बहुतेक वेळा प्रत्येकाच्या आयुष्यात ज्या घटना घडतात ना, त्याचे दोन पैलु असतात. एक तर ती घटना चांगली असते किंवा वाईट असते. पण असं फार कमी वेळा होतं की जे घडलं ते छान पण झालं आणि वाईट पण झालं.
माझी पंक्याशी झालेली भेट ही दुसर्या विभागातली. म्हणजे ब्लॉगींगच्या निमीत्ताने माझी त्याच्याशी ओळख झाली हे चांगल झालं, ह्या मैत्रीतुन काही फलनिष्पत्ती सुध्दा झाली, पण त्यानंतर मात्र जे घडते आहे तो केवळ “मानसीक त्रास”, “इमोशनल अत्याचार”, “जळफळाट”, “चिडचिड”, “त्रागा”, “असहाय्यता” ह्या सर्व विषेशणांचा अनुभव देणारा ठरत आहे.
“डिजीटल एस.एल.आर” हा प्रकार प्रत्येक उभरत्या फोटोग्राफरच्या मनात रुतुन बसलेला काटा असतो. जोपर्यंत तो निघत नाही तो पर्यंत प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण मनाला एक प्रकारची टोचणी लागुन राहीलेली असते. अर्थात केवळ पैसे आहेत आणि ’चला डी.एस.एल.आर’ घेउन येऊ असं सहसा घडत नाही. आत्तापर्यंत केवळ ’याशीका’ आणि ’कोडॅक’चे फारतर फार तिन हजारापर्यंतचे कॅमेरे वापरल्यावर आणि फार तर फार डिजीटल-कॅमेराच्या युगात १०-१५ हजारापर्यंत मजल मारल्यानंतर अचानक कॅमेरासाठी एकदम ३०-४० हजार घालवायचे आणि नको ते पदरात पाडुन घ्यायचे त्यापेक्षा कोणीतरी माहीतगार आणि फोटोग्राफीच्या क्षेत्रात लोणच्यासारखा मुरलेला बरोबर असणे गरजेचे असते.
ब्लॉगींगने माझी भेट “पंकजझ@फ्लिकर’, ’भटकंती अनलिमीटेड’, ’भटक्या पंकज’ अश्या अनेक टोपण नावांनी प्रचलीत असलेल्या पंक्याशी घडवुन दिली आणि माझ्या नशीबी डिजिटल एस.एल.आर बाळगण्याचे भाग्य आले.
पहिले काही आठवडे माझ्यासाठी ’युरेका, युरेका’ ठरले. जे स्वप्नी पाहीले होते, ज्या ’मॅन्युअल फोकससाठी’ तळमळलो होतो, ’डेफ्ट ऑफ फिल्ड’, ’बोकेह’ असे शब्द नुसते ऐकुन होतो ते सर्व काही प्रत्यक्षात उतरवत होतो. आजुबाजुची मित्र मंडळी ज्यांचा कॅमेरा आणि फोटो म्हणजे फक्त ’शटर बटण’ दाबणे ह्या एकाच व्याख्येशी संबंध होता ती सर्व मंडळी ह्या नविन कॅमेराने टिपलेले फोटो पाहुन माझी प्रशंसा करण्याचे थांबत नव्हती. उन्हाळा सुरु असल्याने पंक्याचे फ्लिकरही बर्यापैकी धुळ खात होते. सारे कसे छान, सुरळीत चालले होते.
…पण माशी शिंकली. शिंकणारच होती हो.. नशीबच तसे आहे माझे. प्रत्येक सुखाच्या मागे काहीतरी काळी सावली असतेच असते. आकाशात काळे ढग जमु लागले आणि सुस्तावलेला पंक्या जागा झाला. रात्र रात्र जागुन, प्रवास करुन, डोंगर दर्या, सह्याद्रीचे कडे पालथे घालुन पुन्हा एकदा फ्लिकर गजबजु लागला.
खरंच सांगतो, त्याचे ते छान छान फोटो बघायची पण चोरी होsss!! लपुन लपुन बघतो मी.. उगाच कोणी पाहीले तर त्यांना खर्या फोटोग्राफीची जाणीव होईल आणि माझे फोटो किती थिल्लर, नीच/हिन दर्जाचे येत आहेत ह्याचा बोभाटा होईल.
पण ’कोंबड झाकलं, म्हणुन सुर्य उगवायचा थोडा नं रहाणार’? माझं मन!!. ते तर पहात होते ना सर्व! झालं.. गद्दारपणा केलाच त्याने. मी आधी काढलेल्या आणि काढत असलेल्या प्रत्येक फोटोला वाकुल्या दाखवुन हसु लागले. ’अज्ञानात सुख असते’ म्हणतात ना, तेच खरं. ’अन्या लेका तु लय भारी फोटो काढतो राव’, हे कधीकाळी मित्रांचे अंगाव मुठभर मास चढवणारे उद्गार आता माझे मलाच बोचु लागले. जेंव्हा मला माझ्याच फोटोंमध्ये ’रुम फॉर इंम्प्रुव्हमेंट’ दिसते आहे, माझ्या प्रत्येकच फोटोमध्ये मला चुका दिसत आहेत तेंव्हा मित्र-मंडळींनी केलेली प्रशंसा अंगी कशी लागेल? आनंद होतच नाही त्याचा. कारण मला माहीती आहे ना, त्यांनी कितीही चांगले बोलले, तरी त्या फोटोत चुक आहे हे मला दिसणे थांबत नाही.
बरं थोडेफार प्रयत्न करुन फोटो येतील / येतातही बरे. पण आजुबाजुच्या १०० मिटर परीसरातील फोटो किती काळ टिपणार? रानवार्यात फिरुन, व्हर्जीन निसर्गाला गोंजारुन काढलेल्या फोटोंची त्याला कुठुन सर येणार? घराच्या खिडकीतुन थोडं नं फेसाळणारा समुद्र दिसतो, गच्चीवरुन थोडं नं सैह्याद्रीचे रौद्र रुप दिसते, प्रदुषणाची पातळी ओलांडलेल्या वातावरणात थोडे नं आकाश आच्छादुन टाकणारे ढग किंवा चमचमणार्या चांदण्या दिसतात. ते सर्व टिपायचे तर घराबाहेर पडायला हवं आणि तिथेच तर सर्व अडलयं. नुसती वाईड-ऍंगल असुन उपयोग काय? ट्वाईलाईट टिपायचा तर घराची किंवा कार्यालयाची खिडकी कशी योग्य ठरेल?
इथं थोडं इकडचे तिकडे होता येत नाही, आणि अजुन पावसाळा सुरु नाही झाला तर हा भटक्या पंक्या लागला उंडरायला. बर ह्या ’सोशल नेटवर्कींग’वाल्यांनी तरी जरा आपल्या संगणक प्रणालीमध्ये बिघाड निर्माण करावेत, जरा दोन-चार साईट्स बंद कराव्यात, तर तेही नाही. ’गुगल-बझ’ घ्या, ’फेसबुक’घ्या नाही तर ’ट्विटर’घ्या.. जेथे तेथे पंक्याचे फोटो खिजवायला बसलेले असतातच.
कसं काय जमतं बुवा ह्या पंक्याला इतके भटकायला? मी जरा कुठं जायचे म्हणले की लग्गेच बायको………..अरे.. येस्स,… बायको!!..
काय म्हणालात? पंक्याचे लग्न ठरले आहे??? तारीख पण ठरली आहे..?? मस्त रे…. डिसेंबर दुर नाही बघा.. नुकतेच फेसबुकवरचे पंक्याचे स्टेटस ’सिंगल’ पासुन ’एंन्गेज्ड’ झाले आहे.. लवकरच ’मॅरीड’ होईल.
… ऍन्ड द काऊंटडाउन बिगीन्स…
टिक टिक.. वन….. टिक टिक… टु… टिक टिक.. थ्री….
तळटीप:
लोकाग्रहास्तव मिशीवाल्या पंक्याचा फोटो इथे चिकटवत आहे –

Pankajz@Flickr
पुणेरी सुचना : ह्या पोस्टच्या प्रतिक्रियेमध्ये पंक्याच्या फोटोंबद्दल काढलेले कोणत्याही प्रकारचे सन्माननीय भाष्य खपवुन घेतले जाणार नाही. त्याबद्दलच्या भलत्या-सलत्या प्रतिक्रिया देऊन
वाचकांनी नाहक आपला शाब्दीक अपमान ओढवुन घेऊ नये.
Like this:
Like Loading...