दमलेल्या बाबाची कहाणी


खरं सांगायचं तर ‘सलील कुलकर्णी’ आणि ‘संदीप खरे’ ची मी फारशी गाणी ऐकलेली नाहीत. का कुणास ठाऊक, पण कधी योग जुळुन आला नव्हता. ‘आयुष्यावर बोलु काही’ सुध्दा मी अजुन पर्यंत ऐकलेले नाही.

काल यु-ट्युब वर फेरफटका मारताना अचानकपणे मला ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ चा व्हिडीओ मिळाला. ह्याबद्दल बऱ्याच जणांकडुन ऐकुन, वाचुन होतो पण कधी ऐकले नव्हते. कार्यालयात दुपारनंतर पिकनीकसाठी निघायचे असल्याने कामही यथातथाच होते, म्हणलं ऐकावं.. बघावं काय आहे ते म्हणुन व्हिडीओ चालु केला आणि काही क्षणातच त्या गाण्यात इतका गुंगुन गेलो की डोळ्यातुन अश्रुंचे थेंब कधी ओघळले कळाले सुध्दा नाही.

गाण सुरु होतं आणि काही काळातच नाकपुड्या फुरफुरु लागल्या. डोळे जड होऊ लागले डोळ्यात जमा झालेले पाणी कुणी बघु नये म्हणुन उगाचच डोक्याला कडेने हात लावुन बसलो होतो. गाण्याचे सुर, ती तान इतकी भयानक होती की वाटत होते अजुन काही काळ हा सुर लांबला तर खरंच रडु लागेन. गाण्यात इतकी विलक्षण ताकद होती की मी अक्षरशः ते गाणं सहन नं होऊन बंद करुन टाकलं.

एका बाबा साठी मांडलेले हे गाणं खरंच काळजाला हात घालुन गेले त्याबद्दल सलील आणि संदीपची करावी तेवढी प्रशंसा थोडीच आहे. साध्या सोप्प्या शब्दात केलेला हा अविष्कार श्रोत्यांचे डोळे नं पाणावेल तर नवलचं.

तुझ्यासाठी आईपरी बाबा सुध्दा खुळा
तोही कधी गुपचुप रडतो रे बाळा

हेच ते क्षण होते जेंव्हा मी आश्रुंना आवरु शकलो नाही.

काळ बदलला आणि काळाच्या ओघात जशी आई घरातुन बाहेर पडली, ‘चूल आणि मूल’ इतकेच तिचे विश्व न रहाता ते अधीक व्यापक झाले, तस्सेच आजच्या बाबांच्या अंगी सुध्दा हळवेपणा आला. पुर्वीचे कठोर, घनगंभीर, रागीट ‘अण्णा’, ‘अप्पा’ जाऊन आजचा ‘ए बाबा’ जन्मला. आपल्या बाळासाठी हळवा होणारा, त्याच्या आठवणींमध्ये कोमेजुन जाणारा आजचा बाबा एका विचीत्र कात्रीत सापडला आहे.

आपल्या सानुल्यासाठी सर्वेतोपरी देण्याच्या प्रयत्नात काही निवडक लोकांपायी त्याची सुध्दा फरफट होत आहे. एकीकडे सर्वेतोपरी देण्याच्या प्रयत्नात अधीक पैसा कमावणे त्याला खुणावते आहे तर दुसरीकडे हातातुन निसटुन चाललेले क्षण, आपल्या बाळाचे डोळ्यासमोर निघुन चाललेले बालपण त्याला सतावते आहे.

माझा एक मित्र ‘मर्चंट नेव्ही’ मध्ये कामाला आहे. गेला की एकदम सहामहिन्यांनी पुन्हा घरी येतो. जाण्याआधी एकदा आम्ही सर्व हॉटेलमध्ये बसलो होतो. भरपुर बोलत होता तो. एशिया बरोबरच युरोप, अमेरीका सुध्दा फिरतीच्या नोकरीमुळे बराचसा पाहुन झाला होता. वेगवेगळे देश, वेगवेगळे अनुभव भरपुर त्याच्या गाठीशी होते. ह्यावेळेस आला होता ते त्याला मुलगा झाला म्हणुन. इथुन जाईल तेंव्हा मुलगा महिन्याचा असेल. मुलाचा विषय निघाला तेंव्हा मात्र त्याचा ‘प्राईड’ असलेली त्याची नोकरी क्षणार्धात त्याच्यासाठी फडतुस झाली होती. कारण पुढच्या वेळेस तो जेंव्हा घरी येईल तेंव्हा त्याचा मुलगा एक वर्षाचा झाला असेल. त्याचे हसणे, रडणे, डोळ्यात उमटणारे आपल्यांबद्दलचे ओळखीचे भाव, उठुन बसणे, रांगणे, धरुन चालणे सगळ्याला तो मुकणार होता.

परवाच असाच एक किस्सा एकाने सांगीतला. त्या मुलाचे वडीलही असेच फिरतीच्या नोकरीवर. मुलाला त्यामुळे घरी कोणी आले की ‘बाबा बाहेरगावी असतात’ सांगण्याची सवय. एक दिवस बाबाच घरी आला आणि त्याच्याच मुलाने त्याला ‘बाबा घरी नाहीत’ म्हणुन सांगुन टाकले. काय प्रसंग ओढवला असावा त्याच्यावर हे न लिहीणेच योग्य.

काही ‘प्रॅक्टीकल’ बाबाही आहेत जे पैश्याच्या मागे फारसे धावत नाहीत. त्यांचे पाय अजुनही जमीनीवर आहेत पण त्यामुळे त्यांचीसुध्दा ओढाताण होते आहेच. एकीकडे बाळासाठी सर्वोत्तम ते देऊ शकत नाही ह्याचे दुःख तर दुसरीकडे इतरांइतकी नसली तरीही होणारी कामाची दगदग, धावपळ ह्यामुळे निसटुन चाललेल्या प्रत्येक क्षणाचा हिशोब मांडताना होणारी कसरत संदीपने आपल्या ह्या ओळींमधुन योग्य रीतीने मांडली आहे.

ऑफिसात उशीरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास-तास जातो खाल मानेने निघून
एक-एक दिवा जातो हळूच विझून
अशा वेळी काय सांगू काय-काय वाटे
आठवासोबत पाणी डोळ्यांतून दाटे

आणि शेवटचे पद्य सर्व श्रोत्यांना अंतर्मुख करुन जाते.

असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशीरानं येतो
बालपण गेले तुझे-तुझे निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये

त्या दिवशी कार्यालयात असल्याने मनावर संयम ठेवुन हा व्हिडीओ पाहीला, पण आज रात्री मात्र पुन्हा एकदा हा व्हिडीओ पहाणार. मनावर आलेले दडपण झुगारुन टाकणार. मनामध्ये साठलेले अनेक प्रश्न, विचार, चिंता अश्रुंच्या रुपाने मोकळ्या करुन टाकणार ..

‘हो बाळा.. आज पुन्हा एकदा एक बाबा गुपचुप रडणार..’

‘सलील कुलकर्णी’ आणि ‘संदीप खरे’ ह्या खरोखरच अश्या अतुलनीय गाण्याबद्दल, अश्याच एका हळव्या बाबाकडुन तुमचे अभिनंदन आणि शतशः आभार.

 

18 thoughts on “दमलेल्या बाबाची कहाणी

 1. ‘बाबा’ रे. अजून मी बाबा नसलो तरी मला सुद्धा माझ्या नोकरीचा अत्ता पासूनच विचार पडलाय… बघुया पुढे काय होते ते… बाकी भावना पूर्ण प्रामाणीकपणे मांडल्यास. तुझा हां लेख काही वर्षांनी तुझा मुलगा वाचेल तेंव्हा त्याला काय वाटेल ? कसे वाटेल ???

 2. अनिकेत,

  हे गाणं, हि कविता प्रत्येकाच्याच मनाला भिडते.. नव्हे जखमेवरची खपलीच काढते!

  या विडीयोमध्येसुद्धा जेव्हा-जेव्हा प्रेक्षकांवर कॅमेरा फिरलाय, तेव्हा-तेव्हा प्रत्येक जण रडतांनाच दिसलाय.
  आणि ती धाय मोलकडुन रडणारी लहान मुलगी पाहिलीस? म्हणजे बघ, किती लोकांच्या मनात खोलवर हि कविता शिरते ते…

 3. असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
  हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून
  .
  मीही नुकताच बाबा झालोय.. आणि आता रात्रीचे ११.१० झालेत.. अजुनही ओहिस मध्येच आहे…
  घरी गेल्यावर गेले पाच दिवस माझी हिच अवस्था आहे.. मी ही नुसतं झोळित डोकावून पाहतो नील ला… झोपलेला असतो बिच्चारा..खुप वाटतं त्याला जागं करावं.. पन नको वाटत.. त्याची झोप मोडायला>.

 4. खोचक

  सर्व दमलेल्या बाबांनी उद्योजक बनावे व योग्य गुंतवणूक करुन स्वत:साठी वेळ काढावा.

 5. अनिकेत, माझीही अगदी अशीच अवस्था झाली होती. कुठल्याही सिनेमाने किंवा नाटकाने आजवर माझ्या डोळ्यातून पाणी आले नव्हते पण या गाण्याने आले. अगदी मनाला भिडणारे गाणे आहे.

 6. खरंय दोस्त!
  काही वर्षे नाईटशिप्ट करताना मी माझ्या मुलीला असंच फक्त झोपतानाच पहायचो..
  हा कार्यक्रम जेंव्हा टी.व्ही वर चालु होता, तेंव्हा मी एकट्यानेच पाहिला.. तशी आधीच सोय करुन ठेवली होती.. अगदी मन भरुन आलं होतं… धाय मोकलुन रडावं असं झालं, रडलो ही!

 7. हा कार्यक्रम मी बघितला होता. खरच पूर्ण कार्यक्रम मंत्रमुग्ध होऊन बघितला होता. मला संदीप खरेंच खूप कौतुक वाटत आणि हेवा सुद्धा. इतक नेमक्या शब्दात सगळ्यांच्या मनातल मांडता येण हि खूप मोठी गोष्ट आहे.

 8. प्रभास, अनिकेत –
  ती लाल साडीतली बाई संदीप खरेची पत्नी आहे आणि ती मुलगी संदीपची कन्या !! मी भेटलोय त्यांना तीन-चारवेळा.
  हे गाणे या कार्यक्रमात पहिल्यांदाच सादर झालं म्हणून सर्वांनाच अश्रू आवरणं कठीण गेलं…हे तर नीट नव्हत बसलं तेंव्हा…. आता ’दमलेल्या बाबाची कहाणी’ हा अल्बम आला आहे. त्यातलं पुर्ण ’फिनीश’ केलेलं हे गीत ऐका.. वेडेव्हाल…. विशेषतः “तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग?” या ओळीपासून सुरू झालेल्या तार सप्तकातल्या शेवटच्या काही ओळी आहेत ना, त्याच्या बॅकग्राउंडला सलीलने अंगावर काटा आणणारी हार्मनी दिली आहे. ती बाप आहे !!
  हवं असल्यास सांगा…. गाणं मेल करतो लगेच !!!!

 9. shekhar

  मी संदीप-सलील चे almost सर्वच गाणे ऐकतो, जाम आवडतात. हे गाणे मी घरापासून दूर आल्यावर ऐकले तीनेक महिन्यापूर्वी आणि एकटाच रडलो…..पप्पा रडतो पण असे पोराला कळले तर विश्वास नाही बसणार त्याचा……
  खरय हल्लीचा बाबा जास्त close असतो मुलांच्या …..shift duty , tours , projects , career यात हि वेळ कधी निसटून जाते ..नाही कळत

 10. संजय

  मी हे गाणे आता पहिल्यांदा ऐकले आणि खूप खूप रडलो. फरक ऐवढाच होता कि मी त्याला कुशीत घेतले होते (offcourse तो झोपला आहे). सगळी मुले मम्मी/आई म्हणून रडतात तर माझा मुलगा बाबा म्हणून रडायचा आणि अजूनही जर तो पडला वा त्याला काही लागले तर त्याच्या तोंडात नकळत बाबा असेच येते. ते आठवून तर जास्तच रडू आले.

  Workload, extra hours हे सगळे कॉमन झाले आहे. पण प्लीज weekend तरी मुलांना पुर्णपणे द्या. रोज उशीर होत असेल तर आठवद्यातून एकदा घरुन काम करण्याचा प्रयत्न करा.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s