पुणेरी पगडी काळवंडली..


पुणे ‘सायकलींचे शहर’, ‘विद्येचे माहेरघर’, ‘महाराष्ट्राची सांस्कृतीक राजधानी’, ‘पेंन्शनर लोकांचे शहर’, ‘ऐतीहासीक वारसा लाभलेले शहर’, ‘चांगले हवामान, मुबलक पाणीसाठा लाभलेले शहर’ अशी एक ना अनेक बिरुदावल्या घेउन आम्ही पुणेकर जगत होतो. पुणेकर असल्याचा सार्थ अभीमान होता आम्हाला.. आहेचं. मग भले लोक ‘पुणेरी’ म्हणुन खिल्ली उडवोत, भले पुण्यात झळकणाऱ्या पाट्यांची इंटरनेटवर विनोद निर्मीती होवो. पुणेकर ‘दीड शहाणे’, पुणेकर ‘खडुस’ म्हणुन संबोधले जावो पण तरीही आम्ही पुणेकर हे पुणेकरच होतो.

‘खुन्या मुरलीधर’, ‘पत्र्या मारुती’, ‘जिलब्या मारुती’ असली विचीत्र नावं असलेल्या देवदेवतांवर आमचा अढळं विश्वास आहे, काळ कितीही कॉम्पेटेटीव्ह झाला तरीही दुपारी जेवणाच्या वेळी आणि नंतर वामकुक्षी काढण्यासाठी केवळ आणि केवळ पुणेकरच दुकानं बंद ठेवु शकतात. पुण्यापासुन केवळ १८० कि.मी. अंतरावर असलेल्या मुंबईला अनेक दंगली, आतंकवादी हल्ल्यांनी फोडुन काढले परंतु तरीही आमचे पुणे हे शांत होते. घड्याळाच्या काट्यावर चालणारी मुंबई इतक्या जवळ असुनही, येथील जिवन मात्र संथ गतीने पुढे सरकणारेच. कोणी शिक्षणासाठी तर कोणी निवृत्त जिवन शांततेत घालवण्यासाठी पुण्यात आले आणि पुण्याचेच होऊन गेले. ‘पुणे तेथे काय उणे’ म्हणताना.. ‘पुणे तेथे दहशतवादी हल्लेच उणे होते’ पण कोण्या निष्ठुरने तेही भरुन काढले.

१३ फेब्रुवारी, २०१० रोजी पुण्यात झालेला बॉम्ब ब्लास्ट अजुनही आम्ही मानण्यास तयार नाही, खरं सांगायचं तर विश्वासच बसत नाही अजुन की ‘आमच्या पुण्यात’ असं काही होऊ शकतं!

‘त्या’ दिवशी ‘ती’ बातमी म्हणता म्हणता वाऱ्यासारखी पसरत होती. आधी प्रत्येक जण तो एक ‘गॅस सिलेंडरचाच’ स्फोट आहे असंच म्हणत होते. कश्याला कोण येतेय पुण्यात स्फोट घडवायला? आहे काय आमच्या पुण्यात? असेच जो तो म्हणत होता, पण गृह मंत्रालयाने ‘तो’ ‘दहशतवादी हल्ला’ असल्याची पुष्टी दिली आणि सगळ्यांची मनं ढवळुन निघाली.

‘कोरेगाव पार्क’ तसं म्हणलं तर फार कमी प्रमाणात पुण्याचे अस्तीत्व दाखवतो. खरं पुणे म्हणजे ‘सदाशिव पेठ’, ‘नारायण पेठ’, ‘कोथरुड’ वगैरे. परंतु कोरेगाव पार्क तेथे असलेल्या ‘ओशो आश्रमामुळे’ सदांकदा विदेशी लोकांची वर्दळ असलेला, पाश्चात्य संस्कृती अंगी ल्यायलेला भाग. परंतु काहीही असले तरी तो होता पुण्यातच. ‘जर्मन बेकरी’, ‘मार्झोरीन’, ‘नाझ’, ‘एम.जी.रोड’ ह्या भागात नं गेलेला असा नविन पिढीतील युवक म्हणजे अगदीच ‘सो अऩ कुल्’

‘ती’ बातमी आली आणि ट्विटर वर माहीतीचा ओघ सुरु झाला. कुठे झालं, किती वाजता?, कॅज्युऍलीटीज किती? हेल्पलाईन काय? ह्याबरोबरच पुणेरी शालजोड्यातील राजकारण्यांबद्दल असलेला संताप विवीध ट्विट्सच्या माध्यमातुन व्यक्त होतं होता. हे सगळं इथेच थांबेल ना? मुंबईच्या २६/११ ची पुनरावृत्ती तर होणार नाही ना? ह्या विचारांनी मनाचा थरकाप उडत होता. जो-तो आपले आप्त, मित्र परीवार सुखरुप आहेत ना? ह्याबरोबरच अधीक सुरक्षा आणि दक्षता बाळगण्याबद्दल फोन, एस.एम.एस.च्या माध्यमातुन संपर्क करत होता.

ज्या पुण्यात ‘शिवाजी महाराजांनी’ शाहीस्तेखानाची बोटं कापुन त्याला घाबरवुन पळवुन लावले त्या पुण्यात असं व्हावं? ज्या पुण्याच्या शेजारी लागुन असलेल्या सिंहगडावर तानाजीने आपल्या प्राणाची आहुती देऊन गड काबीज केला तेथे एखादा भेकड बॉम्ब लपवुन पळुन जातो काय आणि निष्पाप लोकांचा बळी जातो काय हे फार मनाला टोचणी लावणारे होते. ज्या पुण्याने ‘दगडुशेठ हलवाई’, ‘मंडई’, ‘कसबा गणपतीवर’ भक्तीरुपाने जिव ओवाळुन टाकला त्याच पुण्यात आज असे घडावे?

‘बाप्पा, आहेस कुठे तु??…’ एक आर्त स्वर बहुतांश पुणेकरांच्या मनामधुन निघत होता. मराठी लोकांसाठी लढणारे, मराठी भाषेसाठी लढणारे कुठे आहेत सगळे जेंव्हा महाराष्ट्राच्या, मराठी अजुनही जपुन ठेवलेल्या पुण्यावर हल्ला झाला? शिवरायांचे पोवाडे गाणारे, पेशव्यांची संस्कृती सांगणारे कुठे आहेत हे ‘बहाद्दर’? अहो आपल्याच बस-गाड्या काय कुणी पण फोडेल? आपल्याच लोकांना कोणी पण काळे झेंडे दाखवेल. हिम्मत असेल तर फोडा ना त्या दहशतवाद्यांच्या गाड्या. असेल हिंमत तर रोखा ह्या अतीरेक्यांना. ‘वाघाचं कातडं पांघरलं म्हणुन कोणी गाढव वाघ होतं नाही’, लहानपणी पंचतंत्र, हितोपदेश मधुन ऐकलेल्या गोष्टीची सत्यता मला आज उमगली.

आज ‘त्या’ घटनेला १ दिवस होऊन गेला. आठवड्याची सुरुवात झाली, पण क्वचीतच कोणी सहकारी ‘त्या’ घटनेबद्दल बोलत आहे. ‘दृष्टी आड सृष्टी’ म्हणतात खरं, पण दुःख लपवल्याने ती कमी थोडी नं होतात? आज ह्या एका घटनेने आम्ही इतके हेलकावुन गेलो, तेथे मुंबई मात्र गेली कित्तेक वर्ष हे सहन करत आहे ह्या विचाराने खरोखरचं मुंबईकरांचे आश्चर्य मिश्रीत कौतुक वाटले.

पुणेकर सहनशील आहेत, हळवे आहेत. त्या स्फोटाने अनेकांच्या मनांना खिंडारं पडली असतील.

स्वाभिमानानं, तेजानं तळपणारी पुणेरी पगडी ‘त्या’ काळ्याकुट्ट धुरानं नक्कीच काळवंडली असणार…