Monthly Archives: April 2015

कॉफी आणि बरंच काही…


कॉफी आणि बरंच काही...

कॉफी आणि बरंच काही…

 

मला सिनेमाचं प्रचंड वेड आहे. नुसताच सिनेमा, सिनेमा म्हणुन न पहाता त्यातील आपल्या लायकीनुसार कळणार्‍या विवीध अंगांच सुध्दा मी निरीक्षण करतो. सिनेमा कुठला हवा असं काही माझं विशेष मत नसतं. अगदी ‘लाल दुपट्टा मलमल का..’ किंवा ‘साधु और शैतान’, ‘नागिन का बदला’ वगैरेसारखे चित्रपट सुध्दा मी चवीने बघतो. पण हॉलीवुड्पट मला विशेष भावतात. म्हणजे त्यातल्या तात्रिक गोष्टी वगैरे कश्या अफलातुन असतात वगैरे भानगडीत न पडता त्याचा थोडक्यात आशय, क्रिस्प मांडणी आणि फालतु फाफट्पसार्‍याला फाट्यावर मारुन ‘शॉर्ट अ‍ॅन्ड स्वीट’ मांडणी विशेष भावते. ‘रॉम-कॉम’ चित्रपट तर अजुन मस्त. फार कमी पात्रांना घेऊन केलेले हे चित्रपट फ़ारच फिचर-रिच असतात. आणि म्हणुनच ‘कॉफी..’ आला तेंव्हा त्याची दोन चार ओळीत सांगता येणारी कथा ऐकुन चित्रपट पहाण्याची इच्छा जागृत झाली.

चित्रपटाच्या कथेबद्दल मी इथे लिहीत नाही. मित्र-परीवार आणि वर्तमानपत्रातील परीक्षणांवरुन कथा आत्तापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचली असेलच. आपण बाकीच्या अंगांबद्दल बोलु.

मला चित्रपटात सगळ्यांत पहीलं आणि सगळ्यात जास्त काय भावलं तर चित्रपटांतील संवाद. चित्रपटाची कथा आणि आशय छोटासा असल्याने चित्रपट फुलवणे आणि प्रेक्षकांचा इंटरेस्ट टिकुन रहाणं महत्वाच आणि त्यासाठी पटकथेची मांडणी आणि संवाद हे अतीशय महत्वाचे होते. आजवर ह्या ब्लॉगवर मी अनेक कथा प्रसिध्द केल्या आणि कथा छोटीशी असेल तर ती तितक्या भागांमध्ये प्रसिध्द करण्यासाठी नुसतेच प्रसंग रंगवुन भागत नाही तर पात्रांचे एकमेकांशी घडणारे संवाद हेच वाचकाला खिळवुन ठेवतात हे मी जाणतो आणि ते किती अवघड आहे ह्याचीही कल्पना आहे आणि कदाचीत म्हणुनच मला हा विभाग सगळ्यांत जास्ती भावला. कित्तेकदा कथा लिहीताना मी अनेक ठिकाणी अडकतो ते संवाद लिहीताना. ह्या चित्रपटात हाणामार्‍या, गरम-प्रसंग, ढिगभर गाणी, पाचकळ विनोद ह्यातलं काहीच नाही. आणि म्हणुनच कथेचा वेग आणि चित्रपटाची वेळ साधायला प्रभावशाली पटकथा आणि संवाद अत्यंत महत्वाचे होते आणि ते नक्कीच ह्या चित्रपटाचे बलस्थान आहे.

बहुतेक पंचेस फारच मस्त जमुन आले आहेत आणि मल्टीप्लेक्स मधील क्लास ‘पब्लिक’ चक्क टाळ्या आांणि शिट्यांनी दाद देताना दिसत होते. ह्याशिवाय आपल्या रोजच्या वापरातील बरेचसे शब्द, वाक्यांचा अंतर्भाव चित्रपट आपल्याच आजुबाजुला घडत असल्याचा भास देत होता. मी संगणक क्षेत्रातील असल्याने ह्यातील बरेचसे प्रसंग रिलेट होत होते. लग्न, अनुरुप जोडीदार मिळणे- न मिळणे वगैरे विषय तसा गंभीर. पण चित्रपट कुठेही फालतु तत्वज्ञान शिकवत नाही, किंवा त्याची थट्टाही उडवत नाही.

काही वर्षांपुर्वी असाच एक लहानसा आशय घेऊन आलेला अतुल कुलकर्णी आणि सागरिका घाटगेचा ‘प्रेमाची गोष्ट’ असाच भावला होता. मला वाटतं त्यानंतर तितकाच आवडलेला दुसरा चित्रपट म्हणजे ‘कॉफी..’

फालतु डायलॉग्सबाजीवाली पात्र नाहीत, अश्लि्ल-दुअर्थी संवाद नाहीत, आयटम सॉग्स नाहीत, एक्झॉटीक लोकेशन्स नाहीत की महागड्या गाड्या नाहीत. तरीही हा चित्रपट पहावासा वाटतो आणि ह्याचे श्रेय सगळ्यात प्रथम ‘माझ्या मते’ जाते ते पटकथा आणि संवादांना. सो हॅट्स ऑफ.

हॅट्स ऑफ टु रायटर तर आहेच, पण ह्या विषयावर विश्वास ठेऊन चित्रपट फंड करणार्‍या प्रोड्युसरचा आणि दिग्दर्शकाला सुध्दा विशेष आभार

 

टॉकींग अबाऊट ‘एक्झॉटीक लोकेशन्स’. बहुतांश चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यातले आहे. पुणे.. जेथे उभे रहाणेही मुश्कील तेथे चित्रपटाचे चित्रीकरण केले ह्याबद्दल विशेष दाद. झेड-ब्रिज, नदीपात्रातील रस्ता, कॅनॉलवर वसवलेले जॉगींग ट्रॅक इतके सुंदर दिसु शकते ह्यावर विश्वास बसत नव्हता. संपुर्ण चित्रपट फ्रेश रंगांनी व्यापलेला होता. विशेषतः जाईची रुम मस्तच.

पात्रांचे कॉश्च्युम्स सुध्दा प्रसंगानुरुप. कुठेही उगाच फालतु फॅशन नाही, अंगप्रदर्शन नाही की उगाच झॅक-पॅक, भपकेपाजपणा नाही. पुर्ण चित्रपटात पात्र दुचाकीवरुनच फिरताना दाखवली आहेत आणि हे सुध्दा नक्कीच उल्लेखनीय.

चित्रपटातील दोन्ही गाणी श्रवणीय़ आणि प्रसंगाला अनुसरुन.

 

सर्वच कलाकारांचा अभिनय मस्त झालाय. ‘इला भाटे’ माझ्या फार आवडत्या कलाकार आहेत.. त्यांना अजुन जास्ती रोल हवा होता राव.. त्या म्हणजे आपल्या मराठी चित्रपटातील ‘रिमा लागु’ आहेत. थोड्याकाळासाठी का होईना ‘दिलीप प्रभावळकर’ आणि ‘सुहास जोशी’ ह्यांचे दर्शनसुध्दा विलोभनिय.

वैभवने केवळ डोळ्यातुन अनेक प्रसंग व्यक्त केले आहेत. प्रार्थनाचा प्रेझेंसही एकदम सहज आणि मस्त. पण खर्‍या टाळ्या आणि शिट्या पडतात ते निषादचा मित्र आणि जाईच्या बहीणीच्या संवादांना. प्रमुख पात्र नसुनही त्यांच पात्र मस्तच रंगवलं आहे.

 

थोडं एडीटींगबद्दल. चित्रपट फ्लॅशबॅक आणि निषाद सध्याचा आणि जाई सध्याची अश्या तिन ठिकाणी फिरत रहातो. परंतु कुठलाही प्रसंग तुटक वाटत नाही. सर्व प्रसंगांची जोडणी आणि मांडणी एकमेकांना अनुरुप. विशेषतः एका प्रसंगात ‘जाई’ तिला बघायला आलेल्या ‘अनिषला’ म्हणते ‘प्रपोज मीच करायचं, संसार मीच करायचा, स्वयंपाक मीच करायचा.. मग त्यानं काय करायचं?’ आणि त्यानंतर कॅमेरा जातो कॅफेत बसलेल्या निषादकडे जो काऊंटरवरची मान हलवणार्‍या डॉलशी खेळत असतो. फारच मस्त जमलंय हे स्विचींग.

 

एकुणच हा चित्रपट सर्वांना भावणारा आहेच, पण तरूणाईसाठी तर खुप्पच मस्त. सनी लिऑनचा `लिला-एक पहेली’ कालच प्रदर्शीत झाला. परंतु दुसरा आठवडा असुनही ‘कॉफी..’च्या स्क्रिनसमोर प्रचंड गर्दी होती ह्यातच सर्व काही आले. तद्दन मसालेपटांच्या मंदीयाळीत हा वेगळा चित्रपट चुकवु नये असा आहे.

बाकी पुणेकर असुनही एखाद्या गोष्टीला चांगले म्हणतोय आणि एक सो-कॉल्ड, सेल्फ डिक्लेअर्ड ‘चांगला’ (!) ब्लॉगलेखक असताना दुसर्‍याच्या लेखनाचे कौतुक ह्यावरुनच काय ते समजुन घ्या..

एक वेगळा प्रयत्न चोखाळल्याबद्दल ‘कॉफी..’च्या टीमचे आभार.. वेल डन गाईज..

तळटीप – चित्रपट परीक्षण हा माझा जॉनर नाही, केवळ चित्रपट अधीकाधीक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणुन ‘गोड’ मानुन घ्या..