Monthly Archives: November 2011

“ऊह ला ला…” एक रसग्रहण


वाचकहो, मला कल्पना आहे तुम्ही ब्लॅकमेल कथेच्या पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत आहात, त्यामुळे मधूनच आलेल्या ह्या पोस्ट बद्दल मी दिलगीर आहे. परंतु तुम्ही ह्या रसग्रहणाचाही आनंदाने आस्वाद घ्याल अशी मला खात्री आहे.

‘डर्टी पिक्चर’ ह्या बहु-चर्चित चित्रपटातील विद्या बालन आणि नसरुद्दिन शहा ह्या कलाकारांवर चित्रित झालेले ‘ऊह ला ला’ हे गाणे आधीच हिट झाले आहे. त्या गाण्याच्या रसग्रहणाचा हा एक छोटासा प्रयत्न.

 

गाण्याची सुरुवात होते तेंव्हा आपल्याला जाणवते कि कुठल्याश्या चित्रपटातील गाण्याच्या शुटींगचा हा सेट आहे.. आणि इथे चित्रीकरण चालू आहे. नायिकेच्या इतर अवयावांवरून फिरून मग कैमेरा तिच्या चेहऱ्यावर स्थिर होतो. प्राचीन, ऐतेहासिक चित्रपटांमध्ये नाग-देवता, पातळ-देवता वगैरे भूमिका वठवणाऱ्या नायिका ज्या प्रकारचा वेष परिधान करायच्या तश्याच प्रकारचा काहीसा वेष इथे नायिकेने परिधान केलेला आहे. डोक्यावर सोनेरी रंगाचा नाग नसल्याने तसली काही भूमिका ही नायिका करत नाहीये हे रसिक प्रेक्षक समजून जातात.

नायिकेच्या अवती-भोवती रंगीत नक्षीकाम केलेली मडकी एकावर एक रचून ठेवलेली दिसतात. आवाज न करणारे रंगीत धुराचे बॉम्ब मागे फुटत असतात. एकूणच दृश्य रसिकांना तोहफा किंवा तत्सम चित्रपटातील गाण्यांची आठवण करून देतात आणि प्रेक्षक थोडेसे नोस्तालीजिक होतात.

हा आह….
हो ओ हो..
हो ओ हो..
हो ओ हो..
हो ओ हो..
हो ओ हो..
हो ओ हो..
हो ओ हो..
हो ओ हो..

पहिल्याच वाक्यात ‘हा आह….’ असा वेदनेने पिडीत नायिका आवाज देते. प्रथम दर्शनी ही वेदना असली तरीही नायिकेच्या आजूबाजूला नृत्य करणाऱ्या सहकारी कलाकार आनंदाने नाचत बागडत ‘हो ओ हो’ असे काहीसे म्हणत असतात, संगीतही आनंदी असते ह्यावरून ही वेदना खचित सुखद असावी ह्याची खात्री पटते.

स्स्स…
छुटकी जो
तुने काटी है
जोरीसे काटी है
यहा वहा…

नायिकेला कसली वेदना झाली असावी ह्याची उकल आपल्याला ह्या कडव्यात होते. चावट नायकाने नायिकेला इकडे तिकडे चिमटे काढलेले आहेत आणि ह्याचीच तक्रार नायिका गाण्याच्या सुरुवातीला करते.

रुठी हू
मै तुझसे रुठी हू
मुझे मना ले ना
ओ जाने जान

नायकाच्या ह्या कृतीचा नायिकेला राग आलेला आहे आणि त्यामुळे नायिका नायकावर रुसलेली आहे ह्याचा अविष्कार आपल्याला ह्या कडव्याच्या पहिल्या दोन ओळीत होतो. नायिका एखाद्या अल्लड बालीकेसारखी नायकावर रुसलेली आहे ह्या विचाराप्रत रसिक येतात न येतात, तोच पुढच्या दोन ओळीत नायिका नायकावर चिडलेली नसून तिचा तो राग, राग नसून लाडिक पणा आहे हे कवी आपल्याला जाणवून देतो.

‘हे नायक, मी तुझ्यावर (खोटी कोटी) चिडलेली असले तरीही तू मला मनवावेस, माझी प्रेमाने समजूत काढावी असे मला वाटते’ असेच काहीसे नायिका इथे सांगू इच्छिते. ‘ओ जाने जान’ असे नायकाला प्रेमाने म्हणून तिने आपले प्रेम व्यक्त केलेले आहेच, पण त्याच बरोबर तू मला चिमटे काढलेस तरीही मी चिडलेली नाहीये असे सुचवले आहे.

छेडेंगे
हम तुझको
लडकी तू है
बडी बोम्बार्ड
आहा आहा आहा आहा

आपला नायकही काय बुळा नाहीये. नायिकेच्या ह्या लटक्या रागाची त्याला पूर्ण कल्पना आहे आणि म्हणूनच तो लगेच तिची माफी न मागता तिला

छेडेंगे हम तुझको….

असे म्हणून मोकळा होतो.

कवीच्या अफाट शब्द-सामर्थ्याची प्रचीती आपल्याला पुढील दोन ओळीत येते. तो नायकाच्या मुखातून नायिकेला ‘बोम्बार्ड’ असे काहीसे संबोधतो. ‘टंच’, ‘मादक’, ‘बेफाम’, ‘आयटम’, ‘माल’ अश्या प्रचलित शब्दांना बगल देऊन कवीने ‘बोम्बार्ड’ ह्या ऑफ-बीट शब्दाची निवड करून सर्वांनाच चकित केले आहे.

ऊह ला ला…
ऊह ला ला…
ऊह ला ला…
ऊह ला ला…
तू है मेरी फैंटसी

ऊह ला ला… ह्या शब्दाचा हिंदी शब्दकोशात विशेष असा काही अर्थ नाही. बहुदा हा शब्द इंग्रजी “Oooh laa laa” ज्याचा अर्थ.. ‘आईशप्पथ..’, ‘वॉव’ असा काहीसा होऊ शकतो अश्यावरून घेतलेला असावा. ह्या ओळी केवळ यमक जुळावे किंवा, कवीच्या मनात विचारांची इतकी गर्दी झाली असावी कि त्याला ते विचार शब्दात मांडता येत नसल्याने त्याने ‘ऊह ला ला… ‘ ह्या शब्दांचा आधार घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

परंतु विचारांचा हा गुंतता लगेच सुटतो आणि कवी नायक-रूपाने नायिकेला ‘फैंटसी’ संबोधतो. पुन्हा एकदा, कवीला इथे दाद द्यावीशी वाटते. ‘स्वप्नातली राजकुमारी’, ‘सपनोंकी रानी’, ‘ड्रीम गर्ल’ अशी पारंपारिक विशेषणे वगळून कवीने ‘फैंटसी’ वापरलेले विशेषण खरोखर लाजवाब आहे.

प्रत्येकाच्या मनात आपल्या जोडीदाराबद्दल काही कल्पना असतात. परंतु फैंटसी हा शब्द त्याला लागू होत नाही. फैंटसी म्हणजे अशी गोष्ट जी आपल्या जोडीदारात मिळाली तर बहारच, अशी गोष्ट जी केवळ परीकथेत असू शकते, किंवा…….

असो..

छु ना ना
छु ना ना
छु ना ना
छु ना ना
अब मै जवान हो गयी…

ह्या कडव्यामध्ये नायिका नायकाला आपण तरुण झालो आहोत आणि म्हणून तू मला हात लावू नकोस असे सांगत आहे. हे सांगत असतानाच कैमेरा नायिकेच्या चेहऱ्यावर येऊन जातो. प्रेक्षकांनी नीट पाहिल्यास नायिकेच्या चेहऱ्यावर आलेली एक तारुण्य-पिटिका नजरेस पडेल. नायिका तरुण झाली असल्याचे एक द्योतक म्हणूनच ही तारुण्य-पिटिका दाखवण्याचा मोह कैमेरा-मैनला झाला असावा.

पुढच्या दोन कडव्यांमध्ये विशेष असे कांही घडत नाही. नायिका नायकाला ‘मी तरुण झाले आहे..’ तर नायक नायिकेला ‘तू माझी फैंटसी आहेस’ असेच वारंवार सांगत बसतात. बहुदा कवीच्या घरी पाहुणे आले असावेत किंवा दूरचित्रवाणीवर एखादी क्रिकेट ची मैच चालू असावी त्यामुळे कवीने हि दोन कडवी, पाट्या टाकल्या सारखी लिहिली आहेत.

चित्रीकरणामध्येही फारसे काही विशेष घडत नाही. नायक-नायिका रुळावरून पुढे सरकणार्या ट्रोली वर उभे राहून इकडे तिकडे फिरत बसतात.

पण चाणाक्ष प्रेक्षक हे जाणतीलाच कि हि वादळापुर्वीची शांतता आहे.

हा…
छुआ जो
तुने तो
दिल ने मारी सिटी

स्त्री-मुक्तीचा जमाना असल्याने आजकाल स्त्रियांनी शिट्टी वाजवल्यास त्यात नाविन्य वाटत नाही त्यामुळे नायिकेचा मौडर्न पणा दाखवण्यासाठी कवी म्हणतो कि नायकाने जेंव्हा नायिकेला स्पर्श केला तेंव्हा नायिका इतकी खुश झाली कि चक्क तिच्या ‘दिले ने’च शिट्टी मारली आहे.

फलाटावरून सुटताना रेल्वे जशी शिट्टी मारते तसेच काहीसे नायिकेच्या ‘दिल’चे झाले आहे आणि आता तेही पूर्ण ‘सुटलेले’ आहे.

जे प्रेक्षक केवळ चित्रिकरणाकडे लक्ष न देता गाण्याच्या बोलाकडे लक्ष देऊन आहेत, त्यांना हे जाणवले असेल कि आधीच्याच कडव्यांमध्ये नायिका नायकाला वारंवार ‘छु ना ना’ म्हणून सांगत होती पण तरीही ‘स्त्री-लंपट’पणा करत नायकाने नायिकेला स्पर्श केलेला आहे आणि आता काही खर नाही बघा..

उगाच नाही इव्ह आणि आदम ला सफरचंद खाऊ नका म्हणून सांगितले गेले होते..

दे दे इन गालोन पे
एक पप्पी
मिठी मिठी

संधीचा फायदा घेऊन नायक नायिकेकडे एका पप्पीची मागणी करताना ह्या कडव्यात दिसून येतो.

पुन्हा एकदा कवीला इथे दाद. ‘चुंबन’, ‘चुम्मा’ सारखे शब्द न वापरता ‘पप्पी’सारखा निरागस परंतु तोच परिणाम साधणारा शब्द कवीने इथे वापरला आहे. ‘पप्पी’, ‘पापी’ असे शब्द साधारणपणे लहान मुलांबरोबर वापरले जातात. तो शब्द इथे वापरला असल्याने लहान आणि किशोर-वयीन मुलांना हे गाणे आपलेसे वाटावे म्हणून कवीने हा कावेबाजपणा केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुढच्या दोन कडव्यांमध्ये कवीने निसर्गाला सामील करून घेतलेले आहे.

हिंदी चित्रपट-सृष्टी मध्ये पावसाला अढळ स्थान आहे. भय-कथा, गुन्हेगारी कथा मध्ये अंधारी रात्र, विजांचा कडकडाट आणि कोसळणारा पाउस वातावरण निर्मिती करतात, नायकाचा द्वेष करणाऱ्या नायिकेचे नायकाबरोबर कुठेतरी जाताना पावसामुळे अडकणे आणि मग रीतसर प्रेमात पडणे असतेच. आणि चित्रपट संगीत तर पावसाशिवाय अपूर्णच आहे.

इथे नायक रुपी कवी म्हणतो –

यौवन तेरा
सावन भरा
भिग गया
दिल ये मेरा

नायिकेच्या तारुण्याने मुसमुसलेल्या यौवनाला कवीने इथे ‘सावन’ची उपमा दिली आहे. ‘बिन बादल बरसात’ म्हणतात तसेच काहीसे इथे नायकाचे झाले आहे. आणि म्हणूनच तो म्हणतो..

यौवन तेरा, सावन भरा….. भिग गया, दिल ये मेरा!!!

पावसात भिजल्यानंतर ‘जवानी’ला आग वगैरे लागते हे आतापर्यंत सर्व-श्रुत आहे. काही चतुर प्रेक्षकांनी ह्याचा अनुभव सुद्धा घेतलेला असेल. असेच काहीसे नायिकेच्या बाबतीत झालेले असणार.

‘सागर’ चित्रपटातील ‘जाने दो ना’ ह्या ऋषी कपूर आणि डीम्पल कपाडिया वर चित्रित झालेल्या गाण्याची आठवण करून देणारी लाल रंगाची साडी घालून खट्याळ नायिका नायकाला दोष देत म्हणते..

आहा.. तुने ही
बरसात कराई
क्या करे
ये यौवन
बेचारा बेचारा बेचारा ….

असे लाडिक आरोप करून झाल्यावर पुन्हा एकवार ‘ऊह ला ला..’ चा जयघोष सुरु होतो आणि पुन्हा एकवार नायक नायिकेला तू माझी ‘फैंटसी’ आहेस सांगतो तर ‘मला छु नकोस’ असे नायिका नायकाला आठवण करून देते.

अह्हा..
अह्हा..
अह्हा..
अह्हा..
उई मा …

असे काहीसे वात्रट आवाज पुढे काहीतरी गरम घडणार ह्याची ग्वाही देत असतानाच, नायिकेच्या उरोजांना झाकण्याचा व्यर्थ प्रयत्न करणारा साडीचा पदर अखेर घसरतोच.

८० च्या दशकातील मिथुन-दाची आठवण करून देणाऱ्या बप्पी-दा चा आवाज नायक रुपाने म्हणतो..

गीराके अपना पल्लू
बार बार
कर देती हो हमको
बेकरार

आधीच्याच कडव्यात नायिकेने नायकावर आरोप केले होते त्यातच नायिकेचा ‘पल्लू’ घसरतो त्यामुळे घायाळ झालेला नायक अश्या प्रकारे आपली व्यथा मांडतो …. नायिकेच्या ह्या मादक रूपाने घायाळ झालेले प्रेक्षक, नायकाशी पूर्णपणे सहमत होतात..

परंतु आपली नायिका एकदम ‘पोहोची’ हुई चीज आहे.. ऐकून घेईल तर ती कसली.. ती पुन्हा एकदा नायकावरच घसरत म्हणते…

आग लगाई
तुने तन मै
क्या करे ये
पल्लू बेचारा
बेचारा ..
बेचारा ..

यौवन, दिल ह्यावरील नायीकेचा याआधीच ताबा सुटलेला होता. “छु ना” वारंवार सांगूनही नायक नको त्या गोष्टी करत जातो आणि आता परिस्थिती इथवर येऊन ठेपली आहे कि नायिकेचा तिच्या पदरावर सुद्धा ताबा राहिलेला नाहीये..

ह्यानंतर पुन्हा बहुतेक कवी टी.व्ही. समोर मैच बघायला बसतो आणि जुनीच कडवी पुन्हा कॉपी-पेस्ट करून गाणे संपवून टाकतो.