netbhet.com
Pramod Dev http://purvaanubhava.blogspot.com/
Raj Kumar Jain http://rajkiranjain.blogspot.com
Minanath Dhaske http://minanath.blogspot.com
Vijaysinh Holam http://policenama.blogspot.com
deepak kulkarni http://aschkaahitri.blogspot.com/
Anand Ghare http://anandghan.blogspot.com

सर्वांचे हार्दिक अभीनंदन

..अस्सं कस्सं झालं माझ्या नशीबी आलं!


खरं सांगतो, आम्ही आय.टी. वाले ना, जरा अती-शहाणे असतोच, पण तितकेच गॅडेट्स्च्या इतक्या आहारी गेलेलो असतो ना की एखाद्या दिवशी ह्या टेक्नॉलॉजीने ‘राम’ म्हणले तर आमचं काही खरं नाही.

आज अस्संच काहीसं झालं त्याचा हा किस्सा.

एक नविन ऍप्लीकेशन लिहायचे होते त्यासाठी मॅनेजरने मिटींग बोलावली. समोरच्या पांढऱ्या फळ्यावर निरनिराळ्या आकृत्या, टिपण्या, कल्पना, लॉजीक्स लिहीली जात होती. अर्थात हे सगळे मलाच करायचे असल्याने ते लिहुन घ्यावे म्हणुन मी कागद आणि पेन सरसावुन बसलो.

मॅनेजरने एक तुच्छ कटाक्ष टाकला आणि म्हणाला, ‘अरे लिहीतोस काय सगळे? आपली मिटींग संपली की मोबाईलने ह्याचे फोटो काढु, मग ते मी तुला ई-मेल करतो आणि त्याचा संदर्भ घेऊन तु एक छानसे डॉक्युमेंट बनव!’ मी सुध्दा खुश झालो, म्हणलं चला हे सगळे लिहीत बसण्याचा त्रास वाचला आणि परत फारसं लक्ष नाही दिलं तरी चालते आहे. नंतर फोटो बघुन कळेलच काय लिहायचे आहे ते.

पुढचा एक तास अगदी मस्त, आरामात गेला.

मिटींग संपली. बाहेर आल्यावर मस्त कॉफीपान करुन आलो. खुर्ची ओढली, संगणक चालु केला आणि इन-बॉक्स उघडला. “आली.. मेल आली..‘, लगेच सगळे फोटो संगणकावर उतरवुन घेतले. ते चालु असतानाच मेल वाचत होतो..

माफ कर मित्रा, मोबाईलमध्ये काहीतरी गडबड झालेली असल्यामुळे फोटो निटसे आले नाहीत त्यामुळे तुला आठवत असेलच, त्यावरुनच डॉक्युमेंट लिहुन टाक

तरी म्हणलं, ‘ठिक आहे.. मोबाईलचे फोटो तसेही काही वेळेस निट येत नाही. अगदी प्रमुख मुद्दे वाचता आले तर खुप झालं’

पण फोटो बघीतले आणि उरले सुरले अवसानच गळुन गेले. का? तुम्हीच बघा फोटो कसे आले आहेत ते. जसेच्या तसे इथे जोडत आहे. साईझ सुध्दा तोच बरं का! मी रिसाईझ वगैरे काही केले नाही. जसे फोटो आले आहेत तस्सेच जोडले इथे.

बरं मित्र असता तर दोन शिव्या तरी घातल्या असत्या. मॅनेजरला कुठल्या तोंडाने म्हणु मिटींगमधले मला आठवतं नाही म्हणुन?

आत्ता तुम्हीच सांगा, कसं काय लिहु डॉक्युमेंट? चांगलं लिहीलं असतं कागदावर तरं ..अस्सं कस्सं झालं माझ्या नशीबी आलं!

अरे रामा, कृष्णा, गोविंदा, परमेश्वरा वाचवं रे बाबा.

मराठीचा मुद्दा चुकीचा कसा?


ही मिडीया खरं सांगायचं तर डोक्यात गेली आहे माझ्या. अक्कल नसल्यासारखं ‘बायस’ होऊन बातम्या देणं चालु आहे असं मला तरी वाटतं.

 • अबु आझमी बद्दल जे काही घडलं त्यावरुन त्यांनी ‘राज ठाकरेचे गुंड’ हा जो उल्लेख केला तो मला तरी फार खटकला. मारामाऱ्या काय फक्त राज ठाकरेच करतो का?
 • गेल्या वर्षी कलेक्टर कचेरीवर जी मोडतोड मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली त्याची भरपाई म्हणुन राज ठाकरेने ५२ हजार रुपये जमा केले ही बातमी का मग झाकोळली गेली?
 • मराठी आरक्षणाला लोकांचा विरोध आहे. का? का तर म्हणे देश्याच्या फाळण्या होतील. मग
  – दलीत, बॅकवर्ड क्लास वगैरेंची कास धरुन जी आरक्षणं ठेवली जातं आहेत त्याचं काय?
  – आंबेडकरांनी ५० वर्षापुर्वी त्यावेळची परीस्थीतीला अनुसरुन जाती-जमातींना आरक्षणं दिली होती. आज त्याची काय किंमत? खरंच त्याची गरज आहे?
  – धनाड्य, करोडपती असुनही जाती-जमातीचे दाखले देऊन फिज मध्ये कन्सेशन्स दिली आणि घेतली जात आहे. टक्के जास्त असताना, केवळ कमी टक्के असलेला मागासवर्गीय आहे म्हणुन एखादा हुशार मुलगा प्रवेश्यापासुन डावलला जात आहे. जातीच्या दाखल्यावरुन निदर्शन केली तर ते गुंड नाहीत का? तेंव्हा मात्र ते आपल्या हक्कासाठी लढणारे साधु संतच ना!
  – स्त्रियांची आरक्षणं अजुनही चालु आहेत. गेल्या वर्षीच स्त्रियांना आरक्षणं मिळावीत म्हणुन मोर्चे उठवले गेले त्याचे काय? आज कुठल्या क्षेत्रात स्त्रिया मागे आहेत? माफ करा, पण पुरुषांसाठी बनवलेल्या कंन्डोमच्या जाहीरातीत सुध्दा स्त्रियांचा वावर आहे. मग आरक्षणं हवीतच कश्याला?
  एकीकडे आजची स्त्री अबला नाही सबला आहे, स्वकर्तुत्वावर उभी आहे.. आहे ना, पण मग इंजीनीयरींगला, शाळा प्रवेशात, गव्हर्नमेंट सर्व्हीसमध्ये आरक्षण कश्याला?
 • ज्या वाहीन्या मराठीचा मुद्दा चुकीचा मानतात, त्याच वाहीन्या प्रादेशीक वाहीन्या करतातच कश्याला मग चालु. मराठी, बांगला, कन्नड, पंजाबी. जर हिंदी देशभाषा आहे तर सर्व वाहीन्या हिंदीतुनच करा ना! पण नाही. प्रादेशीक वाहीन्यांमुळे मिळत असलेला पैसा कोण सोडणार?

अर्थात प्रत्येक स्त्री आरक्षणं मागत नाही, दलित लोकं सांगायला जात नाहीत आम्हाला आरक्षण द्या. स्वाभीमानी लोकही आहेतच. त्यामुळे वरचा प्रश्न त्या मोजक्या लोकांना जे या आरक्षणाच्या चुलीवर आपल्या भाकऱया भाजुन घेतात आणि सरकारला आहे

राज ठाकरेने आज ‘भारतीय स्टेट बॅकेला’ चिठ्ठी लिहुन महाराष्ट्रात मराठी मुलांना प्राधान्य द्यावे अशी सुचना केली तर मिडीयाच्या दृष्टीने ती ‘धमकी’ कशी होते? काय चुकीचे केले त्याने?

शिवाजी महाराजांनी आपल्याच मुलुखात घुसुन मुजोरी करणाऱ्या शाहीस्तेखानाची बोटं तोडली. मग माजलेल्या ‘आबु आझमीच्या’ कानफाटात लावल्यावर ते चुकीचे कसे?

एका नॅशनल टि.व्ही. ला दिलेल्या मुलाखतीत त्याने संपुर्ण मराठीचा वापर केला. समोरचा माणुस हिंदी, इंग्रजीतुन प्रश्न विचारत होता आणि राज ठाकरे त्याला मराठीतुनच उत्तर देत होता. जमत नसतानाही तोंड वेडी वाकडी करत हिंदी/इंग्रजीतुन मुलाखती देणाऱ्या नेत्यांसमोर ही मुलाखत खुपच छान वाटली.

राजने जे बोलले ते करुन दाखवले. नुसत्या गर्जना नाही केल्या. आज महाराष्ट्राला खरंच अश्या नेत्याची गरज आहे जो जे बोलेल ते करुन दाखवेल.

जातीय वाद हा प्रादेशीक वादापेक्षा नक्कीच वाईट आणि राजने जातीय वाद केलेला माझ्या तरी स्मरणात नाही.

प्रश्न अनेक आहेत. कदाचीत ते चुकीचे सुध्दा असतील. राज ठाकरेने पत्करलेला मार्ग काही अंशी चुकीचा असेलही पण पुर्णपणे चुकीचा नक्कीच नाही.. आय.एम.एच.ओ (इन माय ऑनेस्ट ओपीनीयन)

हा लेखामुळे कुणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतु नक्कीच नाही, तरीही कुणाला वाईट वाटले असल्यास मी मनापासुन माफी मागतो

‘तमाशा’


महाराष्ट्रात राहुन अजुनही ‘तमाशा’ बघायचा योग आलेला नाही. शेवटी काहीही झालं तरी ती एक लोक-कला आहे आणि म्हणुनच तो एकदा तरी बघायचाच हे मनाच्या कुठल्यातरी एका कोपऱ्यात ठाम झालं आहे.

मराठी चित्रपटात दाखवतात खरंच तसा तमाशा असतो का कुठे? म्हणजे ते टिपीकल थिएटर, फेटे वाले पाटील, टोपीवाले गावकरी, स्टेजच्या कोपऱ्यात हातात ढोलकी, तुणतुणं घेतलेला फेटेवाला, दुसऱ्या कोपऱ्यात पायाने वाजणारी पेटी घेऊन पायजमा घातलेला वादक, ‘जी-जी’ म्हणणारे सहकारी आणि नृत्याचा अविष्कार सादर करणारी नर्तिका. तमाशा ‘सवाल-जवाबाचा’ असेल तर अजुनच धम्माल, मात्र त्यात अश्लिलता कुठेही नसावी.

पुण्यात चौफुल्याला तमाश्याचे असे फड रंगतात ऐकुन आहे, पण कधी ‘तिकडे’ जाणं झालं नाही. कुणी आहे का ज्याने खरा-खुरा तमाशा पाहीलेला आहे? ह्या विषयावर कुणी अजुन प्रकाश टाकु शकेल का?

मेहंदीच्या पानावर (भाग-४)


मंडळी, पुढचा भाग टाकायला काही कारणांने फारच उशीर झाला. सर्वप्रथम सर्वांची माफी मागतो आणि ‘मेहंदीच्या पानावर’ गोष्टीचा पुढचा भाग पोष्ट करतो..

भाग ३ पासुन पुढे..

२१ फेब्रुवारी
लेह-लडाख, सौदर्य काय वर्णावे त्याचे? स्वच्छ निळं आकाश, निळसर हिरव्या पाण्याचे नितळ तलाव, लालसर-पिवळ्या रंगाचे उंचच उंच पर्वत आणि तश्शीच माती. बाईक्स च्या प्रवासात अंगावर उडणाऱ्या त्या पिवळसर मातीने सर्व अंग माखुन गेले होते. राज तर एक नंबरचा माकड दिसत होता.. सो क्युट..

फ्रेश होऊन आल्यावर राजने विचारले -“गेला का रंग सगळा मातीचा?”, मला तर म्हणावेसे वाटत होते की “वेड्या तो रंग तर केंव्हाच गेला, पण मनावर चढलेला तुझा रंग जातंच नाहीये

इतक्या दुरवर बाईक वरचा असुनही प्रवासाचा शीण असा जाणवलाच नाही. खाचखळग्याच्या रस्त्यातुन, ओढ्यानाल्यातुन प्रवास करताना शरीराला होणारा राजचा निसटता स्पर्श शरीरावर प्राजक्ताच्या फुलांची उधळण करत होता. क्षणभर जाणवलं, तुम्हाला हवा तो जोडीदार बरोबर असेल तर आयुष्यातले या ही पेक्षा मोठे खाच-खळगे कसे अनेक लोकं सहजतेने पारं करत असतील!

‘निधी मेहता’, पुर्णपणे मी तिच्याबद्दल विसरुनच गेले आहे. जणु काही ती अस्तीत्वातच नाही. जणु काही तिच आणि राजचं काही नातं आहे हेच मला ठाउक नाही. मी त्यांच्या नात्याबद्दल पुर्णपणे अनभिज्ञ झाले होते. तिच्याबद्दल मी राजकडे एक शब्दही विचारला नव्हता आणि राजनेही तिच्याबद्दल कधी माझ्याकडे विषय काढला नव्हता. माझ्या मनामध्ये सध्या फक्त एकच गोष्ट होती.. ‘राज’

राज माझ्यासाठी किती महत्वाचा आहे, तो मला कित्ती आवडतो, खरं तर शब्दात सांगणे अवघडच, पण शक्य असते तरीही कदाचीत ते मी इथे नक्कीच उतरवणार नाही. माझ्या मनाशिवाय ही गोष्ट कुणालाही कळु द्यायची इच्छा नाही आणि खरं तर एक भिती सुध्दा वाटते म्हणुन. सर्वांमध्ये वावरताना चेहऱ्यावर मी एक शांत, ‘कुल ऍन्ड काल्म’ असल्याचा मुखवटा घालुन वावरत असते, पण आत मधुन… प्रत्येक क्षण परीस्थीती बिघडतच चालली आहे.

२२ फेब्रुवारी
ग्रुप मधील सर्व जणं मस्तच आहेत, पण सगळ्यात इंप्रेसिव्ह, ‘करण मित्तल’, ‘मित्तल मिल्स’ चे सर्वे-सर्वा ‘कुमार मित्तल’ यांचा एकुलता एक वारस. परंतु करोडपती बाप असल्याचा किंचीतसाही अहंकार त्याच्या चेहऱ्यावर नाही. इन्ट्रोडक्शन परेड मध्ये म्हणतो कसा, ‘कुठल्याही मुलीला मी सहज पटवु शकतो..’, मला तर हसुच आलं, काय असतात ना एक एक पात्र

आज दिवसभर आरामच होता, उद्यापासुन पुन्हा पुढचा प्रवास सुरु. हवा सुरेखच आहे.

२३ फेब्रुवारी
दिवस-भर राज आज ‘निधी’ बद्दलच बोलत होता. त्यांची ओळख कशी झाली, मैत्रीचे प्रेमात रुपांतर कसे झाले हे आणि ते.. इतका वैताग आला होता मला. त्याला एवढे पणं कळत नाही का एका मुलीला दुसऱ्या मुलीची स्तुती, ते पण एखाद्या हॅंन्ड्सम कडुन.. सहसा सहन होतं नाही? मला कंटाळा आला होता त्याच्या ‘निधी’पुराणाचा.. कंटाळा? की राग? की जेलसी?? कुणास ठाऊक!

२४ फेब्रुवारी
काल रात्री हवा फारच खराब होती. आकाशातला निळसरपणा कुठेतरी निघुन गेला होता. पुर्ण आकाश करड्या रंगाने भरुन गेले होते. हवेतला बोचरेपणा अंगावर काटा आणत होता. कुठल्याही क्षणी आभाळ कोसळेल असं वाटत होतं. टेंटचा पडदा जरासा सरकवुन पाहीला तेंव्हा आकाश्यात विजा चमकत होत्या, परंतु पाऊस काही कोसळला नाही.

करडा रंग, नैराश्याचे, निरसतेचे प्रतिक. निसर्गाचे रंग आपल्या मनावर किती परीणाम करु शकतात नाही?

आज राज खुपच शांत, एकटा वाटत होता. त्याच्या मनामध्ये कसली तरी खळबळ माजली होती. कसली असावी?? निधी पासुन दुर असल्याची?, निधी ला न सांगता माझ्याबरोबर इथे आल्याची? का अजुन काही?? ठरवणं कठीण आहे.

सर्व ग्रुप मध्ये राज खुपच लोकप्रिय झाला आहे.. आणि का नाही होणार? प्रत्येक जण त्याच्या तोंडुन गाणं ऐकण्यासाठी, आपल्या मोबाईलमध्ये साठवण्यासाठी धडपडत असतो. वाटतं जावं आणि राजचा हात हातामध्ये घेऊन ‘राज फक्त माझा आहे’ असं ओरडुन सांगावं. पण दुसऱ्या क्षणाला वाटतं, खरंच राज आहे माझा? जितक्या त्वेषाने माझे मन राजसाठी आक्रंदत आहे त्याच्या एक टक्का तरी माझा राजवर हक्क आहे?

मनामध्ये राज बरोबरचा हा सहवास क्षणभंगुर आहे आणि काही दिवसांनी राज परत आपल्यापासुन दुर (?) जाणार आहे ह्याची खंत/टोचणी लागुन आहे आणि त्यामुळे त्याच्याबरोबर मिळणारा प्रत्येक क्षण मला जगायचा आहे.

२५ फेब्रुवारी
सुरेख वातावरणाने मनावर आलेली मरगळं कुठल्या कुठे निघुन गेली होती. आज माहीतेय मी पहिल्यांदा बाईक चालवली. रस्ता चांगला होता आणि राज मागेच लागला ‘चालव, चालव’ म्हणुन. शंभरवेळा गेअर बदलताना बाईक बंद पडली पण शेवटी जमवली कशी तरी. खुप मज्जा आली. इतकी हसले आहे मी आज.

संध्याकाळी सर्व जण उबदार शेकोटी भोवती गप्पा मारत बसलेले असताना मला राहुन राहुन असं वाटत होतं की राज माझ्याकडे बघतो आहे, परंतु माझी त्याच्याकडे बघायची हिम्मतच नाही झाली. आणि हे एकदा नाही तर दोन-तिनदा मला जाणवलं, एकदा तर माझी आणि त्याची नजरानजर सुध्दा झाली होती. मला खात्री आहे की राज अधुन-मधुन माझ्याकडे बघत असतो.. नक्कीच.. “आय नो, इट्स नॉट माय इमाजीनेशन

मला असं का वाट

२६ फेब्रुवारी
काल डायरी लिहीताना मी इतकी गुंग होऊन गेले होते आणि अचानक माझ्यामागे कुणीतरी उभं असल्याची जाणीव झाली म्हणुन मागे वळुन पाहीलं तेंव्हा राज उभा होता. तिच नेहमीची स्टाईल, निळ्या वॉश्ड रंगाचे जर्किन, त्यातुन डोकावणारा व्हॅनीला-व्हाईट रंगाचा शर्ट, एक कॉलर किंचीतशी वर गेलेली, खिश्यामध्ये हात आणि चेहऱ्यावर मिश्किल हास्य. त्याला बघताच मी डायरी खाडकन बंद केली. ‘मुर्ख आहेस का तु?’ स्वतःलाच जोरात ओरडले मी मनाशीच. इतकी घाबरले मी त्याला बघताच. ‘आय जस्ट होप की त्याने काही वाचले नसावे’. कधी कधी कुठल्या तंद्रीत असते मी मलाच कळत नाही.

सकाळी ग्रुप मधली एक जण विचारत होती, ‘बोथ ऑफ यु टुगेदर? कपल?’ आणि मी कसनुस हसुन उत्तर दिलं.. ‘नो.. जस्ट गुड फ्रेंड्स’

काल अर्धवट सोडलेली डायरी पुढे लिहीन म्हणलं.. पण काय लिहीत होते तेच लक्षात येईना.

असो, त्याच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण मला त्याच्याबद्दल वाटणारी ओढ आधीकच वाढवत
आहे. हातातुन निसटुन गेलेला प्रत्येक क्षण मनाला तो लवकरच दुर होणार आहे ह्या विचाराने अनंत यातना देत आहे. मला लवकरात लवकर काही तरी केले पाहीजे.. पण काय? नशीबाने राजला पुन्हा एकदा माझ्यासमोर आणुन उभे केले आहे यावेळेला मी काही केले नाही तर.. तर कदाचीत, कदाचीत?? मलाच माहीत नाही तर काय होईल.

मी वेडी होईन? ती तर मी आधीच झाले आहे!, मग कदाचीत मरुन जाईन?? पण छे.. असं कुणाच्या आठवणीने कुणी कधी मरतं का? काय होईल माझं मलाचं माहीत नाही, पण जे होईल ते नक्कीच चांगलं नसेल.

मी ठरवलं आहे. मी एकदा तरी प्रयत्न करीन. राजला ह्याची पुसटशी का होईना जाणीव करुन देइन की तो मला आवडत होता आणि अजुनही तितकाच आवडतो.

“टु लेट समवन नो यु लव्ह हिम इज टु टेल हिम”, वाक्य साधं सोपं.. पण जमेल मला ते?? कदाचीत येणारा काळच ठरवेल..

[क्रमशः]