Monthly Archives: July 2014

प्यार मे.. कधी कधी (भाग-१०)


भाग ९ पासून पुढे >>

सकाळपासून शंभरवेळा मोबाईल चेक करून झाला, पण प्रितीचा काहीच मेसेज नव्हता. ‘लास्ट सीन ऑनलाइन’ पण बंद करून ठेवले होते. मी काही कोणी मनकवडा नव्हतो, पण समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला अदृश्य अश्या वेव्हज मिळत असतातच ना. गाडीवर प्रितीने ‘फिर मोहोब्बत’ च ऐकवलेले गाणे?घरी जाताना ‘मला दुसरी नेहा व्हायचं नाही’ अस प्रीती म्हणाली होती, त्याचा अर्थ काय असू शकत होता? आणि नेहाच्या घरी समशेर म्हणाला होता ते? अनेक वेडे वाकडे तुकडे एकत्र जोडून मी त्याच चित्र बनवू पाहत होतो. पण त्यावरून स्पष्ट अर्थबोध होत नव्हता. कदाचित, हे सगळे माझ्या मनाचेच खेळ होते.

प्रिती प्लीज.. प्लीज ऑनलाईन ये…

मी अगदी मनापासून याचना करत होतो, जणू काही माझ्या मनाचा आवाज तिला ऐकू जाणार होता.

‘अगर तुम किसी चीज को दिलसे चाहो, तो पुरी कायनात..’ वगैरे सारखे फिल्मी डायलॉग डोक्यात पिंगा घालत होते.

“तरुण, प्लिज कम टू माय केबिन..”, मुरली, माझ्या मॅनेजरचा मेसेज स्क्रिनवर झळकला.

बहुतेक अजुन कुठलातरी कस्टमर इश्यु असणार आणि बहुदा नेमका माझ्याच कोडमधला असणार असले आत्मघातकी विचार घेऊनच मी त्याच्या केबीनमध्ये गेलो.

“हे मुरली…”, चेहर्‍यावर उसनी हास्य आणत मी म्हणालो..
“हाय तरुण.. प्लिज कम.. प्लिज कम…”, हसतच मुरली म्हणाला..

मॅनेजर हसतोय म्हणजे निदान कस्टमरसंबंधी तरी नक्कीच काही नसावं असा एक सुखद विचार आला पण तो क्षणभरच, कारण मॅनेजरचे हासणे हे सुखद कमी आणि त्रासदायकच अधीक असते ह्याचा वारंवार प्रत्येक आय.टी. मधील प्रत्येकाने एकदा तरी घेतला असणारच

“टेल मी मुरली..”
“तरुण.. आपण ते कॅम्पस इंटर्व्ह्यु केले होते ना.. ७-८ जण सिलेक्ट केले होते..”
“हम्म..”
“अ‍ॅक्च्युअली, आपण डिसेंबर मध्ये त्यांच जॉईनिंग प्लॅन केले होते, पण तो प्रोजेक्ट साईन-झालाय आणि लगेच काम सुरु करायचं आहे.. डेट्स प्रि-पोन झाल्यात..”

“ओह.. गुड फॉर अस, आपल्याकडे पण थोडी बेंच स्ट्रेंथ आहे… निदान बिलींग चालू होईल..”
“येस, यु आर राईट.. सो त्यांना ऑन-बोर्ड करायचं आहे, तुला बॅंगलोरला जावं लागेल.. तुला आर्कीटेक्चर चांगलं माहीती आहे.. आणि शिवाय टेक्नीकल नॉलेजपण..”

“मी जाऊ? पण आपण नेहमी ट्रेनीजना बोलावतो ना इकडे?”
“हो.. बट यु नो, वुई आर लो ऑन बजेट.. ट्रॅव्हलींग फ्रिज केलय सगळं, लकीली तुझं अप्रुव्हल मिळालं..”
“पण मुरली.. आय एम ऑलरेडी लोडेड..”
“डोन्ट वरी.. आय विल आस्क विनीत टु टेक केअर ऑफ़ इट..”
“किती दिवस जायचं आहे…?”
“जस्ट ३ डेज.. त्यांना थोडं ब्रिफ कर, थोडे पॉईंटर्स दे, सो दॅट दे कॅन गेट स्टार्टेड, बाकी आपण कॉन्फ कॉलने मॅनेज करु..”

“कधी जायचं आहे..”
“उद्या सकाळी, मी लिनाला फ्लाईट बुक करायला सांगीतली आहे आणि तिकडची अ‍ॅडमीन तुझं हॉटेल बुकींग संध्याकाळपर्यंत मेल करेल..”

हो किंवा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता, आणि दुसरा कुठलाच ऑप्शनही माझ्याकडे नव्हता.

डेस्क वर आल्यावर परत मी व्हॉट्स-अ‍ॅप चेक केलं..कदाचीत १३५व्यांदा वगैरे.. सगळे ग्रुप मी म्युट करुन टाकले होते. मला आत्ता कुणाचेच मेसेज नको होते फक्त एकीचा सोडला तर.. पण तो ही नव्हता.. 😦

प्रितीला सांगावं का बॅंगलोरबद्दल?, एक विचार आला.. पण का? कश्याला? कोण आहे ती माझी आणि मी तिचा? सकाळपासुन एकपण मेसेज नाही. उगाच तिला नको असेल तर आपण कश्याला तिच्यावर लादायचं?

पॅकींगचं कारण सांगुन ऑफीसमधुन लवकरच घरी परतलो..

 

सकाळी ७.३५ ची फ्लाईट होती. ६.३० ला लगेज चेक-इन करुन लाऊंज मध्ये जाऊन बसलो. बोर्डींगला अजुन ४० मिनीटं तरी होती. प्रितीचा काहीच मेसेज नव्हता. मला कसही करुन तिला सांगावंस वाटत होतं मी बॅंगलोरला चाललो आहे, पण नको तितका ईगो आड येत होता. शेवटी एक आयडीया केली.

फेसबुकला चेक-इन अ‍ॅट डोमॅस्टीक एअर-पोर्ट करुन टाकले.

घड्याळाचे काटे मंद गतीने फिरत होते. सकाळची गर्दी बहुदा कॉर्पोरेट्स वाल्यांचीच होती. जो-तो आपला लॅपटॉप नाहीतर स्मार्टफोनवर काही तरी करण्यात मग्न होता. प्रचंड कंटाळवाण्या क्षणांनंतर शेवटी बोर्डींग सुरु झाले. मुंगीच्या गतीने रांगेतुन पुढे सरकुन शेवटी काऊंटरला पोहोचलो..

“गुड मॉर्नींग सर..”, काऊंटरच्या पलीकडची कन्यका म्हणाली..
“गुड मॉर्नींग..”
“सर.. विंडो सिट?”
“नो !”
“नो?”
“आय मिन डझंट मॅटर..”

तिने खांदे उडवुन बोर्डींग पास हातात कोंबला आणि पुढच्या ‘गुड मॉर्नींग’च्या तयारीला लागली..

फ़्लाईट जॅम पॅक होती. फ्लाईट-अ‍ॅटेंन्डंट्स नेहमीच्या प्रि-फ़्लाईट सेफ्टी इंस्ट्रक्शनच्या व्हिज्युअल्स आणि डेमोसाठी तयार होत होत्या..

मी जागेवर जाऊन बसलो.

पाच-एक मिनीटांमध्ये नेहमीचेच बोअरींग डेमो सुरु झाले. लोकेशन्स ऑफ़ सेफ्टी एक्झीट्स, युज ऑफ़ सिट-बेल्ट्स, ऑक्सिजन मास्क, लोकेशन अ‍ॅन्ड युज ऑफ़ लाईफ़-व्हेस्ट्स अ‍ॅन्ड लाइफ़ राफ्ट्स..

इतक्यात माझा मोबाईलफोन किणकिणला..

प्रितीचा फोन.... मी जवळ जवळ जागेवरुन उडालोच..

“हाय…”
“तरुण? हे काय? डोमेस्टीक एअरपोर्ट?”
“अंम्म.. अ‍ॅक्च्युअली बॅंगलोरला चाललो आहे..”
“कश्याला?”
“ऑफीसचे काम!”
“ओह.. किती दिवस..?”
“तिन..”

“तिन दिवस???” प्रिती जवळ जवळ ओरडतच म्हणाली
“हो.. का?”
“नाही.. म्हणजे तु काही बोलला नाहीस..”

सगळा निरर्थक संताप जागा झाला होता. कुणाला सांगू? निर्जीव व्हॉट्स-अ‍ॅपला? का सांगू? कोण तु माझी? आणि मी तरी कोण? पण भावनांना आवर घातला..

“हो म्हणजे.. अचानकच ठरलं काल..”

“सर.. प्लिज स्विच ऑफ युअर मोबाईल फोन..”, एक फ्लाईट-अ‍ॅटेंडंटने जवळ येउन सुचना केली. एव्हाना डेमो संपले होते आणि “आय एम युअर कॅप्टन सो अ‍ॅन्ड सो स्पिकींग..” सुरु होते.. बाहेरचे वातावरण, तापमान, किती वाजले, किती वाजता पोहोचणार वगैरे वगैरे..

“सॉरी.. त्या दिवशी मी अशी अचानकच निघुन गेले..”, प्रिती बोलत होती..
“सर.. प्लिज स्विच ऑफ़..” दुसरी बया टपकली.. फ्लाईट टेक-ऑफ़ साठी साईडची धावपट्टी ओलांडुन मुख्य धावपट्टीवर येत होती..

शिट्ट.. प्रितीला आत्ताच फोन करायचा होता का..?? आणि हे पण अगदी वेळेवर टेक-ऑफ..

“तरुण? काय झालं? काही बोलत का नाहीस..”
“अगं.. फ्लाईट टेक-ऑफ़ होतेय, फोन बंद करावा लागेल…”
“ओह.. ठिक आहे, मग दुपारी बोलु?”
“दुपारी? अगं १० मिनीटात होईल फोन चालु परत..”

“अरे… मी आत्ता घराच्या बाहेर येउन बोलतेय.. घरी कुठे बोलु? आई विचारेल ना, सकाळी सकाळी कुणाशी बोलतेय.. आणि तुझी अजुन ओळख नाही कुणाशी..कोण तरुण? काय करतो वगैरे प्रश्न चालु होतील..”
“ओह…”

“सर.. मे आय रिक्वेस्ट यु.. टु प्लिज..”
“आय एम स्विचींग माय फोन.. जस्ट अ मिनीट…” जवळ जवळ ओरडतच मी म्हणालो..

एक विचीत्र कटाक्ष टाकुन ती हवाई-सुंदरी निघुन गेली

“तरुण.. व्हॉट्स-अ‍ॅप चालु असेल का? त्यावर बोलु शकेन मी..”
“कुल.. बेस्ट आयडीया.. चालेल.. फोन ऑन केला की करतो पिंग.. चल बाय.. करतो फोन बंद…”

असला संताप आला होता त्या फ्लाईट-अ‍ॅटेंडंण्ट्सचा, पण अर्थात त्यांचाही नाईलाजच होता.

डोक्यावरच्या पट्टीवर सिट-बेल्ट्सची खूण चमकली आणि क्षणार्धात विमानाने वेग पकडला.

 

१०-१५ मिनीटं बैचैन करणारी होती.

“थॅक्यु फॉर युअर पेशन्स, यु कॅन नाऊ युज युअर फोन्स, लॅपटॉप्स….”

पुढचं ऐकायची गरजच नव्हती. पट्कन मोबाईल-डाटा ऑन केला.
कनेक्टींगचे चक्र बराच वेळ गरगरं फिरत होते आणि शेवटी नेट कनेक्ट झाले..

“हाय..”, पट्कन प्रितीला मेसेज केला..
धडधड वाढवणारी अख्खी दोन मिनीटं गेल्यावर प्रितीचा रिप्लाय आला.. “हाय..”

“हम्म बोल, काय म्हणत होतीस..?”
“बॅंगलोर काय विशेष?”
“नथींग यार, थोडं फ्रेशर्सना ब्रिफींग आहे, तिन दिवस”
“मस्त ना, तेव्हढाच रिफ़्रेशींग चेंज तुला…”

“प्रत्येक चेंज रिफ़्रेशींग असतो का?”
” 🙂 ”
“बाय द वे, काल दिवसभर कुठे होतीस? ऑनलाईन पण दिसली नाहीस आणि ‘लास्ट-सिन’ पण ऑफ़.. कुणाशी बोलायचं नव्हतं का?”
” 🙂 बोलायचं नव्हतं नाही, बोलायचं होतं.. खूप सारं.. स्वतःशीच..”
“कश्यासंबंधी?”
“सोड ना, तु सांग? हाऊ इज द साईट आऊटसाईड द विंडो?”
“मस्त.. जस्ट सनराईज होतोय.. थांब तुला फोटो पाठवतो..”

मी पटकन तडमडत कॅमेरा ऑन केला.. विंडो सिट नसल्याने शेजारील सभ्य गृहस्थ्याच्या प्रायव्हसीला फाटा देऊन मोबाईल खिडकीच्या काचेजवळ धरुन फोटो काढला. तो माणुस वैतागुन माझ्याकडे बघत होता. तेथे काऊंटरला शहाणपणा करुन विंडो सिट घेतली नाही आणि आता दुसर्‍याना त्रास देऊन फोटो काढत होतो म्हणुन..

फोटो अ‍ॅटॅच करणार त्या आधीच प्रितीचा मेसेज आला..
“फोटो नको पाठवु.. तु सांग ना.. तुला सनराईज कसा दिसतो ते?”
” 🙂 बरं, मला ना, बर्‍याचदा असं वाटतं की आपलं लाइफ़ जसं असतं ना, तसंच आपल्याला जग दिसतं.. म्हणजे बघ ना, मगाशी टेक-ऑफ करताना आकाशात सगळे पावसाळी काळे ढग दाटले होते.. खुप डिप्रेसिंग हवा होती, पण आता.. आता सगळीकडे स्वच्छ सुर्यप्रकाश आहे, काळे ढग तर मागे पडले, तो मस्त गोल्डन सुर्य बघीतला ना…”

“तर काय?”
“नेहाची एक फ्रेंड आहे, मी तिला पहील्यांदा भेटलो होतो ना, तेंव्हा तिने कानामध्ये एक मस्त डायमंड्च्या रिंग्स घातल्या होत्या. सुर्याच्या प्रकाशात इतक्या मस्त ग्लिटर व्हायच्या ना…मला त्याचीच आठवण झाली..”
” 🙂 ओह.. कोण फ्रेंड रे? मी ओळखते का तिला?”

मी अर्थात प्रितीबद्दलच बोलत होतो, तिचे ते स्पार्कलिंग इअर-रिंग्स मला अजुनही जश्याच्या तश्या आठवत होत्या आणि बहुदा प्रितीला नक्कीच कळलं होतं की मी तिच्याबद्दलच बोलतो आहे.

“अं, ओळखत असावीस, खुप क्युट आहे ती..”
मी क्षणभर थांबलो.. काय बोलुन गेलो मी हे..इतक्यात मी नको होतं का असं बोलायला? असं वाटून गेलं.

” 🙂 ओह.. मग तर मला भेटलंच पाहीजे.. काय नाव काय तिचं?”
“माहीत नाही गं, पण तिचं नाव, तिच्यासारखंच गोड असणार हे नक्की..”

“सापडेल.. कोण होती ती ते सापडेल.. नेहाला ना, जास्ती क्लोज फ्रेंड्स नव्हत्या.. सो.. सापडली की तिचं नाव सांगेन तुला नक्की.. पाहीजे तर ओळख पण करुन देईन.. ओक्के?”

मला हा इन-डायरेक्टली बोलण्याचा मस्त मार्ग सापडला होता.. मनातले सगळे विचार ह्यामार्गाने काढायचा चान्स मी सोडणार नव्हतो.

“प्लिज.. नक्की.. मला ना, तिच्याशी खूप बोलावसं वाटतं.. काय? कश्यावर? माहीत नाही… ”
” 🙂 ”
“काय प्रेमात वगैरे पडलास की काय तिच्या..?”
“प्रेम! किती विचीत्र भावना आहे नाही ह्या दोन शब्दात. कधी कधी वाटतं दोन-दोन वर्ष एकत्र राहुनही ज्याला प्रेम म्हणतात ते वाटलंच नाही, आणि दोन मिनीटांच्या भेटीत सुध्दा प्रेमाचा तो सुखद अनुभव मनाला स्पर्शुन जातो.. असं असतं का गं लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट?”
“मला नाही माहीत… पण तुला तरी असं का वाटतं आहे की तुला जे तिच्याबद्दल वाटतं आहे ते प्रेमच आहे? कश्यावरुन दोन वर्षांनी तुला अजुन दुसरी कोणी भेटेल आणि तु परत तिच्या प्रेमात पडशील?”

“ए प्लिज.. मी काय फ्लर्ट वाटलो का तुला?”
“नाही, तसं नाही पण.. नेहाच्या लग्नाला कसाबसा एक महीना झाला आणि आता तु म्हणतो आहेस…”
“प्रिती.. माझं नेहावर प्रेम नव्हतं..”
“काय? काय बोलतो आहेस तु तरूण? म्हणजे तु नेहाला काय फसवतं होतास का? दहा वेळा आय-लव्ह-यु म्हणायचात ना?”
“आय मीन.. प्रेम होतं पण तसं नव्हतं..”
“तसं? प्रेमाचे पण असे प्रकार असतात का तरुण? यु आर टू मच..”
“अगं म्हणजे..मला असं कधी तिच्याशी लग्न करावं.. तिच्याबरोबर आपलं आयुष्य घालवावं वगैरे असं कधी वाटलंच नाही..”

“कदाचीत त्याला कारण म्हणजे तुम्ही पहील्यापासुनच ते मनात ठेवलं होतं..”
“अनिवेज.. इट्स कॉम्लिकेटेड.. आपंण दुसरं काही तरी बोलुयात का?”
“तरुण हे खुप महत्वाचं आहे.. ”
“आय नो प्रिती.. बट धिस इज नॉट द टाईम.. नॉट ऑन चॅट.. मे बी प्रत्यक्ष भेटलो तर…”
“हम्म..”

काही क्षण शांततेत गेले..

“काय झालं? परत स्वतःशी संवाद वगैरे चालु केलास का?”, ती शांतता मला सहन होईना..
“तो तर चालुच आहे तरुण.. घनगंभीर युध्द चालु आहे.. बर, ते सोड, कधी पोहोचशील?”
“अजुन २० मिनीटं.. डायरेक्ट ऑफीसलाच जाणार आहे आधी…”
“ओह.. चल मी जाते आवरायला, कॉलेज आहे…”
“ऑलराइट, जमलं तर दुपारी भेटू, नाही तर रात्री वेळ असेल तर..”
“शुअर.. मी राहीन ऑनलाईन.., पण फोनवर बोलता येणार नाही रात्री, आय होप यु अंडरस्टॅन्ड..”
“नो प्रॉब्लेम..”

“तरुण.. टेक केअर…”
“आय विल प्रिती.. अ‍ॅन्ड यु टु.. जास्ती विचार नको करुस.. 🙂 ”
” 🙂 बाय तरुण ..”
“बाय………”

फ्लाईटचा तो दीड तास कधी गेला कळलंच नाही. सगळं काही बदलुन गेल्यासारखं वाटत होतं. प्रिती वॉज अगेन जस्ट अ मेसेज अवे…
एक प्रकारचा आत्मविश्वास मिळाला आणि बॅंगलोरच्या धावपट्टीवर उतरणार्‍या विमानात स्वतःशीच पुटपुटलो.. “गुड मॉर्नींग बॅंगलुरु…”

 

[क्रमशः]

मंडळी, माफ करा, पोस्ट टाकायला थोडा उशीरच झाला, पण खरंचंच खुप्पच बिझी होतो. तुमच्या प्रतिक्रिया खरंच खुप आनंददायी आणि प्रेरणादायी असतात. मज्जा येते वाचायला. किप-कमेंटींग.
आजची पोस्ट एका-दमात लिहुन काढली आहे.. परत वाचायला सुध्दा वेळ नाही, काही चुक-भुल झाली असल्यास सांभाळून घ्या.. 🙂

प्यार मे.. कधी कधी (भाग-९)


भाग ८ पासून पुढे >>

प्रितीने पाठवलेले फोटो मी आपले सहजच नजरेखालुन घातले. मला तसंही त्यात फारसा इंटरेस्ट नव्हता. माझं लक्ष वेधुन घेतलं ते प्रितीच्या व्हॉट्स-अ‍ॅपच्या डि.पी.ने. बहुतेक घरातच काढलेला सेल्फी होता. साधा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची स्लॅक, मान काहीशी तिरपी करुन एका हाताने केस कानांच्या मागे करतानाचा तो फोटो होता. त्या साध्या फोटोतही कसली क्युट दिसत होती.

मी खूप वेळ त्या फोटोकडेच बघत बसलो.

मी प्रितीचे स्टेटस चेक केले, ती अजुनही ‘ऑनलाईनच’ होती.

आय वॉन्टेड टु से समथींग..पण काय? काही शब्दच सुचत नव्हते.

पाच-एक मिनीटं शांततेत गेली.

“यु ऑलराईट?”, अचानक प्रितीचा मेसेज स्क्रिनवर झळकला..
“हम्म.. मी ठिक आहे..”
“अ‍ॅक्च्युअली.. मी पाठवणार होते तुला फोटो आधी, पण नंतर विचार केला.. की मे बी.. तु ऑलरेडी डिस्टर्ब असशील..उगाच तुला फोटो पाठवुन..”
“हम्म.. अनीवेज, आज नाही तर उद्या हे होणारच होतं, जस्ट दॅट आम्ही ते इग्नोअर करायचा प्रयत्न करत होतो इतकंच.. 😦 ” पाठोपाठ मी एक सॅड-फ़ेस इमोटीकॉन पाठवुन दिला.

“तु नेहाला भेटलास ना आज?”
“हो..”
“खरं सांग.. कशी वाटली?”
“मस्त..हॅप्पी..”

“मग.. तेच तर.. ती सेट हो्ते आहे तिच्या लाईफ़ मध्ये.. ईट इज टाइम फॉर यु टु मुव्ह ऑन..”
“हम्म..”
“सॉरी.. मी थोडं फिलॉसॉफीकल बोलतेय..”
“नो .. नो इट्स ओके.. ईट इज टाईम टु मुव्ह ऑन”

“काही वाटलं तिच्याबद्दल? आय मीन.. पहील्यासारखं?”
“हो.. थोडं.. 🙂 ”
“तरुण…”

मला तिचा असा डोळे मोठ्ठे करुन ओरडतानाचा चेहरा डोळ्यासमोर आला.

“आय मीन.. मी रोबोट तर नाही ना, एक बटण दाबलं की सगळा डेटा इरेझ…”
“तसं नाही रे.. पण भावनांना सांभाळणं तर आपल्या हातात असतं ना?”
“असतं.. मान्य आहे, पण सगळ्यांनाच नाही ना जमत..”

“आता मागे वळून बघतो तर पश्चाताप होतो, वाटते जे घडले ते घडायला नको होते, आम्ही आधीच एकमेकांपासून दूर झालो असतो तर आज हे दुःखाचे, विरहाचे क्षण नशिबी आलेच नसते”

“नाही तरुण तु चुकतो आहेस. नेव्हर रिग्रेट अनिथिंग, बिकॉज दैट टाईम इट वॉज एक्झाक्टली व्हॉट यु वॉटेड..”

“हो, आय मीन मला पश्चाताप ह्याचा होतो आहे की, ह्यातुन बाहेर पडता येत नाहीये, किंवा पडता येणं अवघड आहे हे माहीत असुनही आम्ही..”

“तुला एक गोष्ट सांगू तरुण? सायकॉलॉजीच्या लेक्चरला आम्हाला देसाई मॅडम सांगायच्या.. बेडकाची गोष्ट आहे एक..”
खरं तर मला ती गोष्ट माहीती होती, पण तरीही मी ’हो’ म्हणालो..

“म्हणजे, खरं का खोटं माहीत नाही, पण म्हणे जगात कुठेतरी एक प्रयोग केला होता. एका पाण्याच्या भांड्यात एका बेडकाला ठेवलं आणि ते भांड गरम करायला ठेवलं. जेवढं शक्य होईल तेव्हढं त्या बेडकानं म्हणे सहन केलं, पण जेंव्हा पाणी प्रचंड उकळायला लागलं, तेंव्हा त्या बेडकाने बाहेर पडायच्या प्रयत्नांना सुरुवात केली. परंतु पाणी इतकं उकळलं होतं की तो बेडूक मरून गेला..”

“…”

“कळतंय ना मी काय म्हणतेय… कुठल्याही गोष्टीची एक लिमीट असते ती पार व्हायच्या आधीच आपण..”
“हम्म.. कळतंय मला..”

“तुला सांगतो प्रिती, मला ना, खरं सांगतो जास्त मित्र पण नाहीत.. लेट नाईट दारू पार्टी करणं, ट्रेक्स करणं, क्लब्समध्ये तासं तास सिगारेटच्या धुराच्या वासात गप्पा मारत बसणं असले प्रकार जमतच नाहीत मला..”
” 🙂 ”

“त्यापेक्षा नेहाबरोबर केक-शॉपमध्ये जाऊन पेस्ट्री खाणं, रडारडीचे इमोशनल मुव्हीज बघणं, नेहाबरोबर शॉपिंग.. असल्या गोष्टी मी जास्त एन्जॉय केल्या..”

“आय नो.. यु आर व्हेरी सॉफ्ट हार्टेड पर्सन…”
“हाऊ डू यु नो?”
“विसरलास? सायको च्या क्लासला आला होतास ना आमच्या कॉलेजला.. वेल दॅट्स व्हॉट माय अ‍ॅनॅलीसिस वॉज अबाऊट यु..”
“ही..ही.. विसरलोच होतो.. अजुन सांग ना.. काय काय दिव्य शोध लावलात तुम्ही माझ्याबद्दल..”
“सांगीन नंतर.. 🙂 ”
” 👿 ”

“गुड.. नाऊ चिअर अप.. एक जोक पाठवू?”
“शुअर…”

पुढची १०-१५ मिनिटं ती मला काही फनी जोक्स पाठवत होती आणि अधुन मधुन मी ही माझ्याकडचे काही फॉरवर्डस तिला पाठवून दिले.

“ए चल.. आय एम लॉगींग आऊट, बोलू नंतर..”,प्रिती
“हम्म..”
“.. प्रिती.. एक गोष्ट सांगू?”
“हो बोलं नं :)”

“थैंक्स..”
“थैंक्स? कश्याबद्दल?”

“काही नाही, असंच…”
” 🙂 ”
” 🙂 ”

“बरं चल, जाते मी, बाय”
“बाय”

प्रिती गेल्यानंतर मी तेच मेसेजेस पुन्हा पुन्हा वाचत होतो.

 

फेसबुक म्हणा, व्हॉट्स-अ‍ॅप म्हणा.. किंवा इन-जनरल हा सोशल-मिडीया प्रकारच खूप स्ट्रेंज आहे. किती क्षणार्धात तो लोकांना एकमेकांच्या जवळ आणुन ठेवतो ह्याचं प्रत्यंतर मला वेळोवेळी येत होतं.

प्रिती आता माझ्यापासुन फक्त एका मेसेजच्या अंतरावर होती.

कधी ऑफीसच्या बोअरींग मिटींगच्या मध्येच घडलेला एखादा मजेशीर किस्सा मी लगेच तिला टेक्स्ट करायचो तर कधी ती ‘सिटी-लायब्ररी’मध्ये भेटलेल्या चित्र-विचीत्र व्यक्तींबद्दल मला मेसेज करायची. कधी अगदीच एखादा मिनीट आम्ही बोलायचो, तर कधी १०-१५ मिनीटं सुध्दा.

मुद्दा हा नव्हता की किती वेळ, किंवा कश्याविषयी बोलत होतो.. मुद्दा हा होता की आम्ही दररोज एकमेकांशी बोलत होतो.. आणि गंमत म्हणजे आमच्या बोलण्यात कधीही नेहाचा साधा उल्लेखही झाला नाही. आठवड्याभरात आम्ही.. किंवा निदान मी तरी नेहाला जवळ जवळ विसरुनच गेलो होतो.

“तुला माहीते तरुण..”, एके दिवशी प्रितीचा मेसेज होता.. “आपण हार्डली चार किंवा पाच वेळा भेटलो असु, कधी समोरासमोर आलो तर आपण धड बोलु पण शकणार नाही.. आय मीन निदान मी तरी.. पण इथे आपण काय वेड्यासारख्या गप्पा मारतो नै..”

तिचं म्हणणं खरचं होतं. इथे बोलायला कसलंच, कश्याचंच बंधन नव्हतं. अगदी जगाच्या इकॉनॉमीक्स पासून, ग्लोबल वॉर्मींग बद्दल आणि ह्युमन ट्रॅफीकींगपासुन मुव्हीजपर्यंत कश्यावरही अगदी कंफर्टेबली आमच्या गप्पा चालायच्या. तिच्याशी बोलताना जणु मला जगाचा विसरच पडलेला असायचा.

काय होतं नक्की हे? हे प्रेमच होतं ना? की अजुन काही? तिचा प्रत्येक मेसेज मला आवडायचा भले मग तो एक साधा स्माईली असो किंवा मग तत्वज्ञानाने भरलेला एखादा महाभयंकर विचार. तिचा कुठलाही रिप्लाय निदान दोनदा वाचल्याशिवाय मला चैनच पडत नव्हती.

 

एके दिवशी सकाळी सकाळी नेहाचा मेसेज आला..

“शनिवारी संध्याकाळी आमच्या घरी सत्यनारायणाची पुजा आहे. प्लिज तु नक्की ये. शनिवार आहे, सुट्टी आहे.. सो नो एस्क्युजेस. मी प्रितीला पण सांगते. इथे माझ्या ओळखीचं तसं कोणीच नाही. आई-बाबा येणार आहेत, पण ते सासु-सासर्‍यांबरोबर बिझी असणार. तुम्ही दोघं आलात तर मला खुप बरं वाटेल.. नक्की या, मी वाट पहातेय, अ‍ॅड्रेस मेल करते..”

न कळत कपाळावर आठ्या उमटल्या. नेहाच्या घरच्या कुत्र्याला सुध्दा ओळखत नाही, आणि तिच्या घरी कुठं सत्यनारायणाला जायचं? बरं सिटीमध्ये असतं तरी एकवेळ ठिक.. पण दीड तास प्रवास करुन नारायणगावला जायचं म्हणजे जरा वैतागच होता.

“ए.. काय करायचं?”, प्रितीचा थोड्या वेळात मेसेज आलाच..
“आय डोन्ट नो.. तु सांग…”
“डोन्ट नो काय? तुझी गर्ल-फ्रेंड ना ती? मग तु सांग ना.”
“जायला काही नाही पण.. नारायणगाव दीड-तास तरी दुर आहे..”
“हो ना.. थोड्यावेळ जायचं म्हणलं तरी ४ तास जाणार.. तु सांग..”
“खरं तर मला जाण्यात बिल्कुल उत्साह नाहीये.. त्यात तिथे कुणाला ओळखतं पण नाही, पण नेहाला कारण काय सांगायचं?”

“हम्म.. पण जायचं कसं. बस वगैरे आहे का?”
“बस कश्याला हवी, माझी गाडी आहे ना.. दीड तासाचा तर जर्नी आहे.. आय मीन इफ़ यु आर ओके विथ इट..”
“ओके, चालेल, पण मग थोडं लवकर जाऊन लवकर परत येऊ.. म्हणजे १२, १२.३० ला निघु इथुन आणि ६-७ पर्यंत परत येऊ, जमेल?”

मला प्रिती इतक्या लगेच हो म्हणेल असं वाटलंच नव्हतं… मी अर्थात ‘हो’ म्हणालो.

 

शनिवारची सकाळ उजाडेपर्यंत हजारवेळा नेहाला थॅंक्स म्हणालो होतो. गाडीची सर्व्हिसिंग करुन घेतली, टाकी फुल्ल केली, टायर्स दहा वेळा चेक केली आणि ठरल्या ठिकाणी प्रितीला पिक-अप करायला पोहोचलो.

ब्ल्यु कलरचा लॉग स्कर्ट आणि वर व्हाईट शेडचा स्लिव्हलेस टॉप प्रितीने घातला होता.. गळ्यात नेव्ही-ब्ल्यु रंगाची ओढणी, सिल्व्हर रंगाचे किंचीत हाय-हिल्स शुज आणि हातात सॅक घेऊन प्रिती माझी वाट बघत होती..

“हे काय?”, आम्ही दोघंही एकदमच म्हणालो..
“काय काय?”, मी
“तुझ्याकडे गाडी होती ना?”, प्रिती
“मग हे काय आहे?”, मी

“आय मीन.. आय थॉट.. गाडी म्हणजे.. कार आणणार आहेस तु..”, प्रिती
माझा क्षणार्धात मुड ऑफ झाला..

“पुण्यात गाडी म्हणजे हिच की.. टू व्हिलरच…”, मी आपली सफाई देण्याचा प्रयत्न केला
“अरे पण.. मी.. स्कर्ट घालून बाईकवर?”
“तेच मी विचारणार होतो.. तु स्कर्ट कसा घातला..आपण पुजेला चाललोय ना.. मला वाटलं तु साडी वगैरे..”

“ऑफकोर्स तेव्हढा सेन्स आहे मला.. मी बॅगेत घेतली आहे साडी.. तिकडे चेंज करेन.. पण मग आता..?”
“माझ्याकडे कार नाहीये..ही एकच गाडी आहे.. तु सांग.. म्हणशील तर कॅन्सल करु.. किंवा तु चेंज करुन ये..”

“नाही नको.. दोन्ही ऑपशन्स नको.. ठिके जाऊ आपण, मी एका साईडला बसते…”
“जमेल ना नक्की…”
“बघते.. जमवते.. आता तु एव्हढी गाडी आणलीच आहेस तर..”

बाईकवर चढुन बसताना नकळत प्रितीने माझ्या खांद्यावर क्षणभरासाठी का होईना हात ठेवला..

तो क्षण.. तो स्पर्श.. पुर्ण शरीरभर असंख्य रोमांच फुलवुन गेला.

 

पुण्याबाहेर पडलो आणि गार वार्‍याने थोडं बरं वाटलं. सुरुवातीच्या जुजबी गप्पा मारल्यावर खरं तर काय बोलायचं असा प्रश्न दोघांनाही पडला होता. व्हॉट्सअ‍ॅपवर बोलणं वेगळं आणि असं समोरासमोर बोलणं वेगळच होतं. १५-२० मिनीटं शांततेत गेली.

“तरुण.. आज एव्हढा शांत का? नेहमी तर किती बोलत असतोस..”, प्रिती म्हणाली
“नाही, विशेष असं काही नाही.”
“मग बोल की काही तरी..”
“प्रत्येक गोष्ट बोलुनच दाखवायला पाहीजे का?”
“म्हणजे?”
“म्हणजे काही नाही.. जाऊ देत..”

“श्शी बाबा.. बोअर करतोएस तु.. जाऊ दे मी गाणी ऐकते”, असं म्हणुन प्रितीने तिच्या सॅकमधुन हेडफोन्स काढले आणि मोबाईलवर गाणी ऐकु लागली.

मी एक-दोनदा बाईकच्या आरश्यातुन तिच्याकडे बघत होतो. पण मध्येच नजरानजर झाली आणि मग मी तो नाद सोडुन दिला.

“वॉव्व.. मस्त गाणं लागलंय, ऐक..”, असं म्हणुन प्रितीने हेडफोन्सची एक बाजु माझ्या कानाला लावली..

“दिल.. संभलजा जरा.. फिर मोहोब्बत करने चला है तु…”.. मर्डरमधलं गाणं लागलं होतं..

मी आरश्यात बघीतलं, का कुणास ठाऊक, प्रिती मला गालातल्या गालात हसते आहे असं वाटलं.. तो योगायोग होता? का प्रिती खरंच हसत होती ते तिला इतकं गोड स्माइल बहाल करणारा तो भगवानच जाणे.

 

नेहाचं घर शोधायला काहीच कष्ट पडले नाहीत. पाटील गावचे मोठे प्रस्थ होते, नेहा म्हणली होती त्याप्रमाणे सगळेच जण त्यांना ओळखत असावेत त्यामुळे घर… घर कसल त्यांचा मोठ्ठा वाडा लगेच सापडला.

नेहा सोन्याच्या दागिन्यांनी भरून गेली होती. आम्हाला दोघांना तिथे बघून तिला खरंच आनंद झाला होता.

“थैक्यु सो मच फॉर कमिंग, कसे आलात?”, नेहा
“तरुणच्या गाडीवरून”, गाडी शब्दावर भर देत प्रिती म्हणाली
“ओह वोव्व, फार ब्रेक नाही ना मारले याने येताना?’, नेहा डोळे मिचकावत म्हणाली
“शट-अप नेहा, कुठे काय बोलायचे जरा ध्यान ठेव”, नेहाच्या चोम्बडेपणाचा खरं तर रागच आला होता पण मी पुढे काही बोलणार एवढ्यात तिचा नवरा आम्हाला भेटायला आला.

नेहाने त्याची आमच्याशी ओळख करून दिली

“हि प्रिती, आपल्या लग्नात तू भेटला होतासच तिला, आणि हा तरुण. . “, नेहा
“तरुण?”
“अंम्म, प्रीतीचा बॉयफ्रेंड”, नेहाने फारसा विचार न करता सांगून दिले

“ओह, तरुण, तू नव्हतास न आमच्या लग्नाला?”
“हम्म, मी बेंगलोरला ऑफिसच्या कामासाठी गेलो होतो त्यामुळे नाही जमले”,

नेहाच्या त्या अनपेक्षित इंट्रोने मी आणि प्रीती फुल्ल शॉक झालो होतो.

“तरुण, हा समशेरसिंग, माझा नवरा”, नेहा

आम्ही दोघांनी हस्तांदोलन केले.

नेहाच्या एकूणच लोकांना पेट-नेम ठेवायच्या सवयीनुसार ह्या ‘समशेरसिंगचा’ लवकरच ‘शेरू’ बनणार ह्यात तिळमात्र शंका नव्हती

“प्लीज बी कम्फर्टेबल, नेहा यु लुक आफ्टर देम”, असं म्हणून शेरू बाकीचे गेस्ट अटेन्ड करायला गेला.

“काय हे नेहा, काही काय फेकतेस? तरुण बॉयफ्रेंड आहे का माझा”, प्रिती
“अग त्यात काय झालं, मला जे सुचले ते सांगितले, चिल”, नेहा

तो विषय तिथेच संपला. पण नेहाच्या त्या इंट्रोने क्षणभरासाठी का होईना मी सुखावलो होतो.

 

प्रिती चेंज करायला निघुन गेली आणि मी आणि नेहा दोघंच राहीलो.

“सो? कसा वाटला माझा नवरा?”, नेहाने विचारलं
“दोन मिनिटांच्या ओळखीत मी काय सांगणार? पण स्मार्ट आहे, निदान दिसायला तरी…”, मी
“शट-अप.. स्मार्ट असणारच तो.. हे बघं केव्हढी गोल्ड ज्वेलरी घेतली त्याने माझ्यासाठी लग्नानंतर.. तु तरी घेऊ शकला असतास का मला?”, नेहा सहजच बोलुन गेली. पण ते खूपच हर्ट करणारं स्टेटमेंट होतं.

“तुझ्यापेक्षा तर तो नक्कीच स्मार्ट आहे, बघ बाहेर गॅरेजमध्ये २ बि.एम.डब्ल्यु, जॅग्वॉर आणि पजेरो आहे.. आणि तु बघ, अजुन बाईकवरुन फिरतोय..”, नेहाचं चालुच होतं

“बरं बाबा, सॉरी, तुझा नवरा ग्रेट ओके?”
“बर, तु बस, मी कोल्ड-ड्रिंक्स घेऊन येते”, असं म्हणुन नेहा निघुन गेली.

ती बोलली ते खरं असेलही, पण त्या शेरू ने सगळं स्वतःच्या पैश्याने नव्हतं उभं केलं.. पेट्रोल-पंप्स, गुलाबाची कित्तेक हेक्टर्सची नर्सरी, परत द्राक्षाच्या बागा.. बाप-जाद्याच्या जिवावरच तर त्याचे सगळे खेळ चालले होते ना.

मला तेथे अधीक थांबणं जिवावर आलं होतं. मी प्रितीची वाट बघत बसलो.

थोड्यावेळाने प्रिती चेंज करुन आली. एव्हाना मी प्रितीने बरोबर साडी आणली होती हे विसरुनच गेलो होतो. इतक्यावेळ फक्त नेहाच्या त्या सो कॉल्ड कौतुकामुळे चिडचीड झाली होती. प्रितीला पाहीलं आणि पहातच राहीलो. तिला साडीमध्ये बघुन कुणीही ही महाराष्ट्रीयन नाही ह्यावर विश्वासच ठेवला नसता. वाटलं, तिला सरळ असंच घेऊन जावं, आई समोर उभं करावं आणि “सांगाव हिच्याशीच लग्न करायचंय मला..”

“कशी दिसतेय मी?”, प्रितीने विचारलं
“मस्त, छान दिसतेय साडी तुला..”
“थॅक्स.. पण तुझा चेहरा का असा उतरलेला?”
“काही नाही.. असंच..”, मी कसंनुसं हसत सांगीतलं..
“असंच? नसेल सांगायचं तर नको सांगुस पण, खोटं कश्याला बोलतोस..”
“नाही तसं काही नाही..”, आणि मग मी नेहा काय काय बोलली ते सांगीतलं.

“मुर्ख आहे का जरा ती? मगाशी पण अशी विचीत्रच ओळख करुन दिली..”

पुढंच आमचं बोलणं खुंटलं कारण शेरू आणि नेहा तिथे आले होते..

“ओ लैला-मजनू, असे कोपर्‍यात काय गप्पा मारताय, चला की जरा आमच्या मिक्स व्हा..”

मी आणि प्रितीने एकदा एकमेकांकडे बघीतलं आणि मग त्यांच्याबरोबर त्यांचा वाडा आणि इतर दिखाऊ आयटम्स बघायला निघुन गेलो.

 

संध्याकाळी दर्शन घेऊन परत निघताना ‘शेरू’ने कोपर्‍यात बोलावलं..

“मित्रा, किती वर्ष झाली तुमच्या अफेर्सला?”
मी क्षणभर चमकलोच..

“अरे प्रितीबरोबर! किती वर्ष झाली?’
“दोन.. दोन वर्ष झाली. का?”
“व्वा.. लक्की आहात राव तुम्ही”
“का पण? काय झालं..”
“च्यामारी, दोन वर्ष झाली तरी तुमची गर्लफ्रेंड अगदी नवीन असल्यासारखंच प्रेम करते तुमच्यावर”

मला अजुनही काहीच संदर्भ लागत नव्हता..
“म्हणजे? मला नाही कळलं अजुनही”, चेहर्‍यावर उसनं हसु आणत मी म्हणालो..
“असं काय करता राजे, तुमचं लक्ष नसताना चोरुन चोरुन बघत होती तुमच्याकडे ती.. नशीब लागतं मित्रा..ऐश कर लेका.. आमचे दिवस संपले आता.. म्हैस बांधली आम्ही दावणीला.. तुमचं चालुद्या..”

माझा अजुनही विश्वास बसत नव्हता तो जे म्हणाला त्यावर. खरंच असं होतं का? माझ्या कसं लक्षात नाही आलं? का तो केवळ एक योगायोग होता?

 

“तुला माहीते तरुण, नेहा स्टील लव्हज यु..”, प्रिती येताना गाडीवर अचानकच म्हणाली..

मी शेरूनी पुरवलेल्या माहीतीच्या आधारावर निरनिराळी स्वप्न बघत गाडी चालवण्यात मग्न होतो.

“व्हॉट रब्बीश? काहीही काय? उलट मला तिने माझी लायकी दाखवुन द्यायचा प्रयत्न केला.. तु हवी होतीस तेथे, कसं बोलत होती ती..”, मी
“नाही तरुण. एक स्त्रीच एका स्त्रीची नजर ओळखु शकते. ती जशी बघत होती तुझ्याकडे.. आय एम डॅम शुअर अबाऊट ईट..”, प्रिती म्हणाली

“आणि एक स्त्री, पुरुषाची नजर, त्याचं मन ओळखू शकते?” मी आरश्यात तिच्याकडे बघत विचारलं.

प्रिती काहीच बोलली नाही.

प्रितीच घर जवळ आलं तसं थोडं अंतर ठेवुनच मी गाडी थांबवली.

“नेहा तेथे जे काही बोलली, ते तिने बोलायला नको होतं तरुण”, प्रिती
“सोड ना, मी एव्हढं नाही मनाला लावुन घेतलं, तिला असेल तिच्या नवर्‍याच कौतुक..”, मी
“नाही ते नाही.. तिने जशी आपली इंट्रो करुन दिली..”, प्रिती
“ओह.. ते.. डोन्ट टेक इट सिरीयसली.. ती मोकळ्या मनाने बोलली होती..”, मी

“असेल तरूण.. ती मोकळ्या मनाने बोलली असेल.. पण माझं मन.. ते नाहीये ना मोकळं”, प्रिती
“म्हणजे? काय बोलती आहेस तु?”
“तुला माहीती आहे तरुण मी काय बोलते आहे, मला दुसरी नेहा व्हायचं नाहीये तरुण.. लेट्स स्टॉप धिस.. लेट्स स्टॉप धीस बिफोर ईट्स टु लेट.. बाय…”

प्रिती मी काही बोलायची वाट न पहाता निघुन गेली.

मी मात्र त्या वळणावर, आयुष्यात आलेल्या ह्या विचीत्र वळणाचा विचार करत थिजुन उभा राहीलो…

 

[क्रमशः]

प्यार मे.. कधी कधी (भाग-८)


भाग ७ पासून पुढे >>

आयुष्य कध्धीच.. कुणासाठीच.. कश्यासाठीच थांबत नाही का?
आपला म्हणवणारा वेळ, खरंच आपल्यासाठी असतो का?
क्षुद्र.. किडुक-मिडूक भासणारा सेकंदकाटा सुध्दा आपण थांबवु शकत नाही का?

दिवस भराभर पलटत होते.. नेहाचं लग्न झालं त्याच्या दुसर्‍याच दिवशी.. रविवारी.. वाटलं होतं आजचा मोकळा वेळ आपला जिव घेणार, पण झालं उलटच.. जरा कुठं आवरुन होतं नाही तोवर.. विनीतचा, ऑफीसमधल्या कलीगचा फोन आला..

“अरे कस्टमर इश्यु आहे.. पट्कन लॉगीन कर.. तुला ब्रिफ करतो…”

हाय.. हॅलो.. गुड मॉर्नींग कसलीही फॉर्मॅलीटी न करता तो म्हणाला ह्यावरुनच ‘आग लागलेली आहे’ ह्याची जाणीव झाली.
‘कस्टमर हा भगवान असतो’ असं आम्ही सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत म्हणतो आणि बर्‍याच वेळा ते पाळतोही.. किंवा पाळावे लागतेच.

लगेच लॅपटॉप समोर ओढला आणि व्हिपीएन टनेलला कनेक्ट केले. विनीत ऑनलाईन होताच. त्याने पट्कन इश्यु एक्स्प्लेन केला.

माझ्याच मॉड्युलमध्ये ‘बग’ होता.. नेहाने जेंव्हा एन्गेजमेंटची बातमी दिली होती त्याच्या दुसर्‍या का तिसर्‍या दिवशीचे माझे चेक-इन होते.. थोडक्यात मीच माती खाल्ली होती.

नेहाची त्या दिवशी आठवण झाली ती तेवढीच.. नंतर मी पुर्णपणे कामात बुडुन गेलो. पटापट डिबगर लाऊन कोड-चेंजेस केले, एक युनिट-टेस्ट मारली.. तोपर्यंत विनीतने ‘आशनाला’, आमची टेस्ट-लिड.. तिला कॉलवर घेतलं होतं.

तुझी चुक-माझी चुक असल्या फालतू फंदात न पडता फटाफट टेस्ट रन केल्या आणि संध्याकाळपर्यंत पॅच रिलिज पण करुन टाकला.

रात्री झोपेपर्यंत कस्टमरची अ‍ॅप्रीसिएशनची मेल सुध्दा आली होती.

वाटलं होतं.. आयुष्य खुप सोप्प आहे, पण तसं नसतं बहुदा.. मनाला कितीही समजावलं तरीही का कुणास ठाऊक, नको त्या वेळी ते आपलं शत्रुच बनुन रहातं. ऑफीसमध्ये एका मित्राकडे ‘चंद्रशेखर गोखलेंच’ ‘मी-माझा’ पुस्तक बघीतलं आणि सगळं वाचुन काढलं..

वाटलं.. ह्या कवि-लोकांच कित्ती बरं असतं नै. मनातल्या भावना सहजतेने कागदावर उतरवुन मोकळे होतात.

मी मनसोक्त रडून घेतो,
घरात कुणी नसल्यावर,
मग सहज हसायला जमत,
चारचौघात बसल्यावर…..!!!!!

अगदी माझ्या मनातलंच ओळखून जणु त्यांनी शब्दबध्द केल्ं होतं.. किंवा हे –

हल्ली मी आरशात पाहायचं टाळतो,
कारण…नसते प्रश्न उभे राहतात,
हल्ली माझेच डोळे माझ्याकडे,
अगदी अनोळख्या नजरेने पाहतात !!

असं म्हणतात की प्रेमात पडल्यावर किंवा ब्रेक-अप झाल्यावरच प्रत्येकाला कवितांचे अर्थ उमजु लागतात..
माझंही कदाचीत तसंच झालं होतं.

 

दोन आठवडे उलटले असतील. माझा आणि प्रितीचा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. आणि होणार तरी कसा? आमच्या दोघांमधला कॉमन दुवाच मिटला होता. ‘सिटी-लायब्ररीला’ जाणे हा एक पर्याय माझ्याकडे होता.. पण जेथे माझी मलाच किव येत होती.. तेथे असला दिनवाणा चेहरा तिच्या समोर घेऊन जायची मला आजिबात इच्छा नव्हती.

आणि एके दिवशी अचानक नेहाचा फोन आला..

“हाssssय तरुण…”, नेहा नेहमीच्याच बबली आवाजात बोलत होती..
“हाय नेहा…”, नेहमीची ‘डार्लिंगची’ जागा आज त्या ‘हाय’ मध्ये नव्हती..”हाऊ आर यु? आहेस कुठे??”
“आय एम जस्ट फाईन.. कॉलेज जॉईन केलं आज.. लंचला भेटतोस?”, नेहा
“अम्म.. लंच नको, दुपारी लगेच काही मिटींग्ज आहेत, लंचला भेटलो तर परत ऑफीसला यायला उशीर होईल..”
“ओके.. निदान कॉफी???”

खरं तर तिला भेटायची मला इच्छा नव्हती. पण मी लग्नालाही गेलो नव्हतो.. थोड्यावेळ भेटून यायला काही हरकत नव्हती. आणि कुणास ठाऊक, कदाचीत तिथे प्रिती असेलही असा विचार मनात येऊन गेला.

“ओके.. १२.३०ला भेटू”, असं म्हणून फोन ठेऊन दिला

नेक्स्ट रिलीज संध्याकाळी द्यायचे होते. फ्रेशर्सना युनिट टेस्टींगला लाऊन दुपारी बाहेर पडलो.

 

दुर्दैव माझी पाठ सोडायला तयार नव्हते. कॉलेजपाशी नेहा एकटीच होती.

नेहा बाकी मस्त दिसत होती. सिंदुर, हातात चमचमत्या बांगड्या, बर्‍यापैकी मोठ्ठ मंगळसुत्र, ब्राईट निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस. इन्फॅक्ट थोडं पुट-ऑन पण केलं होतं.

देअर वॉज नो हग धिस टाईम..

“हाऊ वॉज ईट?”, कॉफी ऑर्डर केल्यावर मी विचारलं
“हाऊ वॉज व्हॉट? वेडींग ऑर हनीमून?”, डोळे मिचकावत नेहा म्हणाली..
“अम्म.. दोन्ही?”

“दोन्ही मस्त.. लग्न छानच झालं.. तु हवा होतास.. बट एनिवेज.. हनीमुनही मस्त.. आम्ही मॉरीशसला गेलो होतो..”
“मॉरीशस.. वॉव्व.. ऑस्सम..”

“हो.. व्हर्जीन बिच, ब्ल्यु कलर्ड वॉटर.. लेस क्राऊडेड क्लिन रोड्स…”, पुढची दहा मिनीटं नेहा मॉरीशसबद्दलच बोलत होती..काय काय खाल्लं, कुठे फिरले, काय बघितले, तेथील हॉटेल्स, तेथील कल्चर वगैरे वगैरे

मी सॉल्लीड बोअर झालो होतो.

“अजून काय विशेष? सेटल झालीस नवीन घरी?”, मी विषय बदलत म्हणालो
“नाही रे, १५-२० दिवसांत काय सेटल… ”

“तुमचं नारायणगावाला आहे ना घर? मग आता कॉलेज?”
“हो, मग आता काही दिवस इकडे आई बाबांकडे, काही दिवस तिकडे अस राहणार, ऑक्टोबर ची सेम झाली कि मग क्रिसमस पर्यंत तिकडे आणि मग परत जानेवारी ते मार्च, परीक्षा संपेपर्यंत आईकडे, असले उद्योग करावे लागणारे.”

“अरे बापरे, नसता उद्योग. पण तुला कधी पासून कोलेजची गोडी लागली, आधी तर कधी अटेंड नव्हती करत”
“कॉलेज तर उगाच आपलं कारण रे, अजून इतक्या लवकर संसार, घर वगैरे नको वाटतंय. तिथे कुठे आड-बाजूला जाऊन राहायचं. इथे असले कि तुम्ही पण सगळे भेटाल ना. ”

“हम्म .. मग? उद्यापासून रेग्युलर कॉलेज सुरु?”
“नाही नाही, उद्यापासून लगेच नाही, एक महिना तरी नाही अजून. तिकडे अजून काही रिसेप्शन्स, काही पूजा राहिल्यात, मग सगळे देव-दर्शन, त्यांचे फार्म हाउस आहे, तिकडे काही दिवस, सो दीड-महिन्यांनी कॉलेज सुरु करेन, तेच अप्लिकेशन द्यायला आले होते ऑफिसला.”

“ए मी तुला माझे मौरिशस चे फोटो पाठवते, यु नो, पूर्ण वेळ मी शौर्ट्सवरच होते.”
“आई शप्पथ, फक्त शौर्ट्सवरच?”
“गप्प बस मूर्ख, काही बोलतो, टी-शर्ट होता वरती”
“अच्छा अच्छा, नाही तिकडे न्यूड बिच वगैरे असतात असे ऐकून होतो म्हणून म्हणल”

“आय मिस्ड यु तरुण.. तु असतास तेथे तर अजुन मज्जा आली असती…”

तिच्या नजरेत त्या जुन्या नेहाचे भाव क्षणभर चमकुन गेले..

तो क्षण खुप्पच सेन्टी होता.. इतर कुठल्याही दिवशी मी तिला जवळ घेतले असते.. किंवा मिठी मारली असती. पण आज… आज समोर बसलेली नेहा माझी नव्हती.

“मला यायला काहीच प्रॉब्लेम नव्हता.. पण तुझ्या नवर्‍याला चाललं असतं का ते?”, मी वातावरण थोडं नॉर्मल करत म्हणालो..

नेहा नुसतीच हसली.

“आमचे हे म्हणजे अगदीच अन-रोमांटीक आहेत. आपण किती किती वेळ गप्पा मारायचो नाही? कुठल्याही विषयावर बोलताना अस कधी ऑकवर्ड वाटायचं नाही”, नेहा थोड उदास होत म्हणाली
“अरे थोडा वेळ तर दे त्याला. त्याला काय माहित तू कशी आहेस ते!”

“आय नो, खर तर वेळ त्याला नाही, मला लागणार आहे जुळवून घ्यायला, आय विल मिस यु तरुण. ” आणि मग तिने पर्समधुन फोन काढुन एक नंबर फिरवला.. “भैय्या.. चलो.. आय एम वेटींग..”

“तुझा नवरा आलाय इथे?”, खुर्चीतून उडत मी म्हणालो
“नवऱ्याला भैय्या म्हणेन का मी? ड्रायव्हर आहे..”

“क्या बात है शौफ़र ड्रिव्हन कार एन्ड ऑल..”

मी बिल पे करण्यासाठी पाकीट काढलं तसं मला थांबवत ती म्हणाली.. “इतके दिवस तुच पे करत होतास.. आज माझी टर्न..” नेहाने तिच्या वॉलेटमधुन पैसे काढुन टेबलावर ठेवले..

तिचं वॉलेट १००-५०० च्या नोटांनी खच्चाखच्च भरलेलं होतं..

“चल निघुयात?”,नेहा खुर्चीतून उठत म्हणाली

“हे.. बाय द वे.. लग्नाचे फोटो?”
“अरे.. इतक्यात कुठले? अजुन एक महीना तरी जाईल अल्बम यायला..”

“पण डिजीटल असतील की कुणीतरी काढलेले..”
“हो.. प्रितीकडे आहेत, तिने सेल मधुन काढले होते त्या दिवशी.. मी एक काम करते.. तिला व्हॉट्स-अ‍ॅपवर पाठवायला सांगते.. आणि मग तुला फॉर्वर्ड करते.. ओके?”

“इतका कश्याला उपद्याप? ती काय मला ओळखत नाही का? सरळ मलाच पाठवायला सांग ना..”

“ओके.. नंबर देते तुझा मी तिला.. ती करेल फॉर्वर्ड..”
“माझा आहे नंबर तिच्याकडे.. त्या दिवशी नाही का तिने फोन केला होता..”
“त्या दिवशी? कधी?”, नेहाने चमकुन विचारले..

मला एकदम माझी चुक लक्षात आली..लग्नाच्या दिवशी प्रितीने मला फोन केला होता, आम्ही भेटलो होतो, मी कार्यालयाच्या समोरच होतो वगैरे गोष्टी नेहाला ठाऊक नव्हत्या.

“ओह राईट.. तिच्याकडे कुठुन माझा नंबर असणार? ठिक आहे.. तु दे नंबर तिला.. नक्की पाठवायला सांग पण..”, मी सारवासारव करत म्हणालो..

ती अजुन काही बोलणार एव्हढ्यात बाहेर हॉटेलच्या दाराशी पांढरी स्कॉर्पीओ येऊन थांबली..

काही क्षण.. काहीही नं बोलता आम्ही एकमेकांकडे बघीतलं आणि मग ती गाडीत बसुन निघुन गेली.

 

आयुष्य खरंच खूप निरस झालं होतं.

नो गर्ल-फ्रेंड, बिझी फ्रेंड्स, लॉट्स ऑफ़ वर्क आणि कंटाळवाणे विकएन्ड्स.
फिफा-वर्ल्डकप चालु असल्याने ऑफीसमध्ये दुसरा कुणालाही कुठलाच विषय नव्हता. आणि मला फुटबॉल किंवा फिफा मध्ये इंटरेस्ट नसल्याने त्यांच्या बोलण्याचा काहीही गंध लागत नव्हता.

गाणी ऐकणं, पुस्तकं वाचणं असले रिकामटेकडेपणाचे उद्योग करण्याचाही कंटाळा आला होता. पाऊस नसल्याने ट्रेक्सचे प्लॅनही बारगळले होते.

सगळंच कसं असं मनाविरुध्द्द चाललं होतं.

आणि एकदिवस प्रितीचा व्हॉट्स-अ‍ॅपवर मेसेज आला..

“हाय तरुण.. प्रिती हिअर..”

पेरण्या खोळंबलेल्या शेतकर्‍याला पावसाचं आगमन कसं वाटावं.. तप्त उन्हाच्या दुपारीनंतर अचानक आकाशात मेघांनी दाटी करावी आणि मोराने पंख पसरवुन गडगडत्या आवाजावर तालं धरावा..रिमीक्सची कर्णकर्कश्श गाणी ऐकुन विटलेल्या कानांना वसंतोत्सव अनुभवायला मिळावा.. अगदी तस्सच काहीसं वाटलं..

मी पट्कन तिचा नंबर सेव्ह करुन ठेवला..

“हाय..”
“नेहाच्या लग्नाचे फोटो आहेत.. पाठवू ना?”

मी उगाचच दोन मिनीटं वेळ घेतला आणि मग म्हणालो.. “हम्म…”

खरंच.. टी.व्ही. वर ती जाहीरात दाखवतात ना.. ‘मेन विल बी मेन’ तस्संच.. कध्धी.. सुधरणार नाही.. नौटंकी करण्यामध्ये अव्वल नंबर..
प्रितीने १५-२० फोटो पाठवुन दिले.

मला ती लिंक तेथेच तोडायची नव्हती

“वॉव्व.. मस्त कॅमेरा आहे तुझ्या सेलचा.. कुठला आहे फोन?…”,मी उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून

..आणि अश्या रितीने आमच्या व्हॉट्स-अ‍ॅप चॅटला सुरुवात झाली..पुढे घडणाऱ्या घटनांची ती एक सुरुवात होती

 

पुढे काय होणार.. सगळ्यांनाच उत्सुकता आहे..एक नातं तुटलं आणि दुसरं नातं जोडलं जात होत. कधी? कसं? वगैरे प्रश्न आहेतच, ज्याची उत्तर येणारा भाग देईल.. एक मस्त रोमॅन्टीक फिल देण्याचा प्रयत्न आहे.. यशस्वी होतो.. की नाही ते नक्की सांगा. पुढचा भाग एकद्दम नविन आहे, जुन्या इंग्रजी कथेत नसलेला.. आशा करतो तुम्हाला आवडेल..

तो पर्यंत..
[क्रमशः]

प्यार मे.. कधी कधी (भाग-७)


भाग ६ पासून पुढे >>

११ सप्टेंबर, नेहाच्या लग्नाच्या इंव्हीटेशन कार्ड वर हीच तर तारीख होती.
काही वर्षांपूर्वी अमेरिकेला ह्याच तारखेने रडवले होते ९-११, बहुदा आज माझा दिवस होता.

नेहा रीतसर घरी येउन लग्नाची पत्रिका देऊन गेली होती, पण मी मात्र नेमकं त्याच वेळेस ‘बँगलोर’ला ऑफिसच्या कामासाठी जावं लागत आहे म्हणून `जमणार नाही’ असं आधीच सांगून टाकलं होत.

नेहाच लग्न ठरलं आहे, किंबहुना तिचा साखरपुडा झाला हा विचारच मला किती असह्य झाला होता. तर मग तिला दुसऱ्याच्या गळ्यात माळ घालताना पहाण तर नेक्स्ट-टू-इम्पोसिबल होत.

नेहाने खूप इन्सिस्ट केलं, पण तिच्या लग्नाला जायचं? का नाही? ह्याबद्दल माझ्या मनात कोणतेही दुमत नव्हते.
मी तिच्या लग्नाला जाणार नव्हतो… फायनल !!

 

‘त्या’ दिवशी शनिवार असल्याने ऑफिसला सुट्टीच होती. इतर सुट्टीच्या दिवशी ८-९ वाजेपर्यंत झोपणारा मी, त्या दिवशी मात्र सकाळी ५ वाजल्यापासूनच जागा होतो. काही केल्या परत झोप लागत नव्हती. सारखं डोळ्यासमोर नवरीच्या पोशाखातील नेहाच येत होती.

सकाळचे विधी सुरु झाले असतील….

डोक्यात विचार येउन गेला.

माझे आणि नेहामधले संबंध आईला माहित नसले तरी, आई नेहाला तशी माझी एक मैत्रीण म्हणून ओळखत होती. बऱ्याच वेळा माझा सेल बंद असला कि घरच्या फोन वर नेहाचा फोन असायचा, एक दोनदा नेहा घरीपण येउन गेली होती. त्यामुळे तिच्या लग्नाला मी नाही जात म्हणल्यावर आईने उगाचच प्रश्न विचारले असते, म्हणून मग आवरून ‘नेहाच्या लग्नाला जातो’ सांगून बाहेर पडलो.

नेहाच्या कार्यालयासमोरच एक दुमजली हॉटेल होते. वरच्या मजल्याला एक मोठ्ठी काचेची खिडकी होती तेथून कार्यालयाचा दर्शनी भाग दिसत होता. ११- ११.३० ची वेळ असल्याने हॉटेलमध्ये फारशी गर्दी नव्हती. त्यातच आठवड्याभराची दाढी आणि चेहऱ्यावर देवदास टाइप्स भाव त्यामुळे फारसे कुणी माझ्याकडे लक्षही दिले नाही. वेटरनेही फारसा विचार न करता सरळ `बारचे’ मेन्यु कार्ड समोर धरले.

“एक ऐण्टीक्विटी…. लार्ज”, मी मेन्यु कार्ड न बघताच ऑर्डर देऊन टाकली
“सर सोडा कि अजून काही?”, वेटर
“नथिंग.. ऑन द रॉक्स प्लीज..”

“ओके सर”, म्हणून वेटर निघून गेला
मी खिडकीतून बाहेर बघू लागलो.

 

ऑर्किडच्या महागड्या फुलांनी प्रवेशद्वार सजवले होते. चौघडा वाजवणाऱ्याबरोबर, दोन तुतारी वाजवणारेही प्रवेशादारापाशी उभे होते. अनेक मोठ-मोठ्या गाड्या पार्किंगमध्ये दिमाखात उभ्या होत्या.

प्रिती म्हणत होती तेच बरोबर होतं, कदाचित तेंव्हा आम्हा-दोघांना आमच्या ह्या रिलेशनशीपमधील दोष जाणवले नव्हते, पण आता त्याच चुका बाभळीच्या काट्यांसारख्या शरीरात घुसत होत्या. आणि असे असताना, अजुन एका रिलेशनमधुन बाहेर पडलो नव्हतो तर मन आधीच प्रितीकडे आकर्षलं गेलं होतं. आणि त्यात आता भर पडली होती ती प्रिती माझ्याच कास्टची नसल्याची. एकीकडे मनाचे काही बंध अजुनही नेहामध्ये अडकुन पडले होते, तर एकाबाजुने ते प्रितीकडे ओढले जात होते. मनाचा हा विलक्षण तणाव माझ्या सहनशक्तीच्या बाहेर गेला होता.

वेटरने व्हिस्कीचा पेग टेबलावर आणुन ठेवताच तो बॉटम्स-अप करुन रिकामा त्याच्या हातात रिफील करायला दिला.

एक क्षण त्याने विचीत्र नजरेने माझ्याकडे पाहिले आणि तो पुन्हा ग्लास रिफील करायला निघुन गेला.

व्हिस्कीचा एक जळजळीत ओघळ घश्यातुन पोटापर्यंत तप्त आग पेटवत गेला. मेंदुला विलक्षण झिणझिण्या आल्या.

एव्हाना बाहेर थोडी गडबड उडाली होती. मांडपात अनेक फेटेधारी मान्यवर कुणाच्यातरी स्वागताला जमले होते.

क्षणार्धात एक पांढरी लाल पजेरो दारात येऊन थांबली, पाठोपाठ पांढरीशुभ्र जॅग्वॉर आणि ऑडी धुरळा उडवत आल्या. त्याचबरोबर किल्ली दिल्यासारखे बॅंडपथक ‘राजा की आयेगी बारात..’ गाण वाजवु लागले.

पांढर्‍या जॅग्वॉवर फुलं आणि पैश्याच्या नोटा उधळल्या गेल्या…

नेहाचा नवरा… उगाचच माझ्या चेहर्‍यावर छद्म्मी हास्य येऊन गेलं.
हा काय माझ्या नेहाला सांभाळणार? नेहाला फक्त मीच सांभाळु शकतो. तिचे रुसवे फुगवे, तिचे बालीश लाड, तिचे ओसंडुन वाहणारं प्रेम, तिचे गॉसीप्स, तिची स्वप्न, तिचे आईसक्रिम्स, तिचे बॉलीवुड प्रेम.. तिचे शॉपींग.. तिच्या फेव्हरेट प्लेसेस.. सगळं सगळं..

ह्या लग्नानंतर माझी नेहा नक्कीच कुठेतरी हरवुन जाईल आणि तिची जागा कोणीतरी पोक्त, मॅच्युअर्ड, स्टेट्स सांभाळणारी.. किंवा सांभाळावं लागणारी पाटलीण घेईल..

मी घड्याळात नजर टाकली. सेकंद काटा स्वतःच्याच मग्रुरीमध्ये धावत होता..अजुन ४५ मिनीटं आणि मग.. मग.. तदेव लग्नं..!!

अंगावर एक सरसरुन काटा आला.

 

पुढचा पेग घ्यायला ग्लास उचलला आणि मोबाईल किणकिणु लागला. मला कुणाचाही.. कसलाही फोन घ्यायची इच्छा नव्हती. मी वाजणार्‍या फोनकडे दुर्लक्ष केले आणि ग्लास ओठाला लावला.

फोन वाजुन.. वाजुन बंद झाला.. आणि परत थोड्यवेळाने वाजु लागला.

काहीसं वैतागुनच मी फोन घेतला..

“हॅल्लो??”
“तरुण.. प्रिती बोलतेय.. कुठे आहेस तु??”
“कुठे आहेस म्हणजे? ऑफकोर्स बॅंगलोरला..”, मी आवाज शक्यतो नॉर्मल करत म्हणालो.. “का? काय झालं?”
“तरुण.. खोटं बोलू नकोस प्लिज.. कुठे आहेस सांग…”
“अरे यार.. मी कश्याला खोटं बोलु? खरंच बॅंगलोरला आहे मी… पण काय झालं काय?”

“ओह वॉव.. व्हॉट अ कोईन्सीडन्स.. तुमच्या ऑफीसबाहेरपण लग्न आहे का कुणाचं? आणि तेथेही.. ‘राजा की आयेगी बारात’ वाजतंय वाट्टतं..”, प्रिती उपहासाच्या सुरात म्हणाली.

“शट्ट..”, मी स्वतःशीच पुटपुटलो..

“ओके..सो आय एम हिअर ओनली.. मग?”
“मग तु लग्नाला का येत नाहीयेस? नेहाने दहा वेळा तरी मला विचारलं असेल की तु खरंच बॅंगलोरला आहेस का? कम-ऑन यार.. डोन्ट बी सो मीन.. तिला खरंच आवडेल तु आलास लग्नाला तर..”, प्रिती समजावयाच्या स्वरात म्हणत होती.

“नाही प्रिती.. इट्स नॉट दॅट इझी फॉर मी.. अ‍ॅन्ड इट वोन्ट बी फॉर हर.. आम्ही दोघंही खरंच अ‍ॅटॅच्ड होतो एकमेकांशी. मला तिथे बघीतल्यावर मला माहीत नाही ती कशी रिअ‍ॅक्ट करेल.. यु नो हर राईट..”

“तरुण मला सांग तु कुठे आहेस.. डोन्ट वरी.. मी नाही सांगणार नेहाला..”
“मी सेव्हन-लव्हज मध्ये आहे.. कार्यालयाच्या समोरच..”
“ओके..”, असं म्हणुन प्रितीने फोन बंद केला..

काही मिनिटांमध्येच मी प्रितीला कार्यालयातुन बाहेर येताना पाहीलं आणि मी खुर्चीतुन उठेपर्यंत ती वरती सुध्दा आली होती.

टीपीकल पंजाबी स्टाईलचा राणी-कलरचा घागरा-चोली तिने घातला होता. सोनेरी रंगांचे हेव्ही वर्क त्या घागर्‍याचे सौदर्य अजुनच खुलवत होते. गालांवर त्याच कलरचा.. पण लाईट-शेडचा मेक-अप होता. ब्लॅक-आयलायनर्सने तिचे आधीच अ‍ॅट्रॅक्टीव्ह असणारे डोळे अजुनच अ‍ॅट्रॅक्ट करत होते. पुर्ण मनगटभरुन रंगेबीरंगी बांगड्या तिला टीपीकल गर्ली लुक देत होता..

प्रिती सरळ माझ्या टेबलापाशीच आली.

“प्रिती.. तु.. इथे नको होतंस यायला..”, मी आजुबाजुला बघत म्हणालो..

प्रितीला तिथे बघुन.. अर्धनिद्रेत असलेले, दारु चढलेले ४-५ लोकं एकदम जागे झाले होते आणि माझ्याकडे आणि प्रितीकडे ते आलटुन पालटुन बघत होते.

बहुदा त्यांच्या मते प्रिती समोरच्या लग्नातुन पळुन आलेली नवरीच होती आणि मी तिचा बॉयफ्रेंड.. अर्धवट दारुच्या नशेत असलेला. आता आम्ही एकमेकांचा हात धरुन पळुन जाणार ह्या अपेक्षेने सगळे आमच्याकडेच बघत होते.

प्रितीने खुर्ची पुढे ओढली आणि माझ्या समोरच बसली. ती सरळ माझ्याच डोळ्यात बघत होती.

मी अधीक काळ तिच्या नजरेला नजर देऊ शकलो नाही.. मी नजर खाली वळवली.

“काय हे तरुण?”, प्रिती हळु आवाजात म्हणाली.. “नेहाला अजुनही वाटतं आहे.. तु येशील..”
ती अजुन पुढे काही तरी बोलणार होती.. पण अचानक ती थांबली

माझे डोळे पाण्याने डबडबले होते.

“मला खरंच ते शक्य नाही प्रिती.. खरंच नाही.. मी नाही तिला दुसर्‍याची होताना बघु शकत….”

फॉर नो रिझन, माझा घसा भरुन आला होता. खुप जोरजोरात रडावेसे वाटत होते.

प्रितीने तिचा हात माझ्या हातांवर ठेवला..”तरुण…”

मी माझं डोकं तिच्या हातांवर ठेवलं. डोळ्यातुन गरम अश्रु तिच्या हातांवर टपकु लागले..

आजुबाजुची लोकं अधीक उत्सुकतेने आमच्याकडे बघत होती.
मी डोळे पुसले आणि परत सरळ बसलो.

प्रितीने तिचा उजवा हात पुढे केला.. तिच्या हातामध्ये रंगेबीरंगी तांदुळ होते..

“अक्षता है तरुण..”, माझा हात उलटा करुन तळहातावर अक्षता ठेवत ती म्हणाली.. “नेहा डेफ़ीनेटली डिझर्व्हस युअर ब्लेसिंग्ज.. निदान तो हक्क तरी तिच्याकडुन हिरावुन घेऊ नकोस..”

तिने एकदा माझ्याकडे बघीतले आणि तेथुन निघुन गेली.

 

मी बर्‍याचवेळ त्या अक्षतांकडे झपाटल्यासारखा बघत होतो.

लग्नाचा मुहुर्त येऊन ठेपला होता. शेवटच्या मंगलअष्टका पार पडल्या आणि “तदेवं लग्नं..” सुरु झालं..
काही वेळ.. आणि मग टाळ्यांचा कडकडाट झाला…

मी आजुबाजुला बघीतलं.. प्रिती गेल्यानंतर सगळ्या लोकांचा उत्साह मावळला होता आणि सगळे परत आपल्या मदीरेकडे वळले होते.

पुन्हा एकदा सर्वांगावरुन काटा आला..
मी काही अक्षता उचलल्या आणि कार्यालयाच्या दिशेने टाकल्या..

“ऑल द बेस्ट नेहा.. हॅव अ हॅपी मॅरीड लाईफ़..”
“फर्गिव्ह अ‍ॅन्ड फर्गेट मी. आय शुड नॉट हॅव पुल्ड यु इन्टू धिस.. आय विश यु अ बेटर लाईफ़.. विदाऊट.. मी..”

उरलेल्या अक्षताही खिडकीतुन उडवुन दिल्या.. “गॉड ब्लेस यु नेहा…”
बाहेर सनई-चौघड्यांना उत आला होता…

मी हताश होऊन खुर्चीत बसलो..समोरचा ग्लास एका घोटात संपवला आणि चेहरा तळहातांमध्ये खुपसुन टेबलावर डोकं ठेवलं.

घसा जाळत पोटात विसावलेली व्हिस्की अधीक तप्त होऊन डोळ्यातुन बाहेर पाझरत होती

 

[क्रमशः]

प्यार मे.. कधी कधी (भाग-६)


भाग ५ पासुन पुढे >>

टेबलावर ठेवलेलं ऑम्लेट ब्रेड गार होऊन गेलं होतं. खरं तर आई बर्‍याच वेळ माझ्याकडे बघत आहे.. माझ्या लक्षात आलं होतं, पण मला त्या ऑम्लेटमध्ये काडीचाही इंटरेस्ट नव्हता.

शेवटी आई टेबलापाशी आलीच..

“का रे? काही खात नाहीस? तब्येत बरी नाही का?”
“नाही.. ठिक आहे.. थोडं डोक जड झालंय..”
“सुट्टी घे मग ऑफीसला.. सारखं आपलं दिवस-रात्र कॉम्युटरसमोर बसायचं ते..”
“काय गं आई.. तेच काम आहे माझं. आणि असं कधीही आपण म्हणलं की सुट्टी घेता येते का?”
“अरे पण.. तब्येतच बरी नसेल तर…”
“काही धाड भरली नाहीये तब्येतीला.. ठिक आहे मी.. आत्ता भूक नाहीये फक्त.. ऑफीसमध्ये खाईन काही तरी..”

“अरे मग ज्यूस तरी…”
“आई प्लिज.. उगाच डोकं नको उठवूं.. सगळीकडे आपणच मनमानी करायची का? आम्हाला काही मतं असतात की नाही?’

असं म्हणुन ब्रेकफास्ट नं करताच मी टेबलावरुन उठलो..

आधीच सॉल्लीड डोकं सटकलं होतं. वाटत होतं, आई-बाबांनी हे आपल्याच जातीची मुलगी हवी वगैरे काढलं नसतं तर कदाचीत.. कुणास ठाऊक.. मी आणि नेहा अजुनही एकत्र असतो.. कदाचीत तिच्या आई-वडीलांना समजवता आलं असतं..

 

ऑफीस तर माझं अजात-शत्रू बनलं होतं. पण दुसरा पर्यायही नव्हता. आधीच्या आठवड्यात आधीच काही सुट्य़ा झाल्या होत्या, त्यात त्या ‘सिटी-लायब्ररी’च्या चकरांच्या नादात बर्‍याच वेळा ऑफीसमधुन मधल्या वेळात गायब होत होतो.. त्यामुळे कामंही बरीच खोळंबली होती.

नेहाचाही काहीच फोन नव्हता. सगळीच संकट अचानक आल्यासारखं वाटत होतं. खूप अस्वस्थ वाटतं होतं. काही तरी हरवल्यासारखं? का हवं असलेलं मिळत नसल्यासारखं?

आगतिकता, चिडचीड, संताप, विषण्ण, भावनांचा मानसिक कडेलोटं वगैरे वगैरे…

 

संध्याकाळी ‘अननोन-नंबर’ वरुन फोन आला. हमखास कुठला तरी सेल्स-मार्केटींग कॉल असणार म्हणुन बंदच करणार होतो, पण शेवटी घेतला..

“हाय तरुण…”

फक्त दोन शब्द.. आणि सारं कसं शांत शांत झाल्यासारखं वाटलं… बेभान सुटलेल्या वार्‍याला वावटंळ समजुन आकाशी भिरभिरणार्‍या पाखरांना अचानक ढगाळलेलं आकाश स्वच्छ सुर्य प्रकाशानं भारुन जावं, मोकाट सुटलेला वारा वेसंण घातल्यासारखा शांत झाल्यावर जसं वाटेल.. अगद्दी तस्संच वाटलं…

“हाय प्रिती… तुला नंबर कुठुन मिळाला?”
“अं.. नेहा ने दिला…”
“नेहा? ती कुठे भेटली तुला?”
“आजच आली दुपारी ती.. मग मला फोन केला होता तिने..”
“हम्म.. बोल..”

“नेहाने विचारलेय, आज संध्याकाळी वेळ आहे का? ती एंगेजमेंटची पार्टी देणारे तेंव्हा..”
“एक मिनीट.. एक मिनीट.. नेहाने विचारलेय म्हणजे? तिला मला फोन नाही करता येत?”
“हे बघ तरुण..”
“नो…यु गो अ‍ॅन्ड टेल हर..”
“तरुण.. आय एम नॉट युअर मेसेंजर.. मी तुला फोन पण करणार नव्हते, पण नेहाने खुप वेळा विनंती केली म्हणुन…”

काही क्षण शांततेत गेले…

“ऑलराईट.. कुठे? किती वाजता?”
“८.३०, बंजारा हिल्स..”
“आय विल बी देअर.. थॅक्स..”

पुढे काही बोलायच्या आधीचे प्रितीने फोन बंद केला होता.

“शिट्ट..”, मी स्वतःलाच शिव्या हासडल्या.. “काय फालतू टेंन्शन निर्माण झालं होतं तिघांमध्ये! ही तेढ लवकर सुटणं गरजेचं होतं. पण नेहाचं असं तर्‍हेवाईक वागणं उगाच डोकं फिरवुन गेलं होतं…”

 

बंजारा हिल्स, रंगेबीरंगी दिव्यांनी उजळुन निघालं होतं, पण अंतरंग मात्र गडद निळ्या रंगात बुडुन गेलं होतं. डिस्को-थेकवर नाचणार्‍या कपल्सच्या हातातील निऑन-बॅन्ड्स चमकत होते. ए/सी ची थंडगार लाट शरीराला झोंबत होती. उंची दारुचा मंद गंध हवेत पसरला होता..

अपेक्षेप्रमाणे प्रिती आणि नेहा दोघीही आल्या नव्हत्या.

मी कोपर्‍यातलं टेबल बघुन बसलो.

थोड्यावेळाने प्रिती आतमध्ये आली. निडलेस टू से, शी वॉज लुकींग रॅव्हीशींग. वन थिंग आय नोटीस्ड टूडे वॉज द नोज-स्टोन शी वॉज वेअरींग.

मस्त दिसत होता तिला.

“हाय तरुण..”, नेहमीप्रमाणे तिचा आवाज मस्त फ्रेंडली होता. दुपारचं आवाजातलं टेन्शन कुठेच जाणवत नव्हतं..

“वॉव.. काय मस्त म्युझीक आहे..”, तिची पावलं नकळंत गाण्याच्या तालावर जमीनीवर आपटंत होती.
“काही ऑर्डर केलं आहेस?”

मी फारसं काही बोलतंच नव्हतो.. “आय से..लेट्स वेट फॉर द होस्ट..”, मी सॅरकास्टीक स्वरात म्हणालो..

“ओके.. कूsssल..”, कॅज्युअली प्रिती म्हणाली..

थोड्याच वेळात नेहापण आली…

“हाsssssssय” नेहा जवळजवळ दरवाज्यातुनच ओरडत आत आली. फक्त तो ‘हाय’.. प्रितीसाठी होता.

नेहा येताच प्रिती उठुन उभी राहीली.. दोघींनी एकमेकांना मिठी मारली…

“सी धिस्स…”, नेहाने आपला हात पुढे करुन हातातली अंगठी तिला दाखवली..
“वॉव.. रिअल डायमंड हम्म…”, प्रिती..
“मग.. पाटलीण आहे म्हणलं मी..”, नेहा

दोघीही उगाचच एकमेकींना टाळ्या देत हसल्या

मी मात्र अजुनही त्यांच्या संभाषणातुन वर्जीतच होतो.. जणू काही मी तिथे नव्हतोच..

मग अचानक नेहा माझ्याकडे वळुन म्हणाली.. “हाय तरुण.. कसा आहेस?”
“आय एम गूड…”, मी उगाचच मान हलवत म्हणालो..

थोड्यावेळ कोणीच काही बोललं नाही..

“ओह.. बाय द वे, कॉन्ग्राट्स फॉर युअर एन्गेजमेंट..”, मी हात पुढे करत म्हणालो..

नेहानेही हात पुढे केला आणि आम्ही हॅन्ड्शेक केलं. पण त्यामध्ये तो पुर्वीचा आपलेपणा नव्हता, जणु काही पहील्यांदाच कुणाला तरी हॅन्ड्शेक केल्यासारखं वाटलं..

“सो.. लेट्स ऑर्डर समथींग?”, नेहाने प्रितीला विचारलं..
“शुअर….”…

नेहा समोरच्या खुर्चीत बसली.

“आय विल हॅव ड्राय मार्टीनी..”, प्रिती
आय विल हॅव द युजवल..”,मी

जेंव्हा जेंव्हा मी आणि नेहा एकत्र बारमध्ये जायचो, तेंव्हा माझं ड्रिंक ठरलेलं असायचं..’व्होडका, जिन, व्हाईट रम, सिल्व्हर टकीला, कोक आणि बर्फ’ सगळ्यांच मिश्रण.. लॉंग आयलंड आईस्ड टी

नेहाने माझ्याकडे काही क्षण पाहीलं.. त्या काही क्षणात, आमचे कित्तेक जुने दिवस आणि त्याच्या आठवणी होत्या.. बारमध्ये एकमेकांच्या साथीने रिचवलेले ग्लास होते, गप्पांचे ते न संपणारे फड होते.. काही क्षण तिच्या नजरेत ते सर्व येऊन गेलं..

“आय मीन.. आय विल हॅव लॉंग आयलंड आईस्ड टी…”, मी

नेहाने खुण करताच वेटर ऑर्डर घ्यायला आला..
“वन ड्राय मार्टीनी, वन लॉंग आयलंड आईस्ड टी, अ‍ॅन्ड वन मार्गारिटा…”

मला एक क्षण नेहाला मध्येच थांबवायची इच्छा झाली. मार्गारिटा अर्थात टकीला शॉट्स नेहाला नेहमीच हेवी जायचे. पण का कुणास ठाऊक, अचानक आम्हा दोघांमध्ये एक अदृष्य भिंत उभी राहीली होती.

वेटर निघुन गेल्यावर प्रिती म्हणाली.. “सो? हाऊ वॉज इट?”
“एकदम फॅन्टास्टीक रे.. आय रिअली मिस्ड यु.. पण सगळं इतकं पट्कन ठरलं हे एन्गेजमेंटच.. आम्ही मुलगा बघायला गेलो काय? दोघंही एकमेकांना पसंद पडलो काय, आणि अचानक एंन्गेजमेंट करुन मोकळं झालो काय…”
“फोटोज?”, प्रिती
“आहेत नं, उद्या करते शेअर… काय मस्त घरं आहे अगं त्यांच.. घर काय मोठ्ठा वाडाच आहे, पुढे मागे, गार्डन, आजुबाजुला मस्त झाडी…”

नेहाचं स्तुतीपुराण थांबतच नव्हतं…

एव्हाना वेटरने ड्रिंक्स सर्व्ह केली.

नेहाने आमचे ग्लास खाली ठेवेपर्यंत तिचा ग्लास बॉटम्स अप करुन टाकला आणि ग्लास रिफील करायला वेटरला दिला आणि ती परत आपल्या पुराणाकडे वळली.

मी आणि प्रितीने एकमेकांकडे एकदा बघीतले.

“प्रिती.. तुला माहीते, अगं त्याच्या आबांना गावात एव्हढा मान आहे, आम्ही त्यांची शेती बघायला चाललो होतो ना.. रत्यावर सगळी लोकं बाहेरुन त्यांना नमस्कार करत होती…”

“वॉव.. सही रे..”, प्रितीला पण बहुतेक आता बोअर व्हायला लागलं होतं..

“आम्ही अंगठ्या घातल्या ना एकमेकांना, तर आबांनी.. म्हणजे.. त्याच्या बाबांनी खिश्यातुन दहा हजार काढुन दिले मला.. म्हणाले, तुला पाहीजे तेथे खर्च कर… कॅन यु बिलीव्ह इट???”

नेहाचा एव्हाना तिसरा ग्लास रिकामा झाला होता.

“तरु..तरुण..”, नेहाची जिभ मध्येच अडखळत होती.. “हाऊ इज युअर लॉंग आयलंड आईस्ड टी…?”
“इट्स गुड…”, मी

“गुड.. आय विल ऑर्डर वन फॉर मी…”, नेहाने पुन्हा त्या वेटरला खुण केली..
“नेहा, इनफ.. तु ऑलरेडी बरीच टकीला घेतली आहेस, ह्यामध्ये टकीला डबल आहे, शिवाय रम आणि व्होडका..”, मी समजावण्याच्या स्वरात म्हणालो..

“शट अप तरुण.. आय एम नॉट युअर गर्ल गर्ल्फ़ेंद गर्लफ्रेंड नाऊ..”, नेहा अडखळत म्हणाली..

माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. एक तर मला तिथे बोलावुन ती माझ्याशी फारसं बोललिच नव्हती, उलट मला मात्र तिचं सासरंच पुराण ऐकावं लागत होतं.

मी चिडुन उठुन उभा राहीलो… तसं नेहाने माझा हात धरुन खाली बसवलं..

“सो सॉरी जाssssनू.. चिडलास…?”

नेहाचे डोळे जड झाले होते.. आय कुड सी ईट, तिला खरंच खुप जास्त झाली होती..

“नेहा प्लिज.. बिहेव्ह….”
“हाऊ कॅन आय बिहेव्ह जानू…?? हाऊ कॅन आय?”
“….”

“तुला माहीते प्रिती.. आम्ही पावसाळ्यात भुशी डॅमला जायचो ना.. तेंव्हा हा ..हा तरुण.. माहीते काय काय करायंचा.. तेंव्हा मी असंच म्हणायचे त्याला बिहेव्ह तरुण..”.. नेहा स्वतःशीच हसली…

“लेट्स ऑर्डर मेन कोर्स..”, प्रिती ने समोरंच मेन्यु कार्ड हातात घेतलं..

“तरुण..”..नेहा रिकाम्या झालेल्या ग्लासमध्ये बघत म्हणाली..
“यु रिमेंबर धिस सॉग??”, डिजे ने धांगडधिंगा गाणी एव्हाना बंद केली होती आणि रोमॅन्टीक नंबर्स लावले होते..
“हम्म.. हाऊ डू आय लिव्ह विदाऊट यु! कॉन-एअर मुव्ही मधलं आहे..”, मी म्हणालो..

“शाल वुई डान्स? फ़ॉर द वन लास्ट टाईम?” नेहाने उठुन उभं रहायचा प्रयत्न केला, पण ती परत खुर्चीत बसली…
“प्रिती, लेट्स हॅव डिनर समटाईम लॅटर.. आय थिंक वुई मस्ट गो नाऊ..”, मी..
“हम्म..”, प्रितीने मेन्यु कार्ड बंद केलं आणि तिने वेटरला बिल पाठवायची खुण केली..

“तरुण, २३ नेक्स्ट मंन्थ आय एम गेटींग मॅरीड.. डेट इज फायनलाईज..”, अचानक नेहा म्हणाली.

ईट वॉज अ न्युज टु मी अ‍ॅन्ड टु प्रिती अ‍ॅज वेल..

“आपल्याला माहीती होतं नं हा दिवस एक ना एकदा येणार आहे.. देन व्हाय डज इट हर्ट तरुण? हिअर.. हिअर.. व्हाय डज इट पेन..?” आपल्या हृदयाकडे बोट दाखवत नेहा म्हणत होती..

“आय थिंक वुई नेव्हर सॉ ईट कमींग.. नाही?”

मग बर्‍याच वेळ ती बोटातल्या अंगठीकडे बघत राहीली..”आय विश, आय कुड थ्रो धिस डॅम्न थिंग ऑफ…”

वेटरने एव्हाना बिल आणुन दिलं होतं..

नेहाने पर्समध्ये हात घालुन नोटांचं पुडकं बाहेर काढलं, पण तिला ते पैसे मोजताच येत नव्हते.

प्रितीने तिच्या हातातुन पैसे आणि बिल काढुन घेतलं. लागतील तितके पैसे मोजुन तिने वेटरला दिले आणि बाकीचे नेहाच्या पर्समध्ये ठेऊन दिले…

“लेट्स गो नेहा..”, नेहाला उठवत प्रिती म्हणाली…

“माझ्या लग्नानंतर तुम्ही दोघंही एकटे पडाल नाही? विल यु बोथ मिस मी?”, नेहा काही बाही बरळत होती..
“ऑफकोर्स नेहा वुई विल.. बट वुई विल बी इन टच.. नाही का..”, प्रिती
“ऑफकोर्स .. वुई विल बी.. ऑफकोर्स .. अबाऊट तरुण.. आय डोन्ट नो.. बट विथ यु.. आय विल बी.. यु आर माय बेस्ट फ्रेंड..”, नेहा

आम्ही लाऊंजचं दार उघडुन बाहेर पडलो..

“माझ्याकडे एक बेस्ट आयडीआ आहे..”, नेहा मध्येच म्हणाली…”व्हाय डोन्ट बोथ ऑफ यु गेट मॅरीड टु इच आदर..??”

आम्ही दोघांनीही दचकुन एकमेकांकडे आणि मग नेहाकडे पाहीलं…नेहा अजुनही तंद्रीतच होती…

“ओह.. नो.. बट यु कान्ट…”, नेहा
“व्हाय? व्हाय कान्ट???”, मी जणु प्रतिक्षीप्त क्रियेनेच विचारलं.

“ओह कमॉन तरुण.. आपण दोघंही महाराष्ट्रीयन, फक्त जात वेगळी तरीही आपले घरचे आपल्या लग्नाला तयार झाले नसते.. मग ही तर..”
“मी रिक्षा घेऊन येते…”, प्रितीने नेहाला बाहेरच्या खुर्चीत बसवले आणि ती रिक्षा आणायला गेली.

“ही तर काय नेहा?”, मी नेहाला जोर-जोरात हलवुन विचारत होतो…
“तरुण स्टॉप, यु आर हर्टीग मी”, माझा हात बाजूला ढकलत त्रासिक सुरात नेहा म्हणाली

मी मागे वळून बघितले, प्रिती रिक्षा थांबवून नेहाला घ्यायला येत होती

“नेहा, प्रितीच काय सांगत होतीस?”, मी अधीर झालो होतो

“अरे ती .. पंजाबी आहे.. प्रिती.. प्रिती सिंग.. जर आपण महाराष्ट्रीयन असूनही आपलं लग्न नाही होऊ शकत.. तर मग हिच्याशी तर.. विचार सुध्दा करु नकोस तु..”, नेहा ग्लानीत बोलत होती..

आकाशात धडाड्कन विज कोसळली..
प्रिती एव्हाना रिक्षा घेऊन आली होती. तिने नेहाला धरुन कसे बसे रिक्षात बसवले आणि त्या दोघी निघुन गेल्या..

मी हॉटेलच्या दारात थिजल्यासारखा उभा होतो.

बर्‍याच वेळाने मला जाणिव झाली की आजुबाजुला जोरात पाऊस कोसळतो आहे आणि मी मात्र चिंब भिजला असुनही मुर्खासारखा तेथेच उभा होतो..

एकटाच….

[क्रमशः]

प्यार मे.. कधी कधी (भाग-५)


भाग ४ पासुन पुढे>>

“देख कर तुमको.. यकीन होता है..
कोई इतना भी हसीन होता है..
देख पा ते है कहा हम तुमको…
दिल कही.. होश कही होता है॥”

जगजीतच्या आवाजातले मला गाण्याचे ते शब्द आठवले जेंव्हा प्रितीला मी मॅक्डीला पाहीलं. आई-शप्पथ, काय दिसत होती मस्त.

पिंक कलरचा टाईट फिटींग्सचा कुर्ता आणि व्हाईट कलरचे लेगींज्ज होते आणि स्ट्रॉबेरी रंगाच्या ओढणीने तिने आपले केस बांधले होते.

थोडी ओल्ड फॅशन्ड स्टाईल नाही ही?“, मी मनाशीच विचार केला.. “म्हणजे रेट्रो मुव्हीज मध्ये नितु सिंग, किंवा मुमताज ना मी असली फॅशन केलेली पाहिलं होतं.. बट एनीवेज हु केअर्स, प्रिती वॉज लुकींग गॉर्जीअस…”

आणि मग माझं लक्ष पाठमोर्‍या बसलेल्या नेहाकडे गेलं आणि वास्तवाचं भान आलं. तिचा चेहरा दिसत नसल्याने, नक्की काय झालं असावं ह्याचा अंदाज येत नव्हता.

मी आत येत असतानाच प्रितीचं माझ्याकडे लक्ष गेलं.
मी नजरेनेच काय झालं विचारलं, पण ती काहीच बोलली नाही.

मी नेहा शेजारची खुर्ची ओढुन बसलो.

“हाय!.. काय झालं? एव्हढ्या गडबडीने का बोलावलंस?”, मी नेहाच्या चेहर्‍यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत म्हणालो.

“प्रॉब्लेम है..”, वैतागलेल्या सुरात नेहा म्हणाली.
“काय झालं? जरा निट सांगशील का…”, मला थोडा धीर आला होता.

“उद्या मला बघायला येणार आहेत..”, नेहा नजर टाळत म्हणाली..
मला तर एक सेकंद.. अत्यानंदाने पायाखालची जमीन सरकल्यासारखंच वाटलं..

“काsssssssय?? काय बोलती आहेस तु??”, मी मनातला आनंद आणि चेहर्‍यापर्यंत आलेलं हसु लपवत म्हणालो..

“हो ना अरे.. कोण तरी पाटील आहेत, नारायणगावचे, बाबांच्या ओळखीतलेच आहेत.. त्यांचा मुलगा आहे..”, नेहा

“अरे.. पण तु फक्त २४ ची आहेस, मग इतक्या लवकर काय हे मध्येच लग्नाचं??”, मी
“ए काय रे? म्हणजे मला बघायला येणार आहेत, त्याचं तुला काहीच वाटत नाहीए का?”, नेहा
“ओके.. ओके.. शांत.. गदाधारी भीम.. शांत.. मला निट सांग, कोण आहे मुलगा?, काय करतो?”

“अरे नारायणगावचे पाटील आहेत.. गडगंज श्रीमंत आहेत.. दोन पेट्रोल पंप, गुलाबाची मोठ्ठी नर्सरी आणि द्राक्षांचे मळे आहेत त्यांचे..”, नेहा तिच्या वडीलांची भाषा बोलत होती..

“वॉव्व.. सहीच यार… श्रीमंत झाली म्हणजे तु..”
नेहा चिडुन माझ्याकडे बघत होती..

“तु पाहीलं आहेस..मुलाला?”
“हो.. फोटो पाहीला.. तसा ठिक आहे.. अगदीच काही वाईट नाही.. पण..”

“मग प्रॉब्लेम काय आहे..”, मी
“असं काय करतोस.. अरे, मला इतक्यात लग्न नाही करायचंय. आणि माझं लग्न झालं की मी तुला भेटू शकेन का रे?”, नेहा

“का? त्याला काय झालं? तुझा नवरा काय इतक्या क्षुद्र विचारांचा आहे का? लग्नानंतर सुध्दा कुणीही आपले मित्र-मैत्रीणी जपु शकतंच की..”, मी अ‍ॅक्च्युअली तिला कन्व्हींन्स करायचा प्रयत्न करत होतो.

माझ्या दृष्टीने तो जो कोणी मुलगा होता तो आधीच नेहाचा ‘नवरा’ झाला होता.

“हो.. मित्र-मैत्रीणी ठिक आहेत.. पण बॉयफ्रेंड..?? तो बरा खपवुन घेईल..”, नेहा

“बरं मग एक सांग.. तुझ्याच कास्टचा आहे का तो?”
“अर्थात.. हा काय प्रश्न झाला? त्याशिवाय का बाबा….”

“हम्म.. मग तु सांग ना सरळ, मला शिक्षण पुर्ण करुन मगच लग्न करायचं आहे म्हणुन..”, बोलताना नकळत तळहाताची बोटं मी क्रॉस केली होती.

“सांगीतलं.. ते सुध्दा सांगीतलं. पण त्यांना माझ्या शिक्षणाला काहीच हरकत नाही. लग्नानंतरही शिक्षण पुर्ण करु शकशील म्हणतात…”

“बस्सं तर मग..”, मी मनातल्या मनात म्हणालो.. “तिच्या आणि मुलाकडच्या आई-बाबांनी सगळं ठरवुनच टाकलेलं आहे.. आता नेहाने कितीही.. आणि काहीही सांगीतलं तर कोणीही तिचं ऐकणार नाहीए..”

माझं सहज लक्ष प्रितीकडे गेलं. ती माझ्या चेहर्‍यावरुन माझ्या मनात चाललेले विचार ओळखण्याचा प्रयत्न करत होती..

मी पटकन नजर दुसरीकडे वळवली.

पुढचा अर्धा तास आम्ही वेगवेगळ्या पर्यायांवर निरर्थक चर्चा केली, पण त्यातुन मार्ग काहीच निघाला नाही. नेहा बहुतेक थोडीशी निराश आणि वैतागलेली होती. बहुतेक तिला माझ्याकडुन बर्‍याच अपेक्षा होत्या.. मी काहीतरी मार्ग काढीन ह्या आशेने बहुदा संध्याकाळी तिने मला भेटायला बोलावलं होतं. पण शेवटी मार्ग काहीच निघत नव्हता.

“मगं? आता काय करायचं रे?”

नेहा खुपच सेन्टी झाली होती. तिच्या दृष्टीने एकदा का मुलाला पहाण्याचा कार्यक्रम झाला की त्यातुन दुसरा बाहेर पडण्याचा मार्ग नव्हताच. लग्न कन्फर्मच होणार होते.

मी तिच्या डोळ्यात पाहीलं. तिचे पाणीदार डोळे लाल झाले होते. नाकाचा शेंडा गुलाबी भासत होता.

हीच का ती माझी नेहा? नेहमी हसणारी, दुसर्‍याला हसवणारी.. चुलबुली नेहा…

टेबलावरचा टिश्यु उचलुन तिने तिचे ओलसर झालेले डोळे टिपले.

“कमऑन नेहा.. डोन्ट डु दॅट.. निदान उद्या मुलाला भेट तरी.. कदाचीत त्याला तु आवडणार नाहीस..”, मी नेहाच्या जवळ जात म्हणालो..

नेहाने अचानक मला मिठी मारली…”आय डोन्ट वॉन्ट टु गो तरुण.. आय डोन्ट वॉन्ट टु लिव्ह यु…”
तिच्या डोळ्यातुन निघणारे गरम अश्रु माझ्या खांद्यावर पडत होते. खूप प्रेशीअस होते ते आश्रु कारणं ते माझ्यासाठी होते. नेहा टिश्युने डोळे पुसत होती आणि पुन्हा पुन्हा ते नेहाच्या डोळ्यातुन घरंगळत होते. माझ्या डोळ्यात मात्र टिपुसही नव्हता.. कदाचीत.. कदाचीत ज्या दिवशी प्रितीला भेटलो.. त्याच दिवशी मी ह्या रिलेशनशीपमधुन बाहेर पडलो होतो.

नेहाला रडताना पाहुन वाईट वाटले, पण शेवटी हे कधी-ना-कधी होणारच होते. वुई हॅड आस्कड फॉर इट. आज प्रिती होती म्हणुन कदाचीत मी नेहामध्ये इतका इन्व्हॉल्व्ह नव्हतो.. त्यामुळेच मे बी मी ह्या मोमेंटलाही रिलॅक्स होतो.. नाही तर कदाचीत आज नेहासारखेच माझ्याही डोळ्यात अश्रु आले असते.

मी नेहाच्या खांद्यावरुन प्रितीकडे बघीतले. ती मोबाइलवरचे मेसेजेस वाचत होती.

“सेव्ह युअरसेल्फ फ्रॉम मी बेब्स.. आय एम अ फ्री बर्ड नाऊ…” मी मनातल्या मनातच म्हणालो..

**************************************

दुसर्‍या दिवशी संध्याकाळीच नेहाचा मेसेज आला..

“आय एम नो लॉगर युअर्स तरुण.. आज मी दुसर्‍या कुणाची तरी झाले.. आय गॉट एंन्गेज्ड…”

छातीमध्ये खस्सकन कुणीतरी सुरा खुपसावा तस्सच माझं झालं. मी तो मेसेज दोन-तिनदा वाचला. प्रत्येक वेळी तीच भावना..

मी पट्कन तिला रिप्लाय करायला घेतला आणि परत तिचा दुसरा मेसेज आला…

“प्लिज डोन्ट कॉल ऑर मेसेज मी.. इथे सगळे फॅमीली लोकं आहेत.. तुझा फोन आला तर… आय वोन्ट बी एबल टु कंन्ट्रोल.. ttyl”

दोन्ही मेसेज मध्ये शेवटचं नेहमीचं.. “लव्ह यु.. नेहा..” मिसींग होतं.

एकदा वाटलं, गेलं खड्यात, काही होतं नाही, करावा फोन सरळं. पण मग दुसरा विचार आला, नेहाचंही बरोबर होतं, उगाच ति तेथे रडायला लागली आणि कुणी आमचे मेसेजेस वगैरे बघीतलं तर अर्थाचा अनर्थ व्हायचा. तिचं ठरलेलं लग्न मोडायचं.

“आय गॉट एन्गेज्ड..”, एका शब्दाने आम्हाला दोघांना एकमेकांपासुन कित्ती दुर करुन टाकलं होतं. इतकं की तिला फोन करायला पण आज मला विचार करावा लागत होता. क्षणार्धात तिचं जग आणि माझं जग वेगवेगळं झालं होतं. तिच्या बोटात काल-पर्वापर्यंत आमच्या लेखीही नसणार्‍या कोणा पाटलाच्या पोराने अंगठी काय घातली.. आजपर्यंत फक्त माझी असणारी नेहा आज त्याची झाली होती… फक्त त्याची..

खुप्पच विचीत्र वाटलं. जणु काही मला अर्धांगवायु झाला होता. सर्व शरीर बधीर झालं होतं. शेवटी काही झालं तरी मी आणि नेहा २-३ वर्ष एकत्र होतो. कित्तेक क्षण आम्ही एकत्र घालवले होते. कित्तेक मुव्हीज, म्युझीक कॉन्सर्ट्स, छोट्या छोट्या गोष्टींचे शॉपिंग, लॉग राईड्स, एकमेकांची सुख-दुखः, एकमेकांना चिअर केले होते, एकमेकांचे विनींग मोमेंट्स सेलेब्रेट केले होते. एकमेकांच्या बर्थ-डे ला सगळ्यात पहीलं विश केलं होतं.

कित्ती सारे मेसेजेस, कित्ती सारं “लव्ह यु..”, कित्ती सारं..”मिस्स यु सो मच..”

अचानक छाती भरुन आली. मुलगा बघायला जाणं इथपर्यंत ठिक होतं.. पण असं अचानक.. एन्गेज्ड?
सगळं संपल्यासारखं वाटू लागलं.

ह्यापुढे कित्तीही प्रयत्न केले तरी पुन्हा तो पुर्वीचाच तरुण आणि पुर्वीचीच नेहा असणार नव्हते.

मी चुक होतो.. कदाचीत मी त्या रिलेशनशीपमधुन अजुन पुर्ण बाहेर आलो नव्हतो. मी टीव्ही बंद केला आणि उशीमध्ये डोकं खुपसुन पडुन राहीलो.

अनेक दृष्य.. काही स्पष्ट, तर काही केलीडोस्कोपसारखी चित्र-विचीत्र आकारांची डोळ्यासमोरुन झरझर सरकत होती. मध्येच कधीतरी आई जेवणासाठी हाक मारुन गेली, पण पोटात एक मोठ्ठा खड्डा पडला होता, इतक्यात तो कुठल्या गोष्टीने भरुन येईल असं ते वाटत नव्हतं.

 

सकाळी उठलो तेंव्हा मोबाईलचा व्हॉट्स-अ‍ॅपचा दिवा लुकलुकत होता.

नेहाचा मेसेज होता..

“गोईंग टु नारायणगाव विथ फॅमीली टु सी द हाउस.. माय हाऊस… उद्याच भेटेन.. बाय..”

किती रुक्ष मेसेज होता तो. अगदी फुग्यातली हवा काढुन टाकल्यासारखा.. डोकं सॉल्लीड जड झालं होतं. ऑफीसला फोन करुन सिक-लिव्ह टाकुन दिली आणि परत अंथरुणात पडुन राहीलो.

मन शांत झाल्यावर प्रितीचा विचार डोक्यात आला.. नेहाने तिला पण सांगीतलं असेल का?

प्रितीला भेटणं आवश्यक होतं. सकाळचा वेळ कसाबसा घालवला आणि दुपारी लगेच सिटी-लायब्ररीला पळालो. प्रिती खालच्याच मजल्यावर होती.

आय वॉज इन ग्रिफ अ‍ॅन्ड पेन. नेहापासुन असा अचानक वेगळा तोडुन टाकल्यामुळे कसंतरीच वाटत होतं आणि बहुतेक ते माझ्या चेहर्‍यावर दिसुन येत होतं. मी नेहमीचा ‘मी’ नव्हतो.. नसणारच होतो.

प्रिती काऊंटरचे काम दुसर्‍या कुणालातरी देऊन माझ्याकडे आली.

“यु ओके?”, माझ्या डोळ्यात खोलवर पहात तिने विचारलं.

मी अस्वस्थपणे इकडे तिकडे बघत होतो. हातांची बोटं मोडत नसतानाही उगाचच मोडण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होतो. काय बोलावं, काय नाही.. काहीच कळत नव्हतं.

“कॉफी?”, प्रितीने अचानकच विचारलं.

मी क्षणभर चकीत झालो. इतक्या दिवसात मी कधी प्रितीला कॉफीबद्दल विचारावंसं वाटत असुनही विचारु शकलो नव्हतो, आणि तिनेही कधी विचारलं नव्हतं. त्यामुळे आज मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.

पण मग मी काय करायला हवं होतं.?. प्रितीबरोबरची.. खरं तर फक्त प्रितीबरोबरची पहीली कॉफी.. मी खुश व्हायला हवं होतं की नेहापासुन दुर झाल्याच्या दुःखातच रहायला हवं होतं?

प्रिती कॉफी आणायला गेली आणि मी लायब्ररीच्या बाहेरच्या गार्डनमध्ये मांडलेल्या टेबल्सवर जाऊन बसलो.

“माझं हे असं का होतं आहे? काहीच कळत नव्हत.. मी अजुनही नेहावर प्रेम करतो का? मी नेहाला त्या पाटलाशी लग्न करण्यापासुन थांबवायला हवं का? कसं ही करुन माझ्या आणि तिच्या आईवडीलांना कन्व्हींन्स करुन नेहाला लग्नाची मागणी घालावी का?”

“का हे क्षणभराच्या भावना आहेत..? इतक्या वर्षांचा मित्र आपल्याला सोडुन परदेशात जाणार असेल तरी कदाचीत आपल्याला असंच झालं असतं की… सत्य हेच आहे की प्रितीच्या बाबतीत मनाला जे संकेत मिळाले, ज्या भावना उमटल्या तसं नेहाच्या बाबतीत कध्धीच झालं नव्हतं. प्रितीच ती आहे जिच्यावर माझं प्रेम आहे..”

मनाने मांडलेले अनेक प्रश्न आणि मनानेच त्याला शोधुन काढलेली उत्तर.. सगळाच विचीत्र प्रकार होता.

प्रिती कॉफी घेऊन आली. बहुतेक वेळं तिच बोलत होती आणि मी ऐकत होतो. शक्यतो तिने नेहाचा विषय काढणं टाळलं.. ह्याउलट ती लायब्ररी बद्दलच बोलत राहीली.

आम्ही १०-१५ मिनीटं गप्पा मारल्या आणि मग प्रिती तिच्या कामाला निघुन गेली आणि मी घरी आलो. काल संध्याकाळनंतर पहील्यांदाच थोडं रिलॅक्स वाटलं. निदान काही काळासाठी का होईना, नेहाचा विषय मनातुन बाहेर गेला होता.

मी फक्त प्रितीबद्दलच विचार करायचा प्रयत्न केला, पण मन पुन्हा पुन्हा नेहाकडेच धाव घेतं होतं. संध्याकाळ हळु हळु आपले रंग घेऊन मनामध्ये उतरली.. पण ते रंग फिक्केच होते.

आईने उगाच प्रश्न विचारु नयेत म्हणुन संध्याकाळी कसं बसं जेवलो आणि खोलीत जाऊन पडलो.

इतक्या वर्षात पहील्यांदाच माझा मोबाईल इतका शांत होता. ना नेहाचा फोन, ना मेसेज, ना व्हॉट्स-अ‍ॅप

डोळ्यामध्ये पुन्हा अश्रु जमा व्हायला लागले. मी नाईट-लॅम्प बंद करुन टाकला आणि डोक्यावरुन अंथरुण ओढुन झोपेची वाट पहात पडुन राहीलो.

खुप रात्री कधी तरी झोप लागली..

[क्रमशः]

प्यार मे.. कधी कधी (भाग-४)


भाग ३ पासून पुढे >>

“डू आय बिलीव्ह इन लव्ह अ‍ॅट फ़र्स्ट साईट?”, ऑफीसला जात असताना डोक्यात एक विचार चमकुन गेला…
“फ़र्गेट फ़र्स्ट साईट, डू आय बिलीव्ह इन लव्ह?”

“व्हॉट इज लव्ह?”
“मनांशी मन जुळणं?, की जस्ट अ फिजीकल अ‍ॅट्रॅक्शन? का दोन्ही? का अजुन काही तिसरं पण असतं?”
“असणारंच.. कारण दोन भेटींमध्ये प्रितीबद्दल जे काही मला वाटत होतं ते ह्या दोन्हींपैकी कुठल्याही मुद्यावरुन नव्हतं. तिच्याबद्दलच्या भावना ह्या मनाच्या खूप आतून आल्या होत्या.. आणि खुपच स्ट्रॉग होत्या.. जसं काही मला तिच्याबद्दल जे वाटत होतं त्याबद्दल कुठलंही दुमत नव्हतंच..”

 

सोमवारची सकाळ ही बहुतांश आय.टी. वाल्यांची अजातशत्रु असते, आणि तो आय.टी. इंजीनीअर माझ्यासारखा.. नुकताच प्रेमात पडलेला असेल तर ती सकाळ अगदी नकोसं करुन सोडते.

नशिबाने ४ जुलै असल्याने अमेरीकेतील बहुसंख्य कलीग्स सुट्टीच्या मुड मध्ये असल्याने काम जास्ती आलं नव्हतं. सकाळच्या एक-दोन किरकोळ सिंक-अप मिटीग्ज उरकल्या, आठवड्याभराच्या कामाची आखणी केली आणि इतर इ-मेल्सना प्रत्युत्तर देऊन टाकल्यावर थोडा मोकळा वेळ मिळाला.

प्रितीचा विचार मनाच्या कोपर्‍यात होताच, जरा मोकळा वेळ मिळताच, पुन्हा त्याने मनाचा कब्जा घेतला.

मी घड्याळात नजर टाकली. १२:३० होऊन गेले होते. नेहाचं कॉलेज केंव्हाच सुटलं होतं. त्यामुळे कॉलेजपाशी जाऊन प्रितीला अनपेक्षीत भेटण्याची शक्यता नव्हती.. पण.. कदाचीत….

मी पट्कन माझा कलीग.. ’दिनेशला’ पिंग केले

“हाय दिनेश”
“हाय तरुण.. व्हॉट्स अप..”

“अरे.. मी जरा लंच टाईममध्ये सिटी लायब्ररीमध्ये जाऊन येतोय.. थोडा उशीर झाला तर आपली २ ची मिटींग चालु कर, मी आलो की लगेच जॉईन करतो..”
“नो प्रॉब्लेम.. आय विल हॅन्डल…”

मी पट्कन बाहेर पडलो.

प्रिती दुपारची बर्‍याचदा ‘सिटी लायब्ररी’मध्ये जाते.. किंबहुना जात असावी असा एक अंदाज होता. त्यामुळे मी माझा मोर्चा सिटी लायब्ररीकडे वळवला होता. मनामध्ये एकच धावा करत होतो.. “प्लिज प्लिज गॉड प्लिज… प्रिती असु देत लायब्ररी मध्ये.. आणि प्लिज प्लिज.. प्रिती असो.. किंवा नसो.. तेथे नेहा नसु देत…”

 

सिटी लायब्ररी, नेहमीप्रमाणेच गर्दीने भरलेली होती. ‘विक’डे बहुतांश गर्दी ही एकतर कॉलेज गोईंग स्टूडंन्ट्स किंवा पेन्शनर आणि गृहीणींची होती.

मी लायब्ररीच्या प्रवेश द्वारातुन सगळीकडे नजर टाकत आत शिरलो.

खालच्या मजल्यावर विवीध प्रकारची छोटी छोटी दालनं केलेली होती. “स्टोरी बुक्स”, “टेक्नीकल पब्लीकेशन्स”, “सायन्स-फिक्शन्स”, “कुकिंग-रेसेपिज”, “बॉलीवुड-हॉलीवुड गॉसिप मॅगझीन्स”.

“कुठे असेल प्रिती?”

पुढची जवळ जवळ १५ मिनीटं मी सगळे सेक्शन पालथे घालण्यात घालवले, पण ती कुठेच दिसत नव्हती. मन निराशेने भरुन जात होते.

शेवटचा सेक्शन.. रेसेपीज..

मी आतमध्ये गेलो.

आतमध्ये बहुतांश नवविवाहीत मुली निरनिराळी पुस्तक चाळण्यात मग्न होत्या. ऑफकोर्स प्रिती इथेही नव्हती.

मी निराश होऊन मागे वळणारच होतो एवढ्यात तो मधाळ-साखरेत घोळलेला गोड आवाज कानवर पडला..

“मे आय हेल्प यु तरुण?”

मी खाड्कन मागे वळलो.

मागे प्रिती उभी होती. पर्ल व्हाईट रंगाचा कुर्ता आणि लेगिंज्स, व्हाईट रंगाचीच छोट्टीशी बिंदी, हातात निळ्या, गुलाबी, लाल, जांभळ्या रंगाच्या बांगड्या, थोडेश्शे थिक़ सोलचे सॅन्ड्ल्स आणि चेहर्‍यावर तेच ते.. हृदयाला भेगा पाडणारे मिलीयन डॉलर्स स्माईल..

“ओह हाय प्रिती…”, मी योगायोग दाखवण्याचा प्रयत्न करत म्हणालो..

“काय शोधतो आहेस?”, प्रिती..
“अं.. अ‍ॅक्च्युअली, दुपारी एक अर्जंट मिटींग आहे, त्यासंबंधी काही नोट्स काढायच्या होत्या. म्हणलं इथं लेटेस्ट पब्लीकेशन्स मिळतील म्हणुन बघत होतो..”

“ओह.. मग मिळाली का?”, प्रिती
“नाही ना.. जे पाहीजे होतं ते नाहीच सापडलं..”, मी उगाचच चेहर्‍यावर निराशा आणत म्हणालो..

“नाहीच सापडणार.. “, प्रिती ने सेक्शनच्या हेडींगकडे बोट दाखवलं आणि म्हणाली.. “तु चुकीच्या सेक्शनमध्ये बघतो आहेस.. रेसेपिज मध्ये टेक्नीकल्स कसं मिळेल…”

“ओह.. खरंच की .. मी बघीतलंच नाही.. बट एनीवेज.. हाऊ कम यु आर हिअर? बुक्स बदलायला?”, मी
“नो.. आय वर्क हिअर…”, प्रिती

“यु व्हॉट??”, क्षणभर माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना..
“आय वर्क हिअर.. मी इथे दुपारी पार्ट टाईम काम करते..”, प्रिती

“पण का?”
“का?.. कारण मला बुक्स खुप आवडतात, ह्या असंख्य पुस्तकांमध्ये माझी दुपार मस्त जाते.. दुपारी उगाच घरी लोळत पडण्यापेक्षा इथे मला छान वाटतं.. शिवाय.. सेल्फ एस्टीम.. स्वाभीमान.. पॉकेटमनीसाठी घरी पैसे पण नाही मागावे लागत..”, प्रिती हसत हसत म्हणाली..

मी काही तरी बोलणार एव्हढ्यात एक खत्रुड म्हातारी ‘हृदयरोग आणि त्यावरील उपचार’ असलं काही तरी पुस्तक कुठे आहे विचारायला आली.

“ऑलराईट..” तिला घेउन जाता जाता प्रिती म्हणाली.. “भेटु नंतर.. थोडं बिझी आहे.. इफ़ यु वॉन्ट अनीथींग, लेट मी नो.. मी सेकंड फ्लोवर वर आहे.. बाय..”, असं म्हणुन ती निघुन गेली.

“आय वॉन्ट अ डेट विथ यु.. कॅन आय?” मी मनातल्या मनातच म्हणालो

 

प्रितीची भेट नक्कीच मनाला सुखावणारी होतीच, पण दुसरी सुखावणारी गोष्ट होती ती म्हणजे ‘प्रिती सिटी लायब्ररीमध्ये दुपारी पार्ट टाईम करते” ही होती. म्हणजे दुपारी कधीही तिला भेटावंसं वाटलंच तरी ती कुठे भेटेल हे नक्की होतं

आता प्रश्न होता की आजच्या प्रितीच्या भेटीबद्दल नेहाला सांगावं का? जर आज सांगीतलं तर पुढे प्रत्येक वेळी मी केंव्हा केंव्हा सिटी-लायब्ररीला गेलो आणि प्रितीशी भेट झाली हे सांगणं आलं असतं. त्यामुळे सध्यातरी काहीच न बोलावं असं ठरवलं. अगदीच प्रितीने सांगीतलं असतं तर काहीतरी सारवासारवं करता आली असती.

पुढचे दोन-तिन दिवस मी नेहाच्या संपर्कात होतो, पण तिने कधीही प्रितीचा किंवा मी सिटी-लायब्ररीला तिला भेटण्याचा विषय काढला नाही. थोडक्यात ह्याबद्दल प्रितीनेही तिला काहीच सांगीतलं नव्हतं हे नक्की…

खरं तर, मला पुर्ण खात्री होती की प्रिती नेहाला नक्की सांगेल आणि त्यासाठी द्यायच्या उत्तराचीही मी तयारी करुन ठेवली होती. पण प्रिती नेहाला काहीच बोलली नाही हे अनपेक्षीतच होतं.

“का केलं असेल प्रितीने असं? विसरली असेल? का मुद्दामच सांगीतलं नसेल?”
“मी सिटी-लायब्ररीमध्ये येणं.. तिला भेटणं.. तिला आवडलं असेल का?”

मी पुन्हा एक चान्स घ्यायचा ठरवला. शुक्रवारी तसंही दुपारनंतर ऑफीस रिकामंच व्हायला लागतं. जवळपासच्या गावी.. मुंबई, सांगली, कोल्हापुर वगैरेला रहाणारी मंडळी, दुपारनंतरच कल्टी मारुन एकदम सोमवारी सकाळी ऑफीसला उगवत. त्यामुळे दुपारनंतर वर्कलोड कमी होता. मी लगेच संधी साधुन सिटी-लायब्ररीला पोहोचलो.

प्रिती खालच्या मजल्यावरच्या काऊंटरवरच होती. मला येताना पहाताच तिने लांबुनच हाय केलं.. मी लगेचच टेक्नीकल्स सेक्शनला जाऊन पुस्तक चाळु लागलो. पण माझं लक्ष पुस्तकांत कमी आणि प्रितीकडेच होतं. डेस्कवरच्या संगणकावर ती कसलीतरी लिस्ट अपडेट करत होती.

मी सर्वकाही विसरुन तिच्याकडेच पहात होतो. किती वेळ?? कुणास ठाऊक. आजुबाजुने अनेकजण येत-जात होते, पण मला त्याची पर्वा नव्हती. मी जणु काही कुठल्यातरी दुसर्‍याच जगात होतो. आणि अचानक प्रितीने वर पाहीलं.. आमची नजरानजर झाली.

मी पटकन दचकुन दुसरीकडे पाहीलं. प्रितीने मला तिच्याकडे पहाताना नक्कीच बघीतलं होतं…

“ओह गॉड.. हर आईज.. यु विल किल मी वन डे स्टुपीड विथ दॅट लुक..”, मी स्वतःशीच प्रितीला म्हणालो..

हृदय धाड-धाड उडत होतं. इतक्या गोंगाटातही, मला त्याची धडधड कानांत ऐकु येत होती. शेवटी कुठलंतरी एक पुस्तक उचललं आणि माघारी वळलो.
प्रिती डेस्कवर नव्हती. मी आजुबाजुला तिला शोधायचा प्रयत्न केला, पण ती कुठेच दिसली नाही.

माझा नंबर येताच, पुस्तकाचं कार्ड काउंटरला रजिस्टर केलं आणि तेथुन बाहेर पडलो.

 

मी काही दिवसांतच सिटी-लायब्ररीची अ‍ॅन्युअल मेंबरशीप घेऊन टाकली. लवकरच माझ्या सिटी-लायब्ररीच्या चकरा वाढल्या. तसं माझं आणि प्रितीचं फारसं बोलणं व्हायचं नाही. बर्‍याचवेळेला ती कामातच असायची आणि उगाचच तिल कामात डिस्टर्ब करायची माझी इच्छा नव्हती. बहुतांश वेळ फक्त ‘हाय’ किंवा ‘बाय’ ह्यावरच असायचं. पण हे ही नसे थोडकं. बर्‍याचवेळा आमची नजरानजरही व्हायची. त्या नजरेत कोणतेच भाव नसायचे. खरं तर मला कळत नव्हतं की ति पण माझ्याकडे बघते आहे? का मी तिच्याकडे बघतो आहे हे बघायला ती माझ्याकडे बघते आहे.

पण काहीही असलं तर तेव्हढी एक नजरही पुरेशी होती मला. त्यानंतर दिवसभर मला प्रितीचा हॅगओव्हर असायचा. कधी नेहाशी फोनवर बोलताना चुकुन मी नेहाला ‘प्रिती’ म्हणुनच हाक मारेन अशी भिती वाटायची. जणु काही माझ्याच मल्टीपल पर्सनालिटी झाल्या होत्या. एक नेहासाठी आणि एक प्रितीसाठी. एकाची गोष्ट दुसर्‍याला कळता कामा नये. मानवी मन कित्ती विचीत्र असतं. माझ्या मनाने आता एक नविनच खेळ चालु केला होता.

‘गिल्ट कॉन्शीयस..’

प्रितीला भेटलो की नेहाचा चेहरा समोर यायचा. नेहाला मी फसवतो आहे असला काहीसा विवेकी की अविवेकी विचार डोक्यात पिंगा घालायला लागायचा. शेवटी नेहाचं आणि माझं अजुन ब्रेक-अप झालं नव्हतं. आम्ही अजुनही ‘कपल्स’च होतो. लग्न करणार नसलो, तरी ह्याचा अर्थ कदापी असा नव्हता की ती असतानाच मी दुसरीबरोबर फ्लर्ट करावं.. या उलट नेहाशी बोलताना मनामध्ये फक्त आणि फक्त प्रिती असायची. नेहाशी मी पहील्या इतका एकरुप होऊच शकत नव्हतो.

सारखी मनामध्ये एक प्रकारची भिती असायची –

“प्रिती ने नेहाला मी जवळ जवळ रोज सिटी-लायब्ररीमध्ये भेटतो सांगीतलं तर?”
“नेहाला कधी चुकुन प्रिती म्हणुन हाक मारली तर?”
“प्रितीला माझ्या विचीत्र वागण्याचा संशय आला आणि तिने मला भेटणं सोडुन दिलं तर?”
“माझ्यामुळे प्रिती आणि नेहाची मैत्री तुटली तर?”
“काहीतरी अघटीत घडुन नेहा आणि प्रिती दोघींनीही माझ्याशी बोलणं टाकलं तर?”

एक ना अनेक.. खरंच म्हणतात ना.. “मन चिंती ते वैरी ना चिंती..”

 

मोठं मोठी लोकं सांगुन गेली आहेत..‘थिंक पॉझीटीव्ह.. अ‍ॅन्ड पॉझीटीव्ह थिंग्स विल हॅपन..” माझ्या मनात तर निगेटीव्ह थिंकींग ने थैमान घातला होता आणि नेमका एक दिवशी नेहाचा फोन आला..

“हॅलो..”
“तरुण.. संध्याकाळी ७.३० ला भेट मॅक-डीला..”

विनाकारण नेहाचा आवाज मला थोडासा चिडका.. थोडासा टेन्स्ड वाटत होता..

“काय झालं असेल? तिला प्रिती बोलली असेल का काही?”

“हॅल्ल्लो तरुण.. ऐकु आलं नं… ७.३० शार्प…”
“अगं पण, आज लेट होईल थोडं ऑफीसला… उद्या नाही का चालणार..”, मी थोडा वेळ काढायला बघत होतो..
“नो तरुण.. आजच.. ७.३० शार्प..”

मला बोलायची संधी न देताच नेहाने फोन ठेवुन दिला.

रोनाल्ड मॅक्डोनाल्ड.. आता तुच वाचवं रे बाबा म्हणतं मी कोपरापासुन हात जोडले.

काय होणार होतं आज संध्याकाळी?? त्या नियतीलाच ठाऊक.

कसाबसा संध्याकाळी ६.४५ पर्यंत ऑफीसमध्ये वेळ काढला आणि मग मॅक-डी ला जायला बाहेर पडलो…

 

[क्रमशः]