Monthly Archives: June 2014

प्यार मे.. कधी कधी (भाग-३)


भाग २ पासुन पुढे >>

मला फक्त आणि फक्त तिच दिसत होती. अगदी आपण इंन्स्टाग्राम मध्ये बाकीच्या गोष्टी धुसर करुन टाकतो एखाद्या गोष्टीवर फोकस रहाण्यासाठी.. अगदी तस्संच. मी कुठे होतो? माहीत नाही! ती कुठे होती??.. काय फरक पडतो.. ती ‘होती’, ह्यातच सर्वकाही होतं. तिच्या हसण्याचा आवाज, तिचे स्पार्कलिंग डोळे, क्षणाक्षणाला तिच्या चेहर्‍यावर येत असुनही मनाला गुदगुल्या करणारे तिचे केस सर्व काही अगदी स्पष्ट दिसत होतं. तिने एकदा तरी माझ्याकडे बघावं ह्यासाठी मन आक्रंदत होतं. पण तिचं लक्षच नव्हतं माझ्याकडे. काय करू म्हणजे ती एकदा तरी माझ्याकडे बघेल? काय करु म्हणजे माझं अस्तीत्व तिला जाणवेल?

मला तिच्या समोर जायचं होतं, पण सिमेंटमध्ये रोवल्यासारखे पाय जमीनीमध्ये घट्ट रुतुन बसले होते. तिच्याशी बोलायचं होतं, पण कंठातला आवाज कुठेतरी गायब झाला होता. हृदयाची धडधड एखाद्या जेसीबीने खडकाळ जमीन खोदावी तश्या आवाजात मला ऐकु येत होती.. परंतु तिला.. प्रितीला ह्याची तिळमात्र कल्पना नव्हती.

आणि अगदी बेसावधपणे तो क्षण आला. अचानक तिने नजर वर करुन माझ्याकडे पाहीलं. हृदयामध्ये बाण घुसणं म्हणजे नक्की काय असतं हे मी त्या क्षणी अनुभवलं.

ह्र्दयाच्या आतमध्ये कुठेतरी एक तिव्र कळं उमटली आणि मी धाड्कन अंथरुणात उठुन बसलो.

सर्वत्र विचीत्र अंधार होता. जणु शुटींग चालु असतानाच दिग्दर्शकाने ‘पॅक-अप’ म्हणावं आणि सर्व शुटींग लाईट्स ऑफ व्हावेत तसं.

मी घड्याळात वेळ बघीतली.. फक्त २ वाजुन ५० मिनीटं झाली होती.

ह्रुदय अजुनही धडधडत होतं. टेबलावरची पाण्याची बॉटल तोंडाला लावुन गटागटा पाणि प्यायलो आणि पुन्हा अंथरुणात आडवं झालो. बर्‍याच वेळ तगमग चालु होती. झोप येत नव्हती आणि तिचा चेहरा डोळ्यासमोरुन जात नव्हता अशी विलक्षण आणि असहनीय अवस्था झाली होती.

मी झोप आणण्याचे प्रयत्न सोडुन दिले आणि कल्पनाविलास मध्ये रममाण झालो. प्रिती पुन्हा भेटली तर काय बोलायचे, ती काय म्हणेल, आपण काय म्हणु असले टीनएजर्सचे खेळ खेळत.. मेंदुला त्याच्या सुखासीन अवस्थेत आणुन सोडले. सावकाश कधीतरी नंतर झोप लागली.

 

ऑफीसमधले निळे, फ्लोरोसंट हिरवे रंग आज खुप्पच फिक्के वाटत होते. जणु काही कोणी कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन रंगाची तिव्रता कमी केली असावी. मेल्स सुध्दा चेक कराव्याश्या वाटत नव्हत्या. रिलीज झाल्यामुळे वर्कलोडही तसा कमीच होता. पण टीम-लिड नात्याने काही कर्तव्य पार पाडणं जरुरी होतं. रिसोर्सेसना वर्क अलोकेशन कसं बसं करुन टाकलं, पण मन थार्‍यावर नव्हतंच.

डेस्कवर आलो तेंव्हा मोबाईलचा व्हॉट्स-अ‍ॅपचा दिवा लुकलुकत होता.

“जानू, हाऊ आर यु? इफ़ नॉट बिझी, कॉल मी.. लव्ह यु.. नेहा…”

क्षणार्धात नसा-नसांमधील रक्त दुप्पट वेगानं वाहु लागलं. कश्यासाठी नेहाने फोन करायला सांगीतला असेल? प्रितीचं आणि तिचं काही बोलणं झालं असेल का? प्रितीने कधी भेटायचं ह्याची वेळ सांगीतली असेल का? एक ना दोन.. अनेक प्रश्न मनामध्ये झरझर अवतरले, पण सर्व प्रितीसंबंधीतच केंद्रीत होते.

मी पट्कन नेहाला फोन लावला.

“हाय डिअर..”, पलिकडुन नेहाचा नेहमीचा तो ‘डिअर’ वाला टोन..
“काय गं? काय झालं? कश्याला फोन करायला सांगीतलास?”, मी एका दमातच सर्व प्रश्न विचारले
“हॅल्लोsss..कुल डाऊन.. बिझी आहेस का?”, नेहा
“नाही.. बोल पट्कन..”

“अरे काही विशेष नाही.. अस्संच…”, नेहा
“….”
“बरं.. सांगु?”
“ह्म्म.. बोल..”

“ए.. तुझे आज पाय खुप दुखतं असतील ना रे?”, नेहा खिदळत म्हणाली
“माझे पाय? नाही.. का बरं?”
“काल तु माझ्या स्वप्नात आला होतास. म्हणलं एवढ्या लांब तु आला होतास.. तर म्हणलं विचारावं…”

तोंडामध्ये इतक्या शिव्या आल्या होत्या ना.. पण आवरतं घेतलं
“बरं ऐक ना, आत्ताचं लेक्चर झालं की, लास्ट लेक्चर ऑफ आहे.. भेटुयात? ऑफकोर्स तु बिझी नसशील तर…”

खरं तर अगदी तोंडात आलं होतं, बिझी आहे म्हणुन सांगावं, पण मग सुपीक डोक्यात एक कल्पना आली.

“ऑलराईट.. मी येतो कॉलेजपाशीच..”
“कॉलेजपाशी.. नको त्यापेक्षा डेक्कन ला भेटु ना सिसीडी मध्ये..”
“आपण जाऊ सिसीडीला, पण मी करतो तुला कॉलेजला पिक-अप..”

“ऑलराईट देन.. वेटींग फॉर यु.. डोन्ट बी लेट”, असं म्हणुन नेहाने फोन बंद केला

नेहाला कॉलेजपाशी भेटण्याचं मुख्य कारण अर्थातच प्रिती होतं. मे बी..प्रिती तिच्याबरोबरच असली तर भेटली असती.

मी पट्कन दोन-तिन मेल्स ड्राफ्ट करुन पाठवुन दिल्या आणि बाहेर पडलो. सॉफ्टवेअर-इंजीनीअर असल्याचा आणि त्याहुनही सर्विस बेस्ड कंपनीत असल्याचा एक फायदा असतो.. दिवसभर कधीही बघा, क्लायंट व्हिजीटच्या भितीने का होईना आम्ही अगदी टाप-टीप असतो. फॉर्मल्स, पॉलीश्ड शुज, हेअर-जेल, पर्फ्युम. त्यामुळे बाहेर पडताना आरश्यात बघायची सुध्दा गरज पडली नाही.

वेळेच्या पाच मिनीटं आधीच कॉलेजपाशी पोहोचलो.

थोड्याच वेळात नेहा बाहेर आली.. एकटीच

“हाय डार्लिंग…”, नेहा सरळ बाईकवर बसतच म्हणाली.
“काय गं! आज एकटीच?”
“हो मग?”

“म्हणजे बाकीचा तुमचा ग्रुप कुठे गेला?”
“आहेत सगळ्या आत.. काही तरी फालतु रोझ एक्झीबीशनला जायचा प्लॅन चालला आहे..”

मी हळुच वळुन गेटकडे बघीतलं, पण प्रितीचा काहीच पत्ता नव्हता. थोडावेळ टंगळमंगळही करुन पाहीली, पण उगाच नेहाला नसता संशय येऊन चालणार नव्हतं म्हणुन मग नाईलाजानेच तेथुन निघुन गेलो.

“बरं ऐक, आपण शनिवारी लॉग-राईडला चाललो आहे ओके? कुणी विचारलं तर लक्षात ठेव”, नेहा मध्येच बाईकवर म्हणाली
“मला कश्याला कोण विचारायला येतंय..”, मी अजुनही वैतागलेल्याच मुड मध्ये होतो..
“अरे नाही..अ‍ॅक्च्युअली, प्रिती म्हणत होती, शनिवारी सकाळी ब्रेकफास्टला भेटायचं का? तुमचं ते डिस्कशन पेंडीग होतं ना..”

मी जोरदार ब्रेक मारण्याच्याच तयारीत होतो..

“आणि हे तु मला आत्ता सांगते आहेस…”
“म्हणजे.. अरे आत्ताच तर भेटलो आपण दहा मिनीटांपुर्वी..”
“मग भेटु ना ब्रेकफास्टला…”

“जाऊ दे.. काय आपलं तें तेच बोलायचं. आम्ही हजार वेळा बोललो आहे ह्यावर.. तिला पटत नाही तर कश्याला.. नाही तर नाही.. आपल्याला काय फरक पडतो? असे कित्तेक आले आणि गेले.. सब अपनी जुती के निचे..”, नेहा एकदम रिबेलिअन वगैरे होऊन बोलत होती.
“तसं नाही, पण उगाच रॉंग इंप्रेशन नको पडायला ना.. म्हणुन म्हणालो..”

“ए काय रे.. कित्ती मस्त पावसाळी हवा आहे.. आपण लॉग राईडला पण गेलो नाही इतक्यात अजुन..”, सिसीडीमध्ये शिरताना नेहा म्हणाली.

मी दोघांना कॉफी ऑर्डर केली आणि मग खिश्यातला मोबाईल काढुन तिच्यासमोर धरला…

“हे बघ..”
“काय आहे हे?”, नेहा..
“वेदर प्रेडीक्शन आहे.. शनिवारी बघ ‘हॉट अ‍ॅन्ड ह्युमीड’ आहे. एक्स्पेक्टेड टेंपरेचर ३६..”

“हॅ.. हे काय खरं असतं का? उलट मग तर नक्की पाऊस पडेल त्या दिवशी..”
“छॅया.. हे काय आपल्या हवामान खात्याचे अंदाज नाहीत. अमेरीकेच्या सॅटेलाईटवरुन घेतलेला डेटा अ‍ॅनलाईझ करुन दिलेले प्रेडीक्शन आहे हे. ते नाही चुकत..”

“ए काय रे..”, छोट्ट्स्स तोंड करत नेहा म्हणाली.
“मला काही नाही जायला.. बघ.. तुच काळी होशील…” शेवटचं शस्त्र मी बाहेर काढलं. नेहाला काय ते आपल्या गोरेपणाचं कौतुक होतं कुणास ठाऊक, पण हा वार वर्मी लागला.

“बरं.. मग काय? सांगु का तिला भेटुयात शनिवारी म्हणुन?”
“चालेल.. माझी काही हरकत नाही.. तु म्हणशील तसं..”
“ठिके पण एका अटीवर.. आपण नॅचरल्समध्ये भेटायचं आणि तु मला ते ‘कोकोनट डिलाईट’ देणार.. कबुल??”
“जो हुक्म मेरे आका..”, मनामध्ये फुटणार्‍या आनंदाच्या उकळ्या थोपवत मी म्हणालो..

 

शनिवारची सकाळ कित्तेक वर्षांनी उजाडणार असल्यासारखी भासत होती. मधल्या रात्री, ऑफीसमधले कंटाळवाणे काम, मंद भासणार्‍या संध्याकाळ जणु कधी सरणारच नाहीत अश्या वाटत होत्या. सहनशक्तीचा अंत पाहील्यावर शेवटी तो शनिवार उजाडला.

प्रितीला पहील्यांदा भेटुन तीन दिवस उलटले होते, पण ती भेट मनामध्ये अजुनही फ्रेश होती. त्यावेळचा प्रत्येक क्षण नुकताच घडुन गेल्यासारखा वाटत होता. आज पुन्हा तिला भेटायचं ह्या विचारानेच पुन्हा धडधडायला लागलं होतं…

शेवटचं वळणं घेऊन मी नॅचरल्सपाशी आलो. समोरच्या झाडाखालीच प्रिती उभी होती..

धक़ धक़.. धक धक.. धक धक…

झाडांच्या फांद्यांना हुलकावणी देऊन सुर्याची काही किरणं तिच्यापर्यंत पोहोचली होती. गोल्डन हाईलाइट्स केलेले तिचे केस अधीकच सोनेरी भासत होते. आकाशी-मरुन रंगाच्या पट्य़ांचे तिचे सॅन्डल्स आणि त्यावर बदामी रंगाचे छोटेसे फुल..

नेहा कुठल्या रंगाचे सॅन्डल्स वापरते? हु केअर्स, नेव्हर बॉदर्ड टु चेक दॅट.

मी गाडी पार्क केली तेंव्हा प्रितीचं माझ्याकडे लक्ष गेलं. माझ्याकडे बघुन तिने एक मस्त स्माईल केलं आणि ती मी थांबलो होतो तेथे यायला लागली..

धक़ धक़.. धक धक.. धक धक…

“हाय..गुड मॉर्नींग…”, मी
“हाय…व्हेरी गुड मॉर्नींग..”, प्रिती..

“आय होप.. माझ्यामुळे तुम्हाला तुमचा काही प्लॅन कॅन्सल नाही करावा लागला..”, प्रिती
“नो.. नॉट अ‍ॅट ऑल…”, मी

काही क्षण शांततेत गेले.

पाच एक मिनिटांमध्ये नेहा पण आली आणि आम्ही आतमध्ये आईसक्रिमची ऑर्डर देऊन कोपर्‍यातल्या टेबलवर बसलो.

“सो.. यु वॉन्ट द अ‍ॅन्सर टू युअर क्वेश्चन..”, मी
“अ हं..”, प्रिती

पुढची १०-१५ मिनीटं मी तिला माझ्या परीने माझी आणि नेहाची बाजु पटवुन देत होतो. ह्या काळात नेहाने पहीलं आईसक्रिम संपवुन त्यानंतरची दोन आईसक्रिम्स पण संपवली होती. माझ्या दृष्टीने ते फायद्याचंच होतं. मला माझं पुर्ण लक्ष प्रितीवर द्यायचं होतं.

“हे बघ तरुण, तु म्हणतो आहेस ते तुझ्या दृष्टीने बरोबर आहे.. पण अरे.. प्रेम असं असतं का? म्हणजे जो पर्यंत एकत्र आहोत तो पर्यंत.. उद्या तु तुझ्या मार्गाने, मी माझ्या मार्गाने..”, प्रिती

तिच्या तोंडुन माझं नाव ऐकताना अंगावरुन मोरपिस फिरल्यासारखं वाटत होतं.

“का? काय हरकत आहे?”, मी
“माझी हरकत अशी काहीच नाही. तु आणि नेहाने.. किंबहुना कुणीही.. कसं वागावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण बिईंग अ सायकॉलॉजी स्टूडंट मला थोडं हे विचीत्र वाटलं.. आणि मनाला पटलं नाही म्हणुन..”

“…..”
“तु मला सांग, उद्या तुमची लग्न झाल्यावर, एकमेकांना विसरु शकाल?”
“कश्याला विसरायचं? अफ़्टरऑल फ़्रेंड्सना कोणी असं लग्नानंतर विसरतो का आपण?”

नेहाने एव्हाना आपला आईसक्रिम्सचा कोटा संपवला होता आणि ती आमचा डिबेट ऐकत होती.

“फ्रेंड्स??”, आपले टपोरे डोळे अजुन मोठ्ठे करत प्रिती म्हणाली.. “आपल्या कल्चरमध्ये कधीपासुन फ़्रेंड्सबरोबर सेक्स करु लागले??”
“ओह कमॉन.. वुई नेव्हर डीड सेक्स…”, मी नेहाकडे बघत म्हणालो..

“नो??”, प्रितीने नेहाकडे बघीतले..

“आय मीन अनलेस यु आर टॉकींग अबाऊट फ़ॉंन्डलींग.. नो वुई नेव्हर डीड..”, खांदे उडवत मी म्हणालो..

नेहा एखाद्या लहान मुलीसारखी खिदळत होती. मला खरं तर तिचा प्रचंड राग आला होता.. निदान ह्या इंटेंन्स गोष्टी तरी तिने प्रितीला सांगायला नको होत्या.

प्रितीने एकदा घड्याळात बघीतलं आणि मग उठुन उभं रहात म्हणाली.. “एनीवेज, मला नाही वाटतं मी कन्व्हींन्स होईन.. सो लेट्स स्टॉप हीअर..”

“ऑलराईट, आपण दुसर्‍या विषयावर बोलु..”, मी
“नको.. मला जायला हवं.. उशीर झालायं..”, प्रिती..
“ओह.. सिटी लायब्ररी? तु नाही गेलीस तर ती बंद होईल ना..”, थोड्याश्या कुत्सीत स्वरात मी म्हणालो..

तिने दोन क्षण माझ्याकडे बघीतले, अ‍ॅज इफ़, ती माझ्या डोळ्यात काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करत होती. काय? मला नाही माहीत..

प्रिती गेली आणि नेहमीप्रमाणे वातावरणातला सगळा रंगच निघुन गेला.

“सो? आज काय प्लॅन आहे?”, नेहाने विचारलं.

माझं वाईट्ट डोकं सटकलं होतं तिच्यावर.. त्यामुळे दिवसभर उगाचच तिच्याबरोबर कुठेही फिरण्यात मला इंटरेस्ट नव्हता. मला शांतता हवी होती. मला प्रितीबरोबर घालवलेला हा तास-दीड तास पुन्हा नजरेसमोर आणायचा होता. तिच्याशी झालेल्या नजरानजरीच्या प्रत्येक क्षणी हृदयात उमटलेली ती कळ मला पुन्हा अनुभवायची होती. तिच्या त्या चंदेरी बांगड्यांची किणकिण मला ऐकायची होती, सारखे सारखे चेहर्‍यावर येणारे तिचे केस आणि त्यांना सांभाळताना तिची होणारी तारांबळ मला डोळे मिटून पहायची होती. तिच्या केवळ ओढणीच्या स्पर्शाने अंगावर उमटलेला शहारा मला पुन्हा पुन्हा जगायचा होता…

“आज थोडं पि.सी. बॅकपचं काम आहे, डिस्कला थोडे बॅड सेक्टर आलेत, सो डेटा कॉपी करुन, सगळं फॉरमॅट करायचं आहे.. व्हॉट अबाऊट यु?”, मी
“मला पण आज जरनल कंम्प्लीट करायचं आहे, मागच्या आठवड्यात काहीच झालं नाही रे, आज बसुन करावं लागेल सगळं..”, नेहा

“ठिक आहे, चल मी सोडतो तुला घरी..”, गाडीला किक मारत मी म्हणालो…

 

नेहाला सोडुन घरी येताना मनामध्ये प्रश्नांचे अनेक तरंग उमटत होते.

केवळ एक दोन भेटीतच प्रिती एव्हढी का आवडावी?
नेहा सुध्दा मला पहील्या भेटीतच आवडली होती. पण आज.. आज ती कदाचीत मला तेव्हढी नाही आवडत जेव्हढी इतके वर्ष आवडत होती.. का?
मी.. माझं मन.. एव्हढं थिल्लर आहे का? कश्यावरुन काही वर्षांनंतर प्रितीच्या बाबतीत पण असंच नाही होणार?
कदाचीत हे प्रितीबद्दलचे क्षणभंगुर अ‍ॅट्रअ‍ॅक्शनही असेल. कदाचीत २-४ दिवसांनी मला नेहा पुर्वीइतकीच आवडेल..
कदाचीत प्रितीचा कोणी बॉयफ़्रेंड असेलही. असेल कश्याला.. असणारच…

अनेक प्रश्न भाजायला ठेवलेल्या पॉपकॉर्न्ससारखे मनात उसळत होते ज्याची उत्तर शोधणं गरजेचं होतं.. शक्य तितक्या लवकर…

 

[क्रमशः]

प्यार मे.. कधी कधी (भाग-२)


भाग १ वरुन पुढे>>

“सो टुडे…”, देसाई मॅडम सुरु झाल्या.. “वुई विल बी अ‍ॅनालायझिंग द डिफ़रंट अस्पेक्ट्स ऑफ़ अ ह्युमन ब्रेन”

सगळ्या विद्यार्थीनी आज्ञाधारकपणे देसाई मॅडम बोलतील ते लिहुन घेत होत्या..

“नेहा, प्लिज इंट्र्युड्स द ऑब्जेक्ट टु अस..” देसाई मॅडम..

नेहा उठुन उभी राहीली.

“थॅक्यु मॅम..”, नेहा थोडंस्स कमरेत वाकुन म्हणाली..”अ‍ॅन्ड माय फ्रेंन्ड्स.. द ऑब्जेक्ट टुडे इज तरुण.. ही इज माय फ्रेंड…”

“जस्ट अ फ्रेंड?? की….”, हळुच मागुन कुणी तरी विचारले आणि वर्गात एकच हश्या पिकला..

नेहाने एकदा माझ्याकडे हसुन बघीतलं आणि तिने तो प्रश्न इग्नोर करुन पुढे म्हणाली..

“ही इज अ सॉफ्ट्वेअर इंजीनीअर..”
“वुवुवुह्ह्ह…..”, वर्गात एकजुट आवाज झाला…

“अ‍ॅन्ड ही इज वर्कींग इन अ मल्टी नॅशनल कंपनी…”
“वुवुवुह्ह्ह…..”, पुन्हा एकदा…

“अ‍ॅन्ड ही इज अ टीम लिड…”
“वुवुवुह्ह्ह…..”, ह्या वेळचा वोव्व्ह्ह.. मागच्या दोन्हीपेक्षा जास्तच जोरात होता…

नेहाने एकदा हसुन सगळ्यांकडे बघीतले आणि ती खाली बसली.

“तरुण.. आजचे आपले सेशन दोन भागांचे असणार आहे..”, देसाई मॅडम माझ्याकडे वळुन बोलु लागल्या..
“…पहिल्या भागात विद्यार्थीनी काही फिगर्स तुला दाखवतील…”

देसाई मॅडमने ‘फिगर्स’ शब्द उच्चारताच अचानक वर्गात एकच हश्या पिकला..

देसाई मॅडमना त्यांची चुक लगेचच लक्षात आली..

“डायग्रॅम्स..आय मीन डायग्रॅम्स..”, नाकावर घसरणारा चष्मा सावरत त्या म्हणाल्या..

“त्या डायग्रॅम्स कडे बघुन तुला काय दिसतं? काय वाटतं हे थोडक्यात तु सांग. साधारण १५-२० डायग्रॅम्स आपण बघु, आणि मग दुसर्‍या सेशन्स मध्ये काही रॅन्डम प्रश्न असतील.. यु हॅव टु अ‍ॅन्सर देम अ‍ॅज वेल.. ऑलराईट?”

मी आज्ञाधारक मुलासारखी मान डोलावली.

देसाई मॅमनी हातात खडु घेतला आणि त्या फळ्यावर काहीतरी रखडु लागल्या.

मी पट्कन नेहाकडे बघीतलं..ती माझ्याकडेच बघत होती. आमची नजरानजर होताच, तिने हळुच डावा डोळा मिचकावला.
चायला, ह्या पोरींना हे असलं कसं काय जमतं बुआ.. मी स्वतःला इमॅजीन करत होतो ऑफीसच्या मिटींग्समध्ये कुणाला असं डोळा-बिळा मारणं म्हणजे..

मी ही नेहाला डोळा मारण्याच्याच तयारीत होतो इतक्यात माझं लक्ष दुसर्‍या एका मुलीकडे गेलं… ती नेमकी माझ्याकडेच बघत होती.

मी हा डोळे मारण्याचा खेळ तेथेच आवरता घेतला आणि एव्हाना प्रोजेक्शन-स्क्रिनवर संगणकवरील पॉवर-पॉईंट प्रेझेंटेशन्सच्या काही स्लाईड्स दिसु लागल्या होत्या त्यावर लक्ष केंद्रीत केलं.

पुढची जवळ जवळ ३०-४० मिनीटं चित्र-विचीत्र आकृत्या त्या पडद्यावर अवतरत होत्या. कधी चौकोनात चौकोन, त्याला अर्धकाटकोनात छेदणारे त्रिकोण, मध्येच काही रंगीत टींबांसारखे भासणारे गोल. तर कधी मनुष्याच्या चेहर्‍याच्या रुपरेषेचा भास व्हावा असे काही पॅटर्न्स. कधी उगवत्या सुर्याच्या बाजुलाच गडद जांभळ्या रंगाचा चंद्र, तर कधी नुसतेच रंगीत रंगरेषांचे फटकारे.

मला फारसा विचार न करता, जे वाटलं, जे दिसलं ते सांगायचं होतं ते एकाअर्थी बरंच झालं. नाही तर मॉडर्न आर्टच्या प्रदर्शनात एखाद्या काहीच न कळणार्‍या चित्रासमोर आपण थांबावं आणि आपल्या पोरानं विचारावं.. “बाबा.. बाबा.. हे कसलं चित्र आहे…” तशी अवस्था व्हायची.

पहीलं सेशन तसं पट्कन संपलं आणि अंधारलेला वर्ग पुन्हा प्रकाशमान झाला.

मी नेहाकडे पाहीलं.. तिने भुवया उंचावुन “हाऊ वॉज इट” विचारलं आणि मी ही “इट्स ओके” म्हणुन मान हलवली.

 

पाच एक मिनीटांचा ब्रेक होऊन लगेच दुसरे सेशन सुरु झाले.

प्रश्नांचा असा काही ठरावीक साचा नव्हता. म्हणजे एक प्रश्न होता, “व्हॉट काईंड ऑफ़ ड्रीम्स यु हॅव युजवली?”, तर दुसरा होता “अंडर स्ट्रेस, मन शांत रहायला तुम्ही ड्रग्स, म्युझीक, बुक्स, फ्रेंन्ड्स किंवा शांतता” ह्यापैकी कश्याचा आधार घ्याल?”

अर्थात हे काही कुठल्या कंपनीच्या मुलाखतींचे सत्र नव्हते, त्यामुळे पाच एक मिनीटांमध्येच मी रिलॅक्स झालो आणि नंतर नंतर तर मला त्या प्रश्नांची मज्जाच वाटु लागली.

अ‍ॅक्च्युअली, त्या स्ट्रेसच्या प्रश्नाने खरं तर माझं काम सोप्प केलं होतं. आमच्या टींमचा ऑस्टीनचा एक हेड जोज.. कुठल्याही महत्वाच्या मिटींगला तो फॉर्मल न रहाता असा मस्त खुर्चीत पसरुन बसायचा. एक हात खुर्चीवरुन मागे टाकलेला.. पाय स्ट्रेच्ड आणि टेबलाच्याही पुढे आलेले, मान खुर्चीवर टेकवलेली. मस्त रिलॅक्स वाटायचं. आज मी तस्सच केलं.. मस्त आरामशीरपणे स्वतःला सोडुन दिलं अ‍ॅन्ड जस्ट अ‍ॅन्जॉयीड द सेशन.

मला खरं तर नेहाने एखादा प्रश्न विचारावा असं फार वाटत होतं, पण तसं काहीच घडलं नव्हतं. कुणीही प्रश्न विचारला की नेहा आधी कुणी प्रश्न विचारला तिच्याकडे आणि मग चेहर्‍यावर एक प्रकारची बालीश उत्सुकता ठेऊन मी काय उत्तर देणार ह्याच्याकडे बघत बसायची.

घड्याळ्याचे काटे पुढे पुढे सरकत होते. अजुन ५-१० मिनिटं आणि मी ह्यातुन बाहेर पडणार होतो. प्रश्नांचा ओघ आता आटला होता. प्रत्येकजण वहीमध्ये काही तरी निरीक्षण नोंदवत होता. खरं तर माझी फार इच्छा होती प्रत्येकीच्या वहीत डोकावुन काय लिहीलं आहे ते बघण्याची. शेवटी काही झालं तरी ती निरीक्षणं माझ्याबद्दलची होती.

“तरूण, आय हॅव वन क्वेश्चन अबाऊट ह्युमन रिलेशन्स.. कॅन आय…?”, मी घड्याळात वेळ बघण्यात गुंग होतो इतक्यात एक आवाज कानावर आला.

खरं तर बर्‍याच वेळानंतर एक प्रश्न आला होता, त्यामुळे सर्वचजणी मागे वळल्या होत्या. मी आवाजाच्या दिशेने पाहिलं… आणि पहातचं राहीलो.

शी वॉज द प्रेटीएस्ट गर्ल ऑफ़ द क्लास..

खरं तर माझ्या मनात विचार सुध्दा यायला नको होता, पण ‘ती’ नेहापेक्षाही कित्तेक पटीने सुंदर होती. इतक्या वेळात ति मला एकदा पण कशी दिसली नाही, ह्याचं मला क्षणभर आश्चर्यच वाटलं. दातांच्या कडांवर पेन्सीलने टकटक करत ती माझ्याकडेच बघत होती. एखाद्या टपोर्‍या मोत्यासारखे तिचे सुंदर डोळे काळजाचा ठाव घेत होते. तिचे लांबसडक काळेभोर केस अर्धे पाठीवर तर अर्धे खांद्यांवरुन पुढच्या बाजुला पसरले होते. तिच्या आवाजात एक प्रकारचे मार्दव होते, एक प्रकारचा फ्रेंडली टोन होता. म्हणजे बर्‍याच वेळेला आपल्याला फोन वर जे सेल्स कॉल्स येतात, त्यातील कित्तेक आवाज मनाला भावतात.. कधी कधी एक-दोन मिनीटांतच आपण त्या आवाजाशी एकरुप होऊन जातो.. जणु काही पलीकडुन बोलणारी व्यक्ती आपली कित्तेक वर्षांपासुनची मित्र/मैत्रिण आहे..

“तरुण..”

तिच्या आवाजाने माझी तंद्री भंग पावली..

“युअर नेम मिस..”, मी उगाचच आवाजात स्टाईलीश टोन आणायचा प्रयत्न करत म्हणालो.

खरं तर मला काय घेणं होतं तिच्या नावाशी? आत्तापर्यंत मी कुणाला कुणाचं नाव विचारलं होतं? एक नेहा सोडली तर सर्व जण.. किंवा सर्व जणी माझ्यासाठी त्रयस्थच होत्या. पण का कुणास ठाउक, मला रहावलंच नाही.

मला माझी चुक लक्षात आली. मी पट्कन नेहाकडे बघीतलं.

“घसरला लगेच हा.. सुंदर मुलगी बघीतल्यावर..” असेच काहीसे तिच्या चेहर्‍यावर ते नेहमीचे एक्स्प्रेशन्स असणार अशी मला खात्री होती. पण सुदैवाने तसं काही झालं नव्हतं.

“प्रिती…..” एका जिवघेण्या क्षणाच्या शांततेनंतर ‘ती’ म्हणाली.

प्रेट्टी..जस्ट लाईक यु..” माझं मन आतमध्ये किंचाळत होते, पण मी मोठ्या कष्टाने त्या भावना जिभेवर येऊ नाही दिल्या..

“शुअर प्रिती, प्लिज गो अहेड..”, मी

“तरुण, समज एक मुलगा-मुलगी कमीटेड आहेत. दोघंही मस्त, एकमेकांना अनुरुप, टीपीकल बॉयफ़्रेंड-गर्लफ्रेंड. पण त्यांच्यातील रिलेशन खुप वेअर्ड आहे. आय मीन, दे आर कमीटेड, पण फक्त काही दिवसांसाठीच… जोपर्यंत त्यांची लग्न होत नाहीत तो पर्यंत. दोघंही वेगळ्या कास्टचे. कदाचीत दोघांच्याही घरी इंटरकास्टला विरोध असल्याने, दोघांनाही माहीती आहे की ते एकमेकांशी लग्न नाही करु शकणार.. पण तरीही दोघंही तो पर्यंत का होईना कमीटेड.. एकमेकांशी.

तुला काय वाटतं ह्याबद्दल? हे खरंच प्रेम आहे? की फक्त फिजीकल अ‍ॅट्रॅक्शन..? की एकमेकांना, एकमेकांच्या मनाला आणि आपल्या आई-वडीलांना फसवुन केलेलं एक नाटक??”

ज्या क्षणी हा प्रश्न संपला त्या क्षणी मी नेहाकडे बघीतलं. नेहाने जीभ चावली आणि पट्कन दुसरीकडे बघीतलं. वर्गातल्या सगळ्या मुली आता माझ्याकडेच बघत होत्या.

शंका यायची कारणच नव्हतं. ह्या प्रश्नातले तो मुलगा-मुलगी, दुसरं-तिसरं कोणी नसुन मी आणि नेहाच तर होतो.

दॅट वॉज आवर स्टोरी.

नेहा हिंदु-मराठा होती, तर मी हिंदु-ब्राम्हण. प्रिती म्हणाली तसं हे नाटक वगैरे तर नक्कीच नव्हतं. मला नेहा जितकी आवडतं होती, तितकाच मी तिला आवडत होतो हे नक्की. एक दिवस नाही भेटलो, किंवा फोनवर नाही बोललो तरी आम्हाला त्याची जाणीव व्हायची. आम्ही एकमेकांना खुप मिस्स करायचो. कुठलीही चांगली-वाईट गोष्ट, एकमेकांशी शेअर केल्याशिवाय रहावयाचंच नाही. पण असं असतानाही, आम्ही रिअलॅस्टीक होतो. आम्हाला दोघांनाही ह्याची पुर्ण कल्पना होती की आमचं हे नातं आमच्या घरातले कध्धीच मान्य करणार नाहीत. जसं माझ्या घरी माझी बायको ही हिंदु ब्राम्हणच असावी असा हट्ट होता, तसंच नेहाच्या घरी तिचा नवरा हा ९६ कुळी मराठाच असावा ह्यात कुठलचं दुमत नव्हतं. त्यामुळे आम्ही नवरा-बायको होण्याची स्वप्न कधीच पाहीलीही नाहीत आणि एकमेकांना दाखवलीही नाहीत.

आम्हा दोघांना एकमेकांपासुन विलग फक्त एकच गोष्ट करु शकणार होती, आणि ती म्हणजे एकमेकांची लग्न.

त्यामुळे हा प्रश्न दुसर्‍या तिसर्‍या कुणाचा नसुन माझा आणि नेहाचाच होता.

“प्रिती… कसं असतं ना..”, मी थोडा वेळ विचार करून म्हणालो.. “प्रत्येकजण त्याचं त्याचं आयुष्य जगत असतो. ते त्याने कसं जगावं हे तोच ठरवतो.. त्याचे कॉन्सीक्वेंन्सेस जर त्याला.. किंवा तिला माहीत असतील तर त्यात वाईट काय आहे? खरं तर मला वाटतं आपण त्यांचा आदरच करायला हवा. त्यांनी फक्त…”

मी बोलत होतो आणि इतक्यात तास संपल्याची बेल वाजली. माझं उत्तर अर्धवटच राहुन गेलं..

धडाधडा सगळ्यांनी बॅगा बंद केल्या आणि क्षणार्धात अर्धा क्लास रिकामा झाला सुध्दा..

मी प्रितीकडे पाहीलं.. ती अजुनही तिच्याच डेस्कवर होती. मी तिच्याकडे जाण्यासाठी वळलो इतक्यात नेहा जवळ येऊन उभी राहीली.

“एन्जॉईड ?”, डोळे मिचकावत तिने विचारलं..

मी परत प्रितीकडे पाहीलं. ती पुस्तकं गोळा करुन बॅग मध्ये भरत होती. तिच्या पापण्यांची होणारी उघडझाप काळजाला हेलावुन सोडत होती. तिच्या केसांमधुन मधुनच चमकणारी तिची इअर-रिंग सारखं लक्ष विचलीत करत होती.

मी पट्कन वेळ काढण्यासाठी काहीतरी कारण म्हणुन खाली वाकुन बुटाची लेस ठीक करु लागलो. प्रिती जवळ आली तस्ं मी उठुन उभा राहीलो. कोईंन्सीडेंटली क्लासबाहेर आम्ही तिघंही एकत्रच बाहेर पडलो.

“तरुण, ही प्रिती, माझी बेस्ट फ्रेंड”, नेहाने अचानक माझी ओळख करुन दिली.
“बेस्ट फ्रेंड?”, माझा आवाज अचानकच मोठ्ठा झाला.
“हो.. का?”, नेहा

“आय थॉट, आय नो ऑल युवर फ्रेंड्स.. तुझ्याकडुन प्रिती नाव कधी ऐकलं नव्हतं म्हणुन..”, मी सारवासारव करत म्हणालो.

माझ्या त्या उत्तराने, प्रितीच्या गालावर क्षणभर एक मस्त खळी पडुन गेली.

“हो अरे, तीची उशीरा अ‍ॅडमीशन झाली.. पण आता आम्ही बेस्ट फ्रेंन्ड्स आहोत…”, नेहा आणि प्रिती एकमेकींकडे बघुन हसल्या.

“ऑलराईट देन.. चल मी निघते..”, प्रिती नेहाला म्हणाली..आणि अचानक माझ्याकडे वळुन म्हणाली “नाईस मिटींग यु..”

मी काही बोलायची वाट न बघता ती जायला लागली. खरं तर तिने जरावेळ तरी थांबावं असं फार वाटत होतं.

“कैसे बताए.. क्यु तुझको चाहे.. यारा बताना पाए..
बातें दिलोंकी देखो जुबान की आंखे तुझे समझायें
तु जाने ना.. तु जानें ना…”

“तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर नको?”, मी अचानक प्रितीला विचारलं.
“आय नो द आन्सर तरुण.. मी आणि नेहा खुप बोललो आहे ह्या विषयावर.. जस्ट दॅट आय एम नॉट कन्व्हींन्स्ड…”, प्रिती हसुन म्हणाली..

“ओके देन लेट मी कन्व्हींन्स..”, मी काही चान्स सोडायला तयार नव्हतो..
“शुअर.. ट्राय युअर लक.. पण प्लिज आत्ता नाही, मला सिटी लायब्ररीमध्ये जायचेय.. आपण नंतर भेटुन बोलुयात?”, प्रिती
“कधी??”, मला माझ्याच लाळघोटेपणाची चिड येत होती.. बट कंबख्त दिल माननेको ही तयार नही था..

“मी बोलते नेहाशी..बाssssय”….

ती जाईपर्यंत मी तिच्याकडेच पहात राहीलो. तिच्या चालण्यात एक प्रकारची ग्रेस होती. तिचे सॅन्ड्ल्स, तिचा ड्रेस, तिचे इअर-रिंग्स, हातातलं ब्रेसलेट, बॅग.. मी तिच्या प्रत्येक गोष्टींवर फिदा होतो.

अचानक मी अजुनही नेहाबरोबर तिच्या कॉलेजमध्ये आहे ह्याची आठवण झाली. इतक्या वेळ ती नुसती एकदा माझ्याकडे तर एकदा प्रितीकडे आलटुन-पालटुन पहात होती. मला उगाचच तिची किव आली. वाटलं, आपण किती सहज तिला इग्नोर केलं. खरं तर प्रितीसमोर मी नेहाला थोडा इंपॉर्टन्स दिला असता, तर तिला नक्कीच भाव खाता आला असता.

मला माझी सुध्दा लाज वाटली.

“मग कशी वाटली माझी मैत्रीण?”, नेहाने विचारले
“कशी म्हणजे? ठीकच आहे, मला तर उलट जरा आगाऊच वाटली. “, मी उगाच फारसा इंटरेस्ट न दाखवता म्हणालो, ” तिला काय करायचेय? आपण काहीही करू नं!”

“अरे तिने सहजच विचारले. आणि आगाऊ वगैरे तर अज्जिबात नाही हं, खूप स्वीट आहे ती. आम्ही तर आजकाल इतके एकत्र असतो आम्हाला ग्रुप मध्ये लेस्बो म्हणतात..”, नेहा हसत हसत म्हणाली

“आर यु?”, मी
“ऑफकोर्स नॉट, शट अप !!”, नेहा लटक्या रागाने म्हणाली

“एनीवेज.. सो? काय प्लॅन आता?”, मी नेहाला विचारलं.
नेहानं तिच्या हातातल्या नोटबुकमधील टाईम-टेबल एकदा बघीतलं आणि मग म्हणाली.. “काही विशेष नाही, दुसरं लेक्चर दीड तासाने आहे, मला नाही वाटतं इतक्या वेळ कोणी थांबेल ते अ‍ॅटेंन्ड करायला…”

“तुझा काय प्लॅन??”, नेहा
“अम्म.. माझा तर एखादा मस्त रोमॅन्टीक, हॉट, सिडक्टीव्ह मुव्ही बघायचा प्लॅन आहे. तो नविन आलाय ना एक.. खुप लिप-लॉक सिन्स आहेत म्हणे त्यात.. ऑफकोर्स माझी गर्लफ़्रेंड माझ्याबरोबर येणार असेल तर…”

नेहाने तिचे एक जाडजुड बुक माझ्या खांद्यांवर मारलं आणि हसत हसत म्हणाली.. “मुव्ही इज फ़ाईन, पण बाईक मी चालवणार, तु मागे बसायचंस.. कबुल?”

“अ‍ॅट युअर सर्व्हीस मॅम..” असं म्हणुन मी नेहाचा हात पकडला आणि आम्ही कॉलेज कॅंपस मधुन बाहेर पडलो.

 

[क्रमशः]

प्यार मे.. कधी कधी (भाग-१)


“वेडी आहेस का तु?”, मी जवळ जवळ नेहावर ओरडतच म्हणालो.. “काय लावलं आहेस सकाळपासुन चल ना.. चल ना? जाऊ का मी घरी?”
“प्लिज जानू.. चल ना रेssss”, नेहा लाडीक हेल काढत म्हणाली.

“नाssssssही.. मी येणार नाही.. आणि प्लिज ते जानू जानू बंद कर.. एक तर ते कसलं फिल्मी आहे.. आणि त्यात मला ती सारखी ‘होणार सुन मी..’ मधली जान्हवी आठवते.. सो बोअरिंग..”

“एsss जान्हवीला काही बोलायचं नाही हं..”, नेहा गाल फुगवुन म्हणाली.
“बरं बरं.. सॉरी..”

खरं तर ना, मला नेहाने जानू म्हणलेलं खुप आवडायचं.. ती ज्या पध्दतीने लाडाने म्हणायची ना, मस्त वाटायचं ऐकायला. पण म्हणुनचं मुद्दाम मी आवडत नाही असं दाखवायचो.. आणि मी चिडतो… म्हणुन नेहा अजुन मुद्दाम मला जानू म्हणायची.

खरंच ह्या मुलींना उल्लु बनवायला कित्ती सोप्प असतं नाही??

“चलो.. माफ किया.. पण तुला माझ्या कॉलेजला यावंच लागेल.. अरे मी सांगीतलं आहे तु येशील म्हणुन.. आता तु आला नाहीस तर पोपट होईल माझा…”, नेहा

“अरे.. पण मीच का? तुम्हाला दुसरं कोणी मिळालं नाही का? असलं कसलं थिसीस तुमचं..”

नेहा आर्ट्सच्या सेकंड इयरला होती आणि सायकॉलॉजीमध्ये तिचं स्पेशलायझेशन होतं. त्याचाच एक भाग म्हणुन कसला तरी एक प्रयोग त्यांना करायचा होता जरनलमध्ये लिहायला. ह्या प्रयोगाअंतर्गत ते एखाद्या व्यक्तीला असे विवीध प्रश्न विचारणार, काही चित्र-विचीत्र आकृत्या दाखवणार आणि एकुण संवाद-परिसंवाद करुन त्या व्यक्तीची मानसिक अवस्था अभ्यासणार.. असा काहीसा तो प्रकार होता.

नेहाचं कॉलेज हे खरं तर फक्त मुलींच कॉलेज होतं आणि एकुणच शहराचं एक ‘प्रेक्षणीयं स्थळ’. नेहमी ह्या कॉलेजच्या अवती-भोवती अनेक मजनुंची गर्दी असायची. आणि कॉलेजमध्ये अर्थातच मुलांना प्रवेश निषध्द असल्याने आतमध्ये काय असेल ह्याचे एक कुतुहल सगळ्यांनाच असायचे. इतर वेळी.. माझ्याबरोबर अजुन कोणी असतं ना, तर ही संधी मी सोडलीच नसती. पण आत्ता त्या कॉलेजमध्ये मी एकुलता एक मुलगा आणि तो सुध्दा अनेकींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतानाचा विचार मला सहनच होत नव्हता.

“ते काहीही असो.. तु येणार म्हणजे येणार.. नाही तर आपलं ब्रेक-अप झालं असं समज आणि उद्यापासुन मला भेटु नकोस”, नेहा

नेहा ने एकदम इमोशनल ब्लॅकमेलच चालु केलं होतं. खरं तर, माझ्याकडे तसाही वेळ होता. मागच्या आठवड्यात डेडलाईन्स पाळण्याच्या प्रयत्नात आम्ही ऑफीसमध्ये दोन-तीन विकेंड्सना काम केलं होतं.. त्याची सुट्टी घेता येणार होती. आणि दुसरं म्हणजे.. तुम्हाला गर्लफ्रेंड असेल तर तुमच्याकडे फारसे पर्याय उरत नाहीत.. शेवटी ‘ती’ काय म्हणते ते ऐकावंच लागतं ना..

“बरं यार.. तु चिडु नको..येईन मी..”, सपशेल शरणागती पत्करत, शेवटी नाईलाजाने का होईना.. मी तयार झालो.
“ये हुई ना बात…”, पाठीला मिठी मारत नेहा म्हणाली.. “चल.. त्याबद्दल मी तुला ट्रीट देते..”

“हॅ.. मला नको तुझी फुस्की ट्रीट.. सारखं आपलं ते पेस्ट्री नाही तर दाबेली.. नाही तर गेला बाजार वडापाव..”, मी वैतागुन म्हणालो.
“बरं चल.. तु सांगशील ती ट्रीट.. बोल काय हवंय तुला?”, भुवया उंचावुन कमरेवर हात ठेवुन मान हलवत नेहा म्हणाली.

मला फ़ार मजा वाटायची नेहा असं बोलायची तेंव्हा.. तीचे पोनी बांधलेले केस असे एका बाजुने दुसर्‍या बाजुला हलताना पाहून मला उगाचच घोड्याच्या शेपटीची आठवण व्हायची.

“मला काय हवंय ते तुला चांगलच माहीती आहे..”, हिंदी खलनायक रणजीतच्या स्टाईलमध्ये ओठांवरुन अंगठा फिरवत मी म्हणालो..
“ए.. काय रे.. तुम्हाला दुसरं काही सुचत नाही का? ऑल बॉईज आर द सेम..”, नेहा म्हणाली..
“ऑल बॉईज?? म्हणजे? अजुन पण कुणी तुला….”
“गप्प बस… मी माझं असं नाही म्हणते.. ती रुचा आहे ना क्लासमधली.. ती सांगत असते.. तिचा आहे ना ‘तो’.. तो पण सारखं असंच करत असतो..”.. बाईकवर बसत नेहा म्हणाली..

पुढचा अर्धा तास नेहा तिच्या मैत्रिणी आणि त्यांच्या अफ़ेअर्सबद्दल बोलत होती ज्याबद्दल मला काडीचाही इंटरेस्ट नव्हता..पण करणार काय??? प्यार किया तो निभाना पडेगा..

खरं तर ना.. नेहाला तिच्या थिसीससाठी दुसरं कुणीही मिळालं असतं.. तिच्या मैत्रिणी काय कमी आहेत का? पण तिनी उगाचच मला पकडलं होतं.. मला खात्री आहे तिला नक्की शो-ऑफ करायचा असणार. ह्या मुलींना काय आपला बॉयफ्रेंड इतरांना ‘दाखवायला’ आवडतो कुणास ठाऊक. माझ्या माहीतीत मी माझ्या एकाही मित्राला नेहाला असं मुद्दामहुन भेटवलं नव्हतं. किंवा असं मित्रांमध्ये सुध्दा आम्ही बोलताना ‘माझी गर्लफ्रेंड अशी’ असल्या पाचकंळ विषयांवर गप्पा मारलेल्या नव्हत्या. असो.. आता मागे फिरायला दुसरा मार्गच नव्हता.. जाणं भाग होतं.

 

त्या रात्री सुखद अशी झोप लागलीच नाही. रात्री उगाचच मी एखाद्या सुनसान गावातुन फिरतो आहे आणि अचानक कुठुनतरी काहीतरी अंगावर येत आहे किंवा तत्सम स्वप्न पडुन जाग येत राहीली. आणि मग जरा कुठे झोप लागत होती तोच नेहाचा व्हॉट्स-अ‍ॅप वर मी उठलो आहे की नाही हे पहायला मेसेज येऊन गेला.

मग चरफडतच उठलो आणि आवरुन कॉलेजपाशी नेहाची वाट पहात थांबलो होतो. मनात कुठेतरी वाटत होतं आज नेमकं लेक्चर कॅन्सल झालेलं असावं.. नेहाला बरं वाटत नसावं आणि ती येऊ नये कॉलेजला. पण कसलं काय.. ठरल्या वेळी मॅडम हजर झाल्या.

“ए.. वॉव.. मस्त हॅन्ड्सम दिसतो आहेस..”, नेहाने आल्या आल्या ग्रीट केलं.

अर्थात मला ते माहीती होतं.. व्हाईट डेनिम शर्ट आणि ब्ल्यु स्किन-फ़िट जीन्स माझा ऑलटाईम फ़ेव्हरेट ड्रेस कॉम्बो होता. फ़ास्ट्रॅकचा गॉगल आणि माझे क्रोकोडाईल शुज.. मलाच इतकं कंम्फर्टेबल वाटायचं कि ते नेहमी माझ्या चेहर्‍यावर दिसुन यायचंच..पण तरीही नेहाच्या कॉंम्प्लिमेंटमुळे थोडं बरं वाटलंच. शेवटी गर्ल्स कॉलेजमध्ये चाललो होतो.. बेस्ट दिसायलाच हवं होतं.

“थॅंक्यु मॅम..”, मुजरा स्टाईलमध्ये गुडघ्यात वाकुन सलाम करत मी म्हणालो.
“जाऊ या आत?”, नेहाने गेट कडे बोट दाखवत विचारलं
“बाय ऑल मिन्स..”, चेहर्‍यावर उसनं हास्य आणत मी म्हणालो..

मी एक दीर्घ श्वास घेतला आणि नेहा बरोबर पुढे निघालो. आम्ही बोलत बोलत पुढे चाललो होतो आणि माझ्या लक्षात आलं की कॉलेजच्या गेटची ती बॉर्डरलाईन पार करुन मी आत शिरलो आहे. थंड वार्‍याची एक झुळुक शरीरावर रोमांच फुलवुन गेली. मी उगाचच सतर्क झालो. नेहाची काही तरी बकबक चालु होती.. पण खरं तर माझं तिच्याकडे लक्षच नव्हतं. मी आजुबाजुला पहात होतो.

कॉलेज कॅम्पस मस्तच होतं. बांधकाम तसं जुनं होतं. साधारण १९३५ सालचं वगैरे.. पण दगडी आणि आकर्षक होतं. इतर् कॉलेजेस सारख्या भिंती प्रेमिकांच्या नावाने रंगवलेल्या नव्हत्या.. इतरत्र गुटखा.. तंबाखुच्या पुड्या, सिगारेट्सची थोटकं नव्हती. सर्वत्र डेरेदार वृक्ष, फुलांनी लगडलेली झाडं आणि बर्‍यापैकी शांतता होती…

शांतता रम्य असली तरीही मनावरचे एक अनामीक दडपण वाढत चालले होते.

एका झाडाखालच्या पारावर ५-६ मुलींचा घोळका उभा होता. नेमकी माझी आणि त्यांची नजरानजर झाली. मी पटकन दचकुन नजर दुसरीकडे वळवली. नजर दुसरीकडे वळवली खरी, पण त्याचबरोबर मनात भितीची अजुन एक लाट येऊन गेली. काही क्षणातच ‘ही’ बातमी सर्वत्र पसरली जाणार होती. मुलींच्या कॉलेजमध्ये ‘लांडोरा’ मुलगा आला होता.

मी एकदा मागे वळुन पाहीलं, गेट अजुनही तसं फारसं दुर नव्हतं. पळत सुटलो असतो तर २-३ मिनीटांमध्ये बाहेर पडलो असतो. वाटलं.. जावं असंच पळुन, ब्रेक-अप तर ब्रेक अप..

“ही आमची इकॉनॉमीक्सची लॅब.. ही अक्टीव्हीटी रुम.. इकडे बायोलॉजी…”, नेहा त्यांच कॉलेज मला दाखवत होती.

मी इकडे तिकडे बघणं सोडुन दिलं आणि नेहाच्या बोलण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करु लागलो.

काही अंतरावर पुढे एका नेव्ही-ब्ल्यू रंगाचा मिडी घातलेली एक मुलगी पुस्तक वाचत बसली होती. तिचे कुरळे केस खांद्यावर विसावले होते. फिक्कट तपकीरी रंगाच लिप्स्टीक तिचे पाकळीसारखे ओठ आकर्षक बनवत होते. अचानक तिने पुस्तकातुन डोकं काढुन वर बघीतलं.

माझी आणि तीची नजरानजर झाली. तिच्या डोळ्यांमध्ये एक विलक्षण ओढं होती, इच्छा असो किंवा नसो, मी तिच्यावरुन नजर हटवु शकलो नाही. मग तिने नेहाकडे बघीतलं आणि हात हलवला आणि परत माझ्याकडे एकदा कटाक्ष टाकुन तिने पुस्तकात आपलं डोकं खुपसलं.

“बीच..”, नेहा स्वतःशीच पुटपुटली.

 

आम्ही आता कॉलेजच्या अंतरंगात प्रवेशते झालो होतो. एव्हाना आजुबाजुला वर्दळ बर्‍यापैकी वाढली होती. प्रत्येकजण आडुन आडुन आमच्याकडेच बघत होते आणि कदाचीत काहीतरी एकमेकांना सांगत होते.

“काय सांगत असतील? काय बोलत असतील एकमेकींशी?.. कसायाच्या दुकानात आणल्या जात असलेल्या बोकडाला काही भावना असतात का? असल्याच तर तो काय विचार करत असेल?”, निरर्थक विचार माझ्या डोक्यात पिंगा घालत होते.

नेहाला मात्र ह्या सगळ्या गोष्टींची मजा वाटत होती. शी वॉज एन्जॉयींग द अ‍ॅटेंन्शन शी वॉज गेटींग…

मी पुढे पुढे जात होतो आणि अचानक माझी पावलं अडखळली. समोरुन आमच्या दिशेने दोन पोक्त बायका येताना दिसल्या. दोघींच्याही नजरा आमच्यावर.. किंबहुना माझ्यावरच रोखल्या होत्या.

दोघी आमच्या इथेच येऊन थांबल्या.

कपाळावर मोठ्ठ कुंकु लावलेल्या बाईने नेहाकडे ‘आय-कार्डची’ मागणी केली. नेहाने आय-कार्ड काढुन दिलं खरं. पण दोघींनाही त्यामध्ये फारसा उत्साह नव्हता. म्हणजे बघा ना, सिग्नल तोडुन पुढे गेलेल्या वाहनचालकाचं मामा जसं लायसन्स मागतो आणि परत करतो.. त्याला त्या लायसन्स मध्ये काडीचाही इंटरेस्ट नसतो.

“नेहा.. ” बिन कुंकूवाली मॅडम म्हणाली.. “धिस इज गर्ल्स कॉलेज..”
“आय नो मॅम.. माझ्याकडे परमीशन आहे.. अ‍ॅक्चुअली, आमचं आज सायकॉलॉजीचं थेसीस आहे.. त्यासाठी ऑब्जेक्ट हवं होतं..”

ओह.. सो मी एक ऑब्जेक्ट आहे तर.. गर्रर्र…

“विच टीचर?”, कुकुवाली बाईने विचारले..
“मॅम.. देसाई मॅमचा क्लास..”, नेहाने धिटाईने उत्तर दिले..
“तुमची सायकॉलॉजी लॅब तर मागे गेली.. इकडे कुठे चालला आहात?”, बिन कुकुवाली टीचर
“मॅम आज पुर्ण क्लासचेच प्रॅक्टीकल आहे, सो आज क्लासमध्येच…”, नेहा

“ऑलराईट यु मे गो..”…

“लायसन्स.. चेक.. पि.यु.सी.. चेक.. इंन्शोरंन्स पेपर्स.. चेक.. हवा, ऑइल, इंडीकेटर्स चेक…ऑलराईट.. यु मे गो…”

हुश्श.. त्या दोन मॅम गेल्यावर एकदम हायसं वाटलं.. नेहा वॉज कुल…ह्याचा बदला घ्यायचा झालाच तर नेहाला पुढच्या ऑफीसच्या आर्कीटेक्चर डिस्कशन मिटींगला न्हेउन ’क्यु अ‍ॅन्ड ए’ सेशनला अगदी पुढच्या सिटवर बसवायचं पक्क करुन मी पुढचा मार्ग चालु लागलो.

थोड्याच वेळात आम्ही नेहाच्या क्लासमध्ये जाऊन पोहोचलो. क्लास बर्‍यापैकी पॅक होता. सगळ्यांच चपडचपड चालु होतं. मला वाटलं मला पहाताच एकदम सन्नाटा पसरेल.. पण सुदैवाने तसं काहीच झालं नाही. माझ्या तिथे जाण्याची कुणीच दखल घेतली नाही. कदाचीत अश्या ‘ऑब्जेक्ट्सची’ ह्या क्लासला सवय असावी. यापुर्वी ‘उंदीर’, ‘बेडुक’, ‘ससा’, ‘घुबड’ वगैरेंवर प्रॅक्टीकल्स करुन झाल्यावर माणसामध्ये त्यांना फारसं नावीन्य उरलं नसावं असा विचार करुन मी नेहाने दाखवलेल्या ‘कोपर्‍यातल्या’ खुर्चीवर जाऊन बसलो.

पाचच मिनीटांमध्ये पहीली बेल झाली आणि ‘युवर ऑनर’ देसाई मॅडम वर्गात हजर झाल्या.

मॅडमना आत येताना पहाताच मी जागचा उठुन उभा राहीलो आणि वर्गात एकच खसखस पिकली. बहुदा मॅडम आल्यावर उठुन उभा रहाण्याचा कस्टम तेथे नसावा.. अर्थात मला त्याची कल्पना नसल्याने मी मुर्खासारखा एकटाच उठुन उभा राहीलो होतो.

मी हळुच एक चोरटा कटाक्ष नेहाकडे टाकला..”यु आर सो ओल्ड फॅशन्ड” किंवा तत्सम काहीतरी शब्दरचना दर्शवणारी ओठांची हालचाल करत तिने बॅगेतुन पुस्तक बाहेर काढली.

माझं उरलं-सुरलं अवसानही गळुन पडलं होतं. मानेपासुन पाठीच्या मणक्यापर्यंत घामाचा एक थेंब आरामात रेंगाळत फिरत गेला. घश्याला कोरड पडली होती. मी गप्पकन खाली बसलो.

 

[क्रमशः]