प्रिय पप्पा


स.न.वि.वि.

माझ्या बत्तीस वर्षांच्या आयुष्यात तुम्हाला मी पत्र लिहीण्याची ही बहुदा पहीलीच वेळ. आजपर्यंत काही तुरळक अपवाद वगळता आपण एकमेकांपासुन दुर असे कधी राहीलोच नाही. रहाणे शक्यच नव्हते. तुम्हाला माझी आणि मला तुमची इतकी सवय होऊन गेली होती की तुमच्यापासुन दुर रहाण्याचा विचार जवळ जवळ अशक्यच होता.

जेंव्हापासुनचे आ्ठवते तेंव्हापासुन तुम्ही आमच्यासाठी केलेले कष्ट आठवतात. बहुतांशवेळा तुम्ही नेहमीच कठोर राहीलात पण तुमच्यात लपलेला हळवा माणुस आणि त्याबरोबरचे प्रत्येक क्षण मला आजही आठवतात.

मग आज पत्र लिहीण्याची वेळ का यावी? कारण आज तुम्ही आमच्यापासुन खुप दुर गेला आहात. ह्या भौतीक जगापासुन खुप दुर. कदाचीत तुम्ही आम्हाला पाहु शकत असाल, पण आमचे डबडबलेले डोळे अंधुक झालेल्या दृष्टीने तुम्हाला नाही पाहु शकत.

गेली ५ वर्ष, दोन्ही किडन्या निकामी झाल्यानंतर सुध्दा डायलिसीसचा आधार घेत तुम्ही आयुष्याशी दिलेली झुंज कदाचीत तेंव्हा फक्त जाणवली, पण आता त्यातील दुःख, वेदना, त्रास जाणवला. ही झुंज किती कठीण होती ह्याची जाणीव आता झाली.

११ नोव्हेंबर, २०१० ची ती काळरात्र मला आठवते. रात्री २.३० वाजता तुम्हाला लागलेली प्रचंड धाप, श्वास घेताना होणारा त्रास आणि घामाने डबडबलेला चेहरा डोळ्यासमोरुन हटत नाही. ताठ मानेने, बॅंक मॅनेजरच्या रुबाबात वावरलेले तुम्ही त्या दिवशी मात्र कित्ती हतबल दिसत होतात. तुम्हाला ’आय.सी.यु’ मध्ये दाखल केल्यावर लगेचच डॉक्टरांनी न्युमोनीयाचे निदान केले आणि आमच्या छातीत धस्स झाले परंतु तरीही मोठ्या धिराने मी तुम्हाला म्हणालो होतो, “काळजी करु नका, डॉक्टरांशी बोलणे झाले आहे, दोन दिवसांत बरं वाटेल आणि तुम्ही पुन्हा घरी याल”. पण तेंव्हा काय माहीत होते, पुढे काय वाढुन ठेवले आहे.

दुसर्‍याच दिवशी ऑफीसमध्ये मला डॉक्टरांचा फोन आला, “परीस्थीती गंभीर आहे, न्युमोनीया वेगाने पसरत आहे. तुम्ही जवळच्या नातेवाईकांना बोलावुन घ्या.” आहे त्या परीस्थीतीत हातातले काम टाकुन मी दवाखान्यात धाव घेतली. बाहेर बसलेल्या बहीणीच्या चेहर्‍यावरील भाव खुप काही सांगुन गेले. रात्रभर थांबल्यावर आंघोळीसाठी मम्मी घरी गेली होती. ’तिला आल्यावर कसे सांगायचे?’ हा यक्ष प्रश्न डोळ्यासमोर उभा राहीला.

डॉक्टर म्हणाले, ’व्हेंटीलेटर लावावा लागणार आहे. सि-डेट केल्यावर त्यांना तुमच्याशी बोलता येणार नाही. तेंव्हा बोलुन घ्या’. आतमध्ये आलो तेंव्हा असहाय्यपणे तुम्ही बेडवर झोपला होतात. तोंडाला ऑक्सीजनचा मास्क, सर्वांगाला जोडलेल्या विवीध नळ्या आणि शेजारील अनेक मॉनीटर्सवर दिसणारे विवीध ग्राफ्स आणि आकडे पाहुन गलबलुन आले. पण मोठ्या कष्टाने तुमच्याशी बोलता आले, ’उद्या येतो परत भेटायला, काळजी घ्या’ सांगताना किती कष्ट घ्यावे लागले हे शब्दात मांडणे अशक्य. थरथरणारा तुमचा हात हातात घेताना नकळत मोठ्ठा आवंढा गिळला गेला.

रविवार सकाळ, १४ नोव्हेंबर, २०१०, फार भयानक सकाळ होती. आईने सांगीतले, ’काल तुम्हाला १०६ ताप होता आणि ब्लड-प्रेशर ८०च्या ही खाली आले होते’ मनामध्ये असंख्य वाईट विचार येत होते, पण त्याकडे दुर्लक्ष करुन सकाळची आवरा-आवर करत होतो. आंघोळीला बसतच होतो तोच आईचा फोन असशील तस्साच निघुन ये. मी काय समजायचे ते समजलो पप्पा.. तुमच्यापासुन कायमचा दुर होण्याची वेळ आली आहे.

दवाखान्यात आई साश्रु नयनांनी बसलेली होती. तडक तुमच्या खोलीत आलो. डॉक्टरांनी परीस्थीतीची कल्पना दिली. अजुन काही तास.. फक्त..

तुमच्याशी काही ही बोललो तरी तुमच्यापर्यंत ते पोहोचणे शक्यच नव्हते. व्हेंटीलेटरच्या हवेच्या मार्‍याने तुमच्या छातीची वेगाने वरखाली होणारी हालचाल सोडली तर तुमचे शरीर…..

न्युमोनीयाने तुमची काही आठवड्यांपुर्वीच किडनी-ट्रान्स्प्लॅन्टने बसवलेली किडनी गिळंकृत केली होती. तुम्ही ह्यातुन सुखरुप बाहेर जरी पडलात तरी जगण्यासाठी तुमच्यापुढे पुन्हा एकदा डायलिसीसचा पर्यायच होता. तुम्ही हे ऐकले असतेत तर तुमच्या मनाची काय अवस्था झाली असती? तिन वर्ष उराशी जपलेले किडनी ट्रान्स्पलॅन्टचे स्वप्न आत्ता कुठे पुर्ण झाले होते. ५ वर्षांनंतर प्रथमच झालेली युरीन पाहुन तुमच्या चेहर्‍यावरचा आनंद काय वर्णावा? इतकी वर्ष पाळलेली जाचक पथ्य आता कुठल्याकुठे पळुन जाणार होती. तुम्ही पुन्हा एकदा नेहमीसारखे हिंडु फिरु शकणार होतात. पण कदाचीत नियतीला हे मान्य नव्हते.

मी डॉक्टरांना कडेला घेउन विचारले, “डॉक्टर जर ह्यांची जगण्याची १% ही शक्यता नसेल तर प्लिज त्यांचे व्हेंटीलेटर आणि अजुनही चालु असलेला असंख्य औषधांचा मारा प्लिज बंद करा.” माझ्याच्याने खरोखरच तुमचे हाल बघवत नव्हते हो…

पण डॉक्टर नाही म्हणाले. आपण नॅचरली सर्व होण्याचे वाट पाहु. अजुन २-३ तास. आपण आपले प्रयत्न सदैव चालुच ठेवायचे. पण तोच नर्सने मला आत मध्ये बोलावले आणि सुपरव्हायजर समोरच्या मॉनीटरकडे बोट दाखवत म्हणाले “स्ट्रेट लाईन……………..”

त्यानंतर संध्याकाळपर्यंत मी फक्त एक यंत्र मानव होतो. आजुबाजुला असंख्य लोकं होती. मला हे-कर, ते-कर चालु होते. तोंडात गंगाजलाचे दोन थेंब टाकताना झालेला तुमच्या थंड पडलेल्या चेहर्‍याचा स्पर्श अंगावर आणि मनावर शिरशीरी आणुन गेला. घरातील बाई माणसांसमोर आणि स्मशानभुमीत मनावर ठेवलेला निर्बंध तुमचा देह विद्युत दाहीनीत जाताना पहाताना मात्र रोखु शकलो नाही.

सर्व खेळ केवळ दोन दिवसांत संपला. आम्हा सर्वांपासुन तुम्ही फार दुर निघुन गेलात.

तुमच्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी फार मोठठी आहे. एका मोठ्या व्हॅक्युम मधुन वावरल्यासारखे वाटते. इतरांसमोर नेहमीच्याच अनिकेतच्या रुपात वावरताना होणारी मानसिक ओढाताण असह्य करणारी आहे. तुमच्या वस्तु, नेहमीच्या बसायच्या जागा नजरेला वेदना देतात. अचानकपणे आलेली जबाबदारीने फार वयस्कर झाल्यासारखे वाटु लागले आहे. बाहेर पडलेली ढगाळ हवा मनाला उभारी देण्याऐवजी नैराश्यच देत आहे.

अजुन खुप काही मनामध्ये आहे, पण मनातले शब्द बाहेर काढताना, डोळ्यातुन अश्रु तर येणार नाहीत ना हीच भिती सतावते आहे. त्यामुळे इथेच थांबतो. आजपर्यंत अनेक गोष्टी मुक-संवादाने आपण बोललेल्या आहेत. कदाचीत बाकीचे सर्व त्यासाठीच राखुन ठेवतो.

पुढे पुर्ण आयुष्य आहे. मला माहीत आहे, तुम्ही कुठेतरी आजुबाजुलाच आहात. मी दुःख सावरुन लवकरात लवकर नॉर्मल व्हावे, कुटुंबाला सांभाळावे आणि सदैव सुखी रहावे अशीच तुमची इच्छा असणार आणि ती मी नक्की पुर्ण करीन.

तुम्ही फक्त सदैव माझ्या पाठीशी रहा.

तुमचा,
पिल्लु….

36 thoughts on “प्रिय पप्पा

  1. विक्रांत

    मित्रा अनिकेत,
    काही बोलू नये खरं तर अश्यावेळी…….. म्हणूनच तर ही बातमी कळूनही मी तुला प्रत्यक्ष भेटायला यायचं टाळलं, जाणीवपूर्वक….. आपल्या दोघांनाही अजिबात आवरलं नसतं… म्हटलं थोडा तू त्यातून बाहेर आल्यावरच तुझ्याशी बोलू……….
    मी काय बोलणार रे पण? भगवंत त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि तुम्हा सर्वांना यातून बाहेर पडण्याचं बळ !!!!!!!

    Reply
  2. Dipak

    अनिकेत,
    पोस्ट वाचुनच बातमी कळाली.
    देव त्यांच्या आत्म्याला चीरशांती देवो.

    Reply
  3. ARUNAA ERANDE

    अनिकेत
    तुमच्या दुःखात मि सहभागी आहे. मला पण अनुभव आहे.तुमच्या वडिलान्चे आशिर्वाद आणी प्रेम सतत तुमच्या बरोबर अस्रणार आहेत.
    It is going to take time, but rest assured, your father will always be with you, giving you his blessings.He had a happy and fulfilled life.
    may his soul rest in peace.

    Reply
  4. Patya

    Felt really sad after readding this… Dev tyanchya atmyala shanti devo aani tumchya sarv kutumbala yatun ubharanyasathi samarthya!!

    Reply
  5. Arvind Deshpande

    So sorry to hear the news. Your dad must’ve been very proud of you. Your letter reminded me of the similar experience I went through 3 years back on 12 th November. May god bless his soul.

    Reply
  6. झम्प्या झपाटलेला

    मित्रा फार वाईट वाटले वाचून…वडिलांची खरी ओळख ते गेल्यावरच आपल्याला होते…आपल्या आयुष्यातील त्यांचे स्थान काय आहे हे आपल्याला फार उशिरा लक्षात येते.

    ह्या दुखातून स्वत:ला सावरण्याचे व आलेली जबाबदारी पेलण्याचे सामर्थ्य तुझ्यात नक्कीच आहे. अनुभवाने फक्त इतकेच लिहितो आईला आता तुझी गरज सगळ्यात जास्त आहे.

    Reply
  7. Prajakta

    I don’t know what to say in such times. But, you are not alone, we are all with you.
    May his soul rest in peace.
    Take care.

    Reply
  8. jivanika

    दादा, काळजी घे . सांभाळ स्वतःला. अरे त्यांच्या अंतिम क्षणातल्या त्रासाला आठवण्यापेक्षा त्यांनी सुखाने घालवलेले क्षण आठव. ते तुझ्यासोबत नाहीत असे म्हणण्यापेक्षा ते तुझ्यासोबत नेहमी होते आणि आनंदी होते असे म्हण.
    देव त्यांच्या आत्म्याला शांती देओ .

    Reply
  9. Vasanti

    Aniket, I just read your post and I am so sorry to know about your father. It’s very touching to read your letter and the story of his struggle in the last few days. May his soul rest in peace. Take care.

    Reply
  10. सागर पुन्हा नवीन.....

    ……………
    काळजी घे आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत.

    Reply
  11. Rahul Patki

    अनिकेत,
    अश्या प्रसंगांना प्रत्येकाला तोंड द्यावाच लागते….काय करनार नियती पुढे सगळे हतबल होतात…
    काळजी घे !!

    ईश्वर त्यांच्या आत्म्याला चीरशांती देवो !!

    Reply
  12. gayatri

    आज बऱ्याच दिवसांनी हा ब्लॉग उघडला आणि हि दुखद बातमी समोर आली.
    वाचून फार वाईट वाटले.
    ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

    Reply
  13. Priti Ligade

    तुमच्या दुःखात मि सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला चीरशांती देवो !!

    Reply
  14. श्रेया

    अनिकेत, स्वत:ची आणि कुटुंबियांची काळजी घ्या. हे दु:ख पचवायला तुम्हाला शक्ती मिळो. तुमच्या दु:खात सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

    Reply
  15. monal

    Aniket,mi pn tuzyz bhawna samju shakte karn mi pn kahi divsapurvi ya prasangatun geleli aahe.he sarv kunalahi chukle nahi tyamue yatun savrun pudhe jaylach pahije nahi ka?Dev babacha aatmyala shanti devo.kalji ghe.ani ek sopa upay sangu dukh visarnyacha (baba na visarnyacha nahi) ”aaplyapeksha jast dukhi lokankade bagh mhanje aapla dukh kami vatate”barobar ahe n

    Reply
  16. Anand

    Dear Aniket,

    I am so soorry to hear the bad news. I have myself gone thruogh same situatuion when my father was suffering from Multiple Myloma and i can understand your feelings. But the only truth remains is Show Must Go On …
    Take care

    Anand

    Reply
  17. शशांक नव-पुणेकर

    देव तुमच्या वडिलांच्या आत्म्याला चीर शांती देवो.

    Reply
  18. Raj Jain

    तू सांगू शकलास ! हे भाग्य.
    माझे वडील वारले तेव्हा मी बरोबर देखील नव्हतो.
    प्रत्येक क्षण जपणे आपल्या हाती नसते…
    ईश्वर सर्व काही पाहत असतो, त्यांच्या आत्मास शांती लाभू दे !

    Reply
  19. sumedha

    अनिकेत ,

    आत्ता दुसरया एका पोस्ट चा मेल आला म्हणून ब्लॉग पहिला तर ही बातमी समजली .. तुझ्या दु:खात सहभागी आहे . काळजी घे .

    Reply

Leave a reply to Patya Cancel reply