Tag Archives: छंद

नादखुळा


“छंद”, आयुष्यात प्रत्येकाने केंव्हा ना केंव्हा, कुठल्या नं कुठल्या प्रकारचा जोपासलेला असतो. पुर्वीच्या काळी छंदाची व्याप्ती फार छोटी होती. ‘पोस्टाची तिकीटं गोळा करणे’, ‘दुर्मीळ नाणी, नोटा गोळा’ करण्यापासुन दुर्मीळ गाण्यांच्या ध्वनीमुद्रीका, वेगवेगळ्या वाहनांची, अभिनेत्यांची छायाचित्र गोळा करण्यापर्यंतचे छंद हे सर्वसामान्यांपर्यंत मर्यादीत होते. परंतु काही छंद मात्र केवळ श्रीमंतांचीच मक्तेदारी होऊन राहीले होते.

काळ बदलला, ग्लोबलायझेशन मुळे अनेक संधी उपलब्ध झाल्या, गरीब मध्यमवर्गीय झाले आणि मध्यमवर्गीय- उच्च मध्यमवर्गीय. खिश्यात खुळखुळणारा पैसा वाढला परंतु त्या अनुषंगाने येणारे ताणतणाव सुध्दा वाढले आणि पुन्हा एकदा मनुष्य छंदांकडे आकर्षीत झाला. वर उल्लेखलेले छंद हे बहुदा स्वतःपुरतेच मर्यादीत होते. परंतु आता छंद जोपासण्याची व्याप्ती वाढली आहे. एकसमान छंद जोपासणारे अनेकजण एकत्र येऊन एखादा समुह स्थापन करतात आणि हे सर्वजण मिळुन आपला छंद जोपासताना दिसत आहेत.

गेल्या काही वर्षात असे अनेक ग्रुप मला माहीती पडले त्याबद्दल थोडेसे –

१. सायकल – सायकल हे नुसतेच पर्यायी वाहन न रहाता किंवा तो केवळ एक ‘फिटनेस मंत्र’ न रहाता तो आता अनेकांचा एक छंद झाला आहे. पुर्वीच्या काळी ३५००ची सायकल म्हणजे लोकं भुवया उंचावायचे पण आता केवळ सायकल चालवण्याची आवड म्हणुन अक्षरशः ५० हजारांच्या सायकल चालवणारे सुध्दा पहातो आहे. अश्याच एका ग्रुपचा मी सदस्य आहे. झेन-ऑफ-सायकलींग असे त्या ग्रुपचे नाव. ‘कोकण दर्शन’, ‘पुणे-गोवा’, ‘पुणे-कन्याकुमारी’, ‘मनाली-लेह-लडाख’ अश्या अनेक उत्तोमोत्तम सायकल राईड्स ह्या ग्रुप ने पार पाडलेल्या आहेत. १८ वर्षाच्या युवकापासुन पासष्ठीच्या आज्जी-आजोबांपर्यंतचे दीडशेहुनही अधीक सदस्य ह्या ग्रुप मध्ये आहेत. ही झाली पुण्याची गोष्ट. पण असेच अनेक ग्रुप मुंबई, बॅगलोर सारख्या मेट्रो मध्ये पण आहेतच की.

२. फोटोग्राफी – एक काळ होता जेंव्हा फोटो काढणे म्हणजे श्रीमंतांचे काम असायचे. खानदानी फोटो काढुन भिंतींवर चढवायचा रिवाजच होता ना तेंव्हा. नंतर मात्र सर्वसामान्य एक चैन म्हणुन महिन्यातुन एकद वेळेस स्टुडीओ मध्ये जाऊन सहकुटुंब फोटो काढुन घेऊ लागले. फिल्म रोल असेपर्यंत तरी फोटो काढणे हे तसे चैनीचेच काम होते. आवश्यक तेंव्हाच, सणा-समारंभाचेच फोटो काढले जायचे. डिजीटल युग अवतरले आणि फोटोग्राफीचा कायापलट झाला. अनेक उदयोन्मुख फोटोग्राफर जन्माला आला. फुलं, झाडं, किडे-मकोडे, निसर्ग इतकंच काय भिकारी, रस्त्यावरील वाहतुक, प्राणी, पक्षी अश्या अनेक चित्र-विचीत्र गोष्टींचे फोटो निघु लागले आणि सौदर्याचे एक वेगळेच दालन सर्वांसाठी उघडले गेले.

डिजीटल एस.एल.आर ने तर क्रांतीच घडवुन आणली. खुद्द डोळ्यांनी सुध्दा जी गोष्ट सुंदर दिसु शकत नाही तितके सौदर्य ह्या कॅमेराने प्रत्येक गोष्टीला बहाल केले. केवळ फोटोग्राफीचा छंद म्हणुन कॅमेरा आणि त्याला लागणारे फिल्टर्स, लेन्स ह्यासाठी लाखो रुपायांवर हसत हसत पाणी सोडणारे कित्तेकजण आजुबाजुला दिसतील. नुसता पैसाच नाही तर त्यासाठी लागणारी चिकाटी, संयम सुध्दा वाखाणण्यासारखा आहे. काही दिवसांपुर्वीच एका वृत्तपत्रामध्ये एका प्रसिध्द छायाचित्रकाराने काढलेला दोन सिहिणींचा फोटो आला होता. हा फोटो मिळवण्यासाठी तो म्हणे २७० तास एका जागी खिळुन होता.

अर्थात ही झाली व्यावसायीक बाजु. परंतु केवळ छंद म्हणुन सुध्दा अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील. सिंहगडावर जाणारी नेहमीची वाट सोडुन गडावर नं जाता गडाच्या थोडे खाली जाळीमध्ये, पाणवठ्याच्या ठिकाणी गेलात तर पक्ष्यांची छायाचित्र टिपण्यासाठी तासंतास एका जागी चिकटुन बसलेले अनेक हौशी छायाचित्रकार दृष्टीस पडतील. केवळ सुर्योदय टिपायचा म्हणुन पहाटे ३.३० ला घरातुन निघुन ९० कि.मी. कुडकुडत्या थंडीत जाऊन विलक्षण दृष्य टिपणारे सुध्दा दिसतील. फोटोग्राफर्स@पुणे (AKA P@P) हा असाच एक फोटोग्राफीमध्ये स्वतःला झोकुन देणाऱ्या ध्येयवेड्यांचा ग्रुप.

अर्थात वर दिलेली उदाहरणं ही ढोबळ मानाने सांगता येतील. ह्यामधील काही छायाचित्रकारांचा उद्देश केवळ पक्ष्यांची छायाचित्र टिपणे असतो, काहींचा केवळ निसर्ग, काहींचा सुक्ष्म गोष्टींचा (मॅक्रो) तर कुणाचा अजुन काही. पण अजुन एक समुह ह्या सर्वांपासुन थोडा वेगळा असा आहे. ह्या छायाचित्रकारांचा उत्साह ‘रेल्वे’चे फोटो टिपण्यात आहे. आश्चर्य वाटले ना? मलाही वाटले होते. पण ही मंडळी केवळ रेल्वेचे उत्तोमोत्तम फोटो मिळवण्यासाठी कधी कोकणच्या कड्यात तर कधी माळरानावर ठाण मांडुन बसतात. इंडीयन रेल्वेज फॅन क्लब असे ह्या समुहाचे नावं.

३. चित्र रेखाटन – छायाचित्रकलेशी थोडेफार सार्धम्य दाखवणारा हा अजुन एक छंद. पण ह्यामध्ये कुठल्या यंत्राची मदत नं घेता पेन्सील आणि रंगाच्या कुंचल्याच्या सहाय्याने चित्र रेखाटन करण्याची कामं ही मंडळी करतात. शनिवार-रविवारी कधी पुणे विद्यापीठ, कधी नदीकाठचे एखादं मंदीर तर कधी अजुन कुठे ही मंडळी कोऱ्या कागदावर चित्र रेखाटत असतात. पुण्यामधील संस्कार-भारती नावाने हा समुह कार्यरत आहे. ह्याचाच एक उपविभाग मोठ मोठ्या रांगोळ्या रेखाटण्याच्या छंदात मग्न आहे. गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ मोठ्या रांगोळ्यांच्या पायघड्या घालणारे हेच ते ‘संस्कार भारती’

५. रॉयल इन्फिल्ड – बुलेट, दणदणीत वाहन, पुर्वीच्या काळी फक्त काही निवडक लोकंच वापरत. पण आजच्या युगात हे वाहन तरूणांची ‘धडकन’ बनले आहे. रॉयल इन्फिल्ड, थंडरबर्ड वापरणाऱ्या अश्याच काही हौशी, छंदीष्ट ‘रायडर्स’ चा सुध्दा एक ग्रुप आहे. ‘हिमालयन’ सफारी अंतर्गत हा ग्रुप बऱ्याच वेळा मनाली ते लेह-लडाख हा कठीण मार्ग आपल्या दुचाकींवरुन मार्गक्रमण करत पार पाडतो.

लाखाच्या घरात मिळणारी, अधुन मधुन खर्च काढणारी आणि इंधन सुध्दा जास्त खाणारी ही बुलेट केवळ छंदापायी आज अनेकजण बाळगुन आहेत.

असे अनेक छंद जोपासणारे समुह आपल्या दृष्टीस पडतात. बहुतेक ट्रकच्या मागे ब-याच वेळा आपण लिहीलेले बघतो ‘नाद करायचा नाय‘ पण आजच्या युगात ‘नाद करायचाच‘, आत्ता नाही करणार तर मग कधी? रोजच्या ह्या रडगाण्याला, मानसीक ताणतणावांना, हेवेदावे-मत्सराला विसरण्यासाठी, स्वतःला वेळ देण्यासाठी छंद जोपासणे आवश्यक होऊन बसले आहेच पण त्याच बरोबर काही करत असाल तर ‘मेक ईट लार्ज’ करण्याच्या प्रवृत्तीमुळे जे करु ते ‘शान’से करु झालेले आहे. ह्याच समुहांमुळे अनेक नविन ओळखी होतात, आपला छंद तर जोपासला जातोच, पण त्याचबरोबर ती कला अधीक चांगली होण्यासाठी इतर लोकांची मदत सुध्दा होते.

अजुन आहेत तुमच्या माहीती असे काही छंद? जरुर प्रतिक्रियेमध्ये कळवा, कदाचीत आपल्यातलाच एखादा उदयोन्मुख कलाकार आपल्यात लपलेले गुण निपजण्यासाठी उद्युक्त होइल.