इश्क – (भाग ५)


भाग ४ पासुन पुढे>>

“आई-शप्पथssss.. सौल्लीड शॉक बसला असेल ना तुला?”, रोहन फोनवर खो-खो हसत म्हणाला
“अरे मग काय तर.. दुसरं कोणी असतं तर थोबाडच लाल केलं असतं.. पण यार खरंच, इतकी मस्त आहे ना राधा….”, कबिर

“बsssर.. चांगली प्रगती आहे, दोन दिवस नाही झाले गोव्याला जाऊन तर..करा एन्जॉय करा.. आणि हो स्टोरी घे लिहायला …”, रोहन
“हो रे.. सुचायला तर हवं काही तरी…”, कबिर

“अरे अख्खी कादंबरी आहे तुझ्याजवळ.. मला नक्की खात्री आहे, तुझी गोष्ट तुला राधामध्येच मिळेल…”, रोहन
“लेट्स सी.. बरं चल, ठेवतो.. करेन फोन नंतर…”, कबिर
“येस्स सर.. बरं यार, एक फोटो पाठव नं त्या राधाचा.. तु इतकं छान वर्णन केलं आहेस.. फ़ार बघायची इच्छा आहे बघ…”, रोहन
“चं-मारी.. अरे एक दिवसाची ओळख माझी, बघतो, कधी चान्स मिळाला तर काढतो एखादा सेल्फी तिच्याबरोबर… बाय देन..”, कबिर
“बाय..”

 

“हाऊ आर यु माय सन?”, कबिर ने फोन ठेवलेला बघुन साधारण एक सत्तरीकडे झुकलेली स्त्री, सोफी ऑन्टी, खोलीत आली. शरीर थकलं असलं तरी चेहर्‍यावर प्रचंड प्रसन्नता होती. वार्धक्याने पांढरे झालेले केस वार्‍याच्या झुळकीने हलकेच उडत होते. केसांत सजवलेली पिवळी फुलं त्या चंदेरी केसांमध्ये उठुन दिसत होती. पांढर्‍या-गुलाबी फुलांची नक्षी असलेला मिडी, सोफी ऑन्टींना अधीकच खुलुन दिसत होता.

नकळत कबिरने खाली वाकुन सोफी ऑन्टींना नमस्कार केला.

एजींग-विथ ग्रेस म्हणतात ते हेच असेच काहीसे कबिरला वाटुन गेले.

“आय एम गुड सोफी ऑन्टी”, कबिर म्हणाला.
“राधाने मला सगळा काल-रात्रीचा गैरसमज सांगीतला.. आय वॉज एक्स्टीमली वरीड फ़ॉर हर जेंव्हा रात्र-भर ती आली नाही… बट थॅंक्स टू यु.. गॉड ब्लेस यु…” भिंतीवरील जिझसच्या फोटोकडे बघुन एकवार कपाळाला आणि मग छातीवर डावी-उजवीकडे हात लावुन नमस्कार करत सोफी ऑन्टी म्हणाल्या..

“हो ऑन्टी, ते ब्लेसींग वेळेवरच मिळाले म्हणायचे, नाही तर मी आत्ता तुरुंगाची हवा खात असतो..”, हसत हसत कबिर म्हणाला.
“राधा म्हणाली, तु पुस्तकं लिहीतोस म्हणुन ! आणि गोव्यात नविन गोष्ट लिहायला आला आहेस…”
“हो ऑन्टी.. नशिबाने ही जागा मिळाली, नाही तर आजच्या दिवसात परत निघावंच लागलं असतं..”
“बरं झालं की नाही, राधा तुला मिळाली ते??”
“ऑन्टी.. मिळाली नाही.. भेटली…”, सोफी ऑन्टींच्या खांद्यावर आपला तळहात ठेवुन त्यावर हनुवटी टेकवत राधा म्हणाली..
“हो हो.. तेच.. माझं मराठी काही इतकंस चांगलं नाही.. आमचो आपला कोंकनी ठिक असा…”, सोफी ऑन्टी हसत हसत म्हणाल्या खर्‍या, पण त्यांच्या त्या “राधा तुला मिळाली”, ह्या एका वाक्याने कबिरच्या सर्वांगावर रोमांच उभे केले…

“इथं तुला पाहीजे तश्शी शांतता मिळेल पुस्तक लिहायला.. इथुनच मागे थोड्या अंतरावर छान विस्तीर्ण नदी आहे, छोटी बोट पण आहे तुला येत असेल चालवायला तर.. राधा दाखवेल तुला… आणि काही हवं असेल तर सांग. खायला बाकी काही लगेच तयार नसले तरी वाईनचे केक मात्र कधीही मिळतील…”

“वॉव्व.. वाईनचे केक.. प्रचंड भुक लागलीय.. मी फ्रेश होऊन येतो.. ८-१० केक चे पिसेस आणि मस्त गरम कॉफी मिळाली तर…”, कबिर

“मी टाकलीय कॉफी, तु ये फ्रेश होऊन..”, राधा म्हणाली
काही सेकंद राधाची आणि त्याची नजरानजर झाली आणि मग राधा आणि सोफी ऑन्टी खोलीच्या बाहेर निघुन गेल्या.

कबिर अजुनही संमोहीत झाल्यासारखा राधा गेलेल्या दिशेने बघत उभा होता.

 

“हॅल्लो इन्स्पेक्टर भोसले, अनुराग बोलतोय..”, फोनवर नेहमीच्याच आपल्या हुकुमत गाजवणार्‍या आवाजात अनुराग बोलत होता
“गुड अफ़्टरनुन सर…”
“अहो कसलं गुड-अफ़्टरनून करताय, अनुचा काही शोध लागला का? ३ आठवडे झाले माझी बायको मिसींग आहे, आणि तुम्हाला एक सुध्दा लिड मिळत नाही म्हणजे काय? अहो मिडीआला याची कुणकुण लागली तर किती हंगामा होईल ह्याची कल्पना आहे का तुम्हाला?”
“येस सर.. आमचा तपास चालु आहे सर.. तुम्ही दिलेला मोबाईल नंबर आम्ही ट्रॅकींगला टाकला आहे, पण फोन बंद असल्याने लोकेशन डिटेक्ट होत नाहीए सर…”
“मी कमीशनरशी बोलु का? तुम्हाला अजुन काही सपोर्ट हवा असेल तर..”
“त्याची काही आवश्यकता नाहीए सर, फक्त कसं आहे, प्रकरण थोड सावधानतेनं हाताळावं लागतंय, उघड-उघड पण तपास नाही करता येत ना सर.. म्हणुन थोडा उशीर होतोय एव्हढचं..”
“ठिक आहे, पण काही जरी लिड मिळालं तरी लग्गेच मला कळवा, माझा डायरेक्ट नंबर दिलेला आहे तुम्हाला…”
“येस सर…. हॅव अ…”

परंतु फोन आधीच कट झाला होता..

इन्स्पेक्टर भोसलेंनी एकवार फोनकडे रागाने पाहीले आणि थाड्कन तो टेबलावर आपटला.

“काय रे भोसले, काय झालं?”, सब-इन्स्पेक्टर कदम ने विचारलं….
“अरे काय सांगू.. तिच अनुराग सायबांची केस.. ह्यांच्या बायका कुठं तरी पळुन जाणार आणि हे आमच्यावर बरसणार… शोधा माझ्या बायकोला म्हणुन…”

“अरे पण, पळून गेली असेल कश्यावरुन?”, कदमांनी प्रश्न उपस्थीत केला
“कश्यावरुन काय? अरे त्यांच्या गल्लीतलं शेमडं पोरगं पण सांगेल… गेली एक वर्ष सतत त्यांच्यामध्ये भांडणं चालू असतात म्हणे. बाहेर-पर्यंत आवाज येतो म्हणे. त्यांच्या नोकरांना कोपर्‍यात घेतला होता तेंव्हा बोलला तो. रोज रडायच्या म्हणे त्या अनु मॅडम…”
“च्यायला.. त्या अनुरागने मारलं तर नसेल त्याच्या बायकोला? आणि उगाच पळुन गेलीचा आव आणत असेल?”, कदम

भोसले काही बोलणार इतक्यात टेबलावरचा फोन खणखणला…

“हॅल्लो.. इन्स्पेक्टर भोसले….”
“…”
“हम्म.. हम्म.. ओके.. ओह.. कधी?? अच्छा परत का…? नो प्रॉब्लेम.. किप अ वॉच अ‍ॅन्ड कीप मी अपडेटेड… थॅक्स..”

भोसलेंच्या चेहर्‍यावर हास्य पसरले.. “कदम.. जिवंत आहे त्यांची बायको.. आत्ताच काही सेकंद का होईना त्यांचा फोन ट्रेस झाला होता…चला.. ह्यावेळी सरकारी खर्चाने आपली गोवा-सहल घडणार म्हणायची.. द्या टाळी…”

“ऑ! म्हणजे त्या गोव्यात आहेत..?”
“व्हय..जी….”
“मग सांगुन टाक नं त्या अनुरागला..”
“अज्जीबात नाही.. साल्याने लै डोकं फिरवलंय माझं.. मला आधी शंभरटक्के खात्री होऊ देत.. त्याच त्या आहेत म्हणुन.. फॉल्स-अलार्म असला तर गेलोच आपण कामातुन.. बघु देत तरी गोव्यामध्ये काय चाल्लय ते.. तुला सांगतो.. ती कुठल्या-यार बरोबर पळुन गेली असेल ना, तर ह्यावेळी मीच मिडीयाला-टिप देणारे.. होऊ-देत वाभाडा साल्याच्या इज्जतीचा….”

कदम काही बोलणार त्या आधीच भोसलेंनी फोन उचलला आणि नंबर फिरवायला सुरुवात केली.

 

ज्यावेळी भोसले अनुरागशी फोनवर बोलत होते त्यावेळी इकडे कबिर खिडकीत बसुन गरमा-गरम कॉफीचा आस्वाद घेत होता. राधाला भेटल्यापासुन त्याला एक अशी विचीत्र बैचैनी सतत जाणवत होती. नक्की काय केल्याने आपल्याला बरं वाटेल हेच त्याला समजत नव्हते. फक्त आणि फक्त राधा हा एकच विचार त्याच्या डोक्यात होता.

“अगं असु-देत, मिळे रिक्षा मला कोपर्‍यावर..”, सोफी ऑन्टी राधाला म्हणत होत्या..
“पण कश्याला मी देते ना आणुन.. तुम्ही गेटपाशी येऊन थांबा, मी आलेच रिक्षा घेऊन”, असं म्हणुन राधा बाहेर गेली.

सोफी ऑन्टी हातातली पिशवी सांभाळत हळु हळु गेट कडे गेल्या.

कबिरला कसंही करुन राधा-बद्दल अधीक जाणुन घ्यायचं होतं. ही कोण? कुठली? त्या दिवशी ते मंगळ-सुत्र वगैरे काय प्रकार होता? त्याला ते मंगळसुत्र काही स्वस्थ बसु देईना.

त्याने खिडकीतुन बाहेर बघीतलं. राधाचा कुठेच पत्ता नव्हता. सोफी ऑन्टी सुध्दा गेटच्या बाहेर उभ्या होत्या.

कबिर पट्कन उठला आणि राधाच्या खोलीत गेला. ५ मिनीटांत जे काही दिसेल ते त्याला बघायचं होतं. फारशी उचका-पाचक न करता तो काही तरी शोधत होता. कोपर्‍यात त्याला राधाची ती झोली-बॅग दिसली.

कबिरने सावकाश ती बॅग उघडली आणि आतमध्ये हात घातला.. थोडीशी उचकापाचक केल्यावर, त्याच्या हाताला ती वस्तु लागली.. मोबाईल.

कबिरने तो मोबाईल बाहेर काढला आणि होमचे बटन दाबले.. पण फोन स्विच्ड ऑफ़ असल्याने स्क्रिनवर काहीच आले नाही.

कबिरने फोनचे स्टार्ट-बटन दाबुन धरले. आय-फोन आय-ओ-एस ऑपरेटींग सिस्टीम बुट-अप स्क्रिन समोर चमकु लागली. कबिरला फोनमधुन नक्की काय मिळेल काहीच माहीती नव्हते. कदाचीत लास्ट-डायल्ड कॉल्स, कदाचीत फोटो, कदाचीत स्क्रिनवर टॅग केलेल्या नोट्स.. काहीही…

ओ.एस. बुट होऊन.. होम-स्क्रिन आली पण स्क्रिन-नेमकी पासवर्ड प्रोटेक्टेड होती.

कबिर स्वतःशीच चरफडला.. इतक्यात राधा खोलीत शिरली. कबिरला खोलीत बघुन, काही क्षण तिच्या चेहर्‍यावर आश्चर्याचे भाव उमटले आणि त्याची जागा काही क्षणातच तिरस्काराने, रागाने घेतली जेंव्हा तिने तिचा फोन कबिरच्या हातात बघीतला.

धावतच ती कबिरपाशी गेली आणि तिने फोन हिसकावुन घेतला.

फोन चालु झालेला पहाताच, तिच्या संतापाचा अकस्मात पारा चढला. कसलाही विचार न करता थाड्कन तिने तो फोन भिंतीवर फेकला जणु फोन बंद व्हायला लागणारा वेळ सुध्दा तिला नको होता.

त्या महागड्या आयफोनचे तुकडे खोलीभर पसरले.

कबिर डोळे मोठ्ठे करुन राधाकडे बघत होता. तिचे हे रुप त्याला अनपेक्षीत होते.

“कुणी सांगीतले तुला माझ्या फोनला, माझ्या वस्तुंना हात लावायला? समजतोस कोण तु स्वतःला?”
“आय एम सॉरी.. मी फक्त…”
“काय मी फक्त काय? हु द हेल आर यु? तुला माहीते तुझ्या एका चुकीने काय झालंय? काय होऊ शकतेय?”
“मला समजलं नाही राधा.. मी …”
“नाहीच समजणार.. कुणालाच नाही समजणार.. तुम्ही सगळे एकसारखेच.. मुली म्हणजे तुमची प्रॉपर्टी आहे का? तुम्ही काहीही करा, कसंही वागा…”

“घाई घाई मध्ये ती सगळं सामान गोळा करत होती…”
“अगं पण झालंय काय? सांगशील का?”
“तु फोन चालु केला होतास?”
“हो..”
“किती वेळ झाला होता फोन चालु होऊन..”
“जस्ट चालु होतच होता राधा…”
“जस्ट म्हणजे किती वेळ..”
“हार्डली ३०-४० सेकंद्स… पण झालं काय?”

“आय हॅव टू लिव्ह…”, राधा..
“म्हणजे…”
“म्हणजे.. आय हॅव टू लिव्ह.. इंग्रजी कळत नसेल तर मराठीत सांगते.. मला निघायला हवं…”
“पण का? कुठे?”

“कुठे माहीत नाही, पण इथुन दुर.. खूप दुर…”

“प्लिज राधा.. डोन्ट गो… लुक.. आय् एम सॉरी..”
“इट डझन्ट मॅटर कबिर.. चुक माझीच होती.. फोन कॅरीच करायला नको होता मी..”
“हे बघ राधा.. काय झालंय, काय चुकलंय, तुला का जावं लागतंय, मला माहीत नाही.. पण प्लिज.. प्लिज डोन्ट गो…”

राधाचं कबिरच्या बोलण्याकडे लक्षंच नव्हतं. ती तिचं सगळं सामान भराभरा बॅगेत भरण्यात मग्न होती.

“राधा, मी काय म्हणतोय तुला कळतंय का?”, तिच्या दंडाला धरुन मागे ओढत कबिर म्हणाला.
“कबिर.. प्लिज.. हे बघ.. तुला रहायला घर मिळालंय.. तु तुझं पुस्तक लिही छान, माझ्या शुभेच्छा तुला.. बट आय हॅव टु गो नाऊ.. सोफी ऑन्टीला आल्यावर माझा निरोप सांग…”

“अगं निदान त्या येई पर्यंत तरी थांब, अशी अचानक तडकाफडकी न भेटताच जाणारेस का?”

राधाने आपली बॅग उचलली आणि ती खोलीच्या बाहेर पडली. कबिर तिच्या मागोमाग बाहेर आला.

राधाने सॅन्ड्ल्स अडकवले आणि ती घराच्या बाहेर पडली सुध्दा…

“राधा थांब प्लिज.. कसं सांगू तुला..”, कबिर आगतिकतेने म्हणत होता. असं अचानक राधाला निघुन जाताना पाहुन तो प्रचंड बैचेन झाला होता. राधा निघुन गेली तर आपल्याला वेड-वगैरे लागेल असेच जणु त्याला वाटू लागले होते.

“राधाsssss…”

राधाने एव्हाना गेट उघडले होते…

“राधा स्टॉप राधा….. आय लव्ह यु……”, कबिर डोळे बंद करुन हृदयापासुन जोरात ओरडला……

[क्रमशः]

25 thoughts on “इश्क – (भाग ५)

  1. Vinayak Gundla

    Mastach
    Manatil bhavna vyakt kelya aaplya herone aata heroinechya uttarachi jast pratiksha karu deu naka
    Lavakar post taka

    Reply

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s