Monthly Archives: June 2017

प्लॅन बी-४- वाघा बॉर्डर


वाघा बॉर्डर

 

वाघा, अमृतसर पासून साधारण ४०कि.मी. अंतरावर, भारत आणि पाकिस्तानच्या बॉर्डर वर वसलेले गाव. इथली बॉर्डर, तेथे संध्याकाळी होणारी परेड फार प्रसिद्ध आहे वगैरे ऐकून होतो. पण कधी ह्या भागात येण्याचा योग आला नव्हता. आमचे काश्मीर दर्शन हुकले आणि योगायोगाने हि संधी चालून आली. अर्थात खरं सांगायचं तर मला फारशी उत्सुकता नव्हती, आता आलोच आहोत तर बघू असाच काहीसा विचार डोक्यात होता.

सकाळी हॉटेल मधून चेक-आउट करून सुवर्ण मंदिराला भेट दिली.  तेथून अगदी जवळच असलेली ‘जालियानवाला बाग’ सुद्धा पाहिली. अर्थात ह्या दोन्ही बद्दल नंतर कधीतरी सावकाशित लिहीन.

ऊन प्रचंडच तापले होते. हिमाचल प्रदेशच्या थंडीतून इथे आल्यानंतर हे ऊन अधिकच भाजून काढत होते. सुवर्ण मंदिराच्या परिसरात ठिकठिकाणी मिळणाऱ्या थंडगार लस्सीचे २-३ ग्लास पोटात ढकलले आणि वाघा बॉर्डरकडे प्रयाण केले.

संध्याकाळची ती परेड साधारणपणे ५ वाजता सुरु होते, पण पुढे जागा मिळवायची असेल तर लवकर जाणे मस्ट, त्यामुळे १ वाजताच निघालो. पोहोचेस्तोवर २ वाजलेच. पोहोचलो तेंव्हा आधीच गर्दी उसळली होती. पटापटा रांगेत लागलो. सेक्युरीटी चेक्स वगैरे पार करून मुख्य स्टेडीयमपाशी पोहोचलो. नशिबाने पुढची जागा शिल्लक होती, पण त्याला कारणही तसेच होते. पुढचा सर्व भाग कडक उन्हामध्ये होता. जून महिन्यातले, अमृतसरचे, ३ वाजताचे ऊन ज्याने अनुभवलंय तोच जाणे. बसायच्या पायऱ्याही भयंकर तापल्या होत्या, बसणं अशक्यच होतं. कडक्क ऊन अगदीच डोक्यावर होतं. सॉल्लिड म्हणजे सॉल्लीडच गरम होत होते. काही वेळ कसाबसा काढला खरा पण बरोबरची पोरं कुरकुर करायला लागली. अश्यातच समोरच्या स्टेडीयम मधील एक मुलगी उन्हामुळे चक्कर येऊन पडली. तिचे बाबा तिला घेऊन धावत धावतच बाहेर पळाले. अधिक धोका पत्करणे मूर्खपणाचे होते. मलापण ते ऊन सहनच होत नव्हते. मी मुलांना घेऊन बाहेर जातो, तुम्ही ती परेड बघून बाहेर या असं सुचवले देखील. पण आता आलाच आहेस इथपर्यंत तर हे चुकवू नको असे बरोबरच्यानी सुचवले. शेवटी काही महिला मंडळी मुलांना घेऊन थोड्या सावलीच्या ठिकाणी जाऊन बसल्या. एव्हाना मी एक टोपी आणि छत्री मिळवली होती. बरोबरच रुमाल बिसलेरी पाण्याने ओला करून डोक्यावर टाकला, पण उन्हाची काहिली काही केल्या कमी होतंच नव्हती. वाटत होतं, सगळं सोडून जावं निघून इथून.

घड्याळाचा काटा अत्यंत संथ वेगाने पुढे सरकत होता. बघता बघता सर्व स्टेडियम पूर्ण भरून गेलं. हाकेच्या अंतरावर भारताचे गेट होते आणि पलीकडे पाकिस्तान.

 

अक्षरशः क्षण आणि क्षण मोजून काढत होतो. आपल्या बाजूला हजाराच्या वरती लोक जमली होती. काही व्ही.आय.पी. मंडळी अगदी गेटच्या जवळ उभं राहून तेथील सैनिकांकरवी आपले ग्रुप फोटो काढून घेत होते. इतका राग आला होता त्यांचा… असो.

पाकिस्तानच्या बाजूला फार-तर-फार २०-३० लोक जमली होती. उगाचंच मोबाईलचा टॉर्च चालू करून तिकडून सगळ्यांना हात करत बसले होते येडे.

ते दोन भयंकर तास शेवटी कसे बसे सरले. रस्त्यावरची गर्दी एव्हाना पांगली होती, सर्वजण आपल्या जागेवर बसले होते. लोकांना माईक वरून सूचना दिल्या जात होत्या.

थोड्याच वेळात स्पीकर वर देशभक्तीपर गीतं लागली आणि अंगात जणू स्फुरण चढले.

“रंग दे बसंती चोला” गाणं सुरु झालं आणि पब्लिकने एकच आवाज केला, प्रचंड जल्लोष, इतका कि पाकिस्तानच्या बाजूचे लोक सुद्धा बहिरे झाले असतील.
“सुनो गौर से दुनियावलो, सबसे आज होंगे हिंदोस्तानी” गाण्याने अंगावर शहारे आणले.

प्रेक्षांतील महिलांना रस्त्यावर येऊन नृत्य करण्याची मुभा देण्यात आली आणि एक एक करत बरीच गर्दी जमा झाली. त्या नृत्यामध्ये जोश होता, उल्हास होता, अभिमान होता, स्वातंत्र्य होते.

पाकिस्तानच्या बाजूला अजूनही रस्त्यावर शुकशुकाटच होता. त्या बाजूलाही काही गाणी सुरु होती इतकंच.

आपल्या बाजूचे नृत्य जणू एका लग्नाला आलेल्या वरातीसारखं वाटतं होते. कोण कुठल्या गावचे, कुठल्या प्रांताचे, पण सर्व एकरूप होऊन नाचत होते.

सैनिकांनी मग त्यांना भारतीय ध्वज दिला आणि तो ध्वज घेऊन साधारण त्या गेट पर्यंत धावत जाऊन यायची मुभा दिली.

“आईशप्पथ काय नशीब आहे राव…” नकळत डोक्यात विचार येऊन गेला

एक मारवाडी आज्जी, डोक्यावरून घुंगट घेऊन हातात भारताचा ध्वज घेऊन धावत गेल्या तेंव्हा अख्ख स्टेडियम किंचाळत होतं.

वाटलं किती स्वातंत्र्य आहे आपल्याला. कुणाला बंधन नाही कशाचं. हेवा वाटावा असा आपला देश, आपली संस्कृती आहे. हळूहळू महिलांबरोबर छोट्या मुलांनासुद्धा त्यात सामील केले गेले. मी पण माझ्या मुलाला पाठवून दिले.  Moment of a lifetime it was.

थोड्यावेळाने सैनिकांनी पुन्हा रस्ता मोकळा केला. आता मुख्य परेडची वेळ झाली होती. उपकार करण्याइतपत सूर्याची दाहकता थोडी कमी झाली होती, जोडीला थोडे वारे सुटल्याने बरंच बरं वाटत होते.

काही वेळातच परेड सुरु झाली. डोक्याला काळं फडकं बांधलेले दोन तरणेबांड जवान ताड-ताड पावलं टाकत अगदी त्या गेटच्या जवळ गेले.

साला, काय ऍटिट्यूड होता त्यांचा, काय माज होता, त्यांच्या चालण्यात. जणू परवानगी दिली तर आत्ता गेट ओलांडून पाकिस्तान मध्ये घुसतील आणि एकेकाचा खात्मा करतील.

मागोमाग, बी.एस.फ.च्या दोन महिला सैनिक संचालन करत गेट पर्यंत गेल्या. काय वय असेल त्यांचं? २२? २५? पण काय तडफ होती त्याच्या देहबोलीत, काय आत्मविश्वास होता त्यांच्या चेहऱ्यावर. आणि आपण? आपण काय होतो? काय करत होतो २२-२५चे असताना?

पाठोपाठ बी.एस.फ.च्या सैनिकांची एक तुकडी संचालन करत गेली आणि ‘भारत माता कि जय’, ‘वंदे मातरम’ ने स्टेडियम निनादून गेले. त्याबाजूला सुद्धा एव्हाना काही कार्यक्रम सुरु होते, पण मला खात्री आहे, भारतीयांच्या ह्या आवाजात, त्यांचे बोलणे सुद्धा त्यांना ऐकू गेलं नसेल.

ह्या सगळी परेडचे सूत्र संचालन करणारा सफेद ती-शर्ट-पॅन्ट वेशातील सैनिक लोकांना माईक वरून उचकवत होता. आणि त्याबरोबर जल्लोष क्षणा-क्षणाला वाढतच होता.

 

ओरडून ओरडून घसा कोरडा पडला होता. भावनांचे इतके विचित्र मिश्रण मनामध्ये झाले होते, देशाबद्दल इतकी अभिमानाची भावना मनामध्ये निर्माण झाली होती कि त्याचे शब्दात वर्णन करणे केवळ अशक्यच. नकळत डोळ्यात अश्रू जमा झाले होते, खूप जोरात ओरडायची इच्छा होती, पण शब्दच फुटत नव्हते, जणू कंठ दाटून आला होता.

फोटो अनेक काढले, पण तेथील अनुभव कुठल्याही फोटोला १% पण न्याय देऊ शकत नाहीए हे खरं.

गेट उघडले गेले आणि दोन्ही बाजूचे सैनिक ताड-ताड पावलं टाकत एकमेकांना सामोरे गेले. जोरदार शक्ती प्रदर्शन झाले. त्याबाजूचे सैनिक ढोल-बिल घेऊन आले होते वाजवायला, आपल्या बाजूला हजारो लोक असताना त्याची गरजच नव्हती. साउंड-लेव्हल ची मर्यादा कित्तेक पटीने ओलांडली गेली होती. सर्वांच्या अंगात जणू एक अदृश्य शक्ती संचारली होती. अंगावर क्षणा-क्षणाला रोमांच फुलत होते.

तासाभराचा तो कार्यक्रम केवळ अवर्णनीय होता. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी बघावाच… बघायलाच पाहिजे असा.

कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही बाजूचे सैनिक आपले आपले ध्वज खाली उतरवतात आणि मगच परेड संपते.

कार्यक्रम संपला आणि बहुदा लोकांमधली देशभक्ती पण संपली. प्रचंड गर्दी उसळली, जाण्यासाठी एकच घाई. सर्वत्र रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, खाद्य पदार्थांचे प्लॅस्टिक रैपर्सचा खच पडला होता. कुणाला असे वाटले नाही कि निदान इथे तरी कचरा करू नये. ठिकठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी रिकामे पिंप ठेवले होते, पण इतके कष्ट घेतो कोण?

 

ज्यांना जागा मिळाली नाही अशी अनेक शेकडो लोक बाहेर उभी होती, जी ह्या आनंदाला मुकली होती. सर्व स्टेडियम रिकामे झाल्यावर त्यांना आतमध्ये सोडतात. तेव्हढाच काय तो त्यांना आनंद.

बाहेर आलो तर अजून एक बाई नुकतीच चक्कर येऊन पडली होती. तिला बर्फ लाव, तोंडावर पाणी मार वगैरे चालू होते.

“लाहोर २२ कि.मी” दर्शवणारा पांढरा-पिवळा माईलस्टोन दगड फोटोसाठी गर्दी जमवत होता.

तेथूनच पलीकडे पाकिस्तानची बॉर्डर दिसत होती. खालच्या फोटोत त्या झाडाच्या मागे जे काटेरी कुंपण दिसतेय तीच ती पाकिस्तानची बॉर्डर. दुसऱ्या बाजूने बहुदा आयात-निर्यात करण्यासाठी जाणारे ट्रक्स जातील असा रस्ता दिसत होता.

 

 

वाहन तळाकडे जाताना वाटेत डीजे लागला होता. तरुणाई बेभान होऊन नाचण्यात गुंग होती. आश्चर्य म्हणजे मध्येच त्याने आपले “सैराट” मधले “झिंग झिंग झिंगाट” लावले. महाराष्ट्रापासून इतके दूर, बॉर्डरवर आपले मराठी गाणे ऐकून भारी वाटले.

अख्या ट्रिप मधला मला वाटतं “वाघा-बॉर्डर”चा अनुभव सगळ्यात भन्नाट होता. आयुष्यात विसरू नये, विसरू शकणारच नाही असा.

त्या दोन तासाच्या उन्हात आम्ही वेडे-पिसे झालो होतो, आणि आपले सैनिक आयुष्य घालवता अश्या extreme ठिकाणी.

काय हालत होत असेल त्यांची राजस्थानच्या वाळवंटात? काय होत असेल त्यांचं हाडं गोठवणाऱ्या सियाचीनच्या थंडीत?
कधी कुठून गोळी येईल आणि काळजाचा, डोक्याचा वेध घेईल ह्याचा नेम नाही. तरीही तीच तडफ, तीच निर्भयता, तीच देशभक्ती कशी ठिकवून ठेवत असतील हि लोक? कसल्या रक्ता-मांसाची बनलेली असतात ही?

नेहमी जाणीव असतेच, पण आज खूप जास्त प्रकर्षाने झाली कि आपण किती सुखी आहोत, किती सुरक्षित आहोत. केवळ देशासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या ह्या निर्भीड सैनिकांमुळेच.

सलाम तुम्हाला अगदी … अगदी मनापासून.

प्लॅन बी-3


मैक्लॉडगंज

रात्री, साधारपणे 11.30च्या सुमारास वेड्या-वाकड्या वळणाचा घाट पार करत आमची गाडी मैक्लॉडगंजच्या जवळ पोहोचली होती. आजूबाजूला किर्र काळोख होता. आर्मी-कोर्टर्सच्या बाहेर हातात बंदुका धरून उभे असलेले सैनिक सोडले तर पूर्ण रस्ता निर्मनुष्य होता.

मार्केटही पेंगुळलेलेच होते. नुकतीच जेवणं आटपून हातात-हात घालून फिरणारी नवपरिणीत जोडप्यांची संख्याही लक्षणीय होती. गावातले रस्ते प्रचंड लहान होते, त्यामुळे एकदा पुढे गेल्यावर परत गाडी वळवून मागे येऊन हॉटेल शोधणे एक दिव्य प्रकार ठरला. हॉटेलपाशी पोहोचतच होतो तर अचानक गाडी समोर गलका उडाला. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या एकाला काही लोकांनी मिळून गाडीवरून खाली खेचला होता आणि त्याची धुलाई चालू होती.

 

श्रीनगरची दगडफेक नको म्हणून ते टाळून इथे आलो, तर इथे हे प्रकार, असेच काहीसे भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर होते. पण तो प्रकार थोडक्यात आटोपला आणि लोकं आपल्या आपल्या मार्गाने पांगले. गाडीतून खाली उतरल्या उतरल्या रस्त्याच्या कडेने असलेल्या सिख-कबाब आणि मोमोजच्या टपऱ्यांनी मंडळींचे लक्ष वेधले गेले. परंतु आधी चेक-इन करू आणि मग बघू ह्या विचाराने आम्ही आत शिरलो.

आयुष्यात पहिल्यांदाच असे झाले असेल कि आम्ही कुठल्या हॉटेलला चाललो आहोत, ते कसे असेल ह्याची तिळमात्र कल्पना नव्हती. सगळं बुकिंग अगदी काही मिनटांतच उरकले असल्याचा परिणाम होता. पण नशिबाने हॉटेल छान निघाले. सर्वत्र प्रचंडच थंडी होती. खोलीत वुडन-फ्लोरिंग असूनही पायाला थंडी वाजत होती. पुणेकर असल्याने लगेच कानटोपी, सॉक्स चढवले आणि थोडं फ्रेश होऊन खाली उतरलो.

खाण्यासाठी काही मंडळींनी पारंपरिक हॉटेलचाच मार्ग धरला, तर काही लोकांनी कबाब-मोमोजकडे धाव घेतली.

यथेच्छ पेट-पुजा झाल्यावर तुझी खोली बघू, माझी खोली बघु करून आम्ही सरळ बेडमध्ये घुसलो. दोन दिवसांनंतर मस्त गुबगुबीत बेड मिळाला होता. बेडच्या समोरच विशाल काच होती ज्यातून बाहेरचा नजारा, व्हॅली दिसत होती. काही मिनिट गेली आणि आकाशात एक वीज कडाडली, थोड्यावेळाने दुसरी आणि मग चमकणाऱ्या विजांचे सत्रच सुरु झाले.

“अरे देवा । पाऊस कि काय?” म्हणेस्तोवर बाहेर पावसाला सुरुवातही झाली होती. विजांचा कडकडाट चालूच होता. डोळे मिटले तरी त्या मोठ्या काचेमुळे चमकणाऱ्या विजा जाणवतच होत्या, पण थकवा असल्याने, त्यात ती प्रचंड थंडी आणि अंगावर गरम पांघरून, त्यामुळे लगेचच झोप लागली.

 

सकाळी जाग आली तेंव्हा बाहेर फटफटायला लागले होते. घड्याळ बघितले तर कुठे ५-५.३०च वाजत होते, प्रकाश मात्र जणू ७ वाजून गेले असावेत. पुन्हा झोपायचा निरर्थक प्रयत्न करून शेवटी पांघरून झटकून बाल्कनीत आलो. दूरवर व्हैली मध्ये ढग खाली उतरले होते.  फटाफट आंघोळी उरकल्या, ब्रेकफास्ट केला आणि फिरायला बाहेर पडलो.

मेक्लोडगंज चारही बाजुंनी डोंगरांनी वेढलेले होते. डोंगरांवरची हिमशिखरे सृष्टिसौंदर्याला अधिकच खुलवत होती. मध्येच ढगांनी डोंगर झाकला जायचा, तर ढग बाजूला झाल्यावर दिसणारी ती हिमशिखरे स्तिमित करायची.

सर्व बाजुंनी बर्फ असल्याने वाऱ्याची झुळूकही अंगावर काटा आणत होती. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा मोर्चा वळवला तो ‘भागसु धबधब्याकडे’ अर्थात त्याला फारसे पाणी नव्हते, परंतु तेथपर्यंत पोहोचण्याची वाट खूपच सुरेख होती. साधारण एक किलोमीटरचा तरी walk होता. तेथे पोहोचेपर्यंत पुरी दमछाक झाली. पण आवडती गोष्ट म्हणजे ढीगभर फोटो मिळाले, सेल्फी, गृफी, निसर्गचित्र, फुलं, गुबगुबीत मेंढ्या, रंगीत किडे आणि वगैरे वगैरे 🙂

लेज खाणाऱ्या लोकांच्या अंगावर इथल्या मेंढ्या धावून जात होत्या.. लेज खाण्यासाठी. नेहमी माकडं असले प्रकार करताना पहिले होते… काय नं? पहावं ते नवलच. चढाई करून त्या थंडीतही मस्त घाम फुटला. मग अमूलची कोल्ड-कॉफी पोटात ढकलली आणि दुसऱ्या प्रेक्षणीय स्थळाकडे निघालो.

गावातील रस्ते लहान असल्याने आमचा गाडीवाला गाडी गावाबाहेरच बाहेर पार्क काढून झोपा काढत होता. आम्हाला चालण्याशिवाय पर्याय नव्हता.

 

संपूर्ण रस्ता स्वच्छ आणि देवनारच्या वृक्षांनी सजलेला होता. सूर्य एव्हाना पुन्हा ढगांआड गेला होता. रस्त्यावर एका ठिकाणी एक वृध्द तिबेटियन जोडपे सारंगी सारख्या वाड्यावर ‘परदेसी -परदेसी’ गाणं वाजवत होते. ते मधुर स्वर पूर्ण व्हैली मध्ये भरून गेले होते. फारच स्वर्गीय अनुभव होता तो. काही निवडक लोक ते संगीत आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेत होती. माझ्या मते, मोबाईल ते दृश्य, ते स्वर, तो अनुभव सामावून घेण्याच्या पलीकडे होता. आम्ही चालत राहिलो, काही अंतर दूरपर्यंत ते संगीत ऐकू येतच होते.

 

 

चालता चालता,  गुगलवर मैक्लोडगंज बद्दल माहिती जमवण्याच्या प्रयत्न केला. मैक्लोडगंज हीच ती जागा जेथे १९५९ मध्ये बौद्ध धर्मगुरु दलाई लामा आपल्या हजारो अनुयाइंसहित तिबेटवरून इथे येऊन स्थायिक झाले. आणि म्हणूनच इथे दलाई लामांच एक मोठ्ठ मंदिर आहे जेथे शाक्य मुनि, अवलोकितेश्वर आणि पद्मसंभव ह्यांच्या मूर्त्या विराजमान आहेत. बाजारपेठेतील बहुतांश वस्तू ह्या तिबेटी संस्कृतीशीच निगडित आहेत.

 

दलाई लामांचे मंदिरही प्रशस्त होते. त्यांचे अनेक अनुयायी ठिकठिकाणाहून इथे आले होते. लहानांपासून थोरांपर्यंत अनेक मॉंक त्या प्रसिद्ध लाल-पिवळा झगा आणि डोक्याचं टक्कल वेशात फिरत होते. बाजारपेठेतही अनेक जण आईस्क्रीम, पिझ्झा खाताना दिसून आले.

मैक्लॉडगंज ट्रेकिंगसाठीही बरेच प्रसिद्ध असल्याचे लक्षात आले. ठिकठिकाणी ट्रेकिंगच्या जागांची माहिती देणारे, ट्रेकिंगचे साहित्य पुरवणारे किंवा ट्रेकिंग ऑर्गनाईझ करणारे माहितीपत्रक लावलेले होते.

एव्हाना दुपारची जेवणाची वेळ होत आली होती, पण नेहमीचंच जेवायचा कंटाळा आला होता. मग एका बेकारीतून १५-२० प्रकारच्या जम्बो पेस्ट्री, व्हेज/चिकन पॅटिस, पनीर सँडविचेस, व्हेज हॉट-डॉग सारखा चविष्ट माल भरून घेतला आणि ट्रॅव्हलर मध्ये बसून पुढील स्थळी निघालो.  काही अंतरावरच पुढे गोथिक शैलीचे छोटेसे सेंट जॉर्ज चर्च होते. १८५२ साली बांधलेले हे चर्च सर्व बाजूनी घनदाट देवदार वृक्षांनी वेढलेले आहे.

त्याला लागूनच एक ग्रेव्ह-यार्डही होते. अर्थात इथे फारसे वेगळे पाहायला काही नव्हते आणि मला आता वेध लागले होते ते धर्मशालेतील ‘हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे’ क्रिकेट ग्राउंड. टी.व्ही. वर मॅच बघताना नेहमी वाटायचे एकदा तरी ह्या सुंदर ग्राऊंडला भेट देता यावी. ती भेट इतक्या सहजतेने, ध्यानीमनी होईल असे वाटले नव्हते. अनेक छोटी मुले भावी क्रिकेटर बनण्याची इच्छा मनी बाळगून ग्राउंडवर सराव करत होती. कोणी सांगावे, ह्यांच्यातीलच एखादा उद्याचा प्रसिद्ध क्रिकेटर असेलही.

येताना वाटेत काही टी-इस्टेट होत्या तेथेही थांबून डझनभर फोटो काढले. मग मेक्लोडगंज गावातून एक फेरफटका मारला. खूपच शांत आणि सुंदर शहर भासले. कुठे गर्दी नाही, गोंगाट नाही, ट्रॅफिक जॅम नाही, सर्वत्र हिरवीगार झाडी आणि आजूबाजूला बर्फाचे डोंगर. वाटलं, आपण इथेच का नाही जन्मलो? इथेच का नाही लहानाचे मोठे झालो? कदाचित आज असेच एखादे स्वेटर-कान टोप्यांचे, तिबेटियन वस्तूंचे किंवा टूर ऑर्गनाईझ करणाऱ्या एखाद्या टूर ऑपरेटरचे दुकान टाकून बसलेले असतो.

हॉटेलमध्ये परतेस्तोवर पायाचे तुकडे पडले होते, पण तरीही शॉपिंगसाठी पुन्हा जवळच्या मार्केटमध्ये शिरलो. वाटेत नेहमीच्याच मोमोजबरोबरो फ्राईड मोमोजही दिसले. नकळत पावलं तिकडं वळली आणि मग त्या जबरदस्त थंडीत गरमागरम मोमोजवर हल्ला चढवला.

शॉपिंगसाठी आवर्जून घ्यावे असे विशेष काही नव्हते त्यामुळे किरकोळ खरेदी करून हॉटेलवर परतलो.

रात्रीच जेवायला मुद्दाम मोकळ्या जागेतच बसलो. पुणे-जळगावचा उन्हाळा सोडून इथल्या थंडीत आलो होतो, मग ती थंडी अनुभवायला नको?

ऑल-इन-ऑल पहिला दिवस तर फारच मस्त गेला होता. अर्थात काश्मीरची सर हिमाचल-प्रदेशला येणं शक्यच नाही, पण why to compare?

 

[क्रमश:]

प्लॅन बी-२


रेल्वे स्टेशन वरून बाहेर पडलो आणि ‘कटरा-वैष्णो-देवी’ला घेऊन जाण्यासाठी थांबलेले असंख्य टॅक्सी-वाले, ट्रॅव्हल-कंपन्यांचे एजंट्स अंगावर तुटून पडले. रेल्वेमधला तो सुखद गारवा आता आमच्या सोबत नव्हता, जम्मू मधील कडक ऊन भाजून काढत होते. काश्मीर मध्ये फिरण्यासाठी आम्ही जम्मूहूनच एक टेम्पो-ट्रॅव्हलर बुक केली होती, त्याच्या ऑफिसवर आम्ही सामानासहित धडकलो. आमचे श्रीनगरला पोहोचण्याचे शेवटचे आशास्थान तोच होता. पण त्यानेही जम्मू-श्रीनगरच्या बंद असलेला महामार्ग आणि तेथील बिकट परिस्थितीला दुजोरा दिला.

वैतागुन आम्ही पुन्हा आमच्या श्रीनगर मधील contact ला फोन केला.

“सर, यहा सब ठिक हैं, कोई रास्ता बंद नाही हैं, सुबह मेरी एक बस श्रीनगरसे जम्मू केलीये निकली है, अभी वहा पोहोंचती होगी. आप आ जाओ ”

त्याचे बोलणे ऐकून आम्ही जम्मू मधल्या त्या टेंम्पो-ट्रॅव्हलर वाल्यालाच झापला.

“क्या भैया, वहा श्रीनगर मै बैठा आदमी बोल राहा हैं सब ठीक है, और आप कूछ अलग बोल रहें है”

मग त्याच पण डोकं सणकल. “ये देखो.. अपनी आखोंसे देखो.. “, समोर उभ्या असलेल्या दोन तवेरा गाड्यांकडे बोट दाखवत तो म्हणाला, “कल हि श्रीनगर से आई हैं, देखो काच फुटे है गाडियोंके. .. ”

त्याने आमच्याकडून फोन घेऊन त्या श्रीनगरवाल्याला फोन लावला. दोघांचं एकमेकांच्या आई-बहिणींचा उध्द्दार चालू होता. आम्हाला काय करावं काहीच कळत नव्हतं. कोण खरं? कोण खोटं? काहीच ठरेना. जम्मूला उतरून एव्हाना तासभर उलटून गेला होता आणि  constructive असे काहीच ठरले नव्हते.

वाटत होतं, तो श्रीनगर वाला कश्याला खोटं बोलेल, त्याचे पैसे तर त्याला आधीच मिळाले होते. आम्ही गेलो काय आणि नै गेलो काय. पण मग हा ट्रॅव्हलर वाला तरी का खोटं बोलेल? त्याला ५ दिवसांचे पैसे देणारच होतो, इकडे गेलो काय आणि अजून कुठे गेलो काय.

आमच्या आमच्यात आता ३ गट पडले होते –

१. श्रीनगरला जाऊयात वाला
२. नो श्रीनगर, दुसरा ऑप्शन बघू वाला
३. काहीही चालेल वाला

श्रीनगरच्या परिस्थितीची मला भीती वगैरे आज्जीबातच नव्हती. पण प्रश्न हा होता कि श्रीनगर ला न पोहोचता, मध्येच रस्त्यात दिवस-रात्र अडकून पडलो तर? किंवा अगदी पोहोचलोच श्रीनगरला आणि तिथे कर्फ्यू मुळे सगळंच बंद असलं तर? दिवसभर काय नुसतं हॉटेल मध्ये बसून झोपा काढायच्या? शिवाय हा काय आपल्या आयुष्यातला किंवा कश्मीरच्या existance चा शेवटचा दिवस नव्हता, पुन्हा कधीही येऊच की… ह्या मताचा मी होतो.

जवळ जवळ दोन तास त्या ट्रँव्हलर मध्ये खडाजंगी वादावादी झाली, जो तो आपली मतं एकमेकांना पटवून देण्यात मग्न होता. आमचं बोलणं ऐकून इतक्या वेळ थोड्या अंतरावर उभा असलेला एक इसम अंदाज घेत आमच्या जवळ येऊन पोहोचला.

“मै लेके जाताय आपको श्रीनगर”
“कैसे? हायवे बंद होगा तो?”
“हायवेसे नही, दुसरा एक रिमोट एरीया से रास्ता है, रात के अंधेरे मै निकलेनेंगे, सुबह कैसे भी करके में आपको श्रीनगर पहुंचा दूंगा. वो देखो, मेरे साथ और दो लोग हैं, उनको भी जानेका है”, थोड्या अंतरावर थांबलेल्या दोन लोकांकडे बोट दाखवत तो म्हणाला

अर्थात असली रिस्क घ्यायला कोणीच तयार नव्हते. त्या गूढ इसमाचा पेहेराव, वाढलेली दाढी, पिंजारलेले केस पाहून त्याच्यावर विश्वास ठेवणेही अशक्य होते. आम्ही त्याला नाही म्हणून कटवुन टाकले.

वादावादी चालू असताना एका बाजूने आम्ही गुगलींग चालू केले. श्रीनगर नाही, तर मग कुठे? इतक्या लांब येऊन पुन्हा तसेच माघारी जाणे शक्य नव्हते. गुगलबाबाने मार्ग दाखवला. जम्मू पासून ३००कि.मी.च्या आसपास हिमाचल प्रदेशातील डलहौसी हे प्रसिद्ध ठिकाण होते.

त्याच मार्गावर पुढे धर्मशाला हेही एक प्रसिद्ध ठिकाण होते.

आम्ही जिथे उभं होतो त्याच्या समोरच्या कमर्शील कॉम्प्लेक्स मध्ये आमच्या ट्रॅव्हलरवाल्या टुर-ऑपरेटरचे ऑफिस होते. आम्ही एक-दोघे जण तिकडे घुसलो. त्याला परिस्थितीची कल्पना होती. आम्ही आमचा ‘प्लॅन-बी’ समोर ठेवला. त्यानेही हा मार्ग योग्य असल्याचे सुचवले, शिवाय डलहौसी-धर्मशाला करतच आहात, तर त्याच मार्गावर मॅक्लॉडगंज आहे ते करा आणि पुढे अमृतसर-वाघा बॉर्डरही होऊ शकेल असे त्याने सांगितले.

येतानाची आमची फ्लाईट ‘श्रीनगर ते दिल्ली’ आणि ‘दिल्ली ते पुणे’ अशी connecting होती. श्रीनगर रद्द झाले तर निदान दिल्ली ला जाऊन ‘दिल्ली-पुणे’ विमान पकडता येणे शक्य होते.

 

काही दिवसांपूर्वीच माझा ऑफिसचा लुधियाना येथील सहकारी पुण्याला आला होता, तेंव्हा बोलताना त्याने मॅक्लॉडगंजचा उल्लेख केल्याचे स्मरणात होते. पुन्हा एकदा गुगलबाबाच्या मदतीने मॅक्लॉडगंज, धर्मशाला, डलहौसी चे फोटो चाळले. आणि आमचा निर्णय पक्का झाला. आम्ही पुन्हा आमच्या ट्रॅव्हलर कडे गेलो, तोवर इकडे काही ताज्या बातम्यांचे वृत्तपत्र, काही व्हॉटस-ऍप क्लिप्स आमच्या ड्राइव्हर ने इतरांना दाखवल्या होत्या. ते पाहून नकार देणारे आता काहीसे मवाळ झाले होते.

आम्ही त्यांना आमचा प्लॅन-बी ऐकवला, तेथील फोटो दाखवले आणि शेवटी हो नै- हो नै करता करता सगळे जण तयार झाले. लॉस खूप होतं होता. श्रीनगरचे राहण्याच्या जागेचे जे पैसे भरले होते ते, श्रीनगर-दिल्ली फ्लाईट चे पैसे डुबलेच होते. त्यात सिझन असल्याने डलहौसी-धरमशाला ठिकाणं आधीच हाऊस-फुल्ल होती, त्यामुळे जी हॉटेल्स मिळत होती ती महागडीच होती. शिवाय अमृतसर-ते दिल्ली साठी वेगळी सोया करणं आवश्यक होते. नाही म्हणलं तरी ४०एक हजाराचा फटका दिसत होता. पण दुसरा पर्याय पण नव्हता. “होऊ-दे-खर्च” म्हणत आम्ही प्लॅन-बी फायनल केला.

एव्हाना घड्याळात ३ वाजून गेले होते. सकाळ-पासून काहीच खाल्ले नव्हते ह्याची आता जाणीव झाली. आमच्या ड्राइव्हरने समोरच असलेले एक छोटे रेस्टोरंट दाखवले. “अमृतसरी-कुलचा” नावाची एक प्रसिद्ध रेस्टोरंट चेन आहे, त्यापैकीच एक जॉईंट तो होता.

बसायला अर्थातच जागा नव्हती, थोड्या वेटींग नंतर एक मोठ्ठे टेबल मिळाले आणि ८-१० कोल्ड्रिंक्स बरोबर ऑर्डर देऊन टाकल्या. काही वेळातच तो वाफाळलेला स्टफ्ड कुलचा समोर आला, त्यावर बटर-चा मोठ्ठा क्यूब तरंगत होता. एक घास थोडात टाकला आणि डोळे मिटले गेले. फारच भन्नाट चव होती त्याची, आत्ता लिहितानाही पुन्हा तोंडाला पाणी सुटलं. त्या कुलचा बरोबर छोले-कांदा-लींबू मिश्रीत एक सॅलड हि होते.

सुरुवात तर जोरदार केली, पण शेवटी शेवटी लक्षात आले कि कितीही भूक असली तरीही तो पूर्ण कुलचा खाणे केवळ अशक्य होते. शेवटी संपेल तितका खाल्ला, थंडगार कोल्ड्रिंक पोटात ढकललेले आणि काश्मीर चा विषय मागे सारून, आम्ही तयार झालो आमच्या प्लॅन-बी डेस्टिनेशन ला .

 

पाऊण एक तासात गाडी जम्मूच्या बाहेर पडली, आणि पुढच्या तासाभरातच नदीवरील एका मोठ्ठ्या पुलापाशी येऊन थांबली.

“सरजी, ये ब्रिज के इस पार जम्मू, और उस पार से पंजाब है जी”, ड्राइव्हर ने माहीती पुरवली.

गाडी ब्रिज ओलांडून पलीकडे गेली आणि जादूची कांडी फिरवावी तशी हवा एकदमच आल्हाददायक झाली. फोटो काढेस्तोवर “Welcome to Vodafone-Punjab” असा व्होडाफोनचा मेसेजही येऊन धडकला.

(जम्मू-पंजाबला जोडणारा पूल)

 

दोन्ही बाजुंनी गर्द झाडीमुळे काही वेळातच रस्ता अंधारात बुडून गेला. अर्थात जम्मू-ते हिमाचल प्रदेश ह्यांना काही अंतरासाठीच पंजाब प्रांत विच्छेदतो. पठाणकोट ओलांडले कि लगेचच हिमाचल प्रदेश सुरु होईल हि माहिती गुगल-बाबाने पुरवून टाकली .

साधारण ७.३० च्या सुमारास ड्रायव्हरने गाडी ‘चेन्नई-एक्सप्रेस’ नामक हॉटेलपाशी उभी केली.

“यहा लस्सी बहुत बढीया मिलता है” म्हणत तो आत गेला सुध्द्दा. दुपारचाच कुलचा अजून पोटात असल्याने तशी फारशी भूक नव्हती. पण लस्सी ला कसं नाही म्हणायचं? आणि ते पण पंजाबमधल्या? मग सगळेच खाली उतरलो आणि तो मधुर लस्सीचा थंडगार ग्लास ओठी लावला.

आकाशात निळ्या-जांभळ्या रंगांची उधळण झाली होती. हवेतला गारवाही मस्त वाढला होता. सकाळपासून नुसतीच च्याव च्याव करून सगळेच दमले होते. मैकलॉडगंज यायला किमान ३-४ तास तरी होते. गाडीच्या खिडक्या बंद केल्या, टेप वर अरिजित-सिंगची गाणी वाजत होती. नकळत डोळ्यांत झोप अवतरली.

ह्यावेळी काश्मीर नाही जमलं तर नै, काय त्यात एव्हढं?

“हम ही हम है तो क्या हम है, तुम ही तुम हो.. तो क्या तुम हो?”

Which literally means, “What am I just being me, what are you just being you?”
In more implied way, it means why should you and I be just ourselves, why can’t we be United.

After-all, we all were together, happy and safe, and it was more important…  than anything else.

 

[क्रमश:]

प्लॅन बी-१


“ह्या वर्षी कश्मीर ला जायचं”, फेब्रुवारीतच ठरवलं होतं. सहसा कुठेही जायचं असेल तर मी खूप आधी प्लॅन, बुकींग वगैरे करतच नाही. फार तर फार महिना आधी मी बुकिंग्ज करतो. खरं तर ते नेहमीच महाग पडते, पण ऐन वेळी काहीतरी कारण निघून प्लॅन रद्द होण्यापेक्षा हे बरं असा काहीसा माझा विचार असतो. आणि ह्या वेळी माझा तोच विचार बरोबर आहे हेच सिद्ध झालं.

 

ज्या दिवशी कश्मीरला निघायचं, २८ मे ला, त्याच्या आदल्याच रात्री कोण्या अतिरेकी संघटनेच्या म्होरक्याला आर्मीने उडवला. सकाळचा पेपर तिथे उसळलेल्या दंगलींनी आणि अस्थिरतेच्या माहितीने भरून गेला होता. नेहमीप्रमाणे कर्फ्यु लागला होताच.

नेहमीच्या त्यानं-त्याच जागा बघण्यापेक्षा आपल्याला जे पटेल, आवडेल त्याप्रमाणे जाता ह्या हेतूने आम्ही टूर कोणत्या ऑपरेटर बरोबर न जाता, आमची आम्हीच प्लॅन केली होती.  त्यामुळे लगेच जिथे राहणार होतो तेथे फोन केला.

“कुछ नै साब, ये तो हमेशा का है । आप बिनधास्त आ जाओ”, जेथे बुकिंग केले होते तिथल्या माणसाने full confidence दिला.

“आपल्याच देशात फिरायला आपण का घाबरायचे?”,  ह्या हेतूने जे होईल ते बघू ह्या विचाराने आम्हीही निघालो.

साधारण १४ लोकं होतो, हातात वेळ होता आणि चिल्ले-पिल्ले रेल्वेने जाऊयात म्हणून मागे लागले होते,  म्हणून मग जातानाच जम्मू-तावीच आणि येताना विमानाचं तिकीट काढलं होतं. मला रेल्वेने प्रवास करून दहा-एक वर्ष तरी उलटून गेली होती. त्यामुळे ३६ तासाच्या प्रवासाबद्दल नाही म्हणलं तरी साशंकच होतो. स्वच्छता असेल का? आजूबाजूची लोकं ठीक असतील का?  Toilets कशी असतील? खायचं कसं असेल? एक ना अनेक प्रश्न मनात ठेवून रेल्वे-स्टेशनवर धडकलो.

ठरल्यावेळी झेलम-एक्स्प्रेस धडधडत प्लॅटफॉर्म वर अवतरली. सगळं सामान घेऊन बोगीत बसलो आणि पहिला आश्चर्याचा धक्का बसला. बर्थ अगदी चका-चक्क होते. पडदे, अंथरूण-पांघरूण नव्यासारखी स्वच्छ धुतलेली, कडक्क होती, कुठेही कचरा नव्हता. पहिली टेस्ट तर पास झाली होती, दुसरा टप्पा Toiletsचा.  हा धक्का जास्ती जोराचा होता. Toilets अगदीच स्वच्छ होती.  Indian आणि  Western दोन्ही पद्धतीची Toilets with Tissue role, Hand-wash पाहून विश्वासच बसेना.   काही मिनिटांतच ट्रेनने आपला वेग पकडला आणि थोडेफार फोटो उरकून मी आसनस्थ झालो. अर्थात सुखद धक्के संपायचे होते. काही वेळातच एक कर्मचारी रम-फ्रेशनर आणि मॉस्किटो-हिट फवारत गेला.  मी लगेच धपाधप हे सुखद धक्के व्हॉट्स-ऍप वर मित्रमंडळींना कळवले.

 

बराच वेळ रिकामे असलेली आजूबाजूची बर्थ नगर आणि दौडला सैनिक मंडळींनी व्यापून टाकली. उंचेपुरे, कमावलेली शरीर-यष्टी, रापलेला चेहरा.. काय पर्सनॅलिटी असते राव! चालण्यात, बोलण्यात एक वेगळाच डौल मन मोहून टाकतो.

आमची बाकीची गॅंग मध्यरात्री जळगांवला चढणार होती. फक्कड चहा मारला, बरोबर घेतलेले लाडू, चिवडा, शंकरपाळे हादडले आणि वरच्या बर्थवर निवांत आडवा झालो.

मधल्या वेळात, रेल्वेचा अजून एक कर्मचारी असाच एक धक्का देऊन गेला, फिनेल टाकून मधला भाग लख्ख पुसून काढला. हे प्रकार पुढे ठराविक वेळेने चालूच राहिले. कोल्ड्रिंक्स, अरबट-चरबट खाद्यपदार्थ येत जात होते.

साधारण ९-९.३० च्या सुमारास माझे लक्ष वेधले गेले ते समोरच्या बर्थवर बसलेल्या एका सैनिकाच्या फोनवरील बोलण्याने.

“हो अगं, जेवतोय नीट”
“….. …”
“दिवसभर खरंच जात नव्हते जेवणं, कदाचित संध्याकाळी जायचंय म्हणून असेल, पण आता लागलीय भूक, ३ पोळ्या खाल्यात मी”

मी हळूच वरून वाकून बघितले, तो खरंच सांगत होता

“तू झोप आता, काळजी करू नको, रेंज असेल तसा फोन करत जाईन”, असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला.

 

काय आयुष्य आहे ना? असं आपली प्रेमाची माणसं सोडून मृत्यूच्या जबड्यात जायचे. प्रत्येकवेळी निघताना “परत येऊ ना?” असा विचार येत असेल का त्यांच्या मनात? त्यांच्या नसेल तरी त्याच्या घरच्यांच्या मनात?

झोप येईना तसा बर्थ वरून खाली उतरलो, बॅगेतले एक सफरचंद कापले आणि त्याला दिले

“सफरचंद? नको रे बाबा, गेली दोन वर्ष झाडाखाली बसून भरपूर सफरचंद खालली आहेत, कंटाळा आला आता त्याचा ..”, हसत तो म्हणाला
“कुठे असते पोस्टींग सध्या?”
“पठाणकोट”, तो उत्तरला

काही काळापूर्वीच बातम्यांमधून झळकलेले पठाणकोट आठवले. अतिरेक्यांनी केलेला तो भ्याड हल्ला आठवला.

“कुठल्या गन्स असतात आता तुमच्याकडे, एके-४७ दिल्या कि नाही अजून?”
“नाही, अजून तरी नाही”, तो कसनुसा हसत म्हणाला

पुढचा अर्धा-एक तास आर्मी, त्यांचे ट्रेनिंग, पोस्टिंग्स वगैरे गोष्टींवर गप्पा मारल्या. आजूबाजूचे मराठी भाषिक सैनिक सुद्धा गप्पांमध्ये सामील झाले.  थोड्यावेळाने,  आजूबाजूचे दिवे  हळू-हळू बंद होऊ लागले तसा मी सुद्धा आपल्या बर्थवर जाऊन ताणून दिली. सकाळी जाग आली ती गाडी कुठल्यातरी स्टेशनवर थांबली होती आणि फेरीवाले, विक्रेत्यांची लगबग चालू होती त्यांच्या आवाजाने. जळगांवची मंडळी OnBoard होती.

लगेच गप्पांचा फड जमला. पुढचा अख्खा दिवस खादाडी, ह्यास्यकल्लोळ, दुपारची वामकुक्षी ह्यातच वेळा. बघता बघता रेल्वेत बसल्यापासून २४ तास उलटूनही गेले होते.  गुगल-मॅप वर बदलणारे स्टेशन्स आणि राज्य बघून मज्जा वाटत होती. प्रत्येक स्टेशनवर तेथील स्पेशालिटी-आयटम्स विक्रीला येत होते. आग्रा-मथुराचा पेठा, दिल्लीचा सामोसा-चॅट, मथुरेला छोले पुरी भारीच होते.  रेल्वेत इकडे तिकडे फिरण्यात, एका बोगीतून दुसऱ्या बोगीत जाण्यातही वेगळीच मज्जा आहे नै? नाहीतर ते विमानात सारखं आपलं “अपनी कुर्सी कि पेटी बांधी राखिये”

पंजाब राज्यातून जातानाच प्रवास खूपच छान होता. बाहेर भरपूर हिरवीगार शेती, उंचच-उंच झाडं, सधन भासतील असे शेतात काम करणारे शेतकरी, मुबलक पाण्याने भरून वाहणारे कालवे .. सर्वत्र निसर्ग-संपन्नता होती.

ह्या सगळ्या गडबडीत रेल्वेचे ते सुखद धक्के काही केल्या संपत नव्हते. जेवणासाठी एकदा बिर्याणी मागवली आणि थोड्याच वेळात रेल्वे-प्रशासनाचा माणूस समोर उभा ठाकला.

“बिर्याणीचे किती पैसे घेतले?”
“चव कशी आहे, योग्य गरम आहे ना?”
“हायजेनिक आहे का?”
“रेटिंग्स किती द्याल ?”

वगैरे प्रश्न ऐकून थक्कच व्हायचं बाकी होतो.

वेळ अगदी मस्तच चालला होता आणि अचानक एक बातमी येऊन धडकली. बायकोच्या भावाला, त्याच्या जम्मूतील ओळखीच्या एकाने सांगितले कि जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद केलाय, श्रीनगर मध्ये कर्फ्यू लागू झालाय.

लगेच गुगलींग चालू केले, पण एक न्यूज-पेपर सोडला तर बाकी कुठेही काही बातमी नव्हती.

आजूबाजूच्या सैनिक-बांधवांकडे चौकशी केली, पण त्यांनाही काही कल्पना नव्हती. शिवाय त्यांना हे नेहमीचेच असल्याने त्यांनीही निर्धास्त रहायला सांगितले.

पठाणकोटला आर्मी-बेस असल्याने बरीचशी ट्रेन रिकामी झाली होती. ठरल्या वेळेच्या एक तास उशिरा जम्मूला उतरलो.

बोगीतच एक आर्मी-ऑफिसर होता, उतरल्या उतरल्या तो आमच्यातील एकाला घेऊन स्टेशनवरील आर्मी-छावणीकडे अधिक माहिती मिळवण्यासाठी घेऊन गेला. तोवर फलाटावरील इतर लोकांकडे आम्ही आमचे चौकशी सत्र सुरु केले. एका बाकड्यावर एक पोलीस आणि एक आर्मी ऑफिशिअल बसले होते ट्रेन ची वाट बघत.

“सब बंद है श्रीनगर, वापस लौट जाओ, हालत बत से बत्तर है. पथ्थर फेक रहें है वहा, हम लोग वहींसे आए है.”, तो पोलीस उत्तरला
आर्मी-छावणीतून आलेली माहितीही फार उत्साहवर्धक नव्हती

सर्वांच्या चेहऱ्यावर काळजी पसरली.

आम्ही सामान घेऊन स्टेशनच्या बाहेर पडायला सुरुवात केली. वाटेत दिसेल त्याला श्रीनगरची चौकशी सुरूच ठेवली. बहुतेक आर्मीच्या लोकांनी तेथील परिस्थिती गंभीर असल्याचेच सांगितले, तर जम्मूचे पोलीस अगदी उलट होते.

“श्रीनगर हायवे चालू है का क्या मतलब? वो बंद कब हुआ था?”
“सब ठीक है, बिलकुल जाओ श्रीनगर”

एका पोलिसांचे उत्तर तर अगदी गीतेचे सार होते, “मौत तो आनी हि है एक दिन. बस्स इतना देखना कि वो अच्छी आए”

फार मिक्स उत्तर मिळत होती. काहीच सुचत नव्हते.

प्रत्येकाच्या मनात आणि चेहऱ्यावर एकच प्रश्न ….. “आता?”

 

[क्रमश:]