Tag Archives: मराठी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे ई-साहित्य


आज सहज महाजाल चाळत असताना बुकगंगा.कॉम नावाच्या साईटवर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे [मराठी आणि इंग्रजी भाषेतील] साहित्य ई-बुक स्वरुपात मोफत उपलब्ध असल्याचे आढळले म्हणून ती लिंक इथे लगेच शेअर करत आहे.

खर तर माझ्यादृष्टीने हि लज्जास्पद गोष्ट आहे कि मी यापैकी एकही पुस्तक अजून वाचलेले नाही. पण आता नकळत संधी सांधून आलेली आहे तेंव्हा श्री-गणेशा करतो.

डाऊनलोडच्या पानावर जाण्यासाठी इथे टिचकी मारा.

नुतन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा


नविन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा

नवे वर्ष नव्या आशा,

क्षितीजाच्या या दाही दिशा

नविन वर्षांत तुमच्या सर्व आशा, आकांक्षा पुर्ण होऊ देत. क्षितीज पादाक्रांत करण्यासाठी लागणारे बळ तुमच्या पंखांना लाभु देत.
२०११ वर्ष भरभराटीचे आणि सुख समृध्दीचे जावो.

सर्व वाचकांना नुतन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा……

डो.भु.भु.म. भुंग्याचा आज वाढदिवस


 

 

 

हाच तो दिवस होता, २० मार्च २००९ जेंव्हा ’डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंग्याने’ महाजालावर पदार्पण केले आणि बघता बघता असंख्य वाचक मिळवले. ९ महिन्यात एक लाखाच्यावर वाचक वर्ग आणि ’स्टार माझा’च्या मराठी ब्लॉग स्पर्धेत मिळवलेला प्रथम क्रमांक हे त्याच्या शिरपेचात खोवले गेलेले दोन मानाचे तुरे. परंतु त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे सर्व वाचकवर्गाने मनापासुन दिलेले प्रेम आणि वेळोवेळी आपल्या अमुल्य प्रतिक्रियांनी दिलेला प्रतिसाद हाच तो त्या भुंग्याचा ह्या वर्षात कमावलेला ठेवा.

जानेवारी महिन्यात लाखांचा टप्पा पार झाल्यावर खरं तर फारसे लेखन ह्या ब्लॉगवर झालेच नाही. पण तरीही पंचविस हजाराच्या वर वाचकांनी ह्या ब्लॉगला भेटी दिलेल्या पाहुन वाचकांना हा ब्लॉग अजुनही तितकाच भावतो आहे ह्याचा विश्वास वाटला आणि त्याच निमीत्ताने ह्या ब्लॉगवर साठलेली धुळ झटकण्याचा चंग बांधता आला.

पुन्हा एकदा हा भुंगा लवकरच भुणभुणायला लागला आहे, आणि एका दीर्घ रहस्यमय, खुनांवर बेतलेली गुन्हेगारी कथा घेऊन आपल्या भेटीस येण्यास उत्सुक आहे.

आपला ह्या ब्लॉग वरील विश्वास, प्रेम आणि लोभ असाच कायम रहावा हीच ह्या पहिल्या वाढदिवशी ’डोक्यात भुणभुणणाऱ्या मराठी भुंग्याला’ आपण दिलेली सप्रेम भेट ठरेल.

धन्यवाद.

नादखुळा


“छंद”, आयुष्यात प्रत्येकाने केंव्हा ना केंव्हा, कुठल्या नं कुठल्या प्रकारचा जोपासलेला असतो. पुर्वीच्या काळी छंदाची व्याप्ती फार छोटी होती. ‘पोस्टाची तिकीटं गोळा करणे’, ‘दुर्मीळ नाणी, नोटा गोळा’ करण्यापासुन दुर्मीळ गाण्यांच्या ध्वनीमुद्रीका, वेगवेगळ्या वाहनांची, अभिनेत्यांची छायाचित्र गोळा करण्यापर्यंतचे छंद हे सर्वसामान्यांपर्यंत मर्यादीत होते. परंतु काही छंद मात्र केवळ श्रीमंतांचीच मक्तेदारी होऊन राहीले होते.

काळ बदलला, ग्लोबलायझेशन मुळे अनेक संधी उपलब्ध झाल्या, गरीब मध्यमवर्गीय झाले आणि मध्यमवर्गीय- उच्च मध्यमवर्गीय. खिश्यात खुळखुळणारा पैसा वाढला परंतु त्या अनुषंगाने येणारे ताणतणाव सुध्दा वाढले आणि पुन्हा एकदा मनुष्य छंदांकडे आकर्षीत झाला. वर उल्लेखलेले छंद हे बहुदा स्वतःपुरतेच मर्यादीत होते. परंतु आता छंद जोपासण्याची व्याप्ती वाढली आहे. एकसमान छंद जोपासणारे अनेकजण एकत्र येऊन एखादा समुह स्थापन करतात आणि हे सर्वजण मिळुन आपला छंद जोपासताना दिसत आहेत.

गेल्या काही वर्षात असे अनेक ग्रुप मला माहीती पडले त्याबद्दल थोडेसे –

१. सायकल – सायकल हे नुसतेच पर्यायी वाहन न रहाता किंवा तो केवळ एक ‘फिटनेस मंत्र’ न रहाता तो आता अनेकांचा एक छंद झाला आहे. पुर्वीच्या काळी ३५००ची सायकल म्हणजे लोकं भुवया उंचावायचे पण आता केवळ सायकल चालवण्याची आवड म्हणुन अक्षरशः ५० हजारांच्या सायकल चालवणारे सुध्दा पहातो आहे. अश्याच एका ग्रुपचा मी सदस्य आहे. झेन-ऑफ-सायकलींग असे त्या ग्रुपचे नाव. ‘कोकण दर्शन’, ‘पुणे-गोवा’, ‘पुणे-कन्याकुमारी’, ‘मनाली-लेह-लडाख’ अश्या अनेक उत्तोमोत्तम सायकल राईड्स ह्या ग्रुप ने पार पाडलेल्या आहेत. १८ वर्षाच्या युवकापासुन पासष्ठीच्या आज्जी-आजोबांपर्यंतचे दीडशेहुनही अधीक सदस्य ह्या ग्रुप मध्ये आहेत. ही झाली पुण्याची गोष्ट. पण असेच अनेक ग्रुप मुंबई, बॅगलोर सारख्या मेट्रो मध्ये पण आहेतच की.

२. फोटोग्राफी – एक काळ होता जेंव्हा फोटो काढणे म्हणजे श्रीमंतांचे काम असायचे. खानदानी फोटो काढुन भिंतींवर चढवायचा रिवाजच होता ना तेंव्हा. नंतर मात्र सर्वसामान्य एक चैन म्हणुन महिन्यातुन एकद वेळेस स्टुडीओ मध्ये जाऊन सहकुटुंब फोटो काढुन घेऊ लागले. फिल्म रोल असेपर्यंत तरी फोटो काढणे हे तसे चैनीचेच काम होते. आवश्यक तेंव्हाच, सणा-समारंभाचेच फोटो काढले जायचे. डिजीटल युग अवतरले आणि फोटोग्राफीचा कायापलट झाला. अनेक उदयोन्मुख फोटोग्राफर जन्माला आला. फुलं, झाडं, किडे-मकोडे, निसर्ग इतकंच काय भिकारी, रस्त्यावरील वाहतुक, प्राणी, पक्षी अश्या अनेक चित्र-विचीत्र गोष्टींचे फोटो निघु लागले आणि सौदर्याचे एक वेगळेच दालन सर्वांसाठी उघडले गेले.

डिजीटल एस.एल.आर ने तर क्रांतीच घडवुन आणली. खुद्द डोळ्यांनी सुध्दा जी गोष्ट सुंदर दिसु शकत नाही तितके सौदर्य ह्या कॅमेराने प्रत्येक गोष्टीला बहाल केले. केवळ फोटोग्राफीचा छंद म्हणुन कॅमेरा आणि त्याला लागणारे फिल्टर्स, लेन्स ह्यासाठी लाखो रुपायांवर हसत हसत पाणी सोडणारे कित्तेकजण आजुबाजुला दिसतील. नुसता पैसाच नाही तर त्यासाठी लागणारी चिकाटी, संयम सुध्दा वाखाणण्यासारखा आहे. काही दिवसांपुर्वीच एका वृत्तपत्रामध्ये एका प्रसिध्द छायाचित्रकाराने काढलेला दोन सिहिणींचा फोटो आला होता. हा फोटो मिळवण्यासाठी तो म्हणे २७० तास एका जागी खिळुन होता.

अर्थात ही झाली व्यावसायीक बाजु. परंतु केवळ छंद म्हणुन सुध्दा अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील. सिंहगडावर जाणारी नेहमीची वाट सोडुन गडावर नं जाता गडाच्या थोडे खाली जाळीमध्ये, पाणवठ्याच्या ठिकाणी गेलात तर पक्ष्यांची छायाचित्र टिपण्यासाठी तासंतास एका जागी चिकटुन बसलेले अनेक हौशी छायाचित्रकार दृष्टीस पडतील. केवळ सुर्योदय टिपायचा म्हणुन पहाटे ३.३० ला घरातुन निघुन ९० कि.मी. कुडकुडत्या थंडीत जाऊन विलक्षण दृष्य टिपणारे सुध्दा दिसतील. फोटोग्राफर्स@पुणे (AKA P@P) हा असाच एक फोटोग्राफीमध्ये स्वतःला झोकुन देणाऱ्या ध्येयवेड्यांचा ग्रुप.

अर्थात वर दिलेली उदाहरणं ही ढोबळ मानाने सांगता येतील. ह्यामधील काही छायाचित्रकारांचा उद्देश केवळ पक्ष्यांची छायाचित्र टिपणे असतो, काहींचा केवळ निसर्ग, काहींचा सुक्ष्म गोष्टींचा (मॅक्रो) तर कुणाचा अजुन काही. पण अजुन एक समुह ह्या सर्वांपासुन थोडा वेगळा असा आहे. ह्या छायाचित्रकारांचा उत्साह ‘रेल्वे’चे फोटो टिपण्यात आहे. आश्चर्य वाटले ना? मलाही वाटले होते. पण ही मंडळी केवळ रेल्वेचे उत्तोमोत्तम फोटो मिळवण्यासाठी कधी कोकणच्या कड्यात तर कधी माळरानावर ठाण मांडुन बसतात. इंडीयन रेल्वेज फॅन क्लब असे ह्या समुहाचे नावं.

३. चित्र रेखाटन – छायाचित्रकलेशी थोडेफार सार्धम्य दाखवणारा हा अजुन एक छंद. पण ह्यामध्ये कुठल्या यंत्राची मदत नं घेता पेन्सील आणि रंगाच्या कुंचल्याच्या सहाय्याने चित्र रेखाटन करण्याची कामं ही मंडळी करतात. शनिवार-रविवारी कधी पुणे विद्यापीठ, कधी नदीकाठचे एखादं मंदीर तर कधी अजुन कुठे ही मंडळी कोऱ्या कागदावर चित्र रेखाटत असतात. पुण्यामधील संस्कार-भारती नावाने हा समुह कार्यरत आहे. ह्याचाच एक उपविभाग मोठ मोठ्या रांगोळ्या रेखाटण्याच्या छंदात मग्न आहे. गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ मोठ्या रांगोळ्यांच्या पायघड्या घालणारे हेच ते ‘संस्कार भारती’

५. रॉयल इन्फिल्ड – बुलेट, दणदणीत वाहन, पुर्वीच्या काळी फक्त काही निवडक लोकंच वापरत. पण आजच्या युगात हे वाहन तरूणांची ‘धडकन’ बनले आहे. रॉयल इन्फिल्ड, थंडरबर्ड वापरणाऱ्या अश्याच काही हौशी, छंदीष्ट ‘रायडर्स’ चा सुध्दा एक ग्रुप आहे. ‘हिमालयन’ सफारी अंतर्गत हा ग्रुप बऱ्याच वेळा मनाली ते लेह-लडाख हा कठीण मार्ग आपल्या दुचाकींवरुन मार्गक्रमण करत पार पाडतो.

लाखाच्या घरात मिळणारी, अधुन मधुन खर्च काढणारी आणि इंधन सुध्दा जास्त खाणारी ही बुलेट केवळ छंदापायी आज अनेकजण बाळगुन आहेत.

असे अनेक छंद जोपासणारे समुह आपल्या दृष्टीस पडतात. बहुतेक ट्रकच्या मागे ब-याच वेळा आपण लिहीलेले बघतो ‘नाद करायचा नाय‘ पण आजच्या युगात ‘नाद करायचाच‘, आत्ता नाही करणार तर मग कधी? रोजच्या ह्या रडगाण्याला, मानसीक ताणतणावांना, हेवेदावे-मत्सराला विसरण्यासाठी, स्वतःला वेळ देण्यासाठी छंद जोपासणे आवश्यक होऊन बसले आहेच पण त्याच बरोबर काही करत असाल तर ‘मेक ईट लार्ज’ करण्याच्या प्रवृत्तीमुळे जे करु ते ‘शान’से करु झालेले आहे. ह्याच समुहांमुळे अनेक नविन ओळखी होतात, आपला छंद तर जोपासला जातोच, पण त्याचबरोबर ती कला अधीक चांगली होण्यासाठी इतर लोकांची मदत सुध्दा होते.

अजुन आहेत तुमच्या माहीती असे काही छंद? जरुर प्रतिक्रियेमध्ये कळवा, कदाचीत आपल्यातलाच एखादा उदयोन्मुख कलाकार आपल्यात लपलेले गुण निपजण्यासाठी उद्युक्त होइल.

सादर करत आहोत, मराठी ब्लॉगर्सचे हक्काचे व्यासपीठ


सादर करत आहोत, मराठी ब्लॉगर्सचे हक्काचे व्यासपीठ, 
यंदाच्या धुळवडीच्या दिवशी, १ मार्च २०१० रोजी.
फाल्गुन कृष्ण द्वितिया, शके १९३१.
रात्रौ: १०:०३ मि. (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
आपली ऑनलाईन
उपस्थिती नोंदवा.

अधिक माहितीसाठी जरुर लिहा अथवा चॅट करा
pankajzarekar@gmail.com
mebhunga@gmail.com
aniket.com@gmail.com
vikrant.deshmukh888@gmail.comज्ञानेश्वरांच्या”परि अमृताच्याही पैजा जिंके” नंतर कुण्या पोर्तुगीज फादर स्टीफन्सने लिहिलेल्या या ओळीच मराठीचा गोडवा सांगण्यास पुरेशा आहेत. आहेच आमची मऱ्हाटी वाणी अशी की… कुणालाही ऐकताना भुरळ पडावी. कुणी मनापासून कौतुक केले की कानात सतारीच्या तारा छेडल्याचा भास व्हावा आणि अगदी मनापासून शिवी हासडली तर कानात उकळते तेल ओतल्यागत जाळ अंतर्मनात निघावा अशी आमची मराठी. “महा”राष्ट्राची बोलीभाषा, राजभाषा आणि जनभाषा.
होय तोच मराठी जिथे प्रांत उगवत्या सुर्याच्या साक्षीने मंदिरातल्या काकडआरतीबरोबरच मशिदीची पहिली सुरेल बांगही तेवढीच सुंदर ऐकू येते.  जिथे संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ओवीने अवघ्या जगाला वेडे केले. तुकोबांच्या अभंगांनी अवघा मनुष्यगण अद्वैत झाला. संत एकनाथांनी जगाला भूतदयेचा संदेश दिला. रामदास स्वामींनी बलोपूजेचा मंत्र फुंकला.
याच संत-महंतांपासून स्फूर्ती घेऊन शहाजीराजे आणि जिजाऊंनी शिवाजी महाराजांसारखा पुत्र घडवला, शिवाजी महाराजांनी याच ओघवत्या मराठी भाषाकौशल्यावर जेधे, पिंगळे, देशपांडे, गुजर, मालुसरे अशी वाघाच्या काळजाची माणसे जोडली, महाराष्ट्राबाहेर जाऊन प्रांत जोडला आणि परक्या शक्तींना आपल्या तलवारीच्या आणि या मराठी मातीतून आलेल्या धाडसाच्या जोरावर पाणी पाजले. याच मराठी धर्मापायी संभाजीराजांनी मृत्यू कवटाळला.पेशव्यांनी शिंदे फडणीसांच्या बळावर अटकेपार झेंडे लावले. तात्या टोपेंनंतर वासुदेव बळवंत फडकेंनी क्रांतीची पताका उभारली आणि पुढे टिळक, आगरकर आणि सावरकरांसारखे निधड्या छातीचे वीर ती पताका घेऊन मिरवले.

गोखले, आंबेडकर, कर्वे, फुले, विनोबा भावे, भाऊराव पाटील, कॉ. डांगे यांसारख्या समाज धुरिणांनी जो पाया घालून दिला होता त्यावर बाबा आमटे आणि त्यांचे कुटुंबीय, अशासारख्यांनी कळस उभारला. कला-क्रीडा आणि साहित्यामध्येही फाळके, मंगेशकर, प्रभात, भीमसेन जोशी, पुल देशपांडे, माडगूळकर, तेंडुलकर ते आजचे सलील-संदीप, अजय-अतुल, गावसकर, कुंटे, हजारे, वाडेकर अशा अनेक रथी-महारथींनी जग पादाक्रांत केले आहे.

ही सगळी ऊर्जा कुठून आली? त्याचे एकच उत्तर आहे “आमची मराठी”. होय तीच मराठी अस्मिता जी सह्याद्रीच्या कातळकड्यांत आहे, भीमा-कृष्णा-कोयनेच्या तीरावर आहे, कोकणातल्या लाल मातीत आहे, विदर्भाच्या रांगड्या बोलीत आहे, मराठवाड्यातल्या अजंठा-वेरुळच्या पाषाणकलेत आहे, सातपुड्याच्या थंड हवेत आहे. त्याच मातीने आम्हाला जन्म दिलाय. आणि तिचे आमच्यावर सात जन्माचे ऋण आहे. या ऋणातून आम्ही मुक्त होऊ इच्छित नाही. पण थोडी का होईना परतफेड नक्की करावीशी वाटते आहे. म्हणूनच हा एक प्रामाणिक प्रयत्न. “मराठी मंडळी”चा…!!!

नऊवारी जरीकिनारी पैठणी, बुगड्यांची माळ आणि पसाभर मोठी नथ घातलेले खानदानी सौंदर्य या मराठी भाषेच्या अलंकारामध्ये दडलेले आहे. शाहिरी पोवड्याची डफाची थाप, लेझीमची गाज आणि ढोल-ताशाचा नाद मराठी भाषेत वीररस काठोकाठ ओतत आहेत. ढोलकीवरचा ताल आणि घुंगराचा छणछणाट ऐकून मराठीचा घट शृंगाररसाने निथळत आहे. नाट्यसंगीताचा आब मराठीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो आहे. तसाच सुमधुर भावगीताने धबाबा कोसळणारा अधीर मनःप्रपातही संथ होतो आहे.
संक्रांतीच्या तिळगूळाने ऊबदार आणि मधुर झालेली मराठी वाणी जहालपणे शिमग्याला मुक्तहस्ते शिव्या देऊ शकते आणि धुळवडीला गटारात लोळवू शकते. काळ्या आईचं दान संक्रांतीला वाणाच्या रुपाने तिला परत करायचं हे या मराठी माणसांनीच जगाला शिकवले. याच मराठी काव्य-शास्त्र-विनोदाने अवघ्या विश्वात सन्मानी गुढ्या उभारल्या आहेत. आषाढी-कार्तिकीला अवघा महाराष्ट्र “ग्यानबा-तुकाराम” करत भक्तीरसात न्हाऊन लाडक्या विठूमाऊलीला भेटायला पायी वारीला निघतो. श्रावणी सोमवारच्या गाभाऱ्यातल्या पहाटेची धीरगंभीर मंत्रोच्चारणा अवघे ब्रम्हांड अवतरल्याचा अनुभव देते. बैलपोळ्याच्या दिवशी बैलाला पुरणाचा घास भरवून त्याच्याही उपकारांची जाणीव आम्हांला असते. गौरी-गणपतीला अवघा महाराष्ट्र उत्सवी वातावरणात रमून जात असतो. कोजागिरीच्या टिपूर चांदण्यात केशरी दुधाच्या साथीने गप्पांना काय तो बहर येतो. दिवाळीला अवघा मराठी मुलुख ऐश्वर्यात न्हाऊन निघतो. एवढे ऐश्वर्य की लक्ष्मीपूजनला उदारपणे जुगारही खेळावा. पाडव्याला नथ सांभाळत कारभारीला ओवाळणारी घरधनीण आपल्या सख्याकडे किती नजाकतदार लाडिकपणे पाहून पाडवा “वसूल” करत असते हे काय अवघ्या मराठी मुलखाला ठाऊक नाही?

अशी ही विविधरंगी विविधढंगी मराठी संस्कृती. हिच्या पायीच आम्ही हा यज्ञ सुरु केला आहे. खात्री आहे की आपण पण या यज्ञात सामील व्हाल. आपणा सर्वांचे स्वागत.

आम्ही “मराठी मंडळी”ला यज्ञ म्हणतोय कारण, आम्हाला पुर्णपणे कल्पना आहे की सगळ्याची सुरुवात ही नवख्याच्या नशिबानं होते, आणि मग सुरु होते अत्यंत खडतर अशी परिक्षा… पदोपदी! पण तरीही हा यज्ञ करण्याचा घाट आम्ही घातलाय… आपल्या माय मराठीसाठी. आत्ताच्या जगामध्ये आणि जागतिकीकरणामध्ये कोणतीही प्रादेशिक भाषा टिकवुन ठेवणं तसं अवघड झालंय. पण ते अशक्य नक्कीच नाही! आपली मराठी या रेट्यातही टिकुन राहावी यासाठी आपल्यापैकी प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयत्न करतोय. मराठी साहित्य तर समृद्ध आणि सक्षम आहेच. कोणी अजुनही मराठी वाचन आवर्जून करतोय, कोणी मराठीमधुन लेख लिहीतोय. अनेक मराठी वृत्तपत्रं, मासिकं, साप्ताहिकं आहेत ज्यातुन बरेच लोक आपले लेख लिहीत असतात. असंच अजुन एक माध्यम आहे – ब्लॉग्स. तुम्हाला वाचतांना आश्चर्य वाटेल, पण आजमितीला सुमारे १५ ते २० हजार लोक आपापल्या ब्लॉग्सवर मराठीमधुन लिहीत आहेत! हे लोक तिथं आपल्या कथा लिहीतात, कविता प्रकाशित करतात, मतं मांडतात, अभ्यासपुर्ण लिखाणसुद्धा  करतात!! आणि हो, इथं सुद्धा तेवढंच दर्जेदर लिखाण असतं!!! पण अजुन म्हणावा तेवढा प्रकाशझोत या माध्यमावर आणि या माध्यमातुन लिहिणाऱ्यावर पडलेला नाहीये. नेमकं याच कारणासाठी हा यज्ञ आहे. या यज्ञाचं स्वरुप, त्याची व्याप्ती आणि त्याची फलनिष्पत्ती याबद्दल स्वतंत्रपणे लिहुच, पण यात सगळ्यात महत्वाचं ते सुरुवात करणं.

तर अशी ही आमची “इये मराठिचिये नगरी”

संक्रांतीचा मुहुर्त साधून याच मराठी आईचे वाण घेऊन आम्ही वाटचाल सुरु केली. आमची सगळी एकेकाची संगणक कौशल्ये एक केली आहेत या “मराठी मंडळी” नावाच्या सुगड्यात. येताय ना तुम्ही पण? यंदाच्या धुळवडीला हा चौदा विद्या, चौसष्ट कला असा विविधरंगांनी भरलेला घट आम्ही तुमच्यावर रिता करत आहोत, तुम्हांला नवरसात चिंब भिजवायला… आहात ना तयार?

‘सेक्सी’


तुम्ही जर ५०+ वयोगटातले असाल तर कदाचीत तुमच्या भुवया उंचावल्या असतील! मराठीला वाहीलेल्या ह्या साईटवर असले अचरट, आंबट शब्द वाचुन ‘हा काय चावटपणा?’ असं नक्कीच मनोमन पुटपुटला असाल.

तुम्ही ४० ते ५० वयोगटातले असाल तर ह्या पोस्ट मध्ये ‘तसलं’ काहीतरी असण्याची शक्यता समजुन एक तर ही पोस्ट टाळण्याचा प्रयत्न केला असाल किंवा चिडुन ह्या पोस्टवर काहीतरी खवचट प्रतिसाद द्यायच्या उद्देशाने ही पोस्ट उघडली असेल.

पण तुम्ही तिशीतले किंबहुना विशीतले असाल तर ‘सेक्सी’ ह्या शब्दाचे प्रचलीत असलेले ‘अनेक’ अर्थ तुम्ही जाणुन असाल आणि अगदी साफ मनाने तुम्ही हे पान उघडले असेल, नाही का?

आजच्या युगात ‘सेक्सी’ ह्या शब्दाने अनेक अर्थ अंगीकारले आहेत. पुर्वीच्या काळी ‘सेक्सी’ हा शब्द केवळ ‘कामुक’ गोष्टींशी निगडीत बोलतानाच वापरला जायचा. नगनत्व, कामक्रिडा, यौन किंवा लैगीक विषय हे ‘सेक्सी’ असायचे. पण आजच्या बोलीभाषेत ‘सेक्सी’ शब्दाचे परीमाणच बदलले आहे. आजच्या युगात कोणतीही आकर्षक गोष्ट ही ‘सेक्सी’ असते. रस्त्यावरुन धावणाऱ्या गाड्या सेक्सी असतात, घड्याळं, कपडे, चपला/बुट सेक्सी असतात, निसर्ग सौदर्य सेक्सी असते, ‘कुछ कुछ होता है’ मधली दादी सेक्सी असते, मोबाईल,लॅपटॉप्स, आयपॉड्स आणि इतर गॅडेज्ट्स सेक्सी असतात, अहो इतकच काय पदार्थांची चव सुध्दा सेक्सी असते… आता बोला!!

हा शब्द इतका प्रचलीत झाला आहे की कोणताही युवक किंवा युवती कसलाही विचार न करता अगदी मोकळेपणाने ‘सेक्सी’ म्हणुन मोकळे होतात.

भाषेत नवे शब्द निर्माण होणे हे भाषेच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. प्रत्येक नविन पिढी नविन शब्द प्रचलित करत असते. भाषा नेहमीच बदलत होती आणि बदलत आहे. ‘सही’ हा असाच कधी तरी उगवलेला शब्द. कुठलीही सुंदर असलेली गोष्ट ‘सही’ ह्या शब्दाने गौरवली जायची. पण आजच्या काळात ‘सेक्सी’ ह्या शब्दाने ‘सही’ ह्या शब्दाची जागा घेतल्याचेच दिसुन येते.

असे आहेत अजुन काही नविन शब्द जे तुम्ही इथे प्रतिसादात देऊन लेखकाच्या आणि वाचकांच्या ज्ञानात भर घालु शकाल?

हो, पण तुम्ही सुचवत असलेला शब्द तस्साच ‘सेक्सी’ असला पाहीजे बरं का!!

मराठी ब्लॉगर्स मेळाव्यासाठी काही सुचना


असं म्हणतात, पुणेकर कधी सुचना देण्याची संधी सोडत नाही, मग आम्ही तरी त्याला कसा अपवाद असणार?

मराठी ब्लॉगर्स मेळाव्यासाठी काही सुचना –

१. ब्लॉगर्स मेळाव्यातील सदस्य ओळखण्यासाठी कोणत्याही प्रकारची खुण (उदा. हातात गुलाबाचे फुल) ठरवलेली नाहीये. उगाच ह्या बाबतीत नसत्या चौकश्या करु नयेत
२. पार्कींग किंवा प्रवेश फी साठी लागणाऱ्या सुट्या पैश्यांची मागणी आयोजकांकडे करु नये. आम्ही कधीही कुठल्याही मंदिरासमोर बसत नाही, सुट्यापैश्यांचा प्रश्न आम्हालाही भेडसावतो.
३. मेळाव्यामध्ये खाण्या-पिण्याची व्यवस्था केलेली नाहीये, उगाच त्या उद्देशाने येऊन स्वतःचा हिरमोड करुन घेऊ नये
४. अनुपस्थीतीत ब्लॉगर्स किंवा त्यांच्या ब्लॉग्स बद्दल वाईट-साईट बोलुन स्वतःचा शाब्दीक अपमान करुन घेऊ नये
५. तिळगुळ म्हणुन (स्वस्तातला) हलवाच मिळेल, तिळाच्या वड्यांचा आग्रह धरु नये
६. पुण्याबाहेरुन आलेल्या सदस्यांना पुण्यातील ‘प्रेक्षणीय स्थळांची’ माहीती ह्या मेळाव्यात दिली जाणार नाही
७. बागेमध्ये भेळ-पाणीपुरी मिळत नाही, तसेच लहान मुलांसाठी झोपाळे, पाळणे, घसरगुंड्यांची सोय नाही.
८. शिमग्याला अजुन वेळ आहे, त्याची तयारी आत्तापासुन करण्याचा प्रयत्न करुन नाचक्की ओढवुन घेऊ नये.
९. ब्लॉगर्स मेळाव्यामध्ये सर्वांच्या सक्रिय सहभागाची अपेक्षा आहे त्यामुळे महीलांनी येताना, विणकाम, भाजी निवडण्यासारख्या गोष्टी बरोबर आणु नये
१०. मेळावा संपल्यावर, फुलं, गजरे, पेढा वगैरेंसारख्या गोष्टी किंवा कोणत्याही प्रकारची प्रसाद या सदरात मोडणारी गोष्ट देण्यात येणार नाही. उगाचच सुचक नजरांनी काही शोधण्याचा प्रयत्न करु नये
११. ईलेक्ट्रॉनीक्स गॅजेट्स, मोबाईल फोन, कपड्यांवरील सेल, तुळशीबागेतल्या नविन वस्तु यांवर ह्या मेळाव्यात चर्चा केली जाणार नाही.
१२. नुकत्याच उद्योगाची सुरुवात केली असली तरी पापड, लोणची, कुरडया, सुगंधी तेलं, उटणी, वनौषधी यांची विक्री इथे खपवुन घेतली जाणार नाही. मराठी माणसांचा पाय ओढण्याचा आमचा उद्देश नाही परंतु त्यासाठी ह्या मेळाव्याचा कृपया वापर करु नये.
१३. मराठीब्लॉग विश्वातील घडामोडींवर इथे चर्चा होईल, दुरचित्रवाणीवरील सारेगमप, अनुबंध, ह्या गोजीरवाण्या घरात वगैरे मालीकांवर नाही.
१४. मेळाव्याला आलेल्या सदस्यांचे बागेत बसलेले, फुलांशेजारी, हिरवळीवर बसलेले फोटो काढुन मिळणार नाहीत, त्याबद्दल उगाचच आयोजकांकडे हट्ट धरु नये.
१५.मेळाव्याच्या ठिकाणी ह्या सुचनांना विनोदाचा विषय बनवु नये

जरा हलकेच घ्या हं!! तुम्हा सर्वांची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत!

मराठीचा मुद्दा चुकीचा कसा?


ही मिडीया खरं सांगायचं तर डोक्यात गेली आहे माझ्या. अक्कल नसल्यासारखं ‘बायस’ होऊन बातम्या देणं चालु आहे असं मला तरी वाटतं.

 • अबु आझमी बद्दल जे काही घडलं त्यावरुन त्यांनी ‘राज ठाकरेचे गुंड’ हा जो उल्लेख केला तो मला तरी फार खटकला. मारामाऱ्या काय फक्त राज ठाकरेच करतो का?
 • गेल्या वर्षी कलेक्टर कचेरीवर जी मोडतोड मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली त्याची भरपाई म्हणुन राज ठाकरेने ५२ हजार रुपये जमा केले ही बातमी का मग झाकोळली गेली?
 • मराठी आरक्षणाला लोकांचा विरोध आहे. का? का तर म्हणे देश्याच्या फाळण्या होतील. मग
  – दलीत, बॅकवर्ड क्लास वगैरेंची कास धरुन जी आरक्षणं ठेवली जातं आहेत त्याचं काय?
  – आंबेडकरांनी ५० वर्षापुर्वी त्यावेळची परीस्थीतीला अनुसरुन जाती-जमातींना आरक्षणं दिली होती. आज त्याची काय किंमत? खरंच त्याची गरज आहे?
  – धनाड्य, करोडपती असुनही जाती-जमातीचे दाखले देऊन फिज मध्ये कन्सेशन्स दिली आणि घेतली जात आहे. टक्के जास्त असताना, केवळ कमी टक्के असलेला मागासवर्गीय आहे म्हणुन एखादा हुशार मुलगा प्रवेश्यापासुन डावलला जात आहे. जातीच्या दाखल्यावरुन निदर्शन केली तर ते गुंड नाहीत का? तेंव्हा मात्र ते आपल्या हक्कासाठी लढणारे साधु संतच ना!
  – स्त्रियांची आरक्षणं अजुनही चालु आहेत. गेल्या वर्षीच स्त्रियांना आरक्षणं मिळावीत म्हणुन मोर्चे उठवले गेले त्याचे काय? आज कुठल्या क्षेत्रात स्त्रिया मागे आहेत? माफ करा, पण पुरुषांसाठी बनवलेल्या कंन्डोमच्या जाहीरातीत सुध्दा स्त्रियांचा वावर आहे. मग आरक्षणं हवीतच कश्याला?
  एकीकडे आजची स्त्री अबला नाही सबला आहे, स्वकर्तुत्वावर उभी आहे.. आहे ना, पण मग इंजीनीयरींगला, शाळा प्रवेशात, गव्हर्नमेंट सर्व्हीसमध्ये आरक्षण कश्याला?
 • ज्या वाहीन्या मराठीचा मुद्दा चुकीचा मानतात, त्याच वाहीन्या प्रादेशीक वाहीन्या करतातच कश्याला मग चालु. मराठी, बांगला, कन्नड, पंजाबी. जर हिंदी देशभाषा आहे तर सर्व वाहीन्या हिंदीतुनच करा ना! पण नाही. प्रादेशीक वाहीन्यांमुळे मिळत असलेला पैसा कोण सोडणार?

अर्थात प्रत्येक स्त्री आरक्षणं मागत नाही, दलित लोकं सांगायला जात नाहीत आम्हाला आरक्षण द्या. स्वाभीमानी लोकही आहेतच. त्यामुळे वरचा प्रश्न त्या मोजक्या लोकांना जे या आरक्षणाच्या चुलीवर आपल्या भाकऱया भाजुन घेतात आणि सरकारला आहे

राज ठाकरेने आज ‘भारतीय स्टेट बॅकेला’ चिठ्ठी लिहुन महाराष्ट्रात मराठी मुलांना प्राधान्य द्यावे अशी सुचना केली तर मिडीयाच्या दृष्टीने ती ‘धमकी’ कशी होते? काय चुकीचे केले त्याने?

शिवाजी महाराजांनी आपल्याच मुलुखात घुसुन मुजोरी करणाऱ्या शाहीस्तेखानाची बोटं तोडली. मग माजलेल्या ‘आबु आझमीच्या’ कानफाटात लावल्यावर ते चुकीचे कसे?

एका नॅशनल टि.व्ही. ला दिलेल्या मुलाखतीत त्याने संपुर्ण मराठीचा वापर केला. समोरचा माणुस हिंदी, इंग्रजीतुन प्रश्न विचारत होता आणि राज ठाकरे त्याला मराठीतुनच उत्तर देत होता. जमत नसतानाही तोंड वेडी वाकडी करत हिंदी/इंग्रजीतुन मुलाखती देणाऱ्या नेत्यांसमोर ही मुलाखत खुपच छान वाटली.

राजने जे बोलले ते करुन दाखवले. नुसत्या गर्जना नाही केल्या. आज महाराष्ट्राला खरंच अश्या नेत्याची गरज आहे जो जे बोलेल ते करुन दाखवेल.

जातीय वाद हा प्रादेशीक वादापेक्षा नक्कीच वाईट आणि राजने जातीय वाद केलेला माझ्या तरी स्मरणात नाही.

प्रश्न अनेक आहेत. कदाचीत ते चुकीचे सुध्दा असतील. राज ठाकरेने पत्करलेला मार्ग काही अंशी चुकीचा असेलही पण पुर्णपणे चुकीचा नक्कीच नाही.. आय.एम.एच.ओ (इन माय ऑनेस्ट ओपीनीयन)

हा लेखामुळे कुणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतु नक्कीच नाही, तरीही कुणाला वाईट वाटले असल्यास मी मनापासुन माफी मागतो