डबल-क्रॉस (भाग ९) पासून पुढे >>
करण काही बोलणार इतक्यात इशिताने त्याला हळुच गप्प राहायची खुण केली.
मोहीत आणि इशिता दोघांचेही पाय चिखलाने भरलेले होते. दोघांनीही बुट बाहेर काढले आणि पाय पुसुन आतमध्ये आले. शैला अजूनही मोहितकडे बघण्यातच गुंग होती. थोडेसे मानेपर्यंत रुळणारे त्याचे काहीसे कुरळे केस पावसाने चिंब भिजले होते. गालावरची खुरटी दाढी, एका कानातले किंचितसे लोंबते इअरिन्ग, मनगटाला बांधलेले काळ्या मण्यामण्यांचे ब्रेसलेट, हायअँकले शूज आणि एकूणच त्याचा मर्दानी लुक शैलाला मोहवून टाकत होता. त्याच्या मानाने इशिता अगदीच अवतारात दिसत होती. इतक्या पावसातून चालत येऊनही मोहितच्या चेहऱ्यावर मात्र अदबशीर, मंद हसू होते.
करणला शैलाचे मोहितकडे असं वेड्यासारखं बघत राहणं अस्वस्थ करत होतं.
मोहित शूज काढून सोफ्यावर बसायला गेला तसा करण म्हणाला, “अं.. फोन तिथे आहे..”, असं म्हणून त्याने कोपऱ्यातल्या फोनकडे बोट दाखवले.
“ओह फोन येस.. “, असं म्हणून मोहित उठला आणि फोनपाशी गेला
“थँक्स मॅम, थोडं पाणी मिळेल, इतकं अंतर चालून दमलोय खुप”, इशिता म्हणाली
शैलाला त्यांना इथं एकटं सोडुन जावंस वाटत नव्हतं, पण करण आजारी आहे असं सांगितल्याने त्याला पाणी घेऊन ये, असंही सांगता येईना.
शैला आत गेल्या बरोब्बर इशिताने करणला घट्ट मिठी मारली..
“आय मिस्ड यु सो मंच..”, आपले गाल फुगवत इशिता म्हणाली
करणने पटकन तिला बाजूला केले.
“तु इथं कशी काय? आणि तुला कळलं कसं मी इथे आहे ते?”, हळु आवाजात करण म्हणाला
“ए, काय रे, मला इथे बघून तुला आनंद नै झाला?”, इशिता
“झाला, पण ..”
“सांगते, सगळं सांगते, पण आजच्या रात्रीपुरती आमची इथे राहायची सोय तर कर”, इशिता
“ते शक्य नाहीए”, करण किचेनकडे बघत म्हणाला
“का?”
“का काय का?, माझं घर आहे का हे?, शैलाने आधीच सांगितलेय ना फोन झाला कि जा इथून म्हणून..”
“अरे व्वा, मॅडम बीडम काई नै, एकदम शैला?”, करणकडे संशयाने बघत इशिता म्हणाली… “आणि तू कधी पासून तिचा नवरा झालास? तो शेखर का कोण तो कुठेय?”
“आहे आत मध्ये, खरं तर त्यांचीच तब्येत बरी नाहीए, सकाळपासून ताप भरलाय अंगात म्हणून झोपून आहेत”, करण म्हणाला
“ए, माझी ओळख करुन दे ना, मी त्यांचा जुना फोटो पाहिलाय, ही इज सो हँडसम.. ”
करण काही बोलणार इतक्यात शैला आतून पाणी घेऊन आली.
“सॉरी हा, तुम्हाला उगाचंच त्रास..”, पाणी पिऊन झाल्यावर आपली मान किंचितशी झुकवत मोहित म्हणाला, “..एक फोन करतो आणि लगेच निघतोच आम्ही..”, असं म्हणुन त्याने फोन उचलला
नंबर फिरवल्यावर काही वेळाने त्याने बोलायला सुरवात केली..
“ओ दादा,.. अहो हो.. ऐका.. तुमच्या मागोमागचं निघालो होतो आम्ही, पण वाटेत बंद पडली गाडी.. कुठे काय..? मला काय माहित, ह्या भागात रोज फिरतो का आम्ही? हो इशिता मॅडम ठीक आहेत.. इथे जवळच एक बंगला मिळाला नशिबाने. सेल फोनला पण रेंज नाही, बंगल्यातुनच फोन करतोय..
हं..
हं …
एक काम करा, मागे फिरा तुम्ही, नाही, आम्ही गाव नव्हतं ओलांडलं.. त्याच्याही बरंच अलीकडे या.. आमची गाडी रस्त्याच्या कडेलाच उभी केलीय. ती सापडली कि तेथून थोडं पुढे डाव्या हाताला एक छोटा कच्चा रस्ता गेलेला दिसेल तुम्हाला. जरा वळणावरच एक लाल-पांढरी पजेरो उभी आहे, खड्यात अडकलेली. तेथून सरळ सरळ आतमध्ये या ..
हं …
या लवकर…”, असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला.
“सॉरी मॅडम, तुम्हाला न विचारताच त्यांना खरं इथं बोलावून घेतलं, पण पायाचे तुकडे पडलेत. परत पावसाच माघारी इतकं चालत जायचं आणि ते येईपर्यंत त्यांची पावसात वाट बघायची.. आय होप यु डोन्ट माईंड..”, गालावर खळी पडेल इतपत हसत मोहित म्हणाला
“नो, इट्स ओके, आय अंडरस्टॅंड”, शैला म्हणाली
कुणाला कुणाशी काय बोलावं सुचेना आणि त्यामुळे काही वेळ शांतता पसरली.
करणने अधूनमधून इशिताकडे बघून ती काही सांगु पाहतीय का ह्याचा अंदाज घेतला, पण तिचं करणकडे लक्षच नव्हते.
“विल यु माईंड इफ आय स्मोक?”, मोहितने शांतता भंग करत करणला विचारलं
“नो.. प्लिज गो अहेड..”
मोहितने खिश्यातुन सिगारेटचं पाकीट काढलं, मग सावकाश शर्टच्या खिश्यातुन लायटर काढला, सिगारेट शिलगावली आणि मग मोठ्ठा कश घेऊन हवेत धुराची वलय सोडत खुर्चीत आरामशीर टेकून बसला.
घड्याळाचा सेकंद काटा ‘टिक-टिक’ आवाज करत पुढे सरकत होता.
“सो तुम्ही जाहिरातीच्या शूटिंगसाठी इथे आला होतात का?”, करणने इशिताला विचारले
“हम्म..”
“कसली जाहिरात होती?”
“मिशलीन टायर्स..”, मोहित म्हणाला.. “.. इकडे निसर्ग सौंदर्य फारच छान आहे, शिवाय शूटिंगला पाहिजेत तसे ऑफरोड पण होते ..”
“कोणते प्रोडक्शन हाऊस?”, करण
करणच्या प्रश्नाने मोहित काहीसा गोंधळला पण मग स्वतःला सावरत म्हणाला, “मिडिया विंग्ज.. ”
अर्थात अश्या नावाची कोणती कंपनी आहे किंवा नाही हेच करणला माहित नव्हते. आणि असेलच तरीही खरंच कश्यावरुन त्यांचं इथे ऍड शुट होते हेही कळण्याचा कोणताच मार्ग नव्हता.
“छान आहे हा तुमचा बंगला.. किती रुम्स आहेत?”, मोहितने विषय बदलत विचारले
“३ बीएचके…”, शैला
“मी आतुन बघु शकते का? मला पण केंव्हा पासून माझ्या प्लॉट वर एक बांधायचा आहे”, इशिता जागेवरून उठत म्हणाली
“पाऊण तास उलटून गेला आहे, मला वाटतं तुम्ही पुन्हा एकदा फोन करुन तुमची टीम कुठपर्यंत आली ते बघावं”, इशिताला जणू दुर्लक्षित करत शैला म्हणाली
नाईलाजाने इशिता पुन्हा खुर्चीत बसली
“मेक सेन्स, मी बघतो फोन करून कुठं पर्यंत आलेत.. सॉरी, तुम्हाला उगाचच त्रास”, म्हणून मोहित खुर्चीतून उठला आणि त्याने फोनवर बोलायला सुरुवात केली.
शैलाने पाण्याचे ग्लास उचलले आणि ती किचन मध्ये गेली.
“करण, डु समथिंग, आजच्या रात्रीपुरती सोय कर आमची इथे राहायची.. जस्ट यु अँड मी इन खास विल्डरनेस्ट.. काय मज्जा येईल..”, इशिता हळू आवाजात बोलत होती..
शैलाला किचन मधुन येताना बघुन तिने हळूच करणला तिच्याशी बोलण्याबाबत डोळ्याने खूण केली.
करणने शैलाकडे बघितले, पण तिचं लक्ष मोहितकडेच होते. शैला संथ पावलं टाकत पुढे येत होती.
“देअर इज समथिंग रॉंग”, करणच्या मनात विचार येऊन गेला. शैला मगाजची शैला नव्हती. तिच्या चेहऱ्यावर काहीसे विचित्रच भाव होते.
मोहित अजूनही फोनवर बोलण्यात मग्न होता. शैला शांतपणे मोहितच्या मागे जाऊन उभी राहिली. ती जशी करणला पाठमोरी झाली तशी करणला “व्हॉट वॉज रॉंग” जाणवले, शैलाने पाठीमागे हातात दडवून एक स्क्रू-ड्रायव्हर आणला होता. करण काही बोलणार इतक्यात शैलाने तो स्क्रू-ड्रायव्हर वेगाने हवेत उचलला आणि मोहितच्या पाठीत खुपसला.
बेसावध मोहित त्या आघाताने जोरात विव्हळला, क्षणार्धात तो मागे वळला आणि त्याने शैलाच्या जोरात कानफडात लगावून दिली. मोहितवर वर करण्यासाठी उगारलेला शैलाच हात वेगाने खाली आला, पण तिचा निसटता वार मोहितच्या दंडात घुसला. मोहितच्या त्या कानफडाटाने शैला मागच्या टेबलावर कोसळली.
शैला सावरून उभी राहिली आणि पुन्हा मोहितच्या अंगावर झेपावली. पण ह्यावेळी इशिता सावध होती, तिने पटकन मध्येच पाय घालून शैलाला खाली पाडले.
करणला काय चालू आहे ह्याचाच बोध होत नव्हता. सगळं काही इतक्या वेगाने घडत होते कि तो जणू थिजून एका जागी उभा होता.
मोहितने दंडात रुतलेला तो स्क्रू-ड्रायव्हर बाहेर काढला आणि पाठ दाबत तो भिंतीला जाऊन टेकला.
“करण अरे बघतोयेस काय, गेट हिम..”, शैला ओरडली तसा करण भानावर आला. पण तो जागच्या हलण्याआधीच मोहितने पॅन्टच्या खिश्यातुन पॉइंट.३२ बाहेर काढली होती
“डोन्ट ऍक्ट स्मार्ट..” करणवर रिव्हॉल्व्हर रोखत मोहित म्हणाला
“करण.. किचन मधले सगळ्या चाकू-सुऱ्या कुठेत?”, शैला नाकातून आलेले रक्त पुसत म्हणाली
“मी,.. मी लपवून ठेवल्या होत्या..”, करण
“का??”, आश्चर्याने डोळे मोठे करत शैला म्हणाली
करण काहीच बोलला नाही
“का करण?.. … .. ओह तुला वाटलं मी त्यातली एखादी सूरी घेऊन…”, पण लगेच शैलाला तिची चूक लक्षात आली आणि ती गप्प बसली
“साली हरामी, छिनाल..”, मोहित अजूनही वेदनेने तडफडत होता.. त्याच्या पाठीतून बऱ्यापैकी रक्त वहात होते, पण रक्तापेक्षाही महत्वाचे म्हणजे शैलाचा तो वार मोहितच्या मणक्यावर बसला होता त्यामुळे त्याच्या पूर्ण शरीरभर वेदना पसरली होती
“मोहित, तो फोन गेली कित्तेक वर्ष बंद आहे, आम्ही केंव्हाच डिस्कनेक्ट केलाय. केवळ तो फोन तेथून काढायचा कंटाळा म्हणून अजूनही तिथेच पडून आहे इतकंच”.. कुत्स्तित हसत शैला म्हणाली
मोहित संतापाने उठून उभा राहिला, पण पुन्हा एकदा वेदनेची कळ त्याच्या मस्तकापर्यंत गेली आणि परत तो भिंतीला टेकून खाली बसला.
करणने आश्चर्याने इशिताकडे बघितले. मगाचच्या त्या प्रेमळ भावना इशिताच्या चेहऱ्यावर नावालाही नव्हत्या. तिचा चेहरा भावनाशून्य होता, तिने शैलाला बाजूला ढकलले आणि ती मोहितकडे गेली.
“आर यु ऑलराइट?”
मोहित वेदनेने तळमळत होता
“गेट मी व्हिस्की, रम एनिथिंग .. लार्ज… ”
इशिताने हॉलमध्ये नजर फिरवली, एका कोपऱ्यात शेखरची बार-कॅबिनेट होते. इशिताने तेथून एक व्हिस्कीची बॉटल उचलली आणि मोहीतला न्हेऊन दिली. मोहितने त्याची रिव्हॉल्व्हर इशिताकडे दिली, आणि व्हिस्कीचे ४-५ घोट पोटात ढकलले.
त्याचा चेहरा घामाने डबडबला होता.
“शेखर कुठेय बघ…”, इशिताकडून रिव्हॉल्व्हर परत घेत मोहित म्हणाला
“शेखरची तब्येत बरी नाहीए, तो आतल्या खोलीत आहे.. मी लॉक केलीय त्याची रुम..”, शैला एका खुर्चीत आरामात बसत म्हणाली
“बाहेर बोलावं त्याला”, आपली रिव्हॉल्व्हर शैलावर रोखत मोहित म्हणाला
“बोलावते.. पण मला आधी हे काय चाललंय हे नीट कळायला हवं. तुम्ही कोण? आणि इथे कशासाठी आलात?”
“मी मोहित, कॉन्ट्रॅक्ट-किलर आहे, सुपारी घेऊन खून करणारा… “, मोहितचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच करण ताडकन उठला
“ओ बॉडीगार्ड, जास्त शायनींग नै… जागेवर बस काय.. “, रिव्हॉल्व्हरच सेफ्टी लॉक उघडत मोहीत म्हणाला
त्याच्या डोळ्यातले खुनशी भाव बघून करणच्या लक्षात आले कि हा वेळ पडली तर खरंच रिव्हॉल्व्हर चालवायला मागे पुढे पाहणार नाही. तसं करण परत खाली बसला..
“.. तर मी मोहीत .. आणि हि इशिता, माझी गर्लफ्रेंड… तू तर ओळखतच असशील हिला…”, करणकडे हसत बघत मोहित म्हणाला
शैलाने करणकडे रोखून पहिले
“इथे कशाला आला?”, शैलाने विचारले
“सांगतो कि.. त्याशिवाय काम कसं व्हायचं आमचं? काय रे .. बॉडीगार्ड, खरंय ना?”
करण त्याचं बोलणं काळजीपूर्वक ऐकत होता, पण त्याच वेळी तो आपली रिव्हॉल्व्हर कुठे ठेवलीय ह्याचा विचार करत होता
“आम्ही इथं शेखरसाठी आलोय.. “, मोहीत आपली पाठ अधिक जोराने भिंतीवर दाबत म्हणाला.. त्याचा चेहरा वेदनेने काही क्षण वेडावाकडा झाला
“..पण त्या आधी.. ए.. बॉडीगार्ड, रिव्हॉल्व्हर कुठेय तुझी? इशिता म्हणली तू रिव्हॉल्व्हर घेऊन आलाय म्हणे बरोबर?”
शैलाने ह्यावेळी पुन्हा करणकडे रोखून पहिले ..
“करण व्हॉट इज धिस? तुझ्याकडे रिव्हॉल्व्हर आहे? आणि कोण आहे हि इशिता? तू कसा ओळखतोस हिला.. ?”
“ओ .. तुमच्या गप्पा नंतर.. बॉडीगार्ड… रिव्हॉल्व्हर कुठेय?”
करणने रागाने इशिताकडे बघितले. रिव्हॉल्व्हर त्याच्या खिश्यातच होते, पण मोहितने नेम करणवरच धरलेला होता. शिवाय रिव्हॉल्व्हरचे सेफ्टीलॉक ऑन होते, रिव्हॉल्व्हर बाहेर काढून सेफ्टीलॉक काढेपर्यंत नक्कीच मोहीतने वेळ दिला नसता.
करणने खिश्याकडे बोट दाखवले तसे इशिता वेगाने करण जवळ आली आणि तिने त्याच्या खिश्यातुन रिव्हॉल्व्हर काढुन घेतले.
“गुड.. अजून काही आहे? बॉम्ब-बिंब?” हसत हसत मोहित म्हणाला
“नाही..”
म्हणजे तुला शेखरला मारायची सुपारी दिलीय?.. “, शैला
“अहो काय असे लहान पोरांसारखे प्रश्न विचारताय?”
….
“आम्हाला काय सुपारी वगैरे नाही दिलीय कोणी शेखरची. कशाला कोण मारेल शेखरना, इतका भला माणुस तो. आमचं काय शेखर रावांशी वैर नाही.. आजारी आहेत ना ते??.. असुद्या.. झोपुद्या त्यांना..”
करण आणि शैलाची काही क्षण नजरानजर झाली.. शेखर आतल्या खोलीत मरुन पडला आहे हे कसंही करुन ह्या दोघांना कळता कामा नये असेच काहीसे विचार दोघांच्याही मनात होते.
“..उलट शेखर चांगले धडधाकट असणं, जिवंत असणं हेच आमच्या दृष्टीने फायद्याचे आहे.. “, इशिता मध्येच बोलली
“मग? तुम्ही इथे काय शेखरला प्रोटेक्ट करायला आलाय?”, शैला
“तसं समजा हवं तर.. तुम्ही उगा पाठीत माझ्या तो स्क्रू-ड्रायव्हर खुपसलात.. जरा दमानं घ्यायचं नं.. “, मोहितने व्हिस्कीची बाटली परत तोंडाला लावली आणि २-४ घोट घश्यात ढकलले
“..आणि ह्या उपकाराच्या बदल्यात??”,.. शैला
“हा..स्स आता कसं कामाचं बोललात.. घेणार ना.. पैसे मोजून घेणार.. अंन ते पण चांगले ५ करोड.. ”
“५ करोड?? अरे काय बँक उघडलीय का आम्ही इथे..”, खुर्चीतून ताडकन उठत करण म्हणाला
“ए अरे बॉडीगार्ड.. तुला म्हणलं का मी ५ करोड तुम्ही द्या? तुम्ही फक्त २-३ दिवस राहूद्या आम्हाला इथं.. आमचे पैसे आले कि आम्ही जाऊच इथून.. ”
“हे बघा, तुम्ही खूप कोड्यात बोलताय.. मला काही कळत नाहीए.. जर आम्ही तुम्हाला पैसे नाही द्यायचे तर मग कोणी?”, शैला
“ती आहे ना तुमची इन्शोरन्स कंपनी आणि तो संदीप, तो देईल की ..”, मोहित
“का? तो का देईल?”, संदीपचं नाव निघताच करण जरा सावध झाला. संदीप जर का या गोष्टीत इन्व्हॉल्व्ह झाला आणि तो इथपर्यंत आला तर..
“त्याने नै दिले तर शेखरला ठोकू आम्ही अन मग त्याच्या इन्शोरन्स कंपनीला द्यावे लागतील १५०करोड. आता १५० करोड देणं सोप्प? का ५ करोड?”, मोहित
“म्हणजे तुम्ही शेखरना त्याच्याच घरात किडनॅप करुन ठेवणार पैसे मिळेपर्यंत?”
“भारी आहे कि नै प्लॅन? आणि संदीपला कुठे माहितेय हे घर कुठेय?”, मोहित
“मग तुम्हाला कसं कळलं?”
“तुम्हीच तर आणलेत आम्हाला इथं, ह्या तुमच्या हातातल्या घड्याळाने”
…
“जेंव्हा इशिताने मला पहिल्यांदा तुमच्याबद्दल सांगितले, कसं तुम्हाला हॉटेलमध्ये आणलं होतं, कसं तिने तुम्हाला बेशुद्ध करायचा प्रयत्न केला, मग संदीप तिथे आला.. त्यानंतर तुम्हाला मिळालेलं काम.. मग शेखरबद्दल, तुमचं त्याच्या घरी.. इथं.. येऊन राहण्याबद्दल, मार्केटमध्ये रंगलेली त्या इन्शोरन्स पॉलिसीची चर्चा.. ..”
“.. मग मोहितने प्लॅन बनवला..”, इशिता म्हणाली, “त्यावेळी.. हॉटेलमध्ये तू भाळला नाहीस माझ्यावर आणि ते ड्रिंक्स घेतलं नाहीस, पण ह्यावेळी नाही.. तुला माझ्या प्रेमात पाडायला भाग लावले मी आणि तुला हे घड्याळ दिले.. जीपीएस ट्रॅकर असलेलं. तुम्ही निघालात त्याच दिवशी आम्ही पण निघालो.. पण तुमची अन आमची चुकामुक झाली.. तुम्ही अचानकच गायब झालात.. ”
“हम्म, पण आम्ही धीर सोडला नाही, तुमचं जीपीएस लोकेशन दिसत होते, पण इथे यायचं कसं ते कळेना.. आम्ही त्या गावात एका लॉज मध्येच राहिलो.. सकाळी जेंव्हा तुमचं लोकेशन इथे गावातच दिसलं तेंव्हा तुमचा पाठलाग सुरु केला आणि आलो इथपर्यंत..”, मोहित
“हे बघा, तुम्हाला जे काय करायचंय ते करा, पण शेखरला त्याचा त्रास होता काम नये.. त्याच्यापासून जोपर्यंत तुम्ही लांब आहेत तो पर्यंत मला काही प्रॉब्लेम नाही.. तुम्ही शेखरजवळ जायचा प्रयत्न केलात तर मलाही माझे हात हलवावे लागतील..”, करण निर्वाणीच्या सुरात म्हणाला
“नाय ओ नाय, कुनाला पण त्रास नाय देणार.. फक्त एकदा भेटून घेतो शेखरना.. ज्यांच्या जीवावर इतके पैसे कमावणार, त्यांना एकदा भेटायला नको?”, असं म्हणून भिंतीचा आधार घेत मोहित कसा बसा उभा राहिला
करण आणि शैलाच्या डोळ्यासमोर एकदम काजवेच चमकले. जर का हा मोहित खोलीत गेला तर..
“भेटा तुम्ही.. पण शेखर आता झोपतील.. मला नाही वाटत तुम्ही त्यांना भेटावं.. उगाच त्यांना टेन्शन वगैरे आलं आणि त्यांचं लिखाण थांबलं तर..”, शैला
“च्यामारी.. अहो कसलं टेन्शन? सांगू नका त्यांना आम्ही कोण? कशाला आलो? सांगा ह्या करणचे मित्र…”.. इशिताचा आधार घेत मोहित पुढं सरकू लागला..
लवकरच काहीतरी करणं गरजेचं होत..
“बरं .. बरं.. तुम्ही २ मिनिटं थांबा, मी आणि करण फक्त त्यांना औषध देऊन येतो.. त्यांना झोपू देत, मग फार तर हळूच दार उघडुन त्यांना बघा? ओके?”
“चालतंय की .. डोळ्यांना शेखर दिसल्याशी घेणं.. नाहीतर तुम्ही म्हणायचा शेखर आत मध्ये आहेत, आणि आत कोणीच नसायचं..”, काही काळ विचार करून मोहित म्हणाला
शैला आणि करण लगबगीने आतल्या खोलीत गेले..
“आलं लक्षात..”, शैला काही बोलायच्या आधीच करण म्हणाला.
दोघांनी खोलीचं दार हलकेच लोटून घेतलं.
“शेखर.. बरं वाटतंय न आता? औषध घेऊन टाक हे घे…”, फ्रिजरच दार उघडता उघडता शैला म्हणाली
“उठु नका तुम्ही.. हि घ्या गोळी.. ह्याने शांत झोप लागेल.. सकाळपर्यंत वाटेल बरं..”, करण म्हणाला
दोघांनी पटकन फ्रिजरमधून शेखरची बॉडी काढली.. आधीच जाड-जुड, त्यात बॉडी आता चांगलीच जड व्हायला लागली होती. कसलाही आवाज होऊ न देता ती बॉडी काढून बेडवर ठेवेपर्यंत दोघांची चांगलीच दमछाक झाली.. शैलालातर श्वास घेणं जड जाऊ लागलं.
करणने पटकन शेखरच्या बॉडीवर पांघरुण टाकले, डोक्याखाली दोन उश्या सरकवल्या आणि एक मंद नाईट-लॅम्प चालू केला.
सगळं ठीक ठाक आहे बघून दोघंही खोलीच्या बाहेर आले.
बाहेर मोहीत बंदुक तयार ठेऊन उभा होता..
“नै म्हणलं, आतून दुसरी बंदूक वगैरे घेऊन आलात तर आपलं असावं.. “.. मोहित हसत हसत म्हणाला.. “मला माहिते, तुम्ही असा वेडेपणा करणार नै, पण लोकांचं काय सांगता येत नै ओ आजकाल”
दोघांचे हात रिकामे आहेत ह्याची खात्री झाल्यावर त्याने रिव्हॉल्व्हर खिश्यात ठेवून दिली..
“झोपले का शेखर?”
“थांबा १० मिनिटं.. झोपतच एवढ्यात..”, करण म्हणाला
पण मोहीतला धीर धरवत नव्हता.. लंगडत लंगडत तो खोलीपाशी आला, त्याने करणला बाजूला सरकवले आणि हळूच खोलीचं दार उघडून आत डोकावले.
समोरच्या बेडवर शेखरची बॉडी शांत पसरलेली होती..
स्वतःची तसल्ली झाल्यावर मोहीत सावकाश बाजूला झाला..
लिव्हींगरुम मध्ये येऊन सगळे बसल्यावर मोहीतने घड्याळात नजर टाकली.. संध्याकाळचे ५.३० वाजत आले होते..
“..आता मुद्याचं बोलू.. चला संदीपशी बोलण्याची वेळ झाली..”, असं म्हणून त्याने खिश्यातुन मोबाईल बाहेर काढला..
तो नंबर फिरवणार इतक्यात करण हळू आवाजात ओरडला, “थांब..”
“का? काय झालं?”
“अरे कसला कॉन्ट्रॅक्ट किलर तू.. फडतूस पिक-पॉकेट करणारा पण वाटत नाहीस तू..”, करण काहीसं चिडून म्हणाला
“ए.. बॉडीगार्ड..”
“ए.. गप्प तू.. अरे काय अक्कल आहे कि नाही तुला.. इथून फोन लावतो आहेस? मूर्खा, दोन तासात पकडला जाशील…”, करण
“ते कसं ब्वा?, संदीपला तर पत्ता माहीतच नाहीए इथला..”
“बरोबर आहे.. माहित नाहीए, पण तुझा फोन लागला कि तो ट्रेस करायला असा कितीसा वेळ लागणारे? १०-१५ मिनिटांत तुझा नंबर किंवा मोबाईलचा आय.एम.इ.आय क्रमांक ट्रॅक होईल आणि पोलीस पोहोचतील इथे.. ”
“येस्स, करेक्ट, पण तु का सांगितलेस हे मला? उलट पोलीस इथे पोहोचले असते तर तुम्हाला बरंच होतं की..”, मोहित गोंधळून म्हणाला
“नाही.. पोलीस इथे आले तरी, शेखर होस्टेज आहेत तुझ्याकडे.. जोपर्यंत तुझी बंदुक शेखरवर रोखलेली आहे तोपर्यंत पोलीस काहीच करु शकले नसते. आणि मग अश्या वेळी एखादी चुक, एखादी सुटलेली गोळी.. मग ती तुझ्या बंदुकीतून असो, कि पोलिसांच्या.. शेखरचा जिव धोक्यात आला असता. पैसे संदीपचे जात असतील तर मला काय त्याच्याशी? शेखरच्या जीवाला कोणताही धोका पोचता काम नये..”, करण मोहीतला लक्षपूर्वक न्याहाळत म्हणाला
मोहीतला करणचे म्हणणे पटलेले होते. पण त्याच्या डोक्यात हा विचार आला नाही, कि ह्या घरात फक्त त्याचाच नाही तर शेखर, शैला आणि करणचाही मोबाईल होता. लोकेशनच शोधायचे झाले, तर त्यांच्या मोबाइलवरुनही शोधता आले असतेच..
“हम्म.. पॉईंट आहे.. पॉईंट आहे.. बर मग.. आता काय करायचे?”
“आपल्याला गावात जाऊन तिथल्याच एखाद्या पब्लिक फोन वरुन संदीपला कॉन्टॅक्ट करावं लागेल..”, करण
“आपल्याला??”
“हो मग, संदीप काय तुझ्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवेल का? तिथे जर मी असेन तर मी सांगु शकेन त्याला परिस्थिती..”
“हम्म.. हे हि बरोबरच आहे…”
करणला एव्हाना खात्रीच पटली होती हा मोहीत कोणी कॉन्ट्रॅक्ट किलर वगैरे नक्कीच नाहीए.. इतक्या फालतू, बाळबोध चुका कोणी कॉन्ट्रॅक्ट किलर करुच शकत नाही. पहिल्या भेटीत जी थोडीफार भीती त्याला मोहीतची वाटली होती, ती आता कुठल्या कुठे गेली होती. त्याच्या हातात बंदूक नसती तर करणने त्याला केंव्हाच लोळवले असते.
“पण तू नाही.. तुला मी बरोबर न्हेणार नै..”, अचानक काहीतरी सुचल्यासारखं मोहीत म्हणाला
करणला तेच हवं होतं.. तो मोहीतचं बरोब्बर माईंड-रिड करायला लागला होता.. किंबहुना तो मोहितच्या दोन पावलं पुढं जाऊन विचार करत होता
“का? काय झालं?”
“आधीच मला इथे नीट चालता येत नाहीए.. तिथे भर गर्दीत, गावात तू मला चकवा देऊन पळून गेलास तर?”
करणला आता मोहीतच हसायला यायला लागलं होत..
“हम्म.. पॉईंट आहे..”, त्याची नक्कल करत करण म्हणाला .. “मग?”
“हि.. शैला येईल माझ्याबरोबर.. आणि इथे इशिता राहील तुझ्याबरोबर.. विसरु नकोस, पोरगी असली तरी तिच्या हातात रिव्हॉल्व्हर असेल… चालाखी केलीस तर तुझ्या आधी शेखर वरती पोहोचले असतील..”, मोहित उसन्या आवेशाने म्हणाला
“नै.. असे मी काहीहि करणार नाही..”, करण मनातल्या मनात हसत म्हणाला
त्याच्या डोक्यात केंव्हाच एक प्लॅन तयार झाला होता, आणि त्यातला पहिला भाग जसा करणला हवा होता, तसाच पार पडला होता.
इशिता/मोहितने संदीपला डबलक्रॉस करुन ह्या खेळाला सुरुवात केली होती… पण हि तर फक्त एक सुरुवात होती.. अजून पुढे बरंच काही घडणं बाकी होते.. काय? ते जाणून घेण्यासाठी.. वाचा डबलक्रॉसचा पुढचा भाग.. तोपर्यंत…
[ क्रमशः ]