Monthly Archives: November 2010

प्रिय पप्पा


स.न.वि.वि.

माझ्या बत्तीस वर्षांच्या आयुष्यात तुम्हाला मी पत्र लिहीण्याची ही बहुदा पहीलीच वेळ. आजपर्यंत काही तुरळक अपवाद वगळता आपण एकमेकांपासुन दुर असे कधी राहीलोच नाही. रहाणे शक्यच नव्हते. तुम्हाला माझी आणि मला तुमची इतकी सवय होऊन गेली होती की तुमच्यापासुन दुर रहाण्याचा विचार जवळ जवळ अशक्यच होता.

जेंव्हापासुनचे आ्ठवते तेंव्हापासुन तुम्ही आमच्यासाठी केलेले कष्ट आठवतात. बहुतांशवेळा तुम्ही नेहमीच कठोर राहीलात पण तुमच्यात लपलेला हळवा माणुस आणि त्याबरोबरचे प्रत्येक क्षण मला आजही आठवतात.

मग आज पत्र लिहीण्याची वेळ का यावी? कारण आज तुम्ही आमच्यापासुन खुप दुर गेला आहात. ह्या भौतीक जगापासुन खुप दुर. कदाचीत तुम्ही आम्हाला पाहु शकत असाल, पण आमचे डबडबलेले डोळे अंधुक झालेल्या दृष्टीने तुम्हाला नाही पाहु शकत.

गेली ५ वर्ष, दोन्ही किडन्या निकामी झाल्यानंतर सुध्दा डायलिसीसचा आधार घेत तुम्ही आयुष्याशी दिलेली झुंज कदाचीत तेंव्हा फक्त जाणवली, पण आता त्यातील दुःख, वेदना, त्रास जाणवला. ही झुंज किती कठीण होती ह्याची जाणीव आता झाली.

११ नोव्हेंबर, २०१० ची ती काळरात्र मला आठवते. रात्री २.३० वाजता तुम्हाला लागलेली प्रचंड धाप, श्वास घेताना होणारा त्रास आणि घामाने डबडबलेला चेहरा डोळ्यासमोरुन हटत नाही. ताठ मानेने, बॅंक मॅनेजरच्या रुबाबात वावरलेले तुम्ही त्या दिवशी मात्र कित्ती हतबल दिसत होतात. तुम्हाला ’आय.सी.यु’ मध्ये दाखल केल्यावर लगेचच डॉक्टरांनी न्युमोनीयाचे निदान केले आणि आमच्या छातीत धस्स झाले परंतु तरीही मोठ्या धिराने मी तुम्हाला म्हणालो होतो, “काळजी करु नका, डॉक्टरांशी बोलणे झाले आहे, दोन दिवसांत बरं वाटेल आणि तुम्ही पुन्हा घरी याल”. पण तेंव्हा काय माहीत होते, पुढे काय वाढुन ठेवले आहे.

दुसर्‍याच दिवशी ऑफीसमध्ये मला डॉक्टरांचा फोन आला, “परीस्थीती गंभीर आहे, न्युमोनीया वेगाने पसरत आहे. तुम्ही जवळच्या नातेवाईकांना बोलावुन घ्या.” आहे त्या परीस्थीतीत हातातले काम टाकुन मी दवाखान्यात धाव घेतली. बाहेर बसलेल्या बहीणीच्या चेहर्‍यावरील भाव खुप काही सांगुन गेले. रात्रभर थांबल्यावर आंघोळीसाठी मम्मी घरी गेली होती. ’तिला आल्यावर कसे सांगायचे?’ हा यक्ष प्रश्न डोळ्यासमोर उभा राहीला.

डॉक्टर म्हणाले, ’व्हेंटीलेटर लावावा लागणार आहे. सि-डेट केल्यावर त्यांना तुमच्याशी बोलता येणार नाही. तेंव्हा बोलुन घ्या’. आतमध्ये आलो तेंव्हा असहाय्यपणे तुम्ही बेडवर झोपला होतात. तोंडाला ऑक्सीजनचा मास्क, सर्वांगाला जोडलेल्या विवीध नळ्या आणि शेजारील अनेक मॉनीटर्सवर दिसणारे विवीध ग्राफ्स आणि आकडे पाहुन गलबलुन आले. पण मोठ्या कष्टाने तुमच्याशी बोलता आले, ’उद्या येतो परत भेटायला, काळजी घ्या’ सांगताना किती कष्ट घ्यावे लागले हे शब्दात मांडणे अशक्य. थरथरणारा तुमचा हात हातात घेताना नकळत मोठ्ठा आवंढा गिळला गेला.

रविवार सकाळ, १४ नोव्हेंबर, २०१०, फार भयानक सकाळ होती. आईने सांगीतले, ’काल तुम्हाला १०६ ताप होता आणि ब्लड-प्रेशर ८०च्या ही खाली आले होते’ मनामध्ये असंख्य वाईट विचार येत होते, पण त्याकडे दुर्लक्ष करुन सकाळची आवरा-आवर करत होतो. आंघोळीला बसतच होतो तोच आईचा फोन असशील तस्साच निघुन ये. मी काय समजायचे ते समजलो पप्पा.. तुमच्यापासुन कायमचा दुर होण्याची वेळ आली आहे.

दवाखान्यात आई साश्रु नयनांनी बसलेली होती. तडक तुमच्या खोलीत आलो. डॉक्टरांनी परीस्थीतीची कल्पना दिली. अजुन काही तास.. फक्त..

तुमच्याशी काही ही बोललो तरी तुमच्यापर्यंत ते पोहोचणे शक्यच नव्हते. व्हेंटीलेटरच्या हवेच्या मार्‍याने तुमच्या छातीची वेगाने वरखाली होणारी हालचाल सोडली तर तुमचे शरीर…..

न्युमोनीयाने तुमची काही आठवड्यांपुर्वीच किडनी-ट्रान्स्प्लॅन्टने बसवलेली किडनी गिळंकृत केली होती. तुम्ही ह्यातुन सुखरुप बाहेर जरी पडलात तरी जगण्यासाठी तुमच्यापुढे पुन्हा एकदा डायलिसीसचा पर्यायच होता. तुम्ही हे ऐकले असतेत तर तुमच्या मनाची काय अवस्था झाली असती? तिन वर्ष उराशी जपलेले किडनी ट्रान्स्पलॅन्टचे स्वप्न आत्ता कुठे पुर्ण झाले होते. ५ वर्षांनंतर प्रथमच झालेली युरीन पाहुन तुमच्या चेहर्‍यावरचा आनंद काय वर्णावा? इतकी वर्ष पाळलेली जाचक पथ्य आता कुठल्याकुठे पळुन जाणार होती. तुम्ही पुन्हा एकदा नेहमीसारखे हिंडु फिरु शकणार होतात. पण कदाचीत नियतीला हे मान्य नव्हते.

मी डॉक्टरांना कडेला घेउन विचारले, “डॉक्टर जर ह्यांची जगण्याची १% ही शक्यता नसेल तर प्लिज त्यांचे व्हेंटीलेटर आणि अजुनही चालु असलेला असंख्य औषधांचा मारा प्लिज बंद करा.” माझ्याच्याने खरोखरच तुमचे हाल बघवत नव्हते हो…

पण डॉक्टर नाही म्हणाले. आपण नॅचरली सर्व होण्याचे वाट पाहु. अजुन २-३ तास. आपण आपले प्रयत्न सदैव चालुच ठेवायचे. पण तोच नर्सने मला आत मध्ये बोलावले आणि सुपरव्हायजर समोरच्या मॉनीटरकडे बोट दाखवत म्हणाले “स्ट्रेट लाईन……………..”

त्यानंतर संध्याकाळपर्यंत मी फक्त एक यंत्र मानव होतो. आजुबाजुला असंख्य लोकं होती. मला हे-कर, ते-कर चालु होते. तोंडात गंगाजलाचे दोन थेंब टाकताना झालेला तुमच्या थंड पडलेल्या चेहर्‍याचा स्पर्श अंगावर आणि मनावर शिरशीरी आणुन गेला. घरातील बाई माणसांसमोर आणि स्मशानभुमीत मनावर ठेवलेला निर्बंध तुमचा देह विद्युत दाहीनीत जाताना पहाताना मात्र रोखु शकलो नाही.

सर्व खेळ केवळ दोन दिवसांत संपला. आम्हा सर्वांपासुन तुम्ही फार दुर निघुन गेलात.

तुमच्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी फार मोठठी आहे. एका मोठ्या व्हॅक्युम मधुन वावरल्यासारखे वाटते. इतरांसमोर नेहमीच्याच अनिकेतच्या रुपात वावरताना होणारी मानसिक ओढाताण असह्य करणारी आहे. तुमच्या वस्तु, नेहमीच्या बसायच्या जागा नजरेला वेदना देतात. अचानकपणे आलेली जबाबदारीने फार वयस्कर झाल्यासारखे वाटु लागले आहे. बाहेर पडलेली ढगाळ हवा मनाला उभारी देण्याऐवजी नैराश्यच देत आहे.

अजुन खुप काही मनामध्ये आहे, पण मनातले शब्द बाहेर काढताना, डोळ्यातुन अश्रु तर येणार नाहीत ना हीच भिती सतावते आहे. त्यामुळे इथेच थांबतो. आजपर्यंत अनेक गोष्टी मुक-संवादाने आपण बोललेल्या आहेत. कदाचीत बाकीचे सर्व त्यासाठीच राखुन ठेवतो.

पुढे पुर्ण आयुष्य आहे. मला माहीत आहे, तुम्ही कुठेतरी आजुबाजुलाच आहात. मी दुःख सावरुन लवकरात लवकर नॉर्मल व्हावे, कुटुंबाला सांभाळावे आणि सदैव सुखी रहावे अशीच तुमची इच्छा असणार आणि ती मी नक्की पुर्ण करीन.

तुम्ही फक्त सदैव माझ्या पाठीशी रहा.

तुमचा,
पिल्लु….

ओबामा


“ते आले, त्यांनी पाहीले आणि त्यांनी जिंकले”

सकाळी सेंट झेवियर कॉलेजमध्ये अमेरीकाचे राष्ट्राध्यक्ष ’बराक ओबामा’ ह्यांचे संभाषण पहात होतो त्यावेळेस माझ्यामनात काहीशी अशीच भावना होती. त्यांचे रुबाबदार व्यक्तीमत्व आणि चेहर्‍यावरील चिरपरीचीत मिलीयन डॉलर हास्य पहातच तरूणाईने उत्स्फुर्तपणे उभे राहुन टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. त्यानंतरच्या त्यांच्या संवादाने मी खरोखरच भारावुन गेलो होतो.

त्यांचे वक्तृत्व कौशल्य तर सर्व श्रुत आहे, परंतु मला भावले ते त्यांचे सर्वांमध्ये मिसळुन, सर्वांना उद्देशुन केलेला संवाद. मनाने नकळत त्यांची तुलना आपल्या नेत्यांशी केली. श्रोत्यांपासुन कित्तेक अंतर दुर राहुन केलेले भाषण कसे मनापर्यंत पोहोचणार?

अमेरीकेचा राष्ट्राध्यक्ष असुनसुध्दा त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशुन व्यक्त केलेले मुद्दे अत्यंत महत्वाचे होते. भारताला आर्थीक प्रगतीमध्ये आणि विकसनशील पासुन विकसीत देश होण्यामध्ये आजच्या पिढीचा सहभाग किती महत्वाचा आहे ते त्यांनी वारंवार अधोरेखीत करुन दिले. आपल्या नेत्यांची भाषण नकळत मनामध्ये जिवंत झाली. कुणी शेंदुर फासलेले दगड, कोणी शेंगांची टरफलं, तर कोणी अजुन काय काय विशेषण लावुन केवळ विरोधी नेत्यांची केलेली टींगल आणि मिळवलेले हासेच जास्त होते. भाषणाच्या शेवटी आजच्या पिढीला त्यातुन घेण्यासारखे असे काय असते?

’बराक ओबामांनी’ विचारलेले ३ प्रश्न तरूणाईला अंतर्मुख करुन गेले –
१. येत्या २० वर्षात तुम्ही भारताला कुठे पहाता?
२. येत्या २० वर्षात तुम्ही भारत आणि अमेरीकाचे संबंध काय अपेक्षीत करता?
३. हे जग अधीक चांगल करण्यासाठी तुम्ही प्रत्येकजण काय करु इच्छीता?

जगाचं सोडा, भारत देश्याबद्दलच्या भवितव्याबद्दल असे प्रश्न आपल्या कुठल्या नेत्याने तरूणाईला विचारलेले मला आठवत नाही.

ओबामांचा प्रेझेंन्स खरंच आल्हाददायक होता. त्यांचं हात उंचावुन, हसतमुखाने केलेले अभिवादन मनाला भिडणारे होते. आपल्या नेत्यांपैकी कितीजणांच्या अभिवादनात आपलेपणा असतो? किती जणांचा प्रेझेंन्स मनाला सुखावणारा असतो? मला स्वतःला ’राज ठाकरे’ आणि ’राहुल गांधी’ सोडले तर इतर कुणाच्या तोंडाकडे सुध्दा पहावेसे वाटत नाही. अप्पलपोटेपणा, लाचारी, लाळघोटेपणा, स्वार्थीपणा, मग्रुरी, माज, लोचटपणा, लबाडी बहुतेकांच्या चेहर्‍यावरुन ओसंडुन वहात असते.

संभाषण संपल्यावरसुध्दा कित्तीतरी वेळ जमेल त्याच्याशी हस्तांदोलन करत होते, जमेल त्याच्याशी संवाद साधत होते. त्यांचा संवाद हा एकाजागेवर बुजगावण्यासारखं उभं राहुन कागदांवर लिहीलेले वाचुन केलेला मोनोलॉग नव्हता तर हातामध्ये माईक घेऊन बहुतेक प्रेक्षकाशी आय-कॉन्टाक्ट करत केलेला डायलॉग होता. पॉझीटीव्हनेस त्यांच्या वक्तव्यातुन ओसंडुन वहात होता. मला क्षणभर वाटलं.. खरंच किती करायचं बाकी आहे, कित्ती गोष्टी करण्यासारख्या आहेत. वाटलं, आपण खरंच वेळ वाया घालवतो आहे, उठाव, लॅपटॉप उघडावा आणि कंपनीच्या व्ही.पी.एन जोडुन कामाला सुरुवात करावी.

अमेरीका-भारत एकत्र होणं आणि एकत्र होणं खुप महत्वाचे आहे. दोन्ही देशांना एकमेकांकडुन घेण्यासारखे आणि एकमेकांना देण्यासारखे खुप काही आहे. अमेरीकेकडुन खरंच काही घ्यायचे असेल तर भारताने त्यांचे पॉलीटेशीयन्स घ्यावेत, त्यांची सार्वजनीक सुरक्षा व्यवस्था घ्यावी, त्यांची टेक्नॉ्लॉजी घ्यावी. बहुतेक देशांमध्ये पुढच्या तासाला काय हवामान असेल अश्या सुविधा असताना, भारताकडे मात्र अजुनही भरवश्याची वेदर-फोरकास्ट सिस्टीम नाही. ह्या माध्यमातुन मला वाटतं अमेरीका रोजगार निर्मीती करु शकेल. ह्याउलट कुशल आणि लो-कॉस्ट मनुष्यबळ ही भारताची जमेची बाजु आहे.

त्यांनी घेतलेले काही निर्णय जसे पाकीस्तानला सहाय्य, अफगाणीस्तानात अजुनही तंबु ठोकुन असलेले अमेरीकेचे सैन्य आणि भारतातील आऊटसो्र्सींगवर बंदीची घोषणा वगैरेमुळे भारतीय जनमानसात तरी त्यांच्याबद्दल मिश्र प्रतिक्रिया आहेत. पण शेवटी आपण हे लक्षात घेतले पाहीजे की हे निर्णय त्यांचे वैयक्तीक निर्णय नसुन अमेरीकेचे आहेत.

कुणाचे काहीही मत असो, पण मला मात्र मि.प्रेसिडेन्ट, बराक ओबामा भावले.

दिपावलीच्या शुभेच्छा


“डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा” ब्लॉगच्या सर्व वाचकांबरोबरच इतर सर्व मित्र आणि मैत्रिणींना दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा

~ अनिकेत