Tag Archives: घर

…तुमच्या घरात खुन झालाय


शुक्रवारचा दिवस माझ्यासाठी अतीशय नाट्यमय ठरला.

सध्या माझे रो-हाउस विकुन एखादे मोठ्ठे घर घेण्याच्या विचारात आहे. हेच रो-हाउस मी गेले काही दिवस जवळच्याच कंपनीत काम करणाऱ्या मुलांना भाड्याने रहायला दिले होते. काही महीन्यांपुर्वीच ते रिकामे करुन घेतले. त्यानंतर थोडी डाकडुजी करुन ते लोकांना दाखवायला सुरुवात केली होती.

शुक्रवारी एका गृहस्थाचा मला फोन आला, ‘काय लोकांची फसवणुक करत आहात, घर विकताना पुर्ण माहीती का नाही सांगत?’

मला काहीच कळेना, माझ्या माहीतीतले सगळे डिटेल्स मी देत होतो, मग अशी कुठली गोष्ट आहे जी मी सांगीतली नाही आणि त्यामुळे लोकांची फसवणुक होते आहे.

मग तो गृहस्थ म्हणाला, ‘अहो सरळ सांगा ना तुमच्या घरात एका मुलीचा खुन झाला होता म्हणुन ते घर तुम्ही लगबगीने विकायला काढले आहे, नाहीतर एवढ्या चांगल्या ठिकाणचे चांगले घर कशाला कोण विकेल?’

माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ‘खुन झाला होता? माझ्या घरात? अहो काहीतरी काय बोलताय! कुणाचा खुन? कधी झाला?’

तो म्हणाला, ‘मी फोनवर बोलु शकत नाही, तुम्ही मला सोमवारी समक्ष भेटा मग आपण बोलु.’ असे म्हणुन त्याने फोन ठेवुन दिला.

मी ही कार्यालयात असल्याने मला जास्ती बोलता आले नाही. पण त्यानंतर माझे कामावरचे लक्षच उडाले. सारखे डोक्यात तेच विचार. घर रिकामे केल्यानंतरचा घराचा प्रत्येक कोपरान कोपरा आठवुन बघत होतो, कुठे काही संशयास्पद होते का? कुठे काही रक्ताचे डाग किंवा तत्सम आढळले होते का? वॉचमनचे वागणे, शेजाऱ्यापाजाऱ्यांशी बोलताना काही खटकले होते का? काहीच सुचत नव्हते. हे सगळे खरं असेल तर पोलीस केस झाली होती का? का पोलीस अजुन तपास करत असतील? कधीना कधी ते माझ्यापर्पंत पोहोचतीलच मग? कोर्टाच्या वाऱ्या सुरु. वर्षोंवर्ष. डोकं विचार करुन करुन बधीर झाले होते. शेवटी शक्य तितक्या लवकर काम संपवले आणि घरी पळालो. घरी पोहोचल्या-पोहोचल्या परत त्याला फोन केला.

मी: ‘जरा सविस्तर बोलु यात का? तुम्ही जे खुन वगैरे सकाळी म्हणालात त्याबद्दल बोलायचे आहे. मला सांगा हे कधीच्या घटनेबद्दल तुम्ही बोलत आहात? म्हणजे ती जागा रिकामी झाली असताना झाला होता? का बांधकाम चालु असताना? का पझेशन आमच्याकडे असताना? एक महीना आधी एक वर्ष आधी कधीबद्दल बोलता आहात?’

तो: ‘अहो आपण क्षमक्ष भेटुयात ना? मी आत्ता गाडीवर आहे, आणि तुम्ही हो की नाही ते सांगा ना, खुन झाला होता की नव्हता?’

मी: ‘माझ्या माहीती मध्ये तरी नाही, मी तुमच्याकडुनच ऐकतो आहे. तुम्ही जरा प्लिज गाडी कडेला घ्या आणि मला डिटेल्स सांगा, मी पोलीस कंप्लेंट करायला चाललो आहे. तुम्हाला खात्री आहे का? घर क्रमांक 1234 मध्येच खुन झाला आहे?’

तो: ‘हे बघा साहेब मी त्या भागामध्ये गेली ४० वर्ष रहातो आहे. त्या भागाची मला चांगली माहीती आहे. कोण कुठे रहाते, कोण काय करते, कुठे काय घडते मला सगळे माहीती असते’ (आता मात्र मी जाम घाबरलो होतो. हे जे घडत आहे ते खरंच आहे का स्वप्न आहे अस्सेच मला वाटत होते) तुम्ही भेटा मला, ज्यांनी कुणी मला हे सांगीतले आहे त्याला मी समोर आणतो आणि आपण सोक्षमोक्ष लावुन टाकु. त्याची माहीती चुकीची असेल तुमच्या समोर त्याचे थोबाड फोडतो. ……..भोपाळचा मुलगा होता, त्याने प्रेमप्रकरणातुन एका मुलीचा खुन केला होता..’

मी: ‘एक मिनीट..’ त्याचे वाक्य अर्धवट तोडत मी म्हणालो, माझी ट्युब आता पेटत चालली होती ..’आता लक्षात आलं काय झाले ते. तुम्हाला मिळालेली माहीती अर्धी बरोबर आहे. सांगतो काय घोळ झाला ते. माझ्या घराला लागुनच एक संगणक कंपनी आहे STPI अर्थात आणि तिथुन पुढेच अजुन एक कंपनी आहे ज्याचे नाव पण STPI. अर्थात त्यांचे लॉग-फॉर्म वेगळेवेगळे आहेत. पण तुमच्या दृष्टीने ति एकच कंपनी. खुन झाला ती मुलगी आणि तो मुलगा STP मध्ये कामाला होते, पण दुसऱ्या, माझ्या इथल्या नाहीत. ते रहात होते ते घर कंपनीलाच लागुन होते. त्यामुळे तुमचा गैरसमज झाला. तुम्हाला हवे असेल तर मी आत्ता या क्षणाला तुमच्याबरोबर पोलीस चौकीत येतो, आपण त्या घराचा पत्ता काढु आणि त्यावरुन तुम्हाला कळेल की माझ्या घराचा पत्ता आणि तो वेगवेगळा आहे. तसेच मला आता तुम्हाला भेटण्यात ही स्वारस्य नाहिये कारण मला १००१ टक्के खात्री आहे की तुम्ही ज्याबद्दल बोलत आहेत ते वेगळे ठिकाण आहे, एकच कंपनी नेम आणि एकच एरीया असल्याने तुमचा गोंधळ झाला’

असो, त्याचा माझ्याबोलण्यावर विश्वास बसला आणि तो विषय तिथेच संपला. पण तो दिवस, बापरे, डोक्याचा खरंच विचार करुन करुन भुगा झाला होता. ज्या मुलांना भाड्याने घर दिले होते, त्यांच्या प्रत्येकाचा विचार करत होतो मी. अर्थात ते सगळे विश्वासाचे होते आणि माझ्या पत्नी त्याच कार्यालयात काही दिवस कामाला होती.

पण म्हणतात ना, संशयाचा भुंगा मनात शिरला की काही खरं नसते. मन चिंती ते वैरी ना चिंती हेच खरे नाही का???

घर सजावटीचा एक सोप्पा मार्ग


बऱ्याच वेळेला घरातील रिकाम्या भिंती सजवायला आपण फ्रेम्स चा वापर करतो. परंतु बाजारात या फ्रेम्स च्या किंमती अवाच्या सव्वा असतात. साधारणपणे ६ x ८ ची फ्रेम ३५० रु. पासुन पुढे असते. याचे कारण म्हणजे या किंमती मध्ये नुसती फ्रेमची किंमत नसुन त्यामध्ये वापरलेल्या चित्राची किंमत पण असते.

अर्थात ही चित्र नक्कीच चांगली असतात. मॉडर्न आर्ट, फळांची चित्र, मानवी चेहरे, अदिवासी चित्र, ऍबस्ट्राक्ट आर्ट, पक्षी, निरनिराळी पेंटींग्स अशी असंख्य व्हरायटी यामध्ये असते. परंतु त्यासाठी इतके पैसे घालवायला नको वाटतात. यावर मी नुकताच एक सोप्पा मार्ग शोधुन काढला.

इंटरनेट मध्ये पुढील पैकी एक किंवा अनेक शब्द वापरुन इमेज किंवा वेब सर्च करा. त्यावर तुम्हाला असंख्य प्रकारची तिच किंवा तश्शीच चित्र उपलब्ध होतील. उदा. ‘Modern Art, Paintings, Oil paintings, tribal, frames’ साधारणपणे कमीतकमी १०२४ रिझॉल्युशन असलेले आणि तुम्हाला आवडलेले चित्र तुमच्या संगणकावर उतरवुन घ्या. नंतर ह्याच चित्राला ‘फोटो-फास्ट’ किंवा तश्याच एखाद्या ठिकाणावरुन ६ x ८ ची प्रत काढुन घ्या. ही प्रत साधारण १९ रु. ला पडते. आता एखाद्या लोकल छोट्याश्या दुकानातुन यासाठी फ्रेम बनवुन घ्या ज्याची किंमत जास्तीत जास्ती १५० रु. पडते.

बघा झाली तुमची तश्शीच फ्रेम तयार फक्त १७० रु. म्हणजे बाहेरुन जी एक गोष्ट तुम्ही ३५० रु. घेता तीच तुम्ही ही युक्ती वापरुन ३५०/- मध्ये दोन घेउ शकता. मी माझ्या घरात अश्याच अनेक सुंदर फ्रेम्स बनवल्या आहेत. बघा प्रयत्न करुन स्वस्तात मस्त.

कल्पना आवडली तर जरुर कळवा.