Monthly Archives: December 2009

अलविदा


मंडळी, निरोप घ्यायची वेळ आली. ह्या ब्लॉगवरची माझी ही शेवटची पोस्ट.

२००९ वर्ष माझ्यासाठी खुपच छान गेले. मार्चच्या शेवटाला मी हा ब्लॉग सुरु केला आणि ह्या ९ महिन्यात ब्लॉगच्या वाचकांची संख्या ९१ हजाराच्या वर गेली. मी ह्याची अपेक्षाही केली नव्हती. वाचकांकडुन भरभरुन प्रतिसाद आणि प्रोत्साहन मिळाले ज्यामुळे मला दर वेळेला नविन नविन लिहायची प्रेरणा मिळत गेली. ‘स्टार माझा’ ने भरवलेल्या मराठी ब्लॉग च्या स्पर्धेतही पहिल्या तिन मध्ये स्थान मिळालं ही सुध्दा एक सुखावणारी गोष्ट होती.

ह्या ब्लॉगच्या अनुषंगाने अनेक लोकांच्या ओळखी झाल्या त्यातले काही चक्क मेसेंजरमध्ये आणि ऑर्कुट मध्ये ठाण मांडुन बसले ज्यांच्याशी आयुष्यभर संपर्क राहीलचं. पण असेही अनेक जणं भेटले आणि मनामध्ये स्थान करुन गेले.

पण आता वेळ आली आहे तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याची. आगामी २०१० मध्ये अनेक नविन जबाबदाऱ्या येऊ घातल्या आहेत आणि ज्या सांभाळता सांभाळता ब्लॉग लिहावयाला तितकासा वेळ देऊ शकेन असं वाटतं नाही. दिवसांगणिक नविन पोस्टमध्ये पडणारी गॅप वाढतच चालली होती. उगाचच काहीतरी रटाळ खरडुन तुम्हा सर्वांच्या मनामध्ये मिळवलेले स्थान मला गमवायचे नाही. यशाच्या, प्रेमाच्या ह्या शिखरावर असतानाच निरोप घेतलेला कधीही चांगलचं नाही का?

अर्थात नविन लिखाण काही नसलं तरी अधुन मधुन मराठीब्लॉग्स.कॉम वर उड्या मारुन तुमचे लेखन वाचण्याची संधी मात्र मी नक्कीच साधणार यात शंका नाही.

माझा व्यक्तीगत ब्लॉग मात्र मी अपडेट करीत रहाणारच आहे. मला नाही वाटत कुणाला त्यामध्ये उत्सुकता असेल याची, तरीही कधी वाटलचं तर त्याचा पत्ता आहे –
http://aniketsdiaries.vox.com/

Gtalk – aniket.com@gmail.com
Twitter – http://twitter.com/manatale
Orkut – http://www.orkut.co.in/Main#Profile.aspx?uid=9215324300026099621

चला तर मग मंडळी, ह्या भुणभुणणाऱ्या भुंग्याचा हा शेवटचा रामराम स्विकारा आणि द्या आज्ञा मला निघण्याची.

तुमचे प्रेम, आशिर्वाद सदैव पाठीशी राहतील याची मी खात्री बाळगतो.

तुम्हा सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा

बालभारती आणि कुमारभारतीमधील मराठी कवितांचा संग्रह


शालेय जिवनात शिकलेल्या बालभारती आणि कुमारभारतीमधील मराठी कवितांचा संग्रह इमेलमधुन मला आला होता तो इथे जोडत आहे. या सुमधुर गितांचा गोडवा आणि चाली तुमच्याही मनामध्ये अजुन रेंगाळत असतील याबद्दल शंका नाही.
हा संग्रह संगणकावर उतरवुन घेण्यासाठी इथे टिचकीमारा.

संग्रहामध्ये पुढील गितं समाविष्ट आहेत.

– केवढे हे कौर्य – ना.वा.टिळक
– कणा – कुसुमागज
– या झोपडीत माझ्या – संत तकु डोजी महाराज.
– खबरदार जर टाच मारनी – वा. भा पाठक
– आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे – बालकवी
– उठा उठा चिऊताई- कुसुमागज
– श्रावणमासी हर्ष मानसी – बालकवी
– रे हिंदबांधवा, थांब या स्थळी – भा. रा. तांबे
– खोपा – बहीणाबाई
– मन वढाय वढाय – बहीणाबाई
– पिंपात मेले ओल्या उंदिर – बा.सी.मढेकर
– एका तळयात होती – ग.दि.माडगूळकर
– पैठणी – शांता शेळके
– गाई पाण्यावर – कवी बी
– फुलपांखरं – ग.ह.पाटील
– टप टप टाकित टापा – शांता शेळके
– आजीचे घडाळ – केशवकुमार औदुंबर
– पेम कर भिललासारख
– फ़ुलराणी – बालकवी
– गवतफुला – इंदिरा संत
– तुतारी – केशवसुत
– विचत वीणा – बा. भ. बोरकर
– गणपत वाणी – बा.सी. मढेकर
– सहानभूती – कुसुमागज
– आम्ही कोण? – केशवसुत
– सागरा पाण तळमळला ! – सवा. विनायक दामोदर सावरकर
– लेझिम चाले जोरात – श्रीधर बाळकृष्ण रानडे
– लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी – सुरेश भट
– मधुघट – भा. रा. तांबे
– नको नको रे पावसा …!! – इंिदरा सतं
– किती तरी दिवसांत – बा. सी. मढेकर
– देणाऱ्याने देत जावे – विंदा करंदीकर
– पृथ्वीचे गित – कुसुमागज
– घरटा – बालकवी
– या नभाने या भुईला दान – ना. धो. महानोर
– अरे, संसार संसार – बहीणाबाई चौधरी
– उगवले नारायण – बिहणाबाई चौधरी
– बाळ, चालला रणा – पदमा गोळे
– अनामवीरा – कुसुमागज
– उतुंग आमुची उतर सीमा इंच इंच लढवू – वसतं बापट
– खरा तो एकची धर्म – साने गुरजी
– घाल घाल पिंगा वाऱया – कृ . ब. निकुंब
– देवाचे घर – ग. दि. माडगूळकर
– आई’ महणोनी कोणी, आईस हाक मारी – यशवंत
– रदास आवाहन – भा. रा. तांबे
– कोठुनि येते मला कळेना – बालकवी
– निझररास – बालकवी
– सांग मला रे सांग मला – ग. दि. माडगूळकर
– आली बघ गाई गाई – इंदिरा संत
– देवाचे घर – ग.दि. माडगूळकर
– माझ्या छकुलीचे डोळे – वि. भि. कोलते
– शतकानंतर आज पाहिली – वसंत बापट
– पारवा – बालकवी
– तळयाकाठी – अनिल
– माझ्या मराठीची गोडी -वि. म. कुलकणी
– अ आ आई, म म मका – मधुसूदन कालेलकर
– चढवू गगनी निशाण – बा. भ. बोरकर
– गदड निळे – बा. भ. बोरकर.
– या बाई या… – दतातय कोडो घाटे
– बाळ जातो दुर देशा- गोपीनाथ
– बाभुळझाड – वसतं बापट
– कोलंबसचे गवरगीत – कुसुमागज
– आम्ही कोण? – प. के . अते
– सवारतमका शिवसुंदरा – कुसुमागज
– गे मायभू- सुरेश भट
– जयोऽस्तुते – विनायक दामोदर सावरकर
– थोर तुझे उपकार – भासकर दामोदर पाळंदे
– महाराष्ट्र गीत
– हा हिंद देश माझा – आनंद कृष्णाजी टेकाडे
– गाउं तयानं आरती – कवी यशवंत
– कण-र श्रीकृष्ण संवाद – मोरोपंत
– फटका – अनंत फं दी
– घड्याळ – केशवसुत
– ऐकव तव मधु बोल – माधव ज्युलीयन
– चिमणा राजा – दामोदर अचयतु कारे
– अनंत – बालकवी
– टप टप पडती अंगावरती – मंगेश पाडगावकर
– सदैव सैनिका, पुढेच जायचे – वसतं बापट
– पसायदान – संत ज्ञानेश्वर
– संथ निळे हे पाणी – मंगेश पाडगांवकर
– पितात सारे गोड हिवाळा – बा. सी. मढेकर
– पेमस्वरुप आई – माधव ज्युलियन
– कोकिलानय – कृष्णशास्त्री चिपळूणकर
– बाभळीविषयी अनयोकि – कृष्णशास्त्री चिपळूणकर
– विदाप्रशंसा – कृष्णशास्त्री चिपळूणकर
– झाल्या तिन्ही सांजा – यशवंत
– कशासाठी पोटासाठी – माधव ज्युलियन
– कादरखां – केशवकुमार
– लाडकी बाहली – शांता शेळके
– मामाची गाडी – ग. ह. पाटील

टॅगला


टांग टिंग टींगा क टांग टींग टींगा, आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा.
हे टॅगा टॅगी चाललेले बघुन मी शोधंत होतो कुणी मला टॅगले आहे का. महेंद्रंच्या पोस्टमध्ये नावं बघुन हुश्श केले, त्यांना मनापासुन धन्यवाद दिले आणि पोस्ट लिहावयाला घेतली.

1.Where is your cell phone?
नेहमी तिथेच असतो जिथे मी शोधत नाही

2.Your hair?
कटींगचे चार्जेस वाढल्याने शरीराने नविन उगवणे बंद केले आहे. उरलेले पोरगं उपटतो

3.Your mother?
उत्तर देणं अशक्य, आईबद्दल काय वाटतं शब्दात मांडण्याइतकं शब्द सामर्थ्य नाही आहे अजुन

4.Your father?
काय लिहु? काहीच कळत नाही

5.Your favorite food?
पुरणं पोळी, आमरसं, वरणं भात, आळुची भाजी, जिलेबी, भेळ

6.Your dream last night?
मी कुणाचातरी खुन केला होता आणि पोलीस मागावर आहेत म्हणुन पळुन जात होतो.

7.Your favorite drink?
दुध-साखरं आणि त्यामध्ये खुप सारी पार्ले-जी बिस्कीटं फोडुन टाकायची 🙂

8.Your dream/goal?
लवकरात लवकर कामातुन निवृत्त होऊन एखाद्या छोट्या गावात सेटल व्हायचे आहे. शक्य असल्यास एखादी लायब्ररी चालवणे. आणि हो.. एक तरी पुस्तक छापायचे आहे. आणि.. खुप सारी मुलं असली तर मज्जाच.. पण परवडायचं का?? हा मोठ्ठा प्रश्न आहे.

9.What room are you in?
बेड-रुम. खरं तर क्रिसमस इव्ह म्हणुन परमीट रुम मध्ये हवो होतो का?

10.Your hobby?
तश्या आहेत बोटावर मोजण्याइतक्या, पण मनापासुन आनंद घेतो ते म्हणजे – फोटोग्राफी

11.Your fear?
कुटुंबापासुन दुर होणे

12.Where do you want to be in 6 years?
जिवंत कुठेही

13.Where were you last night?
घरीच

14.Something that you aren’t diplomatic?
अशक्य आहे, मला वाटतं मी प्रत्येक गोष्टीत डिप्लोमॅटीक आहे.

15.Muffins?
काय असते हे?

16.Wish list item?
मेरीडा VS, किंवा ट्रेक ४७०० (सायकल आहेत), स्कॉर्पिओ, बेटर हेल्थ, एखादं कन्या रत्न

17.Where did you grow up?
कुडाळ, राजापुर, रत्नागीरी, पुणे

18.Last thing you did?
फेसबुक वर फार्मव्हिला चालु केले

19.What are you wearing?
काळा टी-शर्ट, राखाडी ट्रॅक पॅन्ट

20.Your TV?
केबलची लाईट गेली आहे त्यामुळे तिनही टिव्ही बंदच आहेत

21.Your pets?
स्वीटी, पॉमेरीयन भुभु

22.Friends
ओजस (४ वर्षाचा मुलगा) आणि पल्लवी (सौ)

23.Your life?
तसं छान आहे, पण प्रत्येक सुखाच्या मागे दडुन काहीतरी दुःख येतंच त्यामुळे सुखाची आजकाल भिती वाटायला लागली आहे.

24.Your mood?
चिंतामणी. कश्याचीही मला चिंता असु शकते.

25.Missing someone?
हो, बायकोला, जस्ट वॉक वर गेली आहे.

26.Vehicle?
ल्युमाला सायकल, बजाज प्लॅटीना बाईक आणि मारुती स्विफ्ट

27.Something you’re not wearing?
रिस्ट वॉच, कधीच घालत नाही

28.Your favorite store?
बिग-बझार

Your favorite color?
काळा. प्रचंड आवडतो मला हा रंग, माझे निम्याहुनही जास्ती कपडे काळ्या रंगाचेच आहेत.

29.When was the last time you laughed?
१० मिनीटांपुर्वीच. आज सकाळी ब्रेकफास्टला सांजा केला होता आणि योगायोगाने आत्ताही सांजाच झाला, तर मुलगा विचारतो आहे, “क्रिसमसला पिवळा सांजा का करायचा असतो?”

30.Last time you cried?
जेंव्हा अमेरीकेला जावे लागले, आणि मुलाशी स्काईपवर बोलताना तो म्हणाला, “बाबा तु मला दिसत नाहीयेस, कुठे आहेस, ये ना लवकर घरी. मला तुझ्याशी खेळायचे आहे”

31.Your best friend?
ओजस

32.One place that you go to over and over?
ब्लॉगचा कमेंट्स सेक्शन

33.One person who emails me regularly?
स्पॅम

34.Favorite place to eat?
स्वयंपाकघर

मी कुणाला टॅगु? बहुतेक सगळे टॅगलेलेच दिसत आहेत??. मे बी.. मी टॅगतो बेबलॉष्की फेम निवेदीता बर्वे ला.

जिंगल बेल्स


“अहो.. ऐकलत का?, सॅंन्टा भाऊजी आलेत”, दरेकर वहिनी एका हाताने दार उघडत तर दुसऱ्या हाताने चेहरा पदराने टिपत म्हणाल्या.

सॅंन्टाचे नाव ऐकताच बन्या आणि चिंगी, “सॅंन्टा काका आले, सॅंन्टा काका आलेssss” करत बागडत बाहेर आले.

मागोमाग दरेकर काकाही चट्यापट्याचा पायजमा आणि पोटाच्या वर गेलेला गंजीफ्रॉक निट करत बाहेर आले.

उन्हाने लाल-गुलाबी झालेला सॅंन्टा हाश-हुश करत समोरच्या सोफ्यावर विसावला. नेहमी कडक आणि लालं भडक कपड्यात वावरणाऱ्या सॅंन्टा चे कपडे चुरगळलेले होते, लाल-भडक रंग सुध्दा उन्हाने उडला होता. हातातले बेचके त्याने कडेलाच फेकले आणि कपाळावरचा घाम पुसु लागला. दरेकव वहिनी तेवढ्यात पाणी घेउन बाहेर आल्या.

बन्या आणि चिंगी हॉलच्या एका कोपऱ्यात सॅंन्टाने कोपर्य़ात फेकलेल्या त्या गाठोड्याकडे बोटं दाखवत खुसपुसु लागले.

“अरे ये ये.. सॅंन्टा, ये.., कधी आलास गावावरुन?” दरेकर काका कौतुकाने सॅंन्टाकडे बघत म्हणाले.

“छ्या.. दमलो बुवा.. होतं नाही आता कामं..” सॅंन्टा अजुनही दम खातं होता..
“का रे? काय झालं?” दरेकर काका आश्चर्याने म्हणाले
“वय झालं आता!! डॉक्टरांनी बि.पी.ची गोळी चालु केली नाही का..” सॅंन्टा सोफ्यात आपलं बुड खुपसत म्हणाला.. “बरं ते जाऊ देत, वहिनी जरा बाहेरच्या रेनडिसर्स ना थोडा पालापाचोळा टाकता का?”
“हो हो.. टाकते की, दमले असतीला ना ते बिच्चारे”, दरेकर वहिनी खिडकीतुन बाहेर बघत म्हणाल्या.

“बोला सॅंन्टा महाशय, कसे आहात? काय म्हणतोय तुमचा क्रिसमस?” दरेकर काका सॅंन्टा जवळ सरकत म्हणाले.

“कसला क्रिसमस आणि कसलं काय? सगळीकडे आपली जागतीक मंदीची लाट आणि त्याचीच चर्चा. डिस्काऊंटच मिळेनासा झालाय, मग होलसेल मध्ये माल घेउ तरी कसा मी?”, सॅंन्टा वैतागुन म्हणाला.. “थोडंफार तरी प्रॉफीट निघायला नको का रावं? आम्हाला पण घरं चालवायचीच की”

“हम्म..” दरेकर काका उसासे सोडत म्हणाले
“मी तर कंटाळलो आहे बाबा आमच्या देश्याला. तुमच्या भारतात काही सोय होइल का हो माझी?” सॅंन्टा
“होईल ना.. आजकाल जेष्ठ नागरीक मंच आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणारे एन.जी.ओ जोरदार आहेत. येऊन जा नं इकडं”, दरेकर काका
“असं म्हणता? बर तुमच्या ओळखीत असेल कोणी तर मायग्रेशन साठी करा कि राव प्रयत्न, थोडा शब्द टाकलात तर होऊन जाईल काम..” सॅंन्टा अजीजीच्या स्वरात म्हणाला..

तेवढ्यात दरेकर वहिनी रेनडिअर्सना खाणं टाकुन आत आल्या.. “भाऊजी, जोडी वाळली की हो.. खायला घालत नाही की काय त्यांना? का रेनडिअर्स मध्येही झिरो-फिगर्स चे लोण पसरले आहे?” स्वतःच्याच विनोदावर हासत दरेकर वहिनी सॅंन्टासाठी काहीतरी खायला करायला आत गेल्या.

“नाही म्हणजे तुमच्या भारत देशात सगळं खपत, सगळं चालतं म्हणुन म्हणलं.. आमच्या इकडे पडलेले सिनेमे सुध्दा जरा हवा करुन इकडे पाठवले की जोमाने धंदा करतात.” सॅंन्टा
“हे मात्र खरं.. पण सॅंन्टा, तुला इथे नोकरी करायची असेल तर मराठी निट शिकुन घे रे बाबा.. उद्या उगाच त्याच्यावरुन इश्यु होयला नको.. काय?” दरेकरकाका
“नाही, काही इश्यु व्हायचा नाही, मी निट शिकुन घेतले आहे, माझा बायो-डाटा पण मराठीतच लिहिला आहे मी. देतो पाठवुन उद्या.. बघा जरा तुमच्या आफिसातच काही होतं असेल तर. डिलिव्हरीचि काही कामं असतील तर करत जाईन. तरणाबांड होतो तेंव्हा १०० घरं कव्हर करायचो दिवसाला. आता इतके होतं नाही.. पण तरी जमवतो कसे तरी.” सॅंन्टा

दरेकर वहिनी आतमधुन पॉपकॉर्न्स, वेफर्स, चिवडा आणि आलं-गवती चहा वापरुन बनवलेला चहा घेउन आल्या.

बन्या आणि चिंगीचि अजुनही चुळबुळ चालु होती. हे सॅंन्टा काका गाठोड्यातुन काहीच का काढत नाहीत याचे कोडं त्यांना उलगडत नव्हते.

“काय बनोबा, पुढच्या वर्षी दहावी ना? आणि तु गं चिंगे? तुझा कसा चालला आहे अभ्यास?”
सॅंन्टा च्या तोंडुन अभ्यासाचा विषय निघताच दोघांचेही चेहरे पडले.

“होssssहो.. होssss हो..” सॅंन्टा मनापासुन हसला.. बरं ते जाऊ देत. बोला काय हवं तुम्हाला क्रिसमसला?” गाठोड्याकडे वळत सॅंन्टा म्हणाला

बन्या किंवा चिंगी काही बोलणार एवढ्यात दरेकर काका म्हणाले, “सॅंन्टा, त्यांना तसं बरंच काही हवं असतं, पण खरं त्यांना ज्याची गरज आहे ते कदाचीत तुझ्या पोतडीत नाही. त्यांना हवे आहेत तुझे आशीर्वाद, कष्ट करण्यासाठी लागणारे बळ, सचोटी, सत्याच्या पातळीवर खरं उतरण्यासाठी लागणारी हिम्मत आणि निरोगी आयुष्य नावाची संपत्ती आयुष्यभर टिकवण्यासाठी लागणारी मेहनत.

आम्हा माणसांना फुकटात गोष्टी मिळवण्याची इतकी सवय लागली आहे की आजकाल बहुतेक सर्व जण कमी श्रमात जास्तीत जास्त गोष्टी मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. काही जण त्यात यशस्वी होतातही. पण हे यश चिरकाल टिकणारे नसते. माझ्या मुलांनी ह्या इतर लोकांसारखे होऊ नये असे मला वाटते..” दरेकर काका धिरगंभीर होत म्हणाले.

आपले बाबा हे काय भलते सलते मागत आहेत हे न कळुन बन्या व चिंगी बावचळले होते.

सॅंन्टा ने एकवार दरेकर काका, दरेकर वहिनी आणि मग बन्या, चिंगी कडे बघीतले.

मग सोफ्यावरुन उठला आणि गाठोडे पाठीवर टाकत तो म्हणाला, “मुलांनो, कदाचीत तुम्हाला तुमचे बाबा काय मागत आहेत ते आत्ता कळणार नाही, पण फार मोठ्ठी गोष्ट मागीतली आहे त्यांनी. आणि ते म्हणतात त्या प्रमाणे त्या गोष्टी खरंच माझ्या पोतडीत नाहीत. मुलांनो जेंव्हा तुम्ही संसारी व्हाल, आणि त्यानंतर वयस्कर व्हाल तेंव्हा तुम्ही कॉलेज मध्ये कुठली जिन्स वापरली होती, कुठल्या ब्रॅन्ड चे तुमचे घड्याळ, बुट होते, फिरायला गाडी कुठली होती हे कोणी विचारणार नाही. तेंव्हा तुमच्या उपयोगी पडेल ती तुम्ही आयुष्यभर झटुन कमावलेली विद्या आणि ज्ञानच. ह्या भौतीक गोष्टींच्या मागे न धावता तुम्ही एकाग्रतेने, जिद्दीने तुमचे शिक्षण पुर्ण करा. मग मोठ्ठ झाल्यावर तुम्हाला ह्या सॅंन्टाची आवश्यकताच भासणार नाही. सर्व सुखं तुमच्या पायाशी लोळणं घेतील.

तुमच्या पिढीने जरं तुमच्यात दडलेले गुण शोधले आणि स्वकर्तुत्वावर विश्वास ठेवला तर तुम्हाला सॅंन्टाची गरजच पडणार नाही. आणि मग मी ही असाच घरी आरामात बसुन माझ्या मुल-बाळं, नातवंडांसमवेत क्रिसमस साजरा करु शकेन.

येतो मुलांनो मी, खुप मोठ्ठे व्हा, माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत”

असं म्हणुन सॅंन्टा बाहेर पडला… दुस़या दरेकरकाकांच्या भेटीच्या अपेक्षेने…..

क्रिसमसच्या पुर्वसंध्येला, सर्व मराठी ब्लॉगर्सना डोक्यात भुणभुणणाऱ्या भुंग्याकडुन क्रिसमसच्या हार्दीक शुभेच्छा.

‘फ्रेंच किस’ रस्त्यावर???


‘सांकृतीक राजधानी’, ‘विद्येचे माहेरघर’ अशी बिरुदावली मिरवणारे पुणे बदलले आहे, जणु कातच टाकली आहे. पण इतके बदलले असेल याची मला कल्पना नव्हती.

बरेच दिवसांत आमचे डेक्कनला जाणे झालेच नव्हते, मुख्यतः संध्याकाळी. पण काल संध्याकाळी काही तरी काम निघालं आणि साधारणपणे ७-७.३० ला डेक्कनवरच्या झेड ब्रिजवरुन परतत होतो. आणि लक्षात आले की तो पुल कपल्सच्या शृंगाराने फुलुन गेला होता. पुलावर दुचाक्या लावुन त्याच्या आडोश्याला कोणी एकमेकांच्या गळ्यात गळे घालुन होते, कुणी एकमेकांच्या मिठीमध्ये विसावले होते तर काही ठिकाणी चक्क फ्रेंच किसेस चालु होते.

आश्चर्याचा धक्काच बसला. डेक्कनसारख्या वर्दळीच्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस असे प्रकार म्हणजे…! पुणं कधीपासुन इतके ‘प्रगत’ झालं? नाही म्हणजे, पुण्यात आहेत अशी अनेक ठिकाणं जेथे संध्याकाळी असा शृंगार फुललेला असतो, पण झेड-ब्रिजवर म्हणजे फारच झाले.

अर्थात त्यांची काही चुक नाही. त्यांनी तरी जायचं कुठं? ‘आमच्या’ काळी चांदणी चौकात, गार्डनकोर्ट पासुन एन.डी.ए पर्यंत रस्ता हा काळोख आणि एकांतात बुडलेला असायचा. तो स्पॉट ‘योग्य’ होता, पण नंतरच्या काळात त्या भागात चोऱ्यामाऱ्या वाढल्या आणि हळु हळु तेथील ‘गर्दी’ कमी होत गेली. पार्क्समध्येही आजकाल पोलीस उठवतात. आकाराने लहान होत चाललेली घरं आणि अजुनही अस्तीत्वात असलेली एकत्रीत कुटुंब पध्दती त्यामुळे प्रेमी युगुलांना हक्काच्या अश्या जागाच उरल्या नाहीत. सो त्यांचा प्रॉब्लेमही समजण्यासारखा आहे.

नुकतेच पुण्यात सिंहगड रोडवरील काही लॉज वर पोलीसांनी छापा घातला आणि ‘क्वालिटी टाईम’ साठी रुम्स भाड्याने घेउन राहीलेल्या अनेक कपल्सना ताब्यात घेतले. नुकतेच पुणे मिरर्स मध्ये ‘प्यार किया तो डरो’ नावाने याच्यावर आर्टिकल वाचण्यात आले होते.

फॅशन्सचा सर्व-सामान्य जनतेपर्यंत झालेला शिरकाव, अनेक ब्रॅन्ड्सचे कपडे, कॉस्मेटिक्स, विदेशी परफुम्स यामुळे ऍव्हरेज लुक्सचे तरूण-तरूणीही आजकाल आकर्षक दिसु लागले आहेत. चित्रपटात वाढत चाललेली चुंबन दृश्य, वाढती शारीरीक जवळीकीची दृश्य यामुळे ‘अश्या’ गोष्टी कॉमन झाल्या असाव्यात. पण तरीही, शारीरीक ओढ इतकी वाढावी?? ‘फ्रेंच किस’ रस्त्यावर घेण्याइतकी?

सहज मनामध्ये विचार आला जगं केंव्हाच बदलले आहे, बदलतं आहे. आम्ही संसारात, मुलाबाळांत इतके रममाण झालो आहोत की बाहेरच्या बदलत्या जगाची काही खबर-बातच राहीली नाही. बाजारात आलेल्या तरूणाईच्या ब्रॅन्ड्स-पेक्षा पोरांच्या खेळण्यांच्या ब्रॅन्ड्सची माहीती जास्ती ठेवली जात आहे बघा!!

पण खरं कारण तेच आहे, का आम्ही म्हातारे झालो आहोत? हे सगळे प्रकार आता अगदी ‘कुल’ झाले असले तरी आमच्या लेखी मात्र ते अजुनही ‘हॉटच’ आहेत!

भानामती


‘भानामती’ हा काय प्रकार आहे हे खरं तर वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. ‘अंधश्रध्दा निर्मुलन समीतीकडुन’ तर भानामती ही केवळ अंधश्रध्दा आहे हे अनेक वेळा लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आपलं वेडं मनं असल्या निरर्थक गोष्टी कुठेतरी ठेवुन देतंच ना आणि मग काय घडतं त्याचा हा किस्सा..

झालं असं, रविवारी दुपारी जेवणं उरकुन आरामात पहुडलो होतो, इतक्यात स्वयंपाकघरातुन भांडी पडण्याचा आवाज आला. एक, दुसरं आणी त्यामागोमाग तिन-चार भांडी धडाधड कोसळली.

काय झालं बघायला म्हणुन बायको स्वयंपाकघरात गेली आणि जोरात किंचाळलीच. म्हणुन मी, मागोमाग आई, वात्रट पोरगं ही धावलं काय झालं बघायला.

बघतो तर काय, एक छोटा कुंडा आपोआप पुढे सरकत होता. दोन मिनीटं बघतोय ते खरं का खोटं हेच कळेना.

हा काय प्रकार?, भानामती झाली की काय?“, मनामध्ये विचार चमकुन गेला. मग घाबरत घाबरत कपडे वाळत घालायची काठी आणली आणि त्या भांड्यावर जोरात मारली. दोन क्षण ‘ते’ भांड स्तब्ध झालं आणि लागलं की परत पुढे पुढे जायला. जाम टरकली होती. मग परत काठीने त्या भांड्याला ढोसरले, एका कडेने ढकलुन भांड उपडं केले आणि सगळा उलगडा झाला.

झालं असं, की स्वयंपाकघराच्या उघड्या खिडकीतुन एका खारुताईने आतमध्ये उडी मारली ती थेट भांड्यांच्या रॅकवरच. त्यामुळे धडाधड भांडी कोसळली. खारूताई पण घसरुन खाली पडली, आणि तिच्या अंगावर तो कुंडा पडला. त्यामुळे तिला काहीच दिसेना आणि ती ते भांड्याच्या आतुन पुढे पुढे जाऊ लागली.

भांड्यातुन बाहेर पडताच, टूणकण उड्या मारत, परत भांडी पाडत खारूताई खिडकीतुन बाहेर पळुन गेली.

हिच ती डॅंम्बीस भानामती खारूताई.

राजकोटचा थरार


कार्यालयात येत असतानाच मित्र म्हणाला, ‘सेहवाग सुटलाय नुसता’
संगणक चालु करुन लगेच ‘क्रिकईन्फो.कॉम’ चालु केले. खरंच राव, चौकारांना सुरुवात झाली होती. ८ च्या रन-रेटने खेळत होते.

“च्यायला हा तेंडल्या बघ, नुसता शांत उभा आहे, विचारले की म्हणतो, माझा खेळ परीपक्व झालाय, मी संयमी खेळी केली, आय वॉज एन्जॉयींग विरुज इनींग वगैरे..”

थोड्यावेळाने तेंडल्या सुध्दा सुरु होतो.

“आयला, कश्याला दोघं पण तुडवताय, एकाने शांत नको का रहायला??”

विरुचे ५० होतात. “जाईल बघ आता हा, टिकुन राहील जरावेळ तर शप्पथ..”

तेंडल्या आणि विरू दोघंही श्रीलंकन गोलंदाजांना बधत नसतात. तेंडल्याही ५० मारुन घेतो. जरा बरं चाललं आहे म्हणायला जावं तर कुठे तरी माशी शिंकते आणि तेंडल्या आऊट.

“कसला रे हा मास्टर ब्लास्टर, अजुनही क्लिन बोल्ड होतो.”

धोनी अवतरतो.
“घ्या आले महाराज. गंभीर फॉर्म मध्ये आहे, त्याला नको का पाठवायला? काय दिवे लावणार हा असा मध्ये येऊन?”

पण नाही. धोनी स्वतःवरील विश्वास सार्थ ठरवतो आणि ‘धोनी धुलाई केंद्र” सुरु होते. दोघंही जण गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेत असतात. अंदाजे स्कोर ३०० मग ३५०, ४०० आणि मग चक्क ४५० पर्यंत येऊन पोहोचलेला असतो.

कार्यालयात कामात लक्षच लागत नसते आणि अचानक क्लायंट कॉलची वेळ येऊन ठेपते. भारतीय वंशाचा अमेरीकेतील क्लायंटसुध्दा मॅचमध्ये गुंग असतो. कित्तेक वर्षाने आज कॉल मध्ये कामा-व्यतीरीक्त गप्पा होतात. कॉल लगेच संपतो आणि परत नजरा लंच-रुम मधील एल.सी.डी किंवा संगणकपटलावरील स्कोरकार्डकडे वळतात.

विरूचे शतक झालेले असते.

“आज हा असाच खेळत राहीला ना, तर २०० मारतो.”
“अरे २०० सोड, १९८ मारले तरी खुप झाले, त्या सईद-अन्वरचे नाव वर बघवत नाही राव”
कुणी म्हणायचाच अवकाश आणि विरेंद्र सहवाग गचकतो.

“झालं.. संपलं. टिकुन रहायची सोयच नाही.”
“अरे, तो काय तेंडल्या आहे का रेकॉर्ड साठी खेळायला, नैसर्गीक खेळ त्याचा..”

रैना गंभीर कडुन आशा लागलेल्या असताना ते अपेक्षाभंग करतात. धोनी सुध्दा गचकतो.

अपेक्षीत स्कोर पुन्हा ३७० वाटायला लागतो.

“कसली रे आपली भक्कम फळी? एक गेला की मागे रांगच लागते. काही अर्थ नाही बघ.”
“हो ना, आणि पिच इतके चांगले आहे. जयसुर्या, दिल्शान आणी संगकाराचे हात खाजत असतील. मला तर वाटतं ३०-४० ओव्हर्समध्येच संपवतील मॅच.”

विराट कोहली क्रिज मध्ये असतो.

“अरे एकदातरी तुझं टीम मध्ये असणं जस्टीफाय कर!, निदान आज तरी खेळ”

तडफडत स्कोर कसाबसा ४०० पार करतो आणि ४१४ वर मॅच संपते.

आता वेळ असते श्रीलंकेची. दिल्शान आणि थरंगा ओपनींग करतात. दिल्शान चा धडाका सुरु होतो. गोलंदाजांना तुड-तुड तुडवत सुटतो.

“कसले रे आपले हे गोलंदाज. वाईड काय, हाल्फ पिच काय, फुल-टॉस काय. छ्या. लायकीच नाही आपली जिंकायची.”
“काही नाही, हरलेच पाहीजेत, त्याशिवाय ताळ्यावर येणार नाहीत.”

झहीर नाही, नेहरा नाही, प्रवीण कुमार नाही, हरभजन नाही. कुणी सुटत नाही त्यांच्या तडाख्यातुन.

“मला तर वाटते आपण १०० एक रन कमी पडणार आहोत”

शेवटी रैनाकडुन ब्रेक मिळतो. थरंगा जातो. पण आपण आगीतुन फुफाट्यात पडतो. संगकारा टी-२०च्याच मुड मध्ये असतो.

“उगाच थरंगा आऊट झाला राव, चालले होते ते बरे होते.”

आता काही खरं नाही. सगळे आप-आपल्या कामाला लागतात. पण नकळत नजर स्कोरकार्ड कडे जात असतेच.

मिस-फिल्डिंगला उधाण आलेले असते. कॅच वर कॅच सुटत असतात.

“श्या.. अजुनही कोणी आऊट नाही. काय करतोय आपला कॅप्टन कुल?”

श्रीलंकन धुलाई-केंद्र जोरात चालु असते, आणि तळ्यातला गणपती पावतो. संगकारा आऊट.
पुन्हा एकदा दुर्दम्य आशावाद जागृत होतो.

जयसुर्या, भारताचा काळ अवतरतो.
“हा तर बघ आता काय करतो ते..” असं म्हणेपर्यंत जयसुर्या सुध्दा आऊट.

“अमेझींग.. वॉव.. जियो धोनी आणि भज्जी….”
पाठोपाठ अनपेक्षीतपणे दिल्शानही परततो.

पण डॅमेज झालेले असते. मॅच श्रीलंकेच्या अजुनही हातात असते.

गणपती बाप्पा सुध्दा आता फार्मात आलेले असतात. काही तुरळक शॉट्स नंतर जयवर्धने रन-आऊट होतो.
“चला, चमकला बाबा कोहली कुठेतरी.. वेल थ्रो..”

पाठोपाठ कंदंबीला सुध्दा तेंडल्या रन-आऊट करतो.
“जेष्ठ खेळाडूंनी कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला”
“तेंडल्या ने टिकाकारांची तोंड बंद केली.”

शेवटुन दुसरी ओहर जहीर अल्टीमेट टाकतो. पुन्हा रन-आऊटस होतात.

शेवटची ओहर. सगळे लंचरुम मधील एल.सी.डी. समोर जमलेले असतात.
मॅनेजर शोधत येतो..”अरे ५.१५ ला मिटींग होती ना..” स्कोर बघुन तो सुध्दा थबकतो.

६ बॉल ११ रन.

गर्दीमध्ये उभी असलेली नेहराची बायको सुध्दा टेन्स्ड असते.

“हा नेहरा घोळ घालणार बहुतेक”
“पिच चांगले आहे, एक थिक एज, एक गुड शॉट आणि संपले सगळे”
“अरे हा धोनी एवढा शांत कसा? जरा बॉलरजवळ जावं उगाचच चर्चा करावी, फिल्डींग चेंज करावी म्हणजे बॅट्समन वर टेन्शन येते रे…”

शेवटच्या ओव्हरचा प्रत्येक बॉल श्वास रोखणारा असतो.

शेवटचा बॉल… १ बॉल ५ रन.

पुन्हा एकदा चेतन शर्माच्या त्या ओव्हरची कडु आठवण जागी होते.

‘सिक्स नको राव मारायला..”
“फोर पण नको आहे रे..”
“नेहराने नो बॉल टाकला नाही म्हणजे मिळवले.. नाहीतर एक रन एक्स्ट्रा आणि परत फ्रि-हिट”

भयानक टेंन्शन..

नेहरा शेवटचा बॉल टाकतो आणि फक्त एक रन….

भारत जिंकला..

टाळ्यांचा कडकडाट..

बाहेर मुलाखतीसाठी आलेला उमेदवार स्वतःशीच .. “भारी कंपनी दिसतेय राव.. इथेच सिलेक्शन व्हायला पाहीजे..”

शेवट गोड होतो… सर्वांच्या चर्चा, शिव्या शाप, सल्ले, कौतुकाचा वर्षाव तुर्तासतरी थांबतो, पुढची मॅच सुरु होई पर्यंत……

नानाची दादागीरी


‘फाटकासमोर वाहनं लावु नयेत’, ‘इथे गाड्या लावु नयेत’ लावल्यास असं केलं जाईल, तसं केलं जाईल वगैरे पुणेरी पाट्या आपल्या वाचनात आल्या आहेतच. पण सोशीक पुणेकर सहसा असल्या गोष्टी करण्याच्या फंदात पडत नाहीत. पण नानाच्या.. अहो आपला ‘नाना पाटेकरच्या’ कृत्यांमुळे आमच्या कार्यालयातील कर्मचारी मात्र त्रासले आहेत हे नक्की.

त्याचे झालेय असे की आमच्या कंपनीच्या एका क्लायंटचे कार्यालय हे लॉ-कॉलेज रोडवरील एका गल्लीत आहेत आणि नेमके त्याच्या समोरच नाना पाटेकरांचा बंगला आहे.

कार्यालयाला पार्कींगची फार मोठ्ठी जागा नसल्याने बऱ्याचवेळा गाड्या रस्त्यावरच लावाव्या लागतात. एखाद्याने गाडी चुकुन नानाच्या बंगल्याच्या गेटा-बाहेर लावली तर मात्र त्याची काही खैर नाही.

काही दिवसांपुर्वीच माझ्या एका मित्राची वॅगन-आर एकाबाजुने चेपलेल्या स्थितीत आढळली. बघणार्य़ांकडुन आणि त्या बंगल्याच्या वॉचमनकडुन कळले की नानानेच ती गाडी मुद्दामहुन ठोकली. का? कारण ती गेटच्या समोर लावली होती. आणि असे किस्से बऱ्याच वेळा घडले आहेत.

काल तर मात्र कहरच झाला. माझ्या एका मित्राने त्याची स्कोडा गाडी बंगल्याच्या गेट समोर लावली होती. दुपारी खाली आला तेंव्हा गाडीच्या कडेच्या खिडकीच्या दोन्ही काचा आणि गाडीची मागची पुर्ण काच फोडलेली होती. तो बिच्चारा बघतच होता की नाना पाटेकर तिथे आले आणि त्याला त्याच्या खास शैलीत ऐकवले..

ये आपका गाडी है क्या? अच्छा.. बच्चे.. गाडी वापस यहापे लगानेका नही हा.. याद रखना.

ठिक आहे.. तो एक मोठ्ठा कलाकार आहे, त्याच्याबद्दल कलाकार म्हणुन मला आदर वाटतो आणि आवडतो सुध्दा, पण एक माणुस म्हणुन मला तरी त्याचे हे कृत्य आवडले नाही बा!

कोण पोलीसांत तक्रार करणार त्याची? आणि नोकरी धंदे सोडुन त्या शिघ्रकोप्याशी कोण भांडत बसणार? आपलीच चुक म्हणुन बिच्चारा मित्र गप्प बसला अजुन काय?

बर अगदी गेटाच्या बाहेरच गाडी लावली आहे, आणि त्याला गाडी काढताच येत नाही बाहेर तर गोष्ट वेगळी. असो.. पोस्ट लिहीण्याचा उद्देश हा, की तुमच्यापैकीच कोणी चुकुन याठिकाणी आलात आणि कुणी तुम्हाला सांगीतले की हा नाना-पाटेकरचा बंगला आहे, इथे गाडी लावु नका, तर त्यावर विश्वास ठेवुन १० कि.मी. लांब लावावी लागली तरी चालेल, पण तिथे गाडी लावु नका.

मजेदार मुलाखत


रिसेशन / मार्केट स्लो-डाउनने कच खाल्ली आणि आय.टी. कंपन्यांमध्ये नविन जागा, नविन संधी पुन्हा उपलब्ध होऊ लागल्या. अर्थात वेळ वाचावा म्हणुन म्हणा किंवा उमेदवार दुसऱ्या गावचा असल्याने म्हणा, प्रथम मुलाखत ही शक्यतो दुरध्वनीवरच घेतली जाते.

अश्याच एका मजेदार मुलाखतीचा मी अनुभवलेला हा प्रसंग –

समोरच्या दुरध्वनीचा स्पिकर चालु करुन त्यावर दिलेला नंबर डायल केला. उमेदवार चैन्नई नामक शहरातील होता. संगीतमय कॉलर ट्युन्स मुळे फोन लागताच तमीळ भाषेतील कुठलेसे गाणे जोरदार सुरु झाले. मी दचकुन फोनच्या स्पिकरचा आवाज कमी केला.

‘हालो’, पलीकडुन आवाज आला.
‘एम आय स्पिकिंग तु मिस्टर गोपालक्रिश्नन अय्यर? (नाव बदलेले आहे)’
‘यास सार, दॅट इज करेक्ट सार’

मग जुजबी चौकश्या करुन, मुख्य मुद्याला हात घातला. प्रश्न चालु होते एक क्रिटिकल प्रश्न विचारला आणि इतक्यात

‘कुssssss.. धडाड धडाड.. धडाड धडाड..’ मोठ्ठा आवाज आला. शेजारुन आगगाडी जात होती.
पुर्ण वेळ स्पिकरवर कु… आणि धडाड चे आगगाडिचे आवाज येत होते.

कॉन्फ रुम मधुन असले अपरीचीत येणारे आवाज ऐकुन बाहेरुन ३-४ लोक दरवाज्यापाशी जमा झाली होती.

शांतता झाल्यावर.. मी विचारलं..

‘हॅलो.. मिस्टर अय्यर, यु देअर..’
‘यास सार.. सारी सार, ट्रेन’

मी पुढचा प्रश्न विचारणार एवढ्यात

कुठलीशी ए़क्स्प्रेस येत आहे याची तेथील निवेदीकेने तिच्यापरीने काढलेल्या गोड आवाजात सुचना केलेली ही ऐकु आली.

‘हॅलो मिस्टर अय्यर, व्हेअर आर यु राईट नाऊ?’ मी
‘सार आय एम ऍट रेल्वे प्लॅटफॉर्म’
‘कॅन यु प्लिज गो टु सम प्लेस व्हेअर देअर इज अ लेस डिस्ट्रबंन्स?’
‘येस सार, सॉरी सार’
‘मिस्टर अय्यर, इंटरव्हु वॉज स्केड्युल्ड लॉंग बॅक, यु शुड हॅव…’
‘सारी सार.. आय एम गोईंग आऊट सार’

मग थोड्यावेळ वेगवेगळे आवाज येत राहीले कधी अनांन्समेंट्चे, कधी दुरुन येणाऱया आगगाड्यांचे, कधी त्याचा चालताना दम लागलेला.. श्वास घेताना…

दाराबाहेर थांबलेली लोकं, आत मध्ये येऊन बसली होती.

‘सार, वुई कॅन टॉक नाऊ…’ अय्यरचा आवाज आला
‘गुड.. सो व्हेअर वेअर वुई’.. मी विसरलोच होतो मुलाखत चालु होती.

मग परत प्रश्न सुरु झाले. बाजुने अजुनही गडबड गोंधळाचे आवाज येत होतेच, पण निदान ते रेल्वेच्या आवाजापेक्षा बरे होते.

थोडाफार डिस्ट्रर्बंन्स कमी झालेला बघुन परत एक हुकमी प्रश्न विचारला. उत्तर ऐकु येणार इतक्यात..

‘ए ताना.. दिन ताना.. उर्वशि.. ढिंक टाक.. ढिटांडा.. ढि..’ जोरदार आवाज आला..
‘मिस्टर अय्यर.. नाऊ व्हॉट इज धिस?’ मी वैतागुन ओरडलो..
‘सारी सर, आय एम स्टॅंडीग ऍट अ सिग्नल सर, सम कार विथ अ लाऊड म्युझीक प्लेयींग इज स्टॅंडीग इन फ्रंट ऑफ मी.’
‘बट मी. अय्यर..’
पण तो पर्यंत त्याने फोन कानावरुन काढला होता आणि तो त्या कारवाल्याशी काही तरी बोलत होता.

कॉन्फ रुम मध्ये खसखस पिकली होती.. माझ्या रागाचा पारा अनावर झाला होता.. वाटत होतं फोन आपटुन बंद करुन टाकावा..

थोड्यावेळाने सिग्नल सुटला असावा, जोरजोरात गाड्यांचे हॉर्न ऐकु आले.. मग बस, रिक्षा, टु-व्हिलर्स गाड्या गेल्या, मिस्टर अय्यर चा पळत पळत रस्ता ओलांडणे, सगळे ऐकले.

‘सारी सर, टु मच डिस्टर्बंन्स’
‘मि.अय्यर, आय कान्ट कंन्टीन्यु विथ द इंटर्व्हयु राईट नाऊ, लेट्स रि-स्केड्युल ईट टुमॉरो, प्लिज बी ऍट अ बेटर प्लेस’
‘ओके.. सार, सॉरी सार’
‘बाय द वे मि.अय्यर, व्हेअर आर यु स्टॅंडीग नाऊ?’

‘… सारी सार.. आय वॉज गोइंग इन अ रेस्टरुम, देअर वोंट बी एनी डिस्टर्बंन्स’

मी फोन ठेवुन दिला. नंतर विचार केला.. बरं झालं ठेवला फोन, मुलाखत चालु ठेवली असती तर न जाणो अजुन कसले कसले आवाज ऐकायला लागले असते….

[कृपया प्रादेशीक भाषा, प्रदेश याबद्दलचा कोणताही वाद ओढवु नये. केवळ हा एक घडलेला प्रसंग नमुद केला आहे, त्यात कोणत्याही व्यक्तीची, प्रदेशाची टिंगल करण्याचा हेतु नाही.]

निबंध


“फार छान लिहीतोस रे तु..” एक परीचीत मला काही दिवसांपुर्वी मला म्हणाले होता. त्याचे पडसाद काय असतील ते मला तेंव्हा समजले नव्हते जे नंतर समजले.

झालं असं की, माझा हा मराठी ब्लॉग आणि त्यावरील लिखाण बघुन माझ्या एका परीचीतांनी मला नुकतीच एक नविन कामगीरी सोपावली आहे, निबंध लिहीण्याची. त्याचा मुलगा दहावीच्या परीक्षेला बसत आहे आणि त्यासाठी त्याला मराठी निबंध हवे आहेत. काही दिवसांपुर्वी शाळेत सांगीतले आहे म्हणुन काही निबंध मी लिहुन दिले, जे फारच आवडले. पण आता त्यांनी मला बोर्डाच्या परीक्षेत येऊ शकतील असे अपेक्षीत १५-२० निबंध लिहायला दिले आहेत. कळलं तुम्हाला आता सध्या माझ्या ब्लॉगवर जास्ती पोस्ट का नाहीत? आणि माझी कथा इतकी का लांबली आहे? पटापट पोस्ट का येत नाहीत? एकतर कामाच्या व्याप सध्या वाढलेला आहेच, पण त्याहुनही जो वेळ मिळेल त्यात मी दहाविचे अपेक्षीत निबंध लिहीत आहे ना!

असो.. माझ्या लेखन शैलीचा कुणाला उपयोग होत असेल तर काय वाईट आहे? त्यातुनच पुढे विचार केला की हे निबंध जर ब्लॉग वर उपलब्ध करुन दिले तर कदाचीत इतर मुलांनाही थोड्याफार प्रमाणात मदत मिळु शकेल. माझ्या माहीतीत तरी महाजालावर अशी संकलीत माहीती एकत्र उपलब्ध असेल असे वाटत नाही.

निबंधामध्ये काही संदर्भ हे महाजालावर उपलब्ध असणाऱ्या माहीतीच्या आधारे घेतलेले आहेत त्याचे राईट्स ज्या त्या लेखकाला साभार.

निबंधाची लांबी जास्तीत जास्ती हस्ताक्षरात एक फुल-स्केप इतकी हवी असल्याने थोडक्यात लिहीले आहेत. त्यामुळे सर्व विषय निबंधाच्याच रुपात असतीलच असे नाही. काही ठिकाणी प्रमुख मुद्दे थोडेसे विस्तार करुन लिहीलेले आहेत. आवश्यकता भासल्यास आपण ते मुद्दे वाढवुन निबंधाची लांबी वाढवु शकता.

हे निबंध आपल्याला कोणत्याही प्रकारे उपयोगी पडल्यास प्रतिक्रिया जरुर कळवा.

निबंधाच्या पानावर जाण्यासाठी इथे टिचकी मारा.