Monthly Archives: June 2010

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ४)


भाग ३ पासुन पुढे >>

“मॅडम, त्या व्यक्तीचे नाव ’जोसेफ’ असे आहे. ’हेल्पलाईन’ मध्ये तो एक महीन्यापुर्वीच स्वयंसेवकाच्या पदासाठी भरती झाला. लहानपणापासुन तो अनाथच आहे. सिंधुताईंच्या.. हेल्पलाईनच्या प्रमुख, म्हणण्यानुसार जोसेफ आपल्या कामात चोख आणि प्रामाणिक आहे. संस्थेमध्ये काही दिवसांतच तो अनेक विद्यार्थ्यांचा लाडका झाला आहे. कुठल्याही प्रकारचे काम करण्यात तो मागे-पुढे पहात नाही.

ह्या पुर्वी त्याचे स्वतःचे गॅरेज होते, पण परीस्थीतीमुळे त्याला ते विकावे लागले. काही ठिकाणी त्याने ड्रायव्हरचेही काम केले आहे.

यापुर्वी करत असलेल्या कामाच्या ठिकाणांचे हे काही रेफरंन्सेस आणि रेकमंडेशन लेटर्स..”, असे म्हणुन नैनाने काही कागदपत्रांच्या प्रती रोशनीच्या समोर ठेवल्या.

रोशनीने सर्व कागदपत्रं कागळीपुर्वक वाचली आणि मग ती नैनाला म्हणाली, “हे बघ नैना, मला वाटते मला एका चांगल्या ड्रायव्हरची आवश्यकता आहे. आपले देव काका आता थकले आहेत. लांबचे प्रवास त्यांना झेपत नाहीत. आय नीड सम फ्रेश लेग्ज टु ड्राईव्ह मी प्लेसेस.. तु त्या जोसेफशी संपर्क करुन आपल्यासाठी काम करायला आवडेल का विचार आणि तो तयार असल्यास त्याला कामावर रुजु करुन घे. ह्या जगात चांगल्या लोकांची फार कमतरता आहे आणि अशी चांगली लोकं हातची जाऊन देणे योग्य ठरणार नाही..”

जोसेफचा ’चांगली व्यक्ती’ उल्लेख ऐकुन नैनाला मनोमन हसु फुटले, पण ते चेहर्‍यावर न दाखवता, ’येस मॅम’ म्हणुन ती तेथुन बाहेर पडली.

****************************************

फिक्कट निळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची ट्राउझर घालुन जोसेफ रोशनीच्या ऑफीसच्या बाहेर नर्व्हस होऊन बसला होता. समोरच्या डेस्कवर नैना बसली होती, पण मधुनच घडणारी नजरानजर सोडली तर त्या दोघांमध्ये कसलाही संबंध नव्हता.

सोनेरी रंगाचा चष्मा, क्लिप्स लावुन व्यवस्थीत बसवलेले केस, चेहर्‍यावर गंभीर भाव, शरीराला घट्ट चिकटुन बसलेला पांढरा शर्ट आणि तितकाच घट्ट करड्या रंगाचा गुडघ्यापर्यंतचा स्कर्ट अश्या पेहरावात नैना खुपच इमॅक्युलेट दिसत होती.

टेबलावरचा फोन वाजला तशी जोसेफची तंद्री भंग पावली.

नैनाने फोन खाली ठेवला आणि जोसेफला बरोबर चलायची खुण केली. समोरचे दार उघडुन नैना आणि तिच्यापाठोपाठ जोसेफ आतमध्ये गेले. समोरच भावनाशुन्य चेहर्‍याने रोशनी बसली होती. अडगळीतील वस्तु काढण्यासाठी हात घालावा आणि हाताला गिळगीळीत घाणेरड्या पालीचा स्पर्श व्हावा तेंव्हा जसा अंगावर शहारा येईल तस्साच शहारा जोसेफच्या अंगावर येऊन गेला.

जोसेफला आतमध्ये सोडुन नैना बाहेर निघुन गेली.

रोशनीने हातानेच जोसेफला बसायची खुण केली.

“हॅलो जोसेफ”, फार लांबुन कुणाचातरी हळुवार आवाज यावा तसा रोशनीचा आवाज आला. ती खरंच काही बोलली का आपण ऐकले तो भास होता हे क्षणभर जोसेफला कळेना. परंतु उत्तराच्या अपेक्षेत असलेले क्षणभर तिच्या चेहर्‍यावर आलेले भाव पाहुन ती खरंच तसं काही म्हणाली होती असं वाटुन जोसेफ उत्तरला “हॅलो..मॅम”

“सो!, तुम्हाला रोशनी एन्टरप्रायझेस साठी काम करण्यात उत्सुकता आहे आणि तुम्ही माझे ड्रायव्हर म्हणुन काम करण्यास उत्सुक आहात असे मी समजु?”, रोशनी
“हो आणि नाही मॅम..”,जोसेफ
“म्हणजे, मला कळाले नाही”, खुर्चीवरुन किंचीतसे पुढे सरकत रोशनी म्हणाली.
“म्हणजे मॅम, मला रोशनी एन्टरप्रायझेससाठी काम करायला आवडेल, पण ड्रायव्हर म्हणुन नाही. मला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये चांगले ज्ञान आहे आणि त्याचा उपयोग रोशनी एन्टरप्रायझेसच्या नविन येऊ घातलेल्या प्रोजेक्टच्या कामात मी योग्य रीतीने करु शकतो असे मला वाटते. ते शक्य नसेल तर मला ’हेल्पलाईन’ मध्ये स्वयंसेवक म्हणुन काम करणे जास्त पसंद आहे..” जोसेफने आपले फासे टाकले होते..
“पण तसे असेल तर तुम्ही इथे आलातच कश्याला? मी तुम्हाला ड्रायव्हरच्या जागेसाठी बोलावले होते..”, रोशनी
“मॅम, तुम्हाला भेटायची संधी कोण सोडेल? आणि मी तुम्हाला खात्री पटवुन देऊ शकतो की ऑटोमोबाईल प्रोजेक्टसाठी मी तुम्हाला जास्ती उपयोगी पडु शकतो.”, जोसेफ

रोशनीने क्षणभर विचार केला आणि म्हणाली, “ठिक आहे जोसेफ, मी तुला फक्त पाचच मिनीट देऊ शकते. ह्या पाच मिनीटात तु मला इंम्प्रेस करु शकलास, तर तुझा जॉब नक्की. नाही तर तु जाऊ शकतोस”

जोसेफने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपले ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्ञान पाजळायला सुरुवात केली. सुरुवातीला आपण काहीही फेकले तरी ह्या बेगड ’बेबी एलीफंट’ ला काय समजणार? असा असणारा समज क्षणार्धात गळुन पडला. रोशनीला ही त्या क्षेत्रातील बरीचशी माहीती होती आणि तिने त्याचे काही मुद्दे खोडुन काढले होते.

इंजिन पॉवर, हॉर्स पॉवर, पिस्टन अश्या बारीक सारीक गोष्टींपासुन सुरु झालेली चर्चा रेसींग कार्स आणि त्यातील सुक्ष्म सर्कीट्स, संगणकीय कॉम्पोनंट्स वगैरेंसारख्या किचकट गोष्टींवर येऊन पोहोचली होती.

पाचच मिनीटांच्या चर्चेचे रुपांतर चांगल्या तासभराच्या चर्चेत झाले होते. बाहेर नैनाचा जिव वर खाली होत होता. ड्रायव्हरच्या जागेसाठी इतका वेळ रोशनी जोसेफशी काय बोलत असेल ह्याचा तिला काहीच थांगपत्ता नव्हता. जोसेफने नैनाच्या नकळत प्लॅनमध्ये नसलेला आपला डाव आखला होता.

“नैना, आत मध्ये ये…”, नेहमीप्रमाणे उत्तराची अपेक्षा न करता रोशनीने इंटरकॉम ठेवुन दिला
नैना आत मध्ये आली तशी रोशनी तिला म्हणाली, “नैना, मिट मी.जोसेफ.. आवर न्यु सुपरवायझर फॉर रोशनी ऑटोमोबाईल्स..”

“अ व्हॉट??”.. नैना दचकुन म्हणाली.
“अ सुपरव्हायझर”, रोशनी पुन्हा त्याच टोन मध्ये म्हणाली.

“पण मॅडम, सध्या आपल्याकडे एक सुपरव्हायझर आहे त्या फ्लोअर साठी..” नैना
“.. फायर हिम..”, नैनाचे वाक्य पुर्ण व्हायच्या आधीच रोशनी म्हणाली..”आणि मि.जोसेफ साठी अपॉईंटमेंट लेटर बनव.”

“मि. जोसेफ, आपली पगाराची काही अपेक्षा?”, रोशनी जोसेफकडे वळुन म्हणाली.
“फिफ्टी थाऊसंड पर मंथ”, क्षणाचाही विलंब न करता जोसेफ म्हणाला

“इझंट इट बिट मोअर??”, नैना
“ट्रस्ट मी, यु वोंट बी डिसअपॉईंटेड!!”, नैनाकडे न बघता रोशनीकडे बघत जोसेफ म्हणाला..

“ऑलराईट.. नैना मिस्टर जोसेफना त्यांच्या अपेक्षीत पगारासहीत अपॉईंटमेंट लेटर दे!”, रोशनी

************************************************

“हे बघ जोसेफ, माझ्या प्लॅन मध्ये मला नं विचारता फेरफार केलेले मला चालणार नाही”, वैतागुन नैना म्हणत होती.

“तुझा प्लॅन? मला वाटतं नैना हा आता आपला प्लॅन आहे..”, जोसेफ

“हो! आहे!! आपलाच आहे, पण तो कसा, कुठुन, कुणी सुरु करायचा आणि त्याचा शेवट कसा करायचा हे माझ्या डोक्यात पक्क आहे. उद्या प्रत्येक जण वेगवेगळा, आपल्या मताने वागायला लागला तर त्या प्लॅनचे बारा वाजल्याशिवाय रहाणार नाही”, नैना

“मला वाटत नैना, तु उगाच हायपर होते आहेस. एका ड्रायव्हरच्या नोकरी ऐवजी मी फक्त सुपरवायझर म्हणुन रोशनी एन्टरप्रायझेस मध्ये घुसलो. ह्याने असा कितीसा फरक पडणार आहे?.. का जळती आहेस तु माझ्यावर?”, जोसेफ

“………..”

“चल, जाऊ देत यार.. लेट्स सेलेब्रेट!.. कमॉन.. गिव्ह मी ए लॉंग किस्स…”, नैनाला जवळ ओढत जोसेफ म्हणाला

परंतु नैनाने त्याला बाजुला ढकलले आणि पर्स उचलुन ती जोसेफच्या घरातुन निघुन गेली.

***************************************

जोसेफचा प्लॅननुसार ’रोशनी एन्टरप्रायझेस’मध्ये शिरकाव झाला होता. परंतु त्याचवेळेस नैना आणि जोसेफमध्ये धुसफुस सुरु झाली होती. काय होईल ह्याचे पर्यवसन? रोशनी नैना-जोसेफ-ख्रिसच्या प्लॅनला बळी पडेल? का ह्या सर्वांना पुरुन उरेल?

खुप काही घडायचे बाकी आहे.. वाचत रहा भाग ५…

[क्रमशः]
भाग ५ >>

भटकंती लिमीटेड: पाबे खिंड


॥ श्री पंकज बाबा प्रसन्न ॥

माझा डी.एस.एल.आरचा मालक होण्याचे स्वप्न श्री पंकजबाबांच्या उपासनेनंतर त्यांच्या कृपेने सफळ झाले. परंतु त्यानंतर मात्र नेहमीच्या कामात व्यस्त झाल्यानंतर फोटो काढायला जमेनासे झाले. घरातच, आजुबाजुला काढलेले फोटो असा कितीसा आनंद, समाधान देणार? त्यात पंकजबाबांचा ब्लॉग आणि फ्लिकर अकांऊंट ’भटकंती अन-लिमीटेड’ नवनविन फोटोंनी भरभरून वाहत होता.

मिशीवाला पंक्या नामक पोस्ट लिहून मी मनातली जळफळ व्यक्त केलेली होतीच. परंतु पंकजबाबांची अघाध करणी बघा, ती पोस्ट लिहीतानाच मला साक्षात्कार झाला आणि फोटो मिळवण्यासाठी घरात बसुन उपयोग नाही तर त्याला भटकंती गरजेची आहे ह्याचे ज्ञान झाले.

मग थोडेफार फिरलो, चांगले फोटो मिळाले आणि उत्साह वाढीस लागला. अश्यातच माझ्या दोन मित्रांनी माझ्या पावलावर पाऊल टाकुन डी.एस.एल.आर खरेदी केला आणि मला प्रथमच भटकंतीला कंपनी मिळाली.

ह्या शनिवारचा मुहुर्त साधुन अनलिमीटेड नाही, पण लिमीटेड भटकंतीची मुहुर्तवेढ रोवली आणि ’पाबे खिंडीला’ धावती भेट दिली.

’पाबे खिंड’, सिंहगडाच्या पायथ्यापासुन खानापुर/पानशेतचा रस्ता धरायचा आणि तेथुन डावीकडे वळुन तोरणा / राजगडाकडे जाणारा चिंचोळा घाट रस्ता पकडुन ’पाबे खिंड’ गाठावी. येथुन दोन महाकाय किल्ले- तोरणा आणि राजगडाचे विहंगम दृश्य घडते.

वेळेअभावी जास्ती न लिहीता काही निवडक फोटोंची मालीका इथे जोडत आहे, आश्या आहे ते आपल्या पसंतीस उतरतील.

ह्युंदाई आय-२०, ड्राईव्ह युअर वे –

नॉट ऑल रोड लिड्स टु रोम, सम लिड्स टु डिव्हाईन नेचर –
(तोरणा आणि राजगड दोन महाकाय किल्ले कॅमेरामध्ये टिपण्याचा एक केविलवाणा प्रयत्न)

व्हेन स्काय हॅज टु ऑफर सो मच… क्लिक इट..

राजगड –

तोरणा –

येताना भेटलेले शेतकरीबाबा, ज्यांनी त्यांच्या शेतीची, पेरणीच्या कामांची सर्व माहीती स्वतःहुन दिलीच आणि परत त्यांचे काही फोटो आणि त्यांच्या बैलजोडीचे (राजा आणि प्रधान) फोटो सुध्दा काढायला लावले. एवढेच नाही तर पंधरा दिवसांनी भातलावणीच्या वेळी पुन्हा एकदा भेट देण्याचे आमंत्रण सुध्दा दिले –

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ३)


भाग २ पासुन पुढे >>

सकाळी बरोब्बर नऊ वाजुन पंचेचाळीस मिनीटांनी मिस् नैनाच्या डेस्क वरील इंटरकॉम खणखणला.

“येस्स मॅम..”, नैनाने क्षणाचाही विलंब न करता फोन उचलला.

नैनाचा आवाज ऐकल्यावर समोरचा फोन बंद झाला.

हरामी साली..“, नैना मनोमन म्हणाली..”इतकी वर्ष झाली इथं काम करुन, पण रोज ९:४५ ला फोन करुन मी वेळेवर जागेवर आहे की नाही हे पहाते..

नैनाने टेबलाच्या खणातुन आरसा बाहेर काढला, स्वतःचे केस एकसारखे केले, ओठांवरुन फिक्कट लाल रंगाच्या लिप्स्टीकचा एक हात फिरवला, टिश्युने चेहर्‍यावरची धुळ झटकली आणि घड्याळात नजर टाकली.. “अजुन दहा मिनीट आणि त्या कुत्रीच तोंड बघायची वेळ येईल. तिला जळवायला, खिजवायला माझं हे सुंदर रुप खुप आहे. चेहर्‍यावरील मेक-अप, अंगाला घट्ट बिलगलेले कपडे, टाक-टाक वाजणारे बुट हे सर्व पाहुन तिची होणारी जळफळाट खरंच खुप सुखवणारी आहे.. तिच्या त्या रुड वागण्याला न बोलता दिलेले हे माझं उत्तर आहे..” नैना स्वतःशीच बोलत होती.

बरोब्बर दहा वाजता टेबलावरील इंटरकॉम पुन्हा एकदा खणखणला.
’नैना..’ पलीकडुन आवाज आला.. ’प्लिज कम इन..’ नैनाकडुन उत्तराची अपेक्षा न करताच फोन बंद झाला होता.

नैनाने नोटपॅड, अपॉंईन्मेंट्स ची डायरी आणि पेन उचलले आणि समोरचे भले मोठे दार उघडुन ती आतमध्ये गेली.

समोरच लांबलचक टेबलाच्या दुसर्‍या टोकाला एक बसकी, जाडजुड आकृती बसली होती. खिडकीतुन येणार्‍या उजेडामुळे त्या व्यक्तीचा चेहरा निटसा दिसत नव्हता परंतु अनुभवाने ती व्यक्ती नैनाकडे आणि तिच्या पेहरावाकडे पहात आहे हे तिने ताडले होते.

नैना सावकाशपणे पावलं टाकत, कमरेला नाजुक लटके देत, वेळोवेळी कपाळावरील केस मागे सारत त्या व्यक्तीपाशी जाउन पोहोचली.

“शुssssट”, ती व्यक्ती, अर्थात रोशनी नैनाला म्हणाली.

नैनाने डायरी उघडली आणि वाचायला सुरुवात केली.

“सकाळी ११.०० वाजता “वर्ल्ड मनी” बॅकेचे जी.एम. येणार आहेत. आपण हाताळत असलेल्या नविन ऑटोमोबाईल प्रोजेक्टचे सर्व व्यवहार त्यांच्या बॅकेमार्फत व्हावेत अशी त्यांची इच्छा आहे आणि त्याबाबत आपणास बॅक देऊ करत असलेल्या सुविधांबद्दल आणि इतर बाबींवर चर्चा करण्यासाठी ते येणार आहेत. ह्या…”

“मिटींग कॅन्सल कर..” रोशनी म्हणाली.

“..पण मॅडम, श्री अविनाश वर्मा त्या बॅकेचे जि.एम आहेत आणि..”

“नेक्स्ट..” रोशनी म्हणाली..

“ओ.के मॅम.. १२ वाजता ‘कुल इंटीरेअर्स’ च्या मिस् भावना प्लॅंन्टच्या इंटेरिअर्सचे फायनल ड्राफ्ट्स घेउन येणार आहेत…”, नैनाने एक प्रश्नार्थक नजर रोशनीकडे टाकली आणि पुढे वाचायला सुरुवात केली..

“१.३० वाजता पुअर्स मेडीकल असोसीएशनचे काही लोक आपणास भेटायला येणार आहेत. आपल्या शहरामध्ये ही संस्था करत असलेल्या कार्या…”

“मिटींग कॅन्सल कर आणि त्यांना हव्या असलेल्या रकमेचा चेक चॅरीटी म्हणुन देऊन टाक… नेक्स्ट..”, रोशनी

नैना एक एक अपॉईंटमेंट्स वाचत होती आणि रोशनी त्यावर घेण्याच्या ऍक्शन्स नैनाला सांगत होती. शेवटी नैना ’त्या’ भेटीपाशी येऊन पोहोचली.. तिच्या मनामध्ये धाकधुक चालु होती. आज नाही तर पुढच्या महीन्यापर्यंत वाट पहावी लागेल. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली ..

“आजची शेवटची मिटींग ५.३० वाजता ’हेल्पलाईन फॉर हॅन्डीकॅप्ड्स’ संस्थेमध्ये आपणास बोलावले आहे. परीक्षेमध्ये किंवा अंतर्गत व्यवसायाभुमीक अभ्यासक्रमात यश मिळवलेल्या अनाथ आणि अपंग विद्यार्थ्यांचा आपल्या हस्ते सत्कार आहे.. आपली उपस्थीती प्रार्थनीय आहे तसेच ती तेथील विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणारी ठरेल.” नैनाने रोशनीकडे नजर फिरवली

दीर्घ वेळ विचार केल्यानंतर रोशनी म्हणाली..”ठिक आहे, आपण जाऊ तिकडे.. ड्रायव्हरला सांगुन गाडी तयार ठेवायला सांग..”

“येस्स मॅम..” नैनाच्या चेहर्‍यावर आनंदाची एक लहर चमकुन गेली. तिने आपला चेहरा क्षणात भावनाशुन्य केला आणि पुढील कामासाठी ती खोलीबाहेर पडली.

दिवसातला प्रत्येक क्षण, प्रत्येक तास मोठ्या मुश्कीलीने चालला होता. वेळ जाता जात नव्हता. नैना हातातील घड्याळात वेळ बघुन बघुन कंटाळली होती. शेवटी ती वेळ येताच नैना टेबल आवरुन बाहेर पडली. ड्रायव्हरला दहा वेळा बजावुन तिने गाडी वेळेत तयार ठेवली होती. ठरल्या वेळी रोशनी बाहेर आली आणि गाडीत येऊन बसली. त्या विचीत्र, अघळपघळ आकृतीशेजारी बसण्याचा विचारही नैनाला असह्य होत असे आणि म्हणुनच आदर असल्याचा बहाणा करुन ति पुढच्या सिटवर ड्रायव्हरशेजारीच बसणे पसंद करत असे.

’हेल्पलाईन फॉर हॅन्डीकॅप्ड्स’च्या प्रवेशद्वारातुन गाडी आतमध्ये गेली तशी नैनाची हृदयाची धडधड अजुन वाढली. हीच ती वेळ होती जेथुन खर्‍या अर्थाने त्यांच्या प्लॅनला सुरुवात होणार होती. सारे काही व्यवस्थीत घडणे गरजेचे होते.

रोशनीने नेहमीच्याच थंडाव्याने काही निवडक शब्दात आपले भाषण उरकले आणि विद्यार्थ्यांचा सत्कार सुरु झाला. एक एक विद्यार्थ्याचे नाव पुकारले जात होते आणि तो किंवा ती रोशनीपाशी येऊन आपले बक्षीस घेऊन जात होती. पुढचे नाव पुकारले गेले. तो अपंग विद्यार्थी स्टेजकडे येत होता आणि अचानक कश्याततरी पाय अडकुन तो धाडकन खाली पडला. कडेला उभे असलेल्या संयोजकांपैकी काहीजण त्या मुलाला उचलायला धावले तेवढ्यात दुसर्‍या एका कोपर्‍यातुन एक खणखणीत आवाज ऐकु आला..

“थांबा……..”

सर्वजण जागच्याजागी थबकले आणि त्या आवाजाच्या दिशेने पाहु लागले.

गर्दीतुन एक देखणा तरूण पुढे झाला.. खाली पडलेल्या त्या विद्यार्थ्याच्या दिशेने चालता चालता तो म्हणाला.. “कुणीही ह्या विद्यार्थ्याला उचलण्याची आवश्यकता नाही. स्वतःची काळजी स्वतः घेण्याची, स्वतःच्या अधु का असेना पायावर स्वतः उभे रहाण्याची धमक आणि हिंमत केवळ ह्याच नाही तर इथील प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आहे.. किंबहुना आपल्या सारख्या धडधाकट माणसांपेक्षा काकणभर जास्तीच.

आज तुम्ही त्याला उठायला हातभार दिलात तर कदाचीत आयुष्यभर तो तुमच्या मदतीवर अवलंबुन राहील. त्याला कळु द्यात, त्याच्यामध्ये असलेल्या शक्तीची जाण त्याला होऊ द्यात, नको असताना तुमचा मदतीचा हात पुढे करुन त्याला अधीक अपंग बनवु नका. त्याला तुमच्या प्रोत्साहनाची गरज आहे, पोकळ मदतीची, किव/दया भरलेल्या नजरांची नाही.”

खाली पडलेला तो विद्यार्थी खुदकन हसला आणि उठुन उभा राहीला.

सर्वत्र टाळ्यांचा एकच गजर झाला. नैनाची नजर मात्र एकटक रोशनीच्या चेहर्‍यावर खिळली होती. परंतु भावनाशुन्य रोशनीच्या चेहर्‍यावरची एखादी रेषाही हालल्याचे नैनाला जाणवले नाही.

जोसेफने आपले काम चोख केले होते, आता नशीबाचा कौल मिळणे गरजेचे होते. त्याने एक नजर नैनाकडे टाकली आणि तो परत गर्दीत जाऊन उभा राहीला.

कार्यक्रम संपला आणि नैना रोशनीबरोबर परत यायला निघाली. नैनाचे कान रोशनीचे शब्द ऐकण्यासाठी तरसले होते. परंतु रोशनी नेहमीप्रमाणेच स्वतःच्या विचारात मग्न, शांत होती. मेहतांच्या अलिशान बंगल्यात गाडी येऊन थांबली. रोशनी खाली उतरली आणि खुरडत खुरडत आत जाऊ लागली. नैनाची नजर अजुनही त्या पाठमोर्‍या आकृतीकडे लागली होती.

काही अंतर गेल्यावर रोशनी थांबली आणि मागे वळुन नैनाला म्हणाली, “नैना, मला त्या तरूणाबद्दलची सर्व माहीती उद्या संध्याकाळच्या आत माझ्या टेबलावर हवी आहे. आजच्या मिटींग संपल्या असल्याने तु आता गेलीस तरीही चालेल..” असे म्हणुन ती आतमध्ये निघुन गेली.

*******************************************

’ब्ल्यु-वेव्ह’ क्लब मध्ये नैना, ख्रिस आणि जोसेफ एकत्र ड्रिंक्स घेत बसले होते. नैनाच्या चेहर्‍यावरील आनंद काही केल्या लपत नव्हता.

“आज एकत्र अशी आपल्या तिघांची ही शेवटची भेट असेल. उद्यापासुन आपण एकत्र कुठेही दिसता कामा नये. प्लॅनचा पहीला टप्पा तरी निट पार पडला. उद्या रोशनीच्या टेबलावर जोसेफ बद्दलची सर्व ’खोटी’ माहीती मी पुरवीन. आय होप एव्हरीथींग विल गो वेल..”

“जे काही करायचे आहे ते लवकर करा बाबा.. त्या घाणेरड्या संस्थेत, त्या अपंग, अनाथ मुलांबरोबर महीनाभर राहुन मी जाम कंटाळलो आहे, मला पहिले बाहेर काढा तेथुन..” जोसेफ वैतागुन बोलला.

त्याचे वाक्य पुर्ण व्हायच्या आधीच नैना आणि मागोमाग ख्रिस उठुन उभे राहीले.

“गुड बाय जोसेफ ऍन्ड ऑल द बेस्ट”, नैना जोसेफला म्हणाली आणि बाहेर पडली.

जोसेफ मागोमाग पळत बाहेर गेला.

“नैना..” त्याने हाक मारली. त्या अंधार्‍या चिंचोळ्या बोळात त्याला केवळ नैना उभी असल्याचेच दिसत होते. तो काळाभिन्न ख्रिस अंधारात न हालता उभा होता का? आणि असेल तर कुठे होता ह्याची त्याला किंचीतशीही कल्पना येत नव्हती.

जोसेफने नैनाचा हात धरुन तिला जवळ ओढले आणि तिचे एक दीर्घ चुंबन घ्यायला तो पुढे सरकला.. परंतु नैनाने त्याला हातानेच ढकलले..

“ओह कम ऑन नैना.. एक महीना झाला मी त्या संस्थेत रहातो आहे.. बाहेरचे जग बघायला सुध्दा बाहेर पडलो नाही. आणि आपण परत कधी भेटु हेही सांगु शकत नाही. आजची रात्र, येतेस माझ्याबरोबर…?” जोसेफ म्हणाला..

“लिव्ह मी अलोन जोसेफ”, नैना त्याच्या मिठीतुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करत म्हणाली. परंतु जोसेफने त्याची पकड अधीक घट्ट केली. त्याचबरोबर त्याच्या खांद्यावर एक मजबुत हाताची थाप पडली..”सोड तिला!!” एखादी वार्‍याची झुळुक येऊन हलकेच कानात काहीतरी बोलावी तसे अगदी हळुवार आवाजातले शब्द त्याच्या कानावर पडले.. पण त्या आवाजात प्रचंड जरब होती.

जोसेफने मागे न बघताच नैनाला सोडुन दिले. नैना त्या बोळातुन बाहेर पडली, एखादी सावली जावी तशी एक काळी आकृती तिच्या मागोमाग बाहेर पडली.

आपला खांदा झटकत जोसेफ मनोमन बोलला..”ऑलराईट नैना, आज हा कुत्रा तुझ्याबरोबर आहे. पण कधीतरी तु मला एकटी सापडशीलच आणि त्यादिवशी तुला वाचवायला कोणी नसेल..

[क्रमशः]
भाग ४>>

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग २)


भाग १ पासुन पुढे >>

“’आर. पी. मेहता’, नाव ऐकुन असशीलच. रोशनी ऍंन्टरप्राईझचे सर्वेसर्वा मेहतांना केवळ आपलाच देश नाही, तर अनेक देश त्यांना आणि त्यांच्या कर्तुत्वाला ओळखतात. टेक्स्टाईल्स, मेटल वर्क्स, शिपींग आणि आता डायमंड व्यवसायात त्यांनी आपला चांगलाच ठसा उमटवला आहे. असं म्हणतात की त्यांची एकुण संपत्ती किती आहे हे त्यांनाच ठाऊक नाही. संपत्तीची मोजदाद करणं त्यांनी केंव्हाच सोडुन दिले आहे. तुझ्या स्वप्नातल्या ’शोअरुम’ मध्ये जेवढ्या गाड्या तु पाहील्या नसशील तेवढ्या गाड्या मेहतांच्या पार्कींग मध्ये धुळ खात उभ्या आहेत.

मेहता साहेबांनी हा सगळा पसारा आपल्या मुलीच्या, ’रोशनीच्या’ नावाने उभारला आहे. रोशनी.. फार थोड्या जणांना तिच्या बद्दल काही माहीती आहे कारण रोशनी कधी जगासमोर आलीच नाहीये. बहुतेक वेळा ती आपल्या घरातच बसुन असते. आणि ह्याचे कारण म्हणजे तिचे रुप. ’बेबी-एलीफंट’ ही उपमा चपखल बसु शकेल अश्शीच ती आहे. गोल मटोल, डस्की कंम्प्लेक्शन, शरीरावर सर्वत्र अतीरीक्त चरबीचा साठा, डाव्या पायाला काहीतरी प्रॉब्लेम असल्याने ते खुरडत खुरडत चालणे, बसके नाक ह्यामुळे एकुणच तो प्रकार पहाणे बहुतांश वेळेला किळसवाणे ठरते. आणि तिला सुध्दा तिच्या ह्या रुपाचा तिरस्कार आहे त्यामुळेच ती सोशलाईज होत नाही. ती स्वतः अनेक सामाजीक संस्थांशी संबंधीत आहे. कित्तेक करोड रुपायाच्या देणग्या ति ह्या संस्थांना देत असते. ’रोशनी स्पोर्ट्स’ ह्या नविन ब्रॅन्ड खाली, मेहता स्पोर्ट्स कार्स चे एक नविन दालन चालु करत आहेत आणि ते सांभाळण्याची सर्व जबाबदारी रोशनीने स्विकारली आहे असे ऐकुन आहे.

ही रोशनी जितकी कुरुप आहे तितकीच स्वभावाने वाईट्ट.. एक नंबरची बिच! अत्यंत मुडी आणि ’टफ टु हॅन्डल’. ह्याच रोशनीची पर्सनल असीस्टंट म्हणुन गेले कित्तेक वर्ष मी काम करते आहे. तिथे माझ्या कामासाठी मिळणार्‍या पैश्याच्या मोबदल्याचा मोह नसता तर ही नोकरी मी केंव्हाच सोडुन दिली असती. त्या खुरडणार्‍या घाणेरड्या कुत्रीबरोबर काम करायला कोण तयार होईल?

असो.. आपल्याला ह्या रोशनीचा काटा काढायचा आहे. तिच्या मृत्युनंतर सर्व संपत्तीचा मालक आणि वारसदार एक दिवस तुच होशील..”

“मी? माझा काय संबंध?”.. नैनाचे वाक्य अर्धवट तोडत जोसेफ म्हणाला..

जोसेफ मध्येच बोलल्याची तिव्र नाराजी नैनाच्या चेहर्‍यावर झळकुन गेली. तिने काही क्षण डोळे मिटुन घेतले. मग समोरचा व्होडकाचा रिकामा झालेला ग्लास रिफील केला, एक लार्ज सिप घेतला आणि ती पुन्हा बोलु लागली..

“तु रोशनीशी लग्न करायचेस…” नैना म्हणाली..

“अरे काय गंम्मत आहे का? मी काय प्रिन्स चार्ली किंवा लॉर्ड फोकलंन्ड आहे? तिला काय महाश्रीमंत तरुणांची कमी आहे की ती माझ्यासारख्या भिकार्‍याशी लग्न करेल..!!”, खुर्चीतुन उठत जोसेफ म्हणाला..

“तु मला बोलु देशील तर मी तुला सगळा प्लॅन ऐकवु शकेन..” वैतागुन नैना म्हणाली..

जोसेफ पुन्हा आपल्या खुर्चीत रेलुन बसला.

“तु म्हणतोस ते खरं आहे. रोशनीला कित्तेक उमदे तरूण मिळतील, पण तिच्यावर मनापासुन प्रेम करणारा एखादा तरी असेल का ही शंका आहे. जे कोणी असतील ते सर्व तिच्या संपत्तीवर डोळा ठेवुनच तिच्याशी लग्न करायला तयार होतील आणि हेच नेमके तिला नकोय. तिला तिच्यावर दाखवलेली दया, माया ह्याचा तिरस्कार आहे. ति कुठल्या प्रकारच्या तरूणाच्या प्रेमात पडु शकते हे इतक्या वर्ष तिच्याबरोबर काम केल्यावर मी चांगलच जाणते आणि नेमक्या त्याच रुपात मी तुला तिच्यासमोर आणणार. तिच तुझ्याशी लग्न कसे होईल ती जबाबदारी माझी.

तुझे तिच्याशी लग्न झाल्यावर काही महिन्यांनी तु तिचा खुन करायचा. पण हा खुन नसुन एक अपघात होता असे आपण दाखवणार आहोत.

तिच्या मृत्युनंतर तिच्या नावावर असलेल्या कंपन्या आणि मालमत्तेचा सर्वेसर्वा तुच होशील. तीच संपत्ती इतकी आहे की तो पैसा नुसता खर्च करत बसायचे म्हणले तरी तुझे अर्धे आयुष्य खर्ची पडेल. मेहता जो पर्यंत आहेत तो पर्यंतच, त्यानंतर त्यांच्या संपत्तीचा वारसही तुच असणार आहेस”

“..पण नैना हे सर्व जरा अधीक तपशीलात सांगीतले असतेस तर बरं झालं असते. हा वरवरचा प्लॅन ऐकुन मला तरी त्याची खात्री वाटत नाही..”, जोसेफ

“सांगेन, सर्व काही प्रत्येक बारकाव्यासहीत सांगेन. आपण तिघंही ह्या प्लॅनबद्दल जो पर्यंत पुर्णपणे समाधानी होत नाही तो पर्यंत हा प्लॅन सुरु होणार नाही. प्रत्येकाला त्याचा ह्या प्लॅनमधील सहभाग प्रत्येक सुक्ष्म गोष्टींनीशी माहीती हवा. एखादी छोटीशी सुध्दा चुक होता कामा नये..” नैना

“..तिघं?? आपण तर दोघंच आहोत नैना..” जोसेफ आश्चर्याने म्हणाला..

“नाही जोसेफ, ह्या प्लॅनमध्ये तिघं आहेत.. तु मी आणि ख्रिस..”
“ख्रिस? हा ख्रिस कोण?”, जोसेफ

“उद्या संध्याकाळी ७.३० वाजता, ’ब्ल्यु वेव्ह’ क्लब मध्ये आपण तिघंही भेटणार आहोत, तेंव्हाच हा प्लॅन पुर्णपणे उलगडला जाईल. त्यातील प्रत्येकाची भुमीका स्पष्ट केली जाईल. त्यातील लुप-होल्स शोधुन त्यावर मार्ग काढला जाईल…आपण करोडपती होणार आहोत जोसेफ.. करोडपती!!”.. असं म्हणुन नैना जागेवरुन उठली, व्होडकाचा उरलेला पेग रिकामा केला आणि जोसेफकडे न बघता बाहेर पडली..

***********************************

सदैव गजबजलेल्या एम.जी.रोडवरच एका अरुंद, अंधारलेल्या बोळातुन थोडे आतमध्ये गेल्यावर एका कोपर्‍यात ’ब्ल्यु-वेव्ह’ क्लब होता. बर्‍याचश्या लोकांना ह्या क्लबबद्दल माहिती नव्हतीच, आणि ज्यांना होती ते सहसा त्या बाजुला फिरकत नसत. ’ब्ल्यु-वेव्ह’ क्लब ही एक अशी जागा होती ज्याबद्दल उघडपणे कोणीच काही बोलत नसे, परंतु न बोलुनही तेथे काय चालते आणि कश्या प्रकारच्या लोकांची वर्दळ तेथे असते हे सर्वश्रुत होते.

’त्या’ दिवशी संध्याकाळी ८ च्या सुमारास मंद दिव्याचे साम्राज्य असलेल्या छोट्या क्युबीक्स पैकीच एका कोनाड्यात तिघं जणं बोलत बसले होते.

गडद काळ्या रंगाचा पेहराव केलेली एक तरूणी, पहाताक्षणी प्रसिध्द मॉडेल ’मिलींद सोमण’ चा चेहरा आणि शरीरयष्टीशी मिळता जुळता भासणारा एक तरुण आणि त्याच्याच बाजुला एक काळा भिन्न, भावनाहिन चेहर्‍याचा एक, कुठल्याश्या क्लब मध्ये बाऊंसर म्हणुन शोभणारा एक दांडगट माणुस असे ते त्रिकुट हळुवार आवाजात कश्याबद्दल तरी बोलत होते.

दोन तास अथक बोलल्यानंतर प्रत्येकाच्या चेहर्‍यावर समाधान पसरले होते.

“.. पण नैना, मला खरच गरज वाटत नाहीये ख्रिसची ह्या प्लॅनमध्ये. माझ्यावर विश्वास ठेव आपण दोघंच हा प्लॅन यशस्वी करु शकु. कश्याला हवाय आपल्या हिस्स्यामध्ये अजुन एक भागीदार?” तो मिलींद सोमण सारखा दिसणारा देखणा तरूण, अर्थात जोसेफ बोलत होता.

“..हे बघ जोसेफ, मला रिस्क घ्यायची नाहीये. ऐनवेळी तु माघार घेतलीस तर आपण सर्वच जण गोत्यात येऊ. माझा ख्रिसवर पुर्ण विश्वास आहे. आजपासुन प्रत्येक क्षणी तो तुझ्याबरोबर असेल. तुला कळणारही नाही ख्रिस आहे.. पण तो असेल… तुझ्या आजुबाजुलाच कुठेतरी नक्की असेल.

काही गडबड झालीच तर तुला त्याची नक्की मदत होईल, पण हेही लक्षात ठेव की तु काही दगाबाजी करायचा प्रयत्न केलास तर ख्रिस ही पहीली आणि शेवटची व्यक्ती असेल ज्याला तु भेटशील..”, नैना

“समहाऊ, आय एम नॉट दॅट हॅप्पी बिईंग धिस बिग कॅट अरांऊड मी ऑल द टाईम”, हाताची बोट अस्वस्थपणे मोडत जोसेफ म्हणाला

“डोंट वरी, यु प्ले युअर कार्ड्स स्ट्रेट, ऍन्ड ख्रिस वोंन्ट बॉदर यु..” नैना ख्रिसचा भलामोठ्ठा दंड थोपटत म्हणाली.

ह्या संपुर्ण भेटीमध्ये ख्रिस एकही शब्द बोलला नव्हता. मात्र अधुनमधुन त्याच्याही होणारी नजरानजर जोसेफला अस्वथ करत होती.

येत्या काही महीन्यातच एका व्यक्तीचा आपण खुन करायचा आहे आणि त्याचवेळेस हा भयानक माणुस सदैव आपल्या आजुबाजुला घुटमळत असणार आहे ह्या विचारानेच त्याचे हाताचे तळवे घामेजले होते.

नैना जायला उठली तसा ख्रिस पाळीव कुत्र्यासारखा उठुन उभा राहीला आणि जोसेफकडे ढुंकुनही न बघता तिच्या मागोमाग बाहेर पडला.

दोघंही निघुन गेल्यावरही जोसेफ तेथेच बसुन होता. “कोण असेल हा ख्रिस? नैना त्याला कशी ओळखते? त्याचा आणि नैनाचा काय संबंध? आपल्यासारखेच नैना त्याच्याबरोबरही बिछान्यात..!!

शेवटी त्याने त्या दोघांचाही विचार करणे सोडुन दिले. पुढचे काही महीने आणि सर्व काही सुरळीत झाले तर आपण करोडपती असु. आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरत असेल. मग काय करायचे त्या नैना आणि त्या ख्रिसचे. त्याने नैनाने सांगीतलेला सर्व प्लॅन पुन्हा एकदा नजरेसमोरुन घातला. रोशनीच्या विचाराने त्याच्या अंगावर एक काटा आला. नैनाने जसे रोशनीचे वर्णन केले होते त्याप्रमाणे खरंच जर ती असेल तर तिच्याशी लग्न सोडाच, प्रेमाचे नाटक करायचे म्हणजे सुध्दा एक दिव्य वाटत होते.

जे चालले आहे तेच बरे का?” एक विचार त्याच्या मनात येऊन गेला. “प्लॅन फसला आणि पकडलो गेलो तर स्वप्न पुर्ण करणे सोडाच, आत्ताचे स्वच्छंदी जगणे पण नशीबात राहीले नसते. नैना नाही तर नाही, दुसरी कोणतीही त्याला सहज मिळाली असती.” पण मग ख्रिसचा विचार डोक्यात आला. “नैनाने सर्व प्लॅन ओपन केला होता. आता माघार घेणे म्हणजे..

जोसेफ ’ब्ल्यु-वेव्ह’ क्लबचा दरवाजा उघडुन बाहेर आला. थंड वार्‍याची एक झुळुक त्याच्या अंगाला स्पर्शुन गेली. अंधारात त्याने सर्वत्र नजर फिरवली. कुठेच कोणतीच हालचाल जाणवत नव्हती. जोसेफची नजर ख्रिसचा शोध घेत होती, परंतु त्या अंधारात कोणी असण्याची शक्यता धुसरच होती.

जोसेफच्या मनात नैनाचे शब्द हेंदकाळले…”आजपासुन प्रत्येक क्षणी ख्रिस तुझ्या आजुबाजुला असेल.. कदाचीत तो तुला दिसणार नाही.. पण तो असेल.. नक्कीच असेल..

नैनाच्या ’आजपासुन’ ह्या शब्दाचा अर्थ ’आत्तापासुन’ असा असेल काय?” ख्रिस विचार करत त्या अंधार्‍या बोळात शिरला…

[क्रमशः]
भाग ३>>

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग १)


गुन्हेगारी कथांचे लेखक ‘जेम्स हैडली चेस’ ह्यांच्या एका फार पूर्वी वाचलेल्या कथेवर आधारीत. कथेत मला भावतील तसे बदल केलेले आहेत. कथेचे नाव काही केल्या आठवत नाहीये, कुणी चेस ह्याच्या कथांचा वाचक असेल आणि त्याला नाव आठवले तर जरूर कमेंटा.


’पैश्यासाठी खुन करु शकशील?’, छतावर लावलेल्या आरश्यात शेजारी झोपलेल्या नैनाचा विवस्त्र देह पहाण्यात गुंग झालेल्या जोसेफची तंद्री नैनाच्या त्या विचीत्र प्रश्नाने भंग पावली.

अंगावर थंडगार साप पडावा तसा दचकुन उठत तो म्हणाला, “काय??”

“हे बघ जोसेफ..”, नैना आपला आवाज स्थिर ठेवत म्हणाली.. “हे असे अजुन किती दिवस चालवायचे? तुला पैसे देऊन देऊन मी कंटाळले आहे. महागड्या गाड्यांची फ्रॅन्चायजी घ्यायचे तुझे स्वप्न सत्यात कधीच उतरणार नाही ये का?” किती दिवस जुगार आणि लॉटरीतुन मिळणार्‍या तुटपुंज्या उत्पन्नाच्या मोहापायी तु माझे कष्टाचे पैसे असे बरबाद करणार आहेस? किती दिवस मी तीच कंटाळवाणी नोकरी करत रहायची? आयुष्यभर नोकरी करुन असे कितीसे पैसे हाती लागणार? आय नीड फास्ट मनी.. ऍन्ड इझी मनी.”

“अगं पण म्हणुन खुन? आणि कुणाचा? तु काय सुपारी वगैरे घ्यायला लागली आहेस की काय?” हसत हसत जोसेफ उद्गारला

“जोक्स अपार्ट जोसेफ..आय एम सीरीयस. थोडेसे व्यवस्थीत प्लॅनींग आणि फक्त एक योजनाबध्द रीतीने पार पाडलेला खुन आणि आपण दोघंही करोडपती होऊ..” नैना त्याच थंड सुरात म्हणाली.

जोसेफ उठुन बसला आणि त्याने नैनाकडे निरखुन पाहीले. नैनाचा तो मोहक, मादक भासणारा चेहरा पुर्ण बदलला होता. डोळ्यातला तो फ्रेंडली भाव डोळ्यात दाटलेल्या क्रुर गडद करड्या छटेने व्यापला गेला होता.

नैना रंग बदलणार्‍या सरड्यासारखी होती.. बिनभरवश्याची. तीचे कधी कुठले रुप पहावयाला मिळेल हे सांगणे कठीण. आणि तितकीच ती लिथल होती. त्यामुळे पहिल्यांदा जरी जोसेफने तिचा तो प्रश्न हसण्यावारी घेतला असला तरी आता मात्र तो हे जाणुन होता की नैनाच्या मनात नक्कीच काहीतरी शिजत आहे आणि पुर्ण विचार केल्याखेरीज तिने हा प्रश्न विचारला नसणार.

करोडपती??” जोसेफ विचार करत होता..“नैना बोलते तसे खरंच होईल? माझं इंप्म्पोर्टेड कार्स चे शोअरुमचे स्वप्न!!, आत्ताच्या हिशोबानेच पैसे जमवत राहीलो तर स्वप्न पुर्ण व्हायला म्हातारपणच उजडायचे. खरंच करोडो रुपये मिळाले तर काही महीन्यात सर्व काही सुरु करता येईल.. प्लॅन ऐकायला काय हरकत आहे? पटलं तर हो, नाही तर चालले आहे ते काही वाईट नाही.

“काय प्लॅन आहे? कुणाचा खुन करायचा आहे? आणि त्यात रिस्क किती आहे? पकडले गेलो तर?.. आणि..” जोसेफ म्हणाला

“सांगते!!, सगळं सांगते”, नैना अंथरुणातुन उठत म्हणाली.. “पण त्याआधी मी वॉश घेऊन येते, तो पर्यंत तु व्होडकाचे दोन लार्ज पेग बनवुन ठेव आणि खालुन एक ट्रिपल फाईव्ह चे पाकीट..!”

जोसेफ काही बोलायच्या आधीच नैनाने पर्स मधुन एक पाचशेची नोट जोसेफकडे फेकली आणि ती बाथरुम मध्ये निघुन गेली.

“..च्यायला काय बाई आहे?” जोसेफ स्वतःशीच पुटपुटला..”५०-७० रुपायासाठी ५००ची नोट देते..!”

जोसेफ सहा फुटाच्या आसपास, पिळदार शरीरयष्टीचा गोरापान तरूण होता. पैश्याअभावी विरलेले, मळलेले आणि चुरगळलेले कपडे, जुनाट बुट वापरुन आणि बहुतेक वेळा वाढलेली दाढी ह्यामुळे तो एखादा बेवडा किंवा भुरटा चोरच वाटायचा. परंतु जेंव्हा त्याकडे पैसे असायचे आणि तो त्याच्या ’बेस्ट’ मध्ये असायचा तेंव्हा मात्र एखाद्या फॅशन एजन्सीसाठी काम करणारा मॉडेलच वाटायचा.

नैनासारख्या कित्तेक तरूणींनी त्याच्याशी शैय्यासोबत केली होती, पण तो मात्र नैनाकडेच आकर्षीत झाला होता ते तिच्या ’डॉमीनन्स पॉवर’ मुळेच..

नैना आली तेंव्हा जोसेफने व्होडकाचे पेग्स बनवुन ठेवले होते आणि सिगारेट शिलगावुन तो टेबलावर पाय पसरवुन बसला होता.

नैनाने लावलेला इंम्पोर्टेड परफ्युम आणि महागड्या शॅम्पुंचा सुगंध जोसेफला उद्दीपीत करुन गेला. खुना-बिनाचा प्लॅन गेला भो**त, नैनाला पुन्हा एकदा बिछान्यात ओढण्याची तिव्र इच्छा त्याच्या मनात तरळुन गेली.

नैना शांतपणे त्याच्या समोर बसली. व्होडकाचा एक लार्ज सिप तिने घेतला. तो घोट घश्यापासुन पोटापर्यंत जळजळत उतरतानाचा तो फिल तिने डोळे मिटुन अनुभवला. मग दुसरा एक घोट घेऊन ती म्हणाली..

“जोसेफ, मला तुझ्याकडुन प्रथम होकार अथवा नकार हवा आहे. तु आत्ताच ह्या प्लॅन मधुन बाहेर पडु शकतोस. तु नसशील तर मी दुसर्‍या कुणाची तरी मदत घेईन. पण एकदा तु हो म्हणल्यावर ह्यातुन माघार नाही..”

आपणाशिवाय नैना दुसर्‍याकुणाचा विचारच कसा करु शकते..??” जोसेफ मनोमन बोलला.. त्याचा इगो जागा झाला आणि त्याने दुसरा तिसरा विचार न देता होकार देऊन टाकला..”आय एम इन नैना, बोल प्लॅन काय आहे!”

नैनाने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती बोलु लागली….

[क्रमशः]
भाग २ >>

पुणेरी तळटीप – कथेचा लेखक व्यवसायाने पुर्णवेळ साहीत्य क्षेत्रात कार्यरत नसुन एक नोकरदार संगणक अभियंता आहे. त्यामुळे कामाचा व्याप संभाळुन पुढचे भाग पोस्ट होत असल्याने कथेच्या दोन भागांमध्ये असह्य होणारा वेळ असु शकतो त्याबद्दल लेखक दिलगीर आहे. कृपया सहकार्य करावे.

मिशीवाला पंक्या


बहुतेक वेळा प्रत्येकाच्या आयुष्यात ज्या घटना घडतात ना, त्याचे दोन पैलु असतात. एक तर ती घटना चांगली असते किंवा वाईट असते. पण असं फार कमी वेळा होतं की जे घडलं ते छान पण झालं आणि वाईट पण झालं.

माझी पंक्याशी झालेली भेट ही दुसर्‍या विभागातली. म्हणजे ब्लॉगींगच्या निमीत्ताने माझी त्याच्याशी ओळख झाली हे चांगल झालं, ह्या मैत्रीतुन काही फलनिष्पत्ती सुध्दा झाली, पण त्यानंतर मात्र जे घडते आहे तो केवळ “मानसीक त्रास”, “इमोशनल अत्याचार”, “जळफळाट”, “चिडचिड”, “त्रागा”, “असहाय्यता” ह्या सर्व विषेशणांचा अनुभव देणारा ठरत आहे.

“डिजीटल एस.एल.आर” हा प्रकार प्रत्येक उभरत्या फोटोग्राफरच्या मनात रुतुन बसलेला काटा असतो. जोपर्यंत तो निघत नाही तो पर्यंत प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण मनाला एक प्रकारची टोचणी लागुन राहीलेली असते. अर्थात केवळ पैसे आहेत आणि ’चला डी.एस.एल.आर’ घेउन येऊ असं सहसा घडत नाही. आत्तापर्यंत केवळ ’याशीका’ आणि ’कोडॅक’चे फारतर फार तिन हजारापर्यंतचे कॅमेरे वापरल्यावर आणि फार तर फार डिजीटल-कॅमेराच्या युगात १०-१५ हजारापर्यंत मजल मारल्यानंतर अचानक कॅमेरासाठी एकदम ३०-४० हजार घालवायचे आणि नको ते पदरात पाडुन घ्यायचे त्यापेक्षा कोणीतरी माहीतगार आणि फोटोग्राफीच्या क्षेत्रात लोणच्यासारखा मुरलेला बरोबर असणे गरजेचे असते.

ब्लॉगींगने माझी भेट “पंकजझ@फ्लिकर’, ’भटकंती अनलिमीटेड’, ’भटक्या पंकज’ अश्या अनेक टोपण नावांनी प्रचलीत असलेल्या पंक्याशी घडवुन दिली आणि माझ्या नशीबी डिजिटल एस.एल.आर बाळगण्याचे भाग्य आले.

पहिले काही आठवडे माझ्यासाठी ’युरेका, युरेका’ ठरले. जे स्वप्नी पाहीले होते, ज्या ’मॅन्युअल फोकससाठी’ तळमळलो होतो, ’डेफ्ट ऑफ फिल्ड’, ’बोकेह’ असे शब्द नुसते ऐकुन होतो ते सर्व काही प्रत्यक्षात उतरवत होतो. आजुबाजुची मित्र मंडळी ज्यांचा कॅमेरा आणि फोटो म्हणजे फक्त ’शटर बटण’ दाबणे ह्या एकाच व्याख्येशी संबंध होता ती सर्व मंडळी ह्या नविन कॅमेराने टिपलेले फोटो पाहुन माझी प्रशंसा करण्याचे थांबत नव्हती. उन्हाळा सुरु असल्याने पंक्याचे फ्लिकरही बर्‍यापैकी धुळ खात होते. सारे कसे छान, सुरळीत चालले होते.

…पण माशी शिंकली. शिंकणारच होती हो.. नशीबच तसे आहे माझे. प्रत्येक सुखाच्या मागे काहीतरी काळी सावली असतेच असते. आकाशात काळे ढग जमु लागले आणि सुस्तावलेला पंक्या जागा झाला. रात्र रात्र जागुन, प्रवास करुन, डोंगर दर्‍या, सह्याद्रीचे कडे पालथे घालुन पुन्हा एकदा फ्लिकर गजबजु लागला.

खरंच सांगतो, त्याचे ते छान छान फोटो बघायची पण चोरी होsss!! लपुन लपुन बघतो मी.. उगाच कोणी पाहीले तर त्यांना खर्‍या फोटोग्राफीची जाणीव होईल आणि माझे फोटो किती थिल्लर, नीच/हिन दर्जाचे येत आहेत ह्याचा बोभाटा होईल.

पण ’कोंबड झाकलं, म्हणुन सुर्य उगवायचा थोडा नं रहाणार’? माझं मन!!. ते तर पहात होते ना सर्व! झालं.. गद्दारपणा केलाच त्याने. मी आधी काढलेल्या आणि काढत असलेल्या प्रत्येक फोटोला वाकुल्या दाखवुन हसु लागले. ’अज्ञानात सुख असते’ म्हणतात ना, तेच खरं. ’अन्या लेका तु लय भारी फोटो काढतो राव’, हे कधीकाळी मित्रांचे अंगाव मुठभर मास चढवणारे उद्गार आता माझे मलाच बोचु लागले. जेंव्हा मला माझ्याच फोटोंमध्ये ’रुम फॉर इंम्प्रुव्हमेंट’ दिसते आहे, माझ्या प्रत्येकच फोटोमध्ये मला चुका दिसत आहेत तेंव्हा मित्र-मंडळींनी केलेली प्रशंसा अंगी कशी लागेल? आनंद होतच नाही त्याचा. कारण मला माहीती आहे ना, त्यांनी कितीही चांगले बोलले, तरी त्या फोटोत चुक आहे हे मला दिसणे थांबत नाही.

बरं थोडेफार प्रयत्न करुन फोटो येतील / येतातही बरे. पण आजुबाजुच्या १०० मिटर परीसरातील फोटो किती काळ टिपणार? रानवार्‍यात फिरुन, व्हर्जीन निसर्गाला गोंजारुन काढलेल्या फोटोंची त्याला कुठुन सर येणार? घराच्या खिडकीतुन थोडं नं फेसाळणारा समुद्र दिसतो, गच्चीवरुन थोडं नं सैह्याद्रीचे रौद्र रुप दिसते, प्रदुषणाची पातळी ओलांडलेल्या वातावरणात थोडे नं आकाश आच्छादुन टाकणारे ढग किंवा चमचमणार्‍या चांदण्या दिसतात. ते सर्व टिपायचे तर घराबाहेर पडायला हवं आणि तिथेच तर सर्व अडलयं. नुसती वाईड-ऍंगल असुन उपयोग काय? ट्वाईलाईट टिपायचा तर घराची किंवा कार्यालयाची खिडकी कशी योग्य ठरेल?

इथं थोडं इकडचे तिकडे होता येत नाही, आणि अजुन पावसाळा सुरु नाही झाला तर हा भटक्या पंक्या लागला उंडरायला. बर ह्या ’सोशल नेटवर्कींग’वाल्यांनी तरी जरा आपल्या संगणक प्रणालीमध्ये बिघाड निर्माण करावेत, जरा दोन-चार साईट्स बंद कराव्यात, तर तेही नाही. ’गुगल-बझ’ घ्या, ’फेसबुक’घ्या नाही तर ’ट्विटर’घ्या.. जेथे तेथे पंक्याचे फोटो खिजवायला बसलेले असतातच.

कसं काय जमतं बुवा ह्या पंक्याला इतके भटकायला? मी जरा कुठं जायचे म्हणले की लग्गेच बायको………..अरे.. येस्स,… बायको!!..

काय म्हणालात? पंक्याचे लग्न ठरले आहे??? तारीख पण ठरली आहे..?? मस्त रे…. डिसेंबर दुर नाही बघा.. नुकतेच फेसबुकवरचे पंक्याचे स्टेटस ’सिंगल’ पासुन ’एंन्गेज्ड’ झाले आहे.. लवकरच ’मॅरीड’ होईल.

… ऍन्ड द काऊंटडाउन बिगीन्स…
टिक टिक.. वन….. टिक टिक… टु… टिक टिक.. थ्री….

तळटीप:
लोकाग्रहास्तव मिशीवाल्या पंक्याचा फोटो इथे चिकटवत आहे –


Pankajz@Flickr

पुणेरी सुचना : ह्या पोस्टच्या प्रतिक्रियेमध्ये पंक्याच्या फोटोंबद्दल काढलेले कोणत्याही प्रकारचे सन्माननीय भाष्य खपवुन घेतले जाणार नाही. त्याबद्दलच्या भलत्या-सलत्या प्रतिक्रिया देऊन
वाचकांनी नाहक आपला शाब्दीक अपमान ओढवुन घेऊ नये.