Monthly Archives: May 2021

डबल-क्रॉस (भाग १९)


भाग १८ पासून पुढे >>

करणने अख्खा दिवस लोळूनच घालवला. कितीही विचार केला, तरी तो हितचिंतक कोण असावा ह्याचं कोडं त्याला काही केल्या उलगडेना.

संध्याकाळी ७ – ७.३० च्या सुमारास तो विचार करत पहुडलेला असतानाच त्याची तंद्री भंगली ती खोलीबाहेर झालेल्या आवाजाने. तो उठून बसेतोवर दार उघडून दोन सफारी घातलेली माणसं आत आली. पटापट खोलीतले दिवे लावले, फॅन मोठा केला आणि करणला म्हणाले,
“सर येत आहेत”

काही सेकंदातच लाईफ़-लाईन इंशोरंन्स कंपनीचा डिव्हीजनल-हेड, संदीप, आतमध्ये शिरला.

“कसा आहेस करण?”, कोटाचे एक बटण काढून खुर्चीवर बसत संदीप म्हणाला

“मी ठीक आहे”, करण
“गुड, देशपांडे, द्या ते इकडे”, रुमालाने सारखा घाम पुसणाऱ्या इसमाला संदीप म्हणाला

त्या माणसाने आपल्या सफारीच्या खिशातून काहीतरी काढून संदीप कडे दिले

संदीपने ती वस्तू करणच्या बेडच्या जवळच्या टेबलावर ठेवली. ती वस्तू एक जुन्या काळचा टेप रेकॉर्डर होती.

“करण, पहिल्या दिवसापासून जे काय तिथे घडलं ते सगळं मला ह्यात रेकॉर्ड हवंय. Sorry, you can call me bit old fashioned, पण मला ह्या रेकॉर्डरवरच विश्वास आहे. कोर्टात ह्यात कोणी डिजीटल फेरबदल केले असे नाही म्हणू शकतं, एकदा रेकॉर्ड झाले की फुल अँड फायनल. सो नीट आठव आणि प्रत्येक बारीक सारीक गोष्ट रेकोर्ड कर.”

….

करणच्या होकाराची वाट न बघता संदीप पुढे म्हणाला, “मी डॉक्टरांशी बोललो आहे, उद्या संध्याकाळी तुला डिस्चार्ज मिळेल, त्याच्या नंतर दोन दिवसात ह्या रेकॉर्ड्स घेऊन सरळ माझ्या ऑफिसमध्ये ये. ह्या रेकॉर्ड्स फक्त आपल्यातच रहातील ह्याची काळजी घे, आणि हो देशपांडे…तुम्ही इथेच थांबा, करण ला काय हवं नको ते बघा”

“सर, मी घरी सांगितले नाहीए, घरी सांगून येऊ?” चेहरा रुमालाने पुसत देशपांडे म्हणाला

“काही आवश्यकता नाहीए, फोनवरुनच कळवा की वहिनींना हं? एक दिवस, दोन रात्रीचा तर प्रश्न आहे”

“पण सर, जरा आधी सांगितलं असतं तर?”
“तर? तर काय देशपांडे? माझे निर्णय मी आता तुम्हाला विचारून घ्यायचे का?”
“नाही सर, तसं नाही”
“तसं नाही तर मग कसं? इथे कंपनीचे १५० कोटी पणाला लागलेत आणि तुम्हाला घरी जायचं आहे?”

असं म्हणून संदीप खुर्चीवरून उठला, आपल्या कोटाचे बटण लावले आणि तो जाण्यासाठी वळला.

“संदीप, शैला मॅडम कश्या आहेत, काही बोलल्या का त्या? नक्की काय झालं, कसं झालं?”, करण

संदीपच्या चेहऱ्यावर एक हलकेच हसू पसरले, “मला वाटलं तुला कळलं असेल. शैला आलीय शुद्धीवर, पण तिला समहाऊ काहीच आठवत नाहीए”

“आठवत नाहीए? म्हणजे? मी समजलो नाही”, करण गोंधळून म्हणाला

“म्हणजे तिला फार्महाऊसवर गेल्याचंच आठवत नाहीए. तिला शेखर गेलाय हे ही माहीत नाहिए”

“काय? कसं कसं शक्य आहे हे?”
“डॉक्टर म्हणतायत एक तर त्यांच्या मेंदूला जबर मार बसलाय किंवा जोराचा शॉक ह्यापैकी कशानेही होऊ शकते”

“And you believe this!”, करण पटकन बोलून गेला
“का? तुझा विश्वास नाहिए?”
“नाही, तसं नाही”
“विश्वास तर माझा तुझ्यावर पण नाहीए करण, तुला तर माहितीच आहे लाईफ्लाईन प्रत्येक क्लेमच्या मुळाशी जातेच”
“येस आय नो, म्हणजे हा क्लेम रिजेक्ट करणार?”

“नाही, आता सिम्पथी शैलच्या बाजूने आहे, अश्यावेळी क्लेम रिजेक्ट करणं लाईफ्लाईन च्या इमेजला तडा पोहोचवू शकतं, सो आम्ही आत्ता पैसे देऊ, पण ही केस सहजा सहजी क्लोज होणार नाही हे ही निश्चित”

करणला हलकेच घाम फुटला

“देशपांडे, कदम, तुम्ही दोघे जरा बाहेर थांबा”, संदीप बरोबरच्या त्या दोघांना म्हणाला

ते दोघे बाहेर गेल्यावर करणकडे वळून संदीप म्हणाला, “शाळेत एक वाक्यात उत्तर द्या खूप सोडवले असशील ना तू?”

“हम्म”

“मग मला फक्त एकाच वाक्यात सांग शेखर कसा मेला”

“जिमीने त्याच्या चाकूने भोसकून मारलं”
“आणि शेखर? त्यांनी प्रतिकार नाही केला?”
“केला, शेवट पर्यंत केला”
“शेखर आणि जिमी शरीरचा आकारमान बघता शेखरच्या एका थपडीतच जिमी गारद व्हायला हवा होता”

करण काहीच बोलला नाही

संदीपने एकवार दार बंद असल्याची खात्री केली, खिशातून एक कागद काढला आणि तो करणच्या समोर धरला

“काय आहे हे?”
“शेखरचा पोस्टमार्टेम रिपोर्ट, अजून पोलिसांना पण मिळाला नाहीए बरका, खास माझ्या कॉन्टॅक्ट मूळे आधी माझ्याकडे आला.. वाच वाच”

करणने तो रिपोर्ट वाचायला सुरुवात केली आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेला.

वाचून झाल्यावर संदीपने तो कागद घडी करून खिश्यात ठेवला आणि तो निघून गेला

 

इन्स्पेक्टर विक्रम आपल्या ऑफिसमध्ये पंचनामा टीमने पाठवलेले सगळे फोटो टेबलावर पसरवून बसला होता.

“शेळके, एक गोष्ट मला राहुन राहून खटकतीय”
“कोणती सर?”, टेबलाशेजारीच उभे असलेले सब-इन्स्पेक्टर शेळके म्हणाले

“हा फोटो बघा शेळके, बेडरूम मधला आहे.. आपल्याला शेखरची बॉडी ह्याच बेडरूम मधल्या फ्रिज मध्ये मिळाली होती, बरोबर”
“हो सर, बरोबर”
“ह्या बेडवरची बेडशीट बघा एकदम क्लीन आहे, रक्ताचा एक थेंब नाही त्यावर..”
“हो सर, पण मर्डर बेडरूममध्येच झाला असेल कश्यावरुन?”
“शक्य आहे, पण बाहेरही आपल्याला ब्लड चे ट्रेसेस नाही मिळाले. शिवाय शेखरची एव्हडी बॉडी उचलून खोलीत आणणे अवघड आहे..”

“….”

“हा फोटो बघा, जिमी आणि रोशनचा.. ह्याच्या अंगावरचे ब्लड पण मला वाटतेय त्यांचेच आहे.. शेखरचं नाहीए..”

“जिमी किंवा रोशनचे अजुनकही कपडे वगैरे मिळालेत आपल्याला तिथे?”
“नाही सर.. “
“हम्म ..”
..

“शेळके, यूव्ही केले होते ना आपल्या फॉरेंसिकने?”
“ऑफकोर्स सर..”
“रिपोर्ट आला त्याचा?”
“नाही सर, अजून नाही आलाय.. “
“बघा ना जरा फोन करून.. रिपोर्ट सावकाश पाठवा म्हणावं पण बेडरूममध्ये किंवा इतर कुठे कुठे ब्लडचे ट्रेसेस मिळाले का यूव्ही मध्ये तेवढं सांगा म्हणावं..”
“सर.. रात्रीचे दोन वाजत आलेत.. आत्ता कोण असेल का?”
“तुम्ही बघा तर फोन करुन ..”
“हो सर..”, असं म्हणून शेळके आपल्या डेस्कपाशी गेले

शेळके फोन संपवून येईपर्यंत विक्रमने कॉफी व्हेंडिंग मशिनमधून स्वतःसाठी एक कॉफी बनवली आणि तो परत खुर्चीवर येऊन बसला

“सर, रिपोर्ट अजून रेडी नाहीए, उद्या दुपार पर्यंत येईल.. पण.. एस सर बेडरुम मध्ये भरपूर ब्लडचे ट्रेसेस मिळालेत.. यूव्ही लाईट मध्ये क्लीअर दिसतंय.. ब्लड नक्की आहे.. आणि बहुदा फडक्याने क्लिनिंगही केले गेले आहे..”

“इंटरेस्टिंग.. म्हणजे मर्डर बेडरुममध्येच झाला.. पण आपल्याला क्लिनिंगसाठी वापरलेले फडके, किंवा ती बेडशीट दोन्ही मिळाले नाही…. करेक्ट??”
“करेक्ट सर.. “

विक्रम आपल्या हाताची बोट टेबलावर वाजवत विचार करत बसला

“आलं लक्षात सर, तुम्ही काय विचार करताय. “, शेळके म्हणाले, “.. साधारणपणे गुन्हेगार हे असे जमीन पुसणे, बेडशीट बदलणे केंव्हा करेल? जेंव्हा त्याला गुन्हा लपवायचा असेल.. पण इथे.. इथे जिमी किंवा रोशनने शेखरचा केलेला मर्डर हा शैला किंवा करणच्या समोरच केला असणार.. मग त्यांना हे असले लपवाछपवी करण्याची काय गरज? असेच ना?”

“काय म्हणालात तुम्ही? जिमी किंवा रोशनने शेखरचा केलेला मर्डर.. तुम्हाला कसं माहीती शेखरचा मर्डर ह्या दोघांपैकीच कोणी केलाय?”

“म्हणजे काय सर? दुसरं होतंच कोण तिथे? शैला जी त्यांची पत्नी आहे.. आणि करण.. तो तर त्यांचा बॉडीगार्ड होता ..”

“कमॉन शेळके, आजपर्यंत आपण किती गुन्हे बघितलेत ज्यामध्ये गुन्हा करणारी व्यक्ती कोणीतरी जवळचीच असते..”
“बरोबर सर, पण तस असतं तर करणने स्वतःहून स्टेशनला कशाला रिपोर्ट केलं असतं? मिसेस शेखरची काय हालत झाली हे तर तुम्ही स्वतः बघितले आहे..”

“शेळके, हा पॅटर्न पण आपण अनेकदा बघितलेला आहे. गुन्हा करून गुन्हेगारच पोलीस कम्प्लेंट देतो, दहा वेळा गुन्हेगार सापडला का म्हणून चौकश्या करतो..”

“बरं. आता हे फोटो नीट पहा..”, विक्रमने टेबलावरचे फोटो बाजूला केले आणि संगणकावरील त्याच्या डिजिटल कॉपीज ओपन केल्या.

“हा जिमीचा गळ्याभोवतीचा चाकूचा वार.. “, विक्रमने फोटो जिमीच्या गळ्याभोवती झूम केला.. “.. अगदी सफाईदारपणे गळा चिरलेला वाटतो आहे. आपल्या प्रत्यक्षदर्शी परिस्थतीनुसार, जेंव्हा शैलावर अत्याचार होत होते, जेंव्हा जिमी तिचा रेप करत होता, किंवा तिला मारझोड करत होता, तेंव्हाच सेल्फ डिफेन्स मध्ये शैलाने जिमीला मारले बरोबर?”

“बरोबर सर..”, शेळके

“मग हा गळ्यावरचा वार तसे दर्शवत नाही ना. मारझोड होत असताना इतक्या सफाईदार पणे चाकू गळ्यावरून फिरू शकतो? ते पण शैलाकडून जी उठून बसण्याच्या परिस्थतीत पण नव्हती?..

शिवाय हा कट बघा किती डीप आहे.. पूर्ण विंड-पाईप कापला गेलाय.. इतकं सोपं काम नाहीए ते.. मला वाटते कुठल्या तरी निष्णात माणसाने केलेले हे काम आहे.. “

शेळकेंने नकळत मान डोलावली

आता हे शैलाचे फोटो बघा.. हिच्या पायावर कुठल्याश्या सळईचे वार दिसत आहेत. प्रत्येक फटका एकाच ठिकाणी बसलाय… अगदी मोजून मापून .. केस पार उपटून निघालेत.. पण निदान फोटोत तरी जिमीच्या नखात एकही केसांचा अंश दिसत नाहीए.. का? “

…..

“मी दावा करत नाहीए की करण किंवा शैलाने हा गुन्हा केला असेल, पण पुढील तपास करताना सगळ्या शक्यता पडताळून पाहायला हव्यात..”

टेबलावर वाजणाऱ्या फोनमुळे विक्रमचे बोलणे खुंटले..

शेळकेंनी फोन उचलला..

काही क्षण बोलून झाल्यावर शेळके म्हणाले, “सर शेखरचा पोस्टमार्टम रिपोर्ट तयार आहे, हवालदाराला पाठवूया आत्ता रिपोर्ट कलेक्ट करायला?”

“हवालदाराला पाठवूच, पण त्यांना म्हणावं रिपोर्ट लगेच फॅक्स करा इथे स्टेशनला.. “, विक्रम

थोड्याच वेळात बीप..बीप.. आवाज करत फॅक्स मशीन सुरु झाले, आणि खर्र खर्र आवाज करत शेखरच्या पोस्टमार्ट रिपोर्ट प्रिंट होऊन बाहेर आला..
विक्रमने झपाट्याने तो रिपोर्ट वाचून काढला.. आणि शेवटचा मसुदा वाचताना त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला..

“रिझन ऑफ डेथ – कार्डिऍक अरेस्ट …”

“कसं शक्य आहे हे शेळके.. ?.. शेखरच्या शरीरावर किमान २५-३० चाकूने भोसकल्याचे व्रण असताना मृत्यूचे कारण कार्डिऍक अरेस्ट?”

विक्रम बोलत असतानाच फॅक्स मशिनमधून दुसरा कागद प्रिंट होऊन निघू लागला..
प्रिंट पूर्ण होताच विक्रमने त्यावरील मजकूर वाचायला सुरुवात केली आणि त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.. त्या रिपोर्ट नुसार, शेखरचा मृत्यू होऊन २-३ तास उलटल्यानंतर ते चाकूचे वार झाले होते..

“शेळके मला काही कळतच नाहीए.. काय प्रकार आहे हा? म्हणजे शेखरच्या डेड-बॉडीला २५-३० वेळा भोसकण्यात आले? पण का?
नक्कीच काहीतरी गडबड आहे. चला आपल्याला करणला भेटावे लागेल.. सगळ्या प्रश्नांची उत्तर त्याच्याकडेच मिळतील.. “

“सर आत्ता? ३ वाजता?”
“हो का?”
“सर तो झोपला असेल..”
“मग? काका, मामा लागतो का तो तुमचा? उठवू त्याला.. चला काढा गाडी..”
“नाही सर म्हणजे व्हिजिटिंग अवर्स पण नाहीएत आत्ता.. “
“शेळके आपण पोलीस आहोत… नातेवाईक नाही.. चला.. “

टेबलावरची आपली कॅप उचलून विक्रम बाहेर पडला सुद्धा होता

 

रात्रीचे २ वाजून गेले तरीही करणला झोप येत नव्हती.

शेखरचा मृत्यू जर हार्ट-ऍटॅकने झालाय तर ह्याचा अर्थ जेंव्हा शैला त्याला चाकूने भोसकत होती, तेंव्हा तो आधीच मेलेला होता..

करणने डोक्याला हात मारुन घेतला, शेखरचा खून लपवण्यासाठी त्याने आणि शैलाने किती मेहनत घेतली होती. पण शेवटी शेखरचा मृत्यू नैसर्गिक होता.. अर्थात आता ह्या सगळ्याचा विचार करून काहीच फायदा नव्हता कारण शेखरच्या मृत्यूला जिमी आणि रोशनच जबाबदार धरले जात होते. शैला आणि करण आपसूकच ह्या सर्वातून सुटले होते.

आता फक्त संदीपला काय उत्तर द्यायचे ह्याचाच विचार करणे भाग होते. शैलाची स्मरणशक्ती हरवलीय वगैरे गोष्टींवर त्याचा अजिबातच विश्वास नव्हता. केवळ वेळ मारून न्यायला शैला हा खेळ खेळतोय ह्या त्याच्या मतावर तो ठाम होता. तसेच, पुढचे पाऊल उचलण्याआधी शैलाला एकदा भेटणे, आणि दोघांच्या बोलण्यात सुसूत्रता आणणे आवश्यक होते. नाहीतर तो आज एक सांगायचा आणि शैला उद्या दुसरच काही..

पण कसे? शैला दुसऱ्याच दवाखान्यात होती, आणि त्यासाठी करणला इथून बाहेर पडणे आवश्यक होते.

करण अस्वस्थपणे खोलीत येरझाऱ्या घालत होता इतक्यात दारावर टकटक झाली आणि क्षणार्धात इन्स्पेक्टर विक्रम आणि शेळके आत मध्ये आले.

“अरे वा, जागा आहेस की तू.. “, विक्रम
..
“शेळके उगाचच काळजी करत होते, तू झोपला असशील, आमच्या अश्या अवेळी येण्याने तुझी झोप मोड होईल.. “
“नो प्रॉब्लेम इन्स्पेक्टर.. बोला कसे येणे केलेत.. “

“त्या दिवशी नंतर आपली भेटच नाही.. हाऊ आर यु?”
“मी ठीक आहे.. बहुतेक उद्या डिस्चार्ज मिळेल.. “
“गुड गुड.. काही महत्वाचे प्रश्न विचारायचे होते, काही महत्वाचे धागेदोरे मिळाले होते म्हणून आलो.. “

करणला क्षणार्धात ट्यूब पेटली, नक्कीच विक्रमने शेखरचा पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाला असणार. त्याने मनोमन लाख वेळा संदीपचे आभार मानले.. निदान तो आता शेखरच्या मृत्यूबद्दल आणि त्याच्या कारणाबद्दल जाणून होता..

“काही हरकत नाही, बसा ..”

“करण, मला शेखरच्या मृत्यूबद्दल अधिक जाणून घ्यायचे होते.. म्हणजे तू हुसेन बरोबर पंप लुटायला बाहेर गेलास, त्याच्या आधी, शेखर कुठे होते? काय करत होते.. ?”

करणने थोडा विचार केल्यासारखे दाखवले आणि मग तो म्हणाला .. “शेखर खूपच स्ट्रेस्ड होते.. त्यांनी बरच ड्रिंक पण घेतलं होत. आम्ही निघालो तेंव्हा ते बरं वाटत नव्हतं म्हणून बेडरूममध्ये जाऊन झोपत होते..”

“बरं वाटत नव्हतं? म्हणजे नक्की काय होतं होते?”
“म्हणजे असे विशेष काही नाही, पण थोडं अनइझी होतं होते.. कदाचित जास्ती ड्रिंक्स घेतल्याने असेल.. “

“ओह.. इट एक्सप्लेन्स देन ..”
“का? काय झालं?”

विक्रमने पोस्टमार्टम रिपोर्टची फॅक्स कॉपी करणसमोर धरली

“म्हणजे? मला नाही कळले..” उगाचच अज्ञानी चेहरा करत करण म्हणाला
“म्हणजे, बहुदा शेखरचा मृत्यू आधीच झाला होता, कदाचित जिमीला ते कळले नाही, शेखर झोपलेत समजून त्याने वार केले असावेत.. “

“ओह आय सी “

“बरं, मला एक सांग, जेंव्हा जिमी आणि रोशन फार्म-हाऊसवर आले, तेंव्हा त्यांचे हेच कपडे होते?”, विक्रमने जिमी-रोशनच्या डेड-बॉडीज चे फार्महाऊसवर घेतलेले फोटो करणच्या समोर धरले..

करणंही पक्का मुरलेला होता, विक्रमच्या प्रश्नाचा रोख त्याच्या लक्षात आला होता..

“नाही विक्रम, त्यांचे वेगळे कपडे होते.. ते कॅसिनो रॉयलमधून आले तेंव्हा त्यांच्या अंगावरच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते.. बहुदा आम्ही गेल्यानंतर त्यांनी कपडे बदलले असावेत.. “

“पण आम्हाला त्यांची कुठलीच कपड्यांची बॅग सापडली नाही.. “, शेळके

“माफ करा, मला त्याची कल्पना नाही… “, करण

विक्रमने काही क्षण करण कडे रोखून पहिले आणि मग तो म्हणाला, “ऑलराइट देन, निघतो आम्ही.. तू आराम कर.. “

..

“आणि हो.. उद्या डिस्चार्ज मिळाल्यावरही घरीच आराम कर बरका, कुठे जाऊ नकोस लगेच”, असे म्हणून विक्रम आणि शेळके निघून गेले..

त्याच्या ह्या बोलण्याचा मतितार्थही करणच्या लक्षात आला होता. थोडक्यात गाव सोडून कुठे जाऊ नकोस परवानगीशिवाय असेच काहीसे विक्रमला म्हणायचे होते. कदाचित त्याच्या शंकांचे पूर्ण समाधान अजूनही झालेले नव्हते.. कदाचित त्याला करणवर संशय होता…

काहीही असो, निदान आत्तापुरते तरी संकट टळले होते. आता कुठल्याही परिस्थितीत त्याला शैलाला भेटणे भागच होते..

[ क्रमशः ]