डबल-क्रॉस (भाग ८) पासून पुढे >>
दुसऱ्या दिवसाची सुरुवात कुंद वातावरणानेच झाली. पाऊस थांबला असला तरी आकाश काळ्या ढगांनी गच्च भरलेले होते. वारा पडला होता त्यामुळे हवेत गारठा असूनही अस्वस्थ व्हायला होतं होते.
करणला जाग आली तेंव्हा काही क्षण आपण कोठे आहोत हेच त्याच्या लक्षात येईना. समोरच चित्र सगळं अंधुक अंधुक दिसत होते. त्याने मोठ्या कष्टाने डोळे उघडले आणि तो बिछान्यावरच पडून राहिला. हळू हळू कालच्या रात्रीच्या घटना त्याच्या डोळ्यासमोर तरळून गेल्या. काही क्षण त्याला वाटले ते सर्व एक भयाण स्वप्नच होते.. एक नाईटमेअर..
तो धडपडत खोलीतून बाहेर आला आणि तडक शेखरच्या खोलीत शिरला. समोरच्या बेडवर शेखर अर्थातच नव्हता. खोलीत एका कोपऱ्यात रक्ताळलेल्या कपड्यांचा, बेडशिट्सचा ढीग पडला होता. जमीन अजूनही काहीशी ओलसर लागत होती.
करण शून्यात नजर लावून खोलीच्या दरवाज्यात उभा होता.
“स्वप्न नव्हतं ते करण”, मागून शैलाचा आवाज आला तसा करण भानावर आला
“मलाही असंच वाटलं होतं, ते सगळं एक स्वप्न होतं. कदाचित शेखर बाहेर त्या सोफ्यावर बसला असेल, किंवा बाहेर गार्डनमध्ये वॉक घेत असेल. पण दुर्दैवाने काल जे काही घडलं ते सगळं खरंच होतं..”
शैलाने गडद निळ्या रंगाचा पलाझो आणि वर पिवळ्या रंगाचा, पांढऱ्या फुलांची नक्षी असलेला टॅंक टॉप घातला होता. अनपेक्षितपणे शैला फ्रेश आणि अधिकच सुंदर दिसत होती.
“कॉफी घेणार?”, शैलाने विचारले
“हम्म, चालेल..”, असं म्हणून करणने शेखरच्या खोलीचं दार लावून घेतले आणि तो बाहेरच्या हॉल मध्ये येऊन बसला
थोड्याच वेळात शैला कॉफीचे कप घेऊन बाहेर आली.
कॉफीचे दोन घोट घश्यात गेल्यावर करणला थोडी तरतरी आली.
काल संध्याकाळपासून, खरं तर काल दुपार पासूनच दोघांनीही काहीच खाल्ले नव्हते आणि त्यामुळे आता पोटात भुकेचा डोंब उसळला होता.
“काही खायला आहे?”, कॉफी संपवून करण म्हणाला
“प्लिज मला आत्ता किचन मध्ये जायला सांगू नकोस, डोकं खूप ठणकतंय माझं”, जमिनीवरच्या बिनबॅग वर पाय गुडघ्यात दुमडून जवळ घेऊन बसत शैला म्हणाली
“डोन्ट वरी, मी बघतो काहीतरी”, असं म्हणून करण किचनमध्ये शिरला. फ्रिजमध्ये काही पॅक केलेली सँडविचेस, चिप्सची दोन पाकीट आणि काही बॉइल्ड एग्स होते ते घेऊन तो बाहेर आला
शैलाने एक सॅन्डविच, थोडे चिप्स कसे बसे खाल्ले आणि तिने प्लेट बाजूला ठेवून दिली. शेजारच्याच टेबलावर तिचा आणि शेखरचा एक जुन्या काळचा फोटो फ्रेम मध्ये ठेवलेला होता तो उचलून तिने छातीशी धरला
“असं नाहीए कि आजकाल आमचे संबंध फार सलोख्याचे होते, किंवा आमचं एकमेकांवर जीवापाड प्रेम उरले होते. पण पहिले काही वर्ष आम्ही खूप छान एकत्र घालवली होती. आणि त्या आठवणी कायमच माझ्याबरोबर राहतील…”, शैला म्हणाली
“शेखरवर अनेक मुली फिदा होत्या. आधीच हँडसम आणि त्यात बुक्स हिट झाल्यावर प्रसिद्धी पण मिळाली म्हणल्यावर त्याचे लेडीज फॅन फॉलोविंग खूप होते. पण असे असतांनाही आम्ही दोघे जवळ आलो. त्यानं त्या सगळ्यांमधून मला निवडले ह्याचा मला खूप जास्ती आनंद होता.
ते दिवस आमचे खूपच छान होते. पण नंतर जणु कुणाचीतरी दृष्ट लागली आणि एक एक करत आमच्यात दुरावा वाढतच गेला.”, शैला बोलत होती
करणंच मात्र तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. त्याच्याकडे असल्या नॉन-सेन्सला वेळ नव्हता. त्याने प्लेटमधली सॅन्डविच संपवली, मूठभर चिप्स तोंडात टाकली, एक बॉइल्ड एग घेतले आणि तो तिथून उठला व दार उघडून बाहेर आला.
बाहेर कुठल्याही क्षणी पाऊस येईल अशीच परिस्थिती होती.
चपला न घालताच तो चालत नदीपाशी गेला. पायाला थंडगार चिखलाचा स्पर्श सुखावत होता. नदीचे गारठलेले पाणी त्यानं सपासप तोंडावर मारले तसं त्याला थोडं फ्रेश वाटलं. तेथीलच एका दगडावर पाण्यात पाय सोडून तो बसला.
आदल्याच दिवशीच्या सकाळी तो आणि शेखर समोरच्या दगडावर गप्पा मारत बसले होते
“जादू आहे करण ह्या जागेत.. जादू“, शेखर त्याला म्हणाला होता, “इथं बसलं ना कि मेंदु कसा फटाफट चालायला लागतो”
करणला आज ह्याच जादूची गरज होती. त्याचा थिजलेला मेंदु जितका भराभर काम करायला लागेल तितकं चांगलं होतं.
त्याने दिवसभर करायच्या कामांची यादी करायला सुरुवात केली
१. सगळ्यात पाहिलं.. संदीपला फोन करुन सर्व काही ठीक-ठाक असल्याचा अपडेट द्यायचा
२. शेखरच्या ईमेल मधून झेड चैनलला एक ईमेल करुन काम सुरु झाले असल्याचे सूचित करायचे.
३. शेखरची खोली नीट नजरेखालून घालायची. कुठेही रक्ताचे डाग असतील तर ते नष्ट करायचे
४. काल रात्री खरंच कोणी घरात होतं का ह्याचा तपास करायचा. बाहेरचा दरवाजा आतून बंद होता. म्हणजे बाहेरुन तर कोणी आले नव्हते. मग घरात यायला दुसरा कुठला रस्ता आहे का आणि असेल तर तिकडून कोणी आलं होतं का हे तपासायचं
५. शेखरची बॉडी फ्रिजर मध्ये असली तरीही ती कायमचीच तेथे फ्रेश राहू शकणार नाही हे तो जाणून होता. एक-दोन दिवसांतच शेखरचा मृत्यू झालाय हे जाहीर करणे महत्वाचे होते. त्यानंतर कोणताही गल्लीतला डॉक्टर ही बॉडी खूप आधीची आहे हे सांगू शकला असता
६. शेखरचा मृत्यू अपघाती दाखवणं शक्यच नव्हतं. शरीरावर इतके वार शेखरचा मृत्यू एक मर्डर आहे हे स्पष्ट करत होता. मग त्यासाठी तशी एखादी सिच्युएशन निर्माण करणे गरजेचे होते..
७. आणि जर ते शक्य नाही झाले तर सरळ सर्व पैश्यावर पाणी सोडून तेथून पोबारा करणे हा एकमेव मार्ग होता. शेखरच्या मृत्यूनंतर तेथील पुरावे नष्ट करून त्याने आपल्या निर्दोषपणाचे सर्व रस्ते नष्ट करून टाकले होते. त्यामुळे तोही आता ‘ऍक्सेसरी टु मर्डर’ होताच. शैला आली तर शैला बरोबर, नाहीतर तिच्याशिवाय तेथून पळ काढणे हा शेवटचा मार्ग होता. अर्थात हा पर्याय करणने अगदीच शेवटचा ठेवला होता. शैला आणि आता शैलाची झालेली हि सर्व संपत्ती तो मिळवणारच ह्याच विचाराचा होता.
एकदा कामांची आखणी झाली कि मग करण तेथुन उठला. प्रत्येक क्षण महत्वाचा होता. आपला फोन आणायला तो आतमध्ये गेला. शैला अजूनही शेखरचा फोटो घेऊन बिन-बॅगवर बसुन होती. कुठेतरी स्वतःच्याच विचारात बुडलेल्या शैलाने करणकडे बघितलेही नाही. करणनेही तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या खोलीतून मोबाईल घेऊन तो बाहेर पडला.
घड्याळात सकाळचे ९.३० वाजून गेले होते. करण काही अंतर चालून गेला आणि मग त्याने संदीपला फोन लावला
“बोल करण, मी तुझ्याच फोनची वाट बघत होतो. एव्हरीथिंग ऑलराईट?”
“येस्स बॉस, एव्हरीथिंग इज ऑलराईट”, आपला आवाज नॉर्मल ठेवत करण म्हणाला. मग त्याने काल दुपारपासून आत्तापर्यंतचे ५ मिनिटांत काल्पनिक ब्रिफींग केले आणि परत दुपारनंतर फोन करतो म्हणून निरोप घेतला
“बर करण, मी दुपारी शेखरना फोन करेन, माझा फोन येईल म्हणून त्यांना आधीच सांगून ठेव”, करण फोन ठेवत असतानाच संदीप म्हणाला
करण अचानक चपापला.. “शेखरला फोन? कशाला?”
“अरे त्यांना आपल्या इन्शोरंन्स कंपनीचा फीडबॅक फॉर्म पाठवायचा आहे.. त्यांच्याकडून टेस्टिमोनी आणि रेटिंग्स मिळाले तर आपल्याला हवंय ना ते..”
शेखर ह्या जगातच नाही तर संदीप कुठून बोलणार त्याच्याशी. बिकट परिस्थिती होती, कसंही करून वेळ निभावून न्हेणे महत्वाचे होते.
संदीपचा फोन येईल तेंव्हा एक वेळ शेखर बाथरुममध्ये आहेत वगैरे सांगता येईल.. पण किती वेळा? संदीप परत फोन करेलच.
अचानक करणला एक कल्पना सुचली
“किती वाजता फोन कराल तेवढं सांगा म्हणजे मी शेखरना बाहेर येऊन थांबायला सांगतो..”, करण म्हणाला
“बाहेर? का?”
“घरात थोडा फोनच्या रेंजचा प्रॉब्लेम आहे, फोन लागत नाहीत. इथे बाहेर यावे लागते. थोडं आड बाजूला घर आहे ना.. म्हणून..”
“ओह.. अच्छा मी साधारण १२च्या सुमारास करेन”
“हरकत नाही. कालपासून पाऊस खूपच लागून राहिलाय. दुपारी पाऊस नसेल तर ते येऊन थांबतील.. नाहीच तर तसेही ते मेल्स चेक करतातच. तुम्ही इमेल पाठवून ठेवा”
“चालेल, पण मी फोन करीनच”, असं म्हणून संदीपने फोन ठेवून दिला.
निदान आजच्या दिवसापुरतं तरी संदीपला टोलवण्यात करण यशस्वी ठरला होता. थोड्यावेळात तीनही फोन ‘फ्लाईट-मोड’ ला टाकून ठेवले कि संदीपला फोन ‘अनरिचेबल’ लागला असता. ‘झेड चॅनल’ बरोबरच संदीपच्या ईमेललाही शेखरच्या ईमेल अकांउंट मधून उत्तर देऊन टाकले कि काम झाले होते.
करण आतमध्ये गेला तेंव्हा शैला बाहेर हॉल मध्ये नव्हती. शेखरचा लॅपटॉप बाहेरच लोळत पडला होता. करणने तो चालू केला. चार्जर नसल्याने बॅटरी अगदी शेवटच्या काही पर्सेंटेज पूर्ती शिल्लक होती. करणने ब्राउझर ओपन केला आणि पटापट हिस्टरी चेक केली. नशिबाने पासवर्ड सेव्हड असल्याने ईमेल-अकाऊंटच्या हिस्टरीवर क्लिक केल्यावर ईमेल्स उघडल्या गेल्या.
करणने जुजबी शब्दात ‘झेड चॅनल’ ला मेल करून टाकली तोवर संदीपची मेल इनबॉक्स मध्ये येऊन धडकली होती.
करणने शक्य तितक्या पटापट तो फॉर्म भरला, पूर्ण सॅटीस्फाईडचे फाईव्ह स्टार रेटिंग दिले आणि लॅपटॉप बंद करून टाकला.
लैपटॉप जागेवर ठेवून तो शेखरच्या खोलीकडे निघाला. शैलाचा तिच्या खोलीतून गाणं गुणगुण्याचा आवाज येत होता. करण प्रथम तिच्या खोलीत गेला.
“शैला, नीट आठव आणि मला सांग ह्या घरात यायला अजुन कुठला रस्ता आहे का?”
“मला कसं माहीत असणार, मी रोज येते का इथं राहायला? शेखरने हे घर बांधलं होतं, असेल कुठला रस्ता तर तो त्यालाच माहीत”, शैलाने कॅज्युअली उत्तर दिले
“शैला मुर्खासारखी उत्तर देऊ नकोस. लहान मुलांचा खेळ नाही चाललाय इथे. एक छोटीशी चुक आणि आपण दोघेही उरलेल्या आयुष्यात तुरुंगात असु”
“माझ्या माहितीत तरी फक्त एकच एंट्रन्स आहे, बाहेरुन..”, शैला
“मी सगळी दारं, खिडक्या तपासल्या, सगळ्या आतूनच बंद आहेत, कुठूनही तोडफोड किंवा जबरदस्तीने आतमध्ये घुसू शकेल अशी खूणही दिसत नाहीए”, करण
“अम्म, एक तळघर आहे खाली, पण त्यालासुध्दा बाहेरुन रस्ता नाहीए”, शैला
“तळघर?”, करण एकदम सावध झाला, “कुठेय दाखव”
शैला काही न बोलता खोलीतून हॉलमध्ये आली. हॉलमध्ये एक मोठ्ठी विंग चेअर होती ती बाजूला सरकवली आणि जमिनीला लागून असलेली एक कडी नजरेस पडली.
“हे दार आहे तळघरात जायला, पण ह्याला सुद्धा कडी आहे..” शैला दाराकडे बोट दाखवत म्हणाली
शेखरच्या मनात असलेली अंधुकशी आशा, कि बाहेरूनच कोणीतरी येऊन शेखरच खून केला, ती हि आता नाहीशी झाली होती.
शैला मात्र एव्हाना करणकडे रोखुन बघत होती.
“काय झालं? असं का बघतीयेस माझ्याकडे?”, करणने वैतागून शैलाला विचारले
“करण , शेखरला तुच तर मारलं नाहीस ना?”, शैला
“काय डोकं बिकं फिरलय का तुझं? मी कश्याला मारु शेखरला?”
“माझ्यासाठी.. पैश्यासाठी.. काल दुपारी मार्केटमध्ये तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं तू कसला विचार करत होतास ते.. ”
“ओके, गो अहेड, प्रुव्ह इट, चल पोलिसांना फोन करुच आपण”, करण फोनकडे जात म्हणाला
“ओके ओके.. आय एम सॉरी”, शैला
“शैला, हे बघ, आपण आता अश्या परिस्थतीत आहोत कि तुला माझ्यावर आणि मला तुझ्यावर विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाहीए. आपल्याला एक टीम म्हणूनच काम करायचंय हे कायम डोक्यात ठेव. एकही चुक होता काम नये. राहील लक्षात?”
“हम्म”, शैला
“बरं, चल बघु काय आहे खाली त्या तळघरात..”, असं म्हणून करणने दाराची कडी उघडली, तेवढ्यात शैलाचा फोन वाजला ..
“फॉर गॉड्स सेक शैला, पुट युअर फोन ऑन फ्लाईट-मोड”, करण ओरडला, पण नंतर त्याच्या लक्षात आलं कि त्याने शैलाला याबाबद्दल काहीच सांगितले नव्हते. इतकंच काय, पण त्याने त्याचा स्वतःचा फोन सुद्धा त्याने अजून फ्लाईट-मोडला टाकलेला नव्हता.
“कुणाचा आहे?”
“माझ्या मैत्रिणीचा, क्लब पार्टनर आहे”
“ओके, नॉर्मल बोल, कसला पण संशय येता कामा नये, मध्येच शेखरला कॉफी ठेवलीय असं ओरडून सांग ओके?”
“हम्म”, असं म्हणून शैलाने फोन उचलला
शैला फोनवर बोलत होती तोवर करणने पटकन आपला फोन फ्लाईट-मोडला सेट केला.
मध्येच शैलाने करणने सांगितल्याप्रमाणे मुद्दाम शेखरला उद्देशुन कॉफी टेबलावर ठेवलीय, लॅपटॉप चार्जींगला लाव वगैरे सूचना दिल्या. थोड्याफार गप्पा मारून शैलाने फोन ठेवून दिला.
“हे काय होते मागाचचे करण? कशाला माझ्यावर ओरडलास? आणि फ्लाईट-मोडचा काय प्रकार आहे?”, शैला कमरेवर हात ठेवुन करण समोर उभी राहीली
“सांगतो, सगळं सांगतो, आधी तो फोन फ्लाईट-मोडला कर”, असं म्हणून करणने शैलाचा फोन काढून घेतला आणि फ्लाईट-मोड चालु केला.
आजूबाजूला बघताना करणचे लक्ष हॉलमधल्या लँडलाईन फोन कडे गेलं.
“ह्याचा नंबर कुणाकुणाकडे आहे? संदीपकडे?”, करणने त्या फोनकडे बोट दाखवत विचारले
“नाही, कुणाकडेच नाही. तो फोन अगदी इमर्जन्सी म्हणून आम्ही ठेवलाय, इथे रेंजचा प्रॉब्लेम आहे ना, सो कधी लागलाच तर म्हणून. पण नंबर कुणाकडेच नाहीए”, शैला
“शुअर?”
“डेड शुअर”
“गुड देन..”
“अरे, पण अश्याने आपल्याला कुणाचाच फोन येणार नाही”, शैला गोंधळुन म्हणाली
“आय नो..”, असं म्हणुन करणने त्याचं संदीपशी झालेलं संभाषण सांगितले
“ओह, आय सी.. करण वुई हॅव टु ऍक्ट फास्ट. काय विचार केला आहेस तु?”, शैला
“अजुन तरी काही नाही. वन ऍट अ टाइम. सगळ्यात पहिल्यांदा ते कपडे, बेडशीट्स तू बाहेर घेऊन जा.. थोडं लांब आणि जाळून टाक. तोवर मी शेखरची खोली परत चेक करतो. कुठे काही रक्ताचे डाग उरले नाहीत ना नीट तपासायला हवं.”
“ओके”, असं म्हणुन शैला किचनमध्ये गेली. कॅम्पफायरसाठी थोडं केरोसीन किचनमध्ये ठेवलेले होते ते आणि माचीस-बॉक्स घेऊन ती शेखरच्या खोलीत गेली. करणने आपले काम चालु केले होते. शैलाने कोपऱ्यातील तो कपड्यांचा ढीग उचलला आणि घराबाहेर पडली.
तासाभरानंतर करण आणि शैला दम खात हॉलमध्ये बसले होते.
“ऑल डन?”, करणने शैलाला विचारले
“हम्म, तु?”
“येस, ऑल क्लिअर. बर, मी तुला सांगायचं विसरलो.. तो सगळा ढीग पूर्ण जळून झाल्यावर त्याची राख…”
“टेकन केअर बॉस, सगळी राख नदीत फेकून दिलीय”, शैला हसत म्हणाली
“गुड, व्हेरी गुड”
“बरं.. आता?”
करणने घड्याळात नजर टाकली. १२ वाजत आले होते.
“लेट्स इट. तु आंघोळ उरकून घे, मी जेवायचं बघतो काहीतरी. एग्स आहेत, ब्रेड आहे. ऑम्लेट करतो..”
“आय एम फाईन, फ्रिज मध्ये थोड्या पेस्ट्रीजपण आहेत”, असं म्हणून शैला आंघोळीला निघून गेली
शैला आंघोळीला गेलीय ह्याची खात्री झाल्यावर करण उठला आणि पहिल्यांदा किचन मधल्या सगळ्या धारदार वस्तू, जसे चाकू, कात्र्या, चिकन कट करायचा धारधार पातं, बर्फ फोडायचा स्क्रू-ड्रायव्हर वगैरे, उचलल्या आणि कपाटातील एका ड्रॉवर मध्ये टाकून त्याला कुलूप लावून टाकले. शेखरच्या बाबतीत होऊ शकते तर त्याच्या बाबतीत का नाही? शेखरचा खून शैलाच्याच हातून झाला आहे ह्याची त्याला आता खात्री पटली होती. घरात जबरदस्तीने कोणी घुसल्याची कुठलीही खूण नव्हती. सर्व दार, खिडक्या आतूनच बंद होत्या. फक्त एकच गोष्ट त्याला सतावत होती ती म्हणजे शेखरच थंडगार पडलेलं शरीर.
अर्थात त्याचा विचार करायला नंतर वेळ होता, आत्ता वेळ होती ती शेखरचा मृत्यू जाहीर करायची आणि त्यासाठी परफेक्ट प्लॅन असणं जरुरी होतं. एक छोटीशी चुक आणि होत्याचं नव्हतं होणार होतं.
करणने गॅस चालू केला आणि हातातले अंड फोडून पॅन मध्ये टाकलं
बाहेर जवळजवळ काळोखच पसरला होता. करणची २-३ ऑम्लेट्स होईपर्यंत जोरदार पाऊस सुरु पण झाला.
करण मगाशी शैलाला म्हणाला खरं कि एकमेकांवर विश्वास असणं गरजेचं आहे, एकत्र टीम म्हणुन काम करु वगैरे, पण समहाऊ करणचाच शैलावरचा विश्वास कमी झाला होता. शेखरच्या मृत्युनंतर अचानकच करणला तिच्या वागण्यात बदल जाणवला होता. करणबद्दल तिच्या डोळ्यात असलेली ती चमक अचानकच दिसेनाशी झाली होती.
“शेखरचा मृत्यू खरोखरच एक अपघात होता की शैलाने जाणूनबुजून..”, करणच्या मनात विचार तरळून गेला
ही बाई जरा डेंजरच आहे, प्रत्येक पाऊल उचलताना नीट काळजी घेऊनच वागावं लागणार आहे हे करणने त्याचं वेळी मनोमन ठरवून टाकले.
करणने शैलाचा विचार मनातून काढून टाकला आणि पुन्हा शेखरच्या मृत्यूचा विचार सुरु केला.
काहीही झालं तरी शेखरचा मृत्यू झाला तेंव्हा तिथे आपण स्वतः हजर होतो हे दाखवणं गरजेचं होतं. शेखरच्या इन्शोरंन्स पॉलिसीमध्ये शैला ५०% भागीदार असल्याने आणि शेखरच्या मृत्यूचा फक्त आणि फक्त तिलाच फायदा होत असल्याने, संशय पहिला तिच्यावरच गेला असता. शेखरच्या मृत्यूच्या वेळी शैला कुठेतरी दुर होती हे सिध्द होणं गरजेचं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे शेखरची बॉडी मिळता कामा नये, नाहीतर पोस्टमोर्टमध्ये मृत्यू कसा झाला हे प्रकाशात आलेच असते. सो, त्या दृष्टीनेसुद्धा विचार होणे गरजेचे होते.
“अपघात..”, सगळ्यात पहिला विचार करणच्या डोक्यात आला
“समजा तो आणि शेखर मासे पकडायला बोटीने नदीत गेले.. शेखरने खूप प्यायली होती. त्याने करणला न जुमानता लॉंच आपल्या ताब्यात घेतली. वेगाने चालवताना त्याचा ताबा सुटला. करणने जीव वाचवायला पाण्यात उडी घेतली आणि लॉंच खडकावर आपटली, त्याचा स्फोट झाला आणि शेखर त्यात जळून मृत्यू पावले..”
पहिल्यांदा करणला तो विचार हास्यास्पद आणि फारच फिल्मी वाटला. पण अधिक विचार करता त्याला त्यात काही दोष सुद्धा सापडेनासे झाले.
असा अपघात होणं शक्य आहे.. होऊ शकते. फक्त नदीत असे काही मोठे खडक आहेत का ते बघणं जरुरी होते आणि लॉंचचे अवशेष बघून करणंच बोलणं पटावं अशी परिस्थिती निर्माण करणं आवश्यक होतं.
खाऊन झाल्यावर लॉंचने नदीत एक चक्कर मारुन मोठे खडक तपासून यायचं करणने निश्चित केलं खरं, पण बाहेरचा पाऊस बघुन सध्या तरी ते शक्य होईल असे वाटत नव्हते. पाऊस कमी होईपर्यंत हातावर हात घेऊन बसणं हा एकच पर्याय होता. शिवाय लॉंच किनाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला होती, कारण चार्जर आणायला जाताना करण लॉंच घेऊन गेला होता, येताना मात्र ते कार घेऊन आले होते.
म्हणजे आता परत कारने त्याबाजूला जाऊन लॉंच घेऊन परत येण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यात अजून वेळ जाणार होता. इथे प्रत्येक क्षण महत्वाचा असताना हा अनावश्यक वेळेचा अपव्यय पाहून करण चरफडला.
करणंच जेवणं तयार झालं तोवर शैला आंघोळ करुन आवरुन आली होती.
करणंही पटकन आंघोळ करुन आला आणि मग जेवता जेवता त्याने आपला प्लॅन शैलाला सांगितला.
“ते ठीक आहे करण, पण शेखरला फक्त बेडवरुन त्या फ्रिजमध्ये न्हेताना आपली इतकी वाट लागली होती. आणि तू म्हणतो आहेस त्याला बेडरुममधून बाहेर लॉंच पर्यंत घेऊन जायचं… जमेल का आपल्याला..?”
“जमवायलाच लागेल कसंही करुन. पण ते बघू नंतर, आधी लॉंच इकडे आणणं महत्वाचं. त्यानंतरच मी रेकी करायला नदीत जाऊ शकतो.”
“करण, माझ्या डोक्यात अजून एक भारी कल्पना आलीय.. सांगू?”, शैला
“हम्म, सांग..”
“हे बघ, आपण लॉंच आणायला गावातूनच जाणार बरोबर?”
“येस, बरोबर..”
“मग, आपल्या बरोबर शेखर सुध्दा येईल..”
“शेखर? मला नाही कळलं..”
“सांगते, गावात शेखरचे लांबचे नातेवाईक राहतात. एकटेच असतात ते, बरेच म्हातारे आहेत.. दिसतही नाही त्यांना नीट. इथे आलो आम्ही कि शेखर त्यांना आवर्जून धावती भेट देतो आणि काही पैसे देतो मदत म्हणून.. ”
“बरं मग..”
“मग ह्यावेळी हि तसंच होईल.. फक्त शेखरला दारू थोडी जास्ती झालेली असल्याने तो गाडीतच बसून राहील आणि मी घरी जाऊन पटकन पैसे देऊन येईन..”
“नाही.. मला नाही कळलं अजून..”
“अरे असं काय करतोस.. शेखरच्या ऐवजी खिडकीत तू बसशील, ती टोपी, गॉगल घालून. अंगात शेखरचे दोन-चार कोट घाल एकावर एक.. आणि नुसता खिडकीतून हात कर..”
“काही काय.. एव्हढं कळणार नाही का?”
“तूच बघ बाहेर, किती अंधारलंय. त्यात पाऊस. त्या म्हाताऱ्याला लांबून काय कळणारे. मी सांगते, शेखरने जास्त झालीय, त्यांना उद्या परवा घेऊन येईन घरी परत. त्या थेरड्याला काय पैसे मिळाल्याशी घेणं.. ”
“बरं.. पण त्याने काय होईल?”
“त्याने दोन गोष्टी होतील, एक म्हणजे तो म्हातारा पुरावा आहे कि शेखर आज दुपार पर्यंत जिवंत होता आणि त्याला खूप दारू चढलेली होती. मग तेथून तू लॉंच घेऊन परत ये. समजा तुला हवा तसा खडक मिळालाच तर शेखरचा अपघाती मृत्यू करून टाकू.
पोलिसांना आपण हेच सांगणार कि गावातून घरी येताना तुम्ही दोघे लॉंच ने आलात आणि मी कारने. म्हणजे मी तुमच्या बरोबर नव्हते. शेखरला दारु जास्ती झाली होती ह्याचा तो म्हातारा पुरावा आहेच. त्यात अंधार आणि जोराचा पाऊस, अपघात होऊ शकतो लॉंचचा.. “, शैला आपल्याच कल्पनेवर खुश होतं म्हणाली.
“व्हेरी गुड आयडिया.. पण इतक्या पावसात मासे पकडायला कोण जाईल?”
“हम्म, ओके सो मासे पकडायला नाही गेलात तुम्ही. नुसती लॉंच घेऊन परतत होतात. आपण शेखरला समजावयाचा प्रयत्न केला आत्ता नको लॉंच न्ह्यायला, पण त्याने ऐकलं नाही आपलं.. सिंपल..”
“ठीक आहे, मला एक तासभर वेळ दे, नीट विचार करु देत प्लॅनचा, कुठे काही लूप-होल नाहीये ना नीट बघावं लागेल”
“गो अहेड, मी तोवर शेखरचे कपडे काढून ठेवते.. ”
दोघजणं प्लॅनबद्दल बोलतच होते तोच दारावरची बेल वाजली.
दोघांनीही चमकून एकमेकांकडे बघितले.
करणने शैलाला गप्प राहायची खूण केली, तो दबक्या पावलांनी दरवाज्यापाशी गेला आणि दरवाजाच्या पिप-होल मधून बाहेर पहिले. पण बाहेरच्या काळोखात काहीच कळत नव्हते. फक्त दोन आकृत्या दिसत होत्या. पावसात चिंब भिजल्याने दोघेही कुडकुडत होते.
“कोण आहे?”, शैलाने हलक्या आवाजात विचारलं
करणने माहीत नाही अशी खूण केली.
एव्हाना परत बेल वाजली.
“काय करायचं?”, शैलाने पुन्हा हळू आवाजात विचारलं
करणने हळूच आपल्या पॅन्टच्या खिश्याला हात लावला. त्याच रिव्हॉल्व्हर खिश्यातच होतं.
“नक्की तू किंवा शेखरने कुणाला इकडे बोलावले नव्हते?”
“नाही.. इथे आम्ही कधीच कुणाला बोलावत नाही..”
दरवाज्यावरची बेल पुन्हा वाजली
“शैला तू दार उघड, मी इथे मागे अंधारात लपून बसतो. शक्यतो जे कोण आहे त्याला बाहेरच्या बाहेरच कटवायचा प्रयत्न कर. अगदीच वेळ आली तर मी येईन बाहेर आणि जबरदस्तीने आपण त्यांना घालवून देऊ.. ओके?”, करणने शैलाच्या जवळ जाऊन कुजबुजत विचारले
“ओके..”, असं म्हणून शैला दरवाज्यापाशी गेली आणि तिने दार उघडले. तोवर करण दरवाज्याच्यामागे लपून बसला, त्याचा एक हात रिव्हॉल्व्हरवर तयार होता.
“येस्स?”, शैलाने बाहेरच्या व्यक्तींना विचारले
“सॉरी टु डिस्टर्ब् यु मॅम, पण आमची गाडी तिकडे बाहेर रस्त्यावर बंद पडलीय. फोनला नेटवर्कही नाहीए, फक्त एक फोन करू शकलो तुमच्याकडे लँडलाईन असेल तर.. तर फार उपकार होतील..”, तो माणुस म्हणाला
“पण तुम्हाला इथं बंगला आहे कसं कळालं. मुख्य रस्त्यापासून तर खुप आतमध्ये आहे हे.. “, शैला
“हो बरोबर.. पण त्या वळणावर तुमची पजेरो बंद पडलेली दिसली.. आम्ही आपलं चान्स घ्यावा म्हणून अंदाजानेच आलो इकडे..”, तो माणूस म्हणाला
“तुमच्या मागे कोण आहे?”, शैला
“ओह ह्या.. मॅडम ह्या मॉडेल आहेत, एका जाहिरातीचं शूटिंग होतं इकडे म्हणून आम्ही आलो होतो…”, तो माणूस म्हणाला
“आणि तुम्ही? तुम्ही पण मॉडेल का?”, शैला
“नाही.. मी मॅडमचा बॉडीगार्ड आहे.. प्लिज आपण आत मध्ये येऊन बोलूयात का? मॅडम पण थंडीने कुडकुडल्यात…”
“एक मिनिटं..”, असं म्हणून शैलाने पोर्चमधला दिवा चालू केला आणि समोरचा तो हँडसम तरुण बघून ती जागेवरच खिळली.
गोरापान, कमावलेली शरीरयष्टी, शर्ट भिजल्याने शरीराला चिकटलेला.. त्यामुळे त्याची बॉडी दिसत होती. हसल्यावर गालाला पडणारी खळी शैलाचा श्वास थांबवत होती.
नकळत शैलाला आपल्या हृदयाचे वाढलेले ठोके जाणवू लागले.
तिने त्या मागच्या तरुणीकडे बघितले. साधारण मॉडेल कश्या असतात तशीच ती होती. शैलाने पुन्हा त्या तरुणाकडे आपले लक्ष वेधले.
“हे बघा.. आत्ता माझा नवरा झोपलाय, जरा तब्येत बरी नाहीए त्यांची..”
“डोन्ट वरी मॅडम, मला लक्षात येतंय.. इथे आड बाजूला.. असं अनोळखी व्यक्तींना घरात घेणं तुम्हाला असुरक्षित वाटू शकतं, आम्ही खरंच आर्टिस्ट आहोत.. हे माझं कार्ड”, असं म्हणून त्या व्यक्तीने आपलं कार्ड शैलाच्या हातात दिलं.
कुठल्याश्या मॉडेल-एन्जन्सी आणि सेक्युरिटी फोर्स च ते कार्ड होतं .. कोपऱ्यात ‘मोहित’, असं नाव लिहिलं होतं.
“ही इज सो हॉट अँड यट क्युट.. मोहित.. नाव अगदी शोभतंय”, शैला स्वतःशीच म्हणाली
“मॅडम.. पाहिजे तर मी बाहेर थांबतो.. मॅडम आत येऊन फक्त आमच्या टीमला फोन करतील म्हणजे कोणीतरी मागे येऊन आम्हाला घेऊन जाईल” , मोहित हसत म्हणाला
“नाही, त्याची आवश्यकता नाही, तुम्ही या आत मध्ये, पण फक्त एकच फोन आणि ऑफ यु गो.. ओके?”
“ओके”, असं म्हणून दोघंही आतमध्ये आले…तसा करण पटकन सोफ्यावर जाऊन बसला
शैलाने हॉल मधील बाकीचे दिवे चालू केले आणि करणकडे बोट दाखवत ती त्या दोघांना म्हणाली, “हे माझे मिस्टर…”
करण आजारी असल्याचं भासवत उभा राहिला, त्याने मोहितशी हातमिळवणी केली व मागे उभ्या असलेल्या त्या तरुणीकडे कटाक्ष टाकला आणि तो जागच्या जागी खिळलाच..
त्याच्या समोर.. त्याची गर्लफ्रेंड.. इशिता उभी होती..
[क्रमशः]
Like this:
Like Loading...