Tag Archives: भटकंती

भटकंती लिमीटेड: ताम्हीणी-लोणावळा


पावसाळा आणि ताम्हीणीचे नाते फार पुर्वीपासुनचे. पावसाळ्यात ह्या घाटाचे जे रुप होते ते केवळ अवर्णनीय. दुधाळ धबदबे, दाट धुके, कोसळणारा पाऊस आणि हिरवीगार झाड-लाल मातीचे विलोभनीय सौदर्य पहाण्यासाठी प्रत्येकजण इथे भेट देतोच.

परंतु ताम्हीणी घाटातुनच एक रस्ता लोणावळ्याकडे जातो. तसा फारसा परीचीत नसलेला हा रस्ता ऑफरोडींग बरोबरच तुफान सौदर्याची बरसात करणारा आहे. कागदोपत्री लोणावळा केवळ ५० कि.मी आहे परंतु तेथे पोहोचण्यासाठी मात्र बराच वेळ लागतो ह्याचे कारण अतीशय अरूंद आणि खराब रस्ता. काही ठिकाणी रस्ता इतका खराब, लहान आणि दाट झाडीतुन जाणारा आहे की इथुन पुढे खरंच रस्ता आहे की नाही असा प्रश्न पडावा.

शनिवारी आम्ही ह्याच रस्त्याने फोटोग्राफीसाठी निघालो. निघताना उन आणि काळ्या ढगांचा लवलेशही नसलेले आकाश पाहुन थोडी निराशा होती पण मुळशी धरण मागे टाकले आणि हवामानातील बदल जाणवायला लागला. सुर्य ढगांच्या आड लपला होता, हवेतील गारवा वाढला होता आणि काही क्षणांतच पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला शिंपडणारा पाऊस नंतर मात्र कोसळु लागला.

ताम्हीणीचा ’बरा’ रस्ता सोडुन लोणावळ्याचा खराब रस्ता पकडला. सर्वत्र दाट धुके होते. गायी-म्हशी, मेंढ्यांचे कळप आणि डोक्यावर पावसापासुन बचाव करण्यासाठी घोंगडे घेउन फिरणारे गावकरी आणि भाताची खाचरं दिसु लागले.

एके ठिकाणी बर्‍यापैकी पठार बघुन गाडी थांबवली. फोटो काढायला काही मिळेल असे वाटत नव्हते कारण दरीमध्ये संपुर्ण धुकेच होते. हवेतला गारवा सुखावत होता. पाच मिनीटं थांबुन पुढे निघावं असा विचार करत असतानाच हवेचा एक जोरदार झोत समोरचे धुके काही क्षणांसाठी बाजुला करुन गेला. ते काही क्षण अवर्णनीय होते. आमच्या समोरच एक मोठ्ठा, महाकाय पर्वत उभा होता जो धुक्याच्या दुलईमागे कुठेतरी दडुन गेला होता. इथे असे काही असेल ह्याची यत्कींचीतही कल्पना आम्हाला नव्हती. नेहमीच्या रहाटगाड्यात असंख्य चिंता, गोष्टी डोक्यात ठाण मांडुन बसलेल्या असतात. मात्र ह्या वेळी डोक्यात फक्त एकच विचार होता..’वॉव्व.. कित्ती सुंदर आहे हे सगळं!!’

एका हातात जोरदार वार्‍याने उडणारी छत्री सांभाळत तर दुसर्‍या हातात हॅन्डशेक येऊ न देता पावसाचे पाणी टाळत, सांभाळत कॅमेराने फोटो टिपणे चालु झाले. आजुबाजुला वर्षासहलीसाठी आलेले काही युवक-युवतींच्या चेहर्‍यावर आमच्या हातातील छत्र्या पाहुन ’काय अरसीक लोकं आहेत’ अश्याप्रकारचे भाव पसरले. अर्थात आम्हाला त्याची पर्वा नव्हती. काही वेळातच तो महाकाय डोंगर पुन्हा ढगांमध्ये बुडुन गेला आणि आम्ही पुढे निघालो.

काही अंतर पुढे गेलो आणि पंक्याचा ’सिक्रेट लेक’ सापडला. परंतु इथे खुप वेळ थांबुनही फोटो काढण्यासारखे काहीच मिळाले नाही. सर्वत्र धुक्याची दाट दुलई पांघरली होती जी बाजुला होण्याचे काहीच चिन्ह दिसेना. फोटो काढण्याच्या नादातच बरोबरचा मित्र ’रितेश’ शेवाळ्यावरुन घसरला आणि जाम दगड-पाण्यात आपटला. परंतु माझा पहीलाप्रश्न मात्र – ’लेन्स ठिक आहे ना रे?’

शेवटी ह्या सिक्रेट लेक वर पुन्हा यायचे असा निर्धार करुन आम्ही पुढे गेलो. रस्ता हळु हळु अजुनच खराब आणि अरुंद होत चालला होता. अधुन मधुन दिसणारे गावकरी किंवा पावसात चिंब भिजलेल्या त्यांच्या झोपड्यासुध्दा दिसेनाश्या झाल्या होत्या. रस्त्यावर कुठेही मार्गदर्शक पाट्या नव्हत्या त्यामुळे दोन रस्ते असल्यावर वळायचे कुठे हा मोठ्ठा संभ्रम निर्माण होत होता. ह्या निर्जन रस्त्यावर सोबत केली ते दोन मोठ्या सर्प आणि रानटी सश्यांनी. सकाळी १० वाजता घरातुन बाहेर पडलो होतो, एव्हाना ३ वाजले होते. पोटात भुकेने कावळे ओरडत होते. बरोबर खाण्यासाठी काही नाही आणि आजुबाजुला दुकानं सोडा वस्ती सुध्दा नव्हती. बरंच अंतर पार केल्यावर शेवटी दुरवर लोहगड,विसापुर चे दर्शन झाले आणि रस्ता बरोबर असल्याची खात्री पटली.

मग तेच किल्ले प्रमाण धरुन पुढे जात राहीलो. हळु हळु रस्ता बरा होत गेला आणि लवकरच लोणावळ्याच्या सुप्रसिध्द ऍम्बी-व्हॅलीच्या रस्त्याला लागलो. इथुन पुढचा रस्ता मात्र लाजवाब होता. धुक्याने पुर्ण रस्ता, डोंगर, दर्‍या व्यापुन टाकल्या होत्या. जागो-जागी बहुतांश मुंबईकरांच्या वर्षाहृतुसाठी आलेल्या पर्यटकांच्या गाड्या लागलेल्या होत्या. सर्व प्रकारचे ’सौदर्य’ आसमंतात भरुन गेले होते. परंतु आम्हाला वेध लागले होते खाण्याचे. अश्यातच आधी रेल्वे क्रॉसींग आणि मग भुशी डॅमपाशी मोठ्ठा ट्रॅफीक जाम लागला. तो पार करुन कसेबसे ए़क्स्प्रेस-वे ला लागलो. वाटेत मनसोक्त पेटपुजा केली हे सांगणे न लागे.

पुण्यात पोहोचलो तेंव्हा लख्ख सुर्यप्रकाश होता परंतु चिखलाने माखलेले कपडे, पायताण आणि कॅमेरावर अजुनही ठाण मांडुन बसलेले पावसाचे थेंब घडलेला स्वप्नवत प्रवास स्वप्न नव्हते ह्याची प्रचीती देत होता.

भटकंती लिमीटेड: पाबे खिंड


॥ श्री पंकज बाबा प्रसन्न ॥

माझा डी.एस.एल.आरचा मालक होण्याचे स्वप्न श्री पंकजबाबांच्या उपासनेनंतर त्यांच्या कृपेने सफळ झाले. परंतु त्यानंतर मात्र नेहमीच्या कामात व्यस्त झाल्यानंतर फोटो काढायला जमेनासे झाले. घरातच, आजुबाजुला काढलेले फोटो असा कितीसा आनंद, समाधान देणार? त्यात पंकजबाबांचा ब्लॉग आणि फ्लिकर अकांऊंट ’भटकंती अन-लिमीटेड’ नवनविन फोटोंनी भरभरून वाहत होता.

मिशीवाला पंक्या नामक पोस्ट लिहून मी मनातली जळफळ व्यक्त केलेली होतीच. परंतु पंकजबाबांची अघाध करणी बघा, ती पोस्ट लिहीतानाच मला साक्षात्कार झाला आणि फोटो मिळवण्यासाठी घरात बसुन उपयोग नाही तर त्याला भटकंती गरजेची आहे ह्याचे ज्ञान झाले.

मग थोडेफार फिरलो, चांगले फोटो मिळाले आणि उत्साह वाढीस लागला. अश्यातच माझ्या दोन मित्रांनी माझ्या पावलावर पाऊल टाकुन डी.एस.एल.आर खरेदी केला आणि मला प्रथमच भटकंतीला कंपनी मिळाली.

ह्या शनिवारचा मुहुर्त साधुन अनलिमीटेड नाही, पण लिमीटेड भटकंतीची मुहुर्तवेढ रोवली आणि ’पाबे खिंडीला’ धावती भेट दिली.

’पाबे खिंड’, सिंहगडाच्या पायथ्यापासुन खानापुर/पानशेतचा रस्ता धरायचा आणि तेथुन डावीकडे वळुन तोरणा / राजगडाकडे जाणारा चिंचोळा घाट रस्ता पकडुन ’पाबे खिंड’ गाठावी. येथुन दोन महाकाय किल्ले- तोरणा आणि राजगडाचे विहंगम दृश्य घडते.

वेळेअभावी जास्ती न लिहीता काही निवडक फोटोंची मालीका इथे जोडत आहे, आश्या आहे ते आपल्या पसंतीस उतरतील.

ह्युंदाई आय-२०, ड्राईव्ह युअर वे –

नॉट ऑल रोड लिड्स टु रोम, सम लिड्स टु डिव्हाईन नेचर –
(तोरणा आणि राजगड दोन महाकाय किल्ले कॅमेरामध्ये टिपण्याचा एक केविलवाणा प्रयत्न)

व्हेन स्काय हॅज टु ऑफर सो मच… क्लिक इट..

राजगड –

तोरणा –

येताना भेटलेले शेतकरीबाबा, ज्यांनी त्यांच्या शेतीची, पेरणीच्या कामांची सर्व माहीती स्वतःहुन दिलीच आणि परत त्यांचे काही फोटो आणि त्यांच्या बैलजोडीचे (राजा आणि प्रधान) फोटो सुध्दा काढायला लावले. एवढेच नाही तर पंधरा दिवसांनी भातलावणीच्या वेळी पुन्हा एकदा भेट देण्याचे आमंत्रण सुध्दा दिले –

भटकंती- निळकंठेश्वर फोटो आणि माहीती


पुण्यापासुन फक्त ५० कि.मी. दुर निळकंठेश्वर नावाचे हे सुंदर भटकंतीसाठी ठिकाण आहे हे फार कमी जणांना माहीत असेल. सिंहगडापासुन फक्त २० कि.मी. वर अत्यंत कमी गर्दीचे आणि सिंहगडाच्या तुलनेचे, किंबहुना त्याहुनही सुंदर ठिकाणाबद्दल थोडेसे आणि काही फोटो.

निळकंठेश्वर हे खरं तर एका मोठ्या डोंगरावर बसलेल्या शिव-शंकराच्या देवळाचे नाव. ह्या देवळाच्या भोवती असंख्य पौराणीक काळातील सुंदर शिल्प उभारली आहेत. मी या-आधी तिन वर्षापुर्वी या ठिकाणाला भेट दिली होती त्यानंतर आणि आजच्या भेटीमध्ये एक-दोन अपवाद वगळता सर्व शिल्प त्यांचे सौदर्य टिकवुन होती हे आश्चर्य.

निळकंठेश्वरला जाण्यासाठी सिंहगडापायथ्याशी वसलेल्या डोणजे गावापासुन फाटा फुटतो जो पानशेत/ वरसगावाकडे जातो. त्या रस्त्याने थोडे गेल्यावर दोन मार्ग आहेत.

१. खानापुरच्या थोडे पुढे गेल्यावर निळकंठेश्वराची पाटी दिसते. तेथे गाडी लावायची. तेथुनच एक छोटी मोटरबोट धरणाच्या पाण्यातुन निळकंठेश्वराच्या पायथ्याशी आणुन सोडते. तेथुन पर्वताच्या टोकावर जाण्यासाठी रस्ता आहे. साधारण २ तासाचे चढण आहे. अर्थात रस्ता बरा आहे त्यामुळे घसरण्याची भिती नाही.

२. याच रस्त्याने वरसगाव धरणापर्यंत सरळ जायचे. वरसगाव धरणाच्या भिंतीपासुन एक छोटा रस्ता निळकंठेश्वराकडे जातो. हा रस्ता अत्यंत खराब आहे. पावसाळ्यात ठिकठिकाणी ओढे, नाले, छोटे धबधबे लागतात जे पार करुन जावे लागतात. अर्थात गाडीनेही वरपर्यंत जाता येत नाही. गाडी साधारण पर्वताच्या मध्यापर्यंतच जाते तेथुन पुढे चालतच जावे लागते. हे अंतर साधारण-पणे १ तासाचे आहे.

वर खाण्यापिण्याची फारशी (चांगली) सोय नाही त्यामुळे बरोबर खाणे घेउन जाणे हेच योग्य.

फोटो –

बहुतांश शिल्प ही दशावतार, अष्टविनायक, भिम-बकासुर, वाली-सुग्रीव युध्द, महाभारत, रामायणातील इतर काही प्रसंग, संत ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज, संत रामदास, सावित्री-यम आणि अश्या अनेक घटना, प्रसंगाबद्दल आहेत.

पावसाळ्यात इथे वातावरण खुपच सुखःद असते. रविवारी आम्ही गेलो होतो तेंव्हा अगदी हलका पाऊस पडत होता आणि सर्वत्र दाट धुके होते.. खुप्प्च सुंदर. वरुन दिसणारे पानशेत आणि वरसगावचे बॅक वॉटर आणि सर्व पॅनोरमा विहंगमच. हे सर्व अनुभवायला पावसाळ्यात इथे एकदा भेट द्यावी असेच हे ठिकाण आहे.