Tag Archives: पुरुष

पुरूष जेंव्हा मनातलं बोलतो


’मनोविश्व’ मासीकाच्या डिसेंबरच्या अंकात माझा छापुन आलेला लेख ’डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा’च्या वाचकांसाठी –

लेखाचे शिर्षक विचीत्र वाटले ना? “हे काय भलतंच?”, “पुरुषांच्या कसल्या आल्यात समस्या?” असा विचार करुन किंवा आता वाचायला काहीच उरले नाही तर बघु इथे काय लिहीलं आहे म्हणुनच इथं आलात ना?

साहजीकच आहे. पुरुष जन्माला येतो तेंव्हा पासुनच त्याच्यावर त्याच्या पुरुष असण्याची जाणीव करुन दिली जाते. ‘काय रडतो आहेस मुलींसारखा?’, किंवा ‘एवढसं लागलं तर काय झालं? मुलगी आहेस का तु?’ ही वाक्य वारंवार ऐकवली जातात. मुलगा लहानाचा मोठा होतो तेच मुळी स्वतःच्या मनाला ठसवत ‘तु पुरुष आहेस, तुला कधीच काही होता कामा नये? तु तुझ्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकलं पाहीजेस. तुला मोकळेपणाने रडायला परवानगी नाही. तुला हताश होऊन बसुन चालणार नाही’. कुठल्याही कठीण परिस्थीतीत न डगमगता पुरुषाने सामोरे जायलाच हवे आणि तो जाणारच हे ’ग्रांटेड’ असते. पुरुषांना प्रश्न, समस्या असुच शकत नाहीत आणि ज्याला आहेत तो जणु काही कमजोर असल्याचीच भावना समाजाच्या मनामध्ये रुजलेली आढळते.

फार लांबचे कश्याला, जेंव्हा आज मी माझ्या मैत्रिणीला ’पुरुषांच्या समस्यांवर’ लिहीणार असल्याचे सांगीतले तेंव्हा तिचा उत्स्फुर्त प्रश्न होता, “पुरुषांना समस्या असतातच कुठे?”

आज इतरत्र नजर टाकली तर ’जेष्ठांसाठी हेल्पलाईन’, ’रुग्णांसाठी हेल्पलाईन’, ‘ग्राहकांच्या फसवणुकीच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन’, ‘महीलांवरील अत्याचार, सासरी छ्ळ, नोकरीत त्रास, पिडीत महीला अश्या असंख्य कारणांसाठीच्या हेल्पलाईन’, ’अपंगांसाठी हेल्पलाईन’, ‘ग्राहकांच्या फसवणुकीच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन’, ‘मतदारांसाठी हेल्पलाईन’, ‘दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन’, ‘रिक्षाचालकांच्या मनमानीविरोधात तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन’ अश्या अनेक ढिगभर हेल्पलाईन्स आढळतील. पण पुरुषांसाठी हेल्पलाईन असल्याचे ऐकले आहे कधी? भारत हा तरूण लोकांचा देश आहे असे म्हणतात, या तरूणांसाठी विशेषतः तरुण पुरुषांसाठी आहे एखादी हेल्पलाईन? असेलही एखादी कदाचीत पण त्यांची संख्या नगण्य आहे.

काळ बदलला आणि काळाच्या ओघात जशी आई घरातुन बाहेर पडली, ‘चूल आणि मूल’ इतकेच तिचे विश्व न रहाता ते अधीक व्यापक झाले, तस्सेच आजच्या पुरुषाच्याअंगी सुध्दा हळवेपणा आला. पुर्वीचे कठोर, घनगंभीर, रागीट ‘अण्णा’, ‘अप्पा’ जाऊन आजचा ‘ए बाबा’ आणि ’अहो’ चा ’ए sss’ जन्मला. परंतु पौरुषत्वाच्या दडपणाखाली त्याला मन-मोकळं करण्याचं स्वातंत्र्य, त्याची घुसमट अजुनही दबलेलीच आहे.

लग्न झाल्यावर तो आईच्या पदराला धरुन चालणारे बाळ नसतो की बायकोच्या ताटाखालचे मांजर, पण तरीही सगळ्यांच्या मर्ज्या सांभाळुनही त्याला प्रत्येक वेळी ह्या नाहीतर त्या पारड्यामध्ये बसवलेच जाते. सासु-सुनांच्या भांडणात बऱ्याचवेळा नाही सासु जास्त दुखावली जात, नाही सुन.. कारण बऱ्याचवेळा भांडताना त्यांना त्यांच्या ‘अहं’ ची चिंता असते, परंतु दुखावला जातो, भरडला जातो तो माणुस कारण दोघीही त्याला प्रिय असतात.

हुंडाबळी, सासरी छळ सारख्या कारणांसाठी बनवलेल्या ४९८(अ) सारख्या कायद्याचा दुरुपयोग होतो आहे हे गृहमंत्रालयाने सुध्दा आता मान्य केले आहे.

नोकरीचा ताण असह्य झाला म्हणुन, कर्जबाजारी झाला म्हणुन आत्महत्या करणाऱ्या तरूणांची, पुरुषांची संख्या लक्षणीय आहे. पण लक्ष देते कोण? हुंडाबळी गेला तर सगळे गाव रस्त्यावर उतरेल, पण अश्या अभागी लोकांना ‘हळवा’, ‘बायकी’, ’कमजोर’ म्हणुन नजरेआड केले जाते.

पुरुषांच्या बरोबरीने, खांद्याला खांदा लावुन चालणाऱ्या बायकांबद्दल रकानेच्या रकाने भरुन लिहिले गेले आहे, जात आहे. पण बायकोच्या बरोबरीने घरात मदत करणाऱ्या, पोराबाळांना आंघोळ घालणाऱ्या, जेवु-खाउ घालणाऱ्या, शाळेत सोडणार्‍या, प्रसंगी घरात स्वयंपाकातही मदत करणाऱ्या पुरुषांबद्दल कोण बोलतो?

तमाश्यामध्ये नाचणाऱ्या स्त्री ला वाहव्वा मिळते, तिच्या कलागुणांना भरभरुन प्रसिध्दी मिळते, पण त्याच तमाश्यात पोटा-पाण्यासाठी ‘नाच्या’ बनलेल्या पुरुषाच्या पदरी मात्र केवळ थट्टा आणि चेष्टा-मस्करीच येते.

स्त्रियांसाठी आजही बहुतेक क्षेत्रांमध्ये राखीव जागा आहेत, स्त्री आहे म्हणुन कुठल्या क्षेत्रात करीअर, नोकरी, शिक्षणासाठी नाकारण्यात आल्याच्या घटना आजच्या काळात नगण्यच आहेत. मग असे असताना स्त्रियांवर अन्याय होतो आहे, स्त्री अबला आहे म्हणणे कितपत योग्य आहे? ग्रामीण भागांतील स्त्रियांवर होणारे अन्याय आहेत हे मान्य पण म्हणुन सरसकट सर्वच स्त्रियांसाठी आजही आरक्षण, सुविधांचा भडीमार होतो आहे तो कितपत योग्य आहे?

आपण स्त्री-पुरुष समानतेचा विचार करत असताना आजच्या काळात तो पुष्कळसा एकांगी करतो आहोत असे वाटते. स्वातंत्र्य स्त्रीचे, भावना स्त्रीच्या, स्त्रियांवर होणारा अन्याय याच दृष्टीकोनातून विचार होतो. तसा तो करु नये असे नाही, पण त्याच बरोबरीने काळानुरुप पुरुषांच्या भूमिकांमध्ये होणारे बदल लक्षात घेतले पाहिजेत. आणि पारंपारिक स्त्रियांच्या भूमिकेतून ज्याप्रमाणे त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जातात तसेच प्रयत्न पुरुषांना पारंपारिक भूमिकांच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी करायला पाहिजेत. ही काळाची आणि आपल्या समाजाची गरज आहे.

लग्नाला उभं राहिल्यानंतर अनुरुप वधुच्या अपेक्षांनी बुचकळ्यात पडलेला, स्वतःला पदोपदी सिध्द केल्यानंतरही इतरांच्या नजरेत दिसणारा कोरडेपणा सोसून वैतागून गेलेला, वयात आल्याबरोबर पैसा कमावलाच पाहिजे अशा सर्वसाधारण अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेला आणि मोकळा श्वास घेण्याचीही उसंत न उरलेला, आपल्या बाळासाठी हळवा होणारा, त्याच्या आठवणींमध्ये कोमेजुन जाणारा आजचा बाबा सुध्दा एका विचीत्र कात्रीत सापडला आहे.

आपल्या सानुल्यासाठी सर्वेतोपरी देण्याच्या प्रयत्नात काही निवडक लोकांपायी त्याची सुध्दा फरफट होत आहे. एकीकडे सर्वेतोपरी देण्याच्या प्रयत्नात अधीक पैसा कमावणे त्याला खुणावते आहे तर दुसरीकडे हातातुन निसटुन चाललेले क्षण, आपल्या बाळाचे डोळ्यासमोर निघुन चाललेले बालपण त्याला सतावते आहे.

माझा एक मित्र ‘मर्चंट नेव्ही’ मध्ये कामाला आहे. गेला की एकदम सहामहिन्यांनी पुन्हा घरी येतो. जाण्याआधी एकदा आम्ही सर्व हॉटेलमध्ये बसलो होतो. भरपुर बोलत होता तो. एशिया बरोबरच युरोप, अमेरीका सुध्दा फिरतीच्या नोकरीमुळे बराचसा पाहुन झाला होता. वेगवेगळे देश, वेगवेगळे अनुभव भरपुर त्याच्या गाठीशी होते. ह्यावेळेस आला होता ते त्याला मुलगा झाला म्हणुन. इथुन जाईल तेंव्हा मुलगा महिन्याचा असेल. मुलाचा विषय निघाला तेंव्हा मात्र त्याचा ‘प्राईड’ असलेली त्याची नोकरी क्षणार्धात त्याच्यासाठी फडतुस झाली होती. कारण पुढच्या वेळेस तो जेंव्हा घरी येईल तेंव्हा त्याचा मुलगा एक वर्षाचा झाला असेल. त्याचे हसणे, रडणे, डोळ्यात उमटणारे आपल्यांबद्दलचे ओळखीचे भाव, उठुन बसणे, रांगणे, धरुन चालणे सगळ्याला तो मुकणार होता.

परवाच असाच एक किस्सा एका मित्राने सांगीतला. त्या मुलाचे वडीलही असेच फिरतीच्या नोकरीवर. मुलाला त्यामुळे घरी कोणी आले की ‘बाबा बाहेरगावी असतात’ सांगण्याची सवय. एक दिवस त्याचा बाबाच घरी आला आणि त्याच्याच मुलाने त्याला ‘बाबा घरी नाहीत’ म्हणुन सांगुन टाकले. काय प्रसंग ओढवला असावा त्याच्यावर हे न लिहीणेच योग्य.

काही ‘प्रॅक्टीकल’ बाबाही आहेत जे पैश्याच्या मागे फारसे धावत नाहीत. त्यांचे पाय अजुनही जमीनीवर आहेत पण त्यामुळे त्यांचीसुध्दा ओढाताण होते आहेच. एकीकडे बाळासाठी सर्वोत्तम ते देऊ शकत नाही ह्याचे दुःख तर दुसरीकडे इतरांइतकी नसली तरीही होणारी कामाची दगदग, धावपळ ह्यामुळे निसटुन चाललेल्या प्रत्येक क्षणाचा हिशोब मांडताना होणारी कसरत ह्यामध्ये तो पिळवटुन निघाला आहे.

एकतर्फी प्रेमातुन प्रेयसीचा खुन करणारा माथेफिरु मिडीया रंगुन जगाला दाखवते पण आपल्या प्रेमीकेचा साखरपुड्याच्या आदल्या रात्री झालेल्या अपघाती मृत्युने दोन वर्षांनंतरही न सावरलेल्या, आपल्या मनाची व्यथा ’I too had a love story’ नावाच्या पुस्तकातुन मांडणार्‍या ’ रविंदर सिंग’ ची मात्र किती जण दखल घेतात?

माझ्या पहाण्यात निदान चारजण तरी असे आहेत जे आय.टी क्षेत्रात भक्कम पगाराची नोकरी असुनही, तिशीला आले तरीही त्यांचे अजुनही लग्न ठरत नाही. आजच्या मुलींनी त्यांना दिलेल्या नकाराची कारणं ऐकायचीआहे्त? आजच्या मुलींना एक तर एकत्र कुटुंब नको आहे किंवा त्यांना लग्नानंतर परदेशी स्थाईक होणाराच नवरा हवा आहे. आणि हे चारही जण ह्या ’कॅटेगरीतले’ नाहीत म्हणुन आजही ते आपल्या अनुरुप वधुच्या शोधात आहेत.

घरातील ओढाताण, नोकरीतील फरफट, ’पिंक स्लिप्स’ ची टांगती तलवार, बायका-मुलांच्या वाढत्या गरजा, बाजारातील सतत वाढत जाणारी स्पर्धा, महागाई ह्या सर्वांना तोंड देता देता, पुरुषार्थाचे मणामणाचे ओझे आणि चेहर्‍यावरील खोटे हास्य घेऊन फिरणार्‍या पुरुषांच्या डोळ्यातील हे ’मगरमच्छ’ चे आश्रु कधी कुणाला दिसतील काय?

Download PDF of Scanned Article copy

हेल्पलाईन


सध्या हेल्पलाईन्सचे पेवच फुटले आहे. ‘मतदारांसाठी हेल्पलाईन’, ‘दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन’, ‘रिक्षाचालकांच्या मनमानीविरोधात तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन’, ‘रुग्णांसाठी हेल्पलाईन’, ‘ग्राहकांच्या फसवणुकीच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन’, ‘महीलांवरील अत्याचार, सासरी छ्ळ, नोकरीत त्रास, पिडीत महीला अश्या असंख्य कारणांसाठीच्या अनेक हेल्पलाईन्स’. पुण्यामध्ये गेल्या वर्षी ‘जेष्ठ’ नागरीकांसाठीही हेल्पलाईन सुरु झाली, त्याला ही उत्तम प्रतीसाद मिळत आहे. ‘सुने कडुन होणारा त्रास, मुलांकडुन मिळणारी विचीत्र वागणुक, एकटेपणा, कायदेशीर सल्ला, लागलचं तर अडी-अडचणीच्या वेळी महत्वाची कामं करण्यासाठी- जसे बॅकेची काम, पोस्टाची कामं – स्वयंसेवकांची उपलब्धता’ अश्या अनेक जेष्ठांच्या समस्यांचे निवारण या हेल्पलाईन वरुन होते. समज देऊन, किंवा वेळप्रसंगी कायदेशीर कारवाई करुन जेष्ठांना न्याय दिला जातो. चला म्हणजे जेष्ठांसाठीच हेल्पलाईन राहीली होती, ते ही झाले, जेष्ठांची सुध्दा सोय झाली.

विचार करताना एक गोष्ट जाणवली आणि खटकली, भारत हा तरूण लोकांचा देश आहे असे म्हणतात, या तरूणांसाठी विशेषतः तरुण पुरुषांसाठी आहे एखादी हेल्पलाईन? असेलही एखादी कदाचीत पण त्यांची संख्या नगण्य आहे.

पुरुष जन्माला येतो तेंव्हा पासुनच त्याच्यावर त्याच्या पुरुष असण्याची जाणीव करुन दिली जाते. ‘काय रडतो आहेस मुलींसारखा?’, किंवा ‘एवढसं लागलं तर काय झालं? मुलगी आहेस का तु?’ ही वाक्य वारंवार ऐकवली जातात. मुलगा लहानाचा मोठा होतो तेच मुळी स्वतःच्या मनाला ठसवत ‘तु पुरुष आहेस, तुला कधीच काही होता कामा नये? तु तुझ्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकलं पाहीजेस. तुला मोकळेपणाने रडायला परवानगी नाही. तुला हताश होऊन बसुन चालणार नाही’

लग्न झाल्यावर तो आईच्या पदराला धरुन चालणारे बाळ नसतो की बायकोच्या ताटाखालचे मांजर, पण तरीही सगळ्यांच्या मर्ज्या सांभाळुनही त्याला प्रत्येक वेळी ह्या नाहीतर त्या पारड्यामध्ये बसवलेच जाते. सासु-सुनांच्या भांडणात बऱ्याचवेळा नाही सासु जास्त दुखावली जात, नाही सुन.. कारण बऱ्याचवेळा भांडताना त्यांना त्यांच्या ‘अहं’ ची चिंता असते, परंतु दुखावला जातो, भरडला जातो तो माणुस कारण दोघीही त्याला प्रिय असतात.

नोकरीचा ताण असह्य झाला म्हणुन, कर्जबाजारी झाला म्हणुन आत्महत्या करणाऱ्या तरूणांची, पुरुषांची संख्या लक्षणीय आहे. पण लक्ष देते कोण? हुंडाबळी गेला तर सगळे गाव रस्त्यावर उतरेल, पण अश्या अभागी लोकांना ‘हळवा’, ‘बायकी’ म्हणुन नजरेआड केले जाते.

पुरुषांच्या बरोबरीने, खांद्याला खांदा लावुन चालणाऱ्या बायकांबद्दल रकानेच्या रकाने भरुन लिहिले गेले आहे, जात आहे. पण बायकोच्या बरोबरीने घरात मदत करणाऱ्या, पोराबाळांना आंघोळ घालणाऱ्या, जेवु-खाउ घालणाऱ्या, शाळेत सोडणे, प्रसंगी घरात स्वयंपाकातही मदत करणाऱ्या पुरुषांबद्दल कोण बोलतो?

तमाश्यामध्ये नाचणाऱ्या स्त्री ला वाहव्वा मिळते, तिच्या कलागुणांना भरभरुन प्रसिध्दी मिळते, पण त्याच तमाश्यात पोटा-पाण्यासाठी ‘नाच्या’ बनलेल्या पुरुषाच्या पदरी मात्र केवळ थट्टा आणि चेष्टा-मस्करीच येते.

लिहीण्यासारखे मुद्दे खुप आहेत, वर उपस्थीत केलेले मुद्दे कदाचीत स्त्री-वाचकांना बायस्ड वाटतील. परंतु लेखकाचा आणि लेखाचा उद्देश त्यांनी समजावुन घ्यावा. लेखाचा हेतु हा पुरूष कसा ग्रेट किंवा केवळ पुरुषांच्याच दृष्टीकोनाला मांडणारा लेख मानु नये. स्त्रियांवर होणारे अत्याचाराला वाचा ज्यात्या वेळेस फोडली जातेच परंतु पुरुषांबद्दल हे तितकेसे होत नाही म्हणुनच हा प्रपंच.

पुरुषांना मन मोकळं करण्यासाठी, त्यांच्या भावना, त्यांचे प्रश्न समजावुन घेण्यासाठी आहे का एखादी हेल्पलाईन?

ई-मेलवरून फिरत असलेली ‘बाप’ नावाची कविता आपण वाचली असेलच, नसेल तर इथे टिचकी मारुन आपण ती वाचु शकता. ह्या कवितेचे हक्क ज्याने लिहीली आहे त्याला राखीव.