Category Archives: Uncategorized

इश्क –


“राधा….”.. कबीर जवळ जवळ किंचाळतच ओरडला.. “हाऊ कॅन यु डू धिस…”
“हे बघ कबिर.. माझ्या आयुष्यात मी कसं वागायचं.. काय करायचं हे तु सांगायची खरंच गरज नाही..”, काहीसं चिडुन राधा म्हणाली..
“पण.. पण तु म्हणाली होतीस.. रिलेशन्स.. लग्न.. हे तुझ्या तत्वात बसत नाही.. मग…”
“कबिर.. कमॉन.. ते फक्त मी तुला शांत करण्यासाठी.. तुझ्या मनातुन माझा विचार काढुन टाकण्यासाठी म्हणाले होते…
“म्हणजे.. तु माझ्याशी खोटं बोललीस??” कबिर संतापाने थरथरत होता..

“कबिर.. खरंच तु अजुनही लहान आहेस अरे.. आयुष्याचा अर्थ अजुन तुला समजलाच नाहीए.. अरे ह्यातच खरी आयुष्याची मज्जा आहे… असं प्लॅन करुन जगण्यात काय अर्थ आहे.. आयुष्य जसं आलं तसं मी जगते.. त्या क्षणाला जे वाटलं.. जे पटलं ते मी करते.. इतके दिवस.. तु माझ्या टच मध्ये नसलास तरीही रोहन होता.. मी माझे प्रत्येक विचार.. त्याच्याशी शेअर करत होते.. का? मला नाही माहीत.. पण त्याच्याशी बोलल्यावर मला खुप मोकळं वाटायचं..

तो पण शांतपणे माझं सगळं ऐकुन घ्यायचा.. आधी एक मन मोकळं करण्याचा मार्ग म्हणुन मी त्याच्याशी बोलत राहीले.. आणि.. आणि अरे हे कधी झालं कळालंच नाही रे….”, राधा नरमाईच्या स्वरात सांगत होती..

“व्हॉट द हेल.. तु त्याच्या इतक्या प्रेमात पडलीस की तुम्ही लग्न करण्याचं ठरवावं इतपत.. आणि तरीही तुला कळालं नाही म्हणतेस.. आणि तु.. रोहन.. तुला मी माझा सगळ्यात जवळचा मित्र समजत होतो… तुला सगळं सगळं सांगत होतो.. आणि तु.. माझ्या पाठीमागे हे असं…”

“कबिर यार.. हे बघ.. खरंच कळलं नाही आमची दोघांच कधी मनं जुळली ते.. तु हे मान्य का करत नाहीस की राधाला तु आवडत नव्हताच.. मी नसतो तरी तु तिच्या आयुष्यात आला नसतास हे सत्य आहे…”

“हे ठरवणारा तु कोण? तु खेळला आहेस माझ्या आयुष्याशी..”
“आणि तु?? तु नाही खेळलास मोनाच्या आयुष्याशी??? आधी मोना.. मग राधा.. आणि आता रती.. खेळत मी नाही तु आहेस.. एकाच वेळी अनेकांच्या आयुष्याशी कबिर..”

 

 

काय मंडळी..अहो असे शॉक लागल्यासारखे काय वाचताय?? मज्जा करतोय.. आज एक एप्रील ना…

मंग..

एप्रील फुल की राव…..

🙂

– अनिकेत

आज म्या देव पाहीलामराठी चित्रपटसृष्टीचा सम्राट ‘अशोक सराफ’ हे नाव ज्या मराठी माणसाला माहीत नाही असा खरंच विरळाच म्हणावा. कित्तेक चित्रपट आपल्या कलेने अजरामर केलेले श्री. अशोकजी प्रत्येक रसिकाच्या मनात आपले स्थान अजरामर करुन आहेत. त्या दिवशी अशोक सरांशी माझी भेट घडणार हे पक्क झाले आणि मी हरखुनच गेलो.

अशोक सरांचा माझ्या स्मरणातला पहीला चित्रपट म्हणजे ‘एक डाव भुताचा’, मावळ्याच्या वेशातील अशोक सराफ ‘ए मास्तुरे.. फुर्र..’ करुन गावात नव्याने आलेले मास्तर ‘दिलीप प्रभावळकरांना’ हाक देतात आणि त्यांची मदत करतात. आजही तो चित्रपट माझ्या स्मरणात आहे. तेथुन जे त्यांचे स्थान माझ्या मनात निर्माण झाले ते आजपर्यंत अढळ आहे.

त्यानंतर अनेक चित्रपट अशोकजींनी केले. त्याबद्दल, त्यांच्या कलाकृतीबद्दल लिहावे इतके शब्द सामर्थ्य नक्कीच माझ्याकडे नाही आणि तितकी क्षमताही माझ्यात नाही. त्यांच्या इतक्या वर्षाच्या चित्रपट सृष्टीतील माझ्या मनात ठसलेल्या काही कलाकृतींपैकी ‘धुमधडाका मधील’ अख्या-उख्खी-एख्खे करणारा म्हातारा, ‘अश्विनी ये ना’ करत नाचणारा, ‘माझा पती करोडपती’ मधील ‘आधी कुकु लाव’ म्हणुन विधवेचे नाटक करणार्‍या सुप्रियाला खडसावणारा नाटकी मेजर, ‘एका पेक्षा एक’ मधील चणे खाणारा पोलिस, ‘आयत्या घरात घरोबा’ मधील गोपुकाका, ‘अशी ही बनवाबनवी’ मधला ‘हा माझा बायको’ म्हणुन लक्ष्मीकांत बेर्डेची ओळख करुन देणारा धनंजय माने, ‘कळत-नकळत’ मधील ‘गालावरच्या पुरीच म्हणणं तरी काय’ म्हणत छोट्यांना हसवणारा सदुमामा हे अगदी ठासुन मनात बसलेले चित्रपट आहेतच पण असेही कित्तेक ‘शे’ चित्रपट आहेत ज्यांची कदाचीत नाव माझ्या कमकुवत मेंदुच्या लक्षात रहात नसतील पण अशोक-सराफ सरांचा चित्रपट टी.व्ही. वर दिसला की रिमोटवर चाळा करणारी बोटं आपोआप थिजतात.

जितक्या सहजतेने त्यांनी आपल्याला हसवले तितक्याच सहजतेने क्षणार्धात भावुक होऊन त्यांनी रसिकांच्या डोळ्यात अश्रु उभे केले आहेत. त्यांच्याबाबत अधीक काय लिहावे? फक्त ‘अशोक सराफ’ हे नावच इतक्या गोष्टी बोलते की बस्स..

आणि म्हणुनच त्या दिवशी अशोक सरांशी माझी भेट होणार ह्या विचारांनीच इतका आनंद झाला की तो शब्दात वर्णने खरंच कठीण आहे. सकाळपासुन काय काय बोलायचे ते कित्तेक वेळा स्वतःशीच रटुन झाले होते.

अशोक सरांना भेटायला आलेल्या मंडळींची रांगच लागली होती. मी मात्र दुर, शांत बसुन होतो. मला घाई गडबडीत त्यांना भेटायचे नव्हते. एखाद्या देवालयात गर्दीला कसं भराभर पुढे ढकलली जाते आणि मग इतक्या वेळ रांगेत थांबुनही निट दर्शन नाही झाले म्हणुन मनाला हुरहुर लागुन रहाते ती हुरहुर मला अनुभवायची नव्हती आणि म्हणुनच मी गर्दी कमी व्हायची वाट पहात होतो.. आणि मग तो क्षण आला. मी अशोक-सराफ सरांसमोर उभं होतो. तिन अंकी नाटकातील सॉल्लीड परफॉर्मंन्स नंतरही त्यांचा चेहरा अजुनही टवटवीत होता.

चित्रपटात अखंड बडबड करणारी विनोदी पात्रे साकारणारे अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत व केवळ मित्र-मंडळीतच मिसळणारा आहे, ऐकुन होतो.. आज प्रत्यक्ष अनुभवत होतो. इतके शांत, चेहर्‍यावर फक्त एक हास्य, बोलका चेहरा आणि नम्र भाव.. खरंच वाटलं ‘आज म्या देव पाहीला’, आणि कंठच दाटुन आला. काय बोलावे काहीच सुचेना, ऐनवेळी शब्दांनी दगा दिला. कित्तेक लाखो लोकांनी त्यांना ‘तुमचा अभिनय आवडतो’, ‘तुमचे चित्रपट आवडतात’ वगैरे गोष्टी हजारो लाखो वेळा सांगीतल्या असतील, मग मी वेगळं काय सांगु?

नकळत मी खाली वाकलो आणि देवाचा चरण-स्पर्श अनुभवला. मनामध्ये त्यांचे असंख्य चित्रपट, त्यांची असंख्य रुप, त्यांचे विनोदी संवाद क्षणार्धात तरळुन गेले. त्या एका क्षणात वाटले हजारो वर्ष उलटली. आणि त्या एका क्षणानेच मला आठवण करुन दिली ‘अशोक सराफ’ ह्यांचे अनेक यशस्वी चित्रपटातील सहकलाकार ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ ह्यांची. वाटलं एकदा विचारावं, ‘तुम्हाला पण आठवण येते का हो त्यांची?’ पण दुसर्‍याच क्षणी त्या प्रश्नांतील फोलपणा लक्षात आला. उगाच आठवणींची ती तार छेडणं मला योग्य वाटेना आणि मी तो विचार सोडुन दिला.

ज्या ज्या लोकांना मामांचा अखंड सहवास लाभला आ्हे, लाभतो आहे अश्या लोकांचा मनस्वी हेवा वाटला.

काय बोलावं काहीच कळेना, शेवटी मी सांगुन टाकलं.. मला खरंच शब्द सुचत नाहीत काय बोलावं.. इतकं काही ठरवुन आलो होतो, इतकं काही बोलावसं वाटत होतो, पण.. आणि मामा म्हणाले.. “तुमच्या भावना पोहोचल्या” मी मामांशी हस्तांदोलन केले आणि त्या क्षणाला मी माझ्या आठवणींमध्येच बंद करुन ठेवले.

आत्ताही मी ही पोस्ट लिहायला बसलो आणि पुन्हा एकदा मनात अनेक विचारांची गर्दी झाली..पण ते बाहेरच पडेनात.. शब्दच कमी पडत आहेत. हे असंच होतं का? हो कदाचीत असंच होत असावं! देवाबद्दल लिहायचं तर तेवढं देवत्व आपल्यात हवं.. नाही का?

ही पोस्ट वाचताना मला लक्षात येते आहे की जे मला म्हणायचे होते, लिहायचे होते त्यातले फारसे काही उतरलेच नाहीये शब्दात. असेन मी लोकांच्या लेखी चांगला लेखक, भले मला, माझ्या ब्लॉगला पुरस्कार मिळाले असोत, भले आज मी एक कमर्शीयल नाटक लिहीतो आहे, पण इथे मात्र आज माझे शब्द खरंच अडकले. असो, मला त्याची पर्वा नाही, कारण हा लेख लिहीताना अशोकजींचा हा सर्व सुवर्णकाळ पुन्हा एकदा मनामध्ये तरळुन गेला, पुन्हा एकदा त्यांची भेट डोळ्यासमोर आली आणि हे माझ्यासाठी खुप आहे.

अशोक मामा तुमच्या त्या छोट्याश्या भेटीबद्दल शतशः धन्यवाद. ही भेट मी आयु्ष्यभर मनामध्ये जपुन ठेवीन..आणि देवाजवळ प्रार्थना करेन की तुम्हाला भेटायचे भाग्य मला पुन्हा पुन्हा लाभो.

निवेदन


मंडळी,

सर्वप्रथम डोक्यात भुणभुणणारा भुंगाचे वाचक आणि वेळोवेळी देत असलेल्या प्रतिसादाबद्दल शतशः धन्यवाद.

‘ब्लॅकमेल’ कथा फारच रखडली आहे ह्याची मला पुर्ण कल्पना आहे. तुमच्या प्रतिक्रिया, ई-मेल्स, निरोपकावर होत असलेली विचारणा मी वाचत आहे, परंतु सध्या कामात अतीशय व्यस्त असल्याने खरोखरच मला कथा पुर्ण करायला वेळ मिळत नाहीये. इतका उशीर सहसा माझ्याकडुन होत नाही. तुमच्या प्रतिक्रियांना प्रतिसाद द्यायला सुध्दा वेळ होत नाहीये त्याबद्दल खरंच क्षमस्वः.

संगणक कंपनीमध्ये काम करणार्‍या वाचकांना माहीतीच असेल की ‘अप्रेझल्स’ जवळ आलेले आहेत आणि मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये हा पायंडाच असतो की वर्षभरात तुम्ही केलेल्या कामाबरोबरच किती सर्टीफीकेशन्स केले आहेत ह्याला सुध्दा महत्व असते आणि म्हणुनच काही स्पेशयलायझेशन्सच्या परीक्षा मी देण्याच्या प्रयत्नात आहे त्याचाही अभ्यास असल्याने ब्लॉगला पुर्ण वेळ देऊ शकत नाहीये. मला खात्री आहे तुम्ही मला समजुन घ्याल.

सवड होताच कथा पुर्ण करीन, पण त्याला थोडा अवधी लागेल हे नक्की.

लवकरच परतेन.. तो पर्यंत………………. [क्रमशः] 🙂

ब्लॉगचा नवीन पत्ता:www.अनिकेत.Co.CC


ब्लॉग मराठी मधून असताना ब्लॉगचा पत्ता इंग्रजी मध्ये का? एकदा का भुंगा डोक्यात भुणभुणायला लागला की मग शांत बसण कठीण, माझ तसेच झाले, हा प्रश्न मला काही शांत बसू देईना, शेवटी आज त्याला उत्तर सापडले आणि ब्लॉग चा नवीन पत्ता तयार झाला…

www.अनिकेत.Co.CC

ब्लॉगचा जुना पत्ता [http://manatale.wordpress.com] चालूच राहिल ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी.

चला, आता मोठ्ठा विकेंड सुरु होतोय.. कुठे असेन माहित नाही म्हणून आधीच गुढी पाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

ती…..


Umbrella-inspired-photographs20कॉलेजचे लेक्चर ऑफ मिळाल्याचा आनंद क्षणभंगुरच टिकला कारण गाडी काढेपर्यंत आकाश काळ्या ढगांनी भरुन गेले होते. घरी जाईपर्यंत पाऊस पडणार हे खचीतच होते. वैतागुन गाडी काढली आणि शक्य तितक्या वेगाने घराकडे गाडी पळवली.

चांदनी चौक पार करुन गाडी एन.डी.ए वरील माळरानाकडे वळवली.

काही आठवड्यांपुर्वीचं उन्हानं रापलेल पिवळधम्मक गवत पावसाच्या आगमनाने हिरव्याकंच शालुत लपेटलं गेलं होतं. पिवळ्या, गुलाबी रंगाची फुलं त्या गवताआडुन डोकावुन डोकावुन आपलं अस्तीत्व सिध्द करत होत्या. वार्‍याच्या झोक्याबरोबर झाडांच्या फांद्या बेधुंद होऊन झुलत होत्या. पण माझं लक्ष मात्र वेधुन घेतलं ’ति’नं. ’ती’ आमच्या कॉलेजमधली.. प्रत्येकाला आपलीच व्हावी अशी वाटावी अशी ती…

दोन्ही हात पसरवुन ती डोळे मिटुन आकाशाकडे पाहात दुरवर उभी होती.

मी गाडी कडेला लावली आणि शक्य तितक्या तिच्या जवळ जावुन तीला न्हाहाळु लागलो.

काळ्याभिन्न मेघांच्या पार्श्रवभुमीवर तिचा तो पांढरा सफेद चुडीदार उठुन दिसत होता. तिच्या चेहर्‍यावर पावसाचे रुपेरी, टपोरे थेंब बसले होते. मला पावसाचा इतका हेवा वाटला ना.. तिच्या अंगाला घट्ट बिलगुन बसला होता तो, तिच्या चेहर्‍यावरील पावसाचे थेंब सुध्दा तिच्या गालावरुन उतरायला तयार नव्हते, स्वतःच्या आगमनाने इतरांना अडकवुन ठेवणारा तो इथे मात्र तिच्या काळ्याभोर केसांमध्ये अडकुन बसला होता. मोठमोठ्या झाडांना हेलावुन सोडणारा तो सोसाट्याचा वारा इथे मात्र तिच्या केसांमध्ये मंद मंद रुंजी घालत होता.

तिच्या पापण्यांची होणारी नाजुक हालचाल मनाला कावरं-बावरं करत होती. तिच्या श्वाच्छोश्वासांचा आवाज ढगांच्या गडगडाटातही मला स्पष्ट ऐकु येत होता.

वार्‍याची पुन्हा एक लहरं आली आणि तिच्या केसांची बट तिच्या चेहर्‍यावर जाऊन विसावली. परंतु तिने चेहर्‍यावरचे केस बाजुला घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही.

वाटलं, तिच्या जवळ जावं, तिच्या चेहर्‍यावरुन ओघळणारे पाण्याचे थेंब ओंजळीत भरुन घ्यावेत..पावसाच्या शिडकाव्याने हवेत पसरलेल्या भिजलेल्या मातीच्या सुखंदापेक्षाही जास्त सुखद, जास्त मादक, मनावर आनंदाचे तरंग निर्माण करणारा तिच्या केसांमधला तो तजेलदार सुगंध श्वासामध्ये भरुन घ्यावा. तिच्या शरीराची उब, थंडगार पडलेल्या माझ्या शरीरावर ओढुन घ्यावी.

नुसत्या विचारांनीच अतीव सुखाने डोळे मिटले गेले आणि शांतपणे झाडाला टेकुन उभा राहीलो.

डोळे उघडले तेंव्हा ती माझ्या समोरच उभी होती. तिची नजर माझ्या डोळ्यांना भेदत आरपार हृदयाला जाऊन भिडली. अचानक तिच्या सामोर्‍या येण्याने मी भेदरुन गेलो. काय बोलावे काहीच सुचेना.. सारवासारव करण्यासाठी तोंड उघडले, पण शब्द घश्यातच अडकले.

ती माझ्याकडे बघुन खुदकन हसली आणि हृदयाचा एक ठोका चक्क क्षणभर थांबुन गेला.

तिने माझा हात धरला आणि मला हळुवारपणे पावसात ओढले. तिचा तो स्पर्श…… अंगावर काटा आला… मानेवरचे केस उभे राहीले. मी हिप्नॉटाईझ झाल्यासारखा तिच्या मागोमाग चालत गेलो.

जमीनीवरील हिरवीगार गवताची पाती पावसाच्या आगमनाने जितके प्रफुल्लीत झाली नसतील तितकी तिच्या ओढणीच्या स्पर्शाने ती मोहरुन जात होती. गुलाबी फुलं तिच्या गालावर पसरलेल्या लालीशी बरोबरी करण्याचा असमर्थ प्रयत्न करत होती. जमीनीवर साठलेल्या तांबुस-चॉकलेटी पाण्याला झालेला तिच्या पावलांचा स्पर्श त्याला बेभान करुन टाकत होता.

मी कुठे वहावत चाललो होतो, माझं मलाच ठाऊक नव्हतं.. डोंगरावरुन सुरु झालेल्या पावसाच्या धारेला तरी कुठं माहीत असतं ते कुठे जाणार आहे ते.. ते नुसत वहावत जातं.. वसुंधरेच्या गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने.. बेफाम होत, हिंदकळत, ठेचाळत… माझंही तस्संच झालं होतं..

माळरानाच्या एकदम कडेला मी तिच्याबरोबर येऊन पोहोचलो. समोर धुक्यात हरवलेलं माझं गाव होतं.. पावसांच्या सरीत भिजलेले रस्ते होते, नखशिखांत नटलेले डोंगर होते.

ति एका खडकावर बसली, मी तिच्या शेजारीच.. तिला खेटुन बसलो..

माझी मान आपसुकच तिच्या खांद्यावर विसावली. पावसाच्या थेंबाने भिजलेला वारा सर्वांगाला झोंबत होता. भिजलेले शरीर त्या थंड वार्‍याने शहारत होते.

तिने माझ्या हातावर तिची ओढणी पांघरली.. इतक्यावेळ धडधडणारे हृदय आता शांत झालं होतं. आसमंतातले सर्व आवाज जणु माझ्या कानापर्यंत येऊन परत गेले होते. स्पेस.. अवकाशातली शांतता जणु आजुबाजुला विखरुन पडली होती.

मी जड झालेले डोळे उघडुन तिच्याकडे पाहीले.. साखरेसारखे तिचे गोड डोळे मी कित्तेक वेळ पहात राहीलो.

तिने तिच्या बोटाचे नख माझ्या मनगटापासुन खांद्यापर्यंत फिरवले. तो स्पर्श मला अंगावर हजारो मोरपिस फिरवल्यासारखा भासला. नकळत माझा हात तिच्या मानेवरुन फिरत तिच्या नाजुक गळ्य़ापर्यंत आला.

आवेगाने तिने मला घट्ट मिठी मारली….. तिचा गरम श्वास माझ्या मानेवर रोमांच निर्माण करत होता. तिच्या हृदयाची धडधड माझ्या हृदयाला जणु काही सांगु पहात होती.

सुखाच्या त्या परमोच्च क्षणात बुडालेले असतानाच मागे उभा राहीलेला पोलीस म्हणाला…”ओ लैला मजनु.. चला उठा इथंन.. आपल्या घरी जाऊन रोमान्स करा.. उठा………………………………..”

टिप: लेख काल्पनीक आहे, वाचकांनी उगाचच कश्याचा कश्याला संबंध लावु नये ही विनंती…….

Note : I am not the owner of the image. Image courtsey from google search.

पुरूष जेंव्हा मनातलं बोलतो


’मनोविश्व’ मासीकाच्या डिसेंबरच्या अंकात माझा छापुन आलेला लेख ’डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा’च्या वाचकांसाठी –

लेखाचे शिर्षक विचीत्र वाटले ना? “हे काय भलतंच?”, “पुरुषांच्या कसल्या आल्यात समस्या?” असा विचार करुन किंवा आता वाचायला काहीच उरले नाही तर बघु इथे काय लिहीलं आहे म्हणुनच इथं आलात ना?

साहजीकच आहे. पुरुष जन्माला येतो तेंव्हा पासुनच त्याच्यावर त्याच्या पुरुष असण्याची जाणीव करुन दिली जाते. ‘काय रडतो आहेस मुलींसारखा?’, किंवा ‘एवढसं लागलं तर काय झालं? मुलगी आहेस का तु?’ ही वाक्य वारंवार ऐकवली जातात. मुलगा लहानाचा मोठा होतो तेच मुळी स्वतःच्या मनाला ठसवत ‘तु पुरुष आहेस, तुला कधीच काही होता कामा नये? तु तुझ्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकलं पाहीजेस. तुला मोकळेपणाने रडायला परवानगी नाही. तुला हताश होऊन बसुन चालणार नाही’. कुठल्याही कठीण परिस्थीतीत न डगमगता पुरुषाने सामोरे जायलाच हवे आणि तो जाणारच हे ’ग्रांटेड’ असते. पुरुषांना प्रश्न, समस्या असुच शकत नाहीत आणि ज्याला आहेत तो जणु काही कमजोर असल्याचीच भावना समाजाच्या मनामध्ये रुजलेली आढळते.

फार लांबचे कश्याला, जेंव्हा आज मी माझ्या मैत्रिणीला ’पुरुषांच्या समस्यांवर’ लिहीणार असल्याचे सांगीतले तेंव्हा तिचा उत्स्फुर्त प्रश्न होता, “पुरुषांना समस्या असतातच कुठे?”

आज इतरत्र नजर टाकली तर ’जेष्ठांसाठी हेल्पलाईन’, ’रुग्णांसाठी हेल्पलाईन’, ‘ग्राहकांच्या फसवणुकीच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन’, ‘महीलांवरील अत्याचार, सासरी छ्ळ, नोकरीत त्रास, पिडीत महीला अश्या असंख्य कारणांसाठीच्या हेल्पलाईन’, ’अपंगांसाठी हेल्पलाईन’, ‘ग्राहकांच्या फसवणुकीच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन’, ‘मतदारांसाठी हेल्पलाईन’, ‘दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन’, ‘रिक्षाचालकांच्या मनमानीविरोधात तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन’ अश्या अनेक ढिगभर हेल्पलाईन्स आढळतील. पण पुरुषांसाठी हेल्पलाईन असल्याचे ऐकले आहे कधी? भारत हा तरूण लोकांचा देश आहे असे म्हणतात, या तरूणांसाठी विशेषतः तरुण पुरुषांसाठी आहे एखादी हेल्पलाईन? असेलही एखादी कदाचीत पण त्यांची संख्या नगण्य आहे.

काळ बदलला आणि काळाच्या ओघात जशी आई घरातुन बाहेर पडली, ‘चूल आणि मूल’ इतकेच तिचे विश्व न रहाता ते अधीक व्यापक झाले, तस्सेच आजच्या पुरुषाच्याअंगी सुध्दा हळवेपणा आला. पुर्वीचे कठोर, घनगंभीर, रागीट ‘अण्णा’, ‘अप्पा’ जाऊन आजचा ‘ए बाबा’ आणि ’अहो’ चा ’ए sss’ जन्मला. परंतु पौरुषत्वाच्या दडपणाखाली त्याला मन-मोकळं करण्याचं स्वातंत्र्य, त्याची घुसमट अजुनही दबलेलीच आहे.

लग्न झाल्यावर तो आईच्या पदराला धरुन चालणारे बाळ नसतो की बायकोच्या ताटाखालचे मांजर, पण तरीही सगळ्यांच्या मर्ज्या सांभाळुनही त्याला प्रत्येक वेळी ह्या नाहीतर त्या पारड्यामध्ये बसवलेच जाते. सासु-सुनांच्या भांडणात बऱ्याचवेळा नाही सासु जास्त दुखावली जात, नाही सुन.. कारण बऱ्याचवेळा भांडताना त्यांना त्यांच्या ‘अहं’ ची चिंता असते, परंतु दुखावला जातो, भरडला जातो तो माणुस कारण दोघीही त्याला प्रिय असतात.

हुंडाबळी, सासरी छळ सारख्या कारणांसाठी बनवलेल्या ४९८(अ) सारख्या कायद्याचा दुरुपयोग होतो आहे हे गृहमंत्रालयाने सुध्दा आता मान्य केले आहे.

नोकरीचा ताण असह्य झाला म्हणुन, कर्जबाजारी झाला म्हणुन आत्महत्या करणाऱ्या तरूणांची, पुरुषांची संख्या लक्षणीय आहे. पण लक्ष देते कोण? हुंडाबळी गेला तर सगळे गाव रस्त्यावर उतरेल, पण अश्या अभागी लोकांना ‘हळवा’, ‘बायकी’, ’कमजोर’ म्हणुन नजरेआड केले जाते.

पुरुषांच्या बरोबरीने, खांद्याला खांदा लावुन चालणाऱ्या बायकांबद्दल रकानेच्या रकाने भरुन लिहिले गेले आहे, जात आहे. पण बायकोच्या बरोबरीने घरात मदत करणाऱ्या, पोराबाळांना आंघोळ घालणाऱ्या, जेवु-खाउ घालणाऱ्या, शाळेत सोडणार्‍या, प्रसंगी घरात स्वयंपाकातही मदत करणाऱ्या पुरुषांबद्दल कोण बोलतो?

तमाश्यामध्ये नाचणाऱ्या स्त्री ला वाहव्वा मिळते, तिच्या कलागुणांना भरभरुन प्रसिध्दी मिळते, पण त्याच तमाश्यात पोटा-पाण्यासाठी ‘नाच्या’ बनलेल्या पुरुषाच्या पदरी मात्र केवळ थट्टा आणि चेष्टा-मस्करीच येते.

स्त्रियांसाठी आजही बहुतेक क्षेत्रांमध्ये राखीव जागा आहेत, स्त्री आहे म्हणुन कुठल्या क्षेत्रात करीअर, नोकरी, शिक्षणासाठी नाकारण्यात आल्याच्या घटना आजच्या काळात नगण्यच आहेत. मग असे असताना स्त्रियांवर अन्याय होतो आहे, स्त्री अबला आहे म्हणणे कितपत योग्य आहे? ग्रामीण भागांतील स्त्रियांवर होणारे अन्याय आहेत हे मान्य पण म्हणुन सरसकट सर्वच स्त्रियांसाठी आजही आरक्षण, सुविधांचा भडीमार होतो आहे तो कितपत योग्य आहे?

आपण स्त्री-पुरुष समानतेचा विचार करत असताना आजच्या काळात तो पुष्कळसा एकांगी करतो आहोत असे वाटते. स्वातंत्र्य स्त्रीचे, भावना स्त्रीच्या, स्त्रियांवर होणारा अन्याय याच दृष्टीकोनातून विचार होतो. तसा तो करु नये असे नाही, पण त्याच बरोबरीने काळानुरुप पुरुषांच्या भूमिकांमध्ये होणारे बदल लक्षात घेतले पाहिजेत. आणि पारंपारिक स्त्रियांच्या भूमिकेतून ज्याप्रमाणे त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जातात तसेच प्रयत्न पुरुषांना पारंपारिक भूमिकांच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी करायला पाहिजेत. ही काळाची आणि आपल्या समाजाची गरज आहे.

लग्नाला उभं राहिल्यानंतर अनुरुप वधुच्या अपेक्षांनी बुचकळ्यात पडलेला, स्वतःला पदोपदी सिध्द केल्यानंतरही इतरांच्या नजरेत दिसणारा कोरडेपणा सोसून वैतागून गेलेला, वयात आल्याबरोबर पैसा कमावलाच पाहिजे अशा सर्वसाधारण अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेला आणि मोकळा श्वास घेण्याचीही उसंत न उरलेला, आपल्या बाळासाठी हळवा होणारा, त्याच्या आठवणींमध्ये कोमेजुन जाणारा आजचा बाबा सुध्दा एका विचीत्र कात्रीत सापडला आहे.

आपल्या सानुल्यासाठी सर्वेतोपरी देण्याच्या प्रयत्नात काही निवडक लोकांपायी त्याची सुध्दा फरफट होत आहे. एकीकडे सर्वेतोपरी देण्याच्या प्रयत्नात अधीक पैसा कमावणे त्याला खुणावते आहे तर दुसरीकडे हातातुन निसटुन चाललेले क्षण, आपल्या बाळाचे डोळ्यासमोर निघुन चाललेले बालपण त्याला सतावते आहे.

माझा एक मित्र ‘मर्चंट नेव्ही’ मध्ये कामाला आहे. गेला की एकदम सहामहिन्यांनी पुन्हा घरी येतो. जाण्याआधी एकदा आम्ही सर्व हॉटेलमध्ये बसलो होतो. भरपुर बोलत होता तो. एशिया बरोबरच युरोप, अमेरीका सुध्दा फिरतीच्या नोकरीमुळे बराचसा पाहुन झाला होता. वेगवेगळे देश, वेगवेगळे अनुभव भरपुर त्याच्या गाठीशी होते. ह्यावेळेस आला होता ते त्याला मुलगा झाला म्हणुन. इथुन जाईल तेंव्हा मुलगा महिन्याचा असेल. मुलाचा विषय निघाला तेंव्हा मात्र त्याचा ‘प्राईड’ असलेली त्याची नोकरी क्षणार्धात त्याच्यासाठी फडतुस झाली होती. कारण पुढच्या वेळेस तो जेंव्हा घरी येईल तेंव्हा त्याचा मुलगा एक वर्षाचा झाला असेल. त्याचे हसणे, रडणे, डोळ्यात उमटणारे आपल्यांबद्दलचे ओळखीचे भाव, उठुन बसणे, रांगणे, धरुन चालणे सगळ्याला तो मुकणार होता.

परवाच असाच एक किस्सा एका मित्राने सांगीतला. त्या मुलाचे वडीलही असेच फिरतीच्या नोकरीवर. मुलाला त्यामुळे घरी कोणी आले की ‘बाबा बाहेरगावी असतात’ सांगण्याची सवय. एक दिवस त्याचा बाबाच घरी आला आणि त्याच्याच मुलाने त्याला ‘बाबा घरी नाहीत’ म्हणुन सांगुन टाकले. काय प्रसंग ओढवला असावा त्याच्यावर हे न लिहीणेच योग्य.

काही ‘प्रॅक्टीकल’ बाबाही आहेत जे पैश्याच्या मागे फारसे धावत नाहीत. त्यांचे पाय अजुनही जमीनीवर आहेत पण त्यामुळे त्यांचीसुध्दा ओढाताण होते आहेच. एकीकडे बाळासाठी सर्वोत्तम ते देऊ शकत नाही ह्याचे दुःख तर दुसरीकडे इतरांइतकी नसली तरीही होणारी कामाची दगदग, धावपळ ह्यामुळे निसटुन चाललेल्या प्रत्येक क्षणाचा हिशोब मांडताना होणारी कसरत ह्यामध्ये तो पिळवटुन निघाला आहे.

एकतर्फी प्रेमातुन प्रेयसीचा खुन करणारा माथेफिरु मिडीया रंगुन जगाला दाखवते पण आपल्या प्रेमीकेचा साखरपुड्याच्या आदल्या रात्री झालेल्या अपघाती मृत्युने दोन वर्षांनंतरही न सावरलेल्या, आपल्या मनाची व्यथा ’I too had a love story’ नावाच्या पुस्तकातुन मांडणार्‍या ’ रविंदर सिंग’ ची मात्र किती जण दखल घेतात?

माझ्या पहाण्यात निदान चारजण तरी असे आहेत जे आय.टी क्षेत्रात भक्कम पगाराची नोकरी असुनही, तिशीला आले तरीही त्यांचे अजुनही लग्न ठरत नाही. आजच्या मुलींनी त्यांना दिलेल्या नकाराची कारणं ऐकायचीआहे्त? आजच्या मुलींना एक तर एकत्र कुटुंब नको आहे किंवा त्यांना लग्नानंतर परदेशी स्थाईक होणाराच नवरा हवा आहे. आणि हे चारही जण ह्या ’कॅटेगरीतले’ नाहीत म्हणुन आजही ते आपल्या अनुरुप वधुच्या शोधात आहेत.

घरातील ओढाताण, नोकरीतील फरफट, ’पिंक स्लिप्स’ ची टांगती तलवार, बायका-मुलांच्या वाढत्या गरजा, बाजारातील सतत वाढत जाणारी स्पर्धा, महागाई ह्या सर्वांना तोंड देता देता, पुरुषार्थाचे मणामणाचे ओझे आणि चेहर्‍यावरील खोटे हास्य घेऊन फिरणार्‍या पुरुषांच्या डोळ्यातील हे ’मगरमच्छ’ चे आश्रु कधी कुणाला दिसतील काय?

Download PDF of Scanned Article copy

2010 in review


The stats helper monkeys at WordPress.com mulled over how this blog did in 2010, and here’s a high level summary of its overall blog health:

Healthy blog!

The Blog-Health-o-Meter™ reads Wow.

Crunchy numbers

Featured image

A helper monkey made this abstract painting, inspired by your stats.

The Louvre Museum has 8.5 million visitors per year. This blog was viewed about 230,000 times in 2010. If it were an exhibit at The Louvre Museum, it would take 10 days for that many people to see it.

In 2010, there were 81 new posts, growing the total archive of this blog to 258 posts. There were 12 pictures uploaded, taking up a total of 445kb. That’s about a picture per month.

The busiest day of the year was July 16th with 2 views. The most popular post that day was लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ९).

Where did they come from?

The top referring sites in 2010 were marathiblogs.net, mr.wordpress.com, google.co.in, indiblogger.in, and bhunga.blogspot.com.

Some visitors came searching, mostly for मराठी कथा मराठी, कथा, मराठी कथा, प्रेम कथा, and मराठी निबंध.

Attractions in 2010

These are the posts and pages that got the most views in 2010.

1

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ९) July 2010
26 comments

2

मराठी कथा January 2010
26 comments

3

मराठी-कथा (ई-पुस्तकं) July 2010
26 comments

4

हनिमुनचा भयावह शेवट April 2009
11 comments

5

निबंध December 2009
15 comments

नुतन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा


नविन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा

नवे वर्ष नव्या आशा,

क्षितीजाच्या या दाही दिशा

नविन वर्षांत तुमच्या सर्व आशा, आकांक्षा पुर्ण होऊ देत. क्षितीज पादाक्रांत करण्यासाठी लागणारे बळ तुमच्या पंखांना लाभु देत.
२०११ वर्ष भरभराटीचे आणि सुख समृध्दीचे जावो.

सर्व वाचकांना नुतन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा……