तुझ्या विना (भाग-२)


भाग १ पासुन पुढे>>

प्रसंग २ :

स्टेजवर अजुनही अंधारच आहे, पण स्पिकरवरुन होणार्‍या अनाऊन्समेंटचा आवाज ऐकु येतो आहे.

ईंडीयन एअरलाईन्स प्लाईट नंबर आय.ए. थ्री. सेवन नाइन इज डिलेड बाय थ्री आवर्स. फ्लाईट इज नाऊ स्केड्युल्ड टु डिपार्ट फ्रॉम गेट नं. ७ ऐट फ़ोर्टीन ट्वेंन्टी.

आय रिपीट… ईंडीयन एअरलाईन्स प्लाईट नंबर आय.ए. थ्री. सेवन नाइन इज डिलेड बाय थ्री आवर्स. फ्लाईट इज नाऊ स्केड्युल्ड टु डिपार्ट फ्रॉम गेट नं. ७ ऐट फ़ोर्टीन ट्वेंन्टी.

पुन्हा एकदा विमानाच्या टेक-ऑफचा आवाज येतो..

पुन्हा अनॉन्समेंन्ट, प्लाईट नं एस. नाईन्टी ऑफ सिंगापुर एअरलान्स इज नाऊ रेडी टु डिपार्ट इन थर्टी मिनीट्स, ऑल द पॅसेन्जर्स आर रिक्वेस्टेड टु प्रोसीड टु गेट नंबर एलेव्हन प्लिज..

चिनी भाषेतुन पुन्हा काही अनाऊन्समेंट्स आणि जाहीराती चालु रहातात.
थोड्यावेळाने स्टेजवर हळु हळु प्रकाश पसरतो.

समोर एअरपोर्टवरील असु शकतो असा एक कॅफे आहे. एक तरुणी, अर्थात पहील्या प्रसंगातील अनु, आपला लॅपटॉप उघडुन त्यावर काही काम करत बसली आहे. आजुबाजुचे टेबल्स भरलेले आहेत.

केतन पाठीला बॅग, हातात बॅग घेउन वैतागत जागा शोधत शोधत त्या तरुणीच्या टेबलापाशी येऊन बसतो. रिकामी खुर्ची बघुन केतन थबकतो.

केतन : एनीबडी सिटींग हीअर?

ती तरुणी वर न बघताच मानेनेच नाही म्हणते.

केतन : कॅन आय सिट हिअर?

ती तरुणी वैतागुन केतनकडे बघते.. मग मानेनेच हो म्हणते आणि पुन्हा लॅपटॉपवर काम करण्यात मग्न होऊन जाते.

केतन आपली बॅग कडेला ठेवतो आणि खुर्ची ओढुन बसतो. थोडावेळ शांततेत जातो. केतन दोन-तिनदा त्या तरुणीकडे बघतो परंतु ती तरुणी अजुनही लॅपटॉपवर काम करण्यात मग्न असते.

केतन (शेवटी न रहावुन) : धिस फ्लाईट डिलेज आर रिएली फ्रस्ट्रेटींग.. इझंट इट?
अनु (एकदा केतनकडे वरपासुन खालपर्यंत निरखुन पहात) : याह.. ट्र्यु

अनु पुन्हा कामात मग्न होऊन जाते.

केतन : देसी?.. अह.. आय मीन इंडीयन?
अनु : (वर न बघताच..) येस्स….

केतन काही क्षण तिच्याकडे रागाने बघत रहातो.

केतन (स्वगत) : च्यामारी बिस्कीट खारी, ही समजते कोण स्वतःला? च्यायला मी चेहर्‍यावरुनच घाटी कळुन येतोय की काय? ही नक्कीच दिल्लीची असावी..

इतक्यात अनुचा फोन वाजतो…

अनु (फोनवर) : हॅलो.. आई.. अगं नाही ना.. फ्लाईट डिले आहे दोन तास.. इथे एअरपोर्टवरच अडकुन पडले आहे.. (काही क्षण शांत) अगं हो ना.. आधी फोन करायला हवा होता.. असो दोनच तास आहे म्हणुन बरं.. (पुन्हा काही क्षण शांत).. हो.. हो हो.. हम्म.. बॅंगलोरला पोहोचले की करते फोन.

अनुला मराठीतुन बोलताना पाहुन केतन आश्चर्यचकीत होतो.

केतन काही बोलण्यासाठी तोंड उघडतो एवढ्यात…

अनु : (त्याचा पुढचा प्रश्न आधीच ओळखुन) हो.. मी महाराष्ट्रीयनच.. मुंबईची… मला मराठी येतं.. अजुन काही..???
केतन : मग तु आधी बोलली नाहीस तुला मराठी येत..
अनु : पण मी मराठी येत नाही, असं तरी कुठं म्हणाले?

केतन चिडतो आणि दुसरीकडे तोंड करुन बसतो.
अनु त्याच्याकडे.. चिडलेल्या केतनकडे बघुन स्वतःशीच हसते आणि मग लॅपटॉप बंद करुन बॅगेत ठेवुन देते.

अनु : तु मुंबईचाच का?

केतनचा चेहरा पुन्हा आनंदाने उजळतो आणि तो अनुकडे तोंड करुन बसतो..

केतन : हो मुंबईचाच.. म्हणजे मी गेली आठ वर्ष स्टेट्सला होतो, इन्फी मध्ये.. आता महीनाभराची सुट्टी घेऊन घरी चाललो आहे.. तु?
अनु : मी इथेच असते शांघायला.
केतन : आय.टी.?
अनु : परदेशात असलं म्हणजे आय.टी. मध्येच असायला हवं का? इतर क्षेत्रही आहेत ज्यामध्ये परदेशगमनाची संधी मिळते..
केतन : मग? काय करतेस तु?

अनु : मी गव्हर्मेंटच्या सांस्कृतीक खात्यात काम करते. चायनाशी सांस्कृतीक देवाण-घेवाण, इकडचे विद्यांर्थ्यांना तिकडे स्थाईक होण्यासाठी मदत, चिनी भाषेचा प्रसार वगैरे वगैरे.. जेंव्हा भारतात असते तेंव्हा चिनी भाषेचे क्लासेस घेते.. नेहमीपेक्षा थोडं हट के.. चालु असते..
केतन : व्वा.. छान की.. बरं आहे तुम्हाला आमच्या सारखी रिलिजेसची कटकट नाही.. त्यात गव्हरमेंट जॉब म्हणल्यावर तर काय आरामच…
अनु : असं काही नाही.. उलट खुप काम असतं कित्तेक लोकांना भेटावं लागतं.. देश्याचं प्रतिनिधीत्व करताना दडपण असतंच.. डिप्लोमसी जपावी लागते. उलट तुम्हा लोकांचच बरं असतं बंद काचेच्या चकाचक इमारतींमध्ये ए/सी लावुन आरामशीर तंगड्या टाकुन बसायचं, काही अडल तर गुगल असतंच…
केतन : अह्हा.. म्हणे गुगल असते.. करुन बघ एकदा काम म्हणजे कळेल..

अनु : असो.. हा विषय नको.. सो तु मुंबईचा तर बॅंगलोरला कश्याला?
केतन : अगं एक छोटे ट्रेनींग द्यायचे होते आमच्या बॅंगलोरमधील एका टिमला.. अनायसे मी भारतात येतच होतो तर ते काम माझ्याच गळ्यात टाकले.. सो उद्या संध्याकाळ पर्यंत बॅंगलोरला आणि संध्याकाळच्या फ्लाईटने मुंबई. तु?
अनु : मला मुंबईचे टिकीट्स नाही मिळाले.. मला आजच पोहोचणं महत्वाचे होते.. सो थोडा द्रवीडी प्राणायाम करायला लागतोय.. बट इट्स ओके.. घरी जाण्याची जी ओढ असते ना.. त्यामुळे थोडा त्रासदायक प्रवास असला तरीही काही वाटत नाही.
केतन : आस्क मी.. आठ वर्षांनी चाललो आहे घरी.. मला कोणी अजुन चार कनेक्टींग फ्लाईट्स पकडुन जायला सांगीतले ना तरी जाईन मी…मलाही टिकेट्स नव्हतीच मिळत.. शेवटी बिझीनेस क्लासचे घेतले..
अनु : अय्या.. मी पण बिझीनेस क्लासमध्येच आहे.. बघु नंबर..
केतन आणि अनु दोघंही बॅगेतुन टीकिट्स बाहेर काढुन एकमेकांचे नंबर बघतात..
अनु : शेजारीच आहेस तर.. 

केतन टेबलावर ठेवलेला अनुचा मोठ्ठा कॅमेरा उचलतो…

केतन : तुझा आहे?
अनु : नाही.. तो पलीकडे चिनी बसलाय ना.. त्याचा ढापलाय.. (थोड्यावेळ थांबत व मग हसुन,) ऑफकोर्स माझा आहे..
केतन : डी.एस.एल.आर. ना? वॉव निकॉन डी३ एस?? सॉल्लीड महाग आहे म्हणे.. कित्ती ४ लाख ना? आणि ही लेन्स.. ८०-८५ हजार…?
अनु : व्वा.. बरीच माहीती आहे की तुला…
केतन : हो.. माझ्या दोन-चार मित्रांना आहे शौक फोटोग्राफीचा… काय पैसा घालवतात वेड्यासारखा..
अनु : वेड्यासारखा काय.. छंदाला मोल नसते रे.. आणि तु फोटो क्वॉलीटी पाहीलीस का? हे बघ फ्लेमींगो चे फोटो मागच्याच आठवड्यात काढले होते.. बघ कसले शार्प आलेत..

अनु कॅमेरातले फोटो केतनला दाखवते..

केतन : कॅमेरामध्ये इतके पैसे घालवण्यापेक्षा मी त्याच पैश्यात घरी दोन-तिन फ्लेमींगो विकत घेउन ठेवेन.. जमलंच तर एखादा प्रशीक्षक पण ठेवेन त्या फ्लेमींगोंना ट्रेन करायला. मग माझ्या सवडीने माझ्या साध्या कॅमेरातुन पण असे घरबसल्या फोटो काढेन.. मान तिरकी केलेला फ्लेमींगो.. एक पाय उचललेला फ्लेमींगो.. कॅमेराकडे बघणारा फ्लेमींगो..

केतन उठुन उभा रहातो आणि स्वतःच फ्लेमींगो असल्याच्या अविर्भावात एक पाय वर करुन कधी इकडे बघ तर कधी चोचीने खाली किडे वेच असले उद्योग करतो आणि स्वतःशीच हसु लागतो.

अनु कॅमेरा बंद करुन परत ठेवुन देते..

अनु : व्हेरी फनी….

थोडावेळ शांतता…

केतन : यु नो व्हॉट… तु मगाशी म्हणालीस ना.. काही अंशी ते खरं आहे.. गुगल ने खुप मदत होते.. पण तुझं काम खरंच छान आहे. म्हणजे नविन लोकांना भेटायंच, त्यांच्या आयुष्याचा काही दिवसांकरीता का होइना भाग बनायचं.. नविन अनुभव, नविन ओळखी जोडायच्या.. नविन ठिकाणं पहायची.. हेच तर लाईफ आहे.. आणि तुला फोटोग्राफीची आवड आहे म्हणल्यावर तर काय, अश्या कित्तेक सुंदर आठवणी फोटोच्या रुपाने तुझ्याकडे संग्रही असतील.. नाही का?

अनु केतनकडे पाहुन हसते.

केतन : ह्या चायनीज काय.. किंवा जापनीज काय.. महाभयंकर भाषा आहेत बुवा.. नुसतीच चित्र चित्र. आणि त्याहुन ही माणसं सगळी एकसारखीच दिसतात.. एकदा माहीते काय गम्मत झाली? मी मॅक्डोनाल्ड मध्ये होतो तेथे एक असाच चिपचिप्या डोळ्यांचा, बुटका माणुस माझ्या पुढे होता. माझ्या मागच्या प्रोजेक्टचा क्लायंट जापनीज होता ना, त्यामुळे मला थोडंफार जॅपनीज येत म्हणलं दाखवावं आपलं शहाणपण म्हणुन मी त्याला म्हणलं.. “कोंन्बावा…” अर्थात “हॅलो.. ” तर त्याच्या चेहर्‍यावर काही भावच नाहीत…

अनु : मग?
केतन : मग काय, मी त्याला म्हणलो.. आर यु जॅपनीज.. तर हसला आणि म्हणाला.. आय अम सॉरी.. आय एम कोरीयन..

अनु खळखळुन हसते.. केतन तिच्याकडे पहात रहातो…

अनु : हो.. खरं आहे तुझं म्हणणं.. सगळेजण बरेचसे एकसारखेच दिसतात..

पुन्हा काही वेळ शांतता..

केतन : तुला एक कॉम्लिमेंट देऊ?
अनु : ओह.. शुअर.. गो अहेड..
केतन : तुझी स्माईल ना खुप गोड आहे.. किप स्मायलींग.. अलवेज…
अनु : थॅक्स.. नक्कीच.. मला हसायला खुप आवडते.. उगाच रुसुन, फुगुन बसायला, तोंड पाडुन फिरायला नाही जमतरे मला.. उद्याचा काय भरवसा? आजच आयुष्य मस्त जगायचं बघ..
केतन : ए तुला एक जोक सांगु? चिनी भाषेशीच संबंधीत आहे.. आवडेल तुला..
अनु : हो.. सांग ना.. पण चायनातील शाळेचे नाव काय असेल?.. उत्तर – “या शिका”.. किंवा ब्रुसलीची आवडती डिश कोणती – उत्तर : “इड-ली”.. असले काही पाचकळ पि.जे. असतील तर प्लिज नको सांगुस.. हजारदा ऐकलेत..

केतन रागाने अनुकडे बघतो आणि मग काही न बोलता गप्प बसतो.
थोडावेळ शांततेत जातो.

अनु : काय रे..? काय झालं..? चिडलास?
केतन : मी कश्याला चिडु.. मला नाही राग-बिग येत..
अनु : अस्सं.. मग हास ना रे एकदा.. ती बघ ती कोपर्‍यातली चिनी मुलगी तुला लाईन देते आहे..

केतन एकदा मागे बघतो आणि मग अनुकडे बघुन हसतो.

अनु : (हसणार्‍या केतनकडे बघुन हाताची बोटं बंदुकीसारखी करत).. स्टॅच्यु

केतन दोन क्षण स्तब्ध होऊन बसतो.. चेहर्‍यावरची स्माईल तशीच हसते..
अनु : स्टॅच्यु ओव्हर ऐन्ड यु अलसो..(थोड्यावेळ थांबुन) किप स्माईलींग..

केतन आणि अनु खुप वेळ एकमेकांकडे पहात रहातात.

अनु : बरं मला सांग किती दिवस आहेस मुंबईमध्ये…?
केतन : आहे.. एक महीना तरी आहे.. भेटूयात?

अनु : का रे..? तुला मुंबईवगैरे फिरायची आहे आणि म्हणुन तु मला रिक्वेस्ट वगैरे करणार आहेस की काय?
केतन : छे गं.. म्हणजे मान्य आहे.. कित्तेक वर्षात गेलो नाही मुंबईला.. पण शेवटी रक्तात मुंबईच आहे ना.
अनु : बरं.. भेटु आपण.. नक्कीच भेटु… आणि आता तु नाही म्हणालास ना.. तरीही मी भेटेन तुला…

इतक्यात अनॉन्समेंन्ट होते : ईंडीयन एअरलाईन्स प्लाईट नंबर आय.ए. थ्री. सेवन नाइन इज नाऊ रेडी टु डिपार्ट इन थर्टी मिनीट्स, ऑल द पॅसेन्जर्स आर रिक्वेस्टेड टु प्रोसीड टु गेट नंबर सेव्हन.. प्लिज..

आय रिपीट… ईंडीयन एअरलाईन्स प्लाईट नंबर आय.ए. थ्री. सेवन नाइन इज नाऊ रेडी टु डिपार्ट इन थर्टी मिनीट्स, ऑल द पॅसेन्जर्स आर रिक्वेस्टेड टु प्रोसीड टु गेट नंबर सेव्हन.. प्लिज..

अनु : निघुयात? चेक-इनला मोठ्ठा क्यु असणारे…
केतन : (खुर्चीतुन उठत) येस्स शुअर.. चलो मुंबई…..

अनु : ओह.. बाय द वे.. मी अनु.. (शेक हॅन्ड साठी हात पुढे करते)
केतन : (शेक हॅन्ड करत) मी केतन…

दोघेही उठतात, आपल्या बॅगा घेतात आणि स्टेजच्या बाहेर जातात.

 

[क्रमशः]

1 thought on “तुझ्या विना (भाग-२)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s