मास्टरमाईंड (भाग-६)


तिच्या मागे एक सहा फुट उंच धिप्पाड, पिळदार मिश्या असलेली व्यक्ती उभी होती. त्या व्यक्तीचा चेहरा घामाने डबडबला होता. डोळे तारवटले होते, जणु काही खोबणीतुन बाहेर पडतील. डॉलीची नजर त्या व्यक्तीच्या चेहर्‍यावरुन खाली सरकली आणि तिला धक्काच बसला. त्या व्यक्तीचे शरीर रक्तबंबाळ झाले होते. कोणीतरी किमान आठ ते दहा वेळा एखादा सुरा भोसकला होता. डॉलीच्या तोंडुन एक जोरदार किंकाळी बाहेर पडली.

ति व्यक्ती कुठल्याही क्षणी कोसळेल अशी उभी होती. त्या व्यक्तीने आपला हात हळु हळु वर उचलला. थरथरत्या तळहाताचे एक बोट पहिल्यांदा डॉलीच्या चेहर्‍यासमोर स्थिरावले आणि मग उजवीकडे सरकले. ती व्यक्ती डॉलीच्या मागे कुणाकडे तरी बोट दाखवत होती. डॉलीने आपली नजर हळुवार मागे फिरवली. मागे जॉन उभा होता.

“डॉली काय झालं? भैय्यासाहेब!!, काय झालं भैय्यासाहेब?”, जॉन धावतच पुढे झाला, परंतु तो पर्यंत भैय्यासाहेबांचा देह खाली कोसळला होता.

डॉलीची किंकाळी ऐकुन इ.पवारही धावत आले.

डॉली मात्र अजुनही आळीपाळीने भैय्यासाहेबांचा चेहरा आणि जॉन ह्यांच्याकडे बघत होती.

*****************************

भैय्यासाहेबांच्या खुनाने अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. निराशेच्या, संतापाच्या, आश्चर्याच्या. छोट्याश्या गावात तिसरा खुन होतो आणि खुन्याचा साधा पुरावा सुध्दा मिळत नाही ह्या विचाराने पोलीस सुध्दा वैतागले होते.

“भैय्यासाहेबांचा खुन झाला तेंव्हा इ.पवार, जॉन आणि डॉली तेथेच होते. परंतु भैय्यासाहेबांचा बारीकसा सुध्दा आवाज ऐकु आला नाही. भैय्यासाहेबांसारख्या आडदांड माणसाला एका पकडीत तोंड दाबुन धरुन भोसकणे अशक्य. ह्याचा अर्थ.. असा धरायचा का, की ज्याने खुन केला तो भैय्यासाहेबांच्या ओळखीतला होता?”, पवारांच्या डोक्यात विचारचक्र चालु होते.

पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार पुन्हा एकदा त्याच प्रकारचा, त्याच आकाराचा सुरा खुनासाठी वापरण्यात आला होता.

“चव्हाण, डोकंच चालेनंसं झालंय बघा!. काहीच संदर्भ लागत नाहीये. सर्व लोकं वेगवेगळ्या क्षेत्रातील. तसा कुणाचा एकमेकांशी संबंध नाही. त्यामुळे खुनामागील मोटीव्ह, पॅटर्न काहीच स्पष्ट होत नाही. मग हे खुन का होतं आहेत? का खरंच तो खुनी माथेफिरु आहे???” इ.पवार आगतीक होऊन बोलत होते, “आता हेच बघा, भैय्यासाहेबांचा खुन करुन कुणाला काय फायदा? म्हणजे असं बघा, तसे भैय्यासाहेब मोठं माणुस होतं. कुणाची ना कुणाची तरी दुश्मनी असणारच, पण खुन करण्याइतपत मजल जाईल असं कोण असेल?”

“नानासाहेब??” चव्हाण सहजच बोलुन गेले.

“काय बोलताय चव्हाण, शुध्दीवर आहात का? अहो बाहेर बोललात तर लोकं मारतील आपल्यालाच”, पवार म्हणाले

“नाही म्हणजे, नानासाहेबांचं पहिल्यापासुनच भैय्यासाहेबांशी वाकडं आहे. त्या जमीनीच्या वादावरुन तर सध्या फारच बिघडलं होतं दोघांच्यात. लोकांदेखत नानासाहेबांनी भैय्यासाहेबांना जिवे मारण्याची धमकी दिली होती”, चव्हाण वरमुन म्हणाले.

“अहो पण चव्हाण, असं बोलणं वेगळं आणि खरोखर करणं वेगळं”, पवार

“ते आहेच हो.. पण संपत्ती! नानासाहेबच वारस होणार सगळ्या संपत्तीचा. भैय्यासाहेबांना ना मुल ना बाळ!!”, चव्हाण

“बरं. एक वेळ तसं समजुन चालु. पण मग शेवंता आणि अनिताताई? खुन तर एकाच प्रकारच्या हत्याराने झालेत. तुमचं म्हणणं खरं धरलं तर त्या दोघींचा खुनसुध्दा नानासाहेबांनीच केला असं म्हणायचे आहे तुम्हाला?” पवार

“शेवंताचं नानासाहेबांच्या वाड्यावर जाणं येणं होतंच. वंगाळ बाई ती, आणि नानासाहेब सुध्दा तसे रंगेल आणि तितकेच भडक डोक्याचे. काही तरी कुठं तरी बिनसले असेल त्यांच. अनिताताईंच म्हणाल तर नानासाहेबांचे दोन दारुचे गुत्ते बंद पाडले होते तिनं, बिना परमीटवाले. गावाबाहेरच्या वडाखाली चालणारे मटक्याचे धंदे शाळेतील पोरांना वाईट सवयी लागतात म्हणुन पंचायतीत तक्रार करुन त्यावर सुध्दा आन आणली होती.” चव्हाण.

“हम्म.. चव्हाण, तुम्ही म्हणताय त्यात तथ्य दिसतेय खरं. पण आपल्याला लगेच असा आरोप करता येणार नाही, हाती बक्कळ पुरावा असल्याशिवाय. लक्ष ठेवायला हवे. शिवाय, शेवंताच्या खुनाच्या वेळी मिळालेल्या वर्णनाशी नानासाहेबांचे वर्णन जुळत नाही तेंव्हा ती व्यक्ती सुध्दा सापडणं तितकंच महत्वाचे”, पवार

“पण साहेब, त्या वर्णनावर आपण किती विश्वास ठेवायचा. अश्या चार लोकांना विचारुन आपण ते चित्र बनवले आहे जे एकतर झोपेत होते, नाहीतर त्यांनी त्या व्यक्तीला अंधुक प्रकाशात निसटसे पाहीले होते..” चव्हाण

“बरोबर आहे, पण नानासाहेब ४५-५०शीचे, त्यात अंगाने आडदांड, निदान अशी तरी ती व्यक्ती नक्कीच नव्हती नाही का..” पवार, “.. बर एक काम करुयात, उद्या नानासाहेबांच्या वाड्यावर एक चक्कर टाकुन येऊ. सहजच, नेहमीच्या चौकश्यांसाठी आणि काही अंदाज घेता येतोय का बघु.. काय?”

“होय सर”, मान डोलावत चव्हाण म्हणाले.

*****************************

नानासाहेबांचा वाडा भैय्यासाहेबांइतका मोठ्ठा नसला तरी एक भव्य वास्तु म्हणता येईल इतपत मोठा नक्कीच होता. परंतु भैय्यासाहेबांच्या वाड्यावर जो एक प्रसन्नपणा जाणवायचा तो इथे खचीतच नव्हता. गेटवर पहारा देणारे, इतरत्र वावर करणारी लोक ही गुंड कॅटॅगरीतली वाटायची.

इ.पवार व्हरांड्यातुन आत शिरले. नानासाहेब अडकित्याने सुपारीची खांड फोडत बसले होते. इ.पवारांना बघताच उभे राहीले आणि कडेच्या खाटेकडे हात दाखवत पवारांना बसायला सांगीतले.

“काय पवार साहेब, काय म्हनतोय तपास? काय सुगावा लागला का नाय? अवं गावात तिसरा मुडदा पडलाय!! कसं रहायचं गावात आमी?” कपाळावर आठ्या पाडुन आपले सुपारी फोडण्याचे काम चालु ठेवत नानासाहेब म्हणाले.

पवारांनी एकवार मागे वळुन उभ असलेल्या चव्हाणांकडे पाहीले आणि परत नानासाहेबांकडे वळुन म्हणाले, “नानासाहेब, तपास तर चालुच आहे. काही मार्ग दिसतो आहे, पण त्याबद्दलच उघडपणे बोलणं आत्ता योग्य ठरणार नाही.”

“काय सुगावा लागलाय? जरा आम्हाला तरी कळु द्या”, नानासाहेब
“हो तर. नक्कीच, त्याबद्दलच बोलायला आम्ही तुमच्याकडे आलो आहोत”, पवार म्हणाले, “चव्हाण, तो जरा कागद देता?”

चव्हाणांनी त्यांच्याकडचा कागद काढुन पवारांकदे दिला.

“नानासाहेब, अश्याप्रकारचा सुरा तुमच्या कधी पहाण्यात आला आहे?” तो कागद उलगडुन दाखवत पवार नानासाहेबांना म्हणाले, “आत्तापर्यंतचे सर्व खुन ह्याच प्रकारच्या चाकुने झाले असावेत असा आमचा अंदाज आहे”

नानासाहेबांनी एकवार त्या चित्राकडे निरखुन पाहीले आणि म्हणाले, “नाय ब्वा!”

“फार दुर्मीळ आणि अती प्राचीन काळचा सुरा आहे हा. म्हणलं तुम्हाला जुन्या वस्तु जमवायची हौस, कदाचीत तुमच्या संग्रही असेल तर..” पवार

“म्हंजी, तुम्हाला असं म्हणायचयं ह्ये खुन आम्ही क्येले? ओ पवार साहेब, सरकारी मानुस तुम्ही म्हनुन इज्जतीत हाय, लाथ घालुन हाकलले अस्तं”, नानासाहेब चवताळुन म्हणाले.

“नाही हो नानासाहेब, तुम्ही गैरसमज करुन घेत आहात. तुम्ही कुठं पाहीला असेल म्हणुन विचारलं. शेवटी चौकशी करणं हेच आमचं काम आहे काय?” पवार

पवार आणि नानासाहेब बोलत होते तेवढ्यात आतुन एक पंचवीशीतली तरुणी आणि एक तिशीतला तरुण बाहेर आले.

पवारांच्या चेहर्‍यावरील प्रश्नचिन्ह बघुन नानासाहेब म्हणाले, “ही सुमन, माझी पोरगी, मुंबईला अस्तेय आणि ह्ये शशांक, आमचं होनार जावई. ह्ये बी मुंबईलाच असतंय. भैय्यासाहेबांची मौत झाली म्हणुन आलं होतं इकडं, जातील ४-८ दिवसांत”

“सुमनं?!! हो आठवतेय मला. कॉलेजला म्हणुन जी गावाबाहेर गेली ती आज आलीस बघ!!”, पवार.. पवारांच लक्ष शशांककडे गेले. सडसडीत बांध्याचा, गोरापान, सावळ्या सुमनला थोडासा उजवाच वाटणारा शशांक मान वळवुन दुसरीकडेच बघत होता.

“नमस्कार शशांक राव…”.. पवार म्हणाले..

“नमस्कार..” चेहर्‍यावर पुसटसे हास्य आणत शशांक म्हणाला

“आपण काय करता मुंबईला??” पवार

“माझ्या वडीलांची केमीकल फॅक्टरी आहे..” शशांक.. इ. पवारांच्या प्रश्नांनी अस्वस्थ होत
म्हणाला..

“.. नाही, ते झालं.. तुम्ही काय करता.. फॅक्टरी तर वडील बघत असतील ना..??” खोचकपणे पवार म्हणाले..

“हम्म.. मी त्यांना मदत करतो..” शशांक..

“म्हणजे नक्की काय करता?..” पवार आपला प्रश्न सोडायला तयार नव्हते

शशांकच्या चेहर्‍यावर पसरलेल्या वैतागाचे जाळं बघुन नानासाहेब जागेवरुन उठले.. “ओ पवारसाहेब, कश्यापाय छळताय पोरांस्नी..? जावा निघा तुमी, कामं करा…जा रं पोरांनो..”

शशांक लगेच बाहेर पडला..

भैय्यासाहेबांच असं अचानक जाणं सुमनच्या चेहर्‍यावर दिसत होते. चेहर्‍यावर कसनुसं हसु आणुन ती शशांकबरोबर बाहेर पडली.

“बरंय नानासाहेब, येतो आम्ही, परत कधी काही लागलं तर चक्कर टाकीन.. काय?” असं म्हणुन पवार आणि चव्हाण बाहेर पडले.

गाडीत बसताना पवार म्हणाले, “चव्हाण त्या शशांकची बॅकग्राऊंड चेक करा. कुठं रहातो, काय करतो. सगळी माहीती काढा. गावात आलेला प्रत्येक नवीन माणुस माझ्यासाठी संशयीत व्यक्ती आहे”

चव्हाणांच्या चेहर्‍यावर ’काय पण आपलं साहेब’ दर्शवणारे भाव होते.

*****************************

“डॉली!!, तुझा अजुनही माझ्यावर संशय आहे??”, जॉन

डॉली खिडकीबाहेरच बघत होती.

” अगं मी कशाला खुन करु भैय्यासाहेबांचा? माझा काय फायदा त्यात?” जॉन डॉलीला हताश होऊन विचारत होता

“पण मग त्या दिवशी भैय्यासाहेबांनी तुझ्याकडे का बोटं दाखवलं?” डॉली जॉनच्या नजरेला नजर न देता बोलत होती.

“आता ते मी कसं सांगु, भैय्यासाहेब जिवंत असते तर त्यांनीच कारण सांगीतले असते..” जॉन

“आणि त्या दिवशी??..”

“त्या दिवशी काय डॉली? त्या दिवशी काय??, तुला कित्तीदा सांगु समजावुन सांगु? त्या दिवशी घाटात मी नव्हतो! आणि शेणाचं काय घेऊन बसलीस! रात्री तु जरी ह्या गावातुन चक्कर मारुन आलीस तरी कधी ना कधी, कुठं ना कुठं तुझ्या पायाला पण लागेलच! म्हणुन काय तु खुनी झालीस का?”

“आय डोंट नो जॉन..! मला खुप भिती वाटतेय!”, डॉली

“भिती? कुणाची?? माझी?? ओह कमॉन डॉली, डोंन्ट ऍक्ट स्टुपीड.”, असं म्हणुन जॉन तेथुन निघुन गेला

[क्रमशः]
भाग ७

12 thoughts on “मास्टरमाईंड (भाग-६)

 1. प्रभास गुप्ते

  जॉनच्या पाठीमागे खुनी असण्याची शक्यता आहे.
  हा तर्क लावण्यात माझी कोणतीही हुशारी नाही, पण ’सावरखेड – एक गांव’ मध्ये असाच सिन होता. 🙂

  Reply
  1. अनिकेत Post author

   चालायचंच रे प्रभास, लाखो सिनेमांमध्ये असा सिन आहे, सावरखेड आपलं तुला एक आठवलं.

   आता हेच बघ ना, तुझ्या ब्लॉगवर तु रुबी-वॉटर बद्दल जे लिहीलं आहेस, जी उदाहरणं दिली आहेत ती रुबी बद्दल माहीती देणार्‍या लाखो वेब-साईटशी साधर्म्य दाखवतात हे सांगायला सुध्दा मला कुठलीही हुशारी लागली नाही.. काय?? 😀

   Reply
   1. प्रभास गुप्ते

    पण मला माहीत आहे तु आता काहीतरी जबरी ’कहानी मे ट्विस्ट’ आणणार! 😀

    माझ्या साईटवरची माहिती टेक्निकल आहे, काल्पनिक नाही. त्यामुळे ती सारखी असणे साहजिकच आहे! जे आहे तेच लिहीणार ना मी! माझ्या साईटवर वॉटरची दोनच उदाहरणं आहेत, आणि त्यातले एकच सर्वत्र उपलब्ध आहे हो.. दुसरे मी स्वतः लिहीलेले आहे.

    असो.

    सांगण्याचा मुद्दा असा की, मी आपला माझा तर्क लावलाय. आता पुढचा भाग आला की बघेन तर्क बरोबर ते चुक ते. शेवटी आपण काय त्या ’जॉन’ एवढे हुश्शार नाही बुवा. 😉

    Reply
 2. ARUNAA ERANDE

  मज़्या ही मनात तेच आले कि खूनी जॊन्च्या मागे अस्ण्याची शक्यता आहे. बघूया काय खरे आहे ते! पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहते आहे.

  Reply
 3. विशाल तेलंग्रे

  चव्हान किंवा शशांक असण्याची जास्त चिन्हे आहेत! चव्हान पहिल्यापासूनच पवारांना हवी ती माहिती पुरवित आहे, पण तो खरी पुरवतोय की खोटी हे मात्र अजुनही गुपित, पण माझा तरी त्याच्यावर दाट संशय आहे! ह्म्म, पण त्याचे वर्णन अजुन तरी या कथेत दृष्टीस पडले नाही! शशांकच्या बाबतीत म्हटलं तर त्याचे वर्णन त्या भाग एक मधील खून करणार्‍या व्यक्तीशी जास्त मिळते, पण तो या भागात नविनच दिसला, त्यामुळे संशयाची सुई त्याच्याकडे वळवणे सध्या तरी घाईत निर्णय घेतल्यासारखे होईल… प्रत्येक भागात तोच थरार कायम ठेवण्यात बरचसं यश मिळवलंहेस दादा तू… पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.

  Reply
 4. Vrushali

  ekdum sahi blog aahe ha tumcha.. so many different topics, all equally interesting.. Tumhi aayushya ekdum “to its fullest” jagata aase watate.. (kaam kadhi karta pan mag? -Ek puneri khochak prashna.. don’t mind ha..!!)

  Reply

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s