ब्लॉग माझा – ३


स्टार-माझा चे अ‍ॅन्कर आणि ’ब्लॉग-माझा’ स्पर्धेचे आयोजक/सह-निर्माते श्री प्रसन्न जोशी ह्याच्याकडुन स्पर्धेच्या तिसर्‍या वर्षाबद्दल माहीती देणारी ई-मेल मिळाली. इतरांना त्याचा लाभ व्हावा म्हणुन ती मेल इथे जोडत आहे.

सर्वांनी जरुर सहभाग घ्यावा. सर्व स्पर्धकांना माझ्या मनःपुर्वक शुभेच्छा. May the best blog win!

~ अनिकेत समुद्र
स्टार-माझा, ब्लॉग माझा – २ (२००९-२०१०) विजेता 🙂


नमस्कार मंडळी! ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या आयोजनाचं हे तिसरं वर्ष. पहिली ‘ब्लॉग माझा’ स्पर्धा घेतल्यानंतरच्या काळात मराठी ब्लॉगॉस्फिअरमध्ये खूप गोष्टी घडल्यायत. मराठी ब्लॉगर्सच्या पुण्या-मुंबईत गाठी-भेटी झाल्या, पुण्यातल्या साहित्य संमेलनापूर्वी आयोजित ‘संमेलनपूर्व संमेलन’ या कार्यक्रमात मराठी ब्लॉग, ब्लॉगर्सबाबत गंभीर चर्चा झाली, मराठी ब्लॉगर्स मंडळी इंटरनेटवर एकत्र आली, वृत्तपत्रांनी, नियतकालिकांनी मराठी ब्लॉगॉस्फिअरची ठळक दखल घेतली. एकूणच मराठी ब्लॉगॉस्फिअर देशातल्या प्रादेशिक ब्लॉगॉस्फिअरमध्ये दखल घेण्यायोग्य ठरलंय. हीच मराठी ब्लॉगरशिप सेलिब्रेट करतोय ‘स्टार माझा’; ‘ब्लॉग माझा’ सिझन-३च्या रूपानं.
विशेष म्हणजे यावेळी आपले परिक्षकही खास आहेत. ज्यात आहेत लीना मेहेंदळे ज्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तर आहेतच, पण संवेदनशील लेखिका आणि मराठी ब्लॉगरही आहेत. मराठीतल्या ‘साधना’ या प्रतिष्ठित साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ आपले संपादकीय कौशल्य पणाला लावून तुमचे ब्लॉग तपासतील. तसंच, आयटी तज्ज्ञ माधव शिरवळकर हेही परिक्षक मंडळात आहेत.
तेव्हा, मंडळी तुमच्यात दडलेल्या लेखक / लेखिकेला केवळ डायरी, फेसबुक, ऑर्कुट किंवा ट्विटर पुरताच ठेवू नका. या स्पर्धेत भाग घ्या. ब्लॉगवर ताजं लिहिलं असेल तर ठिकच नाही तर ब्लॉग अपडेट करा. ब्लॉग नसेल तर या स्पर्धेच्या निमित्तानं सुरू करा.
काय म्हणालात? बक्षिसाचं काय? अहो, बक्षीसे आहेतच की! पहिल्या तीन जणांना आणि उर्वरीत दहा जणांना उत्तेजनार्थ. आता काय बक्षीसं आहेत ते गुपित राहू द्या की! शिवाय, तुमच्या निवडलेल्या ब्लॉगला ‘स्टार माझा’च्या वेबसाईटवर प्रसिद्धी आणि बक्षीस वितरण समारंभ थेट ‘स्टार माझा’वर!
मराठी माझी, ब्लॉग माझा, स्टार माझा……………..शुभेच्छा!

स्पर्धेचे स्वरूप-

१. ब्लॉग मराठीतच लिहिलेला हवा (देवनागरी)

२. अठरा वर्षांपुढील कुणीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतं.

३. सर्वोत्तम ब्लॉग निवडण्याचे अधिकार पूर्णत: परिक्षक आणि स्पर्धा संयोजकांकडे असतील. त्याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण देण्यास परिक्षक, संयोजक, स्टार माझा बांधिल नसतील. तुमच्या एन्ट्रीज या तुम्हाला अटी मान्य असल्याच्या निदर्शक असतील.

४. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी blogmajha3@gmail.com या ई-मेल अँड्रेसवर ई-मेल करावा. ज्यात, तुमचे नाव, पत्ता, व्यवसाय, दूरध्वनी क्र, मोबाईल क्र, व ई-मेल द्यावा. ई-मेल अँड्रेस देणं अनिवार्य आहे. याशिवाय, तुमच्या ब्लॉगची लिंक द्यावी.

५. या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही.

६. एकावेळी एका स्पर्धकाला फक्त एकच ब्लॉग पाठवता येईल.

७. ब्लॉग पाठवण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०१०. स्पर्धेचे निकाल ऑक्टोबर २०१०च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होतील. तसेच, संबंधित विजेत्यांना पत्र अथवा ई-मेलद्वारे निकाल कळवला जाईल.

८. यानंतर ‘स्टार माझा’च्या खास एपिसोडमध्ये विजेत्यांचा सत्कार करण्यात येईल व पुरस्कार वितरण होईल.

९. स्पर्धेचे आयोजन, नियमावली, अटी, बक्षीसे यासंदर्भात कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय बदल करण्याचे अधिकार स्टार माझाकडे असतील.

११.ब्लॉगमधला कंटेंट स्वत:चाच असावा. जर अन्य स्त्रोतांकडून माहिती घेतली असेल, तर त्यांचा नाममिर्देश करावा. ब्लॉग या माध्यमाचे महत्व जपावे. ब्लॉग व त्यातील मजकूर आपलाच असल्याचे सिद्ध करणे, ही स्पर्धकाची जबाबदारी आहे.

ता. क. एन्ट्रीज blogmajha3@gmail.com वरच पाठवा.

इंद्रजाल कॉमीक्स


बालपणी शाळांना उन्हाळी सुट्या लागल्यावर पहीला उद्योग असायचा तो पुस्तकांची लायब्ररी लावुन त्यातुन पुस्तक आणणे. ह्यात बहुदा पहीला नंबर असायचा तो “इंद्रजाल कॉमीक्स” चा. वेताळ, मॅन्ड्रेक्स आणि लोथार ह्यांच्या साहसी कथांनी भरलेली चित्रमय कथानकं म्हणजे जीव का प्राण होते. असं म्हणतात गुगलवर सर्वकाही मिळते म्हणुन जरा गुगला-गुगली केली आणि हिंदी आणि इंग्रजी भाषेतुन संगणकावर उतरवुन घेता येतील अशी अनेक इंद्रजाल कॉमीक्स मिळाली.

खरं तर मराठीमधुन मिळाली असती तर मज्जा आली असती, पण हे ही नसे थोडके. दुधाची तहान ताकावर भागवली म्हणा.

खालील दुव्यांवर टिचक्या मारुन तुम्ही त्या त्या भाषेतल्या कॉमीक्सच्या वेबसाईट्सवर जाऊ शकता.

हिंदी भाषेतुन कॉमीक्स
इंग्रजी भाषेतुन कॉमीक्स

पुणे मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळावा, निमंत्रण पत्रिका(टिप: वरील निमंत्रण पत्रिकेवर टिचकी मारुन अधीक मोठ्या आकारातील पत्रिका आपण वाचु शकता किंवा संगणकावर उतरवुन घेऊ शकता.)

नमस्कार मंडळी,

मराठी ब्लॉगर्सचे पुण्यातील पहिले-वहिले संमेलन येऊ घातले आहे. शनिवारी पेठे काकांबरोबर बसुन कार्यक्रमाची अंतिम रुपरेषा ठरवली आहे. ह्या मेळाव्यासाठी “स्टार माझा” मध्ये काम करणारे श्री. प्रसन्न उपस्थीती लावणार आहेत, तसेच पुण्यातील मिडीया-हाईट संस्थेतर्फे काम करणारे त्यांचे काही मित्र सुध्दा ह्या सोहळ्यास येतील. मराठी ब्लॉगींग विश्वाचा गाढा अनुभव असलेल्या ह्या लोकांचे अनुभव, अपेक्षा, अधिक माहीती कळेल अशी आशा वाटते.

कार्यक्रमाची रुपरेषा अशी राहील –

दिनांक – १७ जानेवारी, २०१०
वेळ – सायंकाळी ठिक ४ वाजता
स्थळ – पु. ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रोड, बिग बाझार जवळ, पुणे ४११ ०३९.
(राजाराम पुलावरुन सिंहगड रोडवर डावीकडे वळावे)

४ ते ४.१५ – सर्व ब्लॉगर मित्र-मैत्रीणींनी उद्यानाच्या प्रवेशद्वारापाशी जमणे

४.१५ ते ४.३० – उद्यान प्रवेश. तेथून डाव्या बाजूने धबधब्या जवळ असलेल्या गोल झोपडीत जमणे. येथे एक रजिस्टर ठेवले जाईल. त्यात प्रत्येकाने पुढील क्रमाने माहिती देणे अपेक्षित आहे..१)संपूर्ण नाव २) पत्ता ३) दूरध्वनी क्रमांक ४) ब्लॉग चे नाव ५ ) ब्लॉगचा पत्ता URL ६) ई-मेलचा पत्ता इत्यादी.

४.३० ते ५ – श्री. अनिकेत समुद्र, श्री. सुरेश पेठे आणि श्री. दिपक शिंदे आलेल्या मित्र-मैत्रिणींचे स्वागत आणि प्रास्ताविक करतील. नुकत्याच पार पडलेल्या संक्रांतीच्या पार्श्वभुमीवर (१४ जानेवारी) छोटेखानी तिळगुळ समारंभ पार पडेल.

५ ते ५.३० – प्रत्येकजण आपली ओळख, आपल्या ब्लॉगची ओळख करुन देतील.

५.३० ते ६.०० – चर्चा. ब्लॉगबद्दलच्या अपेक्षा, मराठीब्लॉग्सच्या श्रुंखलेत जोडल्या गेलेल्या ब्लॉग्समधील घडामोडी, त्यातील चांगले वाईट मुद्दे, ब्लॉग्सबद्दलच्या शंका त्यांची उत्तरे वगैरे

६ ते ६.३० – श्री प्रसन्न जोशी आणि मिडीया-हाईट कंपनीमधील त्यांचे सहकारी ब्लॉग्सबद्दलचे त्यांचे अनुभव सांगतील तसेच सर्व ब्लॉगर्सना मराठी ब्लॉग्स अधीकाधीक समृध्द होण्यासाठी मार्गदर्शन करतील.

६.३० ते ७ – पुढे काय? सर्व जण एकत्र येऊन काही चांगल्या योजना राबवु शकतो का त्याबद्दलची चर्चा. अश्या गाठी-भेटी कधी करायच्या याबद्दलचा आराखडा मांडुन हा स्नेहमेळावा समाप्त होईल.

स्नेहमेळाव्याची औपचारीकता संपली असली तरी ७ ते ७.३० पर्यंत सर्वजण (ज्यांना शक्य आहे त्यांना) एकत्र थांबुन अनौपचारीक गप्पा मारण्यासाठी वेळ.

ह्या स्नेहमेळाव्याचा वृत्तांत आणि फोटोग्राफ्स आपल्यातीलच एक ब्लॉगर प्रभास गुप्ते त्यांच्या मोबाईलमधुन लाईव्ह ट्विट करणार आहेत. आपण हे ट्विट्स पुढील पत्यावर पाहु शकता –
http://twitter.com/PrabhasGupte

ह्या स्नेह-मेळाव्याबद्दलची एक स्वतंत्र पोस्ट सुरेश पेठेकाका टाकतीलच. वरील पोस्टमध्ये काही चुकले असेल किंवा राहीले असेल तर ते त्यांच्या पोस्टमध्ये मांडतील. पण तो पर्यंत ही पोस्ट पुण्यातील पहिल्या-वहिल्या मराठीब्लॉगर्सच्या स्नेहमेळाव्याची निमंत्रणपत्रिका समजा.

चला तर मग एकमेकांना आपल्या ब्लॉग्सच्या नावाने ओळखणारे आपण ह्या ओळखीचे रुपांतर व्यक्तीगत ओळखींमध्ये करुन टाकु. आपली उपस्थिती ह्या स्नेहमेळाव्यासाठी प्रार्थनीय आहे.

दिशा-दर्शक

नकाश्यावर टिचकी मारुन मोठ्या आकारातील नकाशा पहाता येईल.

वरील नकाश्यामध्ये ‘A’ हे ठिकाण ‘राजाराम पुल’ दर्शवते. राजाराम पुल नवसह्याद्री सोसायटी (ताथवडे बाग) मधुन सरळ पुढे आले की हा रस्ता लागतो. किवा आपण म्हात्रे पुलावरुन डावीकडे वळुन “डी.पी.” रोड पकडुन सरळ पुढे येत राहीलात तरी हा रस्ता लागतो.

राजाराम पुलावरुन डावीकडे वळायचे आणि सरळ जात रहायचे, थोड्या अंतरावर आपल्याला सिंहगड रोडवरील ‘बिग-बझार’ दिसेल (नकाश्यामधील ठिकाण ‘B’), तेथुनही सरळ पुढे जात रहायचे. मग एक पेट्रोल पंप लागेल त्याच्या समोरच पु. ल. देशपांडे उद्यान आहे (नकाश्यामधील ठिकाण ‘C’).

आपण मित्र मंडळ चौकातुन येत असल्यास सिंहगड रस्त्यावर दत्तवाडी ह्या भागापर्यंत (नकाश्यामधील ठिकाण ‘D’) आल्यानंतर पत्ता विचारल्यास सापडण्यास सोप्पे जाईल.

उद्यानामध्ये पार्कींगची भरपुर सोय आहे.

अधिक सखोल दिशा दर्शक हवा असल्यास कृपया मला किंवा पेठे काकांना संपर्क करा.

अप्सरा आली..


इंद्रनगरी मध्ये सर्व देवदेवतांची सभा चालु होती.

इंद्र देव म्हणाले, “बोला नारद मुनी, काय म्हणतं आहे भुलोक?”
नारदमुनी म्हणाले, “नारायण! नारायण!! काय सांगु देवा, अहो सर्व भुलोक तुमच्या नावानं बोटं मोडतं आहे?”

इंद्र देव म्हणाले, “अस्सं, का बरं? ह्याच कारण सांगु शकाल का तुम्ही?”

“महाराज, अहो तुम्ही इथे तुमच्या ह्या मोठ्ठ्या महालात बसुन सुरेल संगीत आणि मोहक अप्सरांच्या नृत्याचा आस्वाद घेता आहात, पण हा मनुष्य-गण ह्या परम सुखापासुन अजुनही वंचित आहे. महाराज आपण मनुष्य-प्राण्याची ही इच्छा आपण पुर्ण करावीत महाराज”, नारदमुनी हातातील चिपळ्या वाजवत म्हणाले.

“मुनीवर, तुमची इच्छा आम्ही पुर्ण करु. ह्या भुतलावर लवकरच एक अप्सरा अवतरेल, पण त्या अप्सरेला अनुभवायला आम्हाला एक नाही ३-४ रुप निर्माण करावी लागतील”, असं म्हणुन इंद्रदेवांनी सभा स्थगीत केली.

आणि काही दिवसांनी खरंच एक अप्सरा अवतरली, “नितळ कांतीच्या, आस्मानी डोळ्यांच्या सोनाली कुलकर्णीच्या देहात, मोहक आणि अतीशय गोड गळ्याच्या बेला शेंडेच्या आवाजात, अजय-अतुल ह्याच्या अजरामर वाद्यवृंदात, अप्सरा आली.. अप्सरा आली.”

नटरंग सिनेमाबद्दल, त्याच्या कथानकाबद्दल अनेक लोकांनी लिहीलेच आहे. त्याबद्दल अधीक काय लिहावे? थोडक्यात सांगायचे झाले तर दोन घुंगरांच्या पटावर पडण्यापासुन सुरु झालेला हा चित्रपट अगदी शेवटचा ढोलकीचा ताल संपेपर्यंत जो रंगत जातो ते वर्णने केवळ अशक्यच आहे.

बेला शेंडेच्या आवाजात, अमृता खानविलकरच्या ठसकेबाज लावणीत सुरु झालेला हा चित्रपट अंगाअंगावर रोमांच उभे करतो. चित्रपटगृहात नुसता टाळ्या आणि शिट्यांचा आवाज भारलेला असतो. आपला हात आपसुकच डोक्यावर जातो. पण आपल्या डोक्यावर हवेत उडवायला नाही फेटा असतो, नाही टोपी. अतुल कुलकर्णीचा कसलेला रेखीव बांधा पाहुन वाटते कश्याला आपण शाहरुख, अमिर, सलमान च्या सहा आणि आठ पॅक्सचा बाऊ करतो अहो आपला अतुल काय मागे आहे काय? आणि त्यावर साज त्याच्या त्या पिळदार मिश्यांचा. कसला तरणाबांड गडी दिसतो तो!!

सोनाली कुलकर्णीची “एन्ट्री” पण लाजवाब, तिला नाचताना पाहुन असं वाटतं सरळ जागेवरुन उठावं आणि त्या जत्रेत जाऊन तिच्यासोबत ताल धरावा.

चित्रपट भावनांच्या अनेक हिंदोळ्यावर पुढे सरकत रहातो आणि तो चित्रपट अनुभवतानाच मनात एकच विचार चालु असतो, “अप्सरा कधी प्रगटणार?”

“अप्सरा आली” हे गाणं खरंच इतकं देखणं आहे. सोनाली कुलकर्णीचा तो नाजुक, कमनीय बांधा, त्यावर पांढरी शुभ्र साडी, अप्सरांना साजेसा साज-शृंगार, त्याला बेला शेंडेच्या गोड आवाजाची साथ आणि अजय-अतुलचे संगीत. सर्व काही मोहीनी घालणारे. ७० फुटी पडदा आणि डॉल्बी सिस्टीमच्या आवाजात खरोखरच आपण एखाद्या इंद्रपुरीत तर नाही ना? अस्साच भाव प्रत्येकाच्या मनामध्ये असतो. हे गाणं इतकं रंगत की त्याला काही तोडच नाही. स्वर्गीय, डिव्हाईन, पवित्र, मनावर नाजुक संगीतांचे तरंग उमटवणारे अश्या अनेक शब्दात ह्या गाण्याचे वर्णन करता येईल. वाटतं दोन्ही हातं हवेत फिरवुन बोटं डोक्यावर मोडुन दृष्ट काढावी, मला खात्री आहे, सर्व बोटं काड काड आवाज करत मोडली जातील 🙂

चित्रपट संपल्यावरची ती ढोलकी तर अक्षरशः बाहेर पडण्यासाठी उठलेल्या तमाम प्रेक्षकवर्गाला जागच्या जागी खिळवुन ठेवते. डोक्यापासुन पायाच्या नखांपर्यंत रोमांचक लहर ढोलकीच्या प्रत्येक थापावर पसरत असते. असं वाटतं हे सुख कध्धीच संपु नये, हे वाद्य असंच वाजत रहावं.. कायमचं!!!

चित्रपटाला आलेला एक चकचकीतपणा उठुन दिसण्यासारखा. कॅमेराने टिपलेले रंग अगदी सुरुवातीचा तो घुंगरु पडताना टिपलेला मोरपंखी असो, रात्रीची निळाई असो, की विवीध रंगांनी रंगलेला तमाश्याचा फड असो, सगळंच अतुलनीय.

“सारं गावं नावं ठेवायला लागलंय तुला, सगळे तुला नाच्या, फलक्या म्हणत आहेत”, ह्या टोमण्यावर रागानं थरथरणाऱ्या अतुलचा “जे म्हणत आहेत त्यांच्या आया बहीणी दे लावुन माझ्याकडे, दावतो एकेकाला” हे उत्तर पुर्ण थिएटर दुमदुमुन सोडते.

तमाश्याला, त्या कलाकृतीला वाईट दिवस आले आहेत असे नेहमी ऐकण्यात येते. पण नटरंग चित्रपट पाहिल्यापासुन मला तर वाटते पुर्ण मराठी जनता तमाश्यामागे, लावण्यांमागे वेडी झाली आहे. पुण्यामध्ये डेक्कनच्या पुलाखालील पात्रात जेथे बऱ्याच वेळा सर्कस किंवा मनोरंजन नगरी उभी असते, तेथे तमाश्याचा एक फड टाकुन तर बघा, अख्खी जनता लोटेल तेथे. मला तर उगाचच हे सो-कॉल्ड फॉर्मल कपडे फेकुन देऊन मस्त एक पांढरा पायजमा, त्यावर पांढरा सदरा, पायताण आणि डोक्यावर एक फेटा घालुन फिरावेसे वाटायला लागले आहे बघा. आणि हिच परिस्थीती माझ्यासारख्याच अनेक संगणक क्षेत्रात काम करणार्य़ा तरूणांची आहे.

चित्रपट प्रदर्शाच्या आधीपासुन, आजपर्यंत रोज मी यु-ट्युब वर जाऊन ह्या चित्रपटातील गाण्यांचे व्हिडीओ मिळतील का पहातो आहे. ही गाणी कित्तीही वेळा ऐकली तरी कानांचे आणि मनाचे समाधानच होतं नाही आहे. अजुन एकदा.. अजुन एकदा करुन दिवसभर तीच गाणि सतत ऐकत बसावी असं वाटतं बघा!

सर्व उत्तम तर आहेच हो.. पण “जाऊ द्या नं घरी” आणि “अप्सरा आली” गाणी ऐकली की असं वाटतं “अजय-अतुल” आणि “बेला शेंडे” ह्यांना एक कडकडुन ‘प्यार की झप्पी’ द्यावी आणि म्हणावं… “तुस्सी ग्रेट होssss”

गोष्ट दोन मराठी चोरट्यांची – २


एक मोssssठ्ठ शहर असतं. त्या गावात किनई एक छानसं जोडपं रहात असतं. ‘हॅप्पी कप्पल’!! तो जो नवरा असतो ना, तो थोडास्सा दुःखी असतो. म्हणजे कारण असं की तो ज्या कंपनीत काम करत असतो ना, त्या कंपनीचा मालक म्हणजे त्याचा बॉस ना, त्याच्या बायकोचा बाप असतो. आणि हे लग्न ना त्याला मान्यच नसतं मुळी. केवळ एकुलत्या एक मुलीच्या आग्रहाखातर त्याने जमवुन घेतलेले असते. पण त्यावरुन तो त्याच्या ‘जावयाला’ घालुन पाडुन बोलत असतो.

अश्या ह्या दुःखी जावयाच्या संसारात त्याचा एक मित्र येऊन टपकतो. काही तरी बनण्यासाठी, करण्यासाठी तो या मोठ्ठ्या गावात आलेला असतो. पण त्याचं असं कुणीच नसत ना, मग काय करणार बिच्चारा तो त्याच्या मित्राकडेच येऊन रहातो. पण त्याने होतं काय, ह्या दोघांचा संसार उध्वस्त व्हायला लागतो ना. त्यांना स्वतःची अशी प्रायव्हसीच रहात नाही. तो इतके काय काय घोळ घालतो घरात, ती बायको जाम भडकते त्या नवऱ्यावर. ‘एक तर हा तरी राहील घरात नाही तर मी तरी’ इथपर्यंत येऊन पोहोचते.

परंतु, हळु हळु प्रकरणं निवळत आणि तो मित्र त्या बायकोचा फेव्हरेट व्हायला लागतो. दोघांच चांगलं सुत जुळते. बायको शाळेत शिकवायला असते आणि एकदा कसल्याश्या प्रोजेक्टसाठी लेक्चर द्यायला ती तिच्या नवऱ्याला बोलावते. परंतु तो येऊ शकत नाही आणि नेमका त्याच वेळेस डबा घेऊन तो मित्र येऊन पोहोचतो. मग तोच लेक्चर देतो. इतकं छान की मुलं पण खुश आणि ती बायको पण खुश.

याच वेळेस, त्या नवऱ्याच्या ऑफीसमध्ये काही वेगळे घडत असते. एका प्रेस्टेजीयस प्रोजेक्टचे त्याने मेहनत घेऊन बनवलेले डिझाईन तो बाप दुसऱ्या कुणाच्यातरी नावाने खपवुन टाकतो नं. जाम भडकतो तो नवरा, आणि अश्या तडकलेल्या डोक्याने घरी आलेल्या नवऱ्याला त्याच्या मित्राच्या आणि बायकोच्या सलोख्याच्या संबंधांबद्दल शंका यायला लागते.

मग बऱ्याच घटना घडतात आणि दोघांमधील दुरावा वाढत जातो. शेवटी वैतागुन तो नवरा घरातुन निघुन जातो.

मग तो मित्र आजुबाजुच्या परिसरातील छोट्या मुलांच्या सहाय्याने ‘मित्र हरवला आहे’ अश्या आशयाची पत्रक बनवतो आणि गावभर ती पत्रक घेऊन मित्राचा शोध घेत फिरतो.

शेवटी एकदाचा तो मित्र भेटतो, दोघांमधील शंका, वाद मिटतात. तो मित्र नवऱ्याला घेऊन घरी येतो आणि शेवट गोड होतो.

‘प्रसाद ओक’ आणि ‘मकरंद अनासपुरेच्या’ मैत्रीवर बनलेला तुम्हाला ‘दोघांत दुसरा आता सगळं विसरा’ ह्या सिनेमाची ही गोष्ट वाटली की नाही. बरोबर आहे तुमचं उत्तर, पण ही गोष्ट खरी आहे ती ‘यु मी ऍन्ड ड्युपरी’ ह्या २००६ मध्ये प्रदर्शीत झालेल्या एका इंग्रजीपटाची.

बघा, सापडला की नाही दुसरा चोर???

आय.एम.डी.बी.: ५.७/१०
कॅटेगरी: विनोदी / फॅमीली

गोष्ट दोन मराठी चोरट्यांची – १


आज मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे, अगदी छोट्याश्या.

गोष्ट १ –
एक असते छोटेसे गाव. त्या गावात एक कुटुंब रहात असते. कुटुंबात असतात एक नवरा बायको, एक छोटी मुलगी, एक मुलगा, एक भाऊ आणि एक आजोबा. तो मुलगा आणि त्या भावाच्या बाबतीत काहीतरी विचीत्र प्रकार असतो. काय? ते नंतर सांगेन!!.

मुलीला नृत्याची फार आवड असते आणि अश्यातच तिला नृत्याशी संबंधीत एका स्पर्धेत मध्ये भाग घेण्याची संधी मिळते. घरची परिस्थीती बेताचीच असते. परंतु सर्वजण एकत्र होऊन त्या मुलीला त्या स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी देतात. इतकेच नाही, तर सर्वजणच त्या स्पर्धेला त्या मुलीबरोबर प्रोत्साहन देण्यासाठी जाण्याचेही ठरवतात. ही स्पर्धा दुसऱ्या गावाला असते ना, त्यामुळे सर्वजण एक गाडी भाड्याने घेतात आणि निघतात सगळे या प्रवासावर.

मग काय होतं, नेमकं वाटेत त्यांची गाडी बिघडते. म्हणजे काय होतं की, गाडी बंद पडली की परत सुरुच होत नाही. मग ती सुरु करण्यासाठी सर्वांनी मिळुन गाडीला धक्का मारणं हा एकमेव पर्याय उरतो. त्या दुसऱ्या गावाला जाईपर्यंत ही ‘धक्का’दायक गोष्ट चालुच रहाते. बंद पडली गाडी सगळेजण खाली उतरून धक्का मारायचे, गाडी सुरु झाली की पटापट गाडीमध्ये चढुन बसायचे. मजल दर मजल करत असा त्यांचा प्रवास चालु असतो. मध्ये मध्ये छोट्या छोट्या अडचणीय येतच असतात. एकदा तर काय होतं, ते ते आजोबा अचानक आजारी पडतात. मग त्यांना
उपचारासाठी दवाखान्यात दाखल करावे लागते. त्यामुळे आजोबांना दवाखान्यातच सोडुन बाकीचे सर्वजण स्पर्धेला निघुन जातात.

स्पर्धेला विवीध भागातुन छान छान कपडे घातलेले, नटलेले, श्रीमंत लोकं आलेले असतात, त्यांच्यापुढे ही बिच्चारी मुलगी खुप्पच फिक्की पडते. परंतु कसे बसे करुन ती तो शो निभाउन न्हेते..

आणि मग.. एक मिनीट काय म्हणालात? ही गोष्ट ऐकलेली आहे? काय?.. सिनेमाची आहे. हो बरोबर.. कुठल्या?? ‘दे धक्का’… चुsssssssकले…. म्हणजे तसे बरोबर आहे, पण त्याआधी ही गोष्ट आहे एका इंग्रजी सिनेमाची ‘लिटील मिस सनशाईन‘ जो २००६ साली प्रदर्शीत झाला होता. या चित्रपटाची गोष्टच काय, या चित्रपटातील बरीचशी दृश्य जश्शीच्या तश्शी ‘दे धक्का’ चित्रपटात उचलली आहेत अगदी कॅमेराचे ऍंगल सेटींग सुध्दा.

काही किरकोळ फरक आहेत म्हणजे ‘दे धक्का’ मध्ये तो मुलगा पहेलवान दाखवला आहे तर यामध्ये तो मुलगा ‘गे’ असतो. ‘दे धक्का’ मध्ये ‘सिद्धार्थ जाधव’ ला विनोदी व्यक्तीरेखा आहे तर या चित्रपटात तो भाऊ ‘थोडासा वेडा’ दाखवला आहे. ‘दे धक्का’ मध्ये आजोबा (शिवाजी साटम) जिवंत रहातात, यामध्ये ते मरतात. ‘दे धक्का’ मध्ये ती मुलगी शेवटी जिंकते, या मध्ये जिंकत नाही आणि शेवटचे म्हणजे ‘दे धक्का’ मध्ये ‘सिक्स सिटर’ वाहन दाखवले आहे, यामध्ये ‘मेटाडोअर’ आहे. असे किरकोळ फरक वगळता बाकी सगळे शेम टु शेम.


आय.एम.डी.बी.: ८/१०
कॅटेगरी: विनोदी / फॅमीली

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

पुढच्या भागात – दोघांत तिसरा आता सगळं विसरा..

फोटो: ‘अजंठा केव्हज’


अजंठा केव्हज चे काही निवडक फोटो इथे जोडत आहे. प्रत्येक लेणींबद्दलची अधीक माहीती, त्यांचा इतिहास इथे वाचता येईल.