सुनबाई


“हम्म.. काय म्हणताय? कसा काय झाला सुनबाईंचा वाढदिवस??”, गुलाबी थंडीपासुन बचावासाठी घेतलेली शाल अंगाभोवती गुंडाळत मोठ्ठा “बी” म्हणाला
“कसलं काय? छोटीशी पार्टी ठेवली होती, पण कोण्णीच आलं नाही”, निराश होत ज्युनीयर छप्पन म्हणाला.
“अस्सं?? पण का?”, मोठा बी..
“अहो नेमक्या त्या कुचकट कॅटरीनाने आज एक कुत्र विकत घेतलं त्यानिमीत्त तिने सुध्दा पार्टी ठेवली होती सगळे तिकडेच गेले..” ज्युनीयर छप्पन, “ह्या ब्रिटीशांना जाऊन इतकी वर्ष झाली तरी ब्रिटीशांना चाटण्याची प्रवृत्ती काही गेली नाही अजुन!”

चेहर्‍यावर आलेले कुत्सीत हास्य लपवत मोठ्ठा बि पुढे म्हणाला..”असेल कॅटरीना मोठठी स्टार, पण आपल्या सुनबाई सुध्दा काही कमी नाहीत.”
“राहु देत राहु देत.. तुम्ही तर काही बोलुच नका.. आपलंच कुंपण शेत खायला लागल्यावर कसं होणार पाssss??”, ज्युनियर छप्पन
“अरेच्चा?? काय झालं?”.. मोठ्ठा बि..
“बघीतलं म्हणलं तुमचं परवाचं कौन बनेगा.. तेंव्हा तुम्ही काय म्हणालात ते चांगलं लक्षात आहे माझ्या..” ज्युनीयर छप्पन
“काय?? काय म्हणालो असं मी??”, मोठ्ठा बि
“तुम्ही म्हणालात की तुमचं आता वय झालं आहे.. आणि मोठ मोठ्या अभिनेत्र्या जसे कॅटरीना, करीना तुमच्याबरोबर काम करायला नकार देतात म्हणुन..” ज्युनीयर छप्पन
“मग?? त्यात काय चुकीचे म्हणालो मी..?” मोठ्ठा बि
“अहो पा.. मोठ मोठ्या अभिनेत्रींमध्ये कॅट, करीनाचे नाव घेतलेत आणि ऐशला विसरलात तुम्ही पा… जा आम्ही नाही बोलणार तुमच्याशी..”, ज्युनियर छप्पन
“ए.. निट बोल जरा..! आणि तो हवेत धरलेला तळवा निट खाली टेबलावर ठेव. दोस्ताना केल्यापासुन तुझे चाळे वाढले आहेत. आणि सुनबाई काय अभिनेत्री आहे..”
“पाssssssss”

“पा.. असं कसं म्हणता तुम्ही?? आत्ताच तर तिचा पिच्चर सुपरहीट झालाय…”, ज्युनियर छप्पन
“काय बोलतोस?? कुठला कुठला???”, मोठ्ठा बि
“रोबोट….” ज्युनियर छप्पन..
“हा हा हा हा….”, मोठठा बि छप्पन मजली हसला… “अरे असले विनोद नको करु पोरा.. तुला म्हणुन सांगतो लोकं बाहेर म्हणतात सुनबाईंना रोबोट का मिळाला माहीत आहे??””

“का?? का??”, खुर्चीत सावरुन बसत उत्सुकतेने ज्युनीयर छप्पनने विचारले
“म्हणे त्यांना अशी अभिनेत्री हवी होती जी दिसायला कचकड्याची, प्लॅस्टीकची दिसेल आणि जिचा अभिनय कृत्रीम वाटेल जेणेकरुन रोबोट नावाला साजेशी दिसेल.. आता असे आहे म्हणल्यावर आपल्या सुनबाई त्यात चपखल बसल्या ना…”

“पॉ….ssss”

“आता तर तिचा अक्की आणि हृतिक बरोबरचा सिनेमा पण आलाय म्हणलं. ती गुणी अभिनेत्री आहे म्हणुन तर तिला घेतलं ना चित्रपटांत!”, कानावरच्या केसांची बोटावर गुंडाळी करत ज्युनियर छप्पन म्हणाला.

“हा हा हा हा…”, पुन्हा एकदा मोठ्ठा बि हसला आणि म्हणाला, “अरे ते अक्की आणि हृतिक किती पैसे घेतात माहीती आहे का प्रत्येक सिनेमाचे? त्यात बिग बजेट चित्रपट म्हणल्यावर उरलेल्या पैश्यात फारसा चॉईस नव्हता म्हणे निर्मात्यांकडे म्हणुन मग…”

“पॉ..~~! पॉ तुम्ही लिमीट पार करता आहात, ऐश कडे कित्तेक हॉलीवुड पटांच्या ऑफर आहेत..” ज्युनियर छप्पन
“हो?? जसे? एखादा सांग बर प्रोजेक्ट!”.. मो्ठा बि

ज्युनियर छप्पनने काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडले पण मग तो गप्प बसला.

“पोरा.. काय तुझा चॉईस रे.. तुला दुसरी कोणी मिळाली नाही का?”

“पॉ… परवा ते इंडीया टी.व्ही.वाले प्राईम टाईमला ऐशचे किती गुणगान गात होते. म्हणत होते ३७ वर्षाची झाली तरी इतकी सुंदर दिसते म्हणुन..”

“अरे कुठे ते इंडीया टि.व्ही.चे ऐकतो? असले विनोद करायची सवयच आहे त्यांना. कधी त्यांना गायी/म्हशी पळवणार्‍या यु.एफ.ओ. दिसतात तर कधी त्यांना स्वर्गात जायचा रस्ता सापडतो. अरे आमच्या काळच्या एक एक अभिनेत्र्या बघ, हेमा, रेखा इतकं वय झालं तरी कश्या ताज्या कळीसारख्या आहेत…”

रेखा चे नाव ऐकताच जयाबाईंनी डोळे वटारले आणि घसा खाकरुन त्या तेथुन निघुन गेल्या.

“अरे ते चल्लु-मिया आणि चिवेक चोबेरॉय तुझ्या मागे फिदी-फिदी हसतात. पायावर धोंडा पाडुन घेतला म्हणतात. अरे, एखाद्याने किती ओव्हरअ‍ॅक्टींग करावी?? रावणमध्ये घसा फुटेस्तोवर ओरडली आणि गुजारीश मधला तिचा गंभीर (?) अभिनय पहाताना लोकं पोटं धरुन हसत हसत ख्रुर्चीतुन पडली म्हणे.”

“बरं जाऊ देत, कुठं आहेत कुठं सुनबाई?”, मोठठा बि
“आहे बाहेर..पिंपळाच्या झाडापाशी, मन खट्टु करुन बसलीय, गुजारीश सुध्दा फ्लॉप गेला म्हणुन..!”

“च्यायला, तो पिंपळावरचा मुंजा पण वैतागला असणार!..” मोठ्ठा बि स्वतःशीच पुटपुटला

“अरे अख्या जगात तुला तिच सापडली का? ’राणी मुखर्जी’ काय वाईट होती, आणि ती ’रन’ मधली ’भुमीका चावला?’, ’करीश्माशी’ तर चक्क साखरपुडा मोडलासे रे पोरा..”, डोळ्यात जमा झालेले अश्रु थोपवताना झालेल्या कापर्‍या आवाजात मोठ्ठा बि म्हणाला.. “अरे जॉनला सुध्दा मी जावई म्हणुन स्विकारला असता रे…” पण तु.. दिवट्या.. सगळी स्वप्न धुळीला मिळवलीस रे.. सगळी स्वप्न धुळीला मिळवलीस..”

तेवढ्यात टी.व्ही वर बातमी झळकली..”अभि-अ‍ॅश ला रावणमधील अभिनयासाठी बेस्ट अ‍ॅक्टर-अ‍ॅक्ट्रेसचा” पुरस्कार मिळाला.. बातमी पुर्ण होते न होते तोच आजुबाजुच्या घरांतुन जोरदार होणारा हास्यकल्लोळ कानी पडला..

सहन नं होऊन, ज्युनीय़र छप्पनने कानावर हात ठेवले…!

प्रिय पप्पा


स.न.वि.वि.

माझ्या बत्तीस वर्षांच्या आयुष्यात तुम्हाला मी पत्र लिहीण्याची ही बहुदा पहीलीच वेळ. आजपर्यंत काही तुरळक अपवाद वगळता आपण एकमेकांपासुन दुर असे कधी राहीलोच नाही. रहाणे शक्यच नव्हते. तुम्हाला माझी आणि मला तुमची इतकी सवय होऊन गेली होती की तुमच्यापासुन दुर रहाण्याचा विचार जवळ जवळ अशक्यच होता.

जेंव्हापासुनचे आ्ठवते तेंव्हापासुन तुम्ही आमच्यासाठी केलेले कष्ट आठवतात. बहुतांशवेळा तुम्ही नेहमीच कठोर राहीलात पण तुमच्यात लपलेला हळवा माणुस आणि त्याबरोबरचे प्रत्येक क्षण मला आजही आठवतात.

मग आज पत्र लिहीण्याची वेळ का यावी? कारण आज तुम्ही आमच्यापासुन खुप दुर गेला आहात. ह्या भौतीक जगापासुन खुप दुर. कदाचीत तुम्ही आम्हाला पाहु शकत असाल, पण आमचे डबडबलेले डोळे अंधुक झालेल्या दृष्टीने तुम्हाला नाही पाहु शकत.

गेली ५ वर्ष, दोन्ही किडन्या निकामी झाल्यानंतर सुध्दा डायलिसीसचा आधार घेत तुम्ही आयुष्याशी दिलेली झुंज कदाचीत तेंव्हा फक्त जाणवली, पण आता त्यातील दुःख, वेदना, त्रास जाणवला. ही झुंज किती कठीण होती ह्याची जाणीव आता झाली.

११ नोव्हेंबर, २०१० ची ती काळरात्र मला आठवते. रात्री २.३० वाजता तुम्हाला लागलेली प्रचंड धाप, श्वास घेताना होणारा त्रास आणि घामाने डबडबलेला चेहरा डोळ्यासमोरुन हटत नाही. ताठ मानेने, बॅंक मॅनेजरच्या रुबाबात वावरलेले तुम्ही त्या दिवशी मात्र कित्ती हतबल दिसत होतात. तुम्हाला ’आय.सी.यु’ मध्ये दाखल केल्यावर लगेचच डॉक्टरांनी न्युमोनीयाचे निदान केले आणि आमच्या छातीत धस्स झाले परंतु तरीही मोठ्या धिराने मी तुम्हाला म्हणालो होतो, “काळजी करु नका, डॉक्टरांशी बोलणे झाले आहे, दोन दिवसांत बरं वाटेल आणि तुम्ही पुन्हा घरी याल”. पण तेंव्हा काय माहीत होते, पुढे काय वाढुन ठेवले आहे.

दुसर्‍याच दिवशी ऑफीसमध्ये मला डॉक्टरांचा फोन आला, “परीस्थीती गंभीर आहे, न्युमोनीया वेगाने पसरत आहे. तुम्ही जवळच्या नातेवाईकांना बोलावुन घ्या.” आहे त्या परीस्थीतीत हातातले काम टाकुन मी दवाखान्यात धाव घेतली. बाहेर बसलेल्या बहीणीच्या चेहर्‍यावरील भाव खुप काही सांगुन गेले. रात्रभर थांबल्यावर आंघोळीसाठी मम्मी घरी गेली होती. ’तिला आल्यावर कसे सांगायचे?’ हा यक्ष प्रश्न डोळ्यासमोर उभा राहीला.

डॉक्टर म्हणाले, ’व्हेंटीलेटर लावावा लागणार आहे. सि-डेट केल्यावर त्यांना तुमच्याशी बोलता येणार नाही. तेंव्हा बोलुन घ्या’. आतमध्ये आलो तेंव्हा असहाय्यपणे तुम्ही बेडवर झोपला होतात. तोंडाला ऑक्सीजनचा मास्क, सर्वांगाला जोडलेल्या विवीध नळ्या आणि शेजारील अनेक मॉनीटर्सवर दिसणारे विवीध ग्राफ्स आणि आकडे पाहुन गलबलुन आले. पण मोठ्या कष्टाने तुमच्याशी बोलता आले, ’उद्या येतो परत भेटायला, काळजी घ्या’ सांगताना किती कष्ट घ्यावे लागले हे शब्दात मांडणे अशक्य. थरथरणारा तुमचा हात हातात घेताना नकळत मोठ्ठा आवंढा गिळला गेला.

रविवार सकाळ, १४ नोव्हेंबर, २०१०, फार भयानक सकाळ होती. आईने सांगीतले, ’काल तुम्हाला १०६ ताप होता आणि ब्लड-प्रेशर ८०च्या ही खाली आले होते’ मनामध्ये असंख्य वाईट विचार येत होते, पण त्याकडे दुर्लक्ष करुन सकाळची आवरा-आवर करत होतो. आंघोळीला बसतच होतो तोच आईचा फोन असशील तस्साच निघुन ये. मी काय समजायचे ते समजलो पप्पा.. तुमच्यापासुन कायमचा दुर होण्याची वेळ आली आहे.

दवाखान्यात आई साश्रु नयनांनी बसलेली होती. तडक तुमच्या खोलीत आलो. डॉक्टरांनी परीस्थीतीची कल्पना दिली. अजुन काही तास.. फक्त..

तुमच्याशी काही ही बोललो तरी तुमच्यापर्यंत ते पोहोचणे शक्यच नव्हते. व्हेंटीलेटरच्या हवेच्या मार्‍याने तुमच्या छातीची वेगाने वरखाली होणारी हालचाल सोडली तर तुमचे शरीर…..

न्युमोनीयाने तुमची काही आठवड्यांपुर्वीच किडनी-ट्रान्स्प्लॅन्टने बसवलेली किडनी गिळंकृत केली होती. तुम्ही ह्यातुन सुखरुप बाहेर जरी पडलात तरी जगण्यासाठी तुमच्यापुढे पुन्हा एकदा डायलिसीसचा पर्यायच होता. तुम्ही हे ऐकले असतेत तर तुमच्या मनाची काय अवस्था झाली असती? तिन वर्ष उराशी जपलेले किडनी ट्रान्स्पलॅन्टचे स्वप्न आत्ता कुठे पुर्ण झाले होते. ५ वर्षांनंतर प्रथमच झालेली युरीन पाहुन तुमच्या चेहर्‍यावरचा आनंद काय वर्णावा? इतकी वर्ष पाळलेली जाचक पथ्य आता कुठल्याकुठे पळुन जाणार होती. तुम्ही पुन्हा एकदा नेहमीसारखे हिंडु फिरु शकणार होतात. पण कदाचीत नियतीला हे मान्य नव्हते.

मी डॉक्टरांना कडेला घेउन विचारले, “डॉक्टर जर ह्यांची जगण्याची १% ही शक्यता नसेल तर प्लिज त्यांचे व्हेंटीलेटर आणि अजुनही चालु असलेला असंख्य औषधांचा मारा प्लिज बंद करा.” माझ्याच्याने खरोखरच तुमचे हाल बघवत नव्हते हो…

पण डॉक्टर नाही म्हणाले. आपण नॅचरली सर्व होण्याचे वाट पाहु. अजुन २-३ तास. आपण आपले प्रयत्न सदैव चालुच ठेवायचे. पण तोच नर्सने मला आत मध्ये बोलावले आणि सुपरव्हायजर समोरच्या मॉनीटरकडे बोट दाखवत म्हणाले “स्ट्रेट लाईन……………..”

त्यानंतर संध्याकाळपर्यंत मी फक्त एक यंत्र मानव होतो. आजुबाजुला असंख्य लोकं होती. मला हे-कर, ते-कर चालु होते. तोंडात गंगाजलाचे दोन थेंब टाकताना झालेला तुमच्या थंड पडलेल्या चेहर्‍याचा स्पर्श अंगावर आणि मनावर शिरशीरी आणुन गेला. घरातील बाई माणसांसमोर आणि स्मशानभुमीत मनावर ठेवलेला निर्बंध तुमचा देह विद्युत दाहीनीत जाताना पहाताना मात्र रोखु शकलो नाही.

सर्व खेळ केवळ दोन दिवसांत संपला. आम्हा सर्वांपासुन तुम्ही फार दुर निघुन गेलात.

तुमच्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी फार मोठठी आहे. एका मोठ्या व्हॅक्युम मधुन वावरल्यासारखे वाटते. इतरांसमोर नेहमीच्याच अनिकेतच्या रुपात वावरताना होणारी मानसिक ओढाताण असह्य करणारी आहे. तुमच्या वस्तु, नेहमीच्या बसायच्या जागा नजरेला वेदना देतात. अचानकपणे आलेली जबाबदारीने फार वयस्कर झाल्यासारखे वाटु लागले आहे. बाहेर पडलेली ढगाळ हवा मनाला उभारी देण्याऐवजी नैराश्यच देत आहे.

अजुन खुप काही मनामध्ये आहे, पण मनातले शब्द बाहेर काढताना, डोळ्यातुन अश्रु तर येणार नाहीत ना हीच भिती सतावते आहे. त्यामुळे इथेच थांबतो. आजपर्यंत अनेक गोष्टी मुक-संवादाने आपण बोललेल्या आहेत. कदाचीत बाकीचे सर्व त्यासाठीच राखुन ठेवतो.

पुढे पुर्ण आयुष्य आहे. मला माहीत आहे, तुम्ही कुठेतरी आजुबाजुलाच आहात. मी दुःख सावरुन लवकरात लवकर नॉर्मल व्हावे, कुटुंबाला सांभाळावे आणि सदैव सुखी रहावे अशीच तुमची इच्छा असणार आणि ती मी नक्की पुर्ण करीन.

तुम्ही फक्त सदैव माझ्या पाठीशी रहा.

तुमचा,
पिल्लु….

ओबामा


“ते आले, त्यांनी पाहीले आणि त्यांनी जिंकले”

सकाळी सेंट झेवियर कॉलेजमध्ये अमेरीकाचे राष्ट्राध्यक्ष ’बराक ओबामा’ ह्यांचे संभाषण पहात होतो त्यावेळेस माझ्यामनात काहीशी अशीच भावना होती. त्यांचे रुबाबदार व्यक्तीमत्व आणि चेहर्‍यावरील चिरपरीचीत मिलीयन डॉलर हास्य पहातच तरूणाईने उत्स्फुर्तपणे उभे राहुन टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. त्यानंतरच्या त्यांच्या संवादाने मी खरोखरच भारावुन गेलो होतो.

त्यांचे वक्तृत्व कौशल्य तर सर्व श्रुत आहे, परंतु मला भावले ते त्यांचे सर्वांमध्ये मिसळुन, सर्वांना उद्देशुन केलेला संवाद. मनाने नकळत त्यांची तुलना आपल्या नेत्यांशी केली. श्रोत्यांपासुन कित्तेक अंतर दुर राहुन केलेले भाषण कसे मनापर्यंत पोहोचणार?

अमेरीकेचा राष्ट्राध्यक्ष असुनसुध्दा त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशुन व्यक्त केलेले मुद्दे अत्यंत महत्वाचे होते. भारताला आर्थीक प्रगतीमध्ये आणि विकसनशील पासुन विकसीत देश होण्यामध्ये आजच्या पिढीचा सहभाग किती महत्वाचा आहे ते त्यांनी वारंवार अधोरेखीत करुन दिले. आपल्या नेत्यांची भाषण नकळत मनामध्ये जिवंत झाली. कुणी शेंदुर फासलेले दगड, कोणी शेंगांची टरफलं, तर कोणी अजुन काय काय विशेषण लावुन केवळ विरोधी नेत्यांची केलेली टींगल आणि मिळवलेले हासेच जास्त होते. भाषणाच्या शेवटी आजच्या पिढीला त्यातुन घेण्यासारखे असे काय असते?

’बराक ओबामांनी’ विचारलेले ३ प्रश्न तरूणाईला अंतर्मुख करुन गेले –
१. येत्या २० वर्षात तुम्ही भारताला कुठे पहाता?
२. येत्या २० वर्षात तुम्ही भारत आणि अमेरीकाचे संबंध काय अपेक्षीत करता?
३. हे जग अधीक चांगल करण्यासाठी तुम्ही प्रत्येकजण काय करु इच्छीता?

जगाचं सोडा, भारत देश्याबद्दलच्या भवितव्याबद्दल असे प्रश्न आपल्या कुठल्या नेत्याने तरूणाईला विचारलेले मला आठवत नाही.

ओबामांचा प्रेझेंन्स खरंच आल्हाददायक होता. त्यांचं हात उंचावुन, हसतमुखाने केलेले अभिवादन मनाला भिडणारे होते. आपल्या नेत्यांपैकी कितीजणांच्या अभिवादनात आपलेपणा असतो? किती जणांचा प्रेझेंन्स मनाला सुखावणारा असतो? मला स्वतःला ’राज ठाकरे’ आणि ’राहुल गांधी’ सोडले तर इतर कुणाच्या तोंडाकडे सुध्दा पहावेसे वाटत नाही. अप्पलपोटेपणा, लाचारी, लाळघोटेपणा, स्वार्थीपणा, मग्रुरी, माज, लोचटपणा, लबाडी बहुतेकांच्या चेहर्‍यावरुन ओसंडुन वहात असते.

संभाषण संपल्यावरसुध्दा कित्तीतरी वेळ जमेल त्याच्याशी हस्तांदोलन करत होते, जमेल त्याच्याशी संवाद साधत होते. त्यांचा संवाद हा एकाजागेवर बुजगावण्यासारखं उभं राहुन कागदांवर लिहीलेले वाचुन केलेला मोनोलॉग नव्हता तर हातामध्ये माईक घेऊन बहुतेक प्रेक्षकाशी आय-कॉन्टाक्ट करत केलेला डायलॉग होता. पॉझीटीव्हनेस त्यांच्या वक्तव्यातुन ओसंडुन वहात होता. मला क्षणभर वाटलं.. खरंच किती करायचं बाकी आहे, कित्ती गोष्टी करण्यासारख्या आहेत. वाटलं, आपण खरंच वेळ वाया घालवतो आहे, उठाव, लॅपटॉप उघडावा आणि कंपनीच्या व्ही.पी.एन जोडुन कामाला सुरुवात करावी.

अमेरीका-भारत एकत्र होणं आणि एकत्र होणं खुप महत्वाचे आहे. दोन्ही देशांना एकमेकांकडुन घेण्यासारखे आणि एकमेकांना देण्यासारखे खुप काही आहे. अमेरीकेकडुन खरंच काही घ्यायचे असेल तर भारताने त्यांचे पॉलीटेशीयन्स घ्यावेत, त्यांची सार्वजनीक सुरक्षा व्यवस्था घ्यावी, त्यांची टेक्नॉ्लॉजी घ्यावी. बहुतेक देशांमध्ये पुढच्या तासाला काय हवामान असेल अश्या सुविधा असताना, भारताकडे मात्र अजुनही भरवश्याची वेदर-फोरकास्ट सिस्टीम नाही. ह्या माध्यमातुन मला वाटतं अमेरीका रोजगार निर्मीती करु शकेल. ह्याउलट कुशल आणि लो-कॉस्ट मनुष्यबळ ही भारताची जमेची बाजु आहे.

त्यांनी घेतलेले काही निर्णय जसे पाकीस्तानला सहाय्य, अफगाणीस्तानात अजुनही तंबु ठोकुन असलेले अमेरीकेचे सैन्य आणि भारतातील आऊटसो्र्सींगवर बंदीची घोषणा वगैरेमुळे भारतीय जनमानसात तरी त्यांच्याबद्दल मिश्र प्रतिक्रिया आहेत. पण शेवटी आपण हे लक्षात घेतले पाहीजे की हे निर्णय त्यांचे वैयक्तीक निर्णय नसुन अमेरीकेचे आहेत.

कुणाचे काहीही मत असो, पण मला मात्र मि.प्रेसिडेन्ट, बराक ओबामा भावले.

दिपावलीच्या शुभेच्छा


“डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा” ब्लॉगच्या सर्व वाचकांबरोबरच इतर सर्व मित्र आणि मैत्रिणींना दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा

~ अनिकेत

ब्लॉग माझा – ३


स्टार-माझा चे अ‍ॅन्कर आणि ’ब्लॉग-माझा’ स्पर्धेचे आयोजक/सह-निर्माते श्री प्रसन्न जोशी ह्याच्याकडुन स्पर्धेच्या तिसर्‍या वर्षाबद्दल माहीती देणारी ई-मेल मिळाली. इतरांना त्याचा लाभ व्हावा म्हणुन ती मेल इथे जोडत आहे.

सर्वांनी जरुर सहभाग घ्यावा. सर्व स्पर्धकांना माझ्या मनःपुर्वक शुभेच्छा. May the best blog win!

~ अनिकेत समुद्र
स्टार-माझा, ब्लॉग माझा – २ (२००९-२०१०) विजेता 🙂


नमस्कार मंडळी! ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या आयोजनाचं हे तिसरं वर्ष. पहिली ‘ब्लॉग माझा’ स्पर्धा घेतल्यानंतरच्या काळात मराठी ब्लॉगॉस्फिअरमध्ये खूप गोष्टी घडल्यायत. मराठी ब्लॉगर्सच्या पुण्या-मुंबईत गाठी-भेटी झाल्या, पुण्यातल्या साहित्य संमेलनापूर्वी आयोजित ‘संमेलनपूर्व संमेलन’ या कार्यक्रमात मराठी ब्लॉग, ब्लॉगर्सबाबत गंभीर चर्चा झाली, मराठी ब्लॉगर्स मंडळी इंटरनेटवर एकत्र आली, वृत्तपत्रांनी, नियतकालिकांनी मराठी ब्लॉगॉस्फिअरची ठळक दखल घेतली. एकूणच मराठी ब्लॉगॉस्फिअर देशातल्या प्रादेशिक ब्लॉगॉस्फिअरमध्ये दखल घेण्यायोग्य ठरलंय. हीच मराठी ब्लॉगरशिप सेलिब्रेट करतोय ‘स्टार माझा’; ‘ब्लॉग माझा’ सिझन-३च्या रूपानं.
विशेष म्हणजे यावेळी आपले परिक्षकही खास आहेत. ज्यात आहेत लीना मेहेंदळे ज्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तर आहेतच, पण संवेदनशील लेखिका आणि मराठी ब्लॉगरही आहेत. मराठीतल्या ‘साधना’ या प्रतिष्ठित साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ आपले संपादकीय कौशल्य पणाला लावून तुमचे ब्लॉग तपासतील. तसंच, आयटी तज्ज्ञ माधव शिरवळकर हेही परिक्षक मंडळात आहेत.
तेव्हा, मंडळी तुमच्यात दडलेल्या लेखक / लेखिकेला केवळ डायरी, फेसबुक, ऑर्कुट किंवा ट्विटर पुरताच ठेवू नका. या स्पर्धेत भाग घ्या. ब्लॉगवर ताजं लिहिलं असेल तर ठिकच नाही तर ब्लॉग अपडेट करा. ब्लॉग नसेल तर या स्पर्धेच्या निमित्तानं सुरू करा.
काय म्हणालात? बक्षिसाचं काय? अहो, बक्षीसे आहेतच की! पहिल्या तीन जणांना आणि उर्वरीत दहा जणांना उत्तेजनार्थ. आता काय बक्षीसं आहेत ते गुपित राहू द्या की! शिवाय, तुमच्या निवडलेल्या ब्लॉगला ‘स्टार माझा’च्या वेबसाईटवर प्रसिद्धी आणि बक्षीस वितरण समारंभ थेट ‘स्टार माझा’वर!
मराठी माझी, ब्लॉग माझा, स्टार माझा……………..शुभेच्छा!

स्पर्धेचे स्वरूप-

१. ब्लॉग मराठीतच लिहिलेला हवा (देवनागरी)

२. अठरा वर्षांपुढील कुणीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतं.

३. सर्वोत्तम ब्लॉग निवडण्याचे अधिकार पूर्णत: परिक्षक आणि स्पर्धा संयोजकांकडे असतील. त्याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण देण्यास परिक्षक, संयोजक, स्टार माझा बांधिल नसतील. तुमच्या एन्ट्रीज या तुम्हाला अटी मान्य असल्याच्या निदर्शक असतील.

४. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी blogmajha3@gmail.com या ई-मेल अँड्रेसवर ई-मेल करावा. ज्यात, तुमचे नाव, पत्ता, व्यवसाय, दूरध्वनी क्र, मोबाईल क्र, व ई-मेल द्यावा. ई-मेल अँड्रेस देणं अनिवार्य आहे. याशिवाय, तुमच्या ब्लॉगची लिंक द्यावी.

५. या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही.

६. एकावेळी एका स्पर्धकाला फक्त एकच ब्लॉग पाठवता येईल.

७. ब्लॉग पाठवण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०१०. स्पर्धेचे निकाल ऑक्टोबर २०१०च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होतील. तसेच, संबंधित विजेत्यांना पत्र अथवा ई-मेलद्वारे निकाल कळवला जाईल.

८. यानंतर ‘स्टार माझा’च्या खास एपिसोडमध्ये विजेत्यांचा सत्कार करण्यात येईल व पुरस्कार वितरण होईल.

९. स्पर्धेचे आयोजन, नियमावली, अटी, बक्षीसे यासंदर्भात कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय बदल करण्याचे अधिकार स्टार माझाकडे असतील.

११.ब्लॉगमधला कंटेंट स्वत:चाच असावा. जर अन्य स्त्रोतांकडून माहिती घेतली असेल, तर त्यांचा नाममिर्देश करावा. ब्लॉग या माध्यमाचे महत्व जपावे. ब्लॉग व त्यातील मजकूर आपलाच असल्याचे सिद्ध करणे, ही स्पर्धकाची जबाबदारी आहे.

ता. क. एन्ट्रीज blogmajha3@gmail.com वरच पाठवा.

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा


भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्व वाचकांना हार्दीक शुभेच्छा.

देवाला एकच विनंती, भारत देशाची आम्ही शाळेत घेतलेली प्रतिज्ञा आम्हाला विसरु देऊ नको. प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पानावर मानाने विराजमान झालेल्या ह्या प्रतिज्ञेला आज मनातल्या कुठल्या का होईना एखाद्या पानावर एक स्थान आहे, ते असेच निढळ राहु देत.

भारत माझा देश आहे।
सगळे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या देशावर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।

जय हिंद… जय भारत

दोन वर्षापुर्वी बनवलेल्या एका छोट्याश्या, आधीच पोस्ट केलेल्या एका डॉक्युमेंटरी फिल्मला पुन्हा एकदा इथे जोडत आहे.. एकच विनंती म्हणुन.. “……जरा याद करो कुर्बानी..”

खालील व्हिडीओवर टीचकी मारून तुम्ही ती पाहु शकता.

Vodpod videos no longer available.

नागपंचमी


नागपंचमी

नागपंचमी

पुराणकाळातील “कालीया मर्दनाची कथा” ते अगदी परवा-परवा पर्यंत रौद्र रुपात भेटीस येणारा “ऍनाकोंडा” अश्या अनेक रुपातुन सर्पाची आपल्याला ओळख आहे.

इतकेच काय पण नव्याने येऊ घातलेल्या मल्लीका शेरावतच्या “हिस्स” चित्रपटाची उत्सुकताही प्रचंड ताणली गेली आहे. परंतु श्रावण सुरु होतो आणि श्रावण महीन्यातील शुद्ध पंचमीला येणारा, पहीला महत्वाचा सण म्हणजे “नागपंचमी” च्या दिवशी हाच नागराज घरोघरी देवतेच्या रुपात विराजमान होतो. ह्या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करतात.

आज नागपंचमी, त्यानिमीत्त जाणुन घेऊ यात ह्या सणाबद्दल –

नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात. तसेच या दिवशी जमीन खणु नये, शेतामध्ये नांगर चालवु नये असेही म्हणले जाते.

श्रावणातील बहुतेक सणांना इतिहास आहे आणि तो इतिहास कथांच्या स्वरुपातुन पिढ्यांपिढ्या पुढे पोहोचवला जातो. नागपंचमीच्या बाबतीत सुध्दा अशीच एक कथा प्रचलीत आहेत ति आपण पाहु.

एका राज्यात एक गरीब शेतकरी कुटुंब होते. त्या शेतकर्‍याला दोन मुले व एक मुलगी होती. एकदा शेतात नांगर फिरवत असताना शेतकर्‍याकडून नागाची तीन पिल्ले चिरडून मरण पावतात. मरण पावलेल्या पिल्लांकडे पाहून नागिणीने आक्रोश केला. त्यानंतर नागिणीच्या मनात त्या शेतकर्‍याविषयी सूडाची आग धगधगू लागली. एके दिवशी तिने शेतकर्‍याचा सूड घ्यायचे ठरवले. रात्री अंधाराचा फायदा घेऊन नागीण शेतकर्‍यासह त्याची पत्नी व दोन मुलांना डसली.

दुसर्‍या दिवशी नागीण पुन्हा शेतकर्‍याच्या मुलीला डसण्यासाठी त्याच्या घरी आली. परंतु नागीणीला पाहताच शेतकर्‍याच्या मुलीने नागिणीसमोर दुधाने भरलेली वाटी ठेवली व तिची क्षमा मागितली. शेतकर्‍याच्या मुलीची श्रद्धा पाहून नागीण तिच्यावर प्रसन्न झाली. त्यानंतर नागिणीने तिचे आई-वडील व दोन भाऊ यांना जिवंत केले. तो दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा. या दिवसापासून नागदेवतेचा कोप दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात येणार्‍या पंचमीला नागाचे विधिवत पूजन केले जाते.

नागपंचमीच्या दिवशी केल्या जाणार्‍या विविध कृती व त्या करण्यामागची कारणे

  • उपवासाचे महत्त्व
  • पाच युगांपूर्वी सत्येश्‍वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्‍वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्‍वराचा मृत्यु नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्‍वरीने अन्न ग्रहण केले नाही. त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. `भावाला चिरंतन आयुष्य व अनेक आयुधांची प्राप्‍ती होवो आणि तो प्रत्येक दु:ख व संकट यांतून तारला जावो’, हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याचा भावाला ७५ टक्के लाभ होतो व त्याचे रक्षण होते.

  • नागाची पूजा करण्यामागील शास्त्र
  • सत्येश्‍वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.

  • नवीन वस्त्रे व अलंकार घालण्याचे कारण
  • सत्येश्‍वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला. त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी व तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली. तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले. त्यातून सत्येश्‍वर समाधानी झाला. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्रे व अलंकार परिधान करतात.

  • मेहंदी लावण्याचे महत्त्व
  • सत्येश्‍वर नागराजाच्या रूपात सत्यश्‍वेरीच्या पुढ्यात उभा राहिला. `तो निघून जाईल’, असे वाटून तिने त्याच्याकडून, म्हणजे नागराजाकडून तसे हातांवर वचन घेतले. ते वचन देतांना सत्येश्‍वरीच्या हातांवर वचनचिन्ह निर्माण झाले. त्या वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वत:च्या हातांवर मेहंदी काढते.

  • झोका खेळण्याचे महत्त्व
  • दुसर्‍या दिवशी सत्येश्‍वरीला नागराज दिसला नाही. तेव्हा ती जंगलात सैरावैरा भटकू लागली व शोधता शोधता झाडांच्या फांद्यांवर चढून पाहू लागली. त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्येश्‍वराचे रूप प्रकट केले. तेव्हा ती आनंदाने झाडांच्या फांद्यांवर झोके घेऊ लागली. त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात. त्या दिवशी झोका खेळण्यामागील उद्देश असतो – `जसा झोका वर जातो, तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे व झोका खाली येतो, तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी व दु:खे खाली जाऊ देत.’

`नागपंचमी’ श्रावण शुद्ध पंचमीलाच का येते ?

अ. पुराणांमध्ये एक कथा आहे. तक्षक नागाने केलेल्या अपराधाबद्दल सजा म्हणून राजा जनमेजयान सर्पयज्ञ सुरू केला. या सर्पयज्ञात त्याने सर्व सर्पांच्या आहुती देणे सुरू केले. तक्षक नाग मग स्वत:चा जीव वाचवण्यासाठी देवराज इंद्राच्या आश्रयाला गेला. राजा जनमेजयान मग `इंद्राय स्वाहा: तक्षकाय स्वाहा: ।’ असे म्हणत इंद्राचीही आहुती तक्षक नागाबरोबरच देऊन टाकली. आपल्या या कृतीतून राजा जनमेजयान अपराध्याइतकाच अपराध्याला रक्षण देणाराही तितकाच अपराधी हे दाखवून दिले. आस्तिकऋषींनी राजा जनमेजयाला तप करून प्रसन्न करून घेतले. जनमेजयान आस्तिकऋषींना `वर मागा’ असे म्हटले आणि मग आस्तिकऋषींनी सर्पयज्ञ थांबवावा, असा वर मागितला. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. म्हणून या दिवशी नागपंचमी हा सण येतो. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी हा होता. या दिवशी हळदीने किंवा रक्‍तचंदनाने पाटावर नवनागांच्या आकृत्या काढतात. त्यांना हळदकुंकू वाहून पूजा करतात. नंतर दूध- लाह्यांचा नैवेद्य दाखवतात.

आ. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.

कालानुरुप समाजाने अनेक विधी, घटना कालबाह्य, थोतांड ठरवल्या. नागपंचमीच्या दिवशी सर्पाला मिळणारे अवास्तव महत्व जाणुन गारुडी लोकांनी त्याचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. सर्प दुध पितच नाही, किंबहुन पित असला तरी दारोदारी येणारी सापांची तोंड शिवलेली असतात त्यामुळे नैवेद्य म्हणुन दिलेले दुध हे त्यांना मिळतच नाही आणि काही दिवसांनी हे साप मृत्युमुखी पडतात. ह्यासाठीच सरकारने नागपंचमीच्या दिवशी ’नागोबाला दुध’ म्हणत फिरणार्‍या लोकांवर बंदी घातली. सर्पमित्रांनी अश्या अनेक सापांची गारूड्यांच्या तावडीतुन सुटका केली आणि त्यांना परत अरण्यात सोडुन दिले.

अर्थात खरे सर्प उपलब्ध नसले तरी बहुतेक ठिकाणी नागदेवतेच्या प्रतिमेची पुजा केली जाते. दुध, भाजलेले चणे, भात, लाह्या वगैरेंचा नैवेद्य दाखवला जातो.

माहीती स्त्रोत / अधीक माहीती

४९८ (अ)


आजही आपली संस्कृती ही पुरूष-प्रधान म्हणली जात असली तरीही निदान शहरी परीस्थीती तितकीशी खरी नाही. आज बहुतेक सर्व क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत, अगदी पुरुषांसाठी बनवल्या जात असलेल्या कंडोमच्या जाहीरातीत सुध्दा स्त्रियांचा शिरकाव आहे. हुंडा-बळी, विवाहीतेचा सासरी पैश्यासाठी छळ वगैरे बातम्यांमध्ये लक्षणीयरीत्या घट झालेली आहे. स्त्रिया सक्षम होऊ लागल्या आहेत जे नक्कीच स्वागतार्ह आहे, पण त्या अनुषंगाने काही घटनांचा उल्लेख करावासा वाटतो ज्याचा उपयोग काही स्त्रिया स्वतःच्या स्वार्थासाठी करुन सासरच्या लोकांवर खोटारडे गुन्हे दाखल करत आहेत आणि ह्याला कारणीभुत आहे कायद्यातील कलम ४९८ (अ)

सर्वप्रथम आपण ४९८ (अ) कलम काय आहे ते पाहु.

४९८अ, हे कलम १९८३ साली अस्तित्वात आले. त्यामध्ये विवाहितेचा हुंड्यासाठी छळ केल्यास पती व नातेवाईकांना कारावासाची शिक्षा होऊ शकते.

४९८ (अ) कलमानुसार कोणत्याही स्त्रिने जवळच्या पोलीस ठाण्यात हुंडा-बळी किंवा घरगुती छळाविरुध्द तक्रार केली तर कोणतीही पोलीसचौकशी न करता ज्यांच्या विरुध्द तक्रार दाखल झालेली आहे त्यांना पोलीस-कठडीमध्ये टाकण्याचे हक्क पोलीसांना देण्यात आलेले आहेत. परंतु ९९% वेळा असे लक्षात आलेले आहे की ह्या कायद्याचा दुरुपयोगच जास्त होत आहे. कित्तेक वेळा जाणुन-बुजुन तर कधी नकळतपणे.

काही प्रकरणांमध्ये, पतीच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला, त्याचा काहीही संबंध नसला तरीही अटक करण्यात येते. बऱ्याच प्रकरणांमध्ये इतर कुठल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी ह्या कलमाचा दुरुपयोग केला जातो. अनेक प्रकरणांमध्ये क्षणिक रागामुळे, केसेस केल्या गेल्या, आणि त्यामुळे, अनेकांचे संसार कायमचे उध्वस्त झाले. जरी घटस्फोटाचा खटला चालू असला, तरी ४९८अ बिगर समजुतीचा असल्यामुळे ४९८अ चा खटला चालूच राहतो.

४९८(अ) विरुध्द दाखल झालेला गुन्हा हा दखलपात्र गुन्हा आहे आणि ह्यात तत्काळ कारवाई करुन आरोपी(??)ला तुरुंगवास घडवुन आणला जातो. ह्यामुळे तक्रार खरी आहे की खोटी ह्याची शहानीशा न करता सरळसोटपणे तुरुंगवास भोगावयाला लागतो. तक्रार खोटी असेल तरीही ती केस कोर्टात उभी राहुन, आरोपातुन निर्दोष मुक्तता होईपर्यंत कोठडी नशीबी येतेच. त्याकाळात सामाजीक जिवन तर उध्वस्त होतेच, परंतु निर्दोषत्व मान्य झाल्यावर सुध्दा कळत-नकळत पणे समाजाचा ’त्या’ व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टीकोन बिघडुन जातो. हा प्रकार म्हणजे थोडक्यात “तोंड दाबुन बुक्यांचा मार’ प्रकार होऊ लागला आहे. पिडीत व्यक्तींच्या मदतीसाठी सुध्दा अजुन तरी कुठल्या संस्था स्थापन झाल्याचे ऐकिवात नाही. स्त्रि-मुक्ती साठी पदर सरसावुन पुढे येणार्‍या सामाजीक संस्था सुध्दा अश्या वेळेस मुग गिळुन गप्प का बसतात हे मला न सुटलेले कोडं आहे.

मानवाच्या शरीरात, त्याच्या हार्मोन्समध्ये पिढी-दर-पिढी बदल होत असतात, त्यांचे संक्रमण होतच असते. त्याचाच परीणाम म्हणुन की काय स्त्रिच्या अंगी कठोरपणा आला, स्त्री चुल आणि मुल सोडुन घराच्या चौकटीबाहेर पडली, त्या विरोधात पुरुष मात्र हळवा झाला. निडर छातीने समाजाशी लढणारा पुरुषाच्या एकांतात का होईना डोळ्याच्या कडा पाणावु लागल्या.

हे सर्व लिहीण्याचे कारण की गृहमंत्रालयाने ४९८(अ) कायद्याचा पुर्नविचार करावयाचा ठरवले आहे. ४९८(अ) कायद्यान्वये दाखल होत असलेले खोटे गुन्हे आणि त्याचा गैरवापर गृहमंत्रालयाने मान्य केला आहे आणि त्याचीच दखल घेत गृह-मंत्रालयाने ४९८-अ विरोधात दाखल होणार्‍या गुन्ह्यात सरळसोट अटक न करता पुर्व चौकशी करुनच कारवाई करण्याचे आदेश राज्य-पोलीसांना दिले आहेत.

ह्या पुर्वीसुध्दा न्यायालयाच्या निकालांचा आधार घेत, ह्या कलमामध्ये दुरुस्तीचा प्रयत्न केला गेला, पण महिला संघटनांच्या विरोधामुळे ते शक्य झाले नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने, असे म्हटले आहे कि ” ४९८अ चा गैरवापर .. हा विवाह संस्थेच्या मुळावर आघात करीत आहे, आणि सामाजिक स्वास्थासाठी हा कायदा अयोग्य आहे” त्याचीच री ओढत पुन्हा एकदा ह्या कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी एक पाऊल सरकारने पुढे टाकले आहे.

“भारतीय कायदा अंधळा आहे” ह्या विधानाला धक्का देत सरकारने जो निर्णय घेतला आहे त्याचे स्वागत करावे तितके कमीच आहे

Subscribe to डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा by Email

वेगळा वेगळा


“मराठीब्लॉग्सविश्व.नेट”, एक अत्यंत सुंदर व्यासपिठ आहे तुमचा ब्लॉग लाखो वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. असंख्य विचार, असंख्य विषय, अनेक व्यक्तीमत्व आणि त्यांना शब्दात बांधण्याचा प्रयत्न करत त्यांच्या व्यक्तीमत्वाचे पैलु मांडणारे तितकेच असंख्य ब्लॉग.

माझ्यासाठी, एक काळ असा होता जेंव्हा ह्या संकेतस्थळावर गेलो की वेळ कसा जायचा समजायचे नाही. पण काळानुरुप हेच संकेतस्थळ मला कंटाळवाणे वाटु लागले. नव्याची नवलाई, एक कारण असु शकेल. पण माझे परखड मत असे पडले की आजकाल काहीच्या काही पोस्ट असतात. आहे ब्लॉग म्हणुन काहीही कश्यावरही लिहावं का? माझ्या मते हे प्रत्येकाचे वैयक्तीक मत आहे आणि त्याचा मी आदर करतो. परंतु ह्या फोरमवर जेंव्हा मी जातो तेंव्हा काही निवडक ब्लॉग्स सोडले तर, बहुसंख्य ब्लॉग्स मी न वाचताच पुढच्या पानावर जातो. खरं सांगायचे तर वाचनीय असं काही दिसतच नाही. विक्रांतची “आवरा” ची पोस्ट वाचल्यावर वाटले बहुतांश ब्लॉगर्सना “आवरा” म्हणण्याची वेळ आलेली आहे. (आणि कदाचीत त्यात मी सुध्दा असेन)

हाच विचार मनामध्ये चालु असताना मनात आले, जसे इतरांचे ब्लॉग्स मला कंटाळवाणे वाटतात, कश्यावरुन माझा ब्लॉग इतरांना कंटाळवाणा वाटत नसेल? बस्स..हाच तो विचार होता जो मला असह्य झाला. सर्वजण असतात, त्याप्रमाणेच मी सुध्दा माझ्या ब्लॉगच्या बाबतीत भयंकर पॅशनेट आहे आणि त्यामुळेच कदाचीत हा विचार मनाला झोंबुन गेला. मग ठरवले, बास, माझा ब्लॉग “मराठीब्लॉगविश्वाच्या” यादीतुन काढुन टाकायचा. जेणेकरुन त्या लाखो ब्लॉग्समध्ये निदान माझा ब्लॉग असणार नाही. मला जशी काही ब्लॉग्सचे विषय बघुन चिडचिड होते, तशी निदान कुणाला माझा ब्लॉग बघुन होत असेल तर होणार नाही.

त्याचबरोबर दुसराही विचार, जो सतत माझ्या मनात असायचा की “मी पब्लीक फोरम वर लिहीतो आहे” त्यामुळे कित्तेक गोष्टी.. लिहायची इच्छा असुनही लिहील्या नाहीत.

आज हा ब्लॉग मराठीब्लॉगविश्वाच्या यादीतुन काढुन टाकल्यामुळे इथुन पुढे माझा ब्लॉग हा स्वतंत्र राहील, स्वतःच्या पायावर ठाम उभा, स्वतःच्या विचारांशी घट्ट जोडलेला राहील. आणि म्हणुनच, ह्या भुंग्याने एका फुलावर बसवलेले बस्तान हलवण्याचा निर्णय घेतला. आशा करतो की ही, आणि इथुन पुढे इतर कुठलीही पोस्ट मराठीब्लॉगविश्वाच्या यादीतुन दिसणार नाही. वाचकवर्गाने उजवीकडे दिलेला पर्याय वापरुन ब्लॉगला सबस्क्राईब करुन घेतल्यास नविन पोस्टची माहीती तुम्हाला तुमच्या ई-मेल पत्यावर पोहोचती होईल.

तुम्ही हा ब्लॉग “बुकमार्क” करुन ठेवु शकता किंवा जर तुम्ही माझ्याशी ट्विटर किंवा फेसबुकवर जोडले गेलेले असाल तर नविन पोस्टची माहीती तेथे प्रकाशीत होतेच.

चला तर मग, इथे भेटत राहुच.

“थेऊरची पार्टी”, खरंच इतकं काय वाईट झालं?


“थेऊरची पार्टी” अनेक कारणांनी रंगली. युवतींचा लक्षणीय सहभाग, त्यांचे तोकडे कपडे, दारूचा साठा वगैरे वगैरे. त्यावर अनेक लोकांनी भाष्य करुन आजची पिढी कशी बिघडली आहे ह्यावर फुकटची मतं ऐकवली. पण मला अजुन कळत नाही खरंच ’ते’ इतकं गैरे होते का?

ह्या बद्दलची माझी वैयक्तीक मतं इथं मांडत आहे. कदाचीत पुर्णपणे चुकीची असतील, पण ती माझी मतं आहेत आणि माझ्या मतांचा मी आदर करतो.

– माझ्या दृष्टीने एकमेव गैर प्रकार ज्यावर पोलीसांनी कारवाई केली तो म्हणजे अनाधीकृतरीत्या मद्य विक्री. कायदा ह्याला मान्यता देत नाही आणि त्यामुळे पोलीसांनी केलेली कारवाई ही योग्य आहे.

– कॉलेजमध्ये शिकत असताना दारू पिऊन धांगडधिंगा घातला ह्यावर मिडीयाने आणि अनेक लोकांनी टीकेची झोड उठवली. मला वाटतं ह्या गोष्टीला दोन पैलु आहेत आणि ह्याचा दुसरा पैलु समजावुन घेणे देखील महत्वाचे आहे.

वर्षाऋतुमध्ये माळशेज घाट, ताम्हीणी घाट, लोणावळा सारख्या ठिकाणी अनेक विकृत मद्यपिंचा दंगा चालतो. काही दिवसांपुर्वी तर ताम्हीणीच्या थोडं पुढे काही मद्यपी नग्नावतारात बेधुंद होते. ह्याचा त्रास तरूणींबरोबरच सहकुटुंब आलेल्या परीवारांनादेखील होतो. पण असल्या प्रकाराची मिडीयाकडुन कितीशी दखल घेतली जाते?

ह्या उलट मी म्हणेन ह्या विद्यार्थ्यांनी पुणे शहराबाहेर एखाद्या फार्महाऊसमध्ये ’फ्रेंडशीप डे’चे औचित्य साधुन पार्टी केली तर बिघडले कुठे? समाजाला त्याचा पहील्याउदाहरणाइतका तर त्रास नाही ना झाला? जो काही गोंधळ त्यांनी केला तो त्यांच्या त्यांच्यात केला. नाही कुणाची छेड काढली नाही कुणाला त्रास दिला.

ह्या पार्ट्या रोज रोज खचीतच होत नसणार अन्यथा रोजच ८०० लोकांना पकडल्याच्या बातम्या झळकल्या असत्या. मग एखाद्या खास दिवशी एकत्र जमुन केली पार्टी तर बिघडले कुठे?

मान्य आहे तुम्ही शिकण्यासाठीच आला आहात, पण म्हणुन सर्व काही सोडुन देवुन केवळ शिक्षणच घ्यायचे असा त्याचा अर्थ होतो का? आणि कुठल्या शिक्षणाच्या आपण गप्पा मारतोय? ते शिक्षण जेथे केवळ जातीमुळे एखाद्याला ६०% ला प्रवेश मिळतो आणि ९०%वाला डावलला जातो? शैक्षणिक वर्षात शिकलेल्या किती गोष्टी आपण व्यवहारात आणतो? च्यायला डावीकडुन एक रेल्वे इंजीन येते आहे, नैऋत्येकडुन दुसरी रेल्वे येत आहे. मध्ये एक खांब् आहे, त्यावर एक पक्षी बसला आहे तो काही काळाने ताशी २० कि.मी. प्रती/तास वेगाने उडाला तर जेंव्हा ह्या दोन रेल्वे गाड्या एकमेकांना क्रॉस करतील तेंव्हा पक्ष्याची दिशा सांगा!!.. असली गणीत किती जणांना व्यवहारात उपयोगी पडतात?

मला वाटतं आजची पिढी रिअलॅस्टीक आहे. कामाच्या वेळेला काम आणि एन्जॉयमेंटच्या वेळेस एन्जॉयमेंटचे तंत्र त्यांना चांगले जमलेले आहे.

मी दारू पिण्याचे समर्थन करत नाहीये, पण एन्जॉयमेंट म्हणजे दारू पिणे हे त्यांना कुणी शिकवले? ड्र्ग्ज घेणे हे कदापी समर्थनीय नाही, कायदा सुध्दा त्यावर बंधन घालतो. पण दारु ही बहुतांश सर्वसामान्यांच्या जिवनात विराजमान झालेली आहे हे आता आपण मान्य करायलाच हवे. आणि दारू पिणे पाप आहे तर नॉन-व्हेज खाण्याचं काय? निदान दारू मुळे कुठल्या मुक्या प्राण्याचा जिव तरी जात नाहीये? सणासुदीला कित्तेक लोकं मुक्या प्राण्यांच्या जिवावर आनंद साजरा करतात. ते योग्य का?

“…अरे मग आधी शिका, कमवायला लागा आणि मग स्वतःच्या पैश्याची प्या वाट्टेल तेवढी दारू..” असंच ना?
मला एक सांगा, नोकरीला लागल्यावर, संसारात रमल्यावर ह्या पार्टीत जी मज्जा होती ती मिळु शकेल? कश्यावरुन ह्या पार्टीतली सर्वच्या सर्व मुले बापाच्या पैश्यावरच पार्टीत आली असतील? कश्यावरुन त्यांच्यामधलं कुणी पिझ्हा हट, बिपीओ, कॉल-सेंटरसारख्या ठिकाणी काम करत नसेल?

– तोकडे कपडे.. कुणी शिकवले त्यांना हे? आपल्या आधीच्या पिढीनेच ना? हेलन, किमी काटकर, मंदाकीनी, झिनत अमान ह्यांचे नाचतानाचे, पाण्यात चिंब भिजलेले गरम शॉट्स आधीच्या पिढीनेच तर ’खो’ देऊन आपल्या पिढीला दिले आहेत ना?
.. म्हणे तरूणाई पाश्चात्यांचे अनुकरण करते… का? आधीची पिढी नव्हती करत? साहेबांनी कोट, टाय घालायची पध्दत काय आपल्या राजा महाराजांकडुन आली? बेलबॉटम पॅन्ट्स, मोठ्ठे गॉगल्स, लेफ्ट हॅन्ड ड्राईव्ह गाड्या हे कोणी आणले. राजेश खन्ना किंवा अमीताभ बच्चन सारखी हेअर स्टाईल आधीच्या पिढीने केलीच ना? मग ह्या पिढीने त्यांच्या लाडक्या सुपर-स्टार्सचे अनुकरण केले तर कुठे बिघडले?

तोकड्या कपड्यांची कुणी सक्ती करत नाही. ज्याला पाहीजे तो घालेल, ज्याला नाही, तो नाही घालणार. जर घालणार्‍याला त्याचे काही कौतुक नाही, जर बघणार्‍याला त्यात विशेष वाटत नाही तर बाकीच्या लोकांनी का म्हणुन ओरड करावी? पुर्वापार चालत आलेली नऊ-वारी साडीची जागा सहावारी साडीने घेतलीच ना? अनेक महीला सहावारी साडीकडुन सलवार-कमीज घालु लागल्याच ना? फॅशन बदलतच असते.. त्याचा इतका का बाऊ करायचा?? मला तरी कळत नाही!!

– परप्रांतीय, काही झालं की परप्रांतीयांवर खडे फोडुन मोकळे व्हायचे. हे म्हणजे ’आमचा तो बाळ्या, दुसर्‍याचे ते कार्ट’ प्रकार झाला. मला वाटतं दोष परप्रांतीयांचा नाही, दोष असलाच तर तो स्वातंत्र्याचा आहे. मी स्वतः ’सिंम्बायोसिस महाविद्यालयाचा’ विद्यार्थी होतो. आपल्याच प्रांतातुन नागपुर, सांगली सारख्या ठिकाणांहुन आलेली मुलं अभ्यासाला दुर्लक्ष करुन ’इतर’ गोष्टींमध्ये रमलेली पहात असतानाच, नेहमी टीकेचा विषय ठरलेले ’बिहार’ सारख्या ठिकाणांवरुन आलेली मुल आणि मुली अभ्यासात वरचढच नव्हे तर पहील्या पाच क्रमांकामध्ये येत असताना पाहीलेले आहे. उद्या आपली मुलं दुसर्‍या ठिकाणी राहील्या गेल्यावर, आई-वडीलांचा धाक नाही म्हणल्यावर थोडी का होईना वहावत जाणारच.

– परदेशी नागरीक त्यांची संस्कृती आपल्या इथे आणतात म्हणुन आपण ओरडतोय, पण आपणही नाही का आपली संस्कृती तिकडे जाऊन रुजुवायला बघत. त्यांची संस्कृती आपल्या नजरेतुन वाईट असेल त्यांच्या नाही.

– आजच्या पिढीला ’करीयरची’ पुर्ण जाण आहे, आपल्या पेक्षा किंवा आपल्या आधीच्या पिढीच्या पेक्षा जास्तच. एके काळी ग्रॅज्युएट आणि बॅकेत नोकरी हा एकमेव करीयरचा मार्ग होता. पण आज करीयरच्या कक्षा विस्तारल्या आहेत आणि त्याची चांगली जाण विद्यार्थ्यांना आहे. सिंम्बायोसीसच्या बिझीनेस मॅनेजमेंटच काय परंतु इतरही अनेक विभागातुन कॅम्पस मधुन नोकरी मिळवणार्‍या विद्यार्थ्यांचे पगार पाहीलेत तर डोळे पांढरे होतील. नोकर्‍या देणार्‍या कंपन्यांना पैसे जास्त झालेले नाहीत कि ते उगाचच्या उगाच अश्या वाया गेलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यवसायात समावुन घेतील. त्यामुळे मला नाही वाटत बहुतांश विद्यार्थ्यांना आपल्या फुकटच्या सल्यांची गरज असावी.

काय चांगले काय वाईट हे वडीलधार्‍या नात्याने ज्याने त्याने आपल्या पाल्यांना जरुर सांगावे. परंतु सरसकट सर्वच पिढी वाया गेलेली आहे हे म्हणणे चुकीचे आहे. ४०-५०वर्ष वयाची माणसं सुध्दा दारु पिऊन रस्त्याच्या कडेला बेवारस पडलेली असतात म्हणुन ती संपुर्ण पिढीच दारूडी, वाया गेलेली होती म्हणणे चुकीचे आहे.

सर्वात शेवटी दोन छोट्या गोष्टी आठवल्या त्या सांगतो ..
एक पुरातन गोष्ट – एका गावात एका पापी स्त्रीला गावाच्या चौकात उभे केलेले असते आणि गावकरी तिला दगडं मारत असतात. त्याचवेळेस तेथे कोणी एक संत येतात आणि ते म्हणतात की ह्या स्त्रीला दगड मारण्याचा अधीकार फक्त त्याच व्यक्तीला आहे ज्याने आयुष्यात कधीही पाप केलेले नाही. त्यानंतर एकही दगड त्या स्त्रीवर फेकला जात नाही.

एक नवयुग (का काहींच्या मते असलेले कलयुग)तील गोष्ट – एका विमानतळावर एक माणुस हातामध्ये बिअरचा कॅन आणि सिगारेट घेउन विमानाची वाट बघत असतो.

एक सभ्य गृहस्थ त्याला म्हणतो.. “तुम्ही तुमचा पैसा सिगारेट किंवा बिअरमध्ये नसता घालवला तर तुम्ही खुप काही करु शकला असता.”

तो माणुस म्हणतो.. “जसे? काही?”
तो सभ्य गृहस्थ मिस्कीलपणे म्हणतो.. “जसे ते सर्व पैसे वाचवुन एक दिवस तुम्ही ते समोर उभे असलेले विमान विकत घेऊ शकला असता..”

तो माणुस, त्या सभ्य गृहस्थाला विचारतो…”मग? ते विमान तुमचे आहे का?”
तो सभ्य गृहस्थ नाही म्हणतो.

हातातली सिगारेट पायाखाली चिरडुन, बिअरचा एक घोट घेउन तो माणुस म्हणतो.. “गुड, तुमच्या माहीतीसाठी सांगतो, ते विमान माझे आहे..”

त्या माणसाचे नाव असते “विजय मल्या”….

अनेकांच्या दृष्टीने माझे मुद्दे पुर्णपणे चुकीचे असतील, थोतांड असेल, हरकत नाही, शेवटी मनात जे आले ते लिहीलं…