खरं सांगायचं तर ‘सलील कुलकर्णी’ आणि ‘संदीप खरे’ ची मी फारशी गाणी ऐकलेली नाहीत. का कुणास ठाऊक, पण कधी योग जुळुन आला नव्हता. ‘आयुष्यावर बोलु काही’ सुध्दा मी अजुन पर्यंत ऐकलेले नाही.
काल यु-ट्युब वर फेरफटका मारताना अचानकपणे मला ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ चा व्हिडीओ मिळाला. ह्याबद्दल बऱ्याच जणांकडुन ऐकुन, वाचुन होतो पण कधी ऐकले नव्हते. कार्यालयात दुपारनंतर पिकनीकसाठी निघायचे असल्याने कामही यथातथाच होते, म्हणलं ऐकावं.. बघावं काय आहे ते म्हणुन व्हिडीओ चालु केला आणि काही क्षणातच त्या गाण्यात इतका गुंगुन गेलो की डोळ्यातुन अश्रुंचे थेंब कधी ओघळले कळाले सुध्दा नाही.
गाण सुरु होतं आणि काही काळातच नाकपुड्या फुरफुरु लागल्या. डोळे जड होऊ लागले डोळ्यात जमा झालेले पाणी कुणी बघु नये म्हणुन उगाचच डोक्याला कडेने हात लावुन बसलो होतो. गाण्याचे सुर, ती तान इतकी भयानक होती की वाटत होते अजुन काही काळ हा सुर लांबला तर खरंच रडु लागेन. गाण्यात इतकी विलक्षण ताकद होती की मी अक्षरशः ते गाणं सहन नं होऊन बंद करुन टाकलं.
एका बाबा साठी मांडलेले हे गाणं खरंच काळजाला हात घालुन गेले त्याबद्दल सलील आणि संदीपची करावी तेवढी प्रशंसा थोडीच आहे. साध्या सोप्प्या शब्दात केलेला हा अविष्कार श्रोत्यांचे डोळे नं पाणावेल तर नवलचं.
‘तुझ्यासाठी आईपरी बाबा सुध्दा खुळा
तोही कधी गुपचुप रडतो रे बाळा‘
हेच ते क्षण होते जेंव्हा मी आश्रुंना आवरु शकलो नाही.
काळ बदलला आणि काळाच्या ओघात जशी आई घरातुन बाहेर पडली, ‘चूल आणि मूल’ इतकेच तिचे विश्व न रहाता ते अधीक व्यापक झाले, तस्सेच आजच्या बाबांच्या अंगी सुध्दा हळवेपणा आला. पुर्वीचे कठोर, घनगंभीर, रागीट ‘अण्णा’, ‘अप्पा’ जाऊन आजचा ‘ए बाबा’ जन्मला. आपल्या बाळासाठी हळवा होणारा, त्याच्या आठवणींमध्ये कोमेजुन जाणारा आजचा बाबा एका विचीत्र कात्रीत सापडला आहे.
आपल्या सानुल्यासाठी सर्वेतोपरी देण्याच्या प्रयत्नात काही निवडक लोकांपायी त्याची सुध्दा फरफट होत आहे. एकीकडे सर्वेतोपरी देण्याच्या प्रयत्नात अधीक पैसा कमावणे त्याला खुणावते आहे तर दुसरीकडे हातातुन निसटुन चाललेले क्षण, आपल्या बाळाचे डोळ्यासमोर निघुन चाललेले बालपण त्याला सतावते आहे.
माझा एक मित्र ‘मर्चंट नेव्ही’ मध्ये कामाला आहे. गेला की एकदम सहामहिन्यांनी पुन्हा घरी येतो. जाण्याआधी एकदा आम्ही सर्व हॉटेलमध्ये बसलो होतो. भरपुर बोलत होता तो. एशिया बरोबरच युरोप, अमेरीका सुध्दा फिरतीच्या नोकरीमुळे बराचसा पाहुन झाला होता. वेगवेगळे देश, वेगवेगळे अनुभव भरपुर त्याच्या गाठीशी होते. ह्यावेळेस आला होता ते त्याला मुलगा झाला म्हणुन. इथुन जाईल तेंव्हा मुलगा महिन्याचा असेल. मुलाचा विषय निघाला तेंव्हा मात्र त्याचा ‘प्राईड’ असलेली त्याची नोकरी क्षणार्धात त्याच्यासाठी फडतुस झाली होती. कारण पुढच्या वेळेस तो जेंव्हा घरी येईल तेंव्हा त्याचा मुलगा एक वर्षाचा झाला असेल. त्याचे हसणे, रडणे, डोळ्यात उमटणारे आपल्यांबद्दलचे ओळखीचे भाव, उठुन बसणे, रांगणे, धरुन चालणे सगळ्याला तो मुकणार होता.
परवाच असाच एक किस्सा एकाने सांगीतला. त्या मुलाचे वडीलही असेच फिरतीच्या नोकरीवर. मुलाला त्यामुळे घरी कोणी आले की ‘बाबा बाहेरगावी असतात’ सांगण्याची सवय. एक दिवस बाबाच घरी आला आणि त्याच्याच मुलाने त्याला ‘बाबा घरी नाहीत’ म्हणुन सांगुन टाकले. काय प्रसंग ओढवला असावा त्याच्यावर हे न लिहीणेच योग्य.
काही ‘प्रॅक्टीकल’ बाबाही आहेत जे पैश्याच्या मागे फारसे धावत नाहीत. त्यांचे पाय अजुनही जमीनीवर आहेत पण त्यामुळे त्यांचीसुध्दा ओढाताण होते आहेच. एकीकडे बाळासाठी सर्वोत्तम ते देऊ शकत नाही ह्याचे दुःख तर दुसरीकडे इतरांइतकी नसली तरीही होणारी कामाची दगदग, धावपळ ह्यामुळे निसटुन चाललेल्या प्रत्येक क्षणाचा हिशोब मांडताना होणारी कसरत संदीपने आपल्या ह्या ओळींमधुन योग्य रीतीने मांडली आहे.
ऑफिसात उशीरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास-तास जातो खाल मानेने निघून
एक-एक दिवा जातो हळूच विझून
अशा वेळी काय सांगू काय-काय वाटे
आठवासोबत पाणी डोळ्यांतून दाटे
आणि शेवटचे पद्य सर्व श्रोत्यांना अंतर्मुख करुन जाते.
असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशीरानं येतो
बालपण गेले तुझे-तुझे निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये
त्या दिवशी कार्यालयात असल्याने मनावर संयम ठेवुन हा व्हिडीओ पाहीला, पण आज रात्री मात्र पुन्हा एकदा हा व्हिडीओ पहाणार. मनावर आलेले दडपण झुगारुन टाकणार. मनामध्ये साठलेले अनेक प्रश्न, विचार, चिंता अश्रुंच्या रुपाने मोकळ्या करुन टाकणार ..
‘हो बाळा.. आज पुन्हा एकदा एक बाबा गुपचुप रडणार..’
‘सलील कुलकर्णी’ आणि ‘संदीप खरे’ ह्या खरोखरच अश्या अतुलनीय गाण्याबद्दल, अश्याच एका हळव्या बाबाकडुन तुमचे अभिनंदन आणि शतशः आभार.