डबल-क्रॉस (भाग ५)


डबल-क्रॉस (भाग ४) पासून पुढे >>

करणने उरलेले सामान लॉंच मधून उतरवले आणि तो बंगल्यात शिरला.

शेखर एव्हाना चेंज करून हॉल मध्ये येऊन बसला होता.

करणने एकवार हॉलमधून नजर फिरवली. हॉलमध्ये सर्व फर्निचर होते आणि ते हि उंची स्वरूपातले. कोपऱ्यात सर्व प्रकारच्या मद्याने युक्त बार होता, लॅव्हिश सोफा सेट होता, ५२इंची कर्व्ह्ड टीव्ही होता, मॉडर्न-आर्टच्या महागड्या फ्रेम्सनी भिंती सजल्या होत्या, जमिनीवर गुबगुबीत कार्पेट होते, महागडी झुबरं, स्टायलीश लॅप-शेड्स होत्या, उंची लाकडाची कपाट होती.

करण तो हॉल बघण्यात हरखून गेला, भानावर आला ते शेखरच्या बोलण्याने.

“अरे ये, नुसता उभा का, चल पेग बनव.. आणि तुलाही काय हवं ते घे, लाजू वगैरे नकोस..”, बारकडे हात दाखवत शेखर म्हणाला

“.. पण मॅडम?”, सकाळचा प्रसंग आठवून करण म्हणाला

“शैलाची तू नको काळजी करू, इथे मला नाही, तिला थांबवावे लागते. एक काम कर, तिचा पण पेग बनव, आत बेडरूम मध्ये असेल ती, बघ, विचार तिला काय हवंय”, टीव्ही चालू करत शेखर म्हणाला

करणने मान डोलावली आणि तो आतल्या खोलीत, जिकडे शैला होती, तिकडे गेला. दार हलकेच लोटलेले होते.

करणने दारावर टक-टक केले तसे शैला आतून म्हणाली, “कम-इन”

करण दार उघडून आतमध्ये गेला. समोरच्या किंग-साईझ बेडच्या मध्यभागी शैला बसली होती. गडद-पिवळ्या रंगाचा आणि त्यावर केशरी फुलांची नक्षी असलेला झरझरीत काफ्तान तिने घातला होता. नुकतीच आंघोळ झाल्याने तिचे ओले केस एकाबाजूने तिच्या खांद्यावरून रुळत होते. एक पाय गड्घ्यात दुमडून ती नखांना नेल-पोलिश लावण्यात मग्न होती.

“येस्स?”, करणकडे वर न बघताच तिने विचारले

“मॅडम, सरांसाठी मी ड्रिंक्स बनवतोय, सरांनी तुम्हाला काय हवंय विचारायला सांगितलेय, म्हणजे त्याप्रमाणे मी तुमचे सुद्धा ड्रिंक बनवतो”

“आय विल टेक जीन विथ सोडा, थोडासा लेमन ज्यूस आणि वन स्पून शुगर सिरप.”, अजूनही वर न बघता शैला म्हणाली

तिचा हा तटस्थपणा करणला अस्वस्थ करत होता. अवघ्या काही तासांपूर्वी.. काही सेकंदांसाठी का होईना ती करणच्या मिठीत होती, तिचे नाजूक ओठ करणच्या ओठांवर होते, आणि आता?? आता ती करणकडे बघतही नव्हती.

काही सेकंद थांबून शेवटी करण माघारी वळला तसं शैला म्हणाली, “मगाशी जे घडले, तो माझा एक मूर्खपणा होता, …… उगाच त्यावरून काही अर्थ काढू नको…… आणि हो…. पुढे काही अपेक्षाही ठेवू नकोस”

करणने वळून मागे बघितले, शैला त्याच्याकडेच बघत होती. तिच्या डोळ्यात तेच अनोळखी भाव होते…. करण तिच्यासाठी कोणीच नव्हता.

करणने सगळ्यांसाठी ड्रिंक्स बनवले आणि तो सोफ्यावर जाऊन बसला. थोड्याच वेळात शैला बाहेर आली, बार-टेबलावरचे ड्रिंक उचलले आणि शेखरच्या जवळ जाऊन बसली.

“चिअर्स डार्लिंग..”, हातातला ग्लास शेखरच्या ग्लासला चिकटवत शैला म्हणाली आणि तिने शेखरच्या गालावर एक चुंबन दिले

करणला तिने पूर्ण इग्नोर केले होते, जणू काही तो इथेही नव्हताच.

“ऑल सेट?”, शेखरच्या लैपटॉपकडे बघत शैला म्हणाली
“येस्स, आय एम डाईंग टू. खूप काही साठलंय डोक्यात, कधी एकदा लिहायला सुरुवात करतो असं झालंय.”, शेखर ड्रिंक्सचे घुटके घेत म्हणाला
“मेक इट बिग, मेक इट मैजिकल”, शेखरच्या केसांतून हात फिरवत शैला म्हणाली

शैलाची ही शेखरशी अनपेक्षित जवळीक करणला सहन होत नव्हती. खरं तर ते दोघे नवरा-बायकोच होते, पण करणला का कुणास ठाऊक जळफळाट होत होता.

“ऑफकोर्स आय विल. ”
“उद्यापासून काही दिवस माझा मुक्काम आतल्या बेडरूम मध्ये, मला कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स नकोय. मला काही हवं असेल तर मी स्वतःहून मागून घेईन, ठराविक वेळाने मला विचारायला यायची आवश्यकता नाही”, करण आणि शैलाकडे आलटून-पालटून बघत शेखर म्हणाला

करणने काही न बोलता मान डोलावली.

“करण बेडरूम मध्ये एक छोटा फ्रिज आहे. त्यात बिअर्स चे कॅन्स ठेवून दे. रामुकाकांनी चकण्याची एक वेगळी बॅग बनवली होती, ती, सिगारेट्स, पाण्याच्या बॉटल्स आतमध्येच न्हेऊन ठेव. पहिली पन्नास एक पान लिहून होईस्तोवर तरी मी बाहेर येणार नाही हे नक्की.”

करणने पुन्हा एकदा काही न बोलता मान डोलावली.

बाहेरची हवा स्तब्ध झाली होती, वारा पडला होता त्यामुळे झाडांच्या सळसळीचा होणारा आवाजही थांबला होता. त्या निर्जन भागात ती शांतता अंगावर येत होती.

“पाऊस येणार बहुतेक”, हातातला ग्लास रिकामा करत शेखर म्हणाला
“अजून भरू?” शेजारची बाटली उचलत करण म्हणाला

“अं, नको, उद्यापासुनची रात्र माझी एकट्याचीच असणारे आहे, हा विचार करता निदान आजची रात्र तरी माझ्या बायकोबरोबर जास्तीत जास्त घालवणे योग्य ठरेल, काय विचार आहे?”, शैलाकडे सूचक नजरेने बघत शेखर म्हणाला

“तुला ना, कारणच पाहिजे, चल आवर आणि ये झोपायला”, आपला ग्लास उचलत शैला म्हणाली

मगाशी बॅगा ठेवताना करणने ती मोठ्ठी बेडरूम आणि त्यातील तो किंग-साईज बेड बघितला होता. त्यावर पसरलेली उंची, मलमलीची गुबगुबीत पांघरूण आणि त्यामध्ये एकमेकांना लपेटून झोपलेले नग्न शेखर-शैला त्याच्या नजरेसमोर तरळून गेले.

काहीसं चिडून त्यानेही आपला ग्लास बॉटम्स अप केला आणि एकदा सुरक्षेच्या दृष्टीने बाहेरची पाहणी करून येतो म्हणून तो बंगल्याच्या बाहेर पडला. पहिली काही मिनिटं तो वाट फुटेल तसा चालत होता. त्याच्या डोक्यात विचारांचं कल्लोळ उठले होते.

“काय आवडलं असेल शैलाला शेखरमध्ये?”
“त्याचं लेखन? मला नाही वाटतं. शैला पुस्तक वगैरे वाचत असेल हेच मुळी मला नाही पटत”
“मग? त्याला मिळणारी प्रसिद्धी? अमाप पैसा?”

“कदाचीत, कदाचीत काय, नक्कीच. शेखर काही कोणी राजबिंडा तरुण नव्हता कि त्याच्या रूपावर कोणी भुलावं, आणि ते पण शैलासारख्या फटाकड्या तरुणीने? शक्यच नाही. त्यात ह्यांच्यासारख्या अजागळ माणसाकडून तिला शरीर-सुख मिळण्याची शक्यताही नगण्यच, कदाचीत म्हणूनच मगाशी ती त्या केबिनमध्ये करणकडे आकृष्ट झाली. मग, जर का हे एकदा होऊ शकते, तर.. तर परतही होऊ शकते. ”

करणने नकळत आपल्या शर्टची कॉलर ताठ केली.

करणला शैला हवी होती, त्याच्या जवळ, त्याच्या मिठीमध्ये, त्याच्या बेडमध्ये. तिच्या स्पर्शासाठी करणच्या शरीराचा स्नायूं-स्नायू आसुसला होता.
नदीच्या मंद लाटा खडकावर हळुवार आदळत होत्या. कारण तिथल्याच एका खडकावर पाण्यात पाय सोडून बसला. थंड पाण्याचा पायाला स्पर्श होताच करण जरा शांत झाला. काही तासांच्या ओळखीनेच शैलाने त्याला पार वेड करून सोडलं होत. तिचा विचार काही केल्या त्याच्या डोक्यातून जात नव्हता आणि नकळत का होईना तो शेखरचा तिरस्कार करू लागला होता. एक पैसा सोडला तर आपण त्या बुजगावण्या शेखरपेक्षा कित्तेक पट्टीने भारी आहोत हे त्याचे मन त्याला आक्रन्दून सांगत होते.

“थोडा धीर धर करण, थोडा धीर धर. आजचा तर पहिलाच दिवस होता आणि शैला काही सेकंदांसाठी का होईना आपल्या मिठीत होती. ज्यासाठी कित्तेक तरुण आसुसले असतील ते तिचे ओठ आपल्या ओठांवर टेकलेले होते. थोडे कार्ड्स निट खेळले तर सगळं काही मनासारखं जमून येऊ शकते”, करण स्वतःला समजावत होता. शेखर त्याच्या खोलीत बंद असताना त्याला काहीशी मोकळीक मिळणार होती आणि त्यावेळी कसं वागायचं, काय बोलायचं, शैलाला कसं इंप्रेस करायचं ह्याची दिवा स्वप्न बघण्यात तो रममाण होऊन गेला.

आकाशात कडाडकन एक वीज चमकली तसा करण भानावर आला. करणने आजूबाजूला बघितले. तो बंगल्यापासून खूप दूर निघून आला होता. आजूबाजूला घनदाट जंगल होते. त्याने पटकन घड्याळात नजर टाकली, पाऊण-एक तास सहज उलटून गेला होता. करणला अचानक आपल्या जबाबदारीची जाणीव झाली. शेखरला सुरक्षित ठेवणे हे त्याचे प्रमुख ध्येय होते आणि आत्ता करण तेथे नव्हता, शेखर एकटाच होता.

नकळत करणंचा हात पॅन्टच्या मागच्या खिश्याकडे गेला आणि त्याला दुसरा धक्का बसला. तो आपलं रिव्हॉल्व्हर त्याच्या खोलीतच विसरून आला होता. करण माघारी वळला आणि जिवाच्या आकांताने वेगाने बंगल्याकडे पळत सुटला.

बंगल्यापर्यंत पोहोचेस्तोवर तो घामाने निथळून निघाला होता. बंगला एव्हाना पूर्ण अंधारात बुडून गेला होता. शेखर-शैलाच्या बेडरूममधला दिवा सुद्धा मालवलेला होता. करणने हळूच दार उघडले आणि तो चोर पावलांनी आतमध्ये आला व हळूच दार लावून घेतले.

कित्तीतरी वेळ तो भिंतीला टेकून परिस्थितीचा अंदाज घेत होता. त्याचे कान कुठलाही बारीकसा आवाज टिपण्यासाठी आसुसलेले होते. परंतु सर्वत्र शांतताच होती. हॉलमध्ये कोणी नाही ह्याची खात्री होताच करण भिंतीला लागून पुढे सरकला. प्रथम तो शैला-शेखरच्या खोलीजवळ गेला आणि त्याने दरवाज्याला कान लावले.

आतूनही कसलाच आवाज होत नव्हता. अगदीच काळजीपूर्वक ऐकल्यावर शेखरच्या वजनदार श्वासोत्छ्वासाचा मंद आवाज कानी पडला.

समाधानाने करण माघारी वळला आणि तो आपल्या खोलीकडे आला आणि अचानक त्याच्यातला सिक्स्थ-सेन्स जागा झाला. त्याची खोली नक्कीच रिकामी नव्हती. करण व्यतिरिक्त नक्कीच त्या खोलीत दुसरे कोणीतरी होते. करणचे स्नायू आकसले गेले, मानेवरचे केस टेन्शनने उभे राहिले.

करण भिंतीला चिकटून उभा होता.

“सक.. सक..” असा काही अंतरावरून ठरावीक अंतराने आवाज येत होता.

करण हळूच दिव्याच्या बटनाजवळ सरकला आणि त्याने लाईटचे बटन दाबले.

समोरचे दृश्य बघून तो काही काळ थिजूनच गेला. त्याच्यासमोर पाठमोरी शैला उभी होती, तिच्या हातात किचेनमधला एक चाकू होता आणि यांत्रिक पद्धतीने ती तो चाकू करणच्या बेडवर मारत होती. बेडवरच्या गाडीच्या पार चिंधड्या झाल्या होत्या.

करण तिच्या अंगावर धावून जाणार होता एव्हढ्यात शैलाने चाकू मारणे थांबवले आणि ती माघारी वळली.

करणला पुन्हा एक धक्का बसला. शैलाचे डोळे बंद होते, तिचा चेहरा कमालीचा शांत होता.

एखादा रोबोट चालावा तश्या प्रकारे शैला चालत चालत करणच्या शेजारून निघून गेली…. तिला तिथे करण असल्याची यत्किंचितही जाणीव नव्हती. शैला झोपेत चालत होती.

बऱ्याच वेळ करण शैला गेली त्या दिशेकडे बघत होता. शैला आपल्या खोलीत गेल्याची खात्री होताच करणने आपल्या बेडकडे बघितले. चाकू मारून मारून शैलाने त्याच्या उशीची लक्तर काढली होती. उशीतला कापूस बेडभर पसरला होता.

करणने एक मोठ्ठा आवंढा गिळला. मगाशी बाहेर न जाता करण सरळ त्याच्या खोलीत येऊन झोपला असता… तर….. ???

करणने सावकाश खोलीचे दार लावून घेतले, घट्ट कडी लावली आणि आपल्या बेडवर येऊन झोपला.

करणची झोप मोडली ती दारावर जोरात वाजणाऱ्या थापेच्या आवाजाने. करण दचकून जागा झाला, उशीखाली ठेवलेले रिव्हॉल्व्हर उचलून खिश्यात ठेवले आणि त्याने बेडरूमचे दार उघडले.

समोर शैला उभी होती.

भीतीने तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता. कपाळावर मानेवर घर्मबिंदू जमा झाले होते.
करणने दार उघडताच जणू एखादे भूत बघितल्यासारखे ती करणकडे बघत उभी राहिली.

तिला असे घाबरलेले बघताच करणच्या पायाखालची जमीनच सरकली.

“शेखरना तर काही झाले नसेल?”, क्षणार्धात त्याच्या मनात विचार तरळून गेला.

“मॅम.. काय झालं?” करणने विचारले
शैला अजूनही अविश्वासाने करणकडे बघत होती

“मॅम, इज एव्हरीथिंग ऑलराइट? इज.. इज शेखर ऑलराइट?”, करणेने शैलाला हलवत विचारले

“येस्स, येस्स, हि इज ऑलराइट… आर यु ऑलराइट?”, शैलाने विचारले
“येस्स, मी ठीक आहे? काय झालंय?”, करण

शैलाने काही न बोलता करणला बाजूला केले आणि ती बेडरूममध्ये शिरली, पाठोपाठ करणंही आतमध्ये आला. शैला त्याच्या बेडसमोर आपले दोन्ही हाताचे तळवे छातीवर दाबून ठेवून उभी होती. समोर करणची गादी, उशी फाटलेल्या अवस्थेत विखुरली होती, गादीतला कापूस खोलीत इतरत्र पसरला होता.

ते दृश्य बघून शैलाचे डोळे विस्फारले गेले होते.

“करण .. आय.. आय.. “, तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते

करणने तिला हाताला धरून गादीवर बसवले आणि पाणी प्यायला दिले.

“शैला, यु डोन्ट हैव टू एक्सप्लेन. मला माहिते तू हे मुद्दाम केले नाहीस, तू झोपेत चालत होतीस, पाहिलेय मी ते”, करण तिला समजावण्याच्या सुरात म्हणाला
“अरे पण.. काय होऊन बसले असते हे.. मी झोपेत जे काय करते ते मला जणू रात्री स्वप्नाच्या रूपात घडलेय असे सकाळी आठवते. मला सकाळी जाग आली आणि हे स्वप्न आठवले.. यु शुअर यु आर नॉट हर्ट ?”, शैला आता थोडी भानावर आली होती.
“अज्जीबात नाही, मी अगदी ठणठणीत आहे”, करण आपले हात पाय पुढे करत शैलाला म्हणाला

“करण, तू प्लिज जा इथून, परत माझ्या हातून असे काही घडण्यापेक्षा?”, शैला अचानक गादीवरून उठली आणि करणची बॅग भरत म्हणाली .
“इट्स ओके, डोन्ट वरी, माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे, ह्यापुढे झोपताना मी दार घट्ट लावून झोपत जाईन”, शैलाला थांबवत करण म्हणाला
“नाही करण, आय इन्सिस्ट, मी तुझे पूर्ण ३ महिन्यांचे पगाराचे पैसे देते, तुझं नुकसान होणार नाही, पण प्लिज जा इथून. हे.. हे एकदा झालंय तर पुन्हा सुध्दा होऊ शकतं”, करणला बाजूला ढकलत शैला म्हणाली

त्या परिस्थितीही करणला शैलाच हसू येत होते.

“पण तू मला का मारायला आली होतीस?”, आपलं हसू दाबण्याचा प्रयत्न करत करण म्हणाला
“मी.. कुणावर खूप चिडले असले कि असं करते”, शैला म्हणाली
“ओह.. पण तू का माझ्यावर इतकी चिडली होतीस?”
“काल, दुपारी तिकडे केबिन मध्ये जे झालं ते.. आणि त्यानंतरही संध्याकाळी तू माझ्याकडे कसा बघत होतास, तुला काय वाटलं माझं लक्ष नव्हते तुझ्याकडे?”

करण क्षणभर वरमला, पण त्याच्या लगेच लक्षात आले कि शैलाच हा राग आत्ता तरी खरा नव्हता, उलट तिला कदाचित करणच तिच्याकडे वारंवार बघणं आवडलं होतं.

“एनीवेज, आय एम रिअली सॉरी, पण तू काळजी म्हणून खोलीची कडी लावून घेत जा.. “, शैला खोलीच्या बाहेर पडली, “आणि हो, ब्रेकफास्टचं बघ पटकन, शेखर उठतील आत्ता ” असं म्हणून शैला निघून गेली

करण काही क्षण शैला गेली त्या दिशेने पहात राहिला आणि मग खांदे उडवून हसत स्वतःशीच म्हणाला, “च्यायला डेंजर बाई आहे, एके दिवशी झोपेत त्या शेखरलाच मारायची राग-बिग आला तर..”

पुढचा अर्धा दिवस करणसाठी खूपच गडबडीचा गेला. घरातलं सगळंच नवीन असल्याने सकाळचा नाश्ता करायला त्याला कसरत पडायला लागली पण अचानकपणे शैला किचेन मध्ये आली आणि तिने करणला बरीच मदत केली. करणने शक्यतो तिच्याकडे पाहण्याचं टाळण्याचा प्रयत्न केला, पण तिच्याकडे दुर्लक्ष करणं केवळ अशक्य आहे हे त्याच्या लक्षात आले तसे त्याने तो नाद सोडून दिला.

करणला वाटलं होतं त्यापेक्षा शैलाचा स्वयंपाकघरातला वावर सहज होता. गॅस लावणे, युटेन्सिल्सचा वापर, जिन्नसांचे प्रमाण एखाद्या अनुभवी गृहिणीसारखे होते.

“काय बघतोएस?”, अचानक शैलाने करणला विचारले
“मला वाटलं नव्हतं तुला स्वयंपाकातलं काही येत असेल..”, हातातली दोन अंडी फोडून तव्यावर टाकत करण म्हणाला
“का?”, शैलाने हातातले काम थांबवले आणि केसांचा पोनी बांधत विचारले
“नाही म्हणजे, तुझ्या हाताखाली इतकी लोक असताना तुला कशाला स्वयंपाक घरात काम करायची गरज पडतीय”
“ते आत्ता, लग्नानंतर. लग्नाआधी मी वेट्रेसची पण काम केली आहेत..”, हसत शैला म्हणाली
“सिरियसली? मग शेखर आणि तु?”

करण नकळत शैलाच्या बाबतीत एकेरीवर आला होता.

“सांगीन परत कधी. जा शेखर बाहेर गार्डन मध्ये बसलेत, ब्रेकफास्ट घेऊन जा त्यांना.. मी ज्युस घेऊन येते”,
करण ब्रेकफास्ट घेऊन बाहेर गेला तेंव्हा शेखर लेक शेजारील एका खडकावर पाण्यात पाय सोडून बसले होते. करणने ब्रेकफास्ट टेबलावर मांडला आणि तो शेखरच्या शेजारी जाऊन उभा राहीला.

“काही म्हण करण, पण जादू आहे ह्या जागेत. अर्धा तासच झाला असेल इथे बसून, पण डोकं असं चालायला लागलंय नां, पहिल्या एपिसोडची कॉन्सेप्ट तयार पण झाली. आता पटकन आंघोळ करून घेतो आणि बसतो लिहायला.”, खडकावरून उठत शेखर म्हणाले

“सर ब्रेकफास्ट रेडी आहे.”, करण पटकन गार्डन मधील टेबलापाशी जात म्हणाला

“ब्रेकफास्ट? छे छे, आता त्याला वेळ नाही. एक काम कर, तु ब्रेकफास्ट खोलीतच पाठवून दे”, करणच्या उत्तराची वाट न बघता शेखर आत मध्ये निघुन सुद्धा गेले.

“आज शेखर खूप खुश होणारे, त्याच्या आवडीचं हाल्फ फ्राय केलंय विथ मॅकडीचा पेरी पेरी मसाला….”, थोड्याच वेळात आतून ट्रे घेऊन येत शैला म्हणाली.

“हे काय? शेखर कुठेत?” बाहेर करणला एकट्यालाच बघून शैला म्हणाली
“त्यांना मस्त मुड लागलाय स्टोरीचा, ते गेले खोलीत निघून, ब्रेकफास्ट नकोच म्हणत होते, मग खोलीतच पाठवून दे म्हणाले”, करण

शैलाने काही न बोलता ट्रे टेबलावर ठेवून दिला. तिला आलेला राग तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. करणने काही न बोलता ब्रेकफास्टचा तो ट्रे उचलला आणि तो शेखरच्या खोलीकडे निघून गेला.

करणं बाहेर आला तेंव्हा शैलाने आपला मुड सावरला होता आणि ऑम्लेट बटर लावलेल्या ब्रेडमध्ये सँडविच करून खायला सुरुवात केली होती. करणंही समोरची खुर्ची ओढून ब्रेकफास्ट करायला बसला.

काही वेळ शांततेत गेल्यावर शैला म्हणाली, “शेखर म्हणतो ह्या जागेत जादू आहे. इथे आला की त्याची अडलेली कथा वेगाने पुढे सरकु लागते, मग तो आपल्याच विश्वात रममाण होतो. असो, आजपर्यंत आम्ही आलो तेंव्हा रामुकाकाच असायचे बरोबर, निदान आता तू तरी आहेस. शेखरकडून वेगळी अपेक्षा करण्यातही अर्थ नाही. चल मी तुला प्रॉपर्टी फिरवते”, असं म्हणून शैला उठली.

करणचा ब्रेकफास्ट खरं तर व्हायचा होता, पण शैलाबरोबर जाण्याचा मोह वेगळाच होता, शिवाय त्याला आजुबाजुचा परिसरही अभ्यासायचा होताच. लपून-छपून करण्यापेक्षा हा पर्याय चांगला होता. त्याने पटकन एक सँडविच उचलले आणि तो शैलाबरोबर चालू लागला.

“साधारणपणे साडेपाच वर्षांपूर्वी शेखरचे पहिले सस्पेन्स-थ्रिलर पुस्तक हिट झाले त्यावेळी शेखरने हि जागा घेतली होती. आणि मग हळूहळू करत इथे बांधकाम करून हा व्हिला उभा राहिला.”, शैला बोलता बोलता आजूबाजूची बाग, व्हिलाची मागची बाजू आणि परिसर करणला दाखवत होती.

“…आणि हा रस्ता कुठे जातो?”, व्हिलाला जोडणाऱ्या त्या एकमेव रस्त्याकडे बोट दाखवत करण म्हणाला

“चल जाऊ तिकडे, खूप मस्त वाटतं, गर्द झाडी आहे, छान गार असते एकदम” शैला आनंदाने म्हणाली. मागच्या दोन्ही वेळी शेखर तर आले नाहीतच बरोबर, पण मला पण एकटीने जाऊ दिलं नाही… म्हणे वन्य प्राणी असतील”, शैला बोलताबोलता त्या रस्त्याने चालू लागली.

बऱ्यापैकी पुढे गेल्यावर शैला म्हणाली तसं खरंच हवेतला गारवा वाढला होता. दाट झाडीमुळे सूर्यप्रकाशही कमीच येत होता. साधारणपणे एक किलोमीटर चालल्यावर एकाबाजूला थोडीशी मोकळी जागा होती आणि काही मोठेमोठे दगड. शैला एका दगडाला टेकून थांबली.

“तुझी आणि शेखरची ओळख कशी झाली? तू म्हणालीस सकाळी तू हॉटेलच्या किचनमध्ये पण काम केले आहेस!”, शेखरने विचारले

“मी मुंबईला एका पब मध्ये होते कामाला, शेखर तिथे यायचे त्यांच्या मित्रांबरोबर. खूप हॉट होता त्यावेळी दिसायला”, शैला

करणने नकळत डोळे आश्चर्याने मोठे केले तसं शैला मनापासून हसली. तिने आपल्या मोबाईलची फोटो गॅलरी उघडली आणि शेखरचा जुना फोटो करणला दाखवला

“डोन्ट टेल मी, हे शेखर आहेत?”, करण डोळे विस्फारून मोबाईलवरच्या त्या फोटोकडे बघत होता. साधारण तिशीच्या आसपासच्या एका हँडसम तरुणाचा तो फोटो होता. जिम करून कमावलेले शरीर, कर्व्हड बायसेप्स, गोरापान चेहरा, अंगावर उंची कपडे, आणि कुणालाही भुरळ पडावी असे हास्य…

“विश्वास नाही ना बसत? हार्लेवरून यायचा तो पबमध्ये. पुस्तक क्षेत्रात नुकतेच नाव होऊ लागले होते, खानदानी श्रीमती होतीच. मलाच काय पण पबमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक मुलीला तो आवडायचा. शेखर माझ्यापेक्षा दहा-अकरा वर्षांनी मोठे, पण तरीही तेंव्हा खूप यंग वाटायचे. आमची हेड-वेट्रेस, टीना, तर जाम फिदा होती त्याच्यावर, तो आला की हीच नेहमी झुलत झुलत जायची त्याच्या टेबलापाशी. मुद्दाम त्याच्याशी लगट करायची, उगाच काय हसायची काय, मुद्दाम त्याच्या समोर वाकायची काय, काही विचारू नकोस. पण हे सर्व चालू असताना त्याची आणि माझी नजरानजर व्हायची. आधी योगायोगानेच, पण नंतर नंतर नेहमीच व्हायला लागली.

त्या दिवशी टीना आली नव्हती, मी काम संपवून पार्किंग मध्ये गाडी काढायला गेले तर हा तिथेच उभा होता, माझ्याकडे बघत. मला माहीत होतं तो माझ्यासाठीच थांबला होता. मी सरळ त्याच्याजवळ गेले, त्याने गाडी सुरु केली आणि मी काही न बोलता त्याच्या मागे बसले. त्या रात्री आम्ही खूप फिरलो त्याच्या हार्ले वरून. मला आधी वाटलं हा मला वन नाईट स्टॅन्ड साठी विचारेल, कुठल्याश्या हॉटेल मध्ये जाऊ म्हणेल, पण तसं काहीच झालं नाही. आम्ही जणू खूप वर्षांची ओळख असल्यासारखं फिरलो, खूप गप्पा मारल्या, रस्त्यावरच्या गाड्यांवरच खाल्लं. मस्तच रात्र होती ती.

शेखरशी माझी जवळीक मला अनेक अर्थाने लकी ठरली. दुसऱ्या दिवसापासून टीना आलीच नाही, न सांगताच नोकरी सोडून निघून गेली. आठ्वड्याभरातच मला प्रमोशन मिळालं, टिनाच्या जागेवर. माझ्या आणि शेखरच्या गाठींभेटीही नंतर वाढल्या. नकळत आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. “.

“लग्नानंतर मात्र शेखर खूप बदलला. जसंजशी त्याला प्रसिद्धी मिळू लागली तसंतसा तो माझ्यापासून दूर गेला. मध्येच कधीतरी त्याला थायरॉईड निघाला आणि पूर्वीचा तो हँडसम हंक चारही बाजूने वाढू लागला. पुस्तकांच्या पब्लिशिंग डेटची डेडलाईन, त्यात त्याची दारुशी वाढलेली जवळीक आणि वर्कआऊटचा पत्ता नाही. पूर्वीचा तो देखणा शेखर कधी हा असा बेढब झाला ते त्याचं त्याला कळलंच नाही. आणि जेंव्हा कळालं तेंव्हा खूप उशीर झाला होता. हां, नाही म्हणायला त्याने थोडेफार प्रयत्न केले, पण फारसा फरक पडला नाही. हळुहळु त्यालाच त्याच्या शरीराची लाज वाटू लागली आणि आमच्यात क्वचीत घडणारे शरीर संबंधही बंद झाले…”, शैला सांगत होती

करणंच मात्र त्यांच्या प्रेम कहाणीतून केंव्हाच लक्ष उडालं होत. तो मोहीत झाल्यासारखा शैलाकडे, तिच्या शरीराकडे बघत होता. आकाशातला सूर्य ढगांआड गेला होता, मळभ पडलं होतं आणि गार वारा सुटला होता.

“ए, कुठे हरवलास?”, करणंच लक्ष नाही बघून शैला म्हणाली, “सॉरी, बोअर केलं का? एनिवेज सोड, तुला एक सिक्रेट दाखवते”, असं म्हणून शैला चालू लागली.

ती मोकळी जागा मागे पडून पुन्हा दाट झाडी सुरु झाली होती. पालापाचोळा, अर्धवट तुटून पडलेल्या झाडांच्या फांद्या, काटेरी झावळ्या, निसरडी दगड ह्यामुळे चालायला अवघड होत होतं. करणला अचानक शेखर तिकडे घरात एकटेच आहेत ह्याची जाणीव झाली.

“अजून ५ मिनीटं, बघू शैला काय दाखवतीय, नाहीतर परत फिरायचं..”, ह्या विचारानं करण तिच्या मागे चालत राहिला.

दोन एक मिनिटं चालल्यावर करणला शैला जे सिक्रेट म्हणत होती ती गोष्ट दिसली. झुडपांच्या आड एक छोटी लाकडांची बनवलेली छोटी खोली होती. दार अर्धवट तुटलेले होते, खिडक्यांच्या काचा फुटलेल्या होत्या ह्यावरून तिथे कोणी रहात नव्हते हे करणने ताडले.

“इथं कसलं आलंय सिक्रेट?”, खोलीत अर्धवट तुटलेल्या समानाकडे बघत करणने विचारले. एक मोडलेलं टेबल, उलट्या-पालट्या पडलेल्या 2 खुर्च्या, स्पंज/स्प्रिंग्स निघालेला एक अती-काळाकुट्ट सोफा, फुटलेल्या ट्युबलाइट्स, काही फोटो फ्रेम्स आणि असंच काही भंगार ह्या व्यतिरिक्त तिथे काहीच नव्हतं.

“हे माझं आणि शेखरचं लव्ह नेस्ट होतं”, शैला एका टेबलावरची धूळ फुकरीनें उडवत म्हणाली
“हे? असलं छाडमाड? ते तिकडे इतके सुंदर घर कश्यासाठी आहे मग?”, न कळुन करण म्हणाला

“अरे ते आहेच रे. एकदा काय झालं, मी आणि शेखर असंच फिरत फिरत ह्या बाजूला आलो होतो, तेंव्हा आम्हाला हि केबिन सापडली. असलं भारी वाटत होतं ना, असं अडबाजूला, दूर दूर पर्यंत दुसरं कोणीच नाही…. एकदम वाईल्ड… दोघांनाही एकदम फिलिंग आलं… ह्या इथेच, ह्याच टेबलावर आम्ही पहिल्यांदा केलं”, हसत हसत शैला म्हणाली

“डोन्ट टेल मी… सिरियसली?”, करण
“हो तर, आणि मग आम्हाला ती सवयच झाली. बरोबर रामुकाका असायचे, सो दिवसा तिकडे काही करता यायचं नाही, मग आम्ही इकडे येऊन करायचो.”, शैला करण कडे रोखून बघत म्हणली

तिची बदललेली नजर आणि त्याचा अर्थ न कळण्या इतपत करण दुधखुळा नव्हता. हीच नजर त्याने आदल्याच दिवशी त्या गॅरेज मध्ये बघितली होती.

तो तिच्या डोळ्यांवरची नजर न हटवता तिच्या जवळ गेला, आपला हात श्वासोत्सवासाने वर खाली होणाऱ्या तिच्या उरोजांवर ठेवला. शैलाने सुखाने डोळे मिटून त्याला मूक संमती दर्शवली. करणने दुसरा हात तिच्या कमरेवर ठेवला, तिला जवळ ओढले आणि आपले ओठ तिच्या आसुसलेल्या ओठांवर टेकवले. ह्यावेळी कसलाही विरोध न करता शैलानेही आवेगाने त्याचे चुंबन घेतले.

काही क्षणातच दोघेही पूर्णपणे विवस्त्र झाले होते. करण स्तंभीत होऊन तिच्या नग्न शरीरावरुन नजर फिरवत होता. जिम करून एखादा अवयव सोडा, प्रत्येक मसल न मसल टोन केलेला वाटत होता.

करण समागमासाठी पुढे सरसावला तसे शैलाने त्याला थांबवले आणि म्हणाली, “वेडा आहेस का? आपण निदान दीड-दोन महिने तरी इथे असू, आणि माझाकडे बर्थ कंट्रोल पिल्स नाहीयेत, युज कोंडोंम”

“मी काय खिश्यात कायम काँडोम ठेवून फिरणारा प्लेबॉय वागलो का तुला? माझ्याकडे नाहीये?, हसत हसत करण म्हणाला

“ओह, मग मी काय तुला, येण्याजाणाऱ्या प्रत्येकाबरोबर बेडमध्ये झोपणारी वाटले का? तू नुसतं माझ्याकडे नाहीए इतकंच म्हणू शकला असतास”, आपले विस्कटलेल्या केसांचा निट पोनी बांधत शैला म्हणाली

“हे बघ, मला तसं नव्हतं म्हणायचं, आय एम सॉरी”, करण सारवासारव करत म्हणला. पण एव्हाना शैलाने कपडे घातले होते.

“नो, आय एम सॉरी, तू एक क्षुल्लक नोकर आहेस हे मी विसरलेच होते. मी जातेय, शेखर एकटेच असतील”, असं म्हणून शैला गेली सुध्दा….

करणनेही पटकन कपडे चढवले आणि तो तिच्यामागे धावला. पण त्याला वाटले त्यापेक्षा शैला खूप पुढे निघून गेली होती, तो बंगल्यावर पोहोचेपर्यंत ती आत सुद्धा गेली होती त्यामुळे तिला समजावण्याचे विचार त्याला मनातून काढून टाकावे लागले.

करण हॉलमध्ये गेला तेंव्हा शेखर हॉलमध्येच बसले होते, बहुदा शैला आधीच धावत धावत आली होती आणि आता तिच्या मागोमाग करणला धावत आलेला पाहून शेखर म्हणाले, “अरे काय झालं रे, दोघे असं पळत का आलात?”

“वर्क-आऊट, मस्त हवा होती बाहेर म्हणून पळायला गेलो होतो”, सारवासारव करत म्हणाला

शेखर एका मोठ्या प्लॅस्टिक च्या भांड्यात ज्युसी चिकन तंदूर घेऊन बसले होते, त्यावर लावलेल्या सॉस मुळे सगळे तोंड भरले होते. तंदूर चा एक मोठ्ठा पिस तोंडात टाकला, उलट्या हाताने ओठांवरील सॉस पुसला आणि शेखर म्हणाले, “कुठल्या बाजूला गेला होतात? शैला ने सिक्रेट केबिन दाखवली कि नाही” आणि तोंडातला तो अर्धवट खाल्लेला पीस दाखवत खो खो हसले

शैलाने एकवार रागाने करणकडे बघितले आणि ती आतमध्ये निघून गेली.

शेखरने कोकचा एक ग्लास रिकामा केला आणि परत एक तंदूरचा पिस तोंडात टाकून करणला समोरच्या सेटीकडे बोट दाखवत बसायची खुण करत म्हणाले, “हवा चांगली पडलीय म्हणतोयस, पण मला तर उलट वाटतंय पाऊस येणारे, बघ ना मळभ पडल्यासारखं वाटतंय”

“हो म्हणूनच छान वाटतंय ऊन नसल्याने, छान गारवा झालाय, त्यात इथे इतकी झाडी त्यामुळे अजून थंड वाटतंय”, करणं

शेखरने एव्हाना शेवटचा पिसही तोंडात कोंबला होता. करणला शेखरची किळस वाटू लागली होती, पण त्याच्याकडे पर्याय नव्हता.

“तुमचं सुरु झालं का काम?”, करणने नजर दुसरीकडे फिरवत विचारले
“अरे तोच तर प्रॉब्लेम झालाय म्हणून तुझी वाट बघत होतो”, शेखर
“प्रॉब्लेम? का? काय झालं?”
“अरे काय सांगू, मूर्खपणा माझा, लॅपटॉप आणला मी आणि चार्जर घरीच राहिला.”, शेखर म्हणाला

एव्हाना शैला चेंज करून बाहेर आली होती, “आमच्या मॅडमच तर काही लक्ष नसते, आमचंच आम्हाला बघावं लागतं सगळं”, शैलाकडे बघत टॉन्ट मारत शेखर म्हणाला

“अरे बापरे.. मग? आता?”, करण
“काही नाही, इथे जवळच गाव आहे, तिथे आहे अँपलचे स्टोअर, मी मगाशीच ऍड्रेस शोधून ठेवलाय. चार्जर पण आहे त्यांच्याकडे उपलब्ध, तुला फक्त घेऊन यावा लागेल”, शेखर

“हो आणतो कि, पण पत्ता नीटसा कळला असता म्हणजे बरं झालं असतं”, करण उभा रहात म्हणाला
“तसा सोप्पा आहे, लॉंच घेऊन पलीकडे जा, मग आपली गाडी घेऊन आपण आलो ना, इकडे वळलो आपण ते न वळता उजवीकडे सरळ जा, ५-६ किलोमीटर वर तुला फाटा लागेल कापूरहोळ आणि दुसरा भोर गावात जाणारा. तो गावात जाणारा रस्ता पकड. गावात परत एक चौक लागतो, एक जिथे बाजार भरतो ना ?”

“मला कसं माहित असेल, मी पहिल्यांदाच आलोय.. बर इट्स ओके, मी विचारेन.. पुढे”, करण
“सोड, नाही सापडणार तुला लगेच, फार गल्ली बोळ आहेत. एक काम करतो का शैलाला घेऊन जा बरोबर”, शेखर अचानक म्हणाले

“शेखर प्लिज, मी… “, शैला
“प्लिज डार्लिंग”, शैलाच वाक्य मध्येच तोडत शेखर म्हणाले, “त्याला नाही सापडणार, आणि हे बघ, हे तंदूर आण अजून बोरावकेचे, मागच्या वेळी आपण आणले होते बघ ते दुकान, तुला आठवत असेल, आणि हा मंचुरियन सॉस, आणि प्लिज कोल्डड्रींक्स आण अजून फ्रिज मध्ये कमी आहे”,

शैलाला बहुदा हे नेहमीच होते, तिने ऐकल्या न ऐकल्यासारखे केले आणि ती आवरायला आत निघून गेली

“करणं, मी बोललोय त्यांच्याशी, तरीपण विचारलं तर मॅकबुक-प्रोचा चार्जर हवाय म्हणून सांग”

शेखरने करणला जुजबी माहिती दिली, चार्जर कसा असेल वगैरे सांगितले आणि मग टीव्ही वरचे कार्यक्रम बघण्यात मग्न होऊन गेले.

[क्रमशः ]

39 thoughts on “डबल-क्रॉस (भाग ५)

  1. anil

    very awesome….but why u taking lots of time for this part …u are using name of bhor place …also using in alvani. i remembered that. i also went 2-3 time to bhor ,such a very nice place .

    Reply
    1. अनिकेत Post author

      Thanks Anil, sorry for d delay, bt really can’t help. Story is not ready, i write as and when i get time, and have some thoughts to pen. Generally both things don’t go hand in hand. When i have some idea to write, i don’t get time and when I’ve time i can’t think of anything. I am a software engineer, so hope u understand how much time i will be getting. I try my best to write fast.. Bhor is my fav place too and hence i use it as a backdrop to my stories. Glad u r liking the stories.

      Plz keep commenting..

      Reply
      1. उन्‍मेष

        अनिकेतराव, तुम्‍ही इंजीनीअर आहात तेेव्‍हाा काेेेणी आपल्‍या वाचकांमध्‍ये मदत करू शकताेे का बघा…. 😀
        म्‍हणजे आम्‍हाला स्‍टाेेेरी वाचायला मिळेल …. हा हा हा…

        n e ways… jokes apart story mast… Keep going….

        Reply
  2. Amit Gharat

    या भागात करण तितका कॉन्फिडन्ट वाटलं नाही तो जास्त भावनेच्या आहारी गेलेला दिसला ..छान टर्न आहे हा

    Reply
  3. Vishal A

    Tumcha Likhan = अप्रतिम ,,, अपवादात्मक,,, विलक्षण,,,, असंभवनीय,,, अद्वितीय,,,, भिन्न,,,, अविश्वसनीय…. Shabdh Kami Padat Ahet

    Reply
  4. Aparna Gadgil

    Hi Aniket,

    Chan chalu aahe katha.. Sidney Sheldon chi ch shaili vatatey agadi.. Khup sundar grip aahe.. Waiting for next part.. please post soon.

    ~Aparna

    Reply
  5. Shalaka

    Very well written 👍🏻 Love to read ur stories. 😊
    Was in IT so I know how ur schedule must b but request u to pls atleast once in a week ek tari upload karat ja re, v all really wait for the next part. 😊

    Reply
  6. Akshay

    Aniket sir , tumcha tr fan jhaloy agadi , kas kay suchat evdh safv , te pan evdhya details sobat ek kshan pan as vatat nahi ki story vachtoy , pratyek seen dolyapudhe yeto story madhla , Arthur Conan Doyle ani tumhi majhe ekdum favourite lekhak ahat , waiting for double cross chapter -6

    Reply
  7. Pratham J

    Khupach superb part hota, jas jasa vachat jato tas purn pane story madhe harvun jato sir tumcha lekhna madhe kharokhar jadu ahe tumhi lihilelya story vachun vachanachi aavad norman jhali ahe. So thank you so much aniket sir…👍

    Reply
  8. संगिता पाटिल

    हॅलो सर खुप सुरेख लिहले आहेत . पन मला एक मिस्टेक वाटते आहे शेखर तो हॅाल बघन्यात हरखुन गेला आणि शेखरच्याच आवाजाने भानावर आला हे इथे करन हवे ना सर

    Reply

Leave a reply to अनिकेत Cancel reply