Monthly Archives: July 2021

डबल-क्रॉस (भाग २०)


भाग १९ पासून पुढे >>

करणला एका कडक कॉफीची गरज होती. आत्ता ह्या वेळी बेल मारुन कोणी कॉफी आणून देईल ह्याची श्वाश्वती नव्हती. शेवटी स्वतःच जाऊन आणावी म्हणून तो खोलीच्या बाहेर आला.

समोरच्याच बाकड्यावर देशपांडे अंगाचं मुटकुळं करुन गाढ झोपला होता.

संदीपला त्याची दया आली. त्याने हलवून देशपांडेला जागे केले.

“देशपांडे, अहो अवघडून जाल असे झोपून..”

संदीपने देशपांडेला खरं तर करणवर लक्ष ठेवायला इथे थांबवले होते आणि नकळत त्याला कधी डोळा लागला त्याच त्यालाच कळले नव्हते.

तो कसनुसं हसत उठून बसला.

“चला,कँटीनला चला, चहा कॉफी घेतली कि बर वाटेल”, करण
“अरे तुम्ही नका खोलीच्या बाहेर पडू, हवं तर मी घेऊन येतो..”, देशपांडे उठून बसत म्हणाला

“अहो सरकारी दवाखाना आहे हा.. कोण बघतंय इथे पेशंट खोलीत आहे का बाहेर फिरतोय.. चला.. तेव्हढेच माझे पाय पण जरा मोकळे होतील.

रात्रीचे अडीच वाजून गेले होते, सर्वत्र सामसूमच होती. कँटिनही किरकोळ लोक सोडली तर रिकामेच होते.

करणने दोन कॉफी घेतल्या आणि तो देशपांडेपाशी टेबलावर येऊन बसला

“माफ करा, उगाच माझ्यामुळे तुम्हाला रात्रभर इथे बसावं लागलं”, करण
“नाही तसंच काही नाही, पण संदीपने आधीच सांगितले असते तर निदान घरी जाऊन सांगून आलो असतो. बायकोने बनवलेले जेवण वायाच गेले ना..”
“बरोबर आहे.. मी समजू शकतो.. कोण असतं घरी?”

देशपांडे ने आपला मोबाईल चालू करून आपल्या फॅमिलीचा.. बायको दोन मुलांचा .. फोटो दाखवला.

“देशपांडे.. तुम्ही घरी जाऊन निवांत झोपा, इथली काळजी करू नका, मला काही लागणार नाहीए.. आणि ह्या औषधांनीही सारखी झोपच येतेय. आता झोपलो कि सकाळी ८-९ शिवाय काही मी उठत नाही “, करण

“नको नको.. उगाच संदीप सरांना कळाले तर?”
“अहो आहे कोण इथे संदीपला सांगायला?.. उद्या सावकाशीत सकाळी नाष्टा करुन ह्या परत.. इथे असं अवघडून झोपण्यापेक्षा बायकोशेजारी झोप आरामात.. काय?”, डोळे मिचकावत करण म्हणाला

“पण..”
“पण नाही आणि बीण नाही,.. हे बघा पावणे तीन वाजलेत.. साडे तीनला जरी घरी पोहोचलात तरी चार तास चांगली झोप मिळेल”, हातातल्या घड्याळातली वेळ दाखवत करण म्हणाला..

देशपांडेचीही तिच इच्छा होती, फक्त संदीपच्या भीतीपोटी तो उगाच का कु करत होता..
करणने स्वतःहूनच जायची विनंती केल्यावर तो हि फारसे आढेवेढे न घेता जायला तयार झाला..

“धन्यवाद करण..”, खुर्चीतून उठत देशपांडे म्हणाला.. “फक्त संदीपला कळणार नाही ह्याची..”
“त्याची काळजीच करु नका, हे फक्त आपल्यातच.. चला मला पण आता मस्त झोप आलीय.. “. आळस देत करण म्हणाला

देशपांडेने कॉफी पटकन संपवली आणि तो खुर्चीतून उठून उभा राहिला..

“उद्या नाष्टयाला घरुन पोहे घेऊन येतो.. इथलं नका खाऊ, बायको मस्त पोहे बनवते.. दाणे कोथिंबीर खोबरं वगैरे टाकून आणतो..”, देशपांडे जाण्यासाठी निघाला

करणनेही कॉफी संपवली आणि तो पण उठून उभा राहिला..

“बाय द वे..”, अचानक काहीतरी आठवल्यासारखं देशपांडे म्हणाला.. “घड्याळ आवडलं ना तुम्हाला?”
“घड्याळ?” न समजून करण म्हणाला
“हां .. ते तुम्ही घातलेय ते.. “, करणच्या हातातल्या घड्याळाकडे बोट दाखवत देशपांडे म्हणाला..
“ओह हे.. हो चांगले आहे.. माझ्या मैत्रिणीनेच मला गिफ्ट केले होते ते.. “

“माहीत आहे मला.. इशिता ना?”
“हो.. तुम्हाला कसं माहीती?”
“कसं म्हणजे काय? मीच तर आणून दिले होते तिला.. “
“काय? तुम्ही? कसं? म्हणजे मी नाही समजलो..”
“कसं म्हणजे काय? संदीप सरांनीच सांगितले होते मला.. हे जीपीएस असलेले मॉडेल आणून इशिताकडे द्यायला.. “

करणला हा मोठ्ठा धक्का होता.. पण त्याने चेहर्यावरुन तसे काही दर्शवले नाही

“अच्छा अच्छा, थँक्स.. छानच आहे घड्याळ.. “
“बरं चला येतो मी, सकाळी ८.३० पर्यंत येतो मग.. “, असे म्हणून देशपांडे तिथून निघून गेला..

 

करण आपल्या खोलीत येऊन बसला..
संदीपने हे जीपीएस असलेले घड्याळ मागवले होते? मग इशिता का खोटं बोलली कि तिने ह्या घड्याळात जीपीएस बसवले ..

नुसते एकावर एक प्रश्नच करणच्या डोक्यात साचत होते ज्याची उत्तर लवकरात लवकर मिळणे गरजेचे होते.

सर्वात प्रथम शैला.. तिला भेटणे गरजेचे होते. देशपांडे आता इथे नसल्याने त्याला बाहेर पडून सकाळच्या आत परत येणे शक्य होते. फक्त प्रश्न एकच होता आणि तो म्हणजे शैला ज्या अपोलो हॉस्पिटलमध्ये भरती होती, ते शहराच्या दुसऱ्या बाजूला होते. तिथपर्यंत चालत जाणे शक्य नव्हते आणि रिक्षा किंवा टॅक्सीसाठी करणकडे पैसे आजिबात नव्हते.

थोडा विचार केल्यावर करणला एक उपाय सुचला. करणंच ऑफिस.. टेबलाच्या एका खणात तो नेहमी २००-४०० रुपये लपवून ठेवत असे, अगदीच गरजेच्या वेळी उपयोगी म्ह्णून. त्याचे ऑफिस तसे फारसे लांबही नव्हते. भरभर चालत गेला तर अर्ध्या पाऊण तासात तो सहज तेथे पोहोचु शकला असता.

करणने खोलीचे दार उघडून बाहेर नजर टाकली. व्हरांड्यात सामसूम होती.

बेडच्या कडेला लावलेला औषधांचा चार्ट करणने एकदा नजरेखालून घातला. रात्री कुठलेही इंजेक्शन, गोळी लिहिलेले नव्हते. त्यामुळे रात्री व्हिजिटला डॉक्टर, सिस्टर येण्याची शक्यता कमी होती.

करणने धोका पत्करायचा ठरवले. त्याने बाथरुमचा दिवा चालू केला, खोलीत अंधार केला आणि रुमचा दरवाजा उघडून बाहेर पडणार इतक्यात त्याच्या लक्षात एक गोष्ट आली. हातातले घड्याळ. कोण जाणो, संदीप जीपीएसवरून त्याच्यावर लक्ष ठेवून असेल?

करणने ते घड्याळ काढून टेबलावर ठेवून दिले आणि तो बाहेर पडला.

हॉस्पिटलच्या रिसेप्शनपाशी फुल राडा चालू होता, कुणाचे नातेवाईक गचकले होते आणि तेथे रडारड, डॉक्टरला शिवीगाळ चालू होती. सेक्युरिटी त्यातच मग्न होती. नशिबाने त्याला कोणीच आडवले नाही. करण झपझप पावलं टाकत बाहेर पडला आणि ऑफिसच्या दिशेनं निघाला.

 

शॉर्टकट्स घेत अर्ध्या तासातच करण ऑफिसपाशी पोहोचला. सावकाश जिने चढत तो ऑफिसपाशी आला. तसेही त्याच्या ऑफिसमधून चोरून न्हेण्यासारखे काही नव्हते, त्यामुळे दाराजवळच्या झाडाच्या कुंडीतच लपवून तो ऑफिसची एक ज्यादाची किल्ली ठेवत असे. करणने नेहमीच्या जागी हात घातला पण तिथे किल्ली नव्हती. करणने दोन-तीनदा निट बघितले, परंतु नक्कीच तिथे किल्ली नव्हती आणि त्याचं कारण करणच्या लगेचच लक्षात आलं.

ती किल्ली त्या कुंडीखाली नव्हती, त्याच्या ऑफिसच्या दाराच्या उघडलेल्या कुलुपाला होती.

ऑफिसचं कुलूप कोणी उघडले? कोण येऊन गेले ह्याचा करण विचार करत असतानाच दार उघडले गेले आणि एक व्यक्ती बाहेर आली. अनपेक्षितपणे समोर दुसरी व्यक्ती बघून दोघांनाही धक्का बसला.

करणने त्या व्यक्तीला पकडायचा प्रयत्न केला, पण ती व्यक्ती करणच्या हाताला हिसका देऊन पळाली .. काही पावलंच आणि अचानक एक वेदनेची एक लहर त्या व्यक्तीच्या अंगातून गेली आणि अस्पष्टसे कह्णत ती व्यक्ती जिन्याचा आधार घेऊन खाली बसली.

करणने पटकन त्या व्यक्तीला पकडले, पण ह्या वेळी त्या व्यक्तीने प्रतिकाराचा कुठलाही प्रयत्न केला नाही.

करण त्या व्यक्तीला घेऊन ऑफिसमध्ये गेला, दिवा लावला आणि ऑफिसचे दार लावून घेतले.

समोरच्या त्या व्यक्तीला, मोहीतला, बघून करणला पुन्हा एक आश्चर्याचा धक्का बसला..

“मोहीत .. तू इथे???”

मोहीत डोळे बंद करून भिंतीला टेकून उभा होता. पाठीत मारलेल्या त्या स्क्रू ड्रायव्हरच्या जखमेतून आलेली तीव्र कळ शमेपर्यंत तो भिंतीला टेकून उभा राहीला आणि मग शांतपणे तिथल्याच खुर्चीवर टेकून बसला.

“माझं पत्र मिळालं ना तुला?”, कसंनुस हसत मोहीत म्हणाला
“पत्र? कुठलं पत्र”, दुसऱ्या खुर्चीवरची धूळ झटकून मोहितसमोर ठेवत करण म्हणाला
“इतक्या लवकर विसरलास हितचिंतकाला??”
“ओह.. ते पत्र तू पाठवलं होतंस? तुझ्यामुळे मी त्या दवाखान्यात..”
“सॉरी.. ते करण भाग होतं.. विक्रमने तुला सोडलं नसतं ..”
“पण का? तू माझ्या मदतीला का आलास? तुला तर शैला मारुन टाकणार होती.. आणि त्या.. त्या दिवशी तू अचानक कुठे गायब झालास?”
“सांगतो.. सगळं सांगतो… ” असं म्हणून मोहितने हातातली बॅग करणला दिली..
“हि त्या पेट्रोल पंपावरची कॅश.. साडे-सहा लाख होते एकूण.. मी २ लाख कडून घेतले, बाकीचे तुझ्या ऑफिस मध्ये ठेवायला आलो होतो.. तिथे त्या फार्म हाऊसवर हि बॅग असुरक्षित होती. कुणाच्या हाती लागली असती किंवा पावसात भिजून सगळीच वाया गेली असती म्हणून मीच जाऊन घेऊन आलो.. “

“पण.. पण तू तिथे पोहोचलासच कसा? तिथे तर अजून पोलीस असतील ना?”
“सांगतो म्हणालो ना.. तू मला बोलून देशील तर ना.. “

“ओके सॉरी.. बोल.. ” खुर्चीवर बसत करण म्हणाला.. “फक्त माझ्याकडे वेळ कमी आहे, कसही करून मला सकाळी सातच्या आत हॉस्पिटल मध्ये पोहोचायचंय आणि अजून एक दोन काम शिल्लक आहेत.. “

“तुझी काम तुला नंतर पण करता येतील.. आधी मी काय सांगतोय ते नीट ऐक..” असं बोलून मोहीत बोलू लागला..

“माझी ओळख तर त्या दिवशी इशिताने करुन दिली होतीच.. मी सुपारी घेऊन खून करतो.. ऑफकोर्स, माझ्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नकोस.. मी दिसतो तसा नाहीए .. आणि हाच माझा सेलिंग पॉईंट आहे, लोकांना सांगूनही खरं वाटत नाही की हे माझं प्रोफेशन असेल..

तर.. मी आणि इशिता वेअर गोइंग स्टेडी .. ऐषारामात जगता येईल इतपत पैसा मिळत होता.. पण एकदा नशिबाचे फासे उलटे पडले.. एका मोठ्या सुपारीत माझ्याकडून गडबड झाली.. चुकून दुसरीच व्यक्ती मारली गेली.. सुपारीचे पैसे मिळाले नाहीतच उलट साला नाव खराब झालं.. नवीन काम मिळेना.. मार्केट मधून पैसे उचलले होते ते परत करायचे वांदे झाले…

त्याच वेळी इशिताला संदीपकडून काम मिळाले. दोन-चार दिवसातच सगळी गोम लक्षात आली आणि आम्ही दोघांनी संदीपला डबल-क्रॉस करायचा प्लॅन केला. तुझ्या घड्याळामुळे तुझ्यापर्यंत पोहोचणे सोपे होते. आम्हाला वाटलं काम अगदीच सोप्प आहे. शैला आणि शेखरकडून आम्ही काहीच प्रतिकार अपेक्षित केला नव्हता. प्रश्न फक्त तुझाच होता. मला वाटलं होईल काम. २-३ दिवस फक्त तुम्हाला डांबून ठेवायचे, संदीपकडून पैसे काढायचे आणि गायब व्हायचे. तसंही आम्ही मागितलेले पैसे संदीपसाठी फार नव्हते. प्लॅन अगदीच सोपा वाटत होता. पण.. शैलाने अनपेक्षितपणे प्रतिकार केला आणि होत्याचे नव्हते ते झाले..”

इशिताच्या आठवणीने मोहित काही काळ भावुक झाला..

मोहितने आपली एका बाजूची पॅन्ट वर केली.. जिथे शैलाने गोळी मारली होती.. तो गुडघा.. ती जखम अजूनही ओली होती..

“मला नाही वाटत ह्यापूढे मला नीट चालता येईल.. पेन-किलर इंजेक्शनवर सध्या तरी जगतोय, पण मला सर्जरीची गरज आहे.. तेही लवकरच .. म्हणून मी थोडे पैसे काढून घेतलेत.. आय होप यु वोन्ट माईंड.. “

करणने संमतीदर्शक मान हलवली..

“थँक्स.. त्या दिवशी तू मला स्कॉच बनवून दिलीस .. मला पूर्ण खात्री होती त्यात काहीतरी घातलेले असणार.. मी अंदाज बांधला झोपेचे औषधच असणार.. मला मारायचे असते तर ते तुम्ही आधीच केले असते .. सो मी ती स्कॉच शेजारच्या कुंडीत ओतून दिली..

मिशनवर असताना मी नेहमीच बरोबर स्ट्रॉंग पेन-किलर्स गोळ्या आणि इंजेक्शन्स बाळगतो.. कधी गरज पडेल सांगता येत नाही. मॉर्फीनच नाव ऐकलं असशीलच तू? मोस्टली आर्मीमध्ये वापरतात मेजर इन्जुरीजना तात्पुरता आराम वाटावा म्हणून…. गरज पडलीच तर ऑन-द-रन १-२ दिवस लपून राहता येईल असे सामान नेहमीच माझ्या बॅग मध्ये असते. मी पटकन एक शॉट घेतला आणि झोपेचे सोंग घेत पडून राहिलो.

तुम्ही इशिताची बॉडी घेऊन बाहेर गेलात आणि मी बाहेर पडायचा प्रयत्न करायला उठलो. एक तर दार बाहेरुन बंद होते आणि दुसरे म्हणजे ह्या पेन-किलरच्या भरवश्यावर मी कितपत पुढे जाऊ शकेन ह्याची खात्री नव्हती.. शिवाय तुम्ही किती लांब आहात ह्याची काहीच कल्पना नव्हती.. मी बाहेर पडायला आणि तुम्ही समोर यायला एकच वेळ आली तर..? मग मी घरातच दुसरा मार्ग शोधायला सुरुवात केली आणि शोधा शोध करताना मला तो तळघरात जायचा रस्ता सापडला ..”

“तळघरात?”, करण आश्चर्याने म्हणाला आणि मग त्याची ट्यूब पेटली.. शैलाने त्याला तो बंद दरवाजा दाखवला होता..
“येस्स राईट.. शैलाने दाखवला होता मला.. पुढे.. “

“मी पटकन त्या तळघरात घुसलो.. जाम अंधार होता.. काहीच दिसत नव्हतं.. मी अंधारात चाचपडत एका कोपऱ्यात गेलो.. कारच एक जुनं कव्हर पडलं होतं तिथे ते अंगावर घेतले .. थोड्या वेळातच मला गुंगी आली आणि मी बेशुद्ध पडलो .. “

शुद्ध आली तेंव्हा किती वेळ होऊन गेला होता ह्याची काहीच कल्पना नव्हती. काही मिनिट, काही तास का दिवस..

आपली लाईन कितीही वाईट असली तर एक चांगली गोष्ट असते ती म्हणजे आपण नेहमीच कुठल्याही गोष्टी साठी तयार असतो.. आपली बॉडी असतेच, पण नकळत आपले मन पण अश्या गोष्टींशी जुळवून घेणारे झाले असते. एक प्रकारचा अलर्टनेस फक्त शरीरातच नाही तर मनालाही असतोच.. आणि त्यामुळे मी अचानक सावध झालो.

… माझ्याशिवायही अजून कोणतरी त्या तळघरात होते. बारीकच हालचाल होती.. पण होती हे नक्कीच ..”

करण सावध होऊन बसला..

आधी वाटलं कि शैला किंवा तूच मला शोधत तळघरात आलात कि काय? पण माझा अंदाज चुकीचा होता हे लगेचच माझ्या लक्षात आले. तुम्ही असतात तर असे अंधारात नसता फिरलात.. शिवाय त्या व्यक्तीच्या चालण्याच्या आवाजावरुन ती व्यक्ती कोणतरी वजनदार असावी असे वाटत होते. सावकाश तळघराच्या पायऱ्या चढत ती व्यक्ती तळघराच्या दारापाशी गेली असावी.. तिथे थांबून बहुदा ती व्यक्ती बाहेर तुम्ही बोलत असाल ते ऐकत होती. पाच दहा मिनिट थांबून ती व्यक्ती परत जायला निघाली. जाताना त्या व्यक्तीने एक अगदी बारीक टॉर्च लावला होता.

बघता बघता ती व्यक्ती आणि टॉर्चचा तो उजेड दिसेनासा झाला.. आणि मग.. लांब कुठेतरी एक अगदी बारीकसा खुट्ट आवाज झाला आणि मग शांतता ..

त्या तळघरात यायचा बाहेरुनही एखादा रस्ता आहे हे लक्षात यायला वेळ लागला नाही.

मी सावकाश उठलो आणि तळघराच्या दरवाज्यापाशी आलो.. बाहेरुन तुम्हा दोघांशिवाय अजून दोघांचे आवाज येत होते.. जिमी आणि रोशन..

ती व्यक्त्ती गेली आहे ह्याची खात्री पटल्यावर मी सावकाश सावकाश सरकत तळघराच्या जिन्यापाशी येऊन बसलो. तिथे मला तुमचं बोलणं अस्पष्ट का होईना ऐकू येत होते. कुठलासा पेट्रोल पंप लुटायचा प्लॅन चालू होता. तुमच्या बोलण्यातून कळले कि तो कोण इन्स्पेक्टर विक्रम एकदा येऊन गेला होता आणि परत येण्याची शक्यता होती. जे काही चालू होते सगळेच विचित्र होते. मी ठरवले कि तिथे अजून जास्ती वेळ थांबण्यात अर्थ नाही.. उगाच कश्यात तरी अडकण्यापेक्षा तिथून निघालेले बरं .. तसही मला बाहेर जायचा मार्ग सापडला होता.

मी बाहेर पडायला मागे वळलो आणि पुन्हा मला त्या तळघरातल्या व्यक्तीच्या पावलांचा आवाज येऊ लागला.. मी अगदी जिन्याखालीच होतो.. बारीकसा आवाज झाला असता तरी माझं काही खरं नव्हतं.. मी श्वास रोखून बसून राहीलो. ती व्यक्ती येताना काहीतरी सामान घेऊन आली होती.. बहुदा लोखंडी काहीतरी.. जड ..

ती व्यक्ती माझ्या समोरच जिन्यावर बसून होती..

छातीत सॉल्लिड धडधडत होते. वाटत होते हृदयाचे ठोके तर नाही ना त्याला ऐकू जाणार?

“पण नशिबाने तसे काही घडले नाही. त्या व्यक्तीच लक्ष घरातून येणाऱ्या आवाजाकडेच लागले होते. बऱ्याच वेळ कानोसा घेतल्यावर शेवटी कसलीशी खात्री पटताच ती व्यक्ती तळघराचे दार उघडून घरात घुसली.. क्षणार्धात धाडकन गोळीचा आवाज आला आणि पाठोपाठ कुणाच्यातरी पडण्याचा.. पाठोपाठ दुसऱ्या माणसाची प्रचंड वेदनेची किंकाळी आणि मग सर्व शांत..

आधी वाटलं तुला पण ठोकलं काय..

तळघराचे दार उघडेच होते.. त्यामुळे मला सर्व स्पष्ट दिसत होते आणि ऐकू येत होते.. थोड्या वेळाने ती व्यक्त्ती तळघराच्या दाराशी आली.. सोबत शैला होती. तिच्या चेहऱ्यावर कुठलेही भीतीचे भाव नव्हते. ते दोघे जण एकमेकांशी बोलत होते. त्यांच्या बोलण्यात तुझं नाव आलेलं ऐकलं.. पेट्रोल पंप वगैरे ऐकलं .. त्यावरून बहुदा तूच तो पेट्रोल पंप लुटायला गेला असणार असा अंदाज बांधला..

शैला त्याला स्वतःला मारण्याबद्दल सांगत होती..

आय एम टेलिंग यु करण .. ती बाई ठार वेडी आहे.. तिच्या नादी लागू नको ..

“तू बघितलंस त्या माणसाला?”, करणने मोहीतला मध्येच थांबवत विचारले

“हो बघितले.. काळाभिन्न होता तो, शरीर कमावलेले होते एखाद्या बॉडीबिल्डर सारखे. मानेपर्यंत आलेल्या केसांचा छोटा पोनी बांधला होता.”, मोहित आठवून त्याचे वर्णन करत होता..

“ओके, मग पुढे?”
“मग त्यांनी तळघराचे दार लावून टाकले आणि बाहेरून कडी लावली. बहुदा ती व्यक्ती आता आत येणार नव्हती..”

माझी सॉल्लिड फाटली होती.

मी मागे वळलो आणि सावकाश सावकाश अंदाज घेत पुढे जात राहिलो आणि शेवटी मला बाहेर पडायचा तो मार्ग सापडला.

“बाहेर कुठे निघाला तो तळघरातला रस्ता?”
“साधारण तो जो पूल आहे ना त्याच्या पुढे झाडांमध्ये एका ड्रेनेज पाईप लाईनला तो रस्ता मिळतो तिथून बाहेर निघालो. बाहेर आल्यावर आपल्या पंटर लोकांना फोन केला. मिट्ट काळोख होता बाहेर. गुडघा, पाठ सगळं ठणकत होते. डास, जखमेवर माश्या बसून अजून वाट लागली होती. एकदा वाटलं जावं पळून इथून कुणाच्या फंदात न पडता. पण साला तुझ्यासाठी जीव अडला. त्या दिवशी तू मध्ये पडला नसतास तर शैलाने नक्की ठोकले असते मला. शिवाय तू इशिताचा फ्रेंड. ती कधी बोलली नाही मला, पण तिला तू आवडत होतास हे नक्की.. “

काही क्षण शांतते गेले..

“पंटर लोक कार घेऊन न्यायला आले.. एकाला तिथेच फार्म-हाउसपाशी थांबवला .. आणि दुसऱ्याल पिटाळलं पेट्रोल पंपावर.. तुझ्या मागे.. मी दवाखान्यात होतो तेंव्हा त्याने फोनवरून तिकडे झालेला राडा कळवला.

मला असे वाटत होते कि तू ती कॅश घेउन फार्म-हाऊसवर आलास की तो काळ्या तुला पण ठोकणार.. म्हणून मी लगेच पोलिसांना फार्म-हाउसची टीप दिली. नशिबाने कारच्या डिक्कीत काही फेक करंसी पडली होती, तीच घेऊन तुझ्या नावाने एकाला पाठवला स्टेशन वर..

पोलीस फार्म-हाउसवर पोहोचले, पण तो काळ्या साला आधीच सटकला होता.. किंवा तळघरात तरी लपून बसला होता.”

“फेक करंसी? पण पोलिसांना कळेलच कि. माझ्या मागे येतील कि ते मग..”
“डोन्ट वरी . जशी ती बॅग पोलीस स्टेशनला पोहोचली, तशीच ती गायब पण झालीय. बसलेत सगळे मामू लोक शोधाशोध करत आणि एकमेकांवर आरोप करत..” हसत हसत मोहीत म्हणाला

करणला मोहितचे किती आणि कसे आभार मानावेत हेच लक्षात येत नव्हते. कोण जाणे, कदाचित मोहीतला जे वाटले ते खरे पण असू शकत होते. पेट्रोल-पंपावरून परत आल्यावर तो जो कोणी होता त्याने करणला पण मारून टाकले असते.

“मोहीत .. तू अजून काय सांगू शकशील त्या तळघरातल्या माणसाबद्दल?”
“सॉरी बॉस .. अधिक काहीच माहित नाही. तळघरातल्या अंधारात त्याच्याबद्दल काहीच कळत नव्ह्ते. जे काही २-४ मिनिटं तो मला दिसला तेव्हढच..”
“नो वरी .. तुला नसली तरी शैलाला नक्कीच त्याची माहिती असणार.. “, करणने भिंतीवरच्या घड्याळात नजर टाकली ४.३० वाजले होते. करणकडे अजून दोन तास होते.

“चल मला निघायला हवं.. अपोलो हॉस्पिटल.. शैलाला भेटायला हवे. “
“अपोलो हॉस्पिटल? तिथे जाऊन काय करणार, शैला नाहीए तिथे.. तिला तीच्या घरी हलवलंय.. “
“घरी? कुणी? आणि का? ती तर सिरीयस कंडिशन मध्ये आहे ना?”
“बरोबर.. पण ह्या श्रीमंत लोकांना काय अवघड आहे? कसली कसली यंत्र तिच्या घरी न्हेलीत, शिवाय २४ तास नर्स, डॉक्टर आहे… दारात ऍम्ब्युलन्स उभी आहे इमर्जन्सी साठी.. “
“पण घरी का?”
“संदीपने हलवलंय तिला घरी.. अपोलो हॉस्पिटल मध्ये म्हणे तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. घरी सेक्युरिटी दिलीय, सर्व व्यवथा चोख आहे.. “
“संदीप?? पण त्याला काय घेणं शैलाशी?”
“ते आता फक्त संदीपचा जाणो.. “, मोहित हात हवेत उडवत म्हणाला

“तसंही तू शैलाला भेटून काय उपयोग, तिची मेमरी गेली ना म्हणे?”, मोहित पुढे म्हणाला
“काय माहित.. मला तर तिचं सगळंच नाटकी वाटतं.. आणि तू म्हणतोस तसं तो काळ्या आणि शैला एकमेकांना ओळखत होते.. शिवाय शैलानेच त्याला तिला मारायला सांगितले होते.. मला तर आता खात्रीच आहे कि हे सगळं नाटक आहे.. “
“पटतंय मला, पण ह्याची खात्री कशी करणार? शिवाय तू दवाखान्यातून उघड तिच्या घरी तर जाऊ शकत नाहीस, निदान उद्याचा दिवस तुला डिस्चार्ज मिळे पर्यंत तरी..

“बरोबर. मी नाही जाऊ शकत पण.. “, मोहितकडे हसून बघत करण म्हणाला…
“नो.. नाही.. नेव्हर.. आपलं कर्ज इथे उतरलं आहे.. तुला शक्य तेव्हढी मदत केली.. आता तू तुझ्या मार्गे, मी माझ्या.. तुला आधीच सांगितले होते.. परत सांगतोय.. तू ह्या भानगडीत पडू नकोस, हे तुझे साडे चार लाख.. उद्या डिस्चार्ज मिळाला की इथून बाहेर पड. निघून जा इथून.. “, मोहीत खुर्चीतून उठत म्हणाला
“येस.. तुझे उपकार आहेतच माझ्यावर पण प्लिज.. हे शेवटच काम समज .. प्लिज.. “
“नाही करण .. मला नाही पडायचंय ह्याच्यात.. मला माझा गुडघा ठीक करायचाय आणि इथून सटकायचंय.. उगाच भरीस नको पाडूस मला.. “
“जिने इशिताला मारलं, तिला इतक्या सहज सोडून द्यायचं मोहित?”, अचानक गंभीर होत करण म्हणाला

इशिताचे नाव ऐकताच मोहीत स्तब्ध झाला.. “आपल्या धंद्यात असे इमोशनल होऊन चालत नाही करण .. पण ठीके.. हे लास्ट.. बोल काय करू शकतो?”
“उद्या शैलाच्या घरी जा.. “
“इतकं सोपं वाटलं तुला? तुला आधीच सांगितले बाहेर सेक्युरिटी आहे.. “
“सोपं असतं तर कुणालाही सांगितले असते मी.. मला माहिती आहे तू करू शकशील.. फक्त एकदा तिच्या समोर जा.. बघ ती तुला ओळखतीय का.. त्यावरूनच कळेल हे मेमरी लॉस खरंच आहे का नाटक.. हे नाटक असेल तर बाकीचं माझ्यावर सोड.. तू तुझ्या मार्गे, मी माझ्या मार्गे.. “

करणने शेख-हॅंड्ससाठी हात पुढे केला..

मोहीतने थोडा विचार केला आणि करणशी हातमिळवणी करत म्हणाला.. “डन ..!!!”

 

दुसरा दिवस करणसाठी संयम बाळगण्यातच गेला. मोहीत गेला असेल का शैलाच्या बंगल्यावर, त्याची भेट झाली असेल का? का गेटवरुनच परत पाठवले असेल? शैला खरंच आजारी असेल का हे सगळे एक नाटक असेल?

एक ना दोन, अनेक प्रश्नांनी करणच्या डोक्यात घर केले होते.

मोहीतने करणला भेटायला हॉस्पिटलवर येण्यापेक्षा किंवा फोनवर बोलण्यापेक्षा, संध्याकाळी करणला डिस्चार्ज मिळाल्यावर रात्री उशिरा इथेच करणच्या ऑफिसवर भेटायचे ठरले होते. त्यानुसार डिस्चार्ज मिळताच करण तडक ऑफिसवर गेला. रात्री १२-१ पर्यंत तरी मोहीत येणार नव्हता. तेव्हढ्या वेळात त्याने सुरुवातीपासून जे काही घडलं ते सगळं खरं खरं संदीपच्या एका कॅसेट मध्ये रेकॉर्ड करुन ठेवले. अर्थात त्यात त्याने मोहीतने तळघरातून पाहिलेला तो माणूस, शैलाशी त्याची असलेली ओळख वगैरे वृतांत वगळला होता.

मोहितशी बोलल्यावर आणि शैलाबद्दल कळल्यावरच संदीपला सगळं खरं सांगायचं का दुसरं काही हे ठरवून तो दुसरी कॅसेटही रेकॉर्ड करणार होता आणि मग त्याचप्रमाणे दोन पैकी एक कॅसेट संदीपला देणार होता.

साधारण रात्री १२.३० ला मोहीत करणच्या ऑफिसवर आला.

“बोल काय झालं? भेट झाली? कसा गेलास आतमध्ये? कशी आहे शैला?”, मोहीत खुर्चीवर बसायच्या आधीच करणने प्रश्नांचा भडीमार चालू केला

“भेट झाली.. “, मोहीत खुर्चीत बसत म्हणाला
“आत कसा गेलास.. ?”
“सोप्प होतं, अपोलोमधून आलोय सांगितले, शैला मॅडमसाठी लावलेल्या एका मेडीकल इंस्ट्रुमेंट्सच्या बॅटरी बदलायच्या आहेत म्हणल्यावर सोडले.. “
“सही… शैला बोलली काही? तिने ओळखले तुला?”
“एक नंबरची डामरट बाई आहे ती.. मी गेलो तेंव्हा जागीच होती.. क्षणभर माझ्याकडे बघितले आणि मग दुसरीकडे नजर वळवली. चेहऱ्यावर जराही ओळखीचे भाव नव्हते.”, मोहीत
“ओह.. म्हणजे संदीपकडून ऐकले ते खरं आहे तर? खरंच तिचा मेमरी लॉस झालाय म्हणायचं.. “
“नाही.. ते सगळं नाटकच आहे..”
“कश्यावरुन?”
“तिने चेहऱ्यावरून जरी नसले दाखवले तरी शेजारची मेडिकल इंस्ट्रुमेंट्स खोटं बोलणार नाहीत. ज्या क्षणी तिने मला बघितले त्या क्षणी त्या मॉनिटरवर तिचे हार्ट-बिट्स वाढल्याचे स्पाईक्स दिसले.. पल्स का काय ते.. भले काही सेकंद असेल पण तिने मला ओळखले होते ह्यात तिळमात्र शंका नाही.. “, मोहीत स्वतःच्या हुशारीवर खुश होत म्हणाला

करण खुर्चीतून उठला आणि त्याने रेकॉर्डर मधली ती कॅसेट काढून मोहीतला दिली.. “ह्यात जे काय घडलं, जसं घडलं, सगळं जसच्या तसं रेकॉर्डेड आहे.. उद्या मला काही झालंच तर ही रेकॉर्ड आणि तळघरातला तुझा अनुभव कसंही करुन विक्रमपाशी पोहोचव “

“ए बाबा.. मला नको ह्यात अजून ओढूस .. हे शेवटची मदत मला म्हणाला होतास, म्हणून आणि इशितासाठी म्हणून केली.. आता तू तुझ्या मार्गे आणि मी माझ्या.. “

“नक्कीच.. पण हि कॅसेट मला माझ्याकडे नकोय.. ती सुरक्षित रहायला हवी..
तू म्हणाला तसं ही शैला दिसती तशी नाहीए. ह्यात नक्कीच काहीतरी गडबड आहे. शेखरचा मृत्यू जरी हार्टफेलने झाला असेल तरी शैलाकडून घडलेले ते कृत्य एक अपघात होता असे वाटत नाहीए, तिने ते कृत्य त्याला जाणून-बुजून ठार मारण्यासाठीच केले असणार… तो काळ्या .. त्याचा शोध लावायला हवा.. पण तो मुख्य सूत्रधार असेल असे वाटत नाही. शैला आणि तो काळ्या बरोबर ह्यात अजून कोण तरी नक्कीच सामील आहे.. आणि तेच मला शोधून काढायचं आहे.. “

“ऑल द बेस्ट, जे करशील ते जपून कर .. “, असं म्हणून मोहीतने करण कडून ती कॅसेट घेतली आणि तो निघून गेला….

[ क्रमशः ]