इश्क – (भाग २५)


भाग २४ पासुन पुढे >>

कबीरची झोप मोडली ते केंव्हापासुन वाजणार्‍या फोनच्या आवाजाने. आदल्या दिवशी रात्री नातेवाईकांचा सगळा गोतावळा लग्नासाठी येऊन थडकला होता. सगळ्यांना भेटून, गप्पा-टप्प्पांमध्ये कबीरला झोपायला मध्यरात्र उलटुन गेली होती. त्याने घड्याळात बघीतले, ८च वाजत होते.

काही सेकंदांनी पुन्हा फोन वाजु लागला.

वैतागुन त्याने फोन उचलला…

“कबीर.. ए कबीर.. अरे झोपलाएस का?”, पलीकडुन राधा फोनवर ओरडत होती..
“राधा? हा कुठला नंबर आहे तुझा…?”, कबीर राधाचा आवाज ऐकताच खडबडुन जागा झाला..
“काय करतो आहेस?”, त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन राधा म्हणाली..
“झोपलोए.. सकाळी झोपेतच असतात बहुतेक लोकं..”
“पेपर बघीतलास आजचा?”, राधा
“मी झोपलोय म्हणलं तर! झोपेत वाचेन का पेपर…”
“बरं बरं.. व्हेरी गुड.. एक काम कर, पट्कन एम.जी.रोड वर ये.. तुला काही तरी दाखवायचंय..”
“राधा.. अगं मी अजुन बेडमध्येच आहे.. वेळ लागेल मला.. काय काम आहे बोल नं..”
“ते तु इथे आल्याशिवाय कसं सांगू? ये पट्कन, मी वाट बघतेय.. मार्झोरीन समोर थांब..”, असं म्हणुन कबीरला बोलायची संधी न देता राधाने फोन बंद करुन टाकला..

“काय मुलगी आहे ही.. अशी एकदम गायब होते.. एकदम कुठुन तरी अवतरते.. काही कॉन्टेक्स्ट नाही.. एम.जी.रोडला ये म्हणे…”, चरफडत आणि स्वतःशीच बडबड करत कबीर अंथरुणातुन उठला आणि फ़्रेश व्हायला बाथरुममध्ये गेला..

 

कबीरने एम.जी.रोडच्या कॉर्नरला पोहोचताच राधाला फोन केला. काही वेळातच राधा कुठुनतरी धावत धावत येऊन कबीरच्या समोर येऊन थांबली..

“पाहीलंस?”, राधा
“काय?”, गोंधळुन कबीर म्हणाला..
“चं.. अरे ते बघ ना समोर…”, समोरच्या एका जाहीरातीच्या फलकाकडे बोट दाखवत राधा म्हणाली..

समोर ‘स्ट्रॉबेरी ट्रॅव्हल्स’च्या जाहीरातीचा फ़लक होता.. आणि जाहीरातीत राधाचा मोठ्ठा फोटो.. “कम व्हिजीट युरोप” वगैरे म्हणत..

“ऐल्ला.. तु मॉडेलींग वगैरे चालु केलेस की काय?” कबीर डोक्याला हात लावत म्हणाला..
“अरे नाही.. मी मागच्या आठवड्यात इटलीवरुन परत आले.. ऑफ़ीसमध्ये गेले तेंव्हा अवंतिका.. माझी बॉस आणि अ‍ॅड एजंसीची हेड समीरा.. दोघींचा काहीतरी वाद सुरु होता.. टुरीझमचा सिझन सुरु होतोय आणि आम्हाला युरोप मार्केट करायचं होत.. त्यासाठी आधीच खूप उशीर झाला होता आणि त्या दिवशी फोटो-शुट होतं आणि ती मॉडेल कुठे तरी गायब झाली होती.. तिचं म्हणे ब्रेक-अप झालं आणि ती डिप्रेशन मध्ये गेलीय वगैरे वगैरे काहीतरी चालु होतं..”, राधा सांगत होती..
“मग?”, कबीर..
“समीराने अजुन दोन-तिन मॉडेल्सचे फोटो आणलेले.. पण अवंतीला एकतर कुठले आवडले नाहीत.. आणि त्या लगेच अव्हेलेबल पण नव्हत्या.. अजुन १-२ दिवस शुट पुढे जात होतं.. मी कॉलेजच्या दिवसांत काही असेच फोटो काढले होते..गुगल-ड्राईव्हवर होतेच ते अपलोड केलेले.. ते दाखवले अवंतीला.. तर तिला आवडले.. कदाचीत अगदीच मनाप्रमाणे नसतील.. पण दुसरा पर्याय पण नव्हता.. समीराने पण मान्यता दिली मग काय.. लगेच त्याच दिवशी दुपारी शुट-ड्न.. थोडं फोटो-शॉप एडीटींग, प्रिटींग करुन एका आठवड्यात.. हिअर आय एम..”, समोरच्या फलकाकडे हात दाखवत राधा म्हणाली..
“धन्य आहेस तु.. कधी कुठे काय करशील तुलाच माहीत…”, कबीर
“अरे इथेच काय.. अजुन बर्‍याच ठिकाणी लागतील हे बोर्ड्स.. आज सगळ्या लिडींग पेपर मध्ये पण अ‍ॅड आहे आमची..”, राधा अभिमानाने बोलत होती..आणि कबीर डोळ्याची पापणीही न हलवता तिच्यातला तो खळाळता उत्साहाचा झरा न्हाहाळत होता.

“कबीर..”, अचानक गंभीर होत राधा म्हणाली.. “त्या दिवशी तु प्रसंगावधान राखुन गोकर्णमध्ये मला वाचवलं नसतंस तर कदाचीत मी आजही कोर्टाच्या फ़ेर्‍यांमध्येच अडकले असते.. माझं हे नविन आयुष्य केवळ तुझ्यामुळे.. थॅंक्स अ लॉट वन्स अगेन..”

बोलता बोलता राधाने कबीरच्या हातावर हात ठेवला..

“..आणि म्हणुनच मी तुझ्यासाठी काही तरी करायचं ठरवंलय..”
“आता काय करते आहेस…”, कबीर
“मी ना.. ह्या अ‍ॅड चे पैसे नाही घेतले..”
“माझ्यासाठी?”
“ऐक तर…. ते पैसे मी घेतले नाहीत.. त्या ऐवजी.. ह्या महीना अखेरीस आम्ही स्विझरलॅडला चाललो आहोत.. ८ दिवसांसाठी.. आणि तु येतो आहेस आमच्याबरोबर..”
“म्हणजे?”
“अरे म्हणजे.. त्या पैश्यांऐवजी मी तुझ्यासाठी स्विसची टुर बुक केलीय…”
“व्हॉट??? आणि म्हणजे तुला एव्हढे पैसे मिळत होते त्या अ‍ॅडचे..”
“नाही रे.. पण हे बघ.. टुरची कॉस्ट जी आम्ही जाहीरात करतो ती अर्थात मार्जीन धरुन असते.. खरी कॉस्ट कमीच असते.. शिवाय मी एम्प्लॉई.. थोडा डिस्काऊंट मिळवला.. ते केलंय मी अ‍ॅडजस्ट.. पुढच्या आठवड्यात मी सांगेन ते डॉक्युमेंट्स दे.. तुझा व्हिसा टाकु लगेच प्रोसेसिंगला…ओके?”
“हम्म ठिक आहे..”
“बरं चल.. ब्रेक-फ़ास्ट केला आहेस?”
“नाही.. कार्यालयातच करेन..”
“कार्यालयात?”

अचानक कबीरला आठवले आज लग्न आहे.. त्याने घड्याळात नजर टाकली.. ९ वाजुन गेले होते.. १०.३० ला त्याला रतीला घेऊन कार्यालयात पोहोचायचे होते..

“ओह डॅम्न.., राधा मला जायला हवं..”, कबीर
“का? काय झालं?”
“अगं.. लग्न आहे श्रेयाचं.. माझ्या चुलत बहीणीचं.. मी अजुन तयार पण नाही… मला आवरायचंय.. रतीला पिक-अप करायचंय..मेलो मी..”, कबीर
“रती? रती कोण?”, रतीच नाव ऐकताच राधा सावध झाली..

कबीरला काय बोलावं सुचेना..
“रती.. अं फ़्रेंड आहे माझी…”
“ओह तीच का ती.. तु फोटो पाठवला होतास त्यात तुझ्या शेजारी होती ती?”
“हम्म तिच..चल पळतो मी..”
“एssss उर्मट.. तुझ्या बहीणीचं लग्न आहे आणि मला इन्व्हाईट पण नाही?”
“अगं तु नव्हतीस इथे.. मग मी काय करणार..?”
“पण आता आहे ना?”
“ओह येस.. ये ना मग…”
ये ना मग?? हे असं इन्व्हाईट.. नको त्यापेक्षा.. जाऊ देत.. असं बळंच नको..स्वतःहुन म्हणाला असतास तर विचार केला असता..”
“ए आता उगाच नाटकं नको करुस.. खरंच ये.. उशीर झाला ना.. गडबडीत सुचलं नाही.. ये नक्की वाट बघतोय.. पत्ता पाठवतो व्हॉट्स-अ‍ॅपवर..”, असं म्हणुन कबीर निघुन गेला..

 

कबीर रतीकडे पोहोचला तेंव्हा ११ वाजुन गेले होते.. एव्हढ्या वेळात दहा वेळा रतीचा फोन येउन गेला होता.. आणि कबीर फ़क्त आल्यावर बोलु एव्हढंच बोलत होता..
कबीर रतीच्या घरी पोहोचला तेंव्हा रती पार्कींगमध्ये येऊन थांबली होती.

गुलाबी रंगाचा त्यावर सोनेरी रंगाची नक्षी केलेला घागरा-चोली तिने घातला होता, पायात किंचीत हाय-हिल्स असलेले चंदेरी रंगाचे चमचमते सॅंन्डल्स, ड्रेसला साजेसा गालावर फ़िक्कट गुलाबी रंगाची छटा असलेला मेक-अप तिने केला होता. डोळ्यात हलकेसे काजळ आणि आयलायनरने डोळ्यांच्या रंगवलेल्या कडांमुळे आधीच सुंदर असलेले तिचे डोळे अधीकच सुंदर भासत होते.

हातातल्या डझनभर बांगड्या आणि खांद्यावरुन पाठीमागुन हातांवर गुंडाळलेली ओढणी सांभाळत रती गाडीमध्ये बसली..

“कशी दिसतेय?”, रती..
“सिंड्रेला…”, कबीर नकळत बोलुन गेला…
“अं?”
“खूप मस्त दिसतेस..”
“चं.. काय रे.. लेखक आहेस ना तु..? काही तरी मस्त कॉम्लीमेंट दे की.. काय आपलं तें तेच नेहमीची वाक्य..”, हसत हसत रती म्हणाली..
“बरं.. मग लिहुनच पाठवीन रात्री व्हॉट्स-अ‍ॅप वर.. आत्ता निघुया?”
“हो चला.. आधीच उशीर झालाय… ए.. पण का उशीर झाला एव्हढा?”

कबीरने गाडी सुरु केली आणि तो स्विझरलॅड-ट्रिप चा भाग वगळुन राधाच्या भेटीबद्दल रतीला सांगीतले..

“ती पण येतीय लग्नाला..”, शेवटी कबीर म्हणाला

रती काहीच बोलली नाही, पण तिला राधाचं लग्नाला येणं समहाऊ आवडलं नसावं असं कबीरने ताडलं..

 

कबीर कार्यालयात पोहोचला तेंव्हा बराच उशीर झाला होता, पार्कींग केंव्हाच भरुन गेले होते. कबीरने रस्त्यावरच गाडी लावली आणि रतीला घेऊन तो आतमध्ये गेला.

“अहो काय शेठ.. किती उशीर?”
“कबीर अरे काय? किती वाजले..सकाळी ब्रेकफ़ास्टला येणार होतास…”
“काय रे ब्रो? कित्ती वाट पहात होते सगळे तुझी?”

एक ना अनेक.. कबीरवर उशीरा आल्याबद्दल प्रश्नांचा भडीमार चालु होता. कबीर मात्र तडक रतीला घेऊन आई-बाबांकडे गेला.

“आई- बाबा.. ही रती.. रती.. हे माझे आई-बाबा..”, कबीरने एकमेकांशी ओळख करुन दिली..

रतीने खाली वाकुन दोघांना नमस्कार केला..

“गोड आहेस गं..”, रतीच्या ह्नुवटीला धरत कबीरची आई म्हणाली.
कबीरने हळुच बाबांकडे प्रश्नार्थक नजरेने बघीतले आणि बाबांनीही हसत हसत हळुच छान आहे अशी खुण केली.

आई आणि रतीला थोड्यावेळ गप्पा मारायला सोडुन कबीर बाहेर खुर्च्यांवर येऊन बसला.
थोड्यावेळाने रतीपण त्याच्या शेजारी येउन बसली.

अधुन मधुन कबीरच्या नात्यातले कोण-ना-कोण येऊन जात होते. कबीर त्यांची आणि रतीची ओळख करुन देत होता.. पण त्याचे लक्ष मात्र घड्याळाकडे आणि कार्यालयाच्या दाराकडे लागुन राहीले होते. मनातुन कुठेतरी त्याला राधा यायला हवी होती, तर दुसरे मन राधा नाही आली तर बरेच होईल असेही म्हणत होते.

नवरा मुलगा आणि नवरी मुलगी शेवटचे विधी संपवुन कपडे बदलायला गेले होते.
“तुम्हा मुलींची खरंच कमाल असते हां.. बघ ना.. श्रेयाचंच.. एक-दोनदा काय भेटले, एकमेकांना पसंद केलं आणि लगेच लग्न? बरं तर बरं.. असा एकदम देश सोडुन त्याच्या घरी जाणार रहायला..”, कबीर म्हणत होता..
“मला नाही वाटत ह्यामध्ये दिवसांनी काही फ़रक पडतो. कधी कधी एका भेटीतही समोरचा आपल्याला अगदी जवळचा वाटतो.. कधी कधी कित्तेक महीन्यांच्या भेटीतही नाळ जुळत नाही..”, रती
“हो बरोबर आहे.. पण आता माझं आणि मोनाचं बघ.. दोघं एकमेकांना इतकं चांगलं ओळखत होतो, एकमेकांच्या प्रेमात होतो.. एकत्रही रहायला लागलो होतो.. पण अचानक सगळं बिघडलं.. इतक्या टोकाला गेलं की..”
“कबीर.. आपण शेवटी माणसं आहोत.. रोबोट्स नाही, एकदा प्रोग्रॅम केले की लाईफ़-लॉग ठरवल्याप्रमाणे वागतील. कितीही, काहीही झालं तरी परीस्थीतीनुसार लोकं थोडीफ़ार बदलतातच.. स्वाभावीक आहे ते..”
“म्हणजे.. तुला म्हणायचंय मोना बरोबर होती, मी चुक?”
“नाही, तसं मला म्हणायचं नाहीये. माझा मुद्दा हा आहे की लग्न, नाती जमणं हा जसा नशीबाचा एक भाग आहे तसा एकमेकांशी जुळवुन घेण्याचाही. त्यामध्ये एकमेकांना किती दिवसांपासुन ओळखतो हा मुद्दा दुय्यम आहे..”

कबीरने बोलता बोलता सहज समोर बघीतले, दाराआडुन त्याचे आई-बाबा कबीर-रतीकडे बघत होते. कबीरची नजरानजर होताच दोघंही पट्कन आत निघुन गेले..

“म्हणजे तुझा लग्न-संस्थेवर विश्वास आहे तर…”, कबीर
“अर्थात. मला लग्न करायला.. आपलं घर सोडुन दुसर्‍याच्या घरी जाऊन नवीन सुरुवात करायला, नवीन नाती जोडायला खूप आवडेल..”, रती

कबीर पुढे काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला.

राधाचा फोन होता..

“कबीर.. बाहेर ये ना.. मी गेटपाशी आहे…”
“हो आल्लोच..”, असं म्हणुन कबीर राधाला रिसीव्ह करायला बाहेर गेला.

रतीने नकळत आपला ड्रेस निट केला, मोबाईलच्या कॅमेरात पाहुन केस निट केले आणि उगाचच मोबाईलवरचे मेसेजेस बघण्यात मग्न होऊन गेली.

थोड्याच वेळात कबीर राधाला घेऊन रती बसली होती तेथे आला.

“रती.. मिट राधा… राधा .. ही रती..”, कबीरने दोघींची एकमेकांशी ओळख करुन दिली..
“हाय राधा…”, रती म्हणाली..
“हाय रती.. यु आर ब्युटीफुल..”, शेजारची खुर्ची ओढुन त्यावर बसत राधा म्हणाली..
“थॅंक्स.. बट यु आर गॉर्जीयस..”, रती

दोघीही हसल्या..

“सो.. सकाळी गडबडीत बोलता आले नाही.. हाऊ वॉज इटली..”, कबीर..
“इटली.. वॉव.. ऑस्समच आहे एकदम.. आम्ही खुप फ़िरलो.. आर्ट फ़ेअर्स, म्युझीअम्स..फ़ोटोग्राफ़ी एक्झीबिशन्स.. रेस्तॉरंट्स.. नेपल्सचे समुद्र किनारे तर अमेझींग आहेत.. यु शुड डेफ़ीनेटली व्हिजीट…”, राधा बोलत होती
“वॉव.. मस्त राधा.. सही लाईफ़ आहे तुझी.. मज्जा नै मस्त मस्त ठिकाणं फ़िरायला मिळतात..”, रती म्हणाली..
“हम्म..पण मी स्ट्रगल करुन ही लाईफ़ मिळवली आहे.. त्यासाठी कित्तेक गोष्टी सोडल्या आहेत, कित्तेक लोकांची मनं दुखावली आहेत.. कबीर नोज बेटर.. ना कबीर..”, राधा कबीरकडे बघत म्हणाली..

तिघं जण बोलत असताना तिकडुन कबीरची आई चालली होती.. राधाला बघुन ती परत आतमध्ये गेली आणि तिने कबीरच्या वडीलांना बाहेर बोलावलं..

“अहो, एक मिनीटं बाहेर या..”
“का? काय झालं..?”
“अहो..ती रती-कबीरबरोबर बसलीए ती.. ती राधा आहे का?”

कबीरच्या वडीलांनी त्याच्या आईला कबीरशी फोनवर झालेलं बोलणं सांगीतलं होतं..
कबीरच्या वडीलांनी हळुच डोकावुन बघीतलं..

त्यांनी राधाला टीव्हीवर बघीतलं होतं तेंव्हा ती खूप वेगळीच दिसत होती. पण साधारण चेहरा ओळखीचा वाटला तसे ते म्हणाले..
“हो बहुतेक.. तिच आहे ती..”
“अहो पण.. मग ती इथे कश्याला आलीय? कबीर आणि रती कित्ती छान दिसत आहेत एकत्र.. ही कश्याला उगाच मध्ये तिथे?”
“आता मला काय माहीत.. कबीरनेच बोलावले असेल तिला..”
“काय करावं ह्या मुलाचं..”, डोक्याला हात लावुन त्याची आई निघुन गेली.

इकडे तिघांच्या गप्पा चालु होत्या तेव्हढ्यात एक आज्जीबाई डुलत-डुलत राधापाशी आल्या आणि म्हणाल्या.. “अगं.. पेपरात ती जाहीरात आलीय त्यातली ती मुलगी तुच का?”

राधा हसली आणि म्हणाली.. “हो आज्जी मीच ती..”
“एक.. सेल्फ़ी काढू का तुझ्याबरोबर..” असं म्हणुन त्या आज्ज्जीबाईंनी राधाबरोबर एक-दोन फ़ोटो काढुन घेतले आणि त्या निघुन गेल्या.

आणि थोड्याच वेळात ती बातमी इतरत्र पसरली.. काही क्षणातच राधा सेलेब्रेटी झाली.. कोण ना कोण येऊन तिच्याबरोबर फ़ोटो काढुन घेत होते. शेवटी राधाच एका ग्रुपबरोबर फोटो काढायला तेथुन निघुन गेली..

“कबीर.. अरे तुझी गाडी कुठेय?”, कबिरचे बाबा एव्हाना तेथे आले होते..”
“बाहेरचं आहे.. आत पार्कींग नाही मिळालं..”, कबीर..
“व्हेरी गुड.. एक काम कर ना श्रेया आणि तिच्या नवर्‍याला देवदर्शनाला घेऊन जायचंय.. जवळंच आहे इथे.. पण त्यांच्या गाडीच्या मागे कोणतरी गाडी पार्क करुन गेलंय.. जातोस?”
“हो.. जातो की.. त्यात काय एव्हढं..” असं म्हणुन रतीला दोन मिनिटांत येतो सांगुन कबीर बाहेर पडला.

 

कबीर गेल्यावर रती एकटीच राहीली होती. मोनिकाचं महत्वाच फोटोशुट असल्याने ती आली नव्हती तर रोहन त्याच्या आज्जीची तब्येत बिघडल्याने दोन दिवसांपुर्वीच गावी गेला होता. त्यामुळे ते दोघंही नव्हते.

थोड्यावेळाने राधा रती शेजारी येऊन बसली..

“कबीर कुठे गेला?”, राधा..
“अं तो बाहेर गेलाय ते देवदर्शन करायला गाडी घेऊन गेलाय, येईलच १५ मिनीटांत”.. रती
“ओह ओके..”

एक विचीत्र संवादाची पोकळी दोघींमध्ये निर्माण झाली होती. काय बोलावं कुणालाच सुचेना.. अचानक दोघीही एकदमच म्हणाल्या..

“तु आणि कबीर…”

मग दोघीही हसल्या.. अर्थात त्यामुळे दोघींमध्ये निर्माण झालेलं टेंन्शन थोडं कमी झालं..

“नाही.. तसं काही नाहीए आमच्या दोघांत.. मी आणि कबीर एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत..”, राधा म्हणत होती..”कबीर माझ्याबरोबर माझ्या प्रत्येक कठीण प्रसंगात होता.. तो तेंव्हा नसता.. तर आज मी इथे नसते.. आय ओ हीम ए बिग थिंग.. पण खरंच आमच्या दोघांत तसं काही नाहीए.. इन्फ़ॅक्ट माझं तसं कुणाबरोबरंच काही नाहीए…”, हसत हसत राधा म्हणाली..

“का?”,रती
“म्हणजे मला माझं आयुष्य असं मोकळेपणाने जगायचंय.. मला असा कोणीतरी हवाय जो मला रिस्ट्रिक्ट करणार नाही.. तर मला मोकळीक देईल.. मला माझं आयुष्य जसं मला हवंय तसं जगु देईल..”, राधा

“माझ्या बाबतीत अगदी उलटं आहे..”,रती म्हणाली.. “उलट मला असा कोणीतरी हवाय जो सतत माझ्या आजुबाजुला असेल..जो मला दिवसांतुन पन्नास वेळा फोन करेल.. मी कुठे आहे, काय करतीएस विचारेल.. मला ना, अश्या सुखद बंधनात कायमंच अडकुन रहायला नक्कीच आवडेल..”
“मग तुझं आणि कबीरचं नक्की जमेल.. तो अगदी तुझ्यासारखाचं आहे..”, राधा
“खरंच?”, रती एकदम आनंदाने बोलुन गेली.

काही क्षण दोघी एकमेकांकडे पहात होत्या. शब्द नसले तरीही तो मुक संवाद खुप काही बोलुन गेला. रतीच्या डोळ्यांमध्ये कबीरसाठी असलेलं प्रेम राधा स्पष्ट पाहु शकत होती.

“बरं चलं, मला निघायला हवं..”, अचानक राधा म्हणाली
“अं? अग आत्ता तर आलीएस ना.. अजुन लग्न पण नाही लागलंय..”, रती
“हो गं, पण खरंच थोडं महत्वाचं काम आहे..”
“पण कबीर येईपर्यंत तरी थांब.. त्याला भेटुन जा नं..”, रती
“नाही नको.. त्याला सवय आहे माझ्या अश्या अचानक निघुन जाण्याची.. तो नाही काही बोलणार.. चल.. भेटु परत कधी..”, असं म्हणुन राधा तेथुन निघुन गेली.

 

पाचंच मिनिटांत कबीर आला..

“हे काय.. राधा कुठेय?”, कबीर ची नजर राधाला शोधत होती..
“जस्ट गेली ती..”, रती म्हणाली..
“म्हणजे?”
“तिला काही तरी महत्वाचं काम होतं म्हणुन गेली ती..”, रती
“अरे अशी कशी गेली.. थांबवायचं नाहीस का तु तिला..”, कबीरचा आवाज अचानक वाढला.. इतका की आजुबाजुला बसलेली लोकं त्यांच बोलणं थांबवुन कबीर आणि रतीकडे पाहु लागली
“कबीर.. मी म्हणले तिला.. कबिरला भेटुन जा.. तिने ऐकलं नाही, यात मी काय करणार..”, कबीरच्या अचानक वाढलेल्या आवाजाने रती भांबावुन गेली..
“मला फोन तरी करायचास ना..”
“मी का तुला फोन करु.. राधा तुझी मैत्रीण आहे, माझी नाही. तिने तुला फोन करायला हवा होता.. तिला वाटलं नाही करावासा.. तु मला का सांगतोएस हे..”

“किती वेळ झाला जाऊन…”
“पाचच मिनीटं…”, रती दुसरीकडे बघत म्हणाली..

कबीर धावत धावत राधा दिसतेय का बघायला बाहेर पळाला..
कबीर दिसेनासा होईपर्यंत रती त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पहात राहीली, मग तिने आपली पर्स उचलली, कार्यालयाच्या बाहेर आली, आणि रिक्षात बसुन निघुन गेली.

 

राधा पुनमच्या आलिशान फ्लॅटमधील प्रशस्त टेरेसमध्ये डोकं धरुन बसली होती.
“काय घेणार? थंड बिअर आणु?”, पुनमने विचारलं
“श्शी नको.. कडवट होईल तोंड.. स्मर्नऑफ़ चालेल आणि ऑन-द-रॉक्स प्लिज…”, राधा
“ओके..”, पुनम हसुन परत आत गेली आणि येताना दोघींसाठी दोन लार्ज पेग्स आणि चिप्स घेऊन परतली
“सो अ‍ॅज आय अंडरस्टॅंड.. तुला कबीर आवडतो.. कबीरला तु आवडतेस.. पण रतीला पण कबीर आवडतो.. मग.. मग तुला रती आवडते का?”, पुनम गोंधळुन म्हणाली..
“ओह कमऑन पुनम.. मला कश्याला रती आवडेल…”, राधा वैतागुन म्हणाली..
“सॉरी.. सॉरी.., पण मग तुम्ही दोघं एकमेकांना आवडताय, तर प्रॉब्लेम कुठे आहे? तुला कबीर हवाय? का नकोय?” पुनम
“मला कबीर हवाय पुनम.. पण माझ्या टर्म्स वर.. म्हणजे त्याला जशी मी हवीय तशी मी होऊ शकत नाही हे नक्की.. तो अ‍ॅडजस्ट करायला तयार असेल तर.. आय मीन लुक.. दर वेळेस मुलींनीच का अ‍ॅडजस्टमेंट करायची? त्यांच्यासाठी आपण आपली लाईफ़-स्टाईल.. आपलं करीअर त्यांच्या सोईने करायचं का? कबीर तसाही लेखकच आहे.. तो घर सांभाळायला तयार असेल तर..”

“खरं आहे तुझं.. पण आपली भारतीय मेंटालीटी बदलायला वेळ लागेल राधा.. आणि तो तयार असला तरीही त्याच्या घरच्यांच्याही काही अपेक्षा असतीलच ना एक सुन म्हणुन..”, थोडा विचार करुन पुनम म्हणाली..
“तेच तर.. कबीर ने ते ठरवावं पहीलं.. त्याला बायको हवीए का आई-वडीलांसाठी सुन..”, राधा
“तु कबीरशी बोलली आहेस ह्या विषयावर? आय मीन त्याला कधी क्लिअरली सांगीतलं आहेस की तुला पण तो आवडतो.. तु त्याच्याबरोबर एकत्र राहु शकतेस.. पण तुझ्या ह्या काही अटी आहेत वगैरे..”, पुनम
“नाही..”
“मग मला वाटतं तु त्याच्याशी हे सर्व बोलावंस.. पण हे बघ, हे असं एकदम अंगावर नको जाऊ त्याच्या तुझ्या अटी वगैरे घेऊन.. त्याला तुझ्याबाजुने करुन घे..त्याला इन्व्हॉल्व्ह कर तुझ्यात आणि मग बोल..”
“म्हणजे नक्की काय करु?”, राधा..
“इमोशन्स राधा इमोशन्स.. त्याला इमोशनल कर.. त्याच्यासमोर तु गरीब-बिचारी.. अबला..एकटी वगैरे आहेस हे भासव.. तुला त्याची गरज आहे हे त्याला इंडायरेक्टली जाणवुन दे.. मग बघ.. तो स्वतःहुन त्याचा खांदा तुला रडायला पुढे करेल..”, पुनम..
“पुनम्.. यु बिच..कसली आहेस अगं तु..”, राधा हसत हसत म्हणाली..
“सगळे पुरुष एकसारखेच असतात अगं.. दिसली दुःखी स्त्री.. की कर खांदा पुढे.. ट्राय इट.. आणि ऑल-द-बेस्ट..”

राधाने ग्लास बॉटम्स-अप केला आणि ती तेथुन बाहेर पडली..

[क्रमशः]

मंडळी, तुमच्या ढीग-भर प्रतीक्रिया,अपेक्षा, सजेशन्स ने खूप मज्जा आली.. प्रत्येकाचे कथेबद्दलचे, कबीर, रती,राधाबद्दलचे विचार वाचुन मस्त वाटलं. खरं तर ह्याच भागात कथा संपली असती, संपवता आली असती.. पण अजुनही परफ़ेक्ट-ऐंडींग सापडत नाहीए.. सो शेवट पुढच्या भागात.. तो पर्यंत जरा विचार करायला ही वेळ मिळेल.. तोपर्यंत तुमची मतं, प्रतिक्रियांचा ओघ असाच चालु राहुद्या..

भेटुयात पुढच्या आणि कथेच्या शेवटच्या भागात..

– अनिकेत

134 thoughts on “इश्क – (भाग २५)

 1. prasad

  part mast no doubt but still kahi tari missing vattay may be radha thodi kami whimsical challi asti nahi ka ? but still writers angle is the perfect. still loving the story. bharpur goshti lihi. n strongly vattay ekhada book pan try karavas prachanda success milel obvio financially n as a writer. ( sry are-ture kartuy but ekun mazya mothya bhavachyach vayacha vattos so……..)

  Reply
 2. Prajakta Bhagwat

  please post the next part asap eagerly waiting for it… every morning m checking my mails just for the most awaited end…

  Reply
 3. गौरव

  मस्त आहे हा भाग पण खुप चं आहे आसच लिहा सर

  Reply
 4. sanyogeeta shirke

  pudhil bhag post ka karat nahit lavkar kara ho
  visrayla zale aahe story madhle caraters
  😃😃😃😃

  2016-06-11 21:25 GMT+05:30 “डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा” :

  > अनिकेत posted: “भाग २४ पासुन पुढे >> कबीरची झोप मोडली ते केंव्हापासुन
  > वाजणार्‍या फोनच्या आवाजाने. आदल्या दिवशी रात्री नातेवाईकांचा सगळा गोतावळा
  > लग्नासाठी येऊन थडकला होता. सगळ्यांना भेटून, गप्पा-टप्प्पांमध्ये कबीरला
  > झोपायला मध्यरात्र उलटुन गेली होती. त्याने घड्या”
  >

  Reply
 5. Pingback: इश्क – (भाग २६) – डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s