तुझ्या विना (भाग-४)


भाग ३ पासुन पुढे>>

प्रसंग -४ स्थळ तेच.. केतनचे घर..

स्टेजवर सखाराम बाजार-रहाटाच्या पिशव्या घेउन येतो…

सखाराम : गोमु संगतीनं.. माझ्या तु येशील काय.. गोमु संगतीने माझ्या तु येशील काय?
माझ्या पिरतीची.. राणी तु होशील काय…

तायडी हॉलमध्ये लॅपटॉप उघडुन काही तरी पहात बसली आहे. तायडीला एकटेच बघुन सखाराम पिशव्या पटकन स्वयंपाकघरात ठेवुन तिच्या जवळ येऊन थांबतो..

सखाराम : तुमास्नी म्हणुन सांगतो ताय.. मला काय केतन दादांच ते अमेरीकन बाईशी लगीन करायचं पटलं नाय बगा.. अवं आपल्या देश्यात काय कमी शुंदरी हाएत व्हय.??. अवं आपल्या सुशांत दादाने बघा कशी छान बायडी केली लग्नाला.. अनं.. ते केतन दादांच कायतरी भलतचं..
तायडी : अरे तो त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे..
सखाराम : अवं, कसला वैयकित प्रशन.. अहो.. त्या माय ला नसल काय ओ वाटत.. आपली बी अशीच शुन असावी.. ती अमेरीकन इथं घरात अशी उघडी नागडि फिरनार अनं..
तायडी : शी सख्या.. उघडी नागडी काय?…
सखाराम : तुम्ही काय बी म्हणा.. मला काय ते पटलं नाय बगा….

एव्हाना केतन आवरुन बाहेर येउन बसतो.

तायडी : हाय स्मार्टी…
केतन: हाय!! ..तायडे.. अगं इथं एखादं इलेक्ट्रॉनीक्सच दुकान आहे का गं? अग माझा लॅपटॉपचा चार्जर इथं चालत नाही.. त्याला पुढे एक अडाप्टर घ्यावा लागेल..
तायडी : अरे हे काय पुढं कॉर्नरला आहे ना..
केतन : अगं बघुन आलो मगाशी, आजुबाजुला इथं कुणाकडेच नाहीये…
तायडी : पुढं एक मॉल झालाय बघ.. बरीच दुकानं आहेत तिथ.. तिथं नक्की मिळेल…
केतन : पुढं कुठं?? चालत जाण्याच्या अंतरावर आहे का?
तायडी : नाही.. इतकं पण जवळ नाही.. रिक्शा करुन जा…
केतन : बरं.. येतो जाऊन मी…
तायडी : अरे नाही तर एक काम कर.. अनुला घेउन जा.. कश्याला हवी रिक्शा.. ति योग्य दुकानात घेऊन जाईल तुला…

अनुचं नाव काढताच केतनच्या चेहर्‍यावर आनंद पसरतो, तर सखाराम उठुन बसतो..

सखाराम : अवं अनु ताईस्नी कश्याला तरास देताय.. म्या घेऊन येतो, काय हवंय तुम्हाला..?
केतन : अरे.. सखाराम.. तुला नाही कळायचं मला काय हवंय ते.. चुकीचं आणशील काही तरी तु..
सखाराम : अवं दादा.. लिहुन द्या नव्हं.. आणतो की मी…
तायडी : अरे.. जाऊ देत ना त्याला.. तेवढंच फिरणं पण होईल बाहेर.. तुला लॅपटॉपचं नाही कळणार काही.. दादु..जा तु अनुला घेउन..
केतन : (आनंदाने) हो ना, सख्या तुला काय कळणार मला काय हवंय.. नको नको.. तु नको.. मीच जातो… (मग तायडीकडे बघत) काय ग तायडे, ते समोरचेच घर ना अनुचे?

सखाराम चिडुन पुन्हा आपल्या कामाला लागतो. केतन निघुन जातो..

सखाराम : तायडे.. हे असं केतन दादाने अनुताईंबरोबर जाणं.. मला नाय आवडलं.. सुशांत दादा चिडतील नव्ह का?
तायडी : सख्या.. अरे ती जशी सुशांतची बायको तशी केतनची वहीनी नाही का?
सखाराम : अवं पण होणारी ना.. केतनदादा म्हंजी विलायतीत राहीलेलं पोर….नाय म्हनला तरी तिकडुचं थोंड फार वारं घुसनार नव्हं अंगामंदी
तायडी : नाही रे सख्या.. तु काही म्हण, पण आपला केतन तसा नाही.. मला खात्री आहे…

थोड्यावेळाने स्टेजवर सुशांत आणि पार्वती खिदळत येतात.

तायडी दोघांना बघुन घसा साफ करते. तायडीला बघुन दोघेही शांत होतात. पार्वती मान खाली घालुन आत निघुन जाते.. सुशांत तायडीसमोर येउन बसतो.

सखाराम आsss वासुन पार्वतीकडे पहात असतो. मागे डर्टी पिक्चरमधील ’आरा रा नाक मुका नाक मुका नाक मुका.. आरा रा नाक मुका नाक मुका’ गाणे पार्वती जाई पर्यंत वाजत रहाते. पार्वती आपल्या कमरेला झटके देत आतमध्ये निघुन जाते.
पार्वती दिसेनाशी झाल्यावर सखाराम एक आवंढा गिळतो.

तायडी : काय रे सुशांता.. झालं का व्हिसाचं काम?

सुशांत : हम्म.. बहुतेक ३-४ दिवसांत मिळेल तारीख. (इकडे तिकडे बघत) केतन कुठे गेला? का झोपला परत?
तायडी : अरे त्याला ते काय ते लॅपटॉपचा चार्जर का काय ते घ्यायचे होते. अनुबरोबर गेलाय आणायला.
सुशांत : अनुबरोबर?
तायडी : हो अरे मीच म्हणलं त्याला.. अनुला घेऊन जा बरोबर.. ती बरोबर दुकाना घेऊन जाईल त्याला. तो उगाच कुठे शोधत फिरणार? येतीलच इतक्यात बराच वेळ झालाय जाऊन

सखाराम : बरं..मला थोडं सामान आनायचा व्हंता वाण्याकडुन.. म्या काय म्हंतो.. पार्वतीला घेऊन जाऊ काय बरोबर? नाय म्हंजी तिला पण कलेल ना आपन कुठुन काय घ्येतो.. पुढच्या येळेस ती पन जाऊन घेऊन येउ शकेल नव्हं..
सुशांत : (सखारामला) पार्वती कश्याला.. नको नको.. तुच जा एकटा आणि घेउन ये.
सखाराम : अवं पन..
सुशांत : सख्या.. नको म्हणलं ना.. नको!!
सखाराम : म्या बघतोया सुशांतदा, तुम्ही लई पार्शीलीटी करता… सगळी कामं मलाच सांगता तुमी.. आन तिला मात्र कामात मदत करता.. बघीतलाय मी..
सुशांत : (जोरात ओरडत) सख्या…………
सखाराम : वरडा.. किती बी ओरडा.. पन म्या खरं त्येच बोल्तोय…

इतक्यात केतन आणि अनु स्टेजवर येतात. अनु जोरजोरात हसत असते. केतन शांतपणे तिच्या मागोमाग येतो.

सुशांत : काय गं? काय झालं एव्हढं हसायला?
अनु : अरे हा केतन… (परत जोरजोरात हसायला लागते..)
सुशांत ; अगं जरा कळेल असं बोलशील का?
अनु : (हसु आवरण्याचा प्रयत्न करत) अरे.. आम्ही मॉल मध्ये गेलो होतो.. येताना हा.. हा केतन म्हणला मी चालवतो कार.. म्हणलं चालव.. म्हणुन त्याला किल्ली दिली..
तर.. (परत हसत बसते).. तर हा केतन किनई डाव्या सिटवर जाऊन बसला.. आणि हात हा असा.. असा… (कारचे स्टेअरींग व्हिल पकडण्याची अक्टींग करत..)

सुशांत सुध्दा हसायला लागतो..

तायडी : मग? त्यात हसण्यासारखं काय झालं?
अनु : अगं.. आपल्या इथे कारचे स्टेअरींग उजव्या बाजुला असते.. डाव्या बाजुला नाही..
तायडी : अगो बाई… (असं म्हणुन तायडी सुध्दा हसायला लागते..)
सखाराम : बघीतलं.. ह्यो आपला देश सोडुन दुसरीकडं राह्यल्याचा परीमाण.. ह्ये असं संस्क्रुती विसरत्याती लोकं..
केतन (चिडुन) : सख्या.. ड्रायव्हींगचा आणि संस्कृतीचा काय संबंध? (बाकीच्यांकडे बघत) एव्ह्ढ काही हसण्यासारखे नाहीये त्यात. मी आठ वर्ष तिकडे गाडी चालवत होतो.. तिकडे लेफ्ट हॅन्ड ड्राईव्ह आहे.. मला तिच सवय.. सवयीने चुकुन त्या बाजुला गेलो तर काय चुकलं माझं..??

पण सुशांत, अनु आणि तायडीच त्याच्या बोलण्याकडे लक्षच नसतं.. ते सर्व हसण्यात मग्न असतात.

एव्हढ्यात पार्वती बाहेर येते.. सुशांत आणि पार्वतीची नजरानजर होते आणि पार्वती आत निघुन जाते. केतनच्या नजरेतुन हे सुटत नाही. थोड्याच वेळात सुशांतसुध्दा उठुन आत निघुन जातो.

केतन काही तरी बोलण्यासाठी तोंड उघडतो तेवढ्यात..केतनची आई स्टेजवर येते…

आई : हुश्श… काय बाई हा उकाडा आणि काय ती रस्त्यावर गर्दी… छेछे..
तायडी : काय गं.. भेटले का गुरुजी?
आई : हो भेटले.. मोठ्ठी लिस्ट दिली आहे.. बर ते जाऊ देत.. सुशांत कुठे आहे.. हे बघ मी येताना काय घेऊन आले.
आई बॅगेतुन मुंडावळ्या काढतात. अनु, तायडी, आईंभोवती जमा होतात.
आई : सुशांत.. ए सुशांत..
सुशांत : (आतुन कुठुन तरी आवाज येतो..) आलो.. आलो आई एक दोन मिनीटं हा…
आई : काय बाई हा मुलगा.. काय सारखं आत मध्ये करत असतो कुणास ठाऊक.. (अनुकडे बघत).. अनु तु ये बघु इकडे..

अनु आईंच्या समोर जाऊन गुडघ्यावर बसते. आई तिच्या डोक्याला मुंडावळ्या बांधतात. आधीच सुंदर दिसणारी अनु अजुनच सुंदर दिसु लागते. केतन तिच्याकडे पहाण्यात हरखुन जातो.

तायडी : अग्गो बाई.. कित्ती गोड दिसते आहे अनु नै..

तायडी आणि आई दोघीही कौतुकाने अनुकडे बघत रहातात. अनु अचानक केतनकडे बघते. केतन अनुकडे बघण्यातच मग्न असतो. दोघांची नजरानजर होते. केतन पटकन दुसरीकडे बघतो.

आई : सुशांत.. ए सुशांत.. अरे येतो आहेस ना..
तायडी : अगं हा आपला हॅन्ड्सम आहे ना केतन इथं.. त्याला बघ लावुन.

आई अनुच्या मुंडावळ्या काढुन केतनकडे जाऊ लागतात. त्या मुंडावळ्या केतनला लावुन बघायचा त्यांचा विचार असतो. त्या केतनला मुंडावळ्या बांधणार एवढ्यात आतुन सुशांत येतो..

सुशांत : काय गं आई? कश्याला हाक मारत होतीस?

सुशांतला बघुन केतन चरफडतो.

आई : अरे हे बघ.. ये तुला लावुन बघु कसे दिसते आहे.

असं म्हणुन आई सुशांतला मुंडावळ्या बांधुन बघते. केतन मात्र रागाने सुशांतकडे बघत रहातो.

आई : हम्म.. आत्ता कसं लग्नाचा मुलगा वाटतो आहेस.. काय अनु? कसा दिसतोय सुशांत?
अनु : (चेहर्‍याची एक बाजु तळहाताने झाकत).. इश्श…..
आई : सुशांत… नशीबवान आहेस तु.. बघ.. बघ कश्शी लाजते आहे ते….
अनु : काय हो आई.. (असं म्हणुन अनु आईंना बिलगते..)
सखाराम : (नाचायला लागतो) मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी सदा खुश राहो ये दुआ है हमारी

सगळेजण हसत हसत सखारामकडे बघत असतात.

सखाराम नाचत नाचत तो केतनपाशी येतो, त्याचा हात धरुन त्याला उठवतो आणि त्याला पण नाचण्यात ओढतो. पण केतन चिडुन त्याचा हात बाजुला ढकलतो.

आई : अनु.. हे घे तुझ्यासाठी आणलं आहे (असं म्हणुन पिशवीतुन एक पुस्तक काढुन अनुकडे देतात)
अनु : काय आहे हे आई?
आई : अगं उखाण्यांच पुस्तक आहे. आत्तापासुनच पाठ करायला लाग, ऐन वेळेला आठवत नाही बघ.
अनु : अहो पण अवकाश आहे अजुन..
आई : अवकाश कसला.. विसरशील ऐन वेळेस. तुला सांगते, अगं माझ्या लग्नात किनई अस्संच झालं होतं. ऐन वेळेस मी उखाणाच विसरले बघ..
अनु : (डोळे मोठ्ठे करुन) अय्या होssss!! मग?
आई : मग काय? केला शब्द जुळवुन असाच तयार. त्यावेळेस आमचे हे इतके बारीक, हडकुळे होते ना, मग मी उखाणा घेतला..
चांदीच्या ताटात मटणाचे तुकडे…
चांदीच्या ताटात मटणाचे तुकडे…

घास भरवते मरतुकड्या तोंड कर इकडे..
सगळं खो खो खो करत हसायला लागतात. हसता हसता एक एक करत सगळे आतमध्ये निघुन जातात. अनु उरले-सुरले सामान गोळा करते, केतनकडे बघुन एकदा हसते आणि आतमध्ये निघुन जाते.

केतन अनु गेली त्या दिशेकडे बघत बसतो.
(मागुन हृदयाच्या धडधडण्याचा आवाज येत रहातो.)

तो इतका तल्लीन आणि स्वतःच्या विचारात गुंग होतो की त्याच्या मागे पार्वती येऊन उभी राहीली आहे हे सुध्दा त्याच्या लक्षात येत नाही.
पार्वती एकदा त्याच्याकडे आणि एकदा अनु गेली त्या दिशेकडे दोन-तिनदा पहाते. मग हसते आणि..

पार्वती : गेली ती…
केतन : (दचकुन) अं…
पार्वती : अनु कडे बघत होतास ना? गेली ती आतमध्ये…
केतन : हो.. नाही.. मी .. मी कुठं अनुकडे बघत होतो.. मी आपलं असंच.. (डोक्यावरुन हात फिरवत उठुन बसतो)
पार्वती : आत्ता आतमध्ये निघुन गेलीय.. काहीच केले नाहीस तर कायमचीच निघुन जाईल.. हातातुन…

केतन विचारात गढुन जातो… पार्वती स्वतःशीच हसत हसत आतमध्ये निघुन जाते…

स्टेजवरचे दिवे मंद मंद होत जातात आणि अंधार पसरतो.

 

प्रसंग -५ स्थळ तेच.. केतनचे घर..

अनु काहीतरी काम करण्यात मग्न आहे.. केतन जिन्यावरुन खाली येतो. अनुला बघुन काही वेळ विचार करतो (मागुन हृदयाच्या धडधडण्याचा आवाज येत रहातो.) आणि मग तिच्या शेजारच्या सोफ्यावर जाऊन बसतो..

अनु वळुन केतन कडे बघते. दोघंही एकमेकांकडे बघुन हसतात. केतन तेथेच चुळबुळ करत बसतो.

थोड्यावेळाने..

अनु : काय रे? काही बोलायचं आहे का?
केतन : नाही विशेष असं काही नाही. म्हणलं आठवड्यावर येऊन ठेपले लग्न.. कसं वाटतं आहे?

अनु केतनकडे बघुन हसते आणि परत कामात मग्न होते.

केतन : म्हणा तुला तसा फारसा फरक पडणार नाही.. तुझं घर इथंच समोरच आहे ना.. आणि तुला इथंही सवय आहे तशी.. म्हणजे मी बघतोय ना.. सगळ्यांना तुच हवी असतीस…
अनु : (हसते) हम्म.. पण शेवटी लग्न हा मुलींच्या आयुष्यातील एक वेगळा टप्पाच असतो रे.. शेवटी आपलं घर ते आपलं आणि नवर्‍याचे घर ते नवर्‍याचंच ना.. आणि आता सुशांतचे हे अमेरीकेचं चालु आहे.. आम्ही नाही म्हणलं तरी वर्ष दोन वर्ष तिकडं जाणार.. मग कुठले आई-वडील आणि कुठले सासु-सासरे..
केतन : तुला नाही जायचं अमेरीकेला? मग सांग तसं सुशांतदा ला.. सांग त्याला अमेरीकेचे खुळ काढुन टाक म्हणुन….
अनु : अरे.. असं कसं.. त्याचं स्वप्न आहे ते.. आणि तु सांग.. तु गेली आठ वर्ष आहेच ना अमेरीकेत.. तुला मी म्हणलं अमेरीका सोडुन इकडे ये रहायला.. येशील???
केतन : दुसर्‍या दिवशी येईन…

अनु चमकुन केतनकडे बघते

अनु : ऐ है.. म्हणे दुसर्‍या दिवशी.. आणि तुझं झालं आहे अमेरीकेत आठ वर्ष राहुन, म्हणुन कदाचीत तु म्हणत असशील.. सुशांतचे तसे नाहीये.. तो कधी गेला नाहीये अमेरीकेला.. त्याला क्रेझ असणारच ना.
असो.. ते जाऊ देत.. झाली का तुझी दुपारची झोप??

केतन : नाही गं.. झोपलो नव्हतो.. पिक्चर बघत होतो टी.व्ही. वर..
अनु : हो? कोणता रे?
केतन : डी.डी.एल.जे..
अनु : वॉव.. काय मस्त मुव्ही आहे नाही तो? कित्ती ही वेळा बघा.. कंटाळाच येत नाही.. शाहरुख आणि काजोल.. एव्हरग्रीन पर्फ्रोमंन्स नाही..
केतन : हो.. खरंच कित्ती वेळा पाहीलाय पिक्चर.. पण लागला की परत पहावासा वाटतोच..

अनु आपल्या कामात पुन्हा मग्न होते.. केतन पाय पसरुन.. सोफ्यावर डोकं टेकवुन विचार करत बसतो. मागुन दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे मधील तो प्रसंग ऐकु येत रहातो जणु तो प्रसंग केतनच्या मनात पुन्हा पुन्हा येतो आहे…

‘कौन है वो लडकी?’ अनुपम खेर
‘सिम्रन…!! कौन लडकी??” शाहरुख..
“वही.. जिसकी सुरत तुम चांद मै धुंडनेकी कोशीश कर रहे हो..” अनुपम खेर..”देखो बेटा मै तुम्हारा बाप हु..बताओ मुझे कौन है वो लडकी..”
“पॉप.. सिम्रन नाम है उसका”, शाहरुख
“प्यार करते हो उससे?”, अनुपम खेर
शाहरुख मान डोलावतो..
“और वो..”, अनुपम खेर
“पता नही.. और वैसे भी उसकी शादी तैर हुई है”, शाहरुख
“तैर हुई है ना.. अभी तक हुई तो नही? जावो.. बतादो उसे की तुम उसीसे प्यार करते हो..और ले आओ उसे इस घरकी दुल्हन बनाके.. बेटा एक याद रखना.. दुल्हन उसीकी होती है जो उसे डोली मै बिठा के घर ले आए..” अनुपम खेर..

अनु : ए पण काय रे.. तुला कशी मुलगी हवी? तु सांगीतलच नाहीस.

एव्हढ्यात तायडी स्टेजवर येते.

तायडी : अगं त्याला काय विचारते आहेस.. आम्हाला विचार ना. त्याला हवी असलेली मुलगी इथली नसणारच आहे.. तिकडची.. विलायतेतली.. ब्लॉड-फिंड हवीय त्याला..
अनु : हो.. सुशांत म्हणाला होता मला…
तायडी : मग काय.. एक-सो-एक स्थळ आली होती ह्याच्यासाठी. तसा गुणाचा आहे तो. वडील लहानपणीच सोडुन गेले. सुशांत होताच म्हणा पाठीशी.. पण तरीही स्वतःच्या पायावर स्वतः उभा राहीला, कंम्युटर शिकला.. साता-समुद्रापार अमेरीकेतील कंपनीत नोकरी काय मिळवली आणि आज एका मोठ्या हुद्यावर काम करतोय.. गम्मत नाही.

अनु आळीपाळीने एकदा तायडीकडे तर एकदा केतनकडे पहात रहाते.

तायडी : अनु, तुला म्हणुन सांगते, तुझं आणि सुशांतच जमलं होतं म्हणुन, नाही तर खरं केतनसाठीच तु आम्हाला पसंद होतीस.

(अनु आणि केतन दोघंही चमकुन तायडीकडे बघतात) पण ह्या साहेबांना काहीच पटत नव्हतं..
केतन : तायडे, पण तु मला हीचा कुठं फोटो दाखवलास..? दाखवला असतास तर कदाचीत…

तायडी : चल रे.. डॅंबीस कुठला.. आता बस हातावर हात चोळत….

तायडी आणि अनु दोघीही हसायला लागतात. आणि हसता हसताच आतमध्ये निघुन जातात.
दुसरीकडुन स्टेजवर सखाराम घाईगडबडीत येतो. सख्याला बघुन केतन त्याला थांबवतो..

केतन : अरे सख्या.. थांब ना..
सखाराम : नगा थांबवु दादा.. लै काम हाईत..
केतन : अरे होतील रे काम.. किती धावपळ करशील एकटा.. (मग थोडा विचार करुन) जरा त्या पार्वतीला पण सांगत जा की कामं.. ती तर कधीच कामं करताना दिसत नाही.. तुच एकटा धावपळ करत असतोस बिच्चारा…
सखाराम : (आनंदाने) व्हय ना.. तुमास्नी बी असंच वाटत्ये ना.. (मग हळुच केतनच्या जवळ जात हळु आवाजात) अवं पण सुशांतदादांची वार्नींग हाय.. पार्वतीला जास्ती कामं नाय सांगायची..
केतन : (आवाजात खोटं आश्चर्य आणत).. हो?? का रे? का असं का? ती पण कामवालीच आहे ना?
सखाराम : व्हयं जी.. काय म्हाईत नाय बा..
केतन : (अगदी हळु आवाजात) सख्या.. सुशांतदा आणि पार्वतीच काही…
सखाराम : (तोंडावर हात मारत) अव्वाव्वाव्वा… काय बोलताय दादा.. नाय वो.. तसं काय नाय.. पार्वती सुशांतदादांच्या हाफीसातील कुणाचीतरी बहीन हाय नव्ह… म्हनुन असेल.. चला जाऊ द्या मला.. लै कामं खोळंबली हाईत..

सख्या निघुन जातो.
केतन उठुन उभा रहातो आणि दोन्ही हात पसरुन जोरात म्हणतो…

केतन : (स्वगत) “…दुल्हन उसीकी होती है जो उसे डोली मै बिठा के घर ले आए………”

शेजारच्या टेबलावर ठेवलेली जत्रेत मिळतात तसली दिवे लागणारी शिंग उचलुन डोक्याला लावतो. हातामध्ये एखादे त्रिशुळ..

केतन : (स्वगत).. आय एम डेव्हील.. डर्टी डेव्हील.. ‘एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह ऍंन्ड वॉर’ असं सगळेच म्हणतात, मग आपण तरी कशाला मागे रहायचं. पुढे काय होईल ते होईल. पण निदान अनुला माहीती तरी करुन देण आवश्यक आहे की माझ्या मनात काय आहे ते.. हे असे जगु नाही शकत.. नाही जगु शकत मी…

स्टेजवरचे दिवे मंद मंद होत जातात आणि अंधार पसरतो.

 

[क्रमशः]

12 thoughts on “तुझ्या विना (भाग-४)

  1. shramita

    story aadhi sudha vachali aahe even ticha end sudha mahit aahe. pan tumchya likhanatun vachatana khupach mast vatatay. tyamulech end mahit asun sudha pudhachya bhagachi waat baghtey. please lavkar post kara.

    Reply

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s