पुण्यातील वाहतुक दुचाकींची मक्तेदारी


पुण्यातील ओसंडुन वाहणाऱ्या वाहतुकीत काल अजुन एक बळी गेला. दुचाकीवरुन जाणाऱ्या एका तरूणीला टेंपोची धडक बसली आणि ती तरूणी जागच्या जागी टेंपोच्या मागच्या चाकाखाली चिरडुन मरण पावली. अर्थात टेंपोचालकाला अटक झालेली आहे.

ह्या आणि अश्या अनेक बातम्या पुण्यातील वर्तमानपत्रात रोज वाचायला मिळतात. ह्या वेळी नक्की काय घडले? दोष कुणाचा हे मला तरी ठाऊक नाही. पण बातमी वाचल्यावर एक गोष्ट मनामध्ये येते, सिग्नलला थांबलेल्या टेंपोच्या ‘मागे’ ती तरूणी दुचाकीवर होती. सिग्नल सुटल्यावर टेंपो जेंव्हा पुढे जाऊ लागला तेंव्हा त्याची धडक म्हणे त्या दुचाकीला बसली. यात त्या टेंपोचालकाचा कसा काय दोष बुवा? म्हणजे त्याला कसे काय दिसणार की टेंपोच्या मागे इतके खेटुन कोण आहे? टेंपो पुढे जात होता, रिव्हर्स मध्ये मागे नाही.

पुण्यातील वाहतुकीचा विचार केल्यावर काही मुद्दे समोर येतात –

 • वाहतुकीचे सिग्नल मोडणाऱ्यांमध्ये दुचाकींची संख्या लक्षणीय आहे.
 • एकेरी मार्गातुन विरुध्द दिशेने सर्वाधीक वाहनं दुचाकीच येतात. पुण्यात ज्या ज्या ठिकाणी एकेरी मार्ग आहेत ते इतके अरुंद आहेत की उलट दिशेने चार-चाकी वाहनं येणं फारच कठीण
 • बहुतांश रस्ते हे वाहतुकीने ओसंडुन वाहत असतात. अश्यावेळी गाड्यांचा वेग नोंदवायचा झाल्यास दुचाकी वाहनं ही चारचाकींपेक्षा अधीक वेगवान असतात.
 • लेन (?) कटींग, वाकडे तिकडे जिथुन मिळेल तेथुन घुसणे, शक्य तेंव्हा सायकल मार्गाचा वापर ह्या सर्वच बाबतीत दुचाकीच आघाडीवर आहेत
 • मालवाहु ट्रक, बसेस, टेंपोची धडक बसुन झालेल्या अपघातांत सरसकट मोठ्या गाडीच्या चालकालाच दोषी धरणे चुकीचे आहे. कित्तेक वेळेला दुचाकी दोन मोठ्या गाड्यांच्या अतीशय अरुंद अश्या फटीतुन जिवावर उदार होऊन गाड्या न्हेत असतात. सिग्नलच्या वेळेला मोठ्या गाड्यांना खेटुन उभ्या असलेल्या दुचाकी, चालकाच्या लक्षात येण्याची शक्यता खुपच कमी असते
 • पादचाऱ्यांच्या चुकीमुळे झालेले कित्तेक अपघात डोळ्यासमोर आहेत. त्यांच्यावर कधी काही कारवाई झाल्याचे ऐकीवात नाही.

हजारो आजुबाजुला चिकटलेल्या दुचाकींना कधी ना कधी कुठल्या नं कुठल्या तरी मोठ्या गाडीचा धक्का लागणारच. शेवटी ती सुध्दा माणसंच आहेत, रोबोट नव्हे हे समजुन घेणे आवश्यक आहे.

एका हातात मोबाईल धरुन दुसऱ्या हाताने वाहन चालवणारे ‘बिझी’ चालक, अरुंद रस्त्यावरुनही सुसाट वेगाने झिग-झॅग बाईक्स पळवणारे ‘रोड साईड रोमीओज’, पुढे मुलाला उभे करुन, गाडीच्या हॅन्डलला पिशव्यांचे ओझे लावलेले, दुपट्टा रस्त्यावर, चाकावर वाहत चाललेला, कान, डोळे, तोंड झाकलेल्या अवस्थेतील अनेक महिला सदस्य, स्वतःशीच तार स्वरात बोलत चाललेले, एम-८०, ल्युना सारख्या ऍन्टीक वाहनांवर स्वार झालेले आजोबा असे अनेक प्रकार आजुबाजुला पुण्यातील वाहतुकींमध्ये पहावयास मिळतात.

एक चारचाकी चालक म्हणुन मी जेंव्हा वाहन चालवतो तेंव्हा दुचाकी चालक म्हणुन मी करत असलेल्या चुका मला जाणवतात.

फुटपाथ एक तर उखडलेला किंवा फेरीवाले, भाजीवाल्यांनी अडवलेला त्यामुळे पादचारी रस्त्यावर, सायकल ट्रॅक्स असुन नसल्यासारखे त्यामुळे सायकलवाले रस्त्यावर, पार्कींग साठी फार कमी ठिकाणी वेगळी सुविधा असल्याने ‘पि१, पि२’ रस्त्यावर. तुटलेले सिग्नल्स, खणलेले किंवा कित्तेक महीन्यांपासुन काम चालु असलेले रस्ते, पावती फाडण्यात मग्न असलेले मामा, लग्नाच्या मिरवणुका, जाहीर कार्यक्रमांचे मंडप रस्त्यावरच, गाई-म्हशी, भटकी कुत्र्यांचा मोकाट वावर, ‘सायक्लोमॅटीक रीडंड्न्सी’ सारखे चक्राकार मार्ग यामुळे वाहतुकीची अक्षरशः दुर्दशा झालेली आहे.

आमच्या कार्यालयात एक अमेरीकेहुन गृहस्थ आले होते, त्यांना विचारले ‘कसा वाटला भारत?’ किंबहुना ‘कसे वाटले पुणे?’

दोन क्षण विचार करुन त्यांनी मिश्कीलपणे उत्तर दिले –

‘ऍन ऑर्गनाईझ्ड मेस….’

12 thoughts on “पुण्यातील वाहतुक दुचाकींची मक्तेदारी

 1. 100% satya! News wachalya pasun mi agadi jeew muthit dharun sagala aajacha prawas kela. mi suddha duchaki chalak aahe. Mulala sobat ghewun hindawe lagate (Rikshacha paryay jast dhokedayak watato mhanun). Shakyato sagale niyam sadaiw palate. pan he matra khare ki niyam modanyat duchaki-swar pudhe asatat. signal jawal kinwa rastyat kuthehi don wahananmadhe purese antar nasate. Bahutek apaghat ya mulech hotat.

 2. अनिकेत,
  पूर्णपणे सहमत. माझा तो रोजचाच रस्ता आहे. मला माहिती आहे दुचाकी चालक किती बेपर्वा चालवतात ते! टेंपो वाला कदाचित निरपराध ही असेल. लोक करिष्मा बिल्डींग कडे वळायचे असले तरी बॅरिकेड्स च्या बाहेर उभे राहतात आणि सिग्नल लागताच सुसाट सुटतात. ही एफिशिएंसी कामात दिसत नाही मात्र! सेव्ह पुणे ट्रॅफिक म्हणून एक फोरम आहे, त्यांचे काम चालू असते काही.
  काय करावे!

 3. अनिकेत, एकदम हेच विचार माझ्या डोक्यात आले सकाळी बातमी बघितल्यावर.

  हे तर शहरातील गजबजलेले रस्ते.. कात्रज-देहु बाह्यमहामार्गावर तर एकदम “धूम”आकूळ चालू असतो. साईड मिरर नसणे, बाजूला न बघता उजव्या लेन मध्ये येणे हे सर्रास चालू असते.. आणि वर तुम्ही हॉर्न द्यावा ही त्यांची अपेक्षा असते…म्हणजे यांच्या जीवाची काळजी आपण करायची ! उगाच त्यांच्या हत्येचे पाप नको म्हणून मी आता नाईलाजाने जास्त हॉर्न वाजवतो.
  चार चाकी चालवली की दुचाकीवाल्यांच्या चुका प्रकर्षाने जाणवतात.. अगदी बरोबर बोललात. चारचाकीवाले चुका करत नाही असे नाही पण त्या मानाने बरेच कमी.. पण दुचाकी चालवायला घेतली की त्याच चुका आपल्याकडून होणार नाहीत याची काळजी घेतो…. सगळ्या दुचाकीवाल्यांना आधी एक दोन महिने चारचाकी चालवायला लावले पाहिजे..

 4. ठाण्यामधे हीच मक्तेदारी रिक्षावाल्यांकडे जाते. असेही रिक्षावाले मुजोर आहेतच पण ठाण्यामधे वाहतुकीचे अडथळे आणि अपघात यांना जास्तकरून रिक्षावालेच कारणीभूत आहेत. माणसाला चालण्यासाठी जागा उरलेली नाही. मोठ्या आणि लहान गाडीची टक्कर झाली की नेहमी मोठ्या गाडीवाल्याला अपराधी ठरवतात पण प्रत्येकवेळी लहान गाडीवालाच बिचारा असेल, असं नाही.

 5. सगळे शहरं सारखीच, हैदराबादला दुचाकी स्वारांचा उच्छाद आहे, त्यात भरधाव बसेस, आणि वेडीवाकडी वळणं घेणारे ऑटोज…नशीब सगळे सिग्नल मात्र चालु असतात.
  मामा नेहमीप्रमाणे “भाचे” शोधत असतात…

 6. 🙂 खर आहे. पण आपल्या इथल्या लोकल, बस वेळेवर नसतात. आणि अनेक ठिकाणी त्या थांबतच नाहीत. म्हणून तर इथ दुचाकीचे प्रस्थ एवढ वाढल आहे

 7. अनिकेत, आजकाल मी पुण्याच्या ट्रॆफिकला फार घाबरते. कुठून कधी कसा दुचाकीवाला येईल आणि अगदी आपटला आपटला म्हणताना कचकन ब्रेक मारेल…सिग्नल लागून तो सुटेपर्यंत मग ते मुंबई असो का पुणे एकजात सगळे दुचाकीवाले सापटीतून,फुट्पाथवरून मिळेल तसे घुसत सगळ्यात पुढे. इतकी कसली घाई. पुन्हा पाहावे तर पुढच्या सिग्नलला आहेतच की बरोबर. ठाण्याच्या रिक्षावाल्यांबद्दल काय बोलावे…. अतिशय मुजोर झालेत. चक्क पायावरून रिक्षा नेतात वर म्हणतात तुटला नाही ना? मग कशाला ओरडताय? फुटपाथवरून चालायला फुटपाथ आहेतच कुठे. एक तर खणलेले नाहीतर खणून अर्धवट सोडून दिलेले. बिचारे गाडीवाले मात्र हकनाक केवळ ते गाडी चालवत आहेत यामुळे अपराधी ठरले जातात-रोषाला शब्दश: बळी पडतात.:(

 8. Pingback: पुणेरी वाहतूक « सुकामेवा

 9. लेख छान आहे…
  म्हणतात न.. पुण्यात जो गाडी चालवेल. तो कुठेही गाडी चालवेल…
  तावून सुलाखून निघतो….चालक..

  ब्लॉगबद्दल विजेट कशी तयार करायची? त्याची लिंक कशी घायची आणि कुठून घ्यायची?
  सांगशील का?

 10. होय! पुणे आणि अपघात … समीकरण खुप जवळचे आहे…. घटना घडून गेल्यावर मन सुन्न होते हे खरं आहे पण अजुन किती दिवस? प्रत्येकाला पुढचा प्रवास करायचा आहे…अखेरच्या श्वासापर्यंत …. कुणाला माहीत एक दिवस या सांस्कृतिक पुण्यातील वर्तमानपत्रात त्या मुलीच्या जागी तुमचा-आमचा फोटो असेल…पुण्यातील सरकारला दोष द्यावा की वाहन तयार करणा-या कंपनीला… ही आणि अशीच अजुन काही उत्तरे अनिर्णीत रहाणार …. कायमची… तूर्त पुढच्या प्रवासाला लागा ….. पहिल्या पानावर स्वत:ची बातमी येईपर्यंत… नाही का?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s