Monthly Archives: February 2010

सादर करत आहोत, मराठी ब्लॉगर्सचे हक्काचे व्यासपीठ


सादर करत आहोत, मराठी ब्लॉगर्सचे हक्काचे व्यासपीठ, 
यंदाच्या धुळवडीच्या दिवशी, १ मार्च २०१० रोजी.
फाल्गुन कृष्ण द्वितिया, शके १९३१.
रात्रौ: १०:०३ मि. (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
आपली ऑनलाईन
उपस्थिती नोंदवा.

अधिक माहितीसाठी जरुर लिहा अथवा चॅट करा
pankajzarekar@gmail.com
mebhunga@gmail.com
aniket.com@gmail.com
vikrant.deshmukh888@gmail.comज्ञानेश्वरांच्या”परि अमृताच्याही पैजा जिंके” नंतर कुण्या पोर्तुगीज फादर स्टीफन्सने लिहिलेल्या या ओळीच मराठीचा गोडवा सांगण्यास पुरेशा आहेत. आहेच आमची मऱ्हाटी वाणी अशी की… कुणालाही ऐकताना भुरळ पडावी. कुणी मनापासून कौतुक केले की कानात सतारीच्या तारा छेडल्याचा भास व्हावा आणि अगदी मनापासून शिवी हासडली तर कानात उकळते तेल ओतल्यागत जाळ अंतर्मनात निघावा अशी आमची मराठी. “महा”राष्ट्राची बोलीभाषा, राजभाषा आणि जनभाषा.
होय तोच मराठी जिथे प्रांत उगवत्या सुर्याच्या साक्षीने मंदिरातल्या काकडआरतीबरोबरच मशिदीची पहिली सुरेल बांगही तेवढीच सुंदर ऐकू येते.  जिथे संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ओवीने अवघ्या जगाला वेडे केले. तुकोबांच्या अभंगांनी अवघा मनुष्यगण अद्वैत झाला. संत एकनाथांनी जगाला भूतदयेचा संदेश दिला. रामदास स्वामींनी बलोपूजेचा मंत्र फुंकला.
याच संत-महंतांपासून स्फूर्ती घेऊन शहाजीराजे आणि जिजाऊंनी शिवाजी महाराजांसारखा पुत्र घडवला, शिवाजी महाराजांनी याच ओघवत्या मराठी भाषाकौशल्यावर जेधे, पिंगळे, देशपांडे, गुजर, मालुसरे अशी वाघाच्या काळजाची माणसे जोडली, महाराष्ट्राबाहेर जाऊन प्रांत जोडला आणि परक्या शक्तींना आपल्या तलवारीच्या आणि या मराठी मातीतून आलेल्या धाडसाच्या जोरावर पाणी पाजले. याच मराठी धर्मापायी संभाजीराजांनी मृत्यू कवटाळला.पेशव्यांनी शिंदे फडणीसांच्या बळावर अटकेपार झेंडे लावले. तात्या टोपेंनंतर वासुदेव बळवंत फडकेंनी क्रांतीची पताका उभारली आणि पुढे टिळक, आगरकर आणि सावरकरांसारखे निधड्या छातीचे वीर ती पताका घेऊन मिरवले.

गोखले, आंबेडकर, कर्वे, फुले, विनोबा भावे, भाऊराव पाटील, कॉ. डांगे यांसारख्या समाज धुरिणांनी जो पाया घालून दिला होता त्यावर बाबा आमटे आणि त्यांचे कुटुंबीय, अशासारख्यांनी कळस उभारला. कला-क्रीडा आणि साहित्यामध्येही फाळके, मंगेशकर, प्रभात, भीमसेन जोशी, पुल देशपांडे, माडगूळकर, तेंडुलकर ते आजचे सलील-संदीप, अजय-अतुल, गावसकर, कुंटे, हजारे, वाडेकर अशा अनेक रथी-महारथींनी जग पादाक्रांत केले आहे.

ही सगळी ऊर्जा कुठून आली? त्याचे एकच उत्तर आहे “आमची मराठी”. होय तीच मराठी अस्मिता जी सह्याद्रीच्या कातळकड्यांत आहे, भीमा-कृष्णा-कोयनेच्या तीरावर आहे, कोकणातल्या लाल मातीत आहे, विदर्भाच्या रांगड्या बोलीत आहे, मराठवाड्यातल्या अजंठा-वेरुळच्या पाषाणकलेत आहे, सातपुड्याच्या थंड हवेत आहे. त्याच मातीने आम्हाला जन्म दिलाय. आणि तिचे आमच्यावर सात जन्माचे ऋण आहे. या ऋणातून आम्ही मुक्त होऊ इच्छित नाही. पण थोडी का होईना परतफेड नक्की करावीशी वाटते आहे. म्हणूनच हा एक प्रामाणिक प्रयत्न. “मराठी मंडळी”चा…!!!

नऊवारी जरीकिनारी पैठणी, बुगड्यांची माळ आणि पसाभर मोठी नथ घातलेले खानदानी सौंदर्य या मराठी भाषेच्या अलंकारामध्ये दडलेले आहे. शाहिरी पोवड्याची डफाची थाप, लेझीमची गाज आणि ढोल-ताशाचा नाद मराठी भाषेत वीररस काठोकाठ ओतत आहेत. ढोलकीवरचा ताल आणि घुंगराचा छणछणाट ऐकून मराठीचा घट शृंगाररसाने निथळत आहे. नाट्यसंगीताचा आब मराठीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो आहे. तसाच सुमधुर भावगीताने धबाबा कोसळणारा अधीर मनःप्रपातही संथ होतो आहे.
संक्रांतीच्या तिळगूळाने ऊबदार आणि मधुर झालेली मराठी वाणी जहालपणे शिमग्याला मुक्तहस्ते शिव्या देऊ शकते आणि धुळवडीला गटारात लोळवू शकते. काळ्या आईचं दान संक्रांतीला वाणाच्या रुपाने तिला परत करायचं हे या मराठी माणसांनीच जगाला शिकवले. याच मराठी काव्य-शास्त्र-विनोदाने अवघ्या विश्वात सन्मानी गुढ्या उभारल्या आहेत. आषाढी-कार्तिकीला अवघा महाराष्ट्र “ग्यानबा-तुकाराम” करत भक्तीरसात न्हाऊन लाडक्या विठूमाऊलीला भेटायला पायी वारीला निघतो. श्रावणी सोमवारच्या गाभाऱ्यातल्या पहाटेची धीरगंभीर मंत्रोच्चारणा अवघे ब्रम्हांड अवतरल्याचा अनुभव देते. बैलपोळ्याच्या दिवशी बैलाला पुरणाचा घास भरवून त्याच्याही उपकारांची जाणीव आम्हांला असते. गौरी-गणपतीला अवघा महाराष्ट्र उत्सवी वातावरणात रमून जात असतो. कोजागिरीच्या टिपूर चांदण्यात केशरी दुधाच्या साथीने गप्पांना काय तो बहर येतो. दिवाळीला अवघा मराठी मुलुख ऐश्वर्यात न्हाऊन निघतो. एवढे ऐश्वर्य की लक्ष्मीपूजनला उदारपणे जुगारही खेळावा. पाडव्याला नथ सांभाळत कारभारीला ओवाळणारी घरधनीण आपल्या सख्याकडे किती नजाकतदार लाडिकपणे पाहून पाडवा “वसूल” करत असते हे काय अवघ्या मराठी मुलखाला ठाऊक नाही?

अशी ही विविधरंगी विविधढंगी मराठी संस्कृती. हिच्या पायीच आम्ही हा यज्ञ सुरु केला आहे. खात्री आहे की आपण पण या यज्ञात सामील व्हाल. आपणा सर्वांचे स्वागत.

आम्ही “मराठी मंडळी”ला यज्ञ म्हणतोय कारण, आम्हाला पुर्णपणे कल्पना आहे की सगळ्याची सुरुवात ही नवख्याच्या नशिबानं होते, आणि मग सुरु होते अत्यंत खडतर अशी परिक्षा… पदोपदी! पण तरीही हा यज्ञ करण्याचा घाट आम्ही घातलाय… आपल्या माय मराठीसाठी. आत्ताच्या जगामध्ये आणि जागतिकीकरणामध्ये कोणतीही प्रादेशिक भाषा टिकवुन ठेवणं तसं अवघड झालंय. पण ते अशक्य नक्कीच नाही! आपली मराठी या रेट्यातही टिकुन राहावी यासाठी आपल्यापैकी प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयत्न करतोय. मराठी साहित्य तर समृद्ध आणि सक्षम आहेच. कोणी अजुनही मराठी वाचन आवर्जून करतोय, कोणी मराठीमधुन लेख लिहीतोय. अनेक मराठी वृत्तपत्रं, मासिकं, साप्ताहिकं आहेत ज्यातुन बरेच लोक आपले लेख लिहीत असतात. असंच अजुन एक माध्यम आहे – ब्लॉग्स. तुम्हाला वाचतांना आश्चर्य वाटेल, पण आजमितीला सुमारे १५ ते २० हजार लोक आपापल्या ब्लॉग्सवर मराठीमधुन लिहीत आहेत! हे लोक तिथं आपल्या कथा लिहीतात, कविता प्रकाशित करतात, मतं मांडतात, अभ्यासपुर्ण लिखाणसुद्धा  करतात!! आणि हो, इथं सुद्धा तेवढंच दर्जेदर लिखाण असतं!!! पण अजुन म्हणावा तेवढा प्रकाशझोत या माध्यमावर आणि या माध्यमातुन लिहिणाऱ्यावर पडलेला नाहीये. नेमकं याच कारणासाठी हा यज्ञ आहे. या यज्ञाचं स्वरुप, त्याची व्याप्ती आणि त्याची फलनिष्पत्ती याबद्दल स्वतंत्रपणे लिहुच, पण यात सगळ्यात महत्वाचं ते सुरुवात करणं.

तर अशी ही आमची “इये मराठिचिये नगरी”

संक्रांतीचा मुहुर्त साधून याच मराठी आईचे वाण घेऊन आम्ही वाटचाल सुरु केली. आमची सगळी एकेकाची संगणक कौशल्ये एक केली आहेत या “मराठी मंडळी” नावाच्या सुगड्यात. येताय ना तुम्ही पण? यंदाच्या धुळवडीला हा चौदा विद्या, चौसष्ट कला असा विविधरंगांनी भरलेला घट आम्ही तुमच्यावर रिता करत आहोत, तुम्हांला नवरसात चिंब भिजवायला… आहात ना तयार?

लाईफसायकल


पुण्यामध्ये नुकतेच एका मोठ्या मॉलचे उद्घाटन झाले. ६००० स्क्वे.फुट पसरलेल्या ह्या मॉलमधील अनेक गोष्टी इंपोर्टेड आहेत. त्यांची किंमत ८,०००रु. पासुन ते ३.५ लाखापर्यंत आहे.

आता तुम्ही म्हणाल हे नक्की कसले मॉल आहे? हे आहे पुण्यातीलच नव्हे तर भारतातील पहिले वहीले पुर्णपणे सायकलींसाठी वाहीलेले अनेक देशी-विदेशी बनावटींच्या सायकलींचे मॉल.

पुणे एके काळी सायकलींचे शहर म्हणुन ओळखले जायचे. स्वयंचलीत वाहनांची संख्या पुण्यात अक्षरशः हाताच्या बोटांवर मोजता येईल इतकी कमी होती. अनेक आबाल-वृध्द दैनंदिन कामांसाठी, कामाच्या ठिकाणी, शाळा, भाजी, दुकानात जाण्या-येण्यासाठी सायकलींचाच वापर करत होते. पण काळाच्या ओघात पुणे शहराने सुध्दा कात टाकली आणि शहराबरोबरच राहणीमान सुध्दा गतीमान झाले. ह्या गतीशी ताळमेळ राखण्याकरता पुणेकरांनीही सायकली सोडुन स्वयंचलीत वाहनांची कास धरली.

लोकसंख्या वाढली, घरटी एक नव्हे तर दोन-दोन दुचाकी आणि शिवाय एखादं चारचाकी सुध्दा दिसु लागली. शहर गजबजले परंतु रस्ते मात्र पुर्वीइतकेच राहीले. आणि काही दिवसांतच प्रदुषण, रहदारीचा ताण, गोंगाट वाढु लागला, पर्यायाने त्याचा विपरीत परीणाम पुणेकरांच्या प्रकृतीवर दिसु लागला. उच्च रक्तदाब, मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले. इंधनाचे दर गगनाला भिडलेले असताना आणि शारीरीक व्याधींवर मात करण्यासाठी पर्यायी वाहन म्हणुन पुणेकरांनाच नव्हे तर तमाम भारतीयांना पुन्हा एकदा सायकलचा पर्याय दिसु लागला.

सायकलींनीसुध्दा मग कात टाकली. केवळ पेपर-दुध वाल्यांची मक्तेदारी असलेल्या ऍटलस-हर्क्युलस सायलींऐवजी विवीध रंगाच्या, नाजुक, वजनाने अतीशय हलक्या, २१ किंवा त्याहीपेक्षा अधीक गेअर, डबल सस्पेंशनच्या अल्युमिनीयम्च्या सायकल बाजारात आल्या. ह्या सायकलींनी सर्वांनाच भुरळ पाडली. चालवायला सोप्या, अनेक किलोमीटर चालवुनही कमी दम लागणाऱ्या ह्या सायकलींची मागणी वाढु लागली आणि सायकलींच्या बाजाराने पुन्हा एकदा बाजारात हात पाय पसरले. ५-६ हजारांपासुन चक्क लाखांमध्ये किंमती असलेल्या अनेक विवीध सायकलींचा पर्याय ग्राहकांसाठी खुला झाला. पुणेकरांचा सायकलींकडे असलेला वाढता ओघ पाहुन महानगर पालीकेने सुध्दा अनेक ठिकाणी सायकलींसाठी वेगळे मार्ग निर्माण केले.

म्हणतात ना, एखाद्या बिंदु पासुन सुरु झालेले एक चक्र पुन्हा त्याच ठिकाणी येऊन थांबते. सायकलींच्या बाबतीतही तस्सेच होऊ घातले आहे. रस्त्याने सायकल वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ह्याच चक्राला इंग्रजी भाषेमध्ये ‘LifeCycle’ असे संबोधतात. परंतु सायकलींचे अनेक फायदे बघता ‘Life IS Cycle’ असे म्हणल्यास ते अयोग्य ठरु नये.

कुठलेही कार्य सुरु करताना गरज असते ती प्रोत्साहनाची, बरोबर ना? तर मग ही घ्या सायकल चालवण्यासाठीची ४१४ प्रोत्साहीत करणारी कारणं –

‘सेक्सी’


तुम्ही जर ५०+ वयोगटातले असाल तर कदाचीत तुमच्या भुवया उंचावल्या असतील! मराठीला वाहीलेल्या ह्या साईटवर असले अचरट, आंबट शब्द वाचुन ‘हा काय चावटपणा?’ असं नक्कीच मनोमन पुटपुटला असाल.

तुम्ही ४० ते ५० वयोगटातले असाल तर ह्या पोस्ट मध्ये ‘तसलं’ काहीतरी असण्याची शक्यता समजुन एक तर ही पोस्ट टाळण्याचा प्रयत्न केला असाल किंवा चिडुन ह्या पोस्टवर काहीतरी खवचट प्रतिसाद द्यायच्या उद्देशाने ही पोस्ट उघडली असेल.

पण तुम्ही तिशीतले किंबहुना विशीतले असाल तर ‘सेक्सी’ ह्या शब्दाचे प्रचलीत असलेले ‘अनेक’ अर्थ तुम्ही जाणुन असाल आणि अगदी साफ मनाने तुम्ही हे पान उघडले असेल, नाही का?

आजच्या युगात ‘सेक्सी’ ह्या शब्दाने अनेक अर्थ अंगीकारले आहेत. पुर्वीच्या काळी ‘सेक्सी’ हा शब्द केवळ ‘कामुक’ गोष्टींशी निगडीत बोलतानाच वापरला जायचा. नगनत्व, कामक्रिडा, यौन किंवा लैगीक विषय हे ‘सेक्सी’ असायचे. पण आजच्या बोलीभाषेत ‘सेक्सी’ शब्दाचे परीमाणच बदलले आहे. आजच्या युगात कोणतीही आकर्षक गोष्ट ही ‘सेक्सी’ असते. रस्त्यावरुन धावणाऱ्या गाड्या सेक्सी असतात, घड्याळं, कपडे, चपला/बुट सेक्सी असतात, निसर्ग सौदर्य सेक्सी असते, ‘कुछ कुछ होता है’ मधली दादी सेक्सी असते, मोबाईल,लॅपटॉप्स, आयपॉड्स आणि इतर गॅडेज्ट्स सेक्सी असतात, अहो इतकच काय पदार्थांची चव सुध्दा सेक्सी असते… आता बोला!!

हा शब्द इतका प्रचलीत झाला आहे की कोणताही युवक किंवा युवती कसलाही विचार न करता अगदी मोकळेपणाने ‘सेक्सी’ म्हणुन मोकळे होतात.

भाषेत नवे शब्द निर्माण होणे हे भाषेच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. प्रत्येक नविन पिढी नविन शब्द प्रचलित करत असते. भाषा नेहमीच बदलत होती आणि बदलत आहे. ‘सही’ हा असाच कधी तरी उगवलेला शब्द. कुठलीही सुंदर असलेली गोष्ट ‘सही’ ह्या शब्दाने गौरवली जायची. पण आजच्या काळात ‘सेक्सी’ ह्या शब्दाने ‘सही’ ह्या शब्दाची जागा घेतल्याचेच दिसुन येते.

असे आहेत अजुन काही नविन शब्द जे तुम्ही इथे प्रतिसादात देऊन लेखकाच्या आणि वाचकांच्या ज्ञानात भर घालु शकाल?

हो, पण तुम्ही सुचवत असलेला शब्द तस्साच ‘सेक्सी’ असला पाहीजे बरं का!!

पुणेरी पगडी काळवंडली..


पुणे ‘सायकलींचे शहर’, ‘विद्येचे माहेरघर’, ‘महाराष्ट्राची सांस्कृतीक राजधानी’, ‘पेंन्शनर लोकांचे शहर’, ‘ऐतीहासीक वारसा लाभलेले शहर’, ‘चांगले हवामान, मुबलक पाणीसाठा लाभलेले शहर’ अशी एक ना अनेक बिरुदावल्या घेउन आम्ही पुणेकर जगत होतो. पुणेकर असल्याचा सार्थ अभीमान होता आम्हाला.. आहेचं. मग भले लोक ‘पुणेरी’ म्हणुन खिल्ली उडवोत, भले पुण्यात झळकणाऱ्या पाट्यांची इंटरनेटवर विनोद निर्मीती होवो. पुणेकर ‘दीड शहाणे’, पुणेकर ‘खडुस’ म्हणुन संबोधले जावो पण तरीही आम्ही पुणेकर हे पुणेकरच होतो.

‘खुन्या मुरलीधर’, ‘पत्र्या मारुती’, ‘जिलब्या मारुती’ असली विचीत्र नावं असलेल्या देवदेवतांवर आमचा अढळं विश्वास आहे, काळ कितीही कॉम्पेटेटीव्ह झाला तरीही दुपारी जेवणाच्या वेळी आणि नंतर वामकुक्षी काढण्यासाठी केवळ आणि केवळ पुणेकरच दुकानं बंद ठेवु शकतात. पुण्यापासुन केवळ १८० कि.मी. अंतरावर असलेल्या मुंबईला अनेक दंगली, आतंकवादी हल्ल्यांनी फोडुन काढले परंतु तरीही आमचे पुणे हे शांत होते. घड्याळाच्या काट्यावर चालणारी मुंबई इतक्या जवळ असुनही, येथील जिवन मात्र संथ गतीने पुढे सरकणारेच. कोणी शिक्षणासाठी तर कोणी निवृत्त जिवन शांततेत घालवण्यासाठी पुण्यात आले आणि पुण्याचेच होऊन गेले. ‘पुणे तेथे काय उणे’ म्हणताना.. ‘पुणे तेथे दहशतवादी हल्लेच उणे होते’ पण कोण्या निष्ठुरने तेही भरुन काढले.

१३ फेब्रुवारी, २०१० रोजी पुण्यात झालेला बॉम्ब ब्लास्ट अजुनही आम्ही मानण्यास तयार नाही, खरं सांगायचं तर विश्वासच बसत नाही अजुन की ‘आमच्या पुण्यात’ असं काही होऊ शकतं!

‘त्या’ दिवशी ‘ती’ बातमी म्हणता म्हणता वाऱ्यासारखी पसरत होती. आधी प्रत्येक जण तो एक ‘गॅस सिलेंडरचाच’ स्फोट आहे असंच म्हणत होते. कश्याला कोण येतेय पुण्यात स्फोट घडवायला? आहे काय आमच्या पुण्यात? असेच जो तो म्हणत होता, पण गृह मंत्रालयाने ‘तो’ ‘दहशतवादी हल्ला’ असल्याची पुष्टी दिली आणि सगळ्यांची मनं ढवळुन निघाली.

‘कोरेगाव पार्क’ तसं म्हणलं तर फार कमी प्रमाणात पुण्याचे अस्तीत्व दाखवतो. खरं पुणे म्हणजे ‘सदाशिव पेठ’, ‘नारायण पेठ’, ‘कोथरुड’ वगैरे. परंतु कोरेगाव पार्क तेथे असलेल्या ‘ओशो आश्रमामुळे’ सदांकदा विदेशी लोकांची वर्दळ असलेला, पाश्चात्य संस्कृती अंगी ल्यायलेला भाग. परंतु काहीही असले तरी तो होता पुण्यातच. ‘जर्मन बेकरी’, ‘मार्झोरीन’, ‘नाझ’, ‘एम.जी.रोड’ ह्या भागात नं गेलेला असा नविन पिढीतील युवक म्हणजे अगदीच ‘सो अऩ कुल्’

‘ती’ बातमी आली आणि ट्विटर वर माहीतीचा ओघ सुरु झाला. कुठे झालं, किती वाजता?, कॅज्युऍलीटीज किती? हेल्पलाईन काय? ह्याबरोबरच पुणेरी शालजोड्यातील राजकारण्यांबद्दल असलेला संताप विवीध ट्विट्सच्या माध्यमातुन व्यक्त होतं होता. हे सगळं इथेच थांबेल ना? मुंबईच्या २६/११ ची पुनरावृत्ती तर होणार नाही ना? ह्या विचारांनी मनाचा थरकाप उडत होता. जो-तो आपले आप्त, मित्र परीवार सुखरुप आहेत ना? ह्याबरोबरच अधीक सुरक्षा आणि दक्षता बाळगण्याबद्दल फोन, एस.एम.एस.च्या माध्यमातुन संपर्क करत होता.

ज्या पुण्यात ‘शिवाजी महाराजांनी’ शाहीस्तेखानाची बोटं कापुन त्याला घाबरवुन पळवुन लावले त्या पुण्यात असं व्हावं? ज्या पुण्याच्या शेजारी लागुन असलेल्या सिंहगडावर तानाजीने आपल्या प्राणाची आहुती देऊन गड काबीज केला तेथे एखादा भेकड बॉम्ब लपवुन पळुन जातो काय आणि निष्पाप लोकांचा बळी जातो काय हे फार मनाला टोचणी लावणारे होते. ज्या पुण्याने ‘दगडुशेठ हलवाई’, ‘मंडई’, ‘कसबा गणपतीवर’ भक्तीरुपाने जिव ओवाळुन टाकला त्याच पुण्यात आज असे घडावे?

‘बाप्पा, आहेस कुठे तु??…’ एक आर्त स्वर बहुतांश पुणेकरांच्या मनामधुन निघत होता. मराठी लोकांसाठी लढणारे, मराठी भाषेसाठी लढणारे कुठे आहेत सगळे जेंव्हा महाराष्ट्राच्या, मराठी अजुनही जपुन ठेवलेल्या पुण्यावर हल्ला झाला? शिवरायांचे पोवाडे गाणारे, पेशव्यांची संस्कृती सांगणारे कुठे आहेत हे ‘बहाद्दर’? अहो आपल्याच बस-गाड्या काय कुणी पण फोडेल? आपल्याच लोकांना कोणी पण काळे झेंडे दाखवेल. हिम्मत असेल तर फोडा ना त्या दहशतवाद्यांच्या गाड्या. असेल हिंमत तर रोखा ह्या अतीरेक्यांना. ‘वाघाचं कातडं पांघरलं म्हणुन कोणी गाढव वाघ होतं नाही’, लहानपणी पंचतंत्र, हितोपदेश मधुन ऐकलेल्या गोष्टीची सत्यता मला आज उमगली.

आज ‘त्या’ घटनेला १ दिवस होऊन गेला. आठवड्याची सुरुवात झाली, पण क्वचीतच कोणी सहकारी ‘त्या’ घटनेबद्दल बोलत आहे. ‘दृष्टी आड सृष्टी’ म्हणतात खरं, पण दुःख लपवल्याने ती कमी थोडी नं होतात? आज ह्या एका घटनेने आम्ही इतके हेलकावुन गेलो, तेथे मुंबई मात्र गेली कित्तेक वर्ष हे सहन करत आहे ह्या विचाराने खरोखरचं मुंबईकरांचे आश्चर्य मिश्रीत कौतुक वाटले.

पुणेकर सहनशील आहेत, हळवे आहेत. त्या स्फोटाने अनेकांच्या मनांना खिंडारं पडली असतील.

स्वाभिमानानं, तेजानं तळपणारी पुणेरी पगडी ‘त्या’ काळ्याकुट्ट धुरानं नक्कीच काळवंडली असणार…

पुण्यातील वाहतुक दुचाकींची मक्तेदारी


पुण्यातील ओसंडुन वाहणाऱ्या वाहतुकीत काल अजुन एक बळी गेला. दुचाकीवरुन जाणाऱ्या एका तरूणीला टेंपोची धडक बसली आणि ती तरूणी जागच्या जागी टेंपोच्या मागच्या चाकाखाली चिरडुन मरण पावली. अर्थात टेंपोचालकाला अटक झालेली आहे.

ह्या आणि अश्या अनेक बातम्या पुण्यातील वर्तमानपत्रात रोज वाचायला मिळतात. ह्या वेळी नक्की काय घडले? दोष कुणाचा हे मला तरी ठाऊक नाही. पण बातमी वाचल्यावर एक गोष्ट मनामध्ये येते, सिग्नलला थांबलेल्या टेंपोच्या ‘मागे’ ती तरूणी दुचाकीवर होती. सिग्नल सुटल्यावर टेंपो जेंव्हा पुढे जाऊ लागला तेंव्हा त्याची धडक म्हणे त्या दुचाकीला बसली. यात त्या टेंपोचालकाचा कसा काय दोष बुवा? म्हणजे त्याला कसे काय दिसणार की टेंपोच्या मागे इतके खेटुन कोण आहे? टेंपो पुढे जात होता, रिव्हर्स मध्ये मागे नाही.

पुण्यातील वाहतुकीचा विचार केल्यावर काही मुद्दे समोर येतात –

  • वाहतुकीचे सिग्नल मोडणाऱ्यांमध्ये दुचाकींची संख्या लक्षणीय आहे.
  • एकेरी मार्गातुन विरुध्द दिशेने सर्वाधीक वाहनं दुचाकीच येतात. पुण्यात ज्या ज्या ठिकाणी एकेरी मार्ग आहेत ते इतके अरुंद आहेत की उलट दिशेने चार-चाकी वाहनं येणं फारच कठीण
  • बहुतांश रस्ते हे वाहतुकीने ओसंडुन वाहत असतात. अश्यावेळी गाड्यांचा वेग नोंदवायचा झाल्यास दुचाकी वाहनं ही चारचाकींपेक्षा अधीक वेगवान असतात.
  • लेन (?) कटींग, वाकडे तिकडे जिथुन मिळेल तेथुन घुसणे, शक्य तेंव्हा सायकल मार्गाचा वापर ह्या सर्वच बाबतीत दुचाकीच आघाडीवर आहेत
  • मालवाहु ट्रक, बसेस, टेंपोची धडक बसुन झालेल्या अपघातांत सरसकट मोठ्या गाडीच्या चालकालाच दोषी धरणे चुकीचे आहे. कित्तेक वेळेला दुचाकी दोन मोठ्या गाड्यांच्या अतीशय अरुंद अश्या फटीतुन जिवावर उदार होऊन गाड्या न्हेत असतात. सिग्नलच्या वेळेला मोठ्या गाड्यांना खेटुन उभ्या असलेल्या दुचाकी, चालकाच्या लक्षात येण्याची शक्यता खुपच कमी असते
  • पादचाऱ्यांच्या चुकीमुळे झालेले कित्तेक अपघात डोळ्यासमोर आहेत. त्यांच्यावर कधी काही कारवाई झाल्याचे ऐकीवात नाही.

हजारो आजुबाजुला चिकटलेल्या दुचाकींना कधी ना कधी कुठल्या नं कुठल्या तरी मोठ्या गाडीचा धक्का लागणारच. शेवटी ती सुध्दा माणसंच आहेत, रोबोट नव्हे हे समजुन घेणे आवश्यक आहे.

एका हातात मोबाईल धरुन दुसऱ्या हाताने वाहन चालवणारे ‘बिझी’ चालक, अरुंद रस्त्यावरुनही सुसाट वेगाने झिग-झॅग बाईक्स पळवणारे ‘रोड साईड रोमीओज’, पुढे मुलाला उभे करुन, गाडीच्या हॅन्डलला पिशव्यांचे ओझे लावलेले, दुपट्टा रस्त्यावर, चाकावर वाहत चाललेला, कान, डोळे, तोंड झाकलेल्या अवस्थेतील अनेक महिला सदस्य, स्वतःशीच तार स्वरात बोलत चाललेले, एम-८०, ल्युना सारख्या ऍन्टीक वाहनांवर स्वार झालेले आजोबा असे अनेक प्रकार आजुबाजुला पुण्यातील वाहतुकींमध्ये पहावयास मिळतात.

एक चारचाकी चालक म्हणुन मी जेंव्हा वाहन चालवतो तेंव्हा दुचाकी चालक म्हणुन मी करत असलेल्या चुका मला जाणवतात.

फुटपाथ एक तर उखडलेला किंवा फेरीवाले, भाजीवाल्यांनी अडवलेला त्यामुळे पादचारी रस्त्यावर, सायकल ट्रॅक्स असुन नसल्यासारखे त्यामुळे सायकलवाले रस्त्यावर, पार्कींग साठी फार कमी ठिकाणी वेगळी सुविधा असल्याने ‘पि१, पि२’ रस्त्यावर. तुटलेले सिग्नल्स, खणलेले किंवा कित्तेक महीन्यांपासुन काम चालु असलेले रस्ते, पावती फाडण्यात मग्न असलेले मामा, लग्नाच्या मिरवणुका, जाहीर कार्यक्रमांचे मंडप रस्त्यावरच, गाई-म्हशी, भटकी कुत्र्यांचा मोकाट वावर, ‘सायक्लोमॅटीक रीडंड्न्सी’ सारखे चक्राकार मार्ग यामुळे वाहतुकीची अक्षरशः दुर्दशा झालेली आहे.

आमच्या कार्यालयात एक अमेरीकेहुन गृहस्थ आले होते, त्यांना विचारले ‘कसा वाटला भारत?’ किंबहुना ‘कसे वाटले पुणे?’

दोन क्षण विचार करुन त्यांनी मिश्कीलपणे उत्तर दिले –

‘ऍन ऑर्गनाईझ्ड मेस….’