Monthly Archives: March 2012

आज म्या देव पाहीलामराठी चित्रपटसृष्टीचा सम्राट ‘अशोक सराफ’ हे नाव ज्या मराठी माणसाला माहीत नाही असा खरंच विरळाच म्हणावा. कित्तेक चित्रपट आपल्या कलेने अजरामर केलेले श्री. अशोकजी प्रत्येक रसिकाच्या मनात आपले स्थान अजरामर करुन आहेत. त्या दिवशी अशोक सरांशी माझी भेट घडणार हे पक्क झाले आणि मी हरखुनच गेलो.

अशोक सरांचा माझ्या स्मरणातला पहीला चित्रपट म्हणजे ‘एक डाव भुताचा’, मावळ्याच्या वेशातील अशोक सराफ ‘ए मास्तुरे.. फुर्र..’ करुन गावात नव्याने आलेले मास्तर ‘दिलीप प्रभावळकरांना’ हाक देतात आणि त्यांची मदत करतात. आजही तो चित्रपट माझ्या स्मरणात आहे. तेथुन जे त्यांचे स्थान माझ्या मनात निर्माण झाले ते आजपर्यंत अढळ आहे.

त्यानंतर अनेक चित्रपट अशोकजींनी केले. त्याबद्दल, त्यांच्या कलाकृतीबद्दल लिहावे इतके शब्द सामर्थ्य नक्कीच माझ्याकडे नाही आणि तितकी क्षमताही माझ्यात नाही. त्यांच्या इतक्या वर्षाच्या चित्रपट सृष्टीतील माझ्या मनात ठसलेल्या काही कलाकृतींपैकी ‘धुमधडाका मधील’ अख्या-उख्खी-एख्खे करणारा म्हातारा, ‘अश्विनी ये ना’ करत नाचणारा, ‘माझा पती करोडपती’ मधील ‘आधी कुकु लाव’ म्हणुन विधवेचे नाटक करणार्‍या सुप्रियाला खडसावणारा नाटकी मेजर, ‘एका पेक्षा एक’ मधील चणे खाणारा पोलिस, ‘आयत्या घरात घरोबा’ मधील गोपुकाका, ‘अशी ही बनवाबनवी’ मधला ‘हा माझा बायको’ म्हणुन लक्ष्मीकांत बेर्डेची ओळख करुन देणारा धनंजय माने, ‘कळत-नकळत’ मधील ‘गालावरच्या पुरीच म्हणणं तरी काय’ म्हणत छोट्यांना हसवणारा सदुमामा हे अगदी ठासुन मनात बसलेले चित्रपट आहेतच पण असेही कित्तेक ‘शे’ चित्रपट आहेत ज्यांची कदाचीत नाव माझ्या कमकुवत मेंदुच्या लक्षात रहात नसतील पण अशोक-सराफ सरांचा चित्रपट टी.व्ही. वर दिसला की रिमोटवर चाळा करणारी बोटं आपोआप थिजतात.

जितक्या सहजतेने त्यांनी आपल्याला हसवले तितक्याच सहजतेने क्षणार्धात भावुक होऊन त्यांनी रसिकांच्या डोळ्यात अश्रु उभे केले आहेत. त्यांच्याबाबत अधीक काय लिहावे? फक्त ‘अशोक सराफ’ हे नावच इतक्या गोष्टी बोलते की बस्स..

आणि म्हणुनच त्या दिवशी अशोक सरांशी माझी भेट होणार ह्या विचारांनीच इतका आनंद झाला की तो शब्दात वर्णने खरंच कठीण आहे. सकाळपासुन काय काय बोलायचे ते कित्तेक वेळा स्वतःशीच रटुन झाले होते.

अशोक सरांना भेटायला आलेल्या मंडळींची रांगच लागली होती. मी मात्र दुर, शांत बसुन होतो. मला घाई गडबडीत त्यांना भेटायचे नव्हते. एखाद्या देवालयात गर्दीला कसं भराभर पुढे ढकलली जाते आणि मग इतक्या वेळ रांगेत थांबुनही निट दर्शन नाही झाले म्हणुन मनाला हुरहुर लागुन रहाते ती हुरहुर मला अनुभवायची नव्हती आणि म्हणुनच मी गर्दी कमी व्हायची वाट पहात होतो.. आणि मग तो क्षण आला. मी अशोक-सराफ सरांसमोर उभं होतो. तिन अंकी नाटकातील सॉल्लीड परफॉर्मंन्स नंतरही त्यांचा चेहरा अजुनही टवटवीत होता.

चित्रपटात अखंड बडबड करणारी विनोदी पात्रे साकारणारे अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत व केवळ मित्र-मंडळीतच मिसळणारा आहे, ऐकुन होतो.. आज प्रत्यक्ष अनुभवत होतो. इतके शांत, चेहर्‍यावर फक्त एक हास्य, बोलका चेहरा आणि नम्र भाव.. खरंच वाटलं ‘आज म्या देव पाहीला’, आणि कंठच दाटुन आला. काय बोलावे काहीच सुचेना, ऐनवेळी शब्दांनी दगा दिला. कित्तेक लाखो लोकांनी त्यांना ‘तुमचा अभिनय आवडतो’, ‘तुमचे चित्रपट आवडतात’ वगैरे गोष्टी हजारो लाखो वेळा सांगीतल्या असतील, मग मी वेगळं काय सांगु?

नकळत मी खाली वाकलो आणि देवाचा चरण-स्पर्श अनुभवला. मनामध्ये त्यांचे असंख्य चित्रपट, त्यांची असंख्य रुप, त्यांचे विनोदी संवाद क्षणार्धात तरळुन गेले. त्या एका क्षणात वाटले हजारो वर्ष उलटली. आणि त्या एका क्षणानेच मला आठवण करुन दिली ‘अशोक सराफ’ ह्यांचे अनेक यशस्वी चित्रपटातील सहकलाकार ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ ह्यांची. वाटलं एकदा विचारावं, ‘तुम्हाला पण आठवण येते का हो त्यांची?’ पण दुसर्‍याच क्षणी त्या प्रश्नांतील फोलपणा लक्षात आला. उगाच आठवणींची ती तार छेडणं मला योग्य वाटेना आणि मी तो विचार सोडुन दिला.

ज्या ज्या लोकांना मामांचा अखंड सहवास लाभला आ्हे, लाभतो आहे अश्या लोकांचा मनस्वी हेवा वाटला.

काय बोलावं काहीच कळेना, शेवटी मी सांगुन टाकलं.. मला खरंच शब्द सुचत नाहीत काय बोलावं.. इतकं काही ठरवुन आलो होतो, इतकं काही बोलावसं वाटत होतो, पण.. आणि मामा म्हणाले.. “तुमच्या भावना पोहोचल्या” मी मामांशी हस्तांदोलन केले आणि त्या क्षणाला मी माझ्या आठवणींमध्येच बंद करुन ठेवले.

आत्ताही मी ही पोस्ट लिहायला बसलो आणि पुन्हा एकदा मनात अनेक विचारांची गर्दी झाली..पण ते बाहेरच पडेनात.. शब्दच कमी पडत आहेत. हे असंच होतं का? हो कदाचीत असंच होत असावं! देवाबद्दल लिहायचं तर तेवढं देवत्व आपल्यात हवं.. नाही का?

ही पोस्ट वाचताना मला लक्षात येते आहे की जे मला म्हणायचे होते, लिहायचे होते त्यातले फारसे काही उतरलेच नाहीये शब्दात. असेन मी लोकांच्या लेखी चांगला लेखक, भले मला, माझ्या ब्लॉगला पुरस्कार मिळाले असोत, भले आज मी एक कमर्शीयल नाटक लिहीतो आहे, पण इथे मात्र आज माझे शब्द खरंच अडकले. असो, मला त्याची पर्वा नाही, कारण हा लेख लिहीताना अशोकजींचा हा सर्व सुवर्णकाळ पुन्हा एकदा मनामध्ये तरळुन गेला, पुन्हा एकदा त्यांची भेट डोळ्यासमोर आली आणि हे माझ्यासाठी खुप आहे.

अशोक मामा तुमच्या त्या छोट्याश्या भेटीबद्दल शतशः धन्यवाद. ही भेट मी आयु्ष्यभर मनामध्ये जपुन ठेवीन..आणि देवाजवळ प्रार्थना करेन की तुम्हाला भेटायचे भाग्य मला पुन्हा पुन्हा लाभो.

स्वप्नपुर्ती….


तीन वर्षांपुर्वी जेंव्हा हा ब्लॉग सुरु केला होता तेंव्हा हा ब्लॉग मला कुठंवर घेऊन जाईल ह्याची यत्कींचीतही कल्पना तेंव्हा नव्हती. परंतु पहील्या दिवसांपासुनच वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला तो अजुनही कायम आहे.. किंबहुना यत्कींचीतही वाढलाच आहे.

ह्या ब्लॉगने मला असंख्य मित्र-मैत्रीण दिल्याच शिवाय स्टार-माझा तर्फे ‘ब्लॉग-माझा’ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवुन देऊन टी.व्ही. वर झळकण्याची संधीसुध्दा दिली. बघता बघता ब्लॉगला भेट देणार्‍या वाचकवर्गाची संख्या सुध्दा आता १२ लाखाच्या वर जाऊन पोहोचली आहे.

हे कमी की काय म्हणुन आता अजुन एक मानाचा तुरा खोवुन घेण्याचा योग ह्या ब्लॉगच्या रुपाने मला मिळतो आहे.

आज माझी ओळख केवळ एक ब्लॉगर म्हणुन न रहाता एका कमर्शीयल नाटकाचा लेखक म्हणुन होऊ पहात आहे.

साधारण एक महीन्यांपुर्वी मुंबईस्थीत ‘निलमंगल एंन्टरटेंमेंट’ ह्या प्रॉडक्शन हाऊसने माझा ब्लॉग वाचुन संपर्क केला. ते एका रोमॅन्टीक-कॉमेडी नाटकाच्या शोधात होते आणि त्यांच्या पुढच्या नाटकाची स्क्रिप्ट मी लिहावी असा जणु आग्रहच त्यांनी धरला.

आजपर्यंत केवळ कथा-लेखनच केलेले असल्याने आणि माझं नाटकं पहाणं तसं कमीच असल्याने एकुणच मला जमेल की नाही ह्याबद्दल साशंकता होती, पण सुरुवात केली आणि बघता बघता एक छोटंस उगवलेले रोपट आज नाटकाची स्क्रिप्ट म्हणुन पुर्णत्वास येत आहे. नाटक अर्थात सर्व टीमच्या पसंतीस पडले आहे आणि लवकरच कास्टींग पुर्ण होईन रिहर्सल्स सुध्दा सुरु होतील.

केवळ स्वप्नातच पाहीलेले आज प्रत्यक्षात उतरताना पाहुन कोण आनंद होतो आहे आणि हे केवळ शक्य होते आहे ते तुम्हा सर्वांनी ब्लॉगवर दाखवलेल्या प्रेमामुळे, वेळोवेळी दिलेल्या प्रतिक्रियांमुळेच. तुम्हा सर्वांचे शतशः धन्यवाद.

नाटकाची प्रोग्रेस, कास्टींग, रिहर्स्लल्स च्या गमती जमती सर्वकाही मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेच पण त्यासाठी ‘फेसबुकावरील’ डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा पेज नक्की लाईक करा म्हणजे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील.

अर्थात ही केवळ एक सुरुवात आहे, अजुन अश्या काही गोष्टी पाईपलाईनमध्ये आहे ज्या मला एक प्रतिथयश लेखक म्हणुन प्रसिध्दी देतील, अर्थात त्याबद्दल आत्ताच सांगणे योग्य ठरणार नाही.. योग्य वेळ आली की सांगेनच…

परंतु त्यापुर्वी एक टिझर…….

नोंद – चित्रं, महाजालावरुन साभार. नाटकाचे फोटोशुट व बॅनर बनेपर्यंत एक प्रतिकात्मक म्हणुन हे चित्र इथे जोडले आहे ह्याची नोंद घ्यावी.