“थेऊरची पार्टी” अनेक कारणांनी रंगली. युवतींचा लक्षणीय सहभाग, त्यांचे तोकडे कपडे, दारूचा साठा वगैरे वगैरे. त्यावर अनेक लोकांनी भाष्य करुन आजची पिढी कशी बिघडली आहे ह्यावर फुकटची मतं ऐकवली. पण मला अजुन कळत नाही खरंच ’ते’ इतकं गैरे होते का?
ह्या बद्दलची माझी वैयक्तीक मतं इथं मांडत आहे. कदाचीत पुर्णपणे चुकीची असतील, पण ती माझी मतं आहेत आणि माझ्या मतांचा मी आदर करतो.
– माझ्या दृष्टीने एकमेव गैर प्रकार ज्यावर पोलीसांनी कारवाई केली तो म्हणजे अनाधीकृतरीत्या मद्य विक्री. कायदा ह्याला मान्यता देत नाही आणि त्यामुळे पोलीसांनी केलेली कारवाई ही योग्य आहे.
– कॉलेजमध्ये शिकत असताना दारू पिऊन धांगडधिंगा घातला ह्यावर मिडीयाने आणि अनेक लोकांनी टीकेची झोड उठवली. मला वाटतं ह्या गोष्टीला दोन पैलु आहेत आणि ह्याचा दुसरा पैलु समजावुन घेणे देखील महत्वाचे आहे.
वर्षाऋतुमध्ये माळशेज घाट, ताम्हीणी घाट, लोणावळा सारख्या ठिकाणी अनेक विकृत मद्यपिंचा दंगा चालतो. काही दिवसांपुर्वी तर ताम्हीणीच्या थोडं पुढे काही मद्यपी नग्नावतारात बेधुंद होते. ह्याचा त्रास तरूणींबरोबरच सहकुटुंब आलेल्या परीवारांनादेखील होतो. पण असल्या प्रकाराची मिडीयाकडुन कितीशी दखल घेतली जाते?
ह्या उलट मी म्हणेन ह्या विद्यार्थ्यांनी पुणे शहराबाहेर एखाद्या फार्महाऊसमध्ये ’फ्रेंडशीप डे’चे औचित्य साधुन पार्टी केली तर बिघडले कुठे? समाजाला त्याचा पहील्याउदाहरणाइतका तर त्रास नाही ना झाला? जो काही गोंधळ त्यांनी केला तो त्यांच्या त्यांच्यात केला. नाही कुणाची छेड काढली नाही कुणाला त्रास दिला.
ह्या पार्ट्या रोज रोज खचीतच होत नसणार अन्यथा रोजच ८०० लोकांना पकडल्याच्या बातम्या झळकल्या असत्या. मग एखाद्या खास दिवशी एकत्र जमुन केली पार्टी तर बिघडले कुठे?
मान्य आहे तुम्ही शिकण्यासाठीच आला आहात, पण म्हणुन सर्व काही सोडुन देवुन केवळ शिक्षणच घ्यायचे असा त्याचा अर्थ होतो का? आणि कुठल्या शिक्षणाच्या आपण गप्पा मारतोय? ते शिक्षण जेथे केवळ जातीमुळे एखाद्याला ६०% ला प्रवेश मिळतो आणि ९०%वाला डावलला जातो? शैक्षणिक वर्षात शिकलेल्या किती गोष्टी आपण व्यवहारात आणतो? च्यायला डावीकडुन एक रेल्वे इंजीन येते आहे, नैऋत्येकडुन दुसरी रेल्वे येत आहे. मध्ये एक खांब् आहे, त्यावर एक पक्षी बसला आहे तो काही काळाने ताशी २० कि.मी. प्रती/तास वेगाने उडाला तर जेंव्हा ह्या दोन रेल्वे गाड्या एकमेकांना क्रॉस करतील तेंव्हा पक्ष्याची दिशा सांगा!!.. असली गणीत किती जणांना व्यवहारात उपयोगी पडतात?
मला वाटतं आजची पिढी रिअलॅस्टीक आहे. कामाच्या वेळेला काम आणि एन्जॉयमेंटच्या वेळेस एन्जॉयमेंटचे तंत्र त्यांना चांगले जमलेले आहे.
मी दारू पिण्याचे समर्थन करत नाहीये, पण एन्जॉयमेंट म्हणजे दारू पिणे हे त्यांना कुणी शिकवले? ड्र्ग्ज घेणे हे कदापी समर्थनीय नाही, कायदा सुध्दा त्यावर बंधन घालतो. पण दारु ही बहुतांश सर्वसामान्यांच्या जिवनात विराजमान झालेली आहे हे आता आपण मान्य करायलाच हवे. आणि दारू पिणे पाप आहे तर नॉन-व्हेज खाण्याचं काय? निदान दारू मुळे कुठल्या मुक्या प्राण्याचा जिव तरी जात नाहीये? सणासुदीला कित्तेक लोकं मुक्या प्राण्यांच्या जिवावर आनंद साजरा करतात. ते योग्य का?
“…अरे मग आधी शिका, कमवायला लागा आणि मग स्वतःच्या पैश्याची प्या वाट्टेल तेवढी दारू..” असंच ना?
मला एक सांगा, नोकरीला लागल्यावर, संसारात रमल्यावर ह्या पार्टीत जी मज्जा होती ती मिळु शकेल? कश्यावरुन ह्या पार्टीतली सर्वच्या सर्व मुले बापाच्या पैश्यावरच पार्टीत आली असतील? कश्यावरुन त्यांच्यामधलं कुणी पिझ्हा हट, बिपीओ, कॉल-सेंटरसारख्या ठिकाणी काम करत नसेल?
– तोकडे कपडे.. कुणी शिकवले त्यांना हे? आपल्या आधीच्या पिढीनेच ना? हेलन, किमी काटकर, मंदाकीनी, झिनत अमान ह्यांचे नाचतानाचे, पाण्यात चिंब भिजलेले गरम शॉट्स आधीच्या पिढीनेच तर ’खो’ देऊन आपल्या पिढीला दिले आहेत ना?
.. म्हणे तरूणाई पाश्चात्यांचे अनुकरण करते… का? आधीची पिढी नव्हती करत? साहेबांनी कोट, टाय घालायची पध्दत काय आपल्या राजा महाराजांकडुन आली? बेलबॉटम पॅन्ट्स, मोठ्ठे गॉगल्स, लेफ्ट हॅन्ड ड्राईव्ह गाड्या हे कोणी आणले. राजेश खन्ना किंवा अमीताभ बच्चन सारखी हेअर स्टाईल आधीच्या पिढीने केलीच ना? मग ह्या पिढीने त्यांच्या लाडक्या सुपर-स्टार्सचे अनुकरण केले तर कुठे बिघडले?
तोकड्या कपड्यांची कुणी सक्ती करत नाही. ज्याला पाहीजे तो घालेल, ज्याला नाही, तो नाही घालणार. जर घालणार्याला त्याचे काही कौतुक नाही, जर बघणार्याला त्यात विशेष वाटत नाही तर बाकीच्या लोकांनी का म्हणुन ओरड करावी? पुर्वापार चालत आलेली नऊ-वारी साडीची जागा सहावारी साडीने घेतलीच ना? अनेक महीला सहावारी साडीकडुन सलवार-कमीज घालु लागल्याच ना? फॅशन बदलतच असते.. त्याचा इतका का बाऊ करायचा?? मला तरी कळत नाही!!
– परप्रांतीय, काही झालं की परप्रांतीयांवर खडे फोडुन मोकळे व्हायचे. हे म्हणजे ’आमचा तो बाळ्या, दुसर्याचे ते कार्ट’ प्रकार झाला. मला वाटतं दोष परप्रांतीयांचा नाही, दोष असलाच तर तो स्वातंत्र्याचा आहे. मी स्वतः ’सिंम्बायोसिस महाविद्यालयाचा’ विद्यार्थी होतो. आपल्याच प्रांतातुन नागपुर, सांगली सारख्या ठिकाणांहुन आलेली मुलं अभ्यासाला दुर्लक्ष करुन ’इतर’ गोष्टींमध्ये रमलेली पहात असतानाच, नेहमी टीकेचा विषय ठरलेले ’बिहार’ सारख्या ठिकाणांवरुन आलेली मुल आणि मुली अभ्यासात वरचढच नव्हे तर पहील्या पाच क्रमांकामध्ये येत असताना पाहीलेले आहे. उद्या आपली मुलं दुसर्या ठिकाणी राहील्या गेल्यावर, आई-वडीलांचा धाक नाही म्हणल्यावर थोडी का होईना वहावत जाणारच.
– परदेशी नागरीक त्यांची संस्कृती आपल्या इथे आणतात म्हणुन आपण ओरडतोय, पण आपणही नाही का आपली संस्कृती तिकडे जाऊन रुजुवायला बघत. त्यांची संस्कृती आपल्या नजरेतुन वाईट असेल त्यांच्या नाही.
– आजच्या पिढीला ’करीयरची’ पुर्ण जाण आहे, आपल्या पेक्षा किंवा आपल्या आधीच्या पिढीच्या पेक्षा जास्तच. एके काळी ग्रॅज्युएट आणि बॅकेत नोकरी हा एकमेव करीयरचा मार्ग होता. पण आज करीयरच्या कक्षा विस्तारल्या आहेत आणि त्याची चांगली जाण विद्यार्थ्यांना आहे. सिंम्बायोसीसच्या बिझीनेस मॅनेजमेंटच काय परंतु इतरही अनेक विभागातुन कॅम्पस मधुन नोकरी मिळवणार्या विद्यार्थ्यांचे पगार पाहीलेत तर डोळे पांढरे होतील. नोकर्या देणार्या कंपन्यांना पैसे जास्त झालेले नाहीत कि ते उगाचच्या उगाच अश्या वाया गेलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यवसायात समावुन घेतील. त्यामुळे मला नाही वाटत बहुतांश विद्यार्थ्यांना आपल्या फुकटच्या सल्यांची गरज असावी.
काय चांगले काय वाईट हे वडीलधार्या नात्याने ज्याने त्याने आपल्या पाल्यांना जरुर सांगावे. परंतु सरसकट सर्वच पिढी वाया गेलेली आहे हे म्हणणे चुकीचे आहे. ४०-५०वर्ष वयाची माणसं सुध्दा दारु पिऊन रस्त्याच्या कडेला बेवारस पडलेली असतात म्हणुन ती संपुर्ण पिढीच दारूडी, वाया गेलेली होती म्हणणे चुकीचे आहे.
सर्वात शेवटी दोन छोट्या गोष्टी आठवल्या त्या सांगतो ..
एक पुरातन गोष्ट – एका गावात एका पापी स्त्रीला गावाच्या चौकात उभे केलेले असते आणि गावकरी तिला दगडं मारत असतात. त्याचवेळेस तेथे कोणी एक संत येतात आणि ते म्हणतात की ह्या स्त्रीला दगड मारण्याचा अधीकार फक्त त्याच व्यक्तीला आहे ज्याने आयुष्यात कधीही पाप केलेले नाही. त्यानंतर एकही दगड त्या स्त्रीवर फेकला जात नाही.
एक नवयुग (का काहींच्या मते असलेले कलयुग)तील गोष्ट – एका विमानतळावर एक माणुस हातामध्ये बिअरचा कॅन आणि सिगारेट घेउन विमानाची वाट बघत असतो.
एक सभ्य गृहस्थ त्याला म्हणतो.. “तुम्ही तुमचा पैसा सिगारेट किंवा बिअरमध्ये नसता घालवला तर तुम्ही खुप काही करु शकला असता.”
तो माणुस म्हणतो.. “जसे? काही?”
तो सभ्य गृहस्थ मिस्कीलपणे म्हणतो.. “जसे ते सर्व पैसे वाचवुन एक दिवस तुम्ही ते समोर उभे असलेले विमान विकत घेऊ शकला असता..”
तो माणुस, त्या सभ्य गृहस्थाला विचारतो…”मग? ते विमान तुमचे आहे का?”
तो सभ्य गृहस्थ नाही म्हणतो.
हातातली सिगारेट पायाखाली चिरडुन, बिअरचा एक घोट घेउन तो माणुस म्हणतो.. “गुड, तुमच्या माहीतीसाठी सांगतो, ते विमान माझे आहे..”
त्या माणसाचे नाव असते “विजय मल्या”….
अनेकांच्या दृष्टीने माझे मुद्दे पुर्णपणे चुकीचे असतील, थोतांड असेल, हरकत नाही, शेवटी मनात जे आले ते लिहीलं…
Like this:
Like Loading...