Monthly Archives: March 2010

मेहंदीच्या पानावर (भाग-६)


मंडळी, सर्वप्रथम ’मेहंदीच्या पानावर’ च्या वाचकांची क्षमा मागतो. सहावा भाग टाकायला खरंच खुप उश्शीर झाला. सर्व पात्र, कथानकं डोक्यातुन निघुनच गेले होते, पण सहा महीन्यांनंतरही ह्या कथेवर तुमच्या येणार्‍या प्रतिक्रिया आणि पुढचा भाग कधी याबद्दल होणारी विचारणा मनाचा तो भाग पुन्हा तेजवत ठेवत होती. तुमच्या ह्या प्रेमाला, प्रतिसादाला खाली पडुन द्यायचे नव्हते आणि म्हणुनच उर्वरीत भाग पोस्ट करुन टाकायचे ठरवले आहे आणि पुढचा भाग इथे पोस्ट करत आहे.

कदाचीत पुर्वीची कथा विस्मरणात गेली असण्याची शक्यता आहे आणि म्हणुनच कथानकाच्या सर्व भागांचे दुवे इथे पुन्हा एकदा देत आहे.

भाग-१
भाग-२
भाग-३
भाग-४

भाग-५ पासुन पुढे

१२ मार्च
कालची संध्याकाळ मनावरचे खुप मोठ्ठे ओझे उतरवुन गेली. निदान माझ्या मनात मला बोचत असलेली अपराधीपणाची भावना तरी कमी झाली. मी जे करते आहे, जे करणार आहे, ते अगदीच काही चुकीचे नाही ही जाणीवच माझ्यासाठी खुप आहे.राजला ‘पटवण्याच्या’ प्रयत्नात मदतीला माझ्याबरोबर माझ्या दोन जिवाभावाच्या मैत्रीणीसुध्दा आहेत.

मला माझ्या भावना राजपर्यंत पोहोचवायला हव्यात. पण कधी? कसं? राज एकटा असा कध्धीच सापडत नाही. एक तर त्याचे फॅन्स नाही तर ती निधी. सारखं कोण ना कोणीतरी त्याच्या अवतीभोवती असतेच.

काय करता येईल की निधीपासुन राज काही क्षणांसाठी वेगळा असेल?

विचार करता करताच डोक्यात एक कल्पना आली.. ‘फॅन्स..’, स्तुती.. निधी जाम वेडी आहे असल्या गोष्टींमध्ये. कसेही करुन जर आशु आणी मॅन्डीने निधीला बोलण्यात गुंतवुन ठेवले..

मला जरी निदान राजशी दोन मिनीटं बोलायला मिळाली तरी निदान त्याच्या मनात माझ्याबद्दल काय आहे याचा अंदाज बांधता येईल.

१३ मार्च
हा हा हा… अजुनही हसु येतेय मला. आशु ग्रेट आहे, खरंच!! काय मस्त गुंगवुन ठेवले तिने निधीला. ‘निधीजी तुमची गाणी अशी आहेत..’, ‘निधीजी तुमचा आवाज म्हणजे ना..’, ‘निधीजी असं, निधीजी तस्स.. ’काय पकडलं होतं तिला आज स्टुडीओ मध्ये. आणि मी? मी आतुतरतेने ’त्या’ क्षणाची वाट बघत होते. आशुने मला हळुच खुण केली आणि मी अगदी सहजच राजच्या इथे गेले.

खरं तर खुप गोंधळल्यासारखे झाले होते मला त्याच्या समोर. मनाची खुप घालमेल झाली. एकदा वाटलं, वळुन पळुन जावं परत, कुठंही न बघता. पण मोठ्या मुश्कीलीने हिम्मत गोळा केली होती.

‘राज, मला तुझ्याशी थोडं महत्वाचे बोलायचं आहे, शक्य असेल तर प्लिज मला या नंबरवर फोन कर’ असं म्हणुन घाई-घाईतच माझा फोन नंबर लिहीलेला कागद त्याच्या हातात कोंबला आणि तेथुन निघुन गेले.

त्याची प्रश्नार्थक नजर माझ्यावर रोखलेली मला जाणवले होते, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्याला माझ्याबद्दल काही वाटत असेल तर तो मला नक्की फोन करेल. त्याने फोन नाही केला तर… तर माझे उत्तर मला मिळालेच नाही का?

… पण करेल.. राज नक्की फोन करेल. मी ‘माझ्या’ राजला चांगले ओळखते.

१५ मार्च
दोन दिवस होऊन गेले, राजचा फोन नाही. मी काय बोलले ते कळाले ना राजला? मी कागद बरोबर दिला ना त्याला? काय गडबडीत, वेंधळेपणाने दुसरेच काही हातात कोंबले त्याच्या फोनच्या प्रत्येक रिंगने वाढलेली उत्सुकता आणि ‘तो’ फोन राजचा नाही हे पाहुन चेहऱ्यावर पसरलेली नाराजी मी नाही लपवु शकत. दिवस-रात्र मी मोबाईलला कवटाळुनच आहे, जणु काही तो नाहीसा झाला तर माझं आयुष्यच संपुन जाईल.

स्टुडीओमध्ये नजर सतत राजलाच शोधत असते. पण तो दिसलाच नाही. मी विचीत्र तर नाही ना वागले? आमच्या मैत्रिचा मी चुकीचा तर नाही ना अर्थ काढला? माझ्या मुर्खपणामुळे थोडेफार का होईना जवळ आलेला राज माझ्यापासुन दुरावणार तर नाही ना??

….. कायमचा??

१७ मार्च
’कित्ती सोप्प असतं गं म्हणणं जाऊ देत ना’ असं अगती आगतीकतेने म्हणाले होते मी आशुला. माझी तर खात्रीच पटत चालली होती की, खरंच मुर्खपणाच केला मी. निदान मित्र म्हणुन का होईना राज माझ्या जवळ होता. माझ्या मनाने मला पुर्णपणे धोका दिलेला होता. साफ चुक होता माझा विचार, माझ्या भावना. राजचा फोन तर सोडाच पण गेले ४ दिवस तो दिसला पण नव्हता आणि मी पुन्हा एकदा 😦

घरात खुप सारा पसारा झाला होता. कुठलीही गोष्ट आवरुन ठेवण्याचा विचारच करत नव्हता. आय-ब्रोज करायची वेळ उलटुन गेलेली होती. आरश्यासमोरही जायला भिती वाटत होती. न जाणो चुकुन समोर एखादं अस्वलच दिसायचे :-।

गेले ४ दिवस मी माझी राहीलेलेच नव्हते. कुठल्याही गोष्टीवर निटपणे विचार करणे केवळ अशक्य झाले होते. डोक्यात इतक्या गोष्टी होत्या विचार करायला की कश्यावर आणि काय विचार करावा ह्यावर विचार करायला सुध्दा विचार करण्याचा विचार मला करवत नव्हता.

काय लिहीते आहे मी.. वेड लागलं आहे मला खरंच.

२१ मार्च
’पटकन आवरुन तयार रहा, मॅन्डी येते आहे तुला पिक-अप करायला’ आशु फोनवर जणु किंचाळतच होती.

’अग पण कश्याला? कुठे जायचे आहे? मी नाही येणार कुठे, कंटाळा आला आहे मला’, मी उडत उडतच उत्तर दिले होते पण त्याआधीच आशुने फोन ठेवुन दिला होता

मी उपकार केल्यासारखेच आवरुन ठेवले. एखाद्या वादळासारखीच मॅन्डी आतमध्ये घुसली आणि मला जवळ जवळ ओढतच घराबाहेर काढले. आणि मी? एखाद्या वाळक्या पानासारखी तिच्यामागे फरफटत गेले होते आणि गाडीत जाऊन बसले.

मॅन्डीने गाडी थांबवली तेंव्हा भानावर आले. स्टुडीओच्याबाहेर आम्ही उभं होतो आणि मॅन्डी मला बोट दाखवुन काही तरी दाखवत होती. तिच्या बोटाकडुन त्या दिशेकडे माझी नजर गेली. दुरवर एक अंधुक आकृती मला दिसत होती… राज? छे.. क्षणभर वाटलं, मला दुसरं काही सुचतच नाही. पण नाही, तो राजच होता… आशुशी काही तरी बोलत होता.

मॅन्डी मला हाताला धरुन त्या दिशेने गेली, राजच्या बर्‍़याच जवळ गेल्यावर म्हणाली, ’आsssशु.. आम्ही कॅन्टीनमध्ये जात आहोत’

राजने मागे वळुन पाहीले. त्याच्या चेहर्‍यावर गोड हास्य होते आणि मी मात्र तेरा दिवसांचे सुतक पाळुन आल्यासारखी विस्कटलेली होते. मी तशीच मॅन्डीच्या मागे मागे कॅन्टीनमध्ये गेले. मला काय चालु आहे, काहीच्च कळतं नव्हते. मी कॅन्टीनमध्ये बसे पर्यंत मॅन्डीने कॉफी मागवली होती. मॅन्डी सारखी मागे वळुन वळुन बघत होती. कश्यासाठी? ह्याचे उत्तर मला काही क्षणातच मिळाले, कारण आशु राजला घेउन आमच्याच दिशेने येत होती.

राज येताच मॅन्डी उठुन उभी राहीली आणि त्याला ग्रीट केले, मी मात्र अजुनही मठ्ठासारखी बसुन राहीले होते. काय चालले आहे, खरंच काही कळत नव्हते मला.

राज खुर्ची ओढुन माझ्याशेजारीच बसला आणि इकडे तिकडे बघुन म्हणाला, ’हे सॉरी यार, थोडं कामासाठी बाहेर गावी गेलो होतो, जमलंच नाही बघ फोन करायला. आज आहे वेळ संध्याकाळी?

मॅन्डीने मला हाताने ढोसले तेंव्हा राज पुन्हा तेच विचारत होता. शेवटी मॅन्डीच म्हणाली, “हो आहे ती संध्याकाळी”

’गुड.. मग आपण..’कॅफे रियाटो’ मध्ये भेटुयात? ८.३० ला? थोडं लांब आहे, पण गर्दी कमी असते.’ राज माझ्याकडे बघत विचारत होता.

’चालेल’ मॅन्डीने माझ्यावतीने सांगुन टाकले होते. राज लगेच निघुन पण गेला. पण मी अजुनही तश्शीच उध्वस्त बसले होते.

’एssss बधीर.. आशुने गदागदा हलवले, अगं काय हे? तो तुला विचारतो आहे आणि तु काय अशी ढीम्म?’

कॅलीडोस्कोप कसा असतो ना? क्षणाक्षणाला आकार वेगळे, रंग वेगळा त्याचा अर्थ वेगळा. माझं आयुष्य तस्संच झालं आहे. आत्ता डायरी लिहीताना सगळ्या गोष्टी निट डोळ्यासमोर आल्या आणि आज संध्याकाळी राजला भेटायचं आहे ह्याची जाणीव झाली.

पुन्हा एकदा नविन आशा. एकदा वाटतं होतं जाऊच नये. निदान अपेक्षाभंगाचे दुःख तरी होणार नाही, मग वाटलं. राज वर खुप चिडावं, ओरडावं, मारावं आणि त्याला जवळ ओढुन घट्ट मिठीमध्ये समावुन घ्यावं. घड्याळाचा काटा पुढे पुढे चालला आहे आणि मला आवरायला खुप वेळ लागणार आहे.. खुsssप वेळ.. मला आज सर्वात सुंदर दिसायचं आहे, निधीपेक्षाही सुंदर. मी राजला अनुरुप दिसले पाहीजे, वाटले पाहीजे, राजची गर्लफ्रेंड असावी तर अश्शी.. बायको असावी तर अश्शीच.. नकळत लाजुन तळहाताने चेहरा झाकुन घेतला होता.

मन तर केंव्हाच कॅफे मध्ये पोहोचले होते, शरीराने तिथे पोहोचायला फक्त तिन तास उरले होते.. फक्त तिन तास..

[क्रमशः]
भाग ७>>

अरे भुंग्या आहेस कुठे?


ब्लॉग संबंधी जो भेटतो तो हेच विचारतो आहे. खरंच आहे कुठे मी?

’गेले काही दिवस कमालीचा व्यस्त होतो’ म्हणालो तर काही खवचटं लोकं भुवया उंचावुन म्हणतील, ’जसं काही आम्ही मोकळेच बसलो आहोत :-)’. आणि ते कारण तितकसं खरं सुध्दा नाही. कारण व्यस्त तर सगळेच जणं असतात, पण तरीही वेळात वेळ काढुन ब्लॉगींग चालु असते. गेल्या वर्षी सुध्दा मी व्यस्त होतोच की, पण तरीही ब्लॉगवरील लेखन हे चालुच होते. मग आता काय झालं??

हम्म.. काही जणांना माहीती आहे कारण, आणि ते म्हणजे गेल्या महीन्यात झालेली नविन खरेदी डी.एस.एल.आर ची. कित्तेक दिवसांचे जपलेले स्वप्न पुर्णत्वास गेल्यावर माणुस जसा खुळा होतो ना, तस्सेच झाले आहे माझे, थोडक्यात सांगायचे झाले तर अगदी शेजारच्या चित्रात दिसते आहे तस्सेच. कुठलीही नविन वस्तु कुठल्या ऍंगलने कशी दिसेल हे बघण्याचे वेडच लागले आहे मला.

पण आता फोटो काढायचे म्हणजे कुठले? कारण फोटोचे वेड मला तसे बर्‍़याच वर्षापासुनचे त्यामुळे फुल, पान, किडे मकोडे, पोरं-बाळ, निसर्ग दृष्य जवळपास सर्व प्रकारचे टिपुन झाले होते आणि काही तरी नविन करण्याचा ध्यास लागला होता.

फ्लिकर नामक संकेत स्थळावर ’सिक्रेट लाईफ ऑफ टॉइज’ नावाचा एक ग्रुप सापडला आणि मला ’युरेका युरेका’ असेच झाले. किती मस्त गोष्टी माझ्या जवळपास होत्या आणि त्या टिपण्याचा मी कधी प्रयत्नच केला नव्हता. ह्या उघडल्या गेलेल्या नविन दालनाने फोटो काढायला मला एक नविन दिश्याच मिळाली. रोज.. हो.. अतीशयोक्ती करत नाहीये, अगदी रोज न चुकता कसल्या नं कसल्या प्रकारचे, खेळण्यांचे फोटो कार्यालयातुन आल्यावर काढण्यात मग्न आहे मी आणि त्यामुळेच खरं सांगायचे तर ब्लॉग लिहायला वेळच मिळत नाहीये.

घरातील ’न मोडलेली’ (अर्थात फारच थोडी फार जी होती ती) खेळण्यांचे फोटो काढुन झाले आणि आता पुढे काय? हा प्रश्न पुन्हा एकदा आss वासुन समोर उभा ठाकला आणि ह्याचे परीणाम म्हणुन की काय अचानकच ’अरेच्चा, ओजसला बर्‍याच दिवसांत नविन खेळच आणले नाहीत की आपण’ असे म्हणुन माझ्यातला पिता नाराज झाला. मग काय विचारता एका दगडात दोन पक्षी मारता येत आहेत आणि माझ्यातला पुणेकर शांत कसा बसेल. म्हणजे बघा, नविन खेळणी आणली तर ओजसपण खुश आणि मला फोटो काढायला मिळत आहेत म्हणल्यावर मी पण खुश 🙂 आजच सकाळी पुण्यातील ’एस.मॉल’ मध्ये जाऊन गाड्यांचे काही मिनीएचर घेउन आलो. इतके मस्त कलेक्शन आहे त्यांच्याकडे, इतके महाग नसते तर खुप सार्‍या घेउन आलो असतो. मला आणि ओजसला दोघांनाही कुठले घेउ आणि कुठले नको अस्सेच झाले होते (फक्त दोघांची कारणं वेग-वेगळी होती :-))

तर असा प्रकार आहे बघा सगळा, हेच उद्योग चालु आहेत सध्या. तसे फ्लिकरवर सगळे फोटो टाकतच असतो मी, तरीपण असेच काही निवडक फोटो इथे जोडत आहे.

तसेच बर्‍याचश्या फोटोंमध्ये दिसणारा ’बोकेह’ नामक दिव्यांचा खेळ कॅमेरातुन टिपायचा कसा? ह्याबद्दलचा एक लेख आपल्या ’मराठीमंडळी.कॉम’ ह्या संकेतस्थळावर इथे लिहीला आहे.

चित्र कशी वाटली हे जरुर कळवा.

डो.भु.भु.म. भुंग्याचा आज वाढदिवस


 

 

 

हाच तो दिवस होता, २० मार्च २००९ जेंव्हा ’डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंग्याने’ महाजालावर पदार्पण केले आणि बघता बघता असंख्य वाचक मिळवले. ९ महिन्यात एक लाखाच्यावर वाचक वर्ग आणि ’स्टार माझा’च्या मराठी ब्लॉग स्पर्धेत मिळवलेला प्रथम क्रमांक हे त्याच्या शिरपेचात खोवले गेलेले दोन मानाचे तुरे. परंतु त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे सर्व वाचकवर्गाने मनापासुन दिलेले प्रेम आणि वेळोवेळी आपल्या अमुल्य प्रतिक्रियांनी दिलेला प्रतिसाद हाच तो त्या भुंग्याचा ह्या वर्षात कमावलेला ठेवा.

जानेवारी महिन्यात लाखांचा टप्पा पार झाल्यावर खरं तर फारसे लेखन ह्या ब्लॉगवर झालेच नाही. पण तरीही पंचविस हजाराच्या वर वाचकांनी ह्या ब्लॉगला भेटी दिलेल्या पाहुन वाचकांना हा ब्लॉग अजुनही तितकाच भावतो आहे ह्याचा विश्वास वाटला आणि त्याच निमीत्ताने ह्या ब्लॉगवर साठलेली धुळ झटकण्याचा चंग बांधता आला.

पुन्हा एकदा हा भुंगा लवकरच भुणभुणायला लागला आहे, आणि एका दीर्घ रहस्यमय, खुनांवर बेतलेली गुन्हेगारी कथा घेऊन आपल्या भेटीस येण्यास उत्सुक आहे.

आपला ह्या ब्लॉग वरील विश्वास, प्रेम आणि लोभ असाच कायम रहावा हीच ह्या पहिल्या वाढदिवशी ’डोक्यात भुणभुणणाऱ्या मराठी भुंग्याला’ आपण दिलेली सप्रेम भेट ठरेल.

धन्यवाद.

नादखुळा


“छंद”, आयुष्यात प्रत्येकाने केंव्हा ना केंव्हा, कुठल्या नं कुठल्या प्रकारचा जोपासलेला असतो. पुर्वीच्या काळी छंदाची व्याप्ती फार छोटी होती. ‘पोस्टाची तिकीटं गोळा करणे’, ‘दुर्मीळ नाणी, नोटा गोळा’ करण्यापासुन दुर्मीळ गाण्यांच्या ध्वनीमुद्रीका, वेगवेगळ्या वाहनांची, अभिनेत्यांची छायाचित्र गोळा करण्यापर्यंतचे छंद हे सर्वसामान्यांपर्यंत मर्यादीत होते. परंतु काही छंद मात्र केवळ श्रीमंतांचीच मक्तेदारी होऊन राहीले होते.

काळ बदलला, ग्लोबलायझेशन मुळे अनेक संधी उपलब्ध झाल्या, गरीब मध्यमवर्गीय झाले आणि मध्यमवर्गीय- उच्च मध्यमवर्गीय. खिश्यात खुळखुळणारा पैसा वाढला परंतु त्या अनुषंगाने येणारे ताणतणाव सुध्दा वाढले आणि पुन्हा एकदा मनुष्य छंदांकडे आकर्षीत झाला. वर उल्लेखलेले छंद हे बहुदा स्वतःपुरतेच मर्यादीत होते. परंतु आता छंद जोपासण्याची व्याप्ती वाढली आहे. एकसमान छंद जोपासणारे अनेकजण एकत्र येऊन एखादा समुह स्थापन करतात आणि हे सर्वजण मिळुन आपला छंद जोपासताना दिसत आहेत.

गेल्या काही वर्षात असे अनेक ग्रुप मला माहीती पडले त्याबद्दल थोडेसे –

१. सायकल – सायकल हे नुसतेच पर्यायी वाहन न रहाता किंवा तो केवळ एक ‘फिटनेस मंत्र’ न रहाता तो आता अनेकांचा एक छंद झाला आहे. पुर्वीच्या काळी ३५००ची सायकल म्हणजे लोकं भुवया उंचावायचे पण आता केवळ सायकल चालवण्याची आवड म्हणुन अक्षरशः ५० हजारांच्या सायकल चालवणारे सुध्दा पहातो आहे. अश्याच एका ग्रुपचा मी सदस्य आहे. झेन-ऑफ-सायकलींग असे त्या ग्रुपचे नाव. ‘कोकण दर्शन’, ‘पुणे-गोवा’, ‘पुणे-कन्याकुमारी’, ‘मनाली-लेह-लडाख’ अश्या अनेक उत्तोमोत्तम सायकल राईड्स ह्या ग्रुप ने पार पाडलेल्या आहेत. १८ वर्षाच्या युवकापासुन पासष्ठीच्या आज्जी-आजोबांपर्यंतचे दीडशेहुनही अधीक सदस्य ह्या ग्रुप मध्ये आहेत. ही झाली पुण्याची गोष्ट. पण असेच अनेक ग्रुप मुंबई, बॅगलोर सारख्या मेट्रो मध्ये पण आहेतच की.

२. फोटोग्राफी – एक काळ होता जेंव्हा फोटो काढणे म्हणजे श्रीमंतांचे काम असायचे. खानदानी फोटो काढुन भिंतींवर चढवायचा रिवाजच होता ना तेंव्हा. नंतर मात्र सर्वसामान्य एक चैन म्हणुन महिन्यातुन एकद वेळेस स्टुडीओ मध्ये जाऊन सहकुटुंब फोटो काढुन घेऊ लागले. फिल्म रोल असेपर्यंत तरी फोटो काढणे हे तसे चैनीचेच काम होते. आवश्यक तेंव्हाच, सणा-समारंभाचेच फोटो काढले जायचे. डिजीटल युग अवतरले आणि फोटोग्राफीचा कायापलट झाला. अनेक उदयोन्मुख फोटोग्राफर जन्माला आला. फुलं, झाडं, किडे-मकोडे, निसर्ग इतकंच काय भिकारी, रस्त्यावरील वाहतुक, प्राणी, पक्षी अश्या अनेक चित्र-विचीत्र गोष्टींचे फोटो निघु लागले आणि सौदर्याचे एक वेगळेच दालन सर्वांसाठी उघडले गेले.

डिजीटल एस.एल.आर ने तर क्रांतीच घडवुन आणली. खुद्द डोळ्यांनी सुध्दा जी गोष्ट सुंदर दिसु शकत नाही तितके सौदर्य ह्या कॅमेराने प्रत्येक गोष्टीला बहाल केले. केवळ फोटोग्राफीचा छंद म्हणुन कॅमेरा आणि त्याला लागणारे फिल्टर्स, लेन्स ह्यासाठी लाखो रुपायांवर हसत हसत पाणी सोडणारे कित्तेकजण आजुबाजुला दिसतील. नुसता पैसाच नाही तर त्यासाठी लागणारी चिकाटी, संयम सुध्दा वाखाणण्यासारखा आहे. काही दिवसांपुर्वीच एका वृत्तपत्रामध्ये एका प्रसिध्द छायाचित्रकाराने काढलेला दोन सिहिणींचा फोटो आला होता. हा फोटो मिळवण्यासाठी तो म्हणे २७० तास एका जागी खिळुन होता.

अर्थात ही झाली व्यावसायीक बाजु. परंतु केवळ छंद म्हणुन सुध्दा अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील. सिंहगडावर जाणारी नेहमीची वाट सोडुन गडावर नं जाता गडाच्या थोडे खाली जाळीमध्ये, पाणवठ्याच्या ठिकाणी गेलात तर पक्ष्यांची छायाचित्र टिपण्यासाठी तासंतास एका जागी चिकटुन बसलेले अनेक हौशी छायाचित्रकार दृष्टीस पडतील. केवळ सुर्योदय टिपायचा म्हणुन पहाटे ३.३० ला घरातुन निघुन ९० कि.मी. कुडकुडत्या थंडीत जाऊन विलक्षण दृष्य टिपणारे सुध्दा दिसतील. फोटोग्राफर्स@पुणे (AKA P@P) हा असाच एक फोटोग्राफीमध्ये स्वतःला झोकुन देणाऱ्या ध्येयवेड्यांचा ग्रुप.

अर्थात वर दिलेली उदाहरणं ही ढोबळ मानाने सांगता येतील. ह्यामधील काही छायाचित्रकारांचा उद्देश केवळ पक्ष्यांची छायाचित्र टिपणे असतो, काहींचा केवळ निसर्ग, काहींचा सुक्ष्म गोष्टींचा (मॅक्रो) तर कुणाचा अजुन काही. पण अजुन एक समुह ह्या सर्वांपासुन थोडा वेगळा असा आहे. ह्या छायाचित्रकारांचा उत्साह ‘रेल्वे’चे फोटो टिपण्यात आहे. आश्चर्य वाटले ना? मलाही वाटले होते. पण ही मंडळी केवळ रेल्वेचे उत्तोमोत्तम फोटो मिळवण्यासाठी कधी कोकणच्या कड्यात तर कधी माळरानावर ठाण मांडुन बसतात. इंडीयन रेल्वेज फॅन क्लब असे ह्या समुहाचे नावं.

३. चित्र रेखाटन – छायाचित्रकलेशी थोडेफार सार्धम्य दाखवणारा हा अजुन एक छंद. पण ह्यामध्ये कुठल्या यंत्राची मदत नं घेता पेन्सील आणि रंगाच्या कुंचल्याच्या सहाय्याने चित्र रेखाटन करण्याची कामं ही मंडळी करतात. शनिवार-रविवारी कधी पुणे विद्यापीठ, कधी नदीकाठचे एखादं मंदीर तर कधी अजुन कुठे ही मंडळी कोऱ्या कागदावर चित्र रेखाटत असतात. पुण्यामधील संस्कार-भारती नावाने हा समुह कार्यरत आहे. ह्याचाच एक उपविभाग मोठ मोठ्या रांगोळ्या रेखाटण्याच्या छंदात मग्न आहे. गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ मोठ्या रांगोळ्यांच्या पायघड्या घालणारे हेच ते ‘संस्कार भारती’

५. रॉयल इन्फिल्ड – बुलेट, दणदणीत वाहन, पुर्वीच्या काळी फक्त काही निवडक लोकंच वापरत. पण आजच्या युगात हे वाहन तरूणांची ‘धडकन’ बनले आहे. रॉयल इन्फिल्ड, थंडरबर्ड वापरणाऱ्या अश्याच काही हौशी, छंदीष्ट ‘रायडर्स’ चा सुध्दा एक ग्रुप आहे. ‘हिमालयन’ सफारी अंतर्गत हा ग्रुप बऱ्याच वेळा मनाली ते लेह-लडाख हा कठीण मार्ग आपल्या दुचाकींवरुन मार्गक्रमण करत पार पाडतो.

लाखाच्या घरात मिळणारी, अधुन मधुन खर्च काढणारी आणि इंधन सुध्दा जास्त खाणारी ही बुलेट केवळ छंदापायी आज अनेकजण बाळगुन आहेत.

असे अनेक छंद जोपासणारे समुह आपल्या दृष्टीस पडतात. बहुतेक ट्रकच्या मागे ब-याच वेळा आपण लिहीलेले बघतो ‘नाद करायचा नाय‘ पण आजच्या युगात ‘नाद करायचाच‘, आत्ता नाही करणार तर मग कधी? रोजच्या ह्या रडगाण्याला, मानसीक ताणतणावांना, हेवेदावे-मत्सराला विसरण्यासाठी, स्वतःला वेळ देण्यासाठी छंद जोपासणे आवश्यक होऊन बसले आहेच पण त्याच बरोबर काही करत असाल तर ‘मेक ईट लार्ज’ करण्याच्या प्रवृत्तीमुळे जे करु ते ‘शान’से करु झालेले आहे. ह्याच समुहांमुळे अनेक नविन ओळखी होतात, आपला छंद तर जोपासला जातोच, पण त्याचबरोबर ती कला अधीक चांगली होण्यासाठी इतर लोकांची मदत सुध्दा होते.

अजुन आहेत तुमच्या माहीती असे काही छंद? जरुर प्रतिक्रियेमध्ये कळवा, कदाचीत आपल्यातलाच एखादा उदयोन्मुख कलाकार आपल्यात लपलेले गुण निपजण्यासाठी उद्युक्त होइल.